महात्मा गांधी आणि काही प्रश्न्

मी काही ऐकलेल्या गोष्टींबद्दल मला पडलेले प्रश्न.

१. सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हे जनतेच्या पैश्यातून करावे, सरकारने त्याकरीता खर्च करू नये असे महात्मा गांधीजींनी सरकारला करण्यास का भाग पाडले?

२. पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाल्यावर त्याला भारताने आर्थिक मदत द्यावी ह्याकरीता महात्मा गांधीजी उपोषणास का बसले? स्वतंत्र राष्ट्र देणे पुरेसे नव्हते का?

३. खिलाफत चळवळीला गांधीजींनी पाठींबा का दिला? खिलाफत चळवळीचे आणि स्वातंत्र्य लढ्याचा काय संबंध आहे?

४. भारत - पाकिस्तान निर्माण झाल्यावर त्यानंतर होणाऱ्या हिंसाचाराची पूर्वकल्पना नव्हती का? आणि असेल तर झालेल्या हिसाचाराला जवाबदार कोण? कॉंग्रेस, महात्मा गांधी की ब्रिटीश? लाखो लोक मारणे आणि एखाद्या निर्णयामुळे लाखो लोक मारले जाणे सारखे नाही का? सारखे नसेल तर का नाही?

हे सगळे विचार करत असताना हा एक दुवा सापडला.

लेखनविषय: दुवे:

Comments

फक्त हेच प्रश्न?

महात्मा गांधीजींच्याबद्दल जगभरातल्या असंख्य लोकांना आदर कां वाटत असावा याचासुद्धा विचार करावा असे आपल्याला वाटत नाही कां?

गांधीजी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आनंद घारे लिहितातः"महात्मा गांधीजींच्याबद्दल जगभरातल्या असंख्य लोकांना आदर कां वाटत असावा याचासुद्धा विचार करावा."
सहमत आहे.मागे कोण्या एका नाटककाराने " मी नथुराम बोलतोय " असे काही नाटक लिहिले होते. विकृत मनोवृत्तीच्या काही मूठभर लोकांनी ते पुनःपुन्हा मिटक्या मारीत पाहिले. "हे नाटक पाहून लोक चौकाचौकातील गांधींचे पुतळे फोडतील." असे नाटकाच्या प्रस्तावनेत लिहिले होते म्हणे!! आता ते नाटक आणि नाटककार विस्मृतीत गेले. गांधीजींची जागतिक लोकप्रियता अबाधित आहे.

विकृत आणि लोकप्रिय

विकृत मनोवृत्तीच्या काही मूठभर लोकांनी ते पुनःपुन्हा मिटक्या मारीत पाहिले.

आपली विकृत शब्दाची व्याख्या काय हो? नथुराम - गोपाळ गोडसे - सावरकरांची पुस्तके वाचणारे, त्यांच्या भूमिकांचे समर्थन करणारे, गांधीजींच्या काही भूमिकांबद्दल शंका व्यक्त करणारे ते विकृत का? गांधीजींच्या भूमिकांबद्दल शंका घेणारे, त्यांना विरोध आंबेडकर, जीना, सुभाषचंद्र बोस हे आपल्या मते विकृत आहेत का? की फक्त फक्त हे नाटक मिटक्या मारत बघणारे विकृत?

आता ते नाटक आणि नाटककार विस्मृतीत गेले. गांधीजींची जागतिक लोकप्रियता अबाधित आहे.

म्हणजे गांधीजींचे सर्व बरोबर आहे असे होत नाही. उदाहरणच देतो. आईनस्टाईनने कॉस्मॉलॉजिकल समीकरण लिहिले त्यात विश्व स्थिर ठेवण्यासाठी "कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट" त्या समीकरणात ठेवला होता. पहिल्याने रशियन गणिती अलेक्झांडर फ्रीडमन आणि नंतर बेल्जियन गणिती जॉर्जेस लेमित्रे यांनी तो तसा ठेवणे बरोबर नाही हे प्रतिपादन केले. आईनस्टाईनने सुमारे १२ वर्षे आपली चूक मान्य केली नाही. नंतर विश्व प्रसरण पावत असल्याचा पुरावा हबलने दाखवल्यावर मान्य केली. पण आज हे दोघे बरोबर आणि आईनस्टाईन चूक ठरला आहे. आज या दोघांची नावेही लोकांना फारशी माहिती नाहीत. आईनस्टाईनची लोकप्रियता हे त्याच्या सर्वज्ञतेचा पुरावा म्हणून मी कोणाच्याही तोंडावर फेकणार नाही किंवा फ्रीडमन - लेमित्रे किंवा त्यांच्या समर्थकांना विकृत म्हणणार नाही.

