अधिक महिना
लोकहो,
या वर्षी पुढील महीना ज्येष्ठ, हा अधिक महिना येतो आहे. साधारणपणे दर ३२ महिन्यानी अधिक मास येतो. तो का येतो, कसा येतो आणि त्याचे महत्व काय हे सांगणे हा या लेखनाचा उद्देश आहे.
आपल्याला माहित असेल की, एका वर्षात दोन अयने होतात, सहा ऋतू होतात, आणि बारा चांद्रमास होतात.
प्रत्येक चांद्रमासात रवीची संक्रांत असते. त्यावरून चांद्रमासांची नावे पडली आहेत.
मेषगे रवि संक्रांति: शशीमासे भवति तत् चैत्रम् !
एवं वैशाखाद्या: वृषादि संक्रांत योगेन !!
असे सूत्र आहे.
ज्या चांद्रमासात मेष संक्रांत होते तो चैत्र महिना, वृषभ संक्रांत होते तो वैशाख या प्रमाणे बारा महिने होतात.
चांद्रमास २९*१/४ दिवसांचा असतो आणि चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. ज्या चांद्रमासात रविची संक्रांत होत नाही, तो अधिक महिना . त्यास पुढील महिन्याचे नाव असते.
अधिक महिना साधारण ३२ महिन्यांनी येतो.
सूर्याभोवती पृथ्वीच्या एका भ्रमणास ३६५*१/४ दिवस लागतात. अश्विनी नक्षत्राच्या विशिष्ठ तार्यापासून निघून त्याच तायापर्यंत सूर्य येण्यास ३६५*१/४ दिवसांचा काळ लागतो. ते सौरवर्ष होय.
सौरवर्ष व चांद्रवर्ष यांत दरवर्षी ११*१/४ दिवसांचे अंतर पडते. ते अधिक महिन्याने पुन: पूर्ववत होते.
अशा रितीने सौरवर्ष व चांद्रवर्ष यांचा आपल्या पंचांगात मेळ घातलेला आहे. तो धार्मिक कृत्त्यास पोषक आहे. योग, पर्व, शुभाशुभ दिवस, अधिक मास त्याच्यामुळेच होतात.
अधिक मास ( मल मास)-
चांद्रो मासो ही असंक्रांतो मलमास: प्रकीर्तित: !
ज्या चांद्र मासात रविची संक्रांत होत नाही तो अधिक महिना होय. साधारणपणे, फाल्गुन ते अश्विन हे महीनेच अधिक मास येतात.
कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष हे महिनेच गणिताने क्षय मास म्हणून येऊ शकतात.
क्षय मासात रवीच्या दोन संक्रांती होतात. त्यामुळे दोन्ही महिन्यांची नावे त्यास असतात.
कार्तिक, मार्गशीर्ष व पौष महिन्यात रविची गती (पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची)जास्त म्हणजे ६१ कला असल्याने गणिताने क्षय मास येतो. तो १९ वर्षांनी तर कधी ११९ वर्षांनी अथवा १४१ वर्षांनी येतो.
माघ मास हा कधीही अधिक किंवा क्षय मास होत नाही.
आपला,
(पंचांगी) धोंडोपंत
जुनी पंचांगे आणि टिळक पंचांग यातील फरक:-
सर्व जुन्या पंचांगांमध्ये पुढचा महिना म्हणजे ज्येष्ठ हा अधिक महिना दिलेला आहे. पण टिळकपंचांगानुसार या वर्षीचा अधिक महिना ज्येष्ठ नसून श्रावण आहे . हा फरक का पडतो ते पाहणे महत्वाचे आहे.
जुन्या आणि टिळक पंचांगामध्ये यात फरक येण्याचे कारण यांच्या सूर्यसंक्रांतीच्या वेळेस येणारे सुमारे चार दिवसांचे अंतर हे आहे.
