"कूटलिपी - एक विचार"

मित्र हो,
आणि श्री.हैयोहैयैयो, श्री.धनंजय यांना विशेषकरून,

उपक्रम वा अन्य आंतरजालावर नाडीग्रंथांवर हेटाळणीच्या व चेष्टेच्या प्रतिक्रियांवरून वाचकांना ह्या विषयाची गंभीरता वाटत नसल्याचे लक्षात आले. म्हणून मध्यंतरी मी नाडी ग्रंथांवर विचार व्यक्त करायचे टाळत होतो. पण उपक्रम दिवाळी अंक २००९ मधील "कूटलिपी - एक विचार" या श्री. हैयोहैयैयो यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण लेखामुळे मला पुन्हा एकदा नाडीग्रंथांबद्दल विचार व्यक्त करावेसे वाटले.
श्री. धनंजय यांनी लिहिलेल्या स्याद्वादा वरच्या लेखाला मी प्रतिक्रिया लिहिली होती. - त्याप्रमाणे नाडीग्रंथांच्या पुर्ण अनुभवातून मिळालेल्या माहितीच्या आधाराने निष्कर्ष काढण्याची गरज मी माझ्या लेखनातून वेळोवेळी अधोरेखित करत आलो आहे. विचारवंतांनी यावर नाडी ग्रंथांची फक्त टिंगलटवाळीने दुर्लक्ष न करता विचार करावा ही नम्र विनंती मी केली होती. त्यावर विविध उदाहरणे देत शेवटी "प्रात्यक्षिकाचे सर्वतोपरी स्थान मला मान्यच आहे, याबाबतीत तुमच्याशी पुन्हा सहमती सांगतो" असे लिहून धनंजयांनी अनुभवाचे श्रेष्ठत्व हेच प्रमाण असल्याचे मान्य केले आहे.

एक अभ्यासक म्हणून धनंजय ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वांना कुतुहल आहे. त्यांनी व्यक्त केलेली वैचारिकता, विद्वत्तापूर्ण टीका- टिप्पण्या जालावरील वाचकांना आपापली मते बनवायला, तपासून पहायला आणि सार्वजनिक मत बनवायला प्रवृत्त करतात. हे सर्व विदित आहे. श्री. हैयो ह्यांच्या लेखाच्या संबंधी त्यांनी नाडी ग्रंथांच्या पट्टयांची छायाचित्रे देता आली असती तर... असे म्हणून त्यांच्याकडे तशी मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हैयोंनी माझा (ओकांचा) उल्लेख करून नाडी ग्रंथांच्या पट्ट्यांचे फोटो किंवा स्कॅन त्यांना वा अन्य कोणालाही सहजासहजी मिळवणे अवघड असल्याचे म्हटले आहे.

श्री. हैयोहैयैयो यांच्या विविध लिपिशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून नाडी ग्रंथांच्या लिपीचा, मजकुराचा शोध घेता आला तर किती बहार येईल. असे वाटून मी त्यांना विनंती करतो की मी माझ्या बाजूने जी काही शोध साहित्याची मदत करता येणे शक्य असेल ती आनंदाने करीन. त्यांनी त्या शोधसाहित्याची फोड करून त्याचा अर्थ व माहिती वाचकांना प्रस्तूत करावी.

श्री. धनंजयांना विनंती, की त्यांनी नाडी ग्रंथलेखनावर अधिक प्रकाश पाडण्यासाठी मदत करावी तसेच ह्याबाबत अधिक काय करता येईल त्यावर त्यांची अभ्यासपूर्ण मते सुचवावीत.

या जालावरील उत्साही वाचकांना नाडीग्रंथाच्या सत्यतेची तपासणी करायला मी आवाहन करतो. त्यांनी त्यांच्या नाडीग्रंथांचे वाचन करावे व त्यांच्या नाडीपट्टीचे छायाचित्र मिळवून तेही लिपीतज्ञ श्री. हैयोहैयैयो यांना सादर करावे. त्यामुळे या विषयाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल.
शशिकांत ओक

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे

उपक्रम दिवाळी अंकातल्या लेखात जो प्रतिसाद झाला त्यात मी अशी काही भूमिका सांगितली.

(संभवनीयतेच्या) गणितापूर्वीसुद्धा "प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द" या प्रमाणांचा तरतमभाव आणि उपयोग हा नैयायिकांनी चर्चिलाच आहे. प्रत्यक्ष आपोआप जाणवले, तर प्रत्यक्षच ग्राह्य आहे. पण प्रत्येक प्रत्यक्ष अनुभवणे शक्यच नाही. आप्ताच्या शब्दाबद्दल संदेह असला, तर उपमान शोधावे, ते उजवे. उपमानाबद्दल संदेह असला तर अनुमान शोधावे, ते अधिक उच्च प्रमाण. अनुमानाबद्दल संदेह असला तर प्रत्यक्ष शोधावे, ते सर्वोच्च प्रमाण.

...

माझे आयुष्य मर्यादित आहे. फारफार जगलो तर शंभरएक वर्षे जगेन, कदाचित हे वाक्य टंकता-टंकताच मरण पावेन. या मर्यादित आयुष्यात प्रात्यक्षिके घेण्यासारख्या कित्येक विलक्षण गोष्टी आहेत. या प्रचंड विलक्षणांच्या यादीत "नाडीग्रंथ किती जागेत किती मावतात त्याचे प्रात्यक्षिक" याचे प्रात्यक्षिक घेण्यास आद्यक्रम द्यायला तुम्ही मला का सांगत आहात? त्यासाठी तुम्ही जो काही युक्तिवाद कराल त्यालाच नैयायिक "संदेह" म्हणतील. आणि तसा काही पटण्यासारखा संदेह दिलात तरच जैन विचारवंतही उंट खाण्याचे प्रात्यक्षिक करतील, असे वाटते.
.
सारांश : (संदेह असल्यास, उपयुक्ततेच्या आद्यक्रमाने) प्रात्यक्षिकाचे सर्वतोपरी स्थान मला मान्यच आहे, याबाबतीत तुमच्याशी पुन्हा सहमती सांगतो.

यात ठळक ठशात दिलेल्या वाक्यामधून संशोधनासाठी काही दिशा मिळू शकेल.
१. संदेह पटण्यासारखा करणारे संशोधन
२. उपयुक्तता आहे, आणि आद्यक्रमाने आहे, असे पटवणारे संशोधन

संदेह :
सध्या माझ्या मते संदेह बलवान नाही.
एकीकडे शब्द, उपमान, आणि अनुमान आहेत. तर दुसरीकडे शब्द आहेत.

प्रमाणाचा प्रकार नाडीभविष्याच्या बाजूने नाडीभविष्याच्या विरुद्ध
शब्द नाडीकेंद्रात चमत्कार अनुभवलेल्यांची साक्ष. तुल्यबल. नाडीकेंद्रात फसवले गेलो म्हणणार्‍यांची साक्ष. तुल्यबल.
उपमान जगात कितीतरी विलक्षण गोष्टी आपण प्रत्येकाने अनुभवल्या आहेत, तशी हीसुद्धा विलक्षण गोष्ट आहे. हे उपमान फारच सर्वसमावेशक असल्यामुळे, अन्य विलक्षण गोष्टींपैकी या उदाहरणालाच का लागू आहे, ते सामांतर्य भावत नाही. म्हणून प्रमाण तुलनेने कमजोर पडते. आपल्याला भविष्याबद्दल काळजी-कुतूहल असताना कोणी (वेगळ्या प्रणालीने) आपल्याला पोकळ दिलासा दिल्याचा, पैसे घेतल्याचा आपला अनुभव. या उपमानाचे "भविष्य सांगणारे" हे सामांतर्य अधिक पटण्यासारखे आहे. म्हणून प्रमाण तुलनेने बलवान होते.
अनुमान (या बाजूने अनुमान-प्रमाण नाही. म्हणून पारडे येथे रिकामे आहे.) या बाजूने "इमारतीत पट्ट्या मावू शकत नाहीत" वगैरे अनेक अनुमाने आहेत.
प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही. पारडे जड-हलके ठरवण्याचा प्रश्नच नाही. माझ्यासाठी नाही. पारडे जड-हलके ठरवण्याचा प्रश्नच नाही.

प्रात्यक्षिक घेण्यास कोणी उद्युक्त व्हावे म्हणून उपमानाची आणि अनुमानाची पारडी अधिक भारी करण्याच्या दिशेने संशोधन करावे. शब्दाचेही पटवण्याचे सामर्थ्य वाढू शकते. पट्टीवाचकांच्या पारंपरिक कथेनुसार (इतिहासानुसार) पट्ट्यांमधील माहिती अगस्त्य-भृगु वगैरे ऋषींनी त्रिकालज्ञानाने जाणला. अन्य पुराणांच्या-साहित्याच्या अनुसार हे ऋषी कमीतकमी २०००-३००० वर्षांपूर्वीचे होते. ओकसाहेबांनी मागे कार्बन-डेटिंगबद्दल सांगितले होते, असे अंधुक स्मरते. त्यात पट्ट्यांचे वर ५००-६०० वर्षे होते, असे काही अंधुक स्मरते. असे कधी कोणी सांगितले नसल्यास हे केवळ भावी संशोधनाचे उदाहरण मानावे... असे काही असल्यास पट्टीवाचकांच्या पारंपरिक कथेची सांगड अन्य ऐतिहासिक-पौराणिक शब्दांशी बसत नाही. असे काही असल्यास नाडीवाचकांच्या शब्दाचे पारडे हलके होऊ लागते. जर संशोधन करून असे दाखवले, की पट्ट्यांचे लेखनिक ५००-६०० वर्षांपूर्वीचे कोणी होते, आणि हजारो वर्षे प्राचीन ऋषींशी त्यांचा ऐतिहासिक संबंध काय त्याचे संशोधन केले, तर त्या पारंपरिक कथेचे पारडे भारी होऊ लागेल. वगैरे.

उपयुक्तता :
नाडी या विशेष प्रकाराने भविष्य जाणून उपयुक्तता आहे, असे दाखवणे. म्हणजे आर्थिक, शारिरिक, मानसिक, मनःशांतीविषयक, जो काय फायदा आहे तो स्पष्ट करणे. ही उपयुक्तता इतक्या प्रमाणात आहे, की नाडी-भविष्याच्या प्रात्यक्षिकाचा क्रमांक अन्य अनुभवांच्या यादीत पुढे आणण्यास व्यक्ती उद्युक्त होईल. सध्या अशा प्रकारची अद्यक्रमातली उपयुक्तता माझ्यासाठी स्पष्टपणे दिसत नाही. सध्या जी काय उपयुक्तता सांगितली आहे, त्यामुळे हे प्रात्यक्षिक क्रमाने खूपच खाली आहे. त्यामुळे अर्थातच मी आधी पर्यटन करेन, गिरिभ्रमण करेन, संतसाहित्य वाचेन... अशा सर्व गोष्टी करता-करता, या आयुष्यात नाडीभविष्याचे प्रात्यक्षिक करायची वेळ माझ्यासाठी बहुधा येणार नाही.

सारांश : संशोधनाच्या अनेक दिशांपैकी संभवनीय दोन दिशा वर सांगितल्या आहेत. (१) शब्द-उपमान-अनुमान या प्रमाणांनी संदेह बलवान करून पटवावा, जेणेकरून प्रात्यक्षिक घेणे इष्ट होईल. (२) उपयुक्ततेचा आद्यक्रम अधिक आहे, असे पटवणारे काही संशोधन करावे.

या चर्चेतून तुम्हाला जर संशोधनासाठी दिशा मिळाली तर आनंदच आहे. शुभेच्छा.

मुद्दे.

मुद्दे.

श्री. धनंजय,

नमस्कार. श्री. ओक आणि आपण स्वतः ह्या दोघांमधील चर्चेशी माझा स्वतःचा काही संबंध नाही, तरीही मूळ लेखांत माझा उल्लेख आलेला असल्यामुळे, तथा ह्यापूर्वी ह्या विषयावर आपली-माझी थोडी चर्चा झालेली असल्याकारणाने थोडेसे धैर्य करून लिहितो आहे.

आत्तापर्यंत न्यायशास्त्रातील आपणांस उमगलेले "प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द" हें तत्त्व तेवढेच आपण चर्चिता आहात. नैयायिकांनी ह्याबाबतीत आणखी एका तत्त्वाची चर्चा केलेली आहे तीही आपणांस ठावूक असेल असे गृहित धरून मी त्याची आपणांस सोप्या शब्दांत आठवण करून देवू इच्छितो. "प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द" हें तत्त्व बरोबरच आहे ह्यात शंका नाही. परंतु येथे उद्भविलेल्या प्रसंगामध्ये हे तत्त्व थोडे वेगळ्या रीतीने लागू होते. मी अभ्यासिलेल्या काही टीकांअनुसार कोणताही वितर्क हा एकास एक ह्या पद्धतीने व्हावा. उदा. प्रत्यक्ष अनुभव विरुद्ध प्रत्यक्ष अनुभव असा वितर्क व्हावयास हवा. प्रत्यक्ष अनुभव विरुद्ध अनुमान असा वितर्क होत असेल तर त्या वितर्कास कणमात्र दिशा नाही. असा वितर्क मुळांतूनच अर्धवट आहे, आणि त्यामुळे अभ्यासाकरिता एकार्थाने सर्वथा त्याज्यच आहे. प्रत्यक्षानुभवासमोर अनुमानादि इतर तत्त्वे ही केवळ फुसकी ठरू शकतांत. ह्यामुळे, प्रत्यक्षाबाबत काही वाद निर्माण होत असेल तर तो वाद निष्कारणच वाढविण्यापेक्षा प्रात्यक्षिक करणे अधिक सोपे असते असे आधुनिक न्यायशास्त्र सांगते. त्यातून वादी-प्रतिवादी दोन्ही पक्षांचे शब्द आणि समय वाचविणे आणि तरीही वादामध्ये योग्य त्या मार्गाने प्रगती करणे हे अपेक्षित असते. आपणांसाठीही शाब्दिक वादापेक्षा प्रात्यक्षिक सोपे ठरू शकेल असे मला व्यक्तीशः वाटते.

त्यातही मला असे वाटते की आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे श्री. ओक ह्यांचे आग्रही प्रतिपादन नसावे. मी नाडी ग्रंथांचा अनुभव घेणार नाही, घेण्याची गरजही नाही कारण माझा सैद्धांतिक तर्कांवर पुर्ण विश्वास आहे. असे म्हणणार्‍यांनी आता तरी पुनर्विचार करावा. असे त्यांनी आपल्या स्याद्वादावरील लेखाखालील प्रतिसादात म्हटले आहे. तरीही आपण स्वतः प्रत्यक्षानुभवाचा मुद्दा चर्चेत आणिता आहात. असे करतांना आपल्या सुप्तमनांत 'विलक्षण' नाडिग्रंथांच्या बाबतीत 'विलक्षण उत्सुकता' असेल कदाचित् - ती दिसते. (असणारच, त्याशिवाय आपण श्री. ओक ह्यांच्या लेखास थेट प्रतिसाद लिहिला नसता! हे घडतांना मी तरी प्रथमच पाहतो आहे!) परंतु पुढे 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करतां, आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करतां. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती असे राहून-राहून वाटते. चूकभूल देणेघेणे. श्री. ओक ह्यांनी म्हटल्याप्रमाणे एक अभ्यासक म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचे सर्वांना कुतूहल आहे. आपण व्यक्त केलेली वैचारिकता, विद्वत्तापूर्ण टीका - टिप्पण्या जालावरील वाचकांना आपापली मते बनवायला, तपासून पहायला आणि सार्वजनिक मत बनवायला प्रवृत्त करतात, इत्यादि इत्यादि सर्वविदित आहे. असे असतांना - केवळ 'भविष्य' ह्या शब्दामुळे - एक अभ्यासक म्हणून आपण इतके चाचरत असाल, तर अभ्यासकांच्याबाबतीत केल्या जाणार्‍या 'वैचारिकता, विद्वत्ता' ह्या शब्दप्रयोगांस काही विशेष महत्त्व नाही असे माझे प्रांजल मत आहे. तसेही काय, लोकशाहीत सगळेच वैचारिक आणि सारेच विद्वान! असो.

---

काही विज्ञाननिष्ठ अभ्यासकांची हीच गोची होत असते. मला काही महिन्यांपूर्वी आलेल्या एका निरोपात येथील एका अनामिक विज्ञाननिष्ठ अभ्यासकाने स्वतः नाडिज्योतिषाचा प्रत्यक्षानुभव घेतल्याचे साद्यंत कळवून, मी नाडिज्योतिषावर विश्वास ठेवत नाही असे publicly maintain करणार कारण मी विज्ञाननिष्ठ असून मला माझ्या भूमिकेमध्ये बदल करणे योग्य वाटत नाही - माझी आजपर्यंतची भूमिका तीच होती' असे कळवले होते.

खरे पाहता विज्ञाननिष्ठांनी असे घाबरून, 'काही निष्कर्ष जनतेसमोर मांडता येत नाहीत कारण ते अवैज्ञानिक निष्कर्ष आहेत' असे म्हटल्यास विज्ञानाची प्रगती कदापि होणार नाही. ह्याउलट, अशा निष्कर्षांमध्ये काही विज्ञान आहे काय, असल्यास ते काय ते शोधून काढता येवू शकते.

---

असो. आपण सुज्ञ आहातच. एक अभ्यासक म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचे सर्वांना कुतूहल आहे. आपण व्यक्त केलेली वैचारिकता, विद्वत्तापूर्ण टीका - टिप्पण्या जालावरील वाचकांना आपापली मते बनवायला, तपासून पहायला आणि सार्वजनिक मत बनवायला प्रवृत्त करतात, इत्यादि इत्यादि सर्वविदित आहे. आपण हा शोध घेवून आपले निष्कर्ष उपलब्ध करून दिलेत तर दूरदूरच्या लोकांना वैज्ञानिक दृष्टीने हे ग्रंथ बघता येतील. आपल्या कष्टाचा हा गैरफायदा नाही, तर लोक आपणांस मनःपूर्वक आभारच देतील. मी काय, निव्वळ, विज्ञानावर श्रद्धा असणारा एक साधारण अधिवक्ता आहे. भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांमधील एक तत्त्व 'समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणे' त्याचा खंदा समर्थक असल्याकारणे, विज्ञानाच्या प्रगतीसाठी जेथे योग्य वाटले तेथेच बोलणार.

("अमुक एक पट्टीग्रंथातील मजकूर हा भविष्यनियोजनासाठी असल्याने अभ्यासास उपयोगी नाही" असे एकाद्याने म्हटल्यामुळे इतर विज्ञानाभ्यासकांचे काही बिघडू नये.)

धन्यवाद.
--

श्री. ओक सर, नमस्कार. आपण मला haiyohaiyaiyo@gmail.com येथे लिहू शकता. माझ्या लिपिशास्त्राभ्यासाचा उपयोग माझ्या समाजशास्त्राभ्यासासाठी तसेच समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करण्यासाठी पूरक ठरू शकणार असेल, तर तो तसा करण्यात मला स्वतःला आनंदच आहे.

धन्यवाद.

तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

(१) कसले कुतूहल - स्पष्टीकरण, (२) उपलब्ध वेळ

श्री. हैयो हैयैयो यांनी एक विचारार्ह मुद्दा समोर आणला आहे :
> आपल्या सुप्तमनांत 'विलक्षण' नाडिग्रंथांच्या बाबतीत
> 'विलक्षण उत्सुकता' असेल कदाचित् - ती दिसते.
> (असणारच, त्याशिवाय आपण श्री. ओक ह्यांच्या लेखास
> थेट प्रतिसाद लिहिला नसता! हे घडतांना मी तरी प्रथमच
> पाहतो आहे!)

(१) माझी "विलक्षण उत्सूकता" ही केवळ "कुठल्याही प्रमेयांसाठी सामान्यपणे प्रमाणे काय असावीत?" या विषयाबद्दल आहे. जगातील असंख्य प्रमेयांच्या बाबतीत हे एक उदाहरण आहे. तितपतच कुतूहल.

(२) वरील लेखात त्याबद्दल माझे विचार सांगण्यास येथे नावानिशी विनंती केली आहे. एक मनुष्य म्हणून जर कोणी माझ्याशी संवाद साधू बघितले, तर जितपत वेळ आहे, तितपत मी संवाद साधला पाहिजे. हीच तुमची-माझी समाजप्रियता आहे. हा उपप्रतिसादही नावानिशी काही विचारल्यामुळे आहे.

- - -
परंतु जर माझ्या प्रतिसादातून या विवक्षित प्रमेयाबद्दल मला विलक्षण कुतूहल आहे, असा गैरसमज झाला असेल, तर दिलगीर आहे. माझ्या प्रतिसादाची लांबी बघता, तसा गैरसमज होणे शक्य आहे, हे मला पटू लागले आहे. (माझ्या मते प्रतिसादात मी सामान्य तत्त्वे सांगत होतो, आणि ती विशेष परिस्थितीत लागू करून दाखवत होतो, म्हणून प्रतिसाद लांब होता, हे स्पष्टीकरण.) तसा गैरसमज बळावू नये म्हणून या विषयावर पुन्हा प्रतिसाद मी देणार नाही. माझ्यापाशी उपलब्ध वेळ संपला आहे.

विचारार्ह मुद्दा.

विचारार्ह मुद्दा.

श्री. धनंजय, नमस्कार.

मला लिहिलेल्या खरडीत ज्या मुद्द्यास आपण 'काहीतरीच' असे संबोधले आहे, तोच मुद्दा 'विचारार्ह' असल्याचे येथे सांगताहात; की माझा काही भिन्न समज होतो आहे?

मला आलेली आपली पूर्ण खरड खालीलप्रमाणे:

लेखक: धनंजय, सोम, 11/02/2009 - 11:43

काहीतरीच.

>>> आपल्या सुप्तमनांत 'विलक्षण' नाडिग्रंथांच्या बाबतीत 'विलक्षण उत्सुकता' असेल कदाचित् - ती दिसते. (असणारच, त्याशिवाय आपण श्री. ओक ह्यांच्या लेखास थेट प्रतिसाद लिहिला नसता! हे घडतांना मी तरी प्रथमच पाहतो आहे!) <<<

एक मनुष्य म्हणून जर कोणी माझ्याशी संवाद साधू बघितले, तर जितपत वेळ आहे, तितपत मी संवाद साधला पाहिजे. हीच तुमची-माझी माणूसकी आणि समाजप्रियता आहे. आणि येथे तर नावानिशी मला प्रतिसाद द्यायची विनंती केली आहे.
पण तुम्ही म्हणता तेही विचारार्ह आहे. माझ्याकडे वेळ संपल्यामुळे या विषयावर पुन्हा प्रतिसाद द्यायच्या भानगडीत मी पडणार नाही.

» प्रतिसाद द्या | काढून टाका

ती खरड येथील आपल्या प्रतिसादापेक्षा थोडी भिन्न असल्याने माझ्या समजूतीत काही चूक होत असावी. माझ्या खरडवहीत आणि येथे, दोन्हीकडेही लिहितांना लेखनामागील आपले संदर्भ एकच असावेत असे मला वाटते. त्यामुळे आपल्या खरडीचा मी केलेला अर्थ असा: पूर्वी माझ्या विस्तृत प्रतिसादात मी नोंदविलेल्या (येथे थोडक्यात) "वादी-प्रतिवादी इत्यादि दोन्ही पक्षांचे शब्द आणि समय वाचविणे आणि तरीही वादामध्ये योग्य त्या मार्गाने प्रगती करणे ह्यासाठी "प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द" हें तत्त्व लागू करण्याची रीति: 'कोणताही वितर्क हा एकास एक ह्या पद्धतीने व्हावा' अशी असावी" हा मुद्दा विचारार्ह असल्याचे आपणांस म्हणावयाचे आहे.

असो. आपण नैयायिकांनी चर्चिलेली प्रमाणे त्यांचा उल्लेख केला, त्यांचा एक अभ्यासक ह्याकारणाने मला आवश्यक वाटले ते मुद्दे मी सुचविले. बाकी 'उपलब्ध वेळ' ह्या बहाण्याबाबत अधिक काही टिप्पणी करू इच्छित नाही. वेळ घेतल्याबद्दल क्षमस्व.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

 
^ वर