खेळखंडोबा

२०१४ मध्ये आशियायी क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठीचा भारत सरकारचा प्रस्ताव नामंजूर झाला आहे. २०१० मध्ये होणारी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धाही भारतात होत आहे. हा निकाल लागण्यापूर्वी क्रीडामंत्री मणिशंकर अय्यर यांनी केलेले विधान ("राष्ट्रकूल स्पर्धेच्या आयोजनामुळे भारताची प्रतिमा सुधारेल हे जरी खरे असले तरी त्याचा सर्वसामान्य भारतीयांना फारसा उपयोग होणार नाही") प्रस्ताव नामंजूर होण्यास कारणीभूत झाले असा आरोप भारतीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी केला आहे. प्रस्ताव फेटाळला गेल्यावर मणिशंकर अय्यर यांनी मांडलेले काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. या घटनेच्या निमित्ताने पुढील प्रश्न मनात येतातः

  • भारताला खरेच अश्या चमकदार सोहळ्यांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे का? यातून नक्की काय साध्य होईल?
  • अश्या मोठ्या स्पर्धांचे भारतात आयोजन केल्याने भारतीय क्रीडापटूंना काही मदत होईल का?
  • या स्पर्धेसाठी ५००० कोटी रूपये लागले असते. ते ग्रामीण किंवा निमशहरी भागातील क्रीडासुविधा आणि प्रशिक्षण सुधारण्यासाठी वापरणे अधिक योग्य होईल का?
  • प्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी ही कारणे प्रस्ताव नाकारणार्‍या समितीने दिली आहेत. त्यामुळे भारत सरकारने अश्या महासोहळ्यांवर लक्ष केंद्रित न करता आधी पायाभूत सुविधा सुधारण्यावर अधिक लक्ष द्यावे का?
  • क्रीडा क्षेत्रात भारताचे मागासलेपण संपण्यासाठी काय करावे?

अधिक माहिती: ,

लेखनविषय: दुवे:

Comments

कलमाडींचा खेळखंडोबा

मणिशंकर अय्यर यांची अनेक मते चांगली आहेत. हा खरच कलमाडींचा खेळखंडोबा आहे.
त्यांनी गेल्या काही वर्षात पुण्याचे काय केले ते दिसते आहेच. भारताने खरच पायाभुत सुविधांवर लक्ष केंद्रित करायला हवे. खरतर हि एक् संधी असते जेंव्हा एखाद्या शहराचा/गावाचा काया पालट होतो. पण भारताला गरज आहे संपुर्ण देश सुधारायची.

आयोजना पेक्षा खेळाडूंवर खर्च अपेक्षीत आहे. नाहीतर अनेक् वीरधवल त्यांचा वेळ पैसा गोळाकरण्यात घालवतील अन ऐन स्पर्धेच्या वेळी नुसताच खेळखंडोबा.
त्यावेळी कुठे जातात हे सगळे लोक?

मूलभूत गरजा!

भारतातली अशी किती तरी खेडी आहेत की जिथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत बनलेला आहे. कायम दुष्काळी परिस्थिती असलेले विभाग दिवसेंदिवस वाढत आहेत. विजेचा लपंडाव सुरुच आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. असे असंख्य मूलभूत प्रश्न भारतात आजच्या संगणक क्रांतीच्या युगातही सुटलेले नाहीत. तेव्हा प्रथम ह्या प्रश्नांची योग्य प्रकारे सोडवणूक केली पाहिजे.देशातल्या सर्व थरातील माणसांच्या अन्न,वस्त्र,निवारा आणि तदनुषंगिक गरजा जेव्हा पूर्ण होतील तेव्हाच खेळ वगैरे गोष्टींकडे लक्ष द्यावे असे मला वाटते. खेळासारख्या अनुत्पादक गोष्टींवर होणारा वारेमाप खर्च काही काळ जर इथे वळवला तर लोक स्वस्थ जीवन जगू शकतील आणि असे स्वथ लोकच मग चांगले खेळाडू बनू शकतील.

१००% बरोबर्

अगदी खरे आहे. खरा जनतेच्या पैस्याचाच खेळखंडोबा आहे.

आयोजन

नुसतं आयोजन करण्यात काय मोठेपणा आहे? सगळी पदकं तर इतर देश् लुटतात. आपण एकाही खेळात् पुढे नाही. सार्क वगैरे स्पर्धा ठिक आहे.

सहमत

आयोजनापेक्षा सुविधांवर पैसे वापरणे योग्य. पण मला वाटते प्रश्न नुसत्या पैशाचा नाही. (क्रिकेटमध्ये पैसे, गुणवत्ता सर्व असूनही शेवटी पानिपत होते, असो. हे विषयांतर होईल.)
आपल्याकडे गुणवत्ता नक्कीच आहे, गरज आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर लागणार्‍या 'किलर इन्स्टींक्ट'ची. खेळाडूंच्या निवडीमध्ये होणारे राजकारण, निधीचा गैरवापर यासारख्या गोष्टी यात अजून अपायकारक ठरतात. गाडी फिरून परत त्याच मुद्दयांवर येते. वाढता भ्रष्टाचार किंवा जाणते नेतृत्व, नियोजन यांचा अभाव इत्यादी. यातही काही आशेचे किरण आहेत जसे की सानिया, आनंद पण यांच्या यशात त्यांचा वैयक्तिक वाटा खूप मोठा आणि सरकारी वाटा फार कमी आहे.

खेळ कि खंडोबा ?

भारतासारख्या खन्डप्राय देशात आपण राजकारण , भ्रष्टाचार, स्वार्थ याशिवाय कसल्याही स्पर्धा खेळलेल्या नाही. य बाबतीत आपण जगात अग्रेसर असू. प्रत्येक बाबतीत राजकारण [ स्वार्थकारण ] आणल्याशिवाय आपले चालतच नाही. आता याबाबतीत सुद्धा मणीशंकर विरुद्ध कलमाडी असा सामना रंगणार ; किंवा रंगविला जाणार. खेळाचे काय? क्रिडा विकासासाठी कुणीतरी विचार करणार का?

 
^ वर