आधी प्रपंच करावा नेटका
प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार माणसाचे आयुर्मान शंभर वर्षांचे आहे असे मानले जाते. ज्याचे चार आश्रमांत विभाजन केले आहे-ब्रह्मचर्य,गृहस्थ,वानप्रस्थ आणि संन्यास. यांपैकी 'गृहस्थधर्म' हा अतिशय महत्त्वाचा , चार आश्रमांपैकी तिघांना आधारभूत ठरणारा आहे असे मानले जाते.
एक सुंदर चरित्र वाचत असताना 'धन्यो गृहस्थाश्रम:|' ही उक्ती किती सार्थ आहे याची जाणीव झाली. 'फ्रैंक गिल्ब्रेथ ज्युनियर' आणि 'अर्नेस्टीन गिल्ब्रेथ कॅरी' या बहीण- भावंडांनी लिहिलेले त्यांच्या मातापित्यांचे चरित्र हाती आले. 'चीपर बाय द डझन' या नावाने १९४८ साली हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. हे पुस्तक आणि यावर आधारित चलच्चित्रपट दोन्ही रसिकांच्या पसंतीस उतरले असे कळले.
जगाच्या दृष्टीने या लेखकद्वयीचे वडिल 'फ्रँक बी. गिलब्रेथ' म्हणजे 'वेळ आणि हालचाली यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास' करणारे संशोधक.किमान हालचालीत वा श्रमात कमाल काम कसे करता येईल, त्याद्वारे कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता कशी वाढवता येईल या विषयावर (टाईम अॅन्ड मोशन स्टडीज) त्यांनी पुष्कळ संशोधन केले आहे. आई 'लिलियन' ही मुळात मानसशास्त्राची पदवीधर. परंतु विवाहानंतर तिनेही या संशोधनासाठी संपूर्ण योगदान दिले. अशा अनुरूप जोडप्याचा संसार काही वेगळाच असेल असा विचार आपल्या मनात येतो.चरित्राच्या शीर्षकात 'डझनाच्या भावाने स्वस्त' असा उल्लेख केला आहे, ती त्यांची स्वतःची १२ मुले, हे कळल्यावर संसाराचे वेगळेपण चांगलेच लक्षात येते. अगदी अचूक सांगायचे तर मुलांची अतिशय आवड असल्याने या जोडप्याने जन्माला घातलेले ६ मुलगे आणि तितक्याच मुली...! स्वतःचे संशोधनाचे काम, त्यासंदर्भात द्यायची व्याख्याने आणि इतर कामे सांभाळून हा संसारशकट या दंपतीने किती कार्यक्षमतेने चालविला याचे चित्रमय शैलीतील वर्णन म्हणजे हे चरित्र.
अगदी साध्या बोली भाषेतील हे निवेदन आहे. कुठे शब्दांचे फुलोरे नाहीत की अलंकारांची पखरण नाही. आपल्या मनस्वी वडिलांचे आणि त्यांच्या प्रत्येक कामात सहाय्य करणार्या वेळप्रसंगी मुलांची बाजू घेणार्या, त्यांची मनस्विता, प्रयोगशीलता जर अतिरेकाकडे झुकत असेल तर त्यांना थांबविणार्या आईचे स्वभावचित्रण ठाशीवपणे अनेक छोट्या छोट्या प्रसंगांतून आरेखिले आहे. या पतिपत्नीचे नाते 'समुद्र' आणि त्याला मर्यादा घालणारा 'किनारा' यांसारखे आहे. 'किनारा' याला संस्कृत मधे एक
सुंदर शब्द आहे 'वेला' ..! हा शब्द स्त्रीलिंगी आहे.समुद्ररूप पुरुषाच्या साहसीवृत्तीला मर्यादा घालायला 'वेला' स्त्रीच हवी. तशाच या सौ. गिलब्रेथ प्रत्येक प्रसंगात पतिसोबत असलेल्या दिसतात. तरीही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये हरवून नाही बसलेल्या! 'कान्तासंमित उपदेश' म्हणजे पत्नीने हळुवारपणे केलेला उपदेश,
जो सर्वात प्रभावी ठरतो असे मानतात..या चरित्रात याची उदाहरणे ठायी ठायी विखुरलेली दिसतात. सोबतीने भावंडांच्या व्यक्तिरेखाही साकार होतात. थोडीशी मस्तिखोर, खट्याळ कधीकधी बंडखोर अशी ही भावंडे आहेत. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, अंतरंगी नाना कळा पण प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी सार्या कुटुंबाला घट्ट बांधून ठेवले आहे.
