उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
नवा उपक्रम - भांडीकुंडी (२)
राधिका
November 4, 2009 - 4:25 pm
मंडळी,
आधीच्या चर्चेत ५० प्रतिसाद झाले आहेत, त्यामुळे नवा भाग टाकते आहे. (एका दिवसांत ५० प्रतिसाद :ऑ) सर्वजण मस्त शब्द सुचवत आहेत, इथेही तेच चालू द्या.
राधिका
दुवे:
Comments
आणखी काही शब्द
ताटाळं- ताटं ठेवायचं शेल्फ
फडताळ- खाद्यपदार्थ (विशेषकरून दूध) ठेवायचं कपाट
शकुंतला- तूप ठेवायचं छोटं भांडं.
किसणी- भाज्या किसण्यासाठी
चाळणी- भाज्या धुताना, अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी वापरण्यात असलेली भोकांची ताटली
खवणी- नारळाच्या वाटीतलं खोबरं खवून वेगळं काढण्यासाठी
पोळपाट- पोळ्या लाटण्यासाठी सपाट पृष्ठभाग
लाटणं- पोळ्या लाटण्यासाठी गोल दंडाकार वस्तू
राधिका
रोवळी आणि फुलपात्र
एकेक आठवतय ...
रोवळी : भाज्या धुण्यासाठी/कडधान्य उपसण्यासाठी भोकाची चाळणी
फुलपात्र: पाणी पिण्याचा पेला
गौरी
कुंडा
कुंडा या नावाचे एक भांडे आहे. तळाशी गोलाकार निमुळते. वर विस्तारलेले. घरी त्यात लोणी काढले जाते किंवा दही लावले जाते. हा वास्तवात बाऊलच आहे. स्टीलचा इतकेच.
वाट्यांमध्ये काठाची वाटी असते.
आणखी काही शब्द
सोर्या - चकली, शेव पाडण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.पूर्वी लाकडी सोर्या मिळत असे हल्ली धातूचे निघालेत. (धातूच्या सोर्यात साचा आणि आत बाहेर होणारा दट्ट्यावाला भाग ह्यात माया (गॅप्) अगदी जेमतेम असल्याने आत हवा अडकली जाऊन सोर्या दाबणे अशक्य होऊन बसते. त्यामानाने लाकडी सोरे बरे पडतात असा माझा अनुभव.)
तिवई - तीन पायांचा स्टँड ह्यावर माठ, हंडा, कळशा असे रचून ठेवत
तसराळं - पहिल्या भागात ह्याचा उल्लेख आहे पण अर्थ फारसा नीट दिलेला नाही. ताटलीपेक्षा मोठे आणि परातीपेक्षा लहान आणि कमी उंचीचे काठ असलेला पसरट थाळा.
नरसाळं - अरुंद तोंडाच्या बाटलीत तेल/तूप भरायला सोयीचं पडेल असे कोनाकृती भांडे ज्याच्या तळाला भोक असते आणि नळी जोडलेली असते.
पाटा/वरवंटा - तास मारुन ठोके काढलेली चौकोनी जाड दगडी लादी (साधारण १.५ * २ फूट मापाची) आणी तसाच दगडी ठोके मारलेला दंडगोल - चटणी वगैरे वाटायला उपयोगी - कौशल्याचे काम.
सोंगटी - पंगतीच्या वेळेला उदबत्ती खोचून ठेवायचे साधन. बहुदा हे चांदीचे असे. सोंगटीच्या खेळातल्यासारखा आकार असल्याने ह्याला सोंगटी नाव पडले.
सध्या एवढेच आठवताहेत.
चतुरंग
वा!
वा वा
अनेक दिवसांत न ऐकलेले बरेच शब्द इथे सापडले. विशेषकरून तिवई आणि सोंगटी.
पूर्वी जुन्या वाड्यात या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात होत्या. आता बहुतेक माळ्यावरून हुडकल्या तरच बघायला मिळतील.
धन्यवाद
--अदिती
-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने
शिंकाळ्?
शिंकाळं - हे भांड नाहीये कदाचित. पण शब्द आठवला बुवा.
रवी लिहिली आहे का कोणी?
वाढताना
वाढताना खास वापरले जाणारे शब्द-
पानं - ताटांसाठी खास वाढतानाचा शब्द. पूर्वी केळीच्या पानावर जेवण वाढले जायचे, त्यामुळे
ताट-वाटी-भांडं - वाढायला सुरुवात करण्याआधी मांडायची त्रिमूर्ती.
राधिका
उप्पर दो
पत्रावळ- ताटाऐवजी वापरण्यात येणारी पानांनी बनवलेली ताटली.
बुधला- हा काय प्रकार आहे, हे कोणी सांगेल का? बुधला म्हणजे मोठी बरणी का? हा शब्द 'अलीबाबा आणि चाळीस चोर' कथेत वाचला होता.
राधिका
प्रकाटाआ
चतुरंग
बुधला
तेल ठेवायचा रांजण/बरणी म्हणजे बुधला असावा. ह्याच्या छोट्या पिचकारी सदृश भावंडाला 'बुधली' म्हंटलेले ही ऐकले आहे.
बुधली..
प्रकाटाआ
कळवण्यास आनंद होतो की अवघ्या दीड दिवसात आपण ८२ वस्तूंसाठी ११३ शब्द जमवलेले आहेत.
चालू द्या.
राधिका
अरे वा!
अरे वा!.. संकलित करून तक्ता विकीपिडीयावर देता येईल (अर्थात तिथे ज्याने त्याने भर घालावी)
आता भांड्यांनंतर काय असेल याची उत्सुकता आहे.
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
खल
बराच खल चाललाय, पण ''खलबत्ता'' लिहिला का?
गौरी
छान् उपक्रम्
पूर्वी दही ठेवायला जे चिनी मातीचे छोटे भांडे असे त्याला 'आलवण' म्हणत. आणि देवातील शंखाखाली असते ती 'अडणी'.
अडणी!
हाही शब्द कित्येक दिवसांनी ऐकला. मस्त वाटले.
धन्यवाद!
--अदिती
-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने
तामली
आम्ही याला तामली असे म्हणतो..
बाकी सर्व शब्द आमच्यातही तेच आहेत.
--
संस्कृत भाषा जगासि कळेना
म्हणोनी नारायणा दया आली हो
देवाजीने परि घेतला अवतार
म्हणति ज्ञानेश्वर तयालागि हो!
तामली.
बरोबर. आम्हीही त्याला तामलीच म्हणतो.खुप दिवसांनी हा शब्द पाहिला.
काही अनवट भांडी
वेळणी - बहुतेक भात वाढायला वापरायच्या मोठ्या ताटाला वेळणी म्हणत. खाजगीवाल्यांनी चांदीची पंचपात्री( हाही एक विनोदच आहे. पंचपात्री बहुधा पंचधातूंची असावी. हे म्हणजे निळा पीतांबर म्हणण्यासारखं झालं...) मुठीत आवळून तिचा चेंडू करून पार चुरगाळून टाकली होती त्या कथेत हा उल्लेख वाचला होता . नक्की तपशील आठवत नाही. तरी चूभूदेघे.
वैल - मातीच्या चुलीशेजारी नुसत्या विस्तवासाठी एक वैल असायचे. चुलीखालीच पेटवलेला जाळ या वैलातून बाहेर यायचा. चुलीवर तवा ठेवून भाकरी भाजल्यानंतर ती उलटून या वैलावर भाजली जात असे. थेट आगीवर भाजल्यामुळे तिला जी काही खमंग खरपूस चव लागायची ती काही औरच होती म्हणे.
