दागिन्यांची नावे

शीर्षकाहून वेगळं फारसं काही सांगायला नकोच. आपण आता गोळा करायची आहेत, दागिन्यांची नावे. दागिने शक्यतो महाराष्ट्रातले असावेत. नावाबरोबरच ते कशापासून बनलेले असतात, म्हणजे सोने की मोती की चांदी, तेही सांगा. दागिने बायकांचे तसेच पुरुषांचेही असू शकतात.

हा विषय सुचवल्याबद्दल अदिती आणि ऋषिकेश यांचे आभार.

मी सुरुवात करून देते माझ्या सर्वात आवडत्या दागिन्याने- चिंचपेटी. ही साधारणपणे मोत्याची असते. त्यात मोत्याचे तीन ते चार पदर असतात. ते एक मोठे पदक आणि ४ छोटी पदके यांनी जोडलेले असतात. हा दागिना गळ्यावर घट्ट बांधायचा असतो.

चला तर मग आणखी येऊ द्या.

राधिका

लेखनविषय: दुवे:

Comments

विषय सुरू केल्याबद्दल आभार

हातः स्त्री: बांगड्या, पाटल्या, तोडे, कंगन, वाकी.....पुरुषः कडं.... उभयः अंगठी
पायः स्त्री: विरोल्या, जोडवी, घुंगरू, पैंजण...
गळा: स्त्री: हार, मंगळसुत्र, साज, ठुशी (हे ऐकीव नाव आहे पण बहुदा गळ्यातलाच दागिना असावा, चुभु देघे).... पुरुषःगोफ... उभयः सोनसाखळी
कानः स्त्री: कुडी, कर्णफुले, डूल..... पुरुषः भिकबाळी
नाकः स्त्री: नथ

याशिवाय स्त्रीया कानाच्या पाळी वर, कपाळावर साखळी, कमरेला एक साखळी वगैरे बांधलेल्या बघितल्या आहेत त्याला काय म्हणतात माहित नाहि.
पुरुषांचा भारी लेदर बेल्ट, एखादं लै भारी घड्याळ हे अलंकार होऊ शकतील का?

टीप: वरील अलंकार मराठी आहेत का नाहि याची कल्पन नाहि. मात्र भारतीय असावेत.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

भिकबाळी

पुरुषांचा भारी लेदर बेल्ट, एखादं लै भारी घड्याळ हे अलंकार होऊ शकतील का?

भिकबाळी विसरला वाटते आपण? मध्यंतरी पुण्यात बरीच तरुण मुले खास त्याच्यासाठी कान टोचून घेत होती...
___________________________________________________
आणिबाणी जाहीर करुन टाकली आहे. साला कुणाची मस्ती नाय पायजेल! आपल्याला जे वाटेल ते ठेऊ, बाकीचं उडवू! 'हेच नमोगतावर होत होतं तर त्यावर तू कांगावा केलास, आणि तुझ्या स्थळावर झालेलं बरं चालतंय तुला?' अशी एक आगाऊ प्रतिक्रिया आली होती. लगेचच उडवली!

नीट वाचा

अजिबात विसरलो नाहि. मुळ प्रतिसाद नीट वाचा

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

वा!

छान (आणि गहन/आदिम) विषय! (सोने सध्या सतरा हजारांवर गेले असे ऐकून आहे). त्यामुळे सध्या एकेक उदाहरणावर भागवते.

गळ्यात -

तन्मणी - मोत्याचा असतो, मध्ये मोठे खड्यांचे पदक (याला "खोड" म्हणतात) आणि मोत्यांच्या लडी असतात. पदकात मोर पाहिलेला आहे.

हातात -
पाटल्या - ३-५मिमी रूंद, सोन्याच्या, चपट्या, आणि काहीशा ठोकलेल्या असतात.

दंडात -
वाकी - वाकी दंडावर घालायची. दंडाच्या बाहेरच्या बाजूने दिसेल अशी घट्ट बसवायची असते. बहुदा सोन्याची बनवलेली असते, खड्यांचे नक्षीकाम असते . नाजूक साखळ्यांना किंवा अरूंद पट्टीला दंडाच्या मागील बाजूला हूक लावलेले असतात.

पायात -
पैंजण - बहुदा चांदीचे, आवाज करणारे, लहान बुंदक्यांनी साखळ्या जोडलेले, हूकने लावण्याचे.

नाकात -
नथ - बहुदा सोन्याच्या तारेत मोती आणि तांबडे/पांढरे/हिरवे खडे बसवलेले अशी असते. डाव्या नाकपुडीतील भोकात बसवायची. (हाय, एकेकाळी नाक टोचलेले होते, आता बुजले!), पण चापाचीही नथ मिळते.

मौल्यवान धागा! :)

मौल्यवान धागा! :)

आमचे आवडते दागिने -

वाक, आणि गोफ!

एखाद्या बाईच्या गोर्‍यापान दंडावर जाळीदार वाक फार छान दिसते.