आजच्या काळात सुशिक्षित पालकांना एक मूल नीट वाढवायचे म्हणजे फार मोठी जबाबदारी आहे असा अनुभव येतो. मग डझनभर वाढवायची असतील तर? ती मोठी होतील तशी होऊ देणे , फारसे लक्ष न देणे हा सोपा उपाय. जर हा पटत नसेल तर एखाद्या मोठ्या उद्योगसमूहाचे व्यवस्थापन करावे त्याप्रमाणे घराचे व्यवस्थापन करावे लागेल. मुलांच्या स्वच्छतेच्या सवयी, त्यांचे आरोग्य, गृहपाठ यांसारख्या मूलभूत बाबींकडे लक्ष देणे याद्वारे शक्य होईल.एखादा उत्तम प्राचार्य वर्षाच्या सुरुवातीला आपल्या नियोजनाचा भाग म्हणून सगळ्या वर्गांची वेळापत्रके आपल्या टेबलवर किंवा नजरेसमोर असतील अशी काळजी घेईल. ज्यामुळे महाविद्यालयातील अध्यापनकार्याचे नीट व्यवस्थापन होऊ शकेल. असाच प्रयोग गिलब्रेथ महाशयांनी त्यांच्या घरात केला. घरातील मुलांची संख्या जसजशी वाढू लागली तसा वडिलांनी एक मोठा तक्ता तयार केला. मुलाला स्वतःचे नांव लिहावयास येते असे लक्षात आले की त्याने त्या तक्त्यावर नोंदी करायच्या. दररोज सकाळचे व्यवहार उरकले की, गृहपाठ झाला की, रात्री झोपण्यापूर्वी स्वतःचे आवरले की स्वतःचे नांव लिहायचे आणि स्वत:च्या वजनाची नोंद करून आलेखावर बिंदू निर्दिष्ट करायचा. असा महिनाभराचा तक्ता नजरेखालून घातला तर प्रत्येक मुलाच्या वाढीचा, दैनंदिन नियमिततेचा अंदाज येणे सहज शक्य होईल. जी अगदी छोटी मुले असतील त्या प्रत्येकाच्या नोंदी करायची जबाबदारी एकेका मोठ्या भावंडाने घ्यायची. प्रथम हे वाचल्याक्षणी मनात येते ...."अहो, इकडे मुले रहातात का बालकामगार?" परंतु थोडा शांतपणे विचार केला तर जाणवते की या घराला शिस्त असणे अतिशय आवश्यक आहे. नाहीतर सगळ्यांचे करता करता त्या माऊलीचे काय हाल होतील? बरे, दुर्लक्ष करावे, तर एक मूल एखाद्या कारणाने आजारी पडले की बाकीच्यांना संसर्ग होणे सहज शक्य आहे. जुळ्यांच्या आई बाबांना या परिस्थितीची चटकन कल्पना येईल. हे गिलब्रेथ माता-पिता स्वतः उच्चशिक्षित, त्यांना कमी खर्चात, कमी कष्टात, कमी वेळात आपल्या मुलांना सुशिक्षित, सुसंस्कारित करायचे असावे. त्यासाठी पिता गिलब्रेथ यांनी ज्या अनेक क्लृप्त्या अंमलात आणल्या त्यांचे उत्तम वर्णन लेखकद्वयीने केले आहे.