काहील - उसाचा रस आटवण्यासाठी वापरले जाणारे प्रचंड मोठे कढईच्या आकाराचे भांडे. अर्थात काही घरगुती भांडे नव्हे. पण इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटला. यात दिवसरात्र उसाचा रस उकळला जात असे. त्याची धग आसपासच्या माणसांना सहन करावी लागत असे. त्या ऊष्ण धगीमुळेच प्रचंड उन्हाळ्यात ' अंगाची काहीली होत असे' असा वाक्प्रचार आढळतो. यावरूनच आठवलेला एक संदर्भ म्हणजे गुर्हाळ! हे अनेक दिवस सतत चाललेले असल्यामुळे चेंगटपणाने एखादी गोष्ट सांगत बसणार्या माणसाने ( थोडक्यात पिळापिळी करणार्या माणसाने) काय गुर्हाळ लावले आहे असे म्हणत असावेत.
चिं वि जोश्यांची 'चिमणरावांचे चर्हाट ' आणि 'चिमणरावांचे गुर्हाळ' अशी पुस्तके आहेत बहुतेक. किंवा यातले एक तरी आहेच. चर्हाट चा अर्थ - संदर्भ कोणी सांगू शकेल का?
पखाल - पाणी भरून आणण्यासाठी वापरात असलेली भलीमोठी कातडी पिशवी. आळंदीच्या नरसिंह सरस्वत्च्तींच्या मठात एक पखाल भिंतीवर अडकवून ठेवलेली मी पाहिली आहे. आता आहे की नाही बघावे लागेल.
सट - दूधदुभत्याचे जिन्नस साठवण्याचे लहान चिनी मातीचे भांडे. आमच्याकडे मुख्यत: रोजची साय जमा करण्यासाठी आणि नंतर तिला विरजण लावण्यासाठी या सटाचा वापर होतो.
लिंबाचा रस काढण्यासाठी एक खोलगट वाटी आणि त्या वाटीत बसणारी दुसरी वाटी आणि या दोन्ही वाट्यांना दांडे असलेलं एक उपकरण वापरतात. याला बहुतेक रसाळं म्हणतात. हे हल्ली धातूचं असतं पण मी लाकडाचंही पाहिलेलं आहे.
लोणची - मसाले अशा वर्षाच्या गोष्टी चिनीमातीच्या बरण्यांमधे भरून ठेवायची प्रथा आहे. या बरणीचं तोंड बंद करायला म्हणून त्यांच्यावर एखादा लहान कुंडा उपडा ठेवून वरून एक फर्अकं बांधतात. या प्रकाराला दादरा बांधणे असं म्हणतात.
सुपारी कातण्यासाठी अडकित्ता वापरला जात असे त्याचा उल्लेख पूर्वी आलाच असावा. बुद्धिबळाच्या खेळात रंगून गेल्यामुळे सुपारी ऐवजी हातातला लाकडी घोडा कातरून खाणार्या लो. टिळकांची गोष्टही लहानपणी खूप मनोरंजक वाटली होती.
प्रेशर कुकरचा उदय होण्यापूर्वी भात शिजवायच्या पितळेच्या भांड्याला बहुतेक तपेलं म्हणत. गोरगरीब सामान्यपणे मातीची भांडी वापरीत त्यांना गाडगी मडकी म्हणत.
'श्यामची आई' मधे दही लावायच्या भांड्याला एक शब्द वाचला होता. आता आठवत नाही. श्यामला पोहायला शिकण्यासाठी आई फटके मारून घराबाहेर पाठवते त्या गोष्टीत ती म्हणते की त्या भांड्यात दही आहे ते चाटून टाक. त्या भांड्याचे नाव बहुतेक कोंढी आहे . कोणी सांगू शकेल का?
लहान बाळांना बरीच औषधं उगाळून देतात ती घुटी पाजण्यासाधी वाटीला एकीकडे पन्हळ असलेलं लहानसं ( बहुतेक चांदीचं) भांड असतं त्याला बोंडलं म्हणतात .
तशीच एक बोथीही असते, वसंत बापटांच्या कवितेत वाचलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र विसरले.
देव्हार्यातिल गंधफुलातच झाकुन ठेवा ती पोथी
अशी बुद्धीला भूक लागता कशी पुरेल आम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे नको आम्हाला शिळी कढी
गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी
अशी कविता आहे ती.
चंदन किंवा जायफळ वगरे उगाळण्यासाठी गोलाकार दगडी सहाण वापरतात.
--अदिती
-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने
पिळर
या उपकरणाला एक काकू 'पिळर' म्हणत असल्याचं ऐकलं आहे. हा बहुतेक त्यांनी स्वतः तयार केलेला शब्द असावा. :-)
दाबकं
आम्ही त्याला दाबकं म्हणतो
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
पिळर आणि सोलर
माझी आई सोलाण्याला 'सोलर' म्हणते!
गौरी
आवडले
मराठी आणि इंग्रजीचा हा संगम फारच आवडला.
राधिका
झारी
तुपाच्या लोटीला बुटकुली
खोबरेल तेलाच्या चोच असलेल्या बसक्या बाटलीला झारी
आणि हळद कुंकू ठेवण्याच्या दोनखणी डब्याला कुयरी म्हणत.
नितिन थत्ते
बुटलं
तुपाच्या लोटीला बुटकुली
आम्ही तुपाचं बुटलं म्हणतो.
आपला
गुंडोपंत
काथवट व् इतर छायाचित्रे
काथवट व मोदक पात्र
स्वयंपाकघरातील हरवलेले शब्द हा शुभांगी रायकर यांचा लेख.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
घमेलं
कुठे वाचल्यासारख वाटत नाही म्हणून टाकते
घमेलं.....
मोठ्या पसरट भांड्याला घमेलं म्हणतात.
मापटं
मापटं - धान्य मोजायचे भांडे.
सुप - धान्य निवडायचे एक भांडे / उपकरण.
पावशी
विळीसाठी पावशी हा शब्द ऐकला आहे.
अजून काही शब्द
दगडी - सायीचं दही लावण्याच्या चिनी मातीच्या जड भांड्याला आमच्याकडे 'दगडी' म्हणतात. कदाचित ही भांडी पूर्वी दगडाची असावीत.
सतेलं - आमच्या घरी तूप/तेल ठेवण्याच्या लहान भांड्याला 'सतेलं' म्हणतात.
माझी आई खांदेशाकडील असल्याने हे शब्द तेथील असावेत असे वाटते.
इतर काही शब्द आठवतात ते असे -
डाव - वरणादि पातळ पदार्थ वाढण्यासाठी असलेली खोलगट पळी. (आजकाल या शब्दाचा अर्थ वेगळा होतो ;-) )
सहाण - गंध/औषधे वगैरे उगाळण्यासाठीचा लहान दगडी प्ल्याटफॉर्म.
पेढेकाठी डबा - याच्या झाकणाच्या बाजू पेढ्यासारख्या निमुळत्या असतात (हा बहुधा जेनेरिक शब्द नसावा)
-- येडा बांटू
पेढेकाठी
हा शब्द बहुतेक पेढेघाटी असा असावा. घाट म्हणजे आकार. हा शब्द कदाचित घटावरून आला असावा. नाशिक घाटाची भांडी पूर्वी बरीच प्रसिद्ध असावीत. दंडगोलाकार डब्याला चपट्या घुमटाच्या आकाराचं झाकण असलेल्या डब्याला माझी आई पेढेघाटी डबा असं म्हणते.
बाकी डाव हाही नित्य वापरातला शब्द आहे असे वाटते. त्याचा आकार विशिष्ट प्रकारचा असतो आणि विशेषत: पिठलं करताना याचा फार उपयोग होतो असा अनुभव आहे.
--अदिती
-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने
पेढेघाटी
कदाचित पेढेघाटीच असेल. लहानपणी एवढ्या लक्षपूर्वक कधी शब्द ऐकला नाही, त्यामुळे डोक्यात चुकीचे रूप बसले असण्याची शक्यता आहे. तरी हे कन्फर्म करून बघतो परत एकदा.
-- येडा बांटू
पेढेघाटी बरोबर आहे!! आणखी - ओगराळे
आणखी एक शब्द "ओगराळे"! पाणी घेण्यासाठी दान्डा असलेले पात्र.
पूर्वी झाले असल्यास माफ करा!
गौरी
पूजेतील उपकरणी
गंधाची तबकडी कसे नाही आठवले? आणि नैवेद्याचा द्रोण,पंचामृताचे कचोळे ...बहुतेक चांदीची आढळतात ही भांडी.
मुदाळं
मुदाळं - मूद पाडायची, आतून गोलसर आकार असलेली वाटी.
लंगडी - प्रेशर कुकरमधे ठेवायच्या डब्याला लंगडी म्हणतात.
तवा
तवा - पोळ्या, भाकर्या, आंबोळ्या भाजायचा धातूचा जाड पत्रा. :-) हा पूर्वी लोखंडी असायचा हल्ली मिश्र धातूच्या जाड पत्र्याला रासायनिक लेप लावून बनवतात.
हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आला असावा अशी शंका आहे.
आणखी
तकाटणे हे कचरा गोळा करायच्या सुपासारख्या पत्र्याच्या वस्तूला म्हणतात. तकाटणे वरून आठवले....धूप जाळण्याचे धुपाटणे
शंख ठेवण्याची अडणी.
नितिन थत्ते
संदूक
मोठी पेटी म्हणजे संदूक. [भांड्याकुंड्यात घ्यायचा का हा शब्द ? ]
-दिलीप बिरुटे
गडू
गडू - मराठीतला ८ आकडा आणि त्याचे प्रतिबिंब एकमेकांसमोर ठेवून जोडले आणि वर काठ लावले तर दिसेल तसे दिसणारे भांडे. धातूचे. कधी कधी छोट्या कमंडलूलाही गडू म्हणतात. उदा. गंगेच्या पाण्याचा गडू.
पूजासाहित्य
षोडषोपचार पूजेच्या पूजासाहित्यात अभिषेक पात्र, तांब्यापळी, पंचपात्र यासारखी भांडी, करंडा, आरती-तबक, निरांजन, समई, कर्पूर पात्र (पंचारती), धूपपात्र, फुले ठेवण्यासाठी तबके किंवा परड्या आदी अनेक वस्तू असतात.
कर्पूर पात्र
कापूर लावण्यासाठी एक नागमोडी आकाराचे लहानसे भांडे असते त्याला हलकारती असे म्हणतात. निरांजनाप्रमाणेच लामणदिवा, नंदादीप हेही दिवे असतात. अत्तरदाणी - गुलाबदाणी हीही भांडी या सदरातच मोडावीत.
बाकी पाणी तापवायचा बंब, गॅसची शेगडी, स्टोव्ह, फुंकणी, चकमकीचं शिंग, बोळकी(?) वगरे मंडळी भांडी मानायची का?
--अदिती
-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने
थुंकणे
थुंकण्यासाठी तस्त.
नितिन थत्ते
कानकोरणी
किती दिवसांनंतर ऐकला 'तस्त'. ह्या चर्चेतले कितीतरी शब्द अनेक वर्षांनी भेटत आहेत. पण 'तस्त' ह्या शब्दाच्या नुसत्या उच्चाराने एक काळ जिवंत झाला. तस्त म्हणजेच पिकदाणी ना.
माझी भर: कान कोरण्यासाठीची ती 'कानकोरणी'
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
कळशी
टींब....कळशी शब्द झाला का ?
-दिलीप बिरुटे