सहमत

विकृत मनोवृत्तीच्या काही मूठभर लोकांनी ते पुनःपुन्हा मिटक्या मारीत पाहिले.

मी गांधींना मानतो. (याचा अर्थ गांधींची प्रत्येक गोष्ट - किंबहुना कोठलीही गोष्ट - आचरणात आणतो असा मुळीच नाही. गांधींची विचारसरणी किंवा त्यांचे सगळेच विचार मला पूर्णपणे पटतात असाही माझा दावा नाही. आणि मी स्वतःला गांधीवादी समजतही नाही. परंतु गांधींच्या विचारांमधील 'मेथड इन द मॅडनेस', आणि कोणीही काहीही म्हणो, परंतु आपल्याला पटलेल्या गोष्टीला धरून राहण्यामागील त्यांची निदान मला दिसणारी आत्मनिष्ठा - किंवा एका प्रकारचा हट्ट किंवा हटवाद - यांबद्दल मला प्रचंड आदर आहे.)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किंवा नथुरामाचे विचार मला पटत नाहीत. नथुरामाच्या कृत्याचे - गांधीहत्येचे - कोणत्याही निकषाने समर्थन होऊ शकते असे मला वाटत नाही.

सावरकरांबद्दल माझे वाचन फारसे नाही, परंतु त्यांच्या समर्थकांकडून जे काही वरवर ऐकलेले आहे त्याच्या आधारावर मला त्यांच्या विचारसरणीबद्दल जे काही थोडेफार समजते, त्यावरून (त्यांच्या राष्ट्रभक्तीविषयी पूर्ण आदर ठेवूनसुद्धा) मला त्यांची बहुतांश मते, भूमिका किंवा विचारसरणी माझ्या मनास पटण्यासारखी वाटत नाही.

मात्र उपरोल्लेखित नाटकाचा - किंवा किमानपक्षी त्याच्या हिंदी आवृत्तीचा - अटलांटात झालेला प्रयोग - आता त्यातील फारसे काही आठवत नसले तरी - मी सहपत्नीक पाहिलेला आहे.

दरडोई किमान पंचवीस डॉलर तिकीट गुणिले किमान दोन व्यक्ती या दराने खर्च करून कोणताही कार्यक्रम मी पुन्हापुन्हा पाहण्याची शक्यता नसल्याकारणाने मी हे नाटक पुन्हापुन्हा पाहिलेले नाही. (किंबहुना आजवरच्या आयुष्यात 'शोले' हा चित्रपट वगळता अन्य कोठलाच दृश्यकार्यक्रम - नाटक, चित्रपट, वाद्यवृंद किंवा आणखी काही - मला आवर्जून पुन्हापुन्हा पहावासा वाटलेला नाही. मग तिकीट स्वस्त असो किंवा महाग किंवा फुकट.)

कोणत्याही नाटकात मिटक्या मारण्यासारखे काही असू शकते याची मला कल्पना नसल्याकारणाने हे नाटक पाहताना मी मिटक्या मारल्या नाहीत. मात्र मध्यंतरात विकत घेतलेले बटाटेवडे खाताना मी जरूर मिटक्या मारल्या, हे कबूल करतो.

श्री. मुहम्मद अली जीना यांनी स्थापन केलेले 'डॉन' हे पाकिस्तानी दैनिक मी अनेकदा वाचतो. आजकाल हे वृत्तपत्र रोज वाचणे होत नसले तरी एकेकाळी या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक होतो, आणि अजूनही नियमित वाचक नसलो तरी हे वृत्तपत्र आणि त्यातील लेख वाचावयास मला आवडते. पाकिस्तानातील लोकांच्या एकंदर आणि विशेषतः भारताबद्दलच्या आणि भारतीयांबद्दलच्या दृष्टिकोनाचा त्यातून मला बर्‍यापैकी अंदाज येण्यास मदत होते. मात्र या निकषावर मी पाकिस्तानसमर्थक किंवा पाकधार्जिणा ठरू शकत नाही.

