न देखे रवी

न देखे रवी

न देखे रवी, ते देखे कवी !
कवींनी आपले कौतुक करण्यासाठी हे खरडले का ? शक्य आहे.कौतुक इतर कोण करणार हो ? कुठल्याही साहित्य संमेलनाला जा. कवी संमेलनाला तुडुंब गर्दी. पण समाजवादी पक्षात जसे नेते जास्त.. अनुयायी कमी, तसे इथे कवी जास्त, ऐकणारे कमी. असो. उपक्रमवर त्यांची कटकट (आठवत ?.. अमुच्या भाली कटकट लिहली सदैव वटवट करण्याची.) नसल्याने मी आजही कवितांबद्दल लिहणार नाही.(कोणी हु s s श्श्य.. केले ?) पण ही कविता करणारी मंडळी कवितेतर लिखाण करतात तेव्हा
खरी बहार येते. शांताबाई शेळके, प्रवीण दवणे,वसंत बापट वगैरे लोक जेव्हा ललित,स्फुट लेखन करतात तेव्हा खरी मजा येते. येथे गण-मात्रांचे, लांबी-उंचीचे बंधन नसाल्याने कसे ऐसपैस लिहतात. तशात गप्पांची आवड असेल तर मोकळेच सुटलेले असतात. अशाच एका पुस्तकाची आज ओळख करून घ्यावयाची आहे.
एका प्रकांड पंडिताची, ज्ञानयोग्याची, संशोधनात उभे आयुष्य वेचणार्‍याची मुलगी अरुणा रामचंद्र ढेरे. पण ह्या हिमालयाची सावली तीच्या कविता लेखनावर पडली नाही. तीचा एक कविता संग्रह माझ्याकडे आहेत. पण मी त्यांनी फार प्रभावित झालो असे नाही. आवड एखाद्याची. पण तीच्या प्रवासवर्णनाचे एक पुस्तक "वेगळी माती, वेगळा वास" फार वाचनीय आहे. काय वेगळे आहे यात ? यातील वर्णन केलेल्या बर्‍याच ठिकाणी मीही जाऊन आलेलो असल्याने "कवी काय देखे" आणि आपण काय पहातो यातील दरी झटकन लक्षात येते. सहसा कुठल्याही स्थळाला भेट देण्याआधी मी त्याचा अभ्यास करतो. इतिहास, कला, स्थापत्य, यांवरची मिळेल तेवढी माहिती गोळा करतो. सामान्य प्रवाश्यापेक्षा थोडा जास्त वेळही मोडतो. पण अशा क्षुद्र अहंकाराचा फुगा फोडावयाला अशी पुस्तके उपयोगी पडतात.

बदामीला आपल्यापैकी बरेच जण जाऊन आलेला असाल. तिथली लेणी व मंदिरेही पाहिली असाल. आता कवी काय पाहतो (व आपण काय गमावलेले असते) ते पहाण्याकरता वाचा......

. एका खांबाशी मी उभी होते. समोर एक सुंदर युगलशिल्प. नजरेच्या एका झेपेत ते मावेना. .. मग थांबलेच, मन भरून पाहत रहिले.तो तर गंधर्व वाटावा असा देखणा, पुरूषी रुबाब असलेला. होयसळ शिल्पांमधे पुरूषाकृती नेहमी नाजूक, स्त्रीसदृश देहयष्टीच्याच आढळतात, पण चालुक्य शिल्पशैलीनं या राजपुरूषाचं पौरष अबाधित राखलेल. तर,असा तो, किंचित हसतो आहे.चेहर्‍यावर प्रसन्न आपलेपणा. तो चेहरा पाहून बहुधा ती नखशिखांत मोहरली असावी. ते हेरून त्याची नजर जरा मिष्किल झालेली. मग ही पुरती लाजून गेलेली. तीची ती अवघडलेली आतुर आत्मीयता त्याला कळतेय. म्हणून तो अलगद उचलतो आहे तिची हनुवटी... त्या केशरी दगडांमध्ये खोदलेलया विरक्तांच्या गुहा-लेण्यांमधून आसक्तीचे असे कोवळे धुमारे फुटलेले दिसतील, याची मला कल्पनाचे नव्हती. तीच्या दंडाला धरलेला त्याचा हात अशा हळुवार पकडीचा आहे की,
तीच्या नाजूक बाहूंना जराही कळ लागू नये.

क्षणभर वाटलं की, ही जयदेवाच्या गीतगोविंदातीली राधा आहे. प्रथम कृष्णावर रागावून इथे येऊन बसलेली अन् मग नंतर मदनदाहानं अन् कृष्णविरहानं तळमळू लागलेली. तिला शोधत, सखीच्या निरोपावरून हा यदुनंदन कृष्ण तिथं आला आहे.आधीच मनातून शरमिंदा आहे ; पण तेवढाच लबाडही. प्रेमानं तिला कसे विवश केलं आहे, हे तो डोळ्यांनी पहातो आहे अन् मग तिची हनुवटी उचलून आर्जवाने म्हणतो आहे--"क्षणमधुना नारायणमनुगतमनुसर मा राधिके ! - प्रणयिनी राधे, हा मी नारायण तुला शरण आलो आहे.क्षणभर तरी माझी हो ना ! "

शिल्पातलं दडलेलं काव्य आपल्यासारख्या दगडांना उलगडवून दाखवयाला कवीनजर लागते ती अशाकरतां. (आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे ) सौभाग्यवती म्हणाल्याच " बदामी केंव्हा ? आता इतिहास, कला स्थापत्य यांबरोबर अशी पुस्तके ! "
आपल्याला आवडलं तर असेच आणखी काही उतारे देईन म्हणतो.

शरद

Comments

ग्रेट

क्या बात है? शरदजी
चन्द्रशेखर

हा शब्दसामर्थ्याचा सोहळा कवितेतही

अतिशय सुंदर. शरदरावांना शतशः धन्यवाद. मराठीततल्या सद्यकाळातल्या (लेखक जुना झाल्याशिवाय मराठी रसिकाच्या पसंतीस सहसा पडत नाही.) लेखनापासून स्वतःला वाचवता वाचवता वाचण्यासारखे काय आहे हे आपण नेमकेपणाने या पूढेही दाखवून द्याल ही अपेक्षा. (म्हणजे तुम्हाला कामाला लावत नाही पण तुमच्या आस्वादानंदात आम्हीही डुंबावे म्हणतो.)
उपक्रमवर त्यांची कटकट (आठवत ?.. अमुच्या भाली कटकट लिहली सदैव वटवट करण्याची.) नसल्याने मी आजही कवितांबद्दल लिहणार नाही.
हे मात्र काहीसे पटले नाही. मराठीत एखादे समीक्षण वाचल्याशिवाय किंवा पूर्वीचा काही अनुभव असल्याशिवाय नुस्ते प्रदर्शनात चाळून कवीच्या नवीन नावाकडे दूर्लक्ष करून नवोदित (या शब्दाची भयंकर भीती घातली जाते) कवीचा कवितासंग्रह विकत घेणारा वाचक मिळणे अवघडच. पण म्हणून सगळीच नवी कविता वटवट या सदरात टाकणे अन्यायाचे ठरेल.
कवितेवरची चर्चा उपक्रमवर मान्य आहे की नाही याबद्दल माहिती नाही. (कारण अजुन पर्यंत एकही अशी चर्चा वाचनात आली नाही.) संजय चौधरी यांचा माझं इवलं हस्ताक्षर हा काव्यसंग्रह गेल्या वर्षी वाचनात आल्या होत्या. त्याविषयी माझं मत शरदरावांच्या अरुणा ढेरेंच्या लेखनाबद्दल जसं आहे अगदी तस्संच होत. असो. त्याबद्दल पून्हा कधीतरी.
त्या केशरी दगडांमध्ये खोदलेलया विरक्तांच्या गुहा-लेण्यांमधून आसक्तीचे असे कोवळे धुमारे फुटलेले दिसतील, याची मला कल्पनाचे नव्हती.
अप्रतिम. जे न देखे रवी दे देखे कवी हे ही अगदी खरेच.

मस्तच!

जेव्हा शरदराव असं लिहितात तेव्हा खरी बहार येते
मस्तच!

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

+१

असेच म्हणते.

मस्त ओळख

अरुणा ढेरे यांच्या सौंदर्यदृष्टीबद्दल छान ओळख करून दिली आहे.

धन्यवाद.

असेच म्हणतो

अरुणा ढेरे यांच्या सौंदर्यदृष्टीबद्दल छान ओळख करून दिली आहे.
धन्यवाद.

असेच म्हणतो.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.
 
^ वर