श्रमप्रतिष्ठा हे मूल्य घर, शाळा, समुदाय अशा वेगवेगळ्या सामाजिक व्यवस्था (सोशल सिस्टिम्स) कार्यरत ठेवण्यासाठी खूप मोलाचे आहे. काम कोणतेही असो ते हलके वा महत्त्वाचे नसते. ते कोणत्या दर्जाचे केले हे महत्त्वाचे. मला वाटते या मूल्याची रुजवणूक गिलब्रेथ कुटुंबात फार चांगल्या प्रकारे झाली. घरातील प्रत्येक कामात प्रत्येकाने आपला वाटा तर उचलायचाच पण घराचे कुंपण वा सज्जा रंगविणे इत्यादी जास्तीच्या कामांचा लिलाव व्हायचा. कमीत कमी मूल्य घेऊन जो काम करावयास तयार होईल त्याला कंत्राट मिळायचे आणि त्याने ते काम केले की त्याच्या हातखर्चाला त्याला हे जास्तीचे पैसे मिळत. एखादा उद्योगधंदा सुरु करतानाचा उमेदवारीचा कालखंड किंवा प्रशिक्षण कालावधी असावा त्याप्रमाणे या घराचे वातावरण आहे असे वाटते.
स्वतः गिल्ब्रेथ महाशय वेळेची बचत करण्यासाठी अनेक युक्त्या करत. उदाहरणार्थ दाढी करणे हे रोजचे काम...यातला वेळ वाचावा यासाठी ते दोन ब्रश वापरत म्हणजे साबण लावण्याचा वेळ १७ सेकंदांनी कमी होत असे. कपड्यांची बटणे खालून वर लावत गेले तर ४ सेकंद कमी लागत. अशा अनेक छोट्या गोष्टींमधे वेळेची बचत करत. हल्लीच न्यूरोबिक्स नावाच्या नवीन व्यायामप्रकाराबद्दल वाचले. एखादी दैनंदिन क्रिया अगदी वेगळ्या प्रकारे केली उदाहरणार्थ जिथे उजवा हात वापरायचा ते काम डाव्या हाताने केले तर मेंदूतील काही वेगळ्या पेशी उत्तेजित होतात आणि मेंदूला उत्तम व्यायाम मि़ळतो. कदाचित अजाणता याचा सराव गिलब्रेथ महाशयांकडून झाला असावा. अर्थात यातून काही अपघातही होत, जे ते स्वतः मोकळ्या मनाने, आपल्या विनोदी शैलीत मुलांना कथन करत. एकदा दोन वस्तर्यांनी दाढी करून वेळ वाचवावा अशी कल्पना त्यांच्या मनात आली. मग तसा प्रयोग करून झाल्यावर त्यांनी मुलांना सांगितले-- "यात माझे ४४ सेकंद वाचले पण दाढी करताना मानेला जी दुखापत झाली , त्याला मलमपट्टी करण्यात दोन मिनिटे फुकट गेली." आयुष्यातला क्षण न् क्षण अर्थपूर्ण जगावा असे वाटणारी ही व्यक्ती असली पाहिजे.
संपूर्ण घरावर त्यांची हुकुमत जबरदस्त असावी. ते एक विशिष्ट प्रकारची शिट्टी वाजवत,जी ऐकल्यावर त्यांची मुले घराच्या कानाकोपर्यातून दिवाणखान्यात येत. या शिटीचा अर्थ 'हातात असेल ते काम टाका आणि ताबडतोब या' असा या घरापुरता होता. शिटी वाजवून वडील स्टॉपवॉच लावत. किमान आठ सेकंद ते कमाल चौदा सेकंद एवढ्या वेळात सगळे सदस्य जमा होत. तिथे पोहोचल्यावर या 'समन्स'चा अर्थ समजायचा. वडील परगावाहून आले असतील तर कधी खाऊ वा खेळणी मिळायची. कधी एखाद्या मुलाने कुठे शाई सांडली असेल काही उद्योग केला असेल तर दमही मिळायचा. किंवा वडिलांच्या नव्या कल्पनेचे पहिले वहिले श्रोते म्हणून मुलांना पाचारण केले जाई. या लष्करी शिस्तीचा फायदा या कुटुंबाला जाणवला जेव्हा घराच्या एका भागाला आग लागली. मंडळींनी घर मोजून चौदा सेकंदात रिकामे केले. या पार्श्वभूमीवर आमच्या घरांमधे असलेली 'एक आणि दोन बाळे' त्यांना मारलेल्या 'चार चार' हाकांना 'ओ' देखील देण्याचे कष्ट घेत नाहीत. या दोन घटनांमधला विरोधाभास चांगलाच जाणवणारा आहे.
