उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
आणखी शब्द- कालमापन
राधिका
November 11, 2009 - 3:00 pm
नमस्कार मंडळी,
आता आपण गोळा करुया, काल आणि कालमापनासंबंधीचे शब्द.
यात पुढील प्रकारचे शब्द येतील-
१- तास आणि तासाचे भाग
२- दिवस आणि दिवसांचे भाग, वार
३- दिवसांचे समुच्चय- म्हणजे सप्ताह वगैरे. आणि त्याच्याशी संबंधित शब्द- म्हणजे साप्ताहिक वगैरे
४- वेळ आणि काळ
५- वय आणि त्याच्याशी संंबंधित खास शब्द आणि म्हणी- म्हणजे गद्धेपंचविशी वगैरे आणि त्यांचे अर्थ
उदाहरणे देऊन मी सुरुवात केलेलीच आहे.
आता बोला.
राधिका
दुवे:
Comments
काही शब्द
१- तास आणि तासाचे भाग : तास, मिनिट, सेकंद, घटका, पळं (घटिका मोजायचं घटिकापात्र आहे का कोणाकडे? मला हवंय व्यनी करावा)
२- दिवस आणि दिवसांचे भाग, वार: दिवस, दिन, दिस, सकाळ, दूपार, माध्याह्न, संध्याकाळ, सायंकाळ, रात्र, उत्तररात्र, पहाट, गोरजकाळ, तिन्हीसांज
३- दिवसांचे समुच्चय- म्हणजे सप्ताह वगैरे. आणि त्याच्याशी संबंधित शब्द- म्हणजे साप्ताहिक वगैरे: मास, महिना, सप्ताह, पंधरवडा, पक्ष, पाक्षिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक, सूवर्ण, हीरक, रौप्य, रजत, शतक, द्वीशतक.... वगैरे
बाकीचे नंतर
वाईट वाटले :( पुनर्विचार करावा ही विनंती
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
दिवसाचा भाग
दिवसाचा भागः प्रहर
नितिन थत्ते
आणखी काही
साठी बुद्धी नाठी, तिसरं विसरं, प्राप्ते तु षोडशे वर्षे गर्दभी अप्सरा भवेत् |, लालयेत् पंच वर्षाणि , दश वर्षाणि ताडयेत् |या वयाशी संबंधित म्हणी.
काही सुचलेले वाक्प्रचार
षठी-सण्मासी (की सठी-षण्मासी ) = सुमारे सहा महिन्यातून एकदा ? (बहुदा क्वचित् या अर्थाने असावे)
चातुर्मास : आषाढी ते कार्तिकी एकादशी ? (चूभूदेघे)
साडेसाती : उपक्रमावरील एक जिव्हाळ्याच्या विषयाशी संबंधित :-)
एक तप = १२ वर्षे
आयुष्याच्या मापनाला "वय" , "उमर" सारख्या संज्ञा आहेत. "जन्म" "हयात" यासारख्या संज्ञाही कालमापन नव्हे तरी कालनिर्देशनाकरता वापरात आहेत.
नियतकालिकांची वर्गवारी : साप्ताहिके, मासिके, वार्षिके,पाक्षिके
अनियतकालिक : जे नियतकालिक नाही ते !
पुनःपुन्हा घडणार्या घटना/प्रसंगांची वर्गवारी "नित्य" आणि "नैमित्तिक" अशी केली जाते. मात्र अनित्य हा जो शब्द आहे तो सामान्यतः "नश्वर" या अर्थाने वापरताना आपण पाहतो (चूभूदेघे)
आणखी सुचलेल्या काही म्हणी नि वाक्प्रचार :
काळ या शब्दाच्या अर्थच्छटा संदर्भानुसार बदलताना दिसतात :
वर्तमानाच्या, सद्यस्थितीच्या संदर्भात : "बदलता काळ " , "काळ तर मोठा कठीण आला" , "काळाचा महिमा" वगैरे प्रयोग आहेत. "अमुक अमुक टाईम्स्" , "नवाकाळ" ही नावे याच संदर्भातली असे वाटते.
"कालहरण करणे" : शुद्ध मराठीत सांगायचे तर "टाईमपास" ? ;-)
"घटका गेल्या पळे गेली काळ वाजे ठणाणा
...... राम का रे म्हणाना ? "
(मूळ काव्यपंक्ति पूर्ण आठवत नाहीत पण यावर बेतलेल्या "ठणठणपाळ" नावाच्या सांस्कृतिक घटनेला विसरणे अशक्य !)
"काळाची पावले ओळखणे" /"वक्त के साथ कदम मिलाके चलो" : दोन भाषांमधल्या साधारण एकाच अर्थाचे शब्द असलेल्या वाक्प्रचारांच्या अर्थाची छटाही सारखीच.
"काळ आला होता पण वेळ आली नव्हती".
"काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमतां "
"अवदितगतयामां रात्रिरेवं व्यरंसीत्" (कालिदासाचा तो "एका अनुस्वाराचा" सांगोवांगीचा किस्सा. "रात्र व्यतीत झाली परंतु त्यांच्या गप्पा संपल्या नाहीत. )
"कालाय तस्मः नमः "
(क्रमशः)
घटका गेली
घटका गेली पळे गेली तास वाजे ढणाणा
आयुष्याचा नाश होतो
...... राम का रे म्हणाना ?
आणखी एक वापरातला वाक्यप्रयोग : 'चवते चवताळले' यचा अर्थ आहे : मुलाला चवथे वर्ष लागले की ते आक्रस्ताळी बनते.
'चवते चवताळले' वरून
'चवते चवताळले' वरून "टेरिबल टू" या प्रयोगाची आठवण झाली.
-("टेरिबल टू"चा जबरा अनुभव असलेला )
प्र.का.टा.आ.
मी जे लिहणार होते ते वरील काही प्रतिसादात असल्याने प्र.का.टा.आ.
अपराह्न
'अपराह्न' म्हणजे पहाट काय? आह्निके हा शब्द यातूनच आलेला आहे का?
दुपार
अपराह्न म्हणजे दुपार.
अपर + अहन् (दिवस)
आह्निके म्हणजे दैनिक कामे
ओहोना म्हणजे कालमापिनी काय?
ओहोना (आह्ना) माझ्या एका गोड बंगाली मैत्रिणीचे तितकेच गोड नाव. नेमका अर्थ काय बरे? ओहोना म्हणजे कालमापिनी काय?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
"अहना" असू शकेल का?
"अहना" असे एक नाव गूगलून सापडते. या शब्दाचा बंगालीत उच्चार "ओहोना" असा होईल.
बंगालीत "अहना" म्हणजे "सकाळ" किंवा "उषःकाल"
अहनाच आहे
धन्यवाद. अहनाच आहे! हे नाव मला फार आवडले. विशेषतः बंगाली रूप ओहोना! (धर्मेंद्र व हेमाच्या धाकट्या मुलीचे नावही अहनाच आहे.)
'अहना' हे क्रियापदही आहे.
अहना अ. [सं.अस्ति] वर्त्तमान रहना। होना। (अवधी) उदाहरण-अस अस मच्छ समुद्र महँ अहहीं।–जायसी।
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
यरवाळी/एरवाळी
पश्चिम महाराष्ट्रात खेड्यापाड्यात हा शब्द वापरतात.
यरवाळी/एरवाळी, म्हणजे सकाळी.
यरवाळी
यरवाळी म्हणजे अंधार पडण्याअगोदर आणि रामप्रहर किंवा राम पहारी म्हणजे सकाळी.
-दिलीप बिरुटे
जैन वाङमयातील "पल्योपमा" काळ
इरावती कर्वे यांच्या 'परिपूर्ति' पुस्तकातील 'दिक्काल' या लेखात 'पल्योपमा' काळ म्हणजे किती काळ याचे कोष्टक सांगणारा उतारा :
"जैन वाङमयात काळाचे एक अचाट कोष्टक सापडते. एक महायोजन लांब, तितकीच रुंद व तितकीच खोल अशी विहीर खणावी. ती कोकराच्या अगदी अतिशय बारीक कापलेल्या केसांनी इतकी ठासून भरावी की, त्याच्यावरून पूर लोटला तरी फक्त वरचा थरच भिजावा. अशा या विहीरीतून दर युगशतानंतर एक-एक केस काढीत ती रिकामी होण्यास जो वेळ लागेल तो पल्योपमा काळ!"
(माझ्या माहितीप्रमाणे एक योजन म्हणजे आठ मैल. महायोजन म्हणजे किती योजने ते माहीत नाही. ज्यांना ठाऊक असेल त्यांनी जरूर सांगावे.)
जैन वाङमयातील "पल्योपमा" काळ
इरावती कर्वे यांच्या 'परिपूर्ति' पुस्तकातील 'दिक्काल' या लेखात 'पल्योपमा' काळ म्हणजे किती काळ याचे कोष्टक सांगणारा उतारा :
"जैन वाङमयात काळाचे एक अचाट कोष्टक सापडते. एक महायोजन लांब, तितकीच रुंद व तितकीच खोल अशी विहीर खणावी. ती कोकराच्या अगदी अतिशय बारीक कापलेल्या केसांनी इतकी ठासून भरावी की, त्याच्यावरून पूर लोटला तरी फक्त वरचा थरच भिजावा. अशा या विहीरीतून दर युगशतानंतर एक-एक केस काढीत ती रिकामी होण्यास जो वेळ लागेल तो पल्योपमा काळ!"
(माझ्या माहितीप्रमाणे एक योजन म्हणजे आठ मैल. महायोजन म्हणजे किती योजने ते माहीत नाही. ज्यांना ठाऊक असेल त्यांनी जरूर सांगावे.)
'दिक्काल' आणि शाळेतील तासिका
इरावती कर्वे यांचा हा लेख मला खूपच आवडतो. विशेषत: सापेक्षता वाद तेव्हा त्या मानाने नवीनच होता पण त्यांना काळाच्या सापेक्षतेची चांगलीच प्रचीती आल्याचे जाणवते. प्रत्येकाच्या मनातील कालाची संवेदना वेगळी असते. पण हे आपल्या लक्ष्यातच येत नाही.
शाळेत शिकवायचा पाठ आखतांना मी म्हणत असते की चांगल्या दोन तासिका जोडून आल्या की मी खूप अभ्यास करून घेईन पण बरोब्बर वीसच मिनिटामध्ये छोटासा "ब्रेक'' मिळेल का अशी विचारणा होते! दररोज आठ तास एका जागी बसून शिकणे ही काही सोपी गोष्ट नव्हे....पण विचारपूर्वक वेळेचे नियोजन केले आणि त्यात करमणूक आणली तर मात्र त्या आठ-नऊ तासिका चटकन संपू शकतात.
संदर्भ चौकटीवर घड्याळाचा वेग अवलंबून असतो हे आईनस्टाईनच्या गणितातून कळू शकते पण मानसिक घड्याळाचा वेग नेमका कशामुळे वाढेल(किंवा कमी होईल ) हे कळणे मात्र अवघड आहे
गौरी
सुंदर
तुमचा काळा संबंधीचा प्रतिसाद फार सुंदर आहे.
संदर्भ चौकटीवर घड्याळाचा वेग अवलंबून असतो हे आईनस्टाईनच्या गणितातून कळू शकते पण मानसिक घड्याळाचा वेग नेमका कशामुळे वाढेल(किंवा कमी होईल ) हे कळणे मात्र अवघड आहे
हे वाक्य तर फार आवडले.
काळ आणि घड्तयाळाचा वेग यावर एक छानसा लेखच लिहायला हवा तुम्ही असे वाटून गेले.
आपला
गुंडोपंत
वाढवेळ किंवा वाढूळ
वाढवेळ किंवा वाढूळ म्हणजे उशीर.
"वाढवेळ झाली आता ये रे" अशा काही शब्दांचे एक लोकप्रिय गीत आहे.