हे अंतर दोघांनी राशीचक्रारंभस्थान वेगवेगळे मानल्याने येते. लोकमान्य टिळकांनी खरे भारतीय पंचांग जाणलेले होते. शून्य अयनांश शकवर्ष ४५० दरम्यानच हवा याबद्दल ते आग्रही होते.
त्यानुसार सर्व भारतभर एकच पंचांग प्रसारित व्हावे याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांचे गुरू प्रो. केरो लक्ष्मण छत्रे यांच्या पटवर्धनी पंचांगाचा पुरस्कार केला. जे आज टिळक पंचांग म्हणून ओळखले जाते.
कोकणात विशेषत: कोकणस्थ ब्राह्मणांच्यात टिळक पंचांग वापरात आहे. याची कारणे म्हणजे त्या पंचांगात असणारी अचूकता व लोकमान्यांबद्दल असलेला आदरभाव हे होय.
पण हल्ली दोन वेगवेगळ्या अधिक मासांमुळे होणारा फरक, या कारणास्तव काही मंडळी टिळकपंचांगाचा त्याग करून इतर पंचांगे वापरू लागली आहेत.
कोणते पंचांग वापरावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या कुळात वापरात असलेले पंचांग बदलू नये असे आमचे मत आहे. आम्ही टिळकपंचांगाला घट्ट धरून आहोत.
ज्योतिषाबद्दलच्या कामांसाठी आम्ही इतर पंचांगे वापरतो. कारण लोकांचे जे पंचांग असेल त्यानुसार आम्हाला मुहूर्तादी गोष्टी काढाव्या लागतात. त्यांच्यावर आम्ही आमचे पंचांग वापरण्याची सक्ती करू शकत नाही. पण आमच्या वैयक्तिक गोष्टींसाठी आम्ही टिळकपंचांग वापरतो.
आपला,
(टिळकप्रेमी) धोंडोपंत
Comments
आम्हीही,
आम्हीही टिळकप्रेमी असून टिळक पंचांगच वापरतो.
जय भोलेनाथ!
बाबा त्रिकाल.
श्री. बाबा त्रिकाल
श्री. बाबा त्रिकाल,
आपणही टिळकप्रेमी असून टिळक पंचांग वापरता ही आनंदाची गोष्ट आहे.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
हे 'संक्रांत असणे' म्हणजे काय?
प्रत्येक चांद्रमासात रवीची संक्रांत असते. तेव्हा हे 'संक्रांत असणे ' म्हणजे काय?ह्याबद्दल काही खुलासा केल्यास आमच्यासारख्या ह्या विषयातील अद्न्य लोकांच्या डोक्यात काही प्रकाश पडेल असे वाटते.
"ज्ञ" असाही लिहिता येतो
माफ करा, जरा विषयाला सोडून आहे, पण रहावले नाही म्हणून् - "ज्ञ" लिहिण्यसाठी jYa वापरता येईल.
आवडाबाई
चि. सौ. आवडाबाई,
तुमचे नाव आवडले.
आपला,
(अर्धवटराव) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
संक्रांत
संक्रांत म्हणजे राशी संक्रमण. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करतो त्यास संक्रमण असे म्हणतात. सूर्य जेव्हा मकरेत प्रवेश करतो ती मकर संक्रांत.
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
छान लेख.
नमस्कार,
आपला माहितीपूर्ण लेख आवडला.
हे अंतर दोघांनी राशीचक्रारंभस्थान वेगवेगळे मानल्याने येते. .....शून्य अयनांश शकवर्ष ४५० दरम्यानच हवा याबद्दल ते आग्रही होते.
यातील वरील दोनही संज्ञांचा अर्थ स्पष्ट करावा अशी विनंती.
तसेच अधिक महिन्यावर अजून एक चांगला लेख अवकाशवेध या संकेतस्थळावर वाचता येइल.
http://www.avakashvedh.com/lekh/adhikmahina.htm
-- (खगोलप्रेमी) लिखाळ.