चांगला जाडसर विणलेला जाळीदार गोफही आम्हाला फार आवडतो..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

बुगडी

बुगडी हा शब्द गाण्यातून ऐकला आहे पण हा नक्की कोणता दागिना आहे, ते ठाऊक नाही. कुणी उत्तर दिल्यास उत्तम.

बुगडी.

हा कानातला दागिना आहे एव्हढच ठावुक.कुडीसारखाच असावा.मोत्याची कुडी असते.पण बुगडीबद्दल माहित नाही.जोंधळे हार हा गळ्यातला दागिना तसेच कोल्हापुरी साज,चिंचपेटी.चंद्रहार आणि सुर्यहारही पुर्वीच्या तालेवारांच्या बायका घालत असत असे आजीनी सांगीतले.चपलाहार हाही सोन्याचाच असतो बरे.लक्ष्मीहार हाही त्याच प्रकारचा.एकदाणी हाही गळ्यातलाच दागिना.कानातला चौफुलाही असतो.कुडी सात मोत्यांची तर चौफुला चाराचा.मोहनमाळ हा एक अजुन आठवला प्रकार.

कोल्हापूरचे दागिने

अघळपघळ पण ताठ : कोल्हापूर - उदय गायकवाड यांच्या लेखातून साभार

कोल्हापूर. नदी-तलावात मस्तीत डुंबावं, लाल मातीत कुस्ती करावी, स्टार्चचे पांढरे कपडे, लहरी फेटा आणि कर्रकर्र वाजणारी पायताणं घालून मिरवावं अशी इच्छा या कोल्हापुरातला प्रत्येक पुरुष बाळगतो. तसं पाहता, इथं स्त्रिया म्हणजे "बाईमाणसं'देखील मिरवण्यात मागे नाहीत. त्याही सोन्यानं मढलेल्या. जरीकाठी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन, त्याचं एक टोक हातात धरून हाताची घडी अशा पद्धतीने वावरणाऱ्या. तर सामान्य कष्टकरी वर्गातल्या बायका नऊवारी लुगडं नेसणाऱ्या, डोक्यावर पदर घेऊन त्यावर वैरणीचा भारा किंवा दही-लोेण्याच्या भांड्याने भरलेली बुट्टी घेऊन बाजारात जाणाऱ्या.

अर्थात 20-25 तोळ्यांचे दागिने सहज त्यांच्या अंगावर चकाकताना दिसतील. कोल्हापुरी साज, चिताक, बोरमाळ, जोंधळी पोत, मंगळसूत्र, हातात बिल्वर, पाटल्या, बांगड्या, बोटात अंगठी, कानात बुगडी, कर्णफूल, कुड्या, वेल पाहायला मिळेलच. इथले पुरुषसुद्धा दागिने वापरण्यात मागे नाहीत. गळ्यात सोन्याची चेन, त्यात अडकवलेलं वाघनख, हातात सोन्याचं कडं, बोटांत अंगठ्या, मनगटात सोनेरी घड्याळ आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल. इथला सामान्य कष्टकरीसुद्धा बऱ्यापैकी अंगभर कपडे घालून वावरताना दिसतो.

(http://74.125.153.132/search?q=cache:ICIRFXtm2NwJ:www.eanubhav.com/Uday%...)

ऐकीव माहिती

माझ्या ऐकीव माहिती प्रमाणे बुगडी हा झुमक्यासारखा लटकणारा प्रकार डूल एखाद्या खड्यांचे असतात तर बुगडी अनेक खड्यांचा लटकता झुपका असतो. (अर्थात माहिती ऐकीव आहे)

चपला हार म्हणजे, सोन्याच्या छोट्याछोट्या चकत्यांचा हार. साधारणतः नउवारी पैठणीवर हा घातला जातो.

मोहनमाळ म्हणजे सोन्यांच्या नक्षीकाम केलेल्या मोठ्या मण्यांचा हार ना?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

ते बेंबीत

हल्ली ते बेंबीत घालतात त्या खड्याला काय म्हणतात हो?
बादली बटन का असलंच काही तरी.

(टोचत कसं काय नाही ते कळत नाही मला! या बायकांना बेंबीत बोट घालून फिरवायची सोयच नाही, खडा टोचणारच ना हाताला ;)) )

आपला
गुंडोपंत

बार बेल

हल्ली ते बेंबीत घालतात त्या खड्याला काय म्हणतात हो?

बार बेल असे म्हणतात.
अधिक माहिती ह्या दूव्यावर वाचायला मिळेल.

http://en.wikipedia.org/wiki/Navel_piercing

लोकगीत

हातो घेऊनी चिपळ्या टाळा ब्रह्म वीणा ॥

सारजाचा ताल ईना ॥ हे जी ॥

कंगरेशी की माचपट्टा । चाल झटापटा

सारजा नार । जसा डुलू लागला मोर ॥ हे जी ॥

डोळ्याला भरुन काजळ । कुंकवाचे चिरी

गळ्यामध्ये सोन्याची सरी । हे जी ॥

शोभला गळा दोरल । ठुशीचा जोड

पायात शिंदेशाही तोडे ॥ हे जी ॥

कानात करंड फूल । झुब्याला मोती

नाकाला नथ सरजाची शोभा देती ॥ हे जी ॥

हातात हिरे कंकण । पाटल्या चार

अंगावरती लेली डागिन । सारजा नार ॥ हे जी ॥

अगात जरीची चोळी । फेराची लुगडी

कानाला शोभती बुगडी ॥ हे जी ॥

- लोकगीत

अलंकार - कल्पना देसाईंच्या लेखातुन खालील नविन दागिन्यांची नावे वाचायला मिळालीत.

मोत्याची किंवा हिऱ्याचीकुडीम
गळ्यात घालायचे गाठले, चितक
पिछोडी
दंडावर घालायचे दागिने : खेळण आणि वेल, तुळबंदी
कानात घालायच्या कापबाळ्या
बुगडी : कानाच्या वरच्या कोपऱ्यात घालतात.

अधिक माहिती ह्या दूव्यावर वाचायला मिळेल .
http://www.marathimati.com/Maharashtra/Alankar_Kalpana_Desai.asp

लवंगा

कानाच्या वर घालतात त्या लवंगा.कानाच्या चेहर्‍याजवळच्या त्रिकोणी भागात टोचतात ते कुडकं

दागिने

चर्चेचा विषय फारच छान आहे. या सर्व दागिन्यांचे फोटो जर बघायला मिळाले तर दुग्ध-शर्करा योग यावा.
चन्द्रशेखर

पोहे हार्

एक पोहेहार की काय असतो म्हणतात.
एक मोहनमाळही असते असे ऐकून आहे. (हा दागिना असतो का हे ही माहित नाही)
हे दोन्ही नक्की काय असतं ठाऊक नाही.

-- येडा बांटू

टोचणे

दागिने घालण्यासाठी शरीराच्या विवीध भागात टोचून घेण्याची पद्धत आहे. ही पद्धत पूर्वी जात, धर्म ह्यांच्याची निगडीत होती. आता जागतिककरणामूळ फॅशनच्या नावाने सर्वत्र पाहायला मिळते.

http://en.wikipedia.org/wiki/Body_piercing

बोरमाळ आणि पोहेहार

हे दोन्ही अलंकार गळ्यात घालतात.
पोहेहारामध्ये सोन्याच्या लहानशा पातळ चकत्या एकमेकीत गुंतवलेल्या असतात आणि बोरमाळेत सोन्याचे पोकळ (लाखेने भरलेले) मणी धाग्यात ओवून त्यांचा हार केलेला असतो.

अजुन एक भर

कमरेवर छल्ला असतो तो पण दागिन्यातच मोडतोना??

अंगठी

हा जगातल्या सर्व देशात सर्वात जास्त प्रमाणात दिसणारा आणि स्त्री व पुरुष दोघेही घालत असलेला अलंकार आहे.
उजव्या किंवा डाव्या हाताच्या इतर सर्व बोटांमध्ये हा घालतात, तो कोठल्याही धातूमध्ये असू शकतो, त्यात कोणतेही रत्न बसवता येते आणि नाही बसवले तरी चालते.
पण त्याच्या नावानुसार तो अंगठ्यात घातलेला मात्र मी कधी पाहिला नाही!

मेखला

कमरेवर छल्ल्याप्रमाणे मेखला ही घातली जाते...
आणि मासोळी नावाचा दागिन्याचा प्रकार पण ऐकला आहे जो पायात घातला जातो

आणखी काही अलंकार्

हातात घालायचे 'तोडे' हा जाळीकाम केलेला बांगडीचा प्रकार आणि 'गोठ' हा भरीव सोन्याचा असतो. बहुतेक गुंतवणूक म्हणून करीत असावेत. भांगाजवळ घालतात ती 'बिंदी', केसात माळायचे 'अग्रफूल' वा सोन्याची 'वेणी', कमरेत घालतात तो 'कमरपट्टा'! नाकात घालतात ती 'चमकी किंवा मोरणी', सुरुवातीला घालायचे 'सुंकले', कानातील 'वेल, कानचेन, किंवा अख्खा सोन्याचा कान' या आणखी काही दागिन्यांचा उल्लेख करता येईल.

काही 'बाळलेणी' देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत-जसे वाळे, मनगट्या,कमरेतील साखळ्या इत्यादी.

अरेच्चा...हे राहिले!

श्रीमंत हार, शाही हार, लफ्फा,कंठी,मुकुट हे आणखी काही.

डेकोरेटेड् साडी पिन

आधुनिक जमान्यात ज्यांना साडी सांभाळता येत नाही त्यांच्या साठी चांदीच्या नक्षीदार पिना मिळतात. अशी पिन निर्यांवर सुंदर दिसते.
गौरी

दागिन्यांची नावे

हातातली कडी, पायातले तोडे, कानात वेल भोकरे, डूल, गळ्यात कंठी, कमरेला कंबरपट्टा, हातातले बिलवर, जाळीच्या पाटल्या, गळ्यात गोफ चिंचपेटी मंगळसूत्र कोल्हापुरी साज, डोरलं विसरलात काय?

 
^ वर