तर्कक्रीडा:७४: कुंडलग्राम आश्रमातील घोटाळा

तर्कक्रीडा:७४
सध्या समाजात मनोरुग्णांची संख्या वाढते आहे असे दिसते.वैपरीत्य हा एक मनोविकार आहे. तो पूर्णत्वास गेला की बाधित रुग्णाला हंभ्रमी म्हणतात.सर्व हंभ्रमी अजाण असतात.त्यांच्यावर योगोपचार करण्यासाठी कुंडलग्राम येथे एक आश्रम आहे.तो हरिद्वार येथील पिप्पलाद योगकेंद्रान्तर्गत आहे.तेथे राहाणारे योगगुरु आणि हंभ्रमी रुग्ण हेच सर्व व्यवस्था पाहातात. अन्य कोणी कर्मचारी नाहीत. योगी आणि रोगी सर्व पुरुष . सर्वांचा वेष सारखाच. प्रत्येकाच्या नावाची ठळक पट्टी त्याच्या अंगावरील कपड्यांवर लावलेली.प्रत्येकाचे नाव दुसर्‍याला सहज वाचता येईल अशी.
प्रत्येक हंभ्रमी अजाण असतो. सर्व खर्‍या गोष्टी खोट्या आहेत आणि सर्व असत्य गोष्टी सत्य आहेत असे त्याला प्रतीत होते.तेच तो मानतो.आपल्या या समजाशी तो ठाम असतो.
प्रत्येक योगशिक्षक सुजाण असतो.सत्य गोष्टी सत्य आहेत तर असत्य गोष्टी असत्य आहेत असेच त्याला प्रतीत होते. तेच तो मानतो.
या आश्रमात काही हंभ्रमी रुग्ण, योगगुरु म्हणून वावरत आहेत तर काही योगशिक्षक, हंभ्रमी रुग्ण म्हणून राहात आहेत, असा एक प्रवाद ऐकू येऊ लागला. त्याची गुप्त पडताळणी करण्यासाठी पिंगलाक्ष हे हरिद्वारहून कुंडलाश्रमात आले. त्यानंतर घडलेल्या काही प्रसंगांतील दोन:
(१)अनंतानंद आणि बलभद्र:
आश्रमातील एक रहिवासी अनंतानंद यांना पिंगलाक्षांनी विचारले:
" काय हो, त्या बलभद्रांविषयी तुम्हाला काय माहिती आहे?"
"योगिराज बलभद्र म्हणा. ते इथले योगगुरु आहेत." अनंतानंद म्हणाले.
नंतर पिंगलाक्षांनी बलभद्रांना विचारले:
"ते अनंतानंद कोण आहेत? योगी का रोगी?"
"ते संभ्रमी रुग्ण आहेत." बलभद्र उत्तरले.
यावरून अनंतानंद आणि बलभद्र यांच्याविषयी कोणते निष्कर्ष काढता येतील? प्रवादाच्या सत्यासत्यतेविषयी निश्चितपणे काय सांगता येईल?
आश्रमातील सर्व योगगुरु सुजाण असावे आणि सर्व रुग्ण अजाण असावे अशी अपेक्षा असते. तसे नसेल तर घोटाळा आहे असे म्हणता येईल.
[मूळ कल्पना रेमंड स्मुलियन यांच्या "द लेडी ऑर द टायगर?" या पुस्तकातील कोड्यावरून]
(कृपया उत्तर व्य.नि. ने)
........................................................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

व्य. नि. उत्तरः१

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अक्षय यांनी उत्तर पाठवले आहे.कोड्यात दोन प्रश्न आहेत. त्यांतील पहिल्या प्रश्नाचे त्यांनी योग्य उत्तर दिले आहे.दुसर्‍याचे अचूक उत्तर दिलेले नाही.
श्री.अक्षय यांनी कोड्यातील एक त्रुटी दाखवली आहे. ते म्हणतातः"एका व्यक्तीच्या कपड्यावर बलभद्र अशी चिठ्ठी अजाण हंभ्रमी ने वाचली, तर तो त्या व्यक्तीचे नाव बलभद्र आहे असे मानील की नाही असे मानील? "प्रश्न रास्त आहे. पिंगलाक्ष जेव्हा अ ला प्रश्न विचारीत होता तेव्हा ब तिथेच थोडा दूर उभा होता. त्याच्याकडे अंगुलिनिर्देश करून पिंगलाक्षाने अ ला विचारले"त्या ब विषयी तुम्हाला काय माहिती आहे? "अशी सुधारणा हवी. तसेच ब ला अ विषयी विचारताना.

व्य. नि. उत्तर :२

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अक्षय यांचे सुधारित उत्तर आले. आता त्यांनी कळवलेली दोन्ही प्रश्नांची उत्तरे परिपूर्ण आणि अचूक आहेत.

व्यनि उत्तरे ३ आणि४

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"कुंडलग्राम आश्रमात घोटाळा आहे" या प्रवादात काही तथ्य आहे किंवा कसे याची तर्कशुद्ध पडताळणी करण्यात श्री. धनंजय आणि श्री. कर्क हे दोघे यशस्वी झाले आहेत.

व्यनि.उत्तर :५:

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. आनंद घारे यांनी या कोड्यावर अगदी वेगळ्याप्रकारे पण तर्कसंगत विचार करून अचूक उत्तर शोधले आहे.अभिनंदन!

कुंडलग्राम घोटाळा: उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री. धनंजय यांचे उत्तर पुढील प्रमाणे. त्यात त्यांनी सोंगाड्या हा यथाथ शब्द वापरला आहे.
प्रेषक: धनंजय
प्रति: यनावाला
विषय: कुंडलग्राम घोटाळा
दिनांक: बुध, 10/14/2009 - 04:08

येथे बलभद्र आणि अनंतानंद दीर्घ परिचयामुळे एकमेकांना यथापूर्व भ्रांतमतीने किंवा योगमतीने ओळखतात असे मानले आहे. फक्त पिंगलाक्षाशीच फसवेगिरी करू शकतात असे मानले आहे.

उत्तर : बलभद्र आणि अनंतानंद यांच्यापैकी एक जण तरी सोंगाड्या आहे.

शक्यता १ : जर कोणीच सोंगाड्या नसला तर
शक्यता १.१: अनंतानंद योगी आहे -> बलभद्र योगी आहे -> अनंतानंद रोगी आहे (परस्परविरोध)
शक्यता १.२: अनंतानंद रोगी आहे -> बलभद्र रोगी आहे -> अनंतानंद योगी आहे (परस्परविरोध)
म्हणजे शक्यता १ बाद झाली.

शक्यता २: दोघे सोंगाडे असले तर :
शक्यता २.१: अनंतानंद सोंगाड्या योगी आहे -> बलभद्र रोगी आहे -> अनंतानंद योगी आहे (शक्य)
शक्यता २.२: अनंतानंद सोंगाड्या रोगी आहे -> बलभद्र योगी आहे -> अनंतानंद रोगी आहे (शक्य)

शक्यता ३: फक्त अनंतानंद सोंगाड्या आहे, तर
शक्यता ३.१: अनंतानंद योगी आहे -> बलभद्र रोगी आहे -> अनंतानंद योगी आहे (शक्य)
शक्यता ३.२: अनंतानंद रोगी आहे -> बलभद्र योगी आहे -> अनंतानंद रोगी आहे (शक्य)

बाय सिमेट्री शक्यता ४: फक्त बलभद्र सोंगाड्या असणेही शक्य आहे.

फक्त शक्यता १ हीच बाद झाली. म्हणून निष्कर्ष दिला तसा.

कुंडलग्राम आश्रम घोटाळा: उत्तर(२)

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री.आनन्द घारे यांनी पाठविलेले उत्तर असे:
प्रेषक: आनंद घारे
प्रति: यनावाला
विषय: उत्तर
दिनांक: शुक्र, 10/16/2009 - 09:18

शक्यता १ - अ आणि ब दोघेही योगी असतील तर खरे बोलून एकमेकांना 'योगी' असेच म्हणतील
शक्यता २ - दोघेही रोगी असतील तर खोटे बोलतील आणि एकमेकांना 'योगी' असेच म्हणतील.
शक्यता ३ - त्यातला कोणताही एक योगी आणि दुसरा रोगी असला तर त्यातला योगी रोग्याला 'रोगी' म्हणेल आणि रोगीसुध्दा योग्याला 'रोगी'च म्हणेल. म्हणजे दोघेही एकमेकांना 'रोगी' असेच संबोधतील.

याचाच अर्थ कोड्यात दिलेली शक्यताच नाही. त्यामुळे या प्रश्नातल्या आश्रमात घोटाळा आहे. नियमानुसार खरे किंवा खोटे न बोलणारा निदान एक तरी माणूस आहे.

 
^ वर