राशीचक्रारंभस्थान
राशीचक्रारंभस्थान मानण्याबद्दल दोन भिन्न शाखा आहेत.
एक मत असे आहे की मेष रास ही अश्विनी नक्षत्रापासून सुरू होते. ती रेवती नक्षत्राच्या झिटापेशीयम या शेवटच्या तार्याच्या बिंदूपासून मानावी.
या बिंदूजवळ जेव्हा पूर्वी वसंतसंपात बिंदू होता ते शून्य अयनांश वर्ष मानले आहे. पण या शून्य अयनांश वर्षाचे कालगणनेमध्ये थोडा फरक आहे. तो शके ४२१ ते ४९६ मानावा अशी काही मते आहेत.
पूर्वी अयनांश गति ही दरवर्षी ५८ ते ६० विकला मानली गेली होती. पण सन १९१७ मध्ये सांगली येथे लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली एक विद्वतजनांची सभा झाली ज्यात या विषयावर सांगोपांग चर्चा होवून ही अयनांश गती ५०.२ विकला निश्चित झालेली आहे .
पुण्यातील विद्वान ज्योतिषी श्री. रघुनाथशास्त्री पटवर्धन यांनी या अयनांशाचा अंतर्भाव करून शुध्द टिळकपंचांग सुरू केले.
त्यामुळे दाते आणि टिळक पंचांगात ४ अंशांचा फरक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दोन अधिक महिने, दोन दिवाळी वगैरे पहायला मिळतात.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
असे वाचावे!
"पण सन १९१७ मध्ये सांगली येथे ..."
हे सन १८१७ आहे.
बाकी लेख नेहमीप्रमाणे माहीतीपूर्ण!
कोणतेही असले तरी चालेल, पण घरी पंचांग मात्र नक्की असावे.
आपला
(पंचांगी)गुंडोपंत
नाही १९१७
गुंडोपंत,
सांगली ज्योतिर्विद संमेलनाचे साल १९१७ आहे. पुढे ३ वर्षांनी लोकमान्यांचे निधन झाले.
आपला,
(इतिहासकार) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
सहस्त्रचंद्रदर्शन
लेख आवडला.
>>अधिक महिना साधारण ३२ महिन्यांनी येतो.
>>सौरवर्ष व चांद्रवर्ष यांत दरवर्षी ११*१/४ दिवसांचे अंतर पडते. ते अधिक महिन्याने पुन: पूर्ववत होते.
११.२५*३२/१२(महिने) = ३० दिवस हे समीकरण जुळले.
थोडेसे अवांतर - वयाची ८० वर्षे पूर्ण झाली की 'सहस्त्रचंद्रदर्शन' सोहळा साजरा करण्याची प्रथा आहे. याचे कारण असे, की त्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण आयुष्यात १००० पूर्णचंद्र पाहिले असतात. महिन्यातून एकदा येणारी पौर्णिमा म्हणजे ८०*१२=९६० चंद्र होतात. दर ३२ महिन्यांनी येणारे अधिक मास ८० वर्षांत ८०*१२/३२ = ३० वेळा येतात. दोघांची बेरीज झाली ९९०. अधिकच्या १० चंद्रांबाबत स्पष्टीकरण कुठेतरी वाचले होते, पण ते आता आठवत नाही. याबाबत कोणी अधिक माहिती देऊ शकेल का?
माफी असावी!
धोंडोपंत,
"सांगली ज्योतिर्विद संमेलनाचे साल १९१७ आहे. पुढे ३ वर्षांनी लोकमान्यांचे निधन झाले."
हे बरोबर
माफी असावी! झोपेत प्रतिसाद दिला!
आपला
ओशाळलेला
(झोपाळू) गुंडोपंत
लेख आवडला
धोंडोपंत लेख आवडला. माहितीपूर्ण वाटला.
टिळक पंचांग वगळता इतर पंचांगे कोणती उदा. दाते पंचांग याची माहिती द्यावी.
- गौरी