त्याचप्रमाणे नथुरामाचे मन नेमके कसे चालत होते आणि त्याचे नेमके म्हणणे - मला पटले नाही तरी - काय होते, तत्कालीन घटना आणि त्यांबद्दल त्याची प्रतिक्रिया यांची (नाटककाराच्या म्हणण्याप्रमाणे) आवृत्ती नेमकी काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी या नाटकाचा प्रयोग पाहण्यात मला काहीही गैर वाटत नाही.

बाकी केवळ 'मी हे नाटक पाहिले' या निकषावर जर माझी मनोवृत्ती कोणाच्या लेखी विकृत ठरत असेल तर तसे मत असण्याचा अशांचा अधिकार आहे, त्यामुळे "I love you, too!" यापलीकडे मी त्याबद्दल काहीही म्हणू इच्छीत नाही.

शेवटी, काही मूठभर लोकांनी हे नाटक पाहण्याबद्दल बोलायचे झाल्यास, या नाटकावर भारतात अल्पकाळात बंदी आल्यामुळे त्याचे भारतात अनेक प्रयोग होऊ शकले नाहीत, असे आठवते. त्यामुळे अल्प प्रयोगांत अल्पच जणांनी हे नाटक पाहिलेले असण्यात विशेष असे काही आहे असे मला वाटत नाही. अधिक प्रयोग न झाल्यामुळे अधिक लोकांनी ते पाहिले असते किंवा नसते यांबद्दल कोणताही विदा उपलब्ध नाही. (भारताबाहेर बंदी नसली तरी एका मर्यादेपलीकडे अधिक प्रयोग करणे हे आर्थिक कारणांमुळे शक्य नसावे.) त्यामुळे अशा विद्याअभावी हे नाटक त्यात फारसा दम नसल्यामुळे मूठभराहून अधिक लोकांनी पाहिले नाही, की बंदी आणून लोकांना पाहू दिले न गेल्याकारणाने मूठभराहून अधिक लोकांनी पाहिले नाही, याबद्दल कोणतेही विधान करता येणे कठीण आहे. त्याचप्रमाणे, हे नाटक आणि नाटककार विस्मृतीत जाण्यामागचे कारणसुद्धा नाटकात दम नसल्यामुळे किंवा व्यापक प्रमाणात लोकांना रस नसल्यामुळे नाटक लोकप्रिय न होणे हे आहे की बंदी आणल्यामुळे नाटक फारशा लोकांपर्यंत न पोहोचणे हे आहे, याबद्दलही कोणतेही विधान करणे धाडसाचे आहे असे वाटते.

(अवांतरः तशीही बहुतांश मराठी नाटके ही काही मूठभर अभिजनांव्यतिरिक्त इतरेजनांकडून फारशी पाहिली जात असावीत अथवा लोकप्रिय असावीत किंवा नाही याबद्दल साशंक आहे. चूभूद्याघ्या.)

आता ते नाटक आणि नाटककार विस्मृतीत गेले. गांधीजींची जागतिक लोकप्रियता अबाधित आहे.

म्हणजे गांधीजींचे सर्व बरोबर आहे असे होत नाही.

किंवा, दुसर्‍या शब्दांत, गांधींवर प्रेम करणार्‍यांनासुद्धा गांधींचे सर्वच पटले पाहिजे असेही नाही.

आधी म्हटल्याप्रमाणे, गांधींना मी मानतो. मात्र त्यांचे आर्थिक विचार (मला जितपत कळले त्याप्रमाणे) मला पटत नाहीत. त्यांची शाकाहाराबद्दलची मते (मला कळली तशी) मला पटत नाहीत. त्यांची लैंगिक व्यवहारांबद्दलची मते ('माझे सत्याचे प्रयोग' आणि विशेषतः त्यातील काही प्रसंग वाचून जितपत थोडेफार आठवत आहेत त्याच्या आधारावर मला जे काही कळते असे वाटते त्यावरून) मला पटतात असे वाटत नाही.

याचा अर्थ त्यांच्या विचारसरणीप्रमाणे आणि तत्कालीन परिस्थिती त्यांना जशी कळली त्याप्रमाणे ती मते त्यांच्यापुरती बरोबर नसतीलच, असेही नाही. परंतु मला ती सर्व बरोबर वाटलीच पाहिजेत, किंवा वाटत नसल्यास त्यांच्यावर प्रेम करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल आदर बाळगण्याचा अधिकार मला नसावा, असे काही असावे असे वाटत नाही. चूभूद्याघ्या.

सुरेख

सुरेख प्रतिसाद. शोले वगळता सर्व मुद्यांवर सहमत आहे. (याचा अर्थ शोलेव्यतिरिक्त आणखीही चित्रपट अनेकदा बघायला आवडतात.)

---

विकृत मनोवृत्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विनायक लिहितातः"...आपली विकृत शब्दाची व्याख्या काय हो?.."
..गांधीजींच्या विचारांशी सहमत नसणे, त्यांना विरोध करणे, त्यांच्यावर टीका करणे यांत कोणतीही विकृती नाही हे स्पष्टच आहे. मात्र ज्या नाटकांत इतिहासाचा विपर्यास केला आहे, सत्यापलाप आहे, ज्यात गांधीजींचा उपहास केला आहे, टर उडवली आहे, 'टकलू' म्हणून हिणवण्यापर्यंतची हीन पातळी गाठली आहे, असे नाटक मिटक्या मारीत पाहाणे, त्याचा उदो उदो करणे, गांधीजींची अवहेलना करणारे नीचस्तरीय संवाद ऐकून हुर्यो करीत टाळ्या वाजवणे ही निश्चितपणे मानसिक विकृती आहे असे मला वाटते.
(मी नाटक पाहिले/वाचले नाही. नाटकावरची काही विस्तृत परीक्षणे वाचली आहेत)

काहीतरी घोळ आहे

ज्यात गांधीजींचा उपहास केला आहे, टर उडवली आहे, 'टकलू' म्हणून हिणवण्यापर्यंतची हीन पातळी गाठली आहे

सर्वप्रथम, मी जे नाटक पाहिले त्यात माझ्या आठवणीप्रमाणे - जास्त आठवत नाही, पण जेवढे आठवते त्यावरून - असे काहीही नव्हते. (असते तर नक्की आठवले असते.) कदाचित त्याच काळात नथुरामावर दोन नाटके झाली का? किंवा सेन्सॉर्ड आवृत्ती माझ्यापर्यंत पोहोचली का? पण अमेरिकेत तरी हे कायद्याने सेन्सॉर होण्याचे काही कारण दिसत नाही. आपल्यापैकी कोणाचा तरी एकाचा घोळ होत आहे असे वाटते.

दुसरे म्हणजे, गांधींना 'टकलू' म्हणून हिणवणारी मंडळी समाजात आहेत, यात कोणतेही गुपित नाही. (ही मंडळी एका विशिष्ट समाजापुरतीच मर्यादित नाहीत. आपण हा मुद्दा केला नाहीत, परंतु तरीही हे स्पष्टीकरण.) ही वस्तुस्थिती दर्शवण्याकरिता (a purely hypothetical situation:) एखाद्या नाटकात अशा प्रकारचे उद्गार ज्याच्याकडून अपेक्षित आहेत, अशा एखाद्या पात्राच्या तोंडी नाटककाराने असे संवाद घातले, तर आपण त्याला 'विकृत' म्हणाल काय?

तसेही अशा संवादांच्या अभावी हुर्यो करीत टाळ्या वाजवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. निदान मी पाहिलेल्या नाटकातील प्रेक्षकगणाने अशा टाळ्या वाजवल्याचे किंवा हुर्यो केल्याचे आठवत नाही. (आणि अमेरिकेतील भारतीय प्रेक्षकवर्ग हुर्यो करीत टाळ्या वाजवू शकत नाही असा माझा मुळीच दावा नाही.)

तिसरे म्हणजे, (पुन्हा a purely hypothetical situation:) एखाद्या नाटकात एखादे असे वाक्य आले असता एखाद्या विशिष्ट प्रयोगाच्या प्रेक्षकांपैकी काही जणांनी टाळ्या वाजवीत हुर्यो केली (हे होऊ शकते. प्रेक्षागारातील सर्वच प्रेक्षक सारखे नसतात.), तर या नाटकाच्या (सर्व प्रयोगांच्या) समस्त प्रेक्षकवर्गास आपण 'विकृत' म्हणणार का?

(तसेही आपण हे नाटक पाहिलेले नाही, आणि टाळ्या वाजवून हुर्यो करताना कोणाला प्रत्यक्ष पाहिलेले नाही, असे आपलेच म्हणणे आहे. म्हणजे केवळ ऐकीव माहितीवरचे आपले विधान आहे. आणि कदाचित मी सेन्सॉर्ड किंवा सेल्फसेन्सॉर्ड आवृत्ती पाहिली किंवा असे काही झाले असल्यास विसरलो किंवा मी दुसरेच कोणते तरी नाटक पाहिले असे जरी वादाच्या सोयीकरिता गृहीत धरले, तरी काही प्रेक्षकांवरून समस्त प्रेक्षकवर्गास 'विकृत' म्हणणे अतिरेकी वाटते.)

तुम्ही हिंदीमध्ये पाहिलेत

तुम्ही हिंदीमध्ये पाहिल्याचे लिहिले आहे. कदाचित हिंदी वर्जनमध्ये टकलूऐवजी चमन हा शब्द वापरला असावा. आणि तुमचे हिंदी कदाचित चांगले असल्याने तुम्ही त्याला स्वर्ग समजला असाल.

(अंदाजपंचे दाहोदरसे)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शितावरुन भाताची परीक्षा

काही प्रेक्षकांवरून समस्त प्रेक्षकवर्गास 'विकृत' म्हणणे अतिरेकी वाटते.

यना सरांनी शितावरुन भाताची परीक्षा असा कॉमन सेन्स लावला असावा, जो आजकाल बराच अनकॉमन दिसतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अनकॉमन नॉन्सेन्स

शितावरून भाताची यशस्वी परीक्षा करण्याकरिता:

१. भात सर्वत्र सर्वसाधारण सारखा (बर्‍यापैकी होमोजीनियस) असावा लागतो. (सांख्यिकीच्या तासाला खोलीवर झोपा काढल्याने सांख्यिकीच्या भाषेत हे नेमके कसे मांडावे याबद्दल खात्री नाही, परंतु बहुधा प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रिब्यूशन सर्वत्र सारखे असणे असे कायसेसे असावे असे वाटते. चूभूद्याघ्या / सांख्यिकीतज्ज्ञांनी अथवा सांख्यिकीचे फंडे आठवणार्‍यांनी यावर प्रकाश पाडावा.)
२. शिताचे सॅपल बर्‍यापैकी रँडम असावे लागते.
३. मुळात शीत असावे लागते (बोलाचेच असून भागत नाही) आणि ते प्रत्यक्षात उचलावे लागते. 'शीत आहे' हे गृहीतक पुरेसे नसते.

अवांतरः शाळाकॉलेजातील प्रॅक्टिकलच्या तासामधल्या 'First draw your graph, then take your readings' या तत्त्वाची आज फारा वर्षांनी आठवण झाली.

बोलाचा भात

तुम्ही म्हणता ते पुस्तकीदृष्ट्या खरे वाटत असले तरी भात सर्वत्र सर्वसाधारणपणे सारखा असणे, शिताचे सँपल रँडम असणे या गोष्टी अध्याहृत असतात.

शिताची परीक्षा करण्यापूर्वी 'चला भात सर्वत्र सर्वसाधारणपणे सारखा आहे की नाही पाहू' असे म्हणत तो कोणी चिवडत बसत नाही किंवा दाबून तो शिजला आहे की नाही हे तपासून पाहत नाही. शिताची परीक्षा घेतल्यावर हे आपोआप कळतेच. त्याचबरोबर घेतलेले कोणत्याही शिताचे सँपल हे रँडमच असते. (कृपया जाणकारांनी रँडमची व्याख्या पाहून या वाक्याच्या सत्यतेचा प्रतिवाद करावा.)

सरसकट सर्वसामान्यीकरण किंवा सर्वसामान्य सरसकटीकरणाबाबतचा आपला आक्षेप पूर्णपणे मान्य असला तरी अशी शितावरुन भाताची परीक्षा करणे हे कीस पाडून पाडून योग्य वाटणाऱ्या (जो योग्य असेलच असे नाही) निष्कर्षाला येण्यापेक्षा बरेच सोयीचे असते असा स्वानुभव आहे.

प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात First draw your graph, then take your readings हे वाक्य पूर्णपणे अवांतर व खोडसाळ वाटले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पटले नाही.

शितावरुन भाताची परीक्षा करणे हे कीस पाडून पाडून योग्य वाटणाऱ्या (जो योग्य असेलच असे नाही) निष्कर्षाला येण्यापेक्षा बरेच सोयीचे असते असा स्वानुभव आहे.

पहिल्या अधोरेखिताबाबतः कीस पाडपाडून किमानपक्षी योग्य वाटणारा निष्कर्ष खरोखरच योग्य आहे की नाही हे (इच्छा असल्यास) पुन्हापुन्हा पडताळून पाहता येते. (आणि कधी वेगळा पडताळा आल्यास निष्कर्ष पुन्हापुन्हा सुधारता येतो.) अन्यथा दोन्ही पद्धती योग्य वाटणार्‍या निष्कर्षाकडेच नेणार्‍या आहेत, असे सुचवावेसे वाटते. असो.

दुसर्‍या अधोरेखिताबाबतः हा खरा कळीचा मुद्दा आहे. पुन्हा असो.

शिताची परीक्षा करण्यापूर्वी 'चला भात सर्वत्र सर्वसाधारणपणे सारखा आहे की नाही पाहू' असे म्हणत तो कोणी चिवडत बसत नाही किंवा दाबून तो शिजला आहे की नाही हे तपासून पाहत नाही. शिताची परीक्षा घेतल्यावर हे आपोआप कळतेच.

येथे शिताची परीक्षाही घेण्यात आलेली नाही. तिसर्‍याच कोणीतरी 'मी शिताची परीक्षा घेतली' म्हटलेल्याच्या आधारावर भाताबद्दल निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. तेही असो.

प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात First draw your graph, then take your readings हे वाक्य पूर्णपणे अवांतर व खोडसाळ वाटले.

वाक्य खोडसाळ असण्याबाबत सहमत आहे. अवांतर - विशेषतः पूर्णपणे अवांतर - का वाटले हे कळू शकले नाही.

हुर्यो: एक शक्यता

हीन संवादांबद्दल आणि प्रेक्षकांच्या हुर्योबद्दल यनावालांनी वाचले परंतु मला असे काही का आढळले नाही याबद्दल एक शक्यता खालील दुव्यांवरील लेखकाच्या मुलाखतीच्या तुकड्यांमधील माहितीवरून वाटते. (दुव्यांची विश्वासार्हता मी स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

हीन संवाद आणि हुर्योबद्दल लेखकाचे असे म्हणणे आहे की (भारतात झालेल्या काही प्रयोगांत - कंसांतील मजकूर माझा) १. निर्माते व दिग्दर्शक यांनी बरेच बदल केले, ज्यायोगे गांधीजींचे पात्र एखाद्या असुराप्रमाणे (monster या मूळ शब्दाचे दुबळे रूपांतर - योग्य प्रतिशब्द सुचवावा.) भासू लागले, आणि २. अनेक तिकिटे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फुकट वाटली गेली, आणि त्या कार्यकर्त्यांनी हुर्यो, हुल्लडबाजी आणि विशेषतः गांधींच्या खुनाच्या प्रसंगी टाळ्या वाजवणे वगैरे हिडीस प्रकार केले. (त्यापुढे, या सर्व प्रकारांमुळे आणि विशेषतः आपल्या नाटकात केले गेलेले बदल आणि विकृतीकरण सहन न होऊन लेखकाने स्वतःच महाराष्ट्र शासनास सांगून स्वतःच्या नाटकावर बंदी आणवली, असा लेखकाचा दावा आहे.)

भारताबाहेर झालेल्या प्रयोगांच्या बाबतीत असे नाटकाच्या मूळ संहितेचे विकृतीकरण बहुधा झाले नसावे, या कारणास्तव मला ते दिसले नसावे, अशी माझी अटकळ आहे. किंबहुना, दुव्यावरील माहितीप्रमाणे भारताबाहेर झालेल्या प्रयोगांत इंग्रजी आणि हिंदी आवृत्तींत अनुक्रमे नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी काम केले असल्याचे कळते. (मी पाहिलेल्या हिंदी आवृत्तीत परेश रावलने काम केल्याचे मला नक्की आठवते, आणि नाटकात काही हीन पातळीवरचे पाहिल्याचे आठवत नाही. मी पाहिलेल्या प्रयोगाच्या प्रेक्षकांच्या वर्तणुकीतही काही गैर जाणवल्याचे आठवत नाही.)

तात्पर्य, (१.) मूळ नाटक पटण्यासारखे नसू शकणे हे समजण्यासारखे आहे, परंतु त्यात हीन पातळीवरचे असे काही असावे असे वाटत नाही. निदान मला तरी दिसले नाही. (२) काही प्रयोगांतील मूळ संहितेचे विकृतीकरण अधिक प्रायोजित हुल्लडबाज प्रेक्षकवर्ग यांमुळे झालेल्या हिडीस हुल्लडबाजीच्या अर्धवट वाचीव माहितीवरून एकंदर मूळ नाटकाबद्दल आणि नाटकाच्या विस्तृत (wider अशा अर्थी) प्रेक्षकवर्गाबद्दल व्यापक अनुमाने काढून त्यावरून विशेषतः थेट 'विकृत'सारखी विशेषणे सरसकट बहाल करणे उचित वाटले नाही, असे सुचवावेसे वाटते.

जुनेच प्रश्न

हे प्रश्न वाघ्या यांना 'नव्याने' पडलेले नसून सर्व गांधी द्वेष्ट्यांच्या कडून सर्वांनी ऐकले आहेत.

मुद्दा क्र. २. गांधी ५५ कोटी रु पाकिस्तानला द्यावेत यासाठी उपोषणाला बसले नाहीत. त्यांनी जानेवारी १९४८ मध्ये केलेले उपोषण ५५ कोटींसाठी नव्हते. ते हिंदु मुस्लिम यांच्यात सौहार्द निर्माण करावे यासाठी होते.
त्यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून भारतीय नेत्यांनी त्यांना दिलेल्या वचनांच्या यादीतही ५५ कोटी पाकिस्तानला देण्याचा उल्लेख नाही. ५५ कोटींची थाप गोपाळ गोडसे यांनी (?) ठोकून दिली आणि गांधीद्वेष्ट्यांनी वर्षानुवर्षांच्या प्रचारात ही थाप उचलून धरली. इतकी की बहुतेकांना ती खरी आहे असे वाटू लागले.

मुद्दा क्र. ३. खिलाफत चळवळ ही १९१९-२४ या काळात घडलेली गोष्ट. तिचा १९४८ च्या कृतीशी संबंध असू नये. (ती गांधींची चूक झाली असे मानायला काही हरकत नाही. पण मुसलमान असल्या गोष्टींनी मनापासून आपल्यात सामील होणार नाहीत हे गांधींप्रमाणेच १९१६ मध्ये मुसलमानांना १/३ राखीव जागा देणारा लखनौ करार करणार्‍या टिळक आणि इतर नेत्यांनाही उमगले नव्हतेच)

प्रा. कुरुंदकरांच्या शब्दांत सांगायचे तर लखनौ कराराच्या पुढे पाउलही न टाकणारे (आणि स्वातंत्र्यानंतर ते ही रद्द करणारे)गांधी/नेहरू हे मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारे आणि धार्मिक आधारावर मुस्लिमांना १/३ जागा देणारे टिळक आदि काँग्रेस नेते महान मुत्सद्दी हे कसे मान्य व्हावे?

मुद्दा क्र. ४. हा प्रश्न विचारताना फाळणीचा निर्णय काँग्रेस/गांधी आणि ब्रिटिश यांनीच घेतला इतरांचा यात काही संबंध नव्हता अशा रोखाने विचारला आहे. जिनांना क्लीन चिट देण्याची गेल्या काही वर्षांतील चढाओढ पाहता यात आश्चर्य काहीच नाही. (गांधींच्या उदयाने जीना फ्रस्ट्रेट झाले आणि त्यांनी फाळणीची मागणी केली असे म्हणूनही अप्रत्यक्ष रीत्या गांधींना फाळणीसाठी जवाबदार ठरवता येते).

कुठल्याच मंदिराचे/मशिदीचे/गुरुद्वाराचे/चर्चचे/सिनॅगॉगचे/अग्यारीचे/देरासरचे/वगैरेचे पुनर्निर्माण/जीर्णोद्धार करूच नये असे मत माझे असल्याने मुद्दा क्र. १ वर काही टिपण्णी करीत नाही.

नितिन थत्ते

सहमत

कुठल्याच मंदिराचे/मशिदीचे/गुरुद्वाराचे/चर्चचे/सिनॅगॉगचे/अग्यारीचे/देरासरचे/वगैरेचे पुनर्निर्माण/जीर्णोद्धार करूच नये असे मत माझे असल्याने मुद्दा क्र. १ वर काही टिपण्णी करीत नाही.

पूर्णपणे सहमत!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

देऊळे उदंड जाहली|

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कुठल्याच मंदिराचे/मशिदीचे/गुरुद्वाराचे/चर्चचे/सिनॅगॉगचे/अग्यारीचे/देरासरचे/वगैरेचे पुनर्निर्माण/जीर्णोद्धार करूच नये असे मत माझे असल्याने मुद्दा क्र. १ वर काही टिप्पणी करीत नाही.
सर्वश्री. नितीन थत्ते आणि आ'कर्ण यांच्या या विचाराशी सहमत आहे. आपल्याकडे धर्मस्थळे उदंड झाली आहेत. जीर्णोद्धार करू नयेच पण आता नवीन कोणतेही बांधू नये असा वटहुकूम काढावा.त्यातच समाजाचे हित आहे हे माझे दृढमत आहे.

असहमत

आपल्याकडे धर्मस्थळे उदंड झाली आहेत. जीर्णोद्धार करू नयेच

'आपल्याकडे' म्हणजे नेमके कोठे? आणि जीर्णोद्धार कशाकशाचा करू नये? काशीविश्वेश्वराच्या मंदिराचा? कोणार्कच्या मंदिराचा? मदुराईच्या आणि दक्षिणेतील इतर वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचा? की गोव्यातील शांतादुर्गेच्या किंवा मंगेशीच्या मंदिराचा?

(अवांतरः गोव्यातील मंदिरे ही वैशिष्ट्यपूर्ण आणि उर्वरित भारतातील मंदिरांपेक्षा स्थापत्यशास्त्रीयदृष्ट्या वेगळी असल्याचे ऐकलेले आहे. अर्थात मला त्यातले काही कळत नाही किंवा लक्षातही येत नाही - मी आपला मंदिर पाहतो, भक्तिभावाने नमस्कार करतो, आणि परत येतो - त्यामुळे चूभूद्याघ्या.)

कोठे या अशा ऐतिहासिक मंदिरांचे आपला प्राचीन सांस्कृतिक वारसा म्हणून जतन आणि संवर्धन करणारे मेक्सिकन सरकार, आणि कोठे 'करायचाय काय जीर्णोद्धार? मंदिरे पुष्कळ झालीयेत!' म्हणणारे करंटे आपण!

आता नवीन कोणतेही बांधू नये असा वटहुकूम काढावा.

भारत सरकार नवीन सार्वजनिक मंदिरे बांधण्याच्या व्यवसायात असल्याचे ऐकिवात नाही. बाकी खाजगी मंदिरांबद्दल बोलावयाचे झाल्यास खाजगी (व्यक्तींच्या / संस्थांच्या) पैशाचा व्यय अशा पैशांच्या मालकांनी कसा करावा हा ज्याचात्याचा खाजगी प्रश्न आहे.

भारतात निदान माझ्या शेवटच्या वास्तव्याच्या वेळी तरी भारतीय घटनेनुसार लोकशाही होती याबद्दल मला खात्री आहे. त्यानंतर यात बदल करणारी एखादी घटनादुरुस्ती झाल्याचे ऐकिवात नाही.

त्यातच समाजाचे हित आहे हे माझे दृढमत आहे.

आपल्या मताचा आदर आहे, परंतु हल्ली समाजास आपले हित कशात आहे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे असे वाटते. काही मूठभर लोकांनी आपल्या विचारसरणीप्रमाणे समाजहित ठरवण्याचे दिवस कधीच सरलेले असल्याची कुणकुण आहे. (चूभूद्याघ्या.)

हा मुद्दाच फालतू

काशीविश्वेश्वराच्या मंदिराचा? कोणार्कच्या मंदिराचा? मदुराईच्या आणि दक्षिणेतील इतर वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचा? की गोव्यातील शांतादुर्गेच्या किंवा मंगेशीच्या मंदिराचा?

पुरातत्व खात्याच्या यादीतल्या वास्तूंचा (किल्ले, मंदिरे, कबरी, हौद, न्हाणीघर, मशिदी इत्यादी) जीर्णोद्धाराचा खर्च सरकारी तिजोरीतून झाल्यास त्यात काहीच गैर नसावे. हा मुद्दाच फालतू आहे.

भारतात निदान माझ्या शेवटच्या वास्तव्याच्या वेळी तरी भारतीय घटनेनुसार लोकशाही होती याबद्दल मला खात्री आहे. त्यानंतर यात बदल करणारी एखादी घटनादुरुस्ती झाल्याचे ऐकिवात नाही....परंतु हल्ली समाजास आपले हित कशात आहे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे असे वाटते.

अगदी अमेरिकेसारख्या देशातही मतप्रदर्शन, दृढ किंवा ठिसूळ कसेही असो, करण्याचा अधिकार/स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे असे वाटते. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नेमके!

पुरातत्व खात्याच्या यादीतल्या वास्तूंचा (किल्ले, मंदिरे, कबरी, हौद, न्हाणीघर, मशिदी इत्