अनेक शेजार्यापाजार्यांना , परिचितांना शंका येत असे की या आई-बापांना स्वतःची मुले तरी ओळखता येतात की नाही कोण जाणे! यासंदर्भात, गिलब्रेथ महाशय एक प्रसंग रंगवून सांगत--त्यांच्या पत्नी व्याख्यान द्यायला गेल्या असताना सगळी बच्चे कंपनी एकदा त्यांच्या ताब्यात होती. घरी आल्यावर अर्थातच आईने विचारले की मुलांनी वडिलांना त्रास तर नाही ना दिला? त्यावर ते उत्तरले-" बाकी सगळी शिस्तीत होती, एक ऐकत नव्हते, फटके दिल्यावर तेही सरळ झाले." सौ . गिलब्रेथ अवाक् झाल्या. कारण मस्ती करून मार खाणारे मूल शेजार्याचे होते. हा प्रसंग खराखुरा घडला की नाही कुणास ठाऊक? पण चौकशा करणार्यांचे असे किस्से ऐकून मनोरंजन होत असे. एकदा तर सारखे कपडे घातलेली ही मुले गाडीतून जाताना पाहून एकाने 'गणवेष घातलेली अनाथाश्रमातील असावीत बिचारी' असे उद्गार काढले. छोट्या मुलांची शाळेची सहल असेल तर शिक्षकांना किती काळजी असते एखादे हरविणार तर नाही ना? मग अख्खे कुटुंब घेऊन कुठे बाहेर पडणे या कुटुंबप्रमुखासाठी किती कठिण असेल? पु. लं.च्या 'असा मी असामी' मधील पार्ल्याच्या मावशीचे घर शोधण्याचा प्रसंग आठवून पहा...अगदी स्पष्ट चित्र डोळ्यासमोर येते.
या कुटुंबातील मुलांच्या मानसशास्त्रीय चाचण्या करण्यासाठी एक बाई या घरी नियमित येऊ लागल्या. चाचण्या घेणे राहिले बाजूला, " तुम्ही दररोज अंघोळ करता का? आठवड्यातून किती वेळा करता? आईने फटके दिले तर लागते का? " इत्यादी अनेक प्रश्न त्या विचारू लागल्या. घरातील शिस्त तुम्हा मुलांना जाचक कशी ठरत नाही असा त्यांचा विचारण्याचा रोख असावा. मुलांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, मग सगळ्या गोष्टी विश्वासाने वडिलांच्या कानावर घातल्या आणि या तथाकथित समुपदेशक बाईंना पळवून लावले. अशा काही प्रसंगांत हे करारी वडिल ठामपणे मुलांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात.
'ड्रिल मेथड' किंवा पद्धतशीर सरावपद्धती अवलंबिली तर कोणती कौशल्ये मुले अवगत करू शकतात याची मोठी जंत्री या पुस्तकात सापडेल. मोर्स कोड आणि त्याचे डिकोडिंग,
स्पर्श पद्धतीने अचूक टंकलेखन, दोन अंकी संख्याचे तोंडी गुणाकार, वर्ग करण्याच्या पद्धती, फ्रेंच , जर्मन या परकीय भाषांमधे संभाषण करण्याइतके कौशल्य...! अशा अनेक कलांवर या मुलांनी प्रभुत्त्व मिळविले. या प्रसंगांची वर्णने मुळातूनच वाचायला हवी. वडिलांच्या अनेकविध प्रयोगांत मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. मोठ्या मुलांनी ज्या गोष्टी आत्मसात केल्या, त्याबद्द्ल तोंडी प्रश्न वा चर्चा ऐकून धाकटी पातीही तयार होऊ लागली, इतपत की एके दिवशी तीन वर्षे वयाच्या त्यांच्या मुलाने पंधराचा वर्ग किती याचे सहज उत्तर दिले. ८-९ वर्षे वयाची लेक उत्तम टंकलेखन करू लागली. असे सतत नवनवे बौद्धिक खाद्य ज्या घरात मुलांना पुरविले जात असेल ते घर किती चैतन्यमय असेल? मुलांचा वेळ जावा म्हणून सुटीतील शिबिरांना घालायची गरज नाही. शालेय अभ्यासक्रमाबरोबर अनेक विषयांची शिबिरे घरात सतत चाललेली आणि त्यातला सहभाग अनिवार्य! न जाणो धाकटे भावंड कधी आपल्या पुढे निघून जाईल, पत्ताही नाही लागायचा.
'मोठी माणसे शालेय शिक्षण संपले की शिकणे सोडून देतात, म्हणून छोट्यात छोट्या मुलाला शिकवावे. त्याच्याकडून फार चांगला प्रतिसाद मिळतो' असे या गिलब्रेथ महाशयांचे मत होते. स्वतःच्या संशोधनावर, कुटुंबावर एवढे भरभरून आयुष्य उधळणारी, मनस्वीपणे जगणारी माणसे विरळा. अशा कर्मयोग्यांना नेटका प्रपंच करता करता परमार्थ आपोआप साध्य होतो. अशा व्यक्ती 'श्रेयस्' आणि 'प्रेयस्' च्या पारंपरिक कल्पनांना व्यापूनही दशांगुळे उरतात.
(या चरित्राचा 'मंगला निगुडकर' यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग ने प्रसिद्ध केला आहे.)
Comments
अतिशय रंजक व रोचक
अतिशय रंजक व रोचक असा लेख. गिलब्रेथ (गिलब्रेथ हा उच्चार दुरुस्त. ह्या साहेबांचा अर्थशास्त्री गॅलब्रेथ साहेबांशी कुठलाही संबंध नाही.) महाशयांनी घराची प्रयोगशाळाच करून टाकलेली दिसते. हा पुस्तकाचा अंश आहे काय?
प्रपंच
पुस्तकाचा अंश आहे वा मला आवडलेला भाग आहे असेही म्हणू शकाल. प्रपंच शब्दाचे संपादन करू पहाते आहे, तेव्हढी चूक सांभाळून घ्यावी.
लेख
उत्तम लेख. उपक्रमावर स्वागत आहे.
हे पुस्तक लहानपणी वाचल्याचे स्मरते. निगुडकरांचा अनुवाद सुरेख झाला आहे.
अवांतर : या पुस्तकावर चारेक वर्षांपूर्वी आलेला हॉलिवूड चित्रपट (त्यात स्टीव्ह मार्टीन् सारखा उत्तम अभिनेता असूनही) मात्र मूळ पुस्तकाशी कसलाही संबंध नसणारा होता. मोठ्या परिवारातल्या गमतीजमती असले निव्वळ स्लॅपस्टीक् स्वरूप त्याला दिलेले पाहून घोर निराशा झाली होती.
लेख आवडला
गॅलब्रेथ किती वेळात कपड्याची घडी करायचे काही विदा आहे पुस्तकात? :-)
छान लेख
येस्स. वन ऑफ माय फेवरिटस् ...मंगला निगुडकरांचा अनुवाद अतिशय खुसखुशीत आहे.
ह्याच नावाचे दोन चित्रपट निघाले. दुसरा - २००३ सालातल्या चित्रपटाचा आणि मुळ पुस्तकाचा काही संबंध नाही. मी अर्धवट पाहून् मी सोडून दिला होता.
जाता जाता : गिल्बर्थ महाशय मॅनेजमेंटच्या अनेक पुस्तकांत त्यांच्या संकल्पनांच्यारुपी अजरामर झाले आहेत. :)
छानच
मंगला निगुडकरांचे अनुवादीत पुस्तक लहानपणी वाचले आहे.. मुलांना काहिश्या कोरड्या/यंत्रवत् पद्धतीने वाढविणे आता फारसे योग्य वाटत नसले तरीही माझ्या एका आवडत्या पुस्तकाची ओळख वाचून बरे वाटले
परिचय-वेचा छानच आहे
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे