संस्कृत आणि बोलीभाषा..

राम राम मंडळी,

काही प्रश्न -

१) एखाद्या भाषेची/भाषेतली 'बोलीभाषा' हा त्या भाषेचा एक दागिना आहे, त्या भाषेच्या सौंदर्याचा एक महत्वाचा भाग आहे असे आपण मानता का?

२) संस्कृत भाषेमध्ये 'बोलीभाषा' हा प्रकार आहे का?

३) नसल्यास का नाही?

४) बोलीभाषा नाही, ही संस्कृत मधली एक मोठी उणीव समजावी काय?

धन्यवाद,

तात्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तरे

१. महत्वाचा भाग आहे, सौंदर्याचा नाही
२. संस्कृत या नावाने नाही. मराठी, गुजराथी वगैरे सगळ्याच संस्कृतजन्य भाषांना संस्कृतच्या सध्याच्या बोलीभाषा म्हणता येईल.
३. ही भाषा आज रोजच्या जीवनात कोठेही बोलली जात नाही
४. नाही. तिचे शुद्ध स्वरूप शिल्लाक राहिले आहे म्हणूनच आज आपल्यापर्यंत ते पोचले आहे

भाषेच्या स्वतंत्र अस्तित्वावरच/अविष्कारावरच घाला..!

महत्वाचा भाग आहे, सौंदर्याचा नाही

हम्म! प्रत्येकाचा दृष्टीकोन. आमच्या बहिणाबाई जेव्हा 'मन वढाय वढाय..' असे बोलके काव्य लिहितात तेव्हा आम्हाला ते सुदर वाटते!

मराठी, गुजराथी वगैरे सगळ्याच संस्कृतजन्य भाषांना संस्कृतच्या सध्याच्या बोलीभाषा म्हणता येईल.

अत्यंत धाडसी विधान!

म्हणजे 'प्रमाण मराठी भाषा' असे जे काही आम्ही ऐकून आहोत ती संस्कृतमधली बोलीभाषा आहे तर! बरं बरं!

आमच्या मते घारेसाहेबांनी वरील वाक्य लिहून मराठी भाषेच्या स्वतंत्र अस्तित्वावरच/अविष्कारावरच घाला घातला आहे. असो..

नाही. तिचे शुद्ध स्वरूप शिल्लाक राहिले आहे म्हणूनच आज आपल्यापर्यंत ते पोचले आहे

माफ करा घारेसाहेब, निदान माझ्यापर्यंत तरी (आणि कदाचित माझ्यासारख्या कित्येकांपर्यंत!) संस्कृत भाषा आणि तिचे ते सो कॉल्ड शुद्ध स्वरूप पोहोचलेले नाही.

तात्या.

--
संस्कृत भाषा जगासि कळेना
म्हणोनी नारायणा दया आली हो
देवाजीने परि घेतला अवतार
म्हणति ज्ञानेश्वर तयालागि हो!

प्रत्येकाचा दृष्टीकोन

मोठ्या प्रमाणात रोजच्या जीवनात जी भाषा बोलली जाते ती बोलीभाषा अशी माझी समजूत आहे. बोलीभाषा म्हणजे फक्त ग्रामीण बोली असे मला वाटत नाही. त्यामुळे
१. रोजच्या बोलण्यात कोणीच अलंकृत भाषा वापरत नाही. बहिणाबाईंच्या ओव्या मला अतीशय आवडतात. पण त्या रोज घरातल्या लोकांशी ओव्यांमध्ये बोलत नसाव्यात असे मला वाटते.
२.मराठीसह सर्वच संस्कृतजन्य भाषा हजारो वर्षे संस्कृतचा अपभ्रंश होत होत अस्तित्वात आल्या असाव्यात, हे जर मान्य केले तर अप्रत्यक्षरीत्या "त्या संस्कृतच्या बोलीभाषा असे म्हणता येईल" असे विधान मी केले आहे. त्या आहेतच असे नाही.
४.संस्कृत भाषा आपल्या युगापर्यंत नक्की येऊन पोचली आहे. एकाद्याला इच्छा असेल तर ती शिकता येते. आपल्याप्रमाणेच मीसुद्धा ती शिकलो नाही ही गोष्ट वेगळी.

"संस्कृत भाषा जनासी कळेना" म्हणून संत ज्ञानेश्वरांनी 'अमृताहून गोड' अशा मराठी भाषेत भावार्थदीपिका लिहिली, पण आज ती किती लोकांना समजते? ती प्रमाण मराठी भाषेला धरून आहे का? मराठीचे वेगळे व्याकरण लिहून 'प्रमाण मराठी भाषा' नंतरच्या काळात तयार झाली. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या सार्थ आवृत्त्या काढाव्या लागतात, कारण सात आठशेहे वर्षात मराठी भाषा खूप बदलली आहे. त्या मानाने संस्कृत भाषेत कमी बदल झाला असावा. ती भाषा बोलली जात नसल्यामुळेच तिचे जुने स्वरूप अजून अस्तित्वात राहिले असावे असा माझा अंदाज आहे.
मी काही भाषातज्ज्ञ नाही. माझ्या आकलनानुसार लिहिले आहे. चर्चाप्रस्तावावर फक्त तज्ज्ञांनीच मत द्यावे असे बंधन नसते.

चालु द्या!

हा हा!.. चांगला(च लांबु शकेल असा) चर्चाविषय
इच्छा झाल्यास लिहिण्यासाठी रुमाल टाकून ठेवत आहे.. बाकी चालु द्या!

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

बापरे

वर्तमानकाळ, भूतकाळ...

१. आपल्या ओळखीच्या सर्व भाषा मुख्यतः बोली असतात. (काँप्यूटरच्या 'बेसिक', 'सी', वगैरेंना हल्ली भाषा म्हणायचा प्रघात आहे, त्या प्रणाली मला अभिप्रेत नाहीत. अर्थातच त्या बोली नाहीत.) त्यामुळे एखाद्या भाषेला "बोली" असते किंवा नसते, हे तुमचे वाक्यच समजले नाही. "आचळे असणे हे गायीचे भूषण आहे" म्हटले तर जसे विचित्र वाटेल तसे.
२. मुद्दा १ न समजल्यामुळे मुद्दा २ बद्दल मत नाही.
३. मुद्दा २बद्दल मत नसल्यामुळे मुद्दा २ बद्दल मत नाही.
४. मुद्दा ४शी असहमत. "बोली नाही" म्हणजे काय, ते नीट समजले नाही.

मराठी शाळेत शिकवतात ती अगदी आपल्या घरच्यासारखी नसते, दूरदूरच्या लोकांशी बोलण्याच्या सोयीने शिकवली जाते. याबद्दल काही लोकांना फार क्रोध वाटतो, आणि या शाळेत शिकवल्या जाणार्‍या बोलीचा ते तिरस्कार करतात. हे लोक प्रेमाने आपल्या घरच्या भाषेला "बोली" म्हणतात, पण शाळेत शिकवलेल्या भाषेला "भाषा" म्हणतात, असे काहीसे दिसते. पण घरी बोलतो तीही बोलीच आणि शाळेत शिकवतात तीही बोलीच. दूरदूरचे लोक एकमेकांशी ही शाळेत शिकवलेली बोली वापरतात, म्हणून तिला "प्रमाण" असेही म्हणतात. (म्हणजे घरी वाटी, चमचा, मूठभर, चिमूटभर, असे मोजमाप सर्रास होते, तरी व्यापार करताना मिली, लिटर, वगैरे "प्रमाणे" वापरावी लागतात. तरी "मूठभर" आणि "मिली" ही दोन्ही मोजमापेच आहेत. तद्वत "प्रमाण"मराठी आणि घरची मराठी या दोन्ही बोलीच आहेत.)

"शाळेतली भाषा ही बोली-नसलेला-जुलूम" या विशिष्ट दृष्टोकोनातून वरील चर्चा होत आहे का? आणि "संस्कृत ही शाळेत शिकवतात म्हणून रुक्ष आहे" असा काही "दागिना नसणे" शब्दाचा अर्थ आहे काय? अर्थात काही लोकांना शाळेत तसा अनुभव आला असेल, हे तर आहेच. पण मग चर्चा तशी मांडावी.

डायलेक्ट्स् आणि लॅन्ग्वेज्

भाषा = लॅन्ग्वेज् आणि बोली = डायलेक्ट् असा काहीसा लहानपणापासून आजतागायत डोक्यात फिट् बसलेला समज पायाभूत मानून वरील प्रतिसादाचे खंडन-मंडन करावेसे वाटले म्हणून हा प्रतिसादप्रपंच.

पायाभूत अक्षरचसंच हे भाषेचे (बोलीचे नव्हे!) प्रमुख लक्षण किंवा वैशिष्ट्य असावे. जसे मराठीमध्ये असलेले स्वर आणि व्यंजने, अवग्रह, विसर्ग यांचा अक्षरसंच हे मराठी या 'भाषेचे' पायाभूत लक्षण. या अक्षरसंचातील अक्षरांच्या समूहातून तयार होतात ते शब्द आणि त्याला बहाल होतात किंवा केले जातात ते अर्थ. आणि प्रत्येक भाषेतील शब्दसमूहातून (शब्दांच्या विवक्षित क्रमातून) तयार होतात ती वाक्ये.हा क्रम कसा असावा म्हणजे वाक्याला अर्थ प्राप्त होईल याचा नियम म्हणजे बहुधा व्याकरण. मराठीसह प्रत्येक भाषेत अक्षरसंच, शब्द आणि व्याकरण हे तीन घटक मूलभूत असावेत. आणि याच धर्तीवर सी, सी++, जावा वगैरे 'भाषा' म्हणून मान्य होण्यास हरकत नसावी. या भाषांनाही स्वतःचा अक्षरसंच, शब्द आणि व्याकरण आहे. त्यामुळे धनंजय यांच्या वरील प्रतिसादातील 'सर्व भाषा बोली असतात' या वाक्याशी मी असहमत आहे. भाषा हा बोलींचा महासंच म्हणता येईल; बोली हा भाषेचा उपसंच म्हणता येईल. भाषेतील प्रमाणांशी, व्याकरणाशी फारकत घेऊन वेगळ्या तसेच अतिरिक्त शब्दांतून, किंचित शब्दबदलातून किंवा शब्दवैचित्र्यातून, वाक्य/एखादा शब्द बोलण्यातील हेल बदलून वगैरे बोली तयार होते, असे वाटते. विकिपिडियावरील या दुव्यावर बोली आणि भाषेतील खालील चार फरक नमूद केल्याचे दिसले -
Language varieties are often called dialects rather than languages:
अ. because they have no standard or codified form - मुख्यत्त्वे स्वतःचा असा अक्षरसंच व स्वतःचे व्याकरण (आणि इतर प्रमाणे) यांची अनुपलब्धता
ब. because the speakers of the given language do not have a state of their own
क. because they are rarely or never used in writing - लिखित स्वरूपातील वापर अत्यंत मर्यादित/क्वचितच किंवा शून्य
ड. or because they lack prestige with respect to some other, often standardised, variety -

धनंजय यांचा उर्वरित प्रतिसाद हा मुख्यत्त्वे 'प्रमाणित' बोली = भाषा आणि बोली 'प्रमाणित' आहे की नाही हे कसे ठरवावे, अशा काहीशा अंगाने जाणारा वाटतो; तो तितकासा पटला नाही. पण दिलेली उदाहरणे रोचक वाटली.

चर्चाप्रस्तावकाचा 'एखादी भाषा किंवा बोली दागिना असणे' या विचारात-
१. त्या बोलीतील स्वतःचे असे वैशिष्ट्यपूर्ण शब्द, मूळ भाषेतील मूळ शब्दाशी फारकत घेऊन उगम पावलेल्या शब्दचमत्कृती
२. लिखित स्वरूपातील वाक्य वाचणे नि तेच वाक्य कोणाच्यातरी तोंडून विशिष्ट हेलासहित बोलले जाणे या दोन अभिव्यक्तींमधून जाणवणारा फरक व परिणाम
३. कोणत्याही प्रमाणांच्या उपलब्धतेशिवाय विचारांचे आदानप्रदान होऊन संवाद साधला जाण्याची किमया होणे
यांचा समावेश असावा असे मला वाटते.

मूळ चर्चेतील प्रश्नांची माझ्या समजुतीनुसारची उत्तरे पुढीलप्रमाणे -
१. दागिना काही प्रमाणात आहे, सौंदर्यस्थळ नाही.
२. नसावा - आजपर्यंत मला तरी माहीत नाही
३. माहीत नाही; जाणून घ्यायला आवडेल.
४. नाही.

- परीवश

प्रकाटाहो

खालील प्रतिसाद अक्षरसंच = लिपी असा गोंधळ होऊन लिहिला होता. माझ्याच प्रतिसादातील चुक लक्षात आल्याने वर सफेदी मारत आहे ;)


जसे मराठीमध्ये असलेले स्वर आणि व्यंजने, अवग्रह, विसर्ग यांचा अक्षरसंच हे मराठी या 'भाषेचे' पायाभूत लक्षण

मराठी भाषेने देवनागरी अक्षरसंच त्यामानाने नुकताच (बहुदा १९५०) अधिकृतरित्या स्वीकारला आहे. त्या आधी हीच भाषा मोडी मधे निहिली जात होती व काही काळ (२०व्या शतकाच्या पूर्वार्धात) दोन्ही अक्षरसंचांमधे लिहिली जात असे.
तेव्हा अक्षरसंच हे भाषेचे पायाभूत लक्षण आहे हे पटत नाहि. अश्या अनेक भाषा आहेत ज्यांना स्वतःचा अक्षरसंच नाहि त्याही भाषाच आहेत बोली नाहित बहासा इंडोनेशिया ही "भाषा"स्वतःची लिपी नसल्याने - लुप्त झाल्याने रोमन अक्षरे वापरते म्हणून ती काहि बोली नाहि.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

धन्याशेठचे उत्तर पटले नाही..

भाषेतील प्रमाणांशी, व्याकरणाशी फारकत घेऊन वेगळ्या तसेच अतिरिक्त शब्दांतून, किंचित शब्दबदलातून किंवा शब्दवैचित्र्यातून, वाक्य/एखादा शब्द बोलण्यातील हेल बदलून वगैरे बोली तयार होते, असे वाटते.

सहमत आहे. धन्याशेठचे उत्तर पटले नाही..

बोलीभाषा हा मूळ भाषेचा किंवा प्रमाणभाषेपेक्षा निश्चितच वेगळा प्रकार आहे व तो नानाविध लोकांच्या बोलण्यातूनच जन्माला येतो. संस्कृत भाषेत 'बोलीभाषा' असा कुठलाही वेगळा प्रकार नाही हे सरळ सरळ मान्य न करता धन्याशेठने उगाचंच काही शब्दच्छल करून संस्कृत भाषेमधील या उणीवेवर पांघरूण घातले आहे असे वाटते..

अगदी साधे उदाहरण घेता येईल..

मराठीत आपण 'पाणी' असे म्हणतो पण अनेक मराठीजन बोलतांना त्याचा 'पानी' असा उल्लेख करतात. म्हणजेच 'पानी' हा बोलीभाषेतला शब्द झाला. आता मराठीतले एक वाक्य पाहू -

"ए आई, मला खूप भूक लागली आहे. मला भाकरी खायला दे"

आता हेच वाक्य बोलीभाषेत काही प्रान्तात साधारण असे बोलले जाईल -

"ए माय, भुकेनं लैच कावून र्‍हायलो बग. वैच भाकरतुकडा दे की खायाला!"

ही झाली बोलीभाषा.

अशी बोलीभाषा संस्कृतमध्ये आहे किंवा नाही असा माझा साधासरळ प्रश्न आहे. पण कुणीही त्याचे उत्तर द्यायला तयार नाही.

मुळात बोलीभाषेत भाषाविषयक/व्याकरणविषयक नियम तितकेसे कठोर नसतात. संवाद साधाला जाणे हेच महत्वाचे असते. लोकांच्या रोजच्या बोलण्यामुळे एखाद्या भाषा तिच्यातील व्याकरणविषयक, भाषाविषयक नियमांमधून हळूहळू मुक्त होऊ लागते आणि तिचे बोलीभाषेत रुपांतर होते. पण संस्कृत भाषा ही तिच्या नाकापेक्षा मोती जड म्हणावे अश्या अत्यंत जाचक आणि कडक अश्या व्याकरण-नियमात इतकी जखडली गेली आहे की तिला बिचारीला कधीही बोलीभाषेच्या स्वरुपात मुक्तपणे आम जनतेची/लोकांची बोलीभाषा म्हणून विहरता येईल किंवा नाही इतकाच माझा सवाल आहे..

तात्या.

--
संस्कृत भाषा जगासि कळेना
म्हणोनी नारायणा दया आली हो
देवाजीने परि घेतला अवतार
म्हणति ज्ञानेश्वर तयालागि हो!

सहमत .. असहमत

मुळात बोलीभाषेत भाषाविषयक/व्याकरणविषयक नियम तितकेसे कठोर नसतात
असहमत. प्रत्येक बोलीचे व्याकरणाचे नियम असतात. फक्त ते लिखित स्वरूपात नसतात इतकेच. "खंय वता?" च्या ऐवजी "खंय जातो?" असे विचारणे, हे चुकीचेच आहे.

संवाद साधाला जाणे हेच महत्वाचे असते
कसं बोललात! संवाद साधणे हे महत्त्वाचे. आता सांगा, एखादा मालवणी, एखादा अहिराणी आणि एखादा वर्‍हाडी एकत्र आले, तर त्यांनी कोणत्या बोलीत एकमेकांशी बोलावे की जेणेकरून व्यवस्थित "संवाद" साधला जाईल?

लोकांच्या रोजच्या बोलण्यामुळे एखाद्या भाषा तिच्यातील व्याकरणविषयक, भाषाविषयक नियमांमधून हळूहळू मुक्त होऊ लागते आणि तिचे बोलीभाषेत रुपांतर होते
साफ असहमत. प्रक्रीया ह्याच्या बरोबर उलट होते. विविध बोलींतून एक अपरिहार्य गरज म्हणून एक समाईक अशी प्रमाण बोली तयार होते.

संस्कृत भाषा ही तिच्या नाकापेक्षा मोती जड म्हणावे अश्या अत्यंत जाचक आणि कडक अश्या व्याकरण-नियमात इतकी जखडली गेली आहे की तिला बिचारीला कधीही बोलीभाषेच्या स्वरुपात मुक्तपणे आम जनतेची/लोकांची बोलीभाषा म्हणून विहरता येईल किंवा नाही इतकाच माझा सवाल आहे..
शंका रास्त आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रमाण बोलीचा मुद्दा

प्रक्रीया ह्याच्या बरोबर उलट होते. विविध बोलींतून एक अपरिहार्य गरज म्हणून एक समाईक अशी प्रमाण बोली तयार होते.

आपण मांडलेली 'प्रमाण बोली' ही संकल्पना अगदी मान्य आहे..परंतु 'प्रमाण भाषा' आणि 'प्रमाण बोली' या दोन गोष्टी तर वेगळ्या आहेत हे आपल्याला मान्य आहे का? आणि तसे असल्यास संस्कृतमध्ये हे दोन प्रकार आहेत का आणि नसल्यास का नाहीत हे मला जाणून घ्यायचे होते! :)

शंका रास्त आहे.

धन्यवाद..:)

तात्या.

--
संस्कृत भाषा जगासि कळेना
म्हणोनी नारायणा दया आली हो
देवाजीने परि घेतला अवतार
म्हणति ज्ञानेश्वर तयालागि हो!

संस्कृतात "वैकल्पिक" रूपे सर्व "प्रमाण"च

मराठीत आपण 'पाणी' असे म्हणतो पण अनेक मराठीजन बोलतांना त्याचा 'पानी' असा उल्लेख करतात. म्हणजेच 'पानी' हा बोलीभाषेतला शब्द झाला. आता मराठीतले एक वाक्य पाहू -
"ए आई, मला खूप भूक लागली आहे. मला भाकरी खायला दे"आता हेच वाक्य बोलीभाषेत काही प्रान्तात साधारण असे बोलले जाईल -
"ए माय, भुकेनं लैच कावून र्‍हायलो बग. वैच भाकरतुकडा दे की खायाला!"
ही झाली बोलीभाषा.

>> पानी/पाणी
अशा प्रकारचे फरक संस्कृतात आहेत.
उदाहरणार्थ कोणी "सुरापाणम्" म्हणते, तर कोणी "सुरापानम्" म्हणते. पण एकाला प्रमाणित आणि एकाला अप्रमाणित म्हणण्याचा भंपकपणा संस्कृतात करत नाही. दोन्हीही रूपे प्रमाणितच आहेत. अशी कित्येक उदाहरणे आहेत. आता भंपकपणा करत नाही, एकाला "अशुद्ध" म्हणत नाहीत. लवचिकपणा मुळातच प्रमाणित केला म्हणून चांगलेच आहे की! तो दोष नाहीच मानावा.

"ए आय भूक लागली"...
समजले नाही. अर्थातच अशी काही वाक्य बोलतात - पण ते बोलीभाषेतले म्हणून तुम्हाला नेमके कसे ऐकू यायला हवे, ते कळले नाही. जर एखाद्या वाक्याचे अनेक उच्चार असतील ते सर्वच प्रमाणित मानले जातात.
आई = प्रमाण, आय = अप्रमाण असा भंपकपणा नाही.

अयि मातः एहि!
अयि मातयेहि!
अयि मात एहि!
(अगे आई/आय/आइ, ये!) सगळेच प्रमाणित आहे.

"विविधता"
मला वाटते, "पूर्वेकडची बोली, पश्चिमेकडची बोली" वगैरे आपल्याला माहीत आहे, हे मी तुम्हाला सांगितले आहे. विपाशा नदीच्या अलीकडे-पलीकडे संस्कृत बोलण्याचे हेल बदलत ते आपल्याला माहीत आहे. मग "कोणीच तुम्हाला सांगत नाही" असे काय म्हणता :-) सांगितलेले आठवत नाही, असे असावे बहुधा.

अहो सोडा. शब्दाशी खेळ करण्यापेक्षा क्रियाशील मुद्दा सांगा - तुमच्या शाब्दिक खेळाने नेमका काय फरक पडणार आहे? ज्यांना संस्कृत आणि मराठी आणि कोंकणी भाषा वेगवेगळ्या आणि सुंदर वाटतात, ते तुमचे चार प्रश्न वाचून म्हणणार आहेत "अरे, काल मला सुंदर वाटलेले काव्य अगदीच बेकार आहे?" छे! आजही त्या तीन्ही भाषांतील काव्ये मला सुंदरच वाटत आहेत. माझ्या मते माझा सौंदर्यानुभव खोटा "शाबित" करणारे तुमचे प्रश्न म्हणजे शब्दच्छल होत.

समोर रक्तवारुणी आहे, तिच्यासाक्ष म्हणतो, संस्कृत, इंग्रजी, मराठी, कोंकणी, स्पॅनिश सर्व भाषा मला खूप वेगवेगळ्या आणि सुंदर वाटतात. आता बोला कुठले शब्दच्छल :-)

अक्षरे अस्तित्त्वात येण्यापुर्वी

श्री परिवश, प्रतिसादावर विचार करत आहे. एक शंका.

पायाभूत अक्षरचसंच हे भाषेचे (बोलीचे नव्हे!) प्रमुख लक्षण किंवा वैशिष्ट्य असावे.

अक्षरांचा शोध लागण्यापुर्वी भाषा अस्तित्त्वात नसावी, असे आपले मत आहे काय?

धनंजयच्या खालीले प्रतिसादाने शंकानिरसन झाले आहे. धन्यवाद.

खंडन-मंडन

भाषा = लॅन्ग्वेज् आणि बोली = डायलेक्ट् असा काहीसा लहानपणापासून आजतागायत डोक्यात फिट् बसलेला समज पायाभूत मानून वरील प्रतिसादाचे खंडन-मंडन करावेसे वाटले म्हणून हा प्रतिसादप्रपंच.

फिट्ट बसलेला समज काढून टाका :-)

पायाभूत अक्षरचसंच हे भाषेचे (बोलीचे नव्हे!) प्रमुख लक्षण किंवा वैशिष्ट्य असावे.

हे योग्य नाही. पायाभूत अक्षरसंच हा बोलींना नेहमीच असतो. (ज्याला इंग्रजीत "फोनीम" म्हणतात, आणि संस्कृतात "वर्ण" म्हणतात त्यालाच बहुधा "अक्षरसंच" म्हटले असावे असे समजतो आहे. नाहीतर अक्षरसंच म्हणजे काय हेच मला माहीत नाही.) "अक्षरसंच" नसलेल्या एखाद्या बोलीचे उदाहरण देऊ शकाल काय?

हा क्रम कसा असावा म्हणजे वाक्याला अर्थ प्राप्त होईल याचा नियम म्हणजे बहुधा व्याकरण.

व्याकरण म्हणजे काय याबद्दल (संस्कृत व्याकरणकार) पतंजलींचे मत मराठीतील उदाहरणांसह मी एका लेखमालेत दिले आहे (दुवा). आधुनिक भाषाविज्ञानातला विचार फारच थोड्या फरकाने पतंजलींच्या म्हणण्यासारखाच आहे. व्याकरणाचे नियम कोणी लिहिण्यावाचण्यापूर्वीच बोलीत अध्याहृत असतात. असे पतंजली म्हणतात - "मडके हवे तर आपण कुंभाराकडे जाऊन म्हणतो, मडके बनव. सुयोग्य शब्द बोलण्यापूर्वी आपण व्याकरणकाराकडे नाही जात, शब्द बनवून दे म्हणत..."

मराठीसह प्रत्येक भाषेत अक्षरसंच, शब्द आणि व्याकरण हे तीन घटक मूलभूत असावेत.

प्रत्येक बोलीमध्ये अक्षरसंच, शब्द आणि व्याकरण हे तीन घटक मूलभूत असतात. हे नसलेल्या एखाद्या बोलीचे उदाहरण देऊ शकाल काय? शक्यतोवर तुमच्या-माझ्या ओळखीची बोली असली तर बरे होईल.

विकिपेडियावरील चारही मुद्दे "ऑफ्टन कॉल्ड" म्हणजे काही शास्त्रीय ठोकताळे नाहीत.

अ. because they have no standard or codified form - मुख्यत्त्वे स्वतःचा असा अक्षरसंच व स्वतःचे व्याकरण (आणि इतर प्रमाणे) यांची अनुपलब्धता

येथे तुमचे भाषांतर योग्य नाही. योग्य भाषांतर असे :
"कारण त्यांना प्रमाणीकृत आणि लिखित-नियम रूप नसते". प्रमाणीकरणाचा मुद्दा मी वरती सांगितलाच आहे. कुठलाही भाषावैज्ञानिक प्रमाणित रूपांना "प्रमाणित बोली" म्हणेल, इतकेच. इंग्रजीतली "आर.पी., बीबीसीची बोली" ही इंग्रजीच्या अनेक बोलींपैकी एक आहे. पण ती प्रमाणित आहे, कारण दूरदूरचे लोक एकमेकांशी बोलण्यासाठी हीच बोली वापरतात. अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, कनेडियन बोलींपैकी प्रत्येकी एक-एक तरी प्रमाणित बोली आहेच. शेवटी एखादी बोली प्रमाणित मानायचे ठरवणे हा सत्तेचा आणि अस्मितेचा मुद्दा आहे, मुळात राजकीय मुद्दा आहे, भाषावैज्ञानिक मुद्दा नाही.

"भाषेस मानणारे राज्य असणे/नसणे" आणि "तुलनात्मक सन्मान नसणे" हे तर उघडउघड राजकीय आहेत. आणि "लिखित वापर कमी असणे" हीसुद्धा बाब मुख्यत्वे राजकीय आहे. पूर्वीच्या काळी लेखन फार कमी लोकांना जमे, आणि कोणाला जमे, तेसुद्धा राजकीय वर्चस्वावर अवलंबून असे.

आणि याच धर्तीवर सी, सी++, जावा वगैरे 'भाषा' म्हणून मान्य होण्यास हरकत नसावी.

मला वाटते, की तुम्ही या अभ्यासाकडे कुठल्या दिशेने येता, त्यावरून हरकत ठरते. हल्लीचे भाषावैज्ञानिक साधारणपणे या प्रश्नाकडे "चिह्नशास्त्र=सेमिऑटिक्स" या दिशेने येतात. हे चिह्नप्रणालींचे शास्त्र आहे. चिह्नांचा अर्थांशी संबंध असतो. म्हणजे मोर्स कोडला सुद्धा . आणि - ही "अक्षरे" (तुमचा शब्द) असतात. त्या अक्षरांनी जोडलेले "शब्द" असतात जसे .-, .., -- वगैरे. त्यांना "अर्थ" असतात.
परंतु सर्व चिह्नप्रणालींना "भाषा" म्हणत नाहीत, आणि सर्व "कोडिफिकेशन"ला व्याकरण म्हणत नाहीत. बोललेल्या चिह्नप्रणाली, आणि मेंदूचा तोच भाग वापरणार्‍या अन्य चिह्नप्रणाली (उदाहरणार्थ मूकबधिर लोकांची साइन-भाषा), यांच्या व्याकरणात गुणात्मक गुंतागुंत असते, आणि या सर्व प्रणाली एकमेकांशी खूप समांतर असतात.

मला वाटते, जे लोक संगणक शास्त्राकडून या अभ्यासाकडे येतात, त्यांना "सी++" वगैरेंना भाषा म्हणण्याचा सराव असतो. तेसुद्धा "नॅचरल लॅग्वेज" म्हणून एक वेगळा प्रकार आहे, असाच अभ्यास करतात. दोन वेगवेगळ्या शात्रज्ञांचा एकमेकांसाठी अनुवाद करायचा असेल तर :
भाषावैज्ञानिकांची "लँग्वेज" = संगणकवैज्ञानिकांची "नॅचरल लँग्वेज"
भाषावैज्ञानिकांची "सेमिऑटिक सिस्टिम" = संगणकवैज्ञानिकांची "लँग्वेज"

जोवर एकाच शब्दाचा संदर्भ सोडून गोंधळ होत नाही, तोवर प्रत्येक वैज्ञानिकाने वापरलेला शब्द ठीकच आहे.

गृहपाठ : (हा "रिदुक्तियो आद आब्सुर्दुम" प्रयोग आहे. याचे उत्तर देताना बोली-भाषा यांच्यामध्ये फरक करण्याचा फोलपणा लक्षात यावा.)
१. गोव्याची कोंकणी ही बोली आहे की भाषा? बोली
- १८०० काळापर्यंत तीत फारसे लिखित साहित्य सापडत नाही
- १९६०, किंवा १९८० दशकापर्यंत कोंकणीसाठी राज्य नव्हते
- कोंकणीत अक्षरे नाही असे कितीतरी लोक आत्मविश्वासाने ठोकून देत
- कोंकणी ही भारताच्या राज्यघटनेत सुरुवातीला उल्लेखलेली नव्हती
- इत्यादि.

- हल्ली कोंकणीत साहित्यरचना होते
- अक्षरांसहित शाळेत शिकवली जाते
- "प्रमाणित" बोली, वाद असला, तरी "अंत्रुजी" प्रमाणित आहे
- भारताच्या घटनेत समाविष्ट झाली आहे

आमच्या शेजारचे आजोबा पुर्वी बोलायचे तसेच बोलतात. पूर्वी ते "बोली" बोलायचे आणि हल्ली "भाषा" बोलतात म्हणजे शेजारचे आजोबा नक्की काय वेगळे करतात. जर पूर्वी कोंकणी "बोली" होती, तर कुठल्या भाषेची बोली होती? (कोंकणी ही मराठीची बोली होती असे काही लोकांचे उत्तर असे.) आता जर कोंकणी "स्वतंत्र भाषा" झाली, म्हणून मराठीचे काही बिघडले का?

२. मंगळूर-कोंकणी ही "भाषा" की "बोली"? "बोली" असल्यास कुठल्या भाषेची? कन्नडाची, "प्रमाणित" गोव्याच्या कोंकणीची, की मराठीची?

तस्मात, परीवश, तुम्ही "बोली"/"भाषा" वगैरे शब्दांची अशी काही व्याख्या करा, की तो "कोंकणी" या खर्‍याखुर्‍या उदाहरणाचा विचार करण्यालायक होईल. नाहीतर जमल्यास ह निरर्थक फरक "शास्त्रोक्त" करण्याच्या भानगडीतून तुम्ही-मी दोघेही बाहेर पडूया.

मात्र राजकीय बाब ही निरर्थक नाही. पण राजकीय वादांना उगाच शास्त्रोक्त मुखवटा घालून काहीएक हशील नाही.

अक्षरसंच नि व्याकरणाचा वारसा - मूळ भाषा >> बोली

धनंजय,

१. माझा संगणकशास्त्राचा अभ्यास भाषाशास्त्राच्या तुलनेत जास्त असल्याने संगणकशास्त्रीय दृष्टिकोनातून भाषेची व्याख्या आणि भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून भाषेची व्याख्या यात तफावत असण्याची आणि त्यामुळे समजुतीचा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. संगणकशास्त्राच्या दृष्टिकोनातून मराठीसारख्या भाषेला नॅचरल लॅन्ग्वेज म्हणणे आणि सी/सी++ सारख्या भाषेला संगणकाची भाषा संबोधणे, हे सुयोग्य. त्यामुळे आपण भाषेची व्याख्या काय करतो, यावर सगळे अवलंबून आहे, हा तुमचा मुद्दा पटण्यासारखा आहे. संगणाकशास्त्रीय दृष्टीने भाषेची व्याख्या मी सांगितली आहे, जी नॅचरल लॅन्ग्वेजेस् ना लागू होतेच. कृपया पडताळून पहावे.

२. डायलेक्ट् = बोली आणि लॅन्ग्वेज = भाषा या समजाला छेद देणारे कोणतेही पुरावे इतरत्र किंवा या चर्चेतही सापडलेले नाहीत.

३. बोलीला अक्षरसंच, व्याकरण इ. असणे, नसणे याबद्दल मला असे वाटते की (मी आधी म्हटल्याप्रमाणे) बोली ज्या भाषेचा उपसंच (किंवा वेरिअन्ट्) आहे, त्या मूळ भाषेतील अक्षरसंच, व्याकरण तिच्या बोलीकडे वारशाने येणे सहज शक्य आहे. ज्यांना ऑब्जेक्ट् ओरिएन्टेड् प्रोग्रामिंग ची ओळख आहे, त्यांना संगणकशास्त्रीय परिभाषेत सांगायचे झाले, तर मूळ भाषा = बेस् क्लास्, बोली = इनहेरिटेड् क्लास् अशी समांतरता घेतल्यास हा वारसा (इनहेरिटन्स्) लक्षात येईल, असे वाटते. कोंकणीला स्वतःचा अक्षरसंच असणे, व्याकरण* असणे ही वैशिष्ट्ये असतील, तर मला वाटते ती भाषा मानली जावी, बोली नाही. पण खानदेशी मराठीचा अक्षरसंच = प्रमाणित मराठी भाषेचा अक्षरसंच (नि व्याकरणाचेही तसेच) असे लक्षात घेतले तर खानदेशी मराठी ही बोली, भाषा नाही, असे मला वाटते. 'मी पाणी प्यालो' हे प्रमाणित मराठीमधील वाक्य 'म्या पानी प्याला' या वेरिअन्ट् रूपात तिच्या एखाद्या बोलीत अस्तित्त्वात असतेच; पण वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांचा परस्परसंबंध आणि भावार्थ यात तफावत नसावी.

* कर्ता, कर्म, क्रियापद व त्यांचा परस्परसंबंध याच्याही पलीकडे व्याकरण म्हणजे काय, याबाबत माझी माहिती अपूर्ण, कच्ची असण्याची शक्यता आहेच. त्यामुळे माझ्या मतातील व्याकरणाचा विचार कर्ता, कर्म, क्रियापद यांबाबतच्या प्रमाणित मराठीतील ढोबळ, सर्वसामान्य नियमांपाशी केन्द्रित आहे.

- परीवश

दोन पैसे

श्री परीवश, तुमच्याप्रमाणेच माझाही भाषाशास्त्र या विषयाचा अभ्यास नाही पण कुतुहल आहे. त्यामुळे मत मांडत आहे. मतात त्रूटी असल्यास जाणकार सुधारणा करतीलच. फार फार तर मत चुकीचे आहे, असे माझ्या लक्षात येईल, ज्यामुळे कमीत कमी या विषयावर विचार करण्याची (मला) योग्य दिशा मिळू शकेल.

तथाकथित बोलीभाषेला (उदा. खानदेशी) अक्षरसंच नसतो किंवा व्याकरण नसते, असल्यास ते तथाकथित प्रमाण भाषेतून आलेले (derived) असते. हे तुमच्या मताचे योग्य आकलन आहे का? असे आपले मत असल्यास असहमती व्यक्त करतो. कुठल्याही एका बोलीभाषेचा अक्षरसंच व स्वतंत्र व्याकरण असते हे दाखवता येणे शक्य असावे. त्या बोलीशी साधर्म्य असणार्‍या भाषेशी हा अक्षरसंच व व्याकरण मोठ्या प्रमाणात सारखे आहेत हे दाखवता येईल. त्याचवेळी (बोली व भाषा यांचे) अक्षरसंच व व्याकरण हे भिन्न आहेत असेही दाखवता येईल. त्यामुळे बोली व भाषा हे वर्गीकरण योग्य वाटत नाही.

नैसर्गिक आणि कृत्रिमांतला एक फरक

नैसर्गिक आणि कृत्रिमांतला एक फरक हा की कृत्रिमांत "डिक्लेरेशन" वगैरे आढळते.

> ज्यांना ऑब्जेक्ट् ओरिएन्टेड् प्रोग्रामिंग ची ओळख आहे,
> त्यांना संगणकशास्त्रीय परिभाषेत सांगायचे झाले, तर मूळ
> भाषा = बेस् क्लास्, बोली = इनहेरिटेड् क्लास् अशी समांतरता
> घेतल्यास हा वारसा (इनहेरिटन्स्) लक्षात येईल, असे वाटते.

नैसर्गिक वस्तूंमध्ये "हा बेस क्लास आहे" आणि "हा इन्हेरिटेड क्लास आहे" असे डिक्लेरेशन आढळत नाही.

(सी-संगणक भाषा जशी कर्निहान आणि रिची यांनी शब्द-सिंटॅक्स-प्रोसेसर "बनवून" तयार केली तशा नॅचरल भाषा कोणी "बनवल्या" असे तर तुमचे मत नाही ना? नॅचरल भाषांचे वर्ण, व्याकरण वगैरे कोणी बनवलेले नाही. नैसर्गिकपणे बोलणार्‍यांचे बोलणे ऐकून-विश्लेषण करून नॅचरल लँग्वेजच्या व्याकरणाचे वर्णन केले जाते. वर्णनात वर्ण-शब्द-वाक्य वगैरे संकल्पना येतात. तुमची व्याख्या पडताळून बघू म्हणजे कशी? अस्खलितपणे बोलणार्‍या माझ्या नातेवाइकांना वर्ण कुठले ते सांगता येत नाही - शाळेत शिकले म्हणून "अं अ:" हे अक्षरमालेत ते सांगतात - व्याकरणदृष्ट्या हे वर्ण नाहीत. "ञ्" वर्णाचा उच्चार शब्दाच्या अंतर्गत अस्खलित करतात, पण वर्णमाला घोकताना "यं" असे काहीसे म्हणतात. कर्ता-कर्म वगैरेच्या बाबतीत गोंधळलेले असतात. पण संवादात एकही चूक नसते. बेसिक-सिंटॅक्स उघडपणे न जाणता अस्खलित बेसिक-प्रोग्रॅम लिहू शकणे शक्य तरी आहे का? सर्व नॅचरल भाषांची प्रक्रिया मेंदूच्या डाव्या गोलार्धातील कानशिलाच्या आतील टेंपोरल भागात होते. याचे "हार्डवायरिंग" असते. यामुळे नॅचरल-लँग्वेजच्या व्याकरणाचा अभ्यास थोडाफार जीवशास्त्रासारखा होतो. जर समाजामध्ये काही वाक्य ऐकू आले, पण व्याकरण-अभ्यासकाच्या नियमात बसले नाही, तर व्याकरण-अभ्यासक आपला नियम चुकला असे मान्य करतो - गत्यंतरच नसते. जर प्रोग्रॅमरने काही लिहिले, आणि प्रमाण सिंटॅक्सच्या दृष्टीने ते चूक असले, तर प्रॉग्रॅमरचीच चूक मानली जाते, नियम तसाच कायम राहातो. म्हणून संगणक-भाषेचा दृष्टांत नैसर्गिक भाषांना फार दूरपर्यंत लागू करू नये.)

खानदेशीला व्याकरण आहे, आणि दक्खनी*ला व्याकरण आहे, दोघांना अक्षरसंच आहेत. पण खानदेशीमधली रूपे काही रूपे वेगळी आहेत आणि दक्खनीमधली काही रूपे वेगळी आहेत.
(*मराठीच्या प्रमाण बोलीच्या जवळात जवळची प्रादेशिक बोली - ही पुण्याच्या जवळ बोलतात)

उदाहरणार्थ ज्या ठिकाणी दक्खनीमध्ये "त्याला" म्हणतात, तिथे खानदेशीमध्ये "त्याले" म्हणतात. येथे "बेस क्लास" कुठला आणि व्हेरियंट क्लास कुठला? कारण हे कुठे डिक्लेर केलेले सापडत नाही. जर खानदेशी माणूस मनात आधी "त्याला" असे बेस-क्लास-मधले रूप आणून मग ते बदलून "त्याले" असे करत असता, तर "त्याले" हे व्हेरियंट म्हणता आले असते. पण खानदेशी बोलणारा माणूस तसे काही करत नाही. थेट मनापासून "त्याले" असेच म्हणतो.

> कोंकणीला स्वतःचा अक्षरसंच असणे, व्याकरण* असणे
> ही वैशिष्ट्ये असतील, तर मला वाटते ती भाषा मानली जावी,
> बोली नाही.
"स्वतःचा अक्षरसंच" म्हणजे काय? साधारणपणे संस्कृतोद्भव भाषांना जो अक्षरसंच असतो, त्याचाच एक "सबसेट" कोंकणीला आहे. इतकेच काय त्याचाच एक "सबसेट" मराठीला आहे. त्याचाच एक "सबसेट" खानदेशीला आहे. (खुद्द संस्कृतातही एक "सबसेट"च आहे, पूर्ण सेट नाही.)

"स्वतःचे व्याकरण" म्हणजे काय? कर्ता, कर्म वगैरे (तुमच्या तळटीपेतून) कोंकणीत, खानदेशीमध्ये, दक्खनीमध्ये आणि संस्कृतात ओळखता येतात. पैकी भाषा कुठली आणि बोली कुठली? "स्वतंत्र व्याकरण" विरुद्ध "इन्हेरिटेड व्याकरण" कसे ओळखता येते?

> पण खानदेशी मराठीचा अक्षरसंच = प्रमाणित मराठी भाषेचा
> अक्षरसंच (नि व्याकरणाचेही तसेच) असे लक्षात घेतले तर
> खानदेशी मराठी ही बोली, भाषा नाही, असे मला वाटते.
खानदेशीचा अक्षरसंच हा सुद्धा संस्कृतोद्भव भाषांचा अक्षरसंच आहे. मराठीचा अक्षरसंच आहे, तसा हिंदीचा आहे. व्याकरणाबद्दल "त्याले"चे वरती उदाहरण दिले आहे. आणि अगदी मुळाशी कर्ता-कर्म वगैरे करायला गेले, तर खानदेशीचे व्याकरण संस्कृताचेच "व्हेरियंट" व्याकरण आहे, मग ही संस्कृताची "बोली", की मराठीची "बोली"?

> खानदेशी मराठी ही बोली, भाषा नाही, असे मला वाटते.
याबद्दल मी तुमच्याशी सहमत आहे. पण त्याचे कारण राजकीय आहे - खानदेशी लोक प्रमाणमराठीला "आपले प्रमाण" मानतात, म्हणून खानदेशी ही मराठीची बोली होय. गोव्यातले बहुसंख्य कोंकणीभाषक प्रमाणमराठीला "आपले प्रमाण" मानत नाहीत, त्यांनी राजकीय आंदोलन केले, म्हणून कोंकणी मराठीची बोली नाही.

कोंकणी ही बोली आहे, तिला व्याकरण नाही, आणि अक्षरे नाही, (किंवा जे काय आहे ते "स्वतंत्र" नाही) असे अगदी मनापासून ठासून सांगणारे लोक १९८० काळापर्यंत खूप दिसत. आजकाल तितकेसे दिसत नाहीत. खानदेशीबाबत तुमचे असे तर काही होत नाही ना? थोडासाच अभ्यास करून जाणवेल की खानदेशी-दक्खनी-संस्कृत या सर्व खूप जवळ-जवळच्या आहेत - त्यांचे अक्षरसंच एकमेकांचे "व्हेरियंट्स" मानता येण्यासारखे आहेत - कुठलीलाही "बेस" माना. पण थोडेथोडे वेगळे आहेत. म्हणजे थोडेथोडे "स्वतंत्र" आहेत. व्याकरणाबाबतही तसेच.

> डायलेक्ट् = बोली आणि लॅन्ग्वेज = भाषा या समजाला
> छेद देणारे कोणतेही पुरावे इतरत्र किंवा या चर्चेतही सापडलेले
> नाहीत.
हा समज मुळात तुम्हाला कुठल्या पुराव्यानिशी मिळाला? :-) ते न समजता त्याच्याविरुद्ध ठोस "पुरावा" म्हणजे काय, हेच कळणार नाही. पतंजलींच्या व्याकरणमहाभाष्याचे भाषांतर वाचूनही तुम्हाला छेद देणारे काही सापडले नाही, म्हणजे आश्चर्य वाटते?

भाषा म्हणजे भाषण-होते-ती ="जी बोलली जाते. बोली = जी बोलली जाते. लँग्वेज = लँग्-वेज = जिभेचे वळण. डायालेक्ट = एकमेकांशी बोलणे.

इंग्रजीमध्ये तरी भाषावैज्ञानिक विचारांत "डायालेक्ट" आणि "लँग्वेज" यांच्यात स्पष्ट व्याख्येचा फरक कुठे केलेला तुम्हाला आढळलेला आहे? (तुमचे विकीचे उद्धरण बहुतेक राजकीय अस्मितेचे आणि अवमानाचेच मुद्दे सांगते.) जर तुमचा हा मूळ समज "बिनपुराव्या"ने आला असेल, तर त्याच्याविरुद्ध पुरावा तरी कोणाला काय देता येईल?

असो. समज असण्याचे स्वातंत्र्य आपणा सर्वांना आहे. पण समज करून धोरणात काही फरक पडणार आहे का? - त्याचे मात्र स्वातंत्र्य नसून बहुमत लागते. ही भाषा आणि ती बोली असा पूर्वग्रह "वैज्ञानिक" मानून गोव्याच्या लोकांना राज्यभाषा बनवण्यात आडथळा आणला गेला. आंदोलने करून नुकसान झेलून तेच साध्य करून घ्यावे लागले. म्हणून तुमच्या स्वतंत्र समजाचा मी विरोध करत आहे. पण जर धोरणात्मक काही फरक पडत नसेल, तर मी तुमचा या बाबतीत विरोध करणार नाही. तुमच्या समजाने धोरणात्मक काय फरक पडतो, असे समजावून सांगाल काय?

उत्तराचा प्रयत्न

१) एखाद्या भाषेची/भाषेतली 'बोलीभाषा' हा त्या भाषेचा एक दागिना आहे, त्या भाषेच्या सौंदर्याचा एक महत्वाचा भाग आहे असे आपण मानता का?
जी बोलली जाते ती बोली. ह्या दृष्टीने पाहिले तर्, जगात बोलली जाणारी प्रत्येक भाषा ही बोलीच ठरते. भौगोलिक विभाग आणि साजाजिक स्तर यांवरून बोली बदलत जाते. मराठीचेच उदाहरण घेतले तर, कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ ह्या विविध भौगोलिक विभागात (तसेच त्यांच्या उपविभागात) वेगवेगळ्या बोली प्रचलित आहेत. त्याच बरोबरीने, त्या त्या विभागातील सामाजिक दृष्ट्या उच्च वर्गीय तसेच निम्न वर्गीय ह्यांच्या बोलीदेखिल वेगवेगळ्या असतात, असे दिसून येईल. थोडक्यात, कोणत्याही बोलल्या जाणार्‍या भाषेच्या अनेक बोली एकाच वेळी अस्तित्वात असतात. त्याच वेळी, ह्या सर्व बोलींना समाईक अशी प्रमाण बोलीदेखिल अस्तित्वात असते, नव्हे ती असायलाच हवी. मालवणी बोली ही कितीही गोड असली तरी, मालवणी बोलीतील एखादे पुस्तक, भंडारा जिल्यातील एखाद्या शेतकर्‍याला कितपत कळेल याची शंकाच आहे. तेव्हा संवादाचा प्रमुख हेतू, की आपले म्हणणे समोरच्याला पूर्णपणे कळायला हवे, हा असेल तर्, तो एका समाईक बोलीतच हवा.

प्रमाण बोली म्हणजे जडबंबाळ संस्कृतप्रचूर बोली, हा निव्वळ गैरसमज आहे. (श्री विसोबा खेचर आणि सुनील जेव्हा एकमेकांशी बोलतात, तेव्हा ते प्रमाण बोलीचाच आधार घेतात)

तेव्हा दागिना वगैरे कल्पना नाही, पण बोली (प्रमाण बोलीसहित) हा बोलल्या जाणार्‍या प्रत्येक भाषेचा एक अविभाज्य आणि अपरिहार्य भाग आहे, हे निश्चित.

२) संस्कृत भाषेमध्ये 'बोलीभाषा' हा प्रकार आहे का?
कर्नाटकातील मठूर गावात संस्कृत बोलली जाते, हे नुकतेच कळले. तेव्हा बोलली जाणारी ती बोली, ह्यानुसार संस्कृत बोली आहे. परंतु, मठूर गावात बोलली जाणारी संस्कृत आणि वाराणशीतील काही कुटुंबात बोलली जाणारी संस्कृत, ही सारखीच आहे किंवा कसे, ह्याबाबत कल्पना नाही. तेव्हा संस्कृतची एकच प्रमाण बोली असणेदेखिल शक्य आहे.

३) नसल्यास का नाही?
उत्तर क्रमांक २ पहावे.

४) बोलीभाषा नाही, ही संस्कृत मधली एक मोठी उणीव समजावी काय?
उत्तर क्रमांक २ पहावे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हम्म!

मराठीचेच उदाहरण घेतले तर, कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ ह्या विविध भौगोलिक विभागात (तसेच त्यांच्या उपविभागात) वेगवेगळ्या बोली प्रचलित आहेत. त्याच बरोबरीने, त्या त्या विभागातील सामाजिक दृष्ट्या उच्च वर्गीय तसेच निम्न वर्गीय ह्यांच्या बोलीदेखिल वेगवेगळ्या असतात, असे दिसून येईल. थोडक्यात, कोणत्याही बोलल्या जाणार्‍या भाषेच्या अनेक बोली एकाच वेळी अस्तित्वात असतात.

अशीच विविधता संस्कृत भाषेत आहे का असा माझा प्रश्न होता! :)

पण बोली (प्रमाण बोलीसहित) हा बोलल्या जाणार्‍या प्रत्येक भाषेचा एक अविभाज्य आणि अपरिहार्य भाग आहे, हे निश्चित.

संस्कृतचाही आहे का? असा माझा प्रश्न होता/आहे..

परंतु, मठूर गावात बोलली जाणारी संस्कृत आणि वाराणशीतील काही कुटुंबात बोलली जाणारी संस्कृत, ही सारखीच आहे किंवा कसे, ह्याबाबत कल्पना नाही.

तेच जाणून घ्यायचे होते..

तेव्हा संस्कृतची एकच प्रमाण बोली असणेदेखिल शक्य आहे.

हम्म! म्हणजे विविधता नाही!

असो..

तात्या.

--
संस्कृत भाषा जगासि कळेना
म्हणोनी नारायणा दया आली हो
देवाजीने परि घेतला अवतार
म्हणति ज्ञानेश्वर तयालागि हो!

भाषा - अक्षरे

>>पायाभूत अक्षरचसंच हे भाषेचे (बोलीचे नव्हे!) प्रमुख लक्षण किंवा वैशिष्ट्य असावे.

असे बहुधा नसावे. नाहीतर खालील वाक्य मराठी/हिंदी/संस्कृत मध्ये लिहिले आहे असे मानावे लागेल.

तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

नितिन थत्ते

वाद कशाला म्हणतो मी

विसोबा

असे बघा. तुम्ही ठाण्याहून लोकलने, सेंट्रल लाईनने मुंबई व्हीटीला निघालात तर मुलुंड, भांडुप, करत व्हीटीला पोचाल. समजा धनंजय चेंबूरहून हार्बरने निघाले तर कुर्ला, चुनाभट्टी करत पोचतील आणि राधिकाबाई अंधेरीहून हार्बरने निघाल्या तर आणखी वेगळी स्टेशने घेत पोचतील. पण तुम्ही व्हीटीला एकमेकाला भेटालच.
तसेच इथे आहे. तसेच तुम्ही, धनंजय आणि राधिका यांचा ऍप्रोच वेगळा असला, मुद्दे वेगळे असले तरी सर्वजण एकाच ठिकाणाला म्हणजे निष्कर्षाला पोचलात. मग माझ्या मार्गावरची स्टेशने इतरांच्याही मार्गावर लागलीच पाहिजेत असा आग्रह का? किंबहुना ती लागणार नाहीतच. काही स्टेशनांची नावे एकच असली तरी हार्बरचे स्टेशन वर आणि सेंट्रलचे खाली (उदा. कॉटन ग्रीन, आणखीही असतील, चूकभूल देणेघेणे) असे असते. तसेच इथेही मुद्दे सारखे वाटले तरी नेमक्या अर्थ वेगळे असू शकतात. ते तितके महत्त्वाचे नाही जितके मुंबई व्हीटीला सुरक्षित पोचून एकमेकाला भेटणे.

आजकाल अतिरेकी बाँब फोडण्याचा धोका इतका आहे की ट्रेनने सुरक्षित कुठेही पोचल्याबद्दल देवाचे आभारच मानले पाहिजेत. मग अंतिम स्थानी सुरक्षित पोचल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा सोडून उगीच वाद कशाला घालायचे?

विनायक

पटले!

उत्तर पटले!

धन्यवाद, :)

आपला,
(स्नेहांकित) तात्या.

--
राजकारणाप्रमाणेच मराठी आंतरजालावरदेखील कुणीच कुणाचा कायमस्वरूपी शत्रू वा मित्र नसतो! :)

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

असेच्

आजकाल अतिरेकी बाँब फोडण्याचा धोका इतका आहे की ट्रेनने सुरक्षित कुठेही पोचल्याबद्दल देवाचे आभारच मानले पाहिजेत. मग अंतिम स्थानी सुरक्षित पोचल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा सोडून उगीच वाद कशाला घालायचे?
असेच ..
फक्त आपण वाद घालतो आहे ते कळत नाही, स्टेशन आल ते सुद्धा समजत नाही. निदान जिवंत आहोत तेवढे कळत असावे...म्हणून प्रतिसाद आणि चर्चा पुन्हा सुरु होते:)
सोनाली

खरं आहे..!

फक्त आपण वाद घालतो आहे ते कळत नाही, स्टेशन आल ते सुद्धा समजत नाही.

खरं आहे गं बये तुझं! :)

आपला,
(ठाणे स्टेशनवर उतरणारा) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

प्राकृत

प्राकृत भाषा
हे लेखन श्री. विसोबा खेचर यांच्या "संस्कृतच्या बोलभाषा" या संबंधात आहे. माझ्या एका जाणकार मित्रांना या बाबतीत विचारले असताना त्यांनी "प्राकृत भाषा संस्कृतच्या बोलभाषा नव्हेत " असे सांगितल्यामुळे ती शक्यता धरूनच वाचावे.
संस्कृत हा शब्द"कृतां"त आहे. जी भाषा मुद्दाम, जाणूनबुजून, व्याकरणात बंदिस्त केलेली, ती "संस्कृत". अर्थात ती जनसामान्यांना अवघड वाटणारच. त्यामुळे ज्यावेळी सुत्रे रचली गेली त्यावेळीही जनसामान्य ही बंदिस्त भाषा न वापरता, "पाअड" (प्रगट) भाषा वापरत होते. ती भाषा "प्राकृत". या भाषेत संस्कृत शब्दांबरोबर "देशी" शब्दही असत.व्याकरणाचे फारसे बंधन नसल्यामुळे स्त्रीया, नोकरचाकर, शूद्र वगैरे यांची ही भाषा. गंमत म्हणजे सर्व संस्कृत नाटकात प्रामुख्याने हीच भाषा
वापरात आहे. शेवटी राजा. मंत्री (व फार तर नायक) इत्यादी थोडेच "श्रेष्ट"च संस्कृतमध्ये बोलणार बाकी सगळी पात्रे प्राकृतात. घरात हे श्रेष्टही प्राकृतातच बोलत व म्हणून यज्ञाची दीक्षा घेतल्यावर यजमानाने प्राकृत बोलू नये असे बंधन घालावे लागले! एवढ्या साम्यावरून प्राकृतला पाहिजे तर बोलीभाषा म्हणावे.

मुख्य प्राकृत भाषा चार. महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पिशाची. यात पहिली ज्येष्ठ. गाथासप्तशती (जीचा परिचय श्री. वालावलकरांनी करून दिला आहे) हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ झाला.
शौरसेनीतील ग्रंथ उपलब्ध नाही. पिशाचीमध्ये गुणाढ्याचा बृहत्कथा होता.(त्याची संस्कृत छायाच उपलब्ध आहे). मागधीमध्ये ( अर्धमागधी, पाली अंतर्भुत करा) बौद्ध साहित्य विपुल आहे. स्थळकाळानुसार प्राकृतचे अनेक पोटभेद निर्माण झाले. पुढे या भाषांवरही व्याकरणाचे बंधन येऊ लागले, त्या मरगळल्या. त्यातून आधुनिक भाषा निर्माण झाल्या, जसे महाराष्ट्रीतून मराठी. (उपक्रमवर काही हलकेफुलके लेख येऊन गेले की मग या विषयावरही लिहीन.)
शरद

येन्नाप्पा यिप्पडि किण्डल् पण्ड्रीङ्गळेऽ...! ;-)

येन्नाप्पा यिप्पडि किण्डल् पण्ड्रीङ्गळेऽ...! ;-)

>>पायाभूत अक्षरचसंच हे भाषेचे (बोलीचे नव्हे!) प्रमुख लक्षण किंवा वैशिष्ट्य असावे.
असे बहुधा नसावे. नाहीतर खालील वाक्य मराठी/हिंदी/संस्कृत मध्ये लिहिले आहे असे मानावे लागेल.
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

येन्नाप्पा यिप्पडि किण्डल् पण्ड्रीङ्गळेऽ...! ;-) (काय बुवा माझी अशी मजा घेतांय!)

असो. श्री. विसोबा खेचर ह्यांच्या 'संस्कृताच्या बोली' या संदर्भात मला एक प्रश्न पडला आहे.

तमिऴभाषा ही मराठीभाषेची आई आहे असे 'संमत सिद्धांत' मांडून सिद्ध करणारे प्रसिद्ध महाराष्ट्रीय भाषाशास्त्री श्री. विश्वनाथ खैरे ह्यांच्या मते, संस्कृत ही एक उद्भ्रंश केली गेलेली आणि 'संस्कृत' (well constructed) अशी 'केली गेलेली' भाषा आहे. (श्री. शरद सर म्हणतांत त्याप्रमाणे 'कृतांत') अशा ह्या भाषेस, पूर्वी 'भाषा' करतांना आणि नंतर 'संस्कृत' करतांना, त्याकाळी उपलब्ध असलेल्या विविध भाषांच्या बोली - विशेषतः प्राकृत भाषा आणि त्यांच्या विविध बोली - ह्यांतून व्याकरणसूत्रांची निर्मिती करून सूत्रांत ताळलेले आहे. त्यामुळे संस्कृताची स्वतःची बोली असण्याचा प्रश्न गौण ठरतो.

---

भाषावार प्रांतरचनेनंतर उत्तरभारतामध्ये अस्तित्त्वात असणार्‍या अनेक बोलीभाषांनी स्वतःस स्वतंत्र अशा हिन्दी भाषेमध्ये लोपविले असे दिसते. राजस्थानाचे उदाहरण ठळक आहे तें अभ्यासावे: मारवाडी ह्या मातृभाषेऐवजी हिन्दीमध्ये संभाषण करण्याकडे तरुणांचा कल झालेला आहे. उत्तरपूर्व भारतांतदेखील जवळ-जवळ ३५० विविध भाषा अस्तित्त्वांत आहेत, तेथील तरुणांचा इंग्लीश भाषेचा उपयोग करण्याकडे कल वाढतो आहे^. ही भाषाशास्त्राभ्यासकांची काही निरीक्षणें आहेत. ह्याचप्रमाणे त्याकाळच्या बोलीभाषा संस्कृतात लोप पावणे ही एक शक्यता असू शकते - असणार हा तर्क आहे. त्यामुळे, तिची स्वतंत्र बोलीभाषा अस्तित्त्वांत असण्याचा प्रश्न गौण ठरावा काय?

^ ह्याबाबत आपले सदस्य श्री. पूर्वांचल हे काही उद्बोधक भाष्य करू शकतील.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

संगणक

>> माझा संगणकशास्त्राचा अभ्यास भाषाशास्त्राच्या तुलनेत जास्त असल्याने संगणकशास्त्रीय दृष्टिकोनातून ....

भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे पुनःपुन्हा येत असतात त्यांपैकी काहींमध्ये "संस्कृत ही संगणक प्रणालीसाठी (काँप्युटर प्रोग्रॅमसाठी) सर्वात सुटेबल भाषा आहे अशा स्वरूपाचा दावा असतो."

हा दावा खरा आहे काय आणि जगात कोठे संस्कृतवर आधारित संगणक भाषा बनवण्याचा प्रयत्न करीत आहे काय? यावर जाणकारांनी खुलासा केला तर बरे होईल.

नितिन थत्ते

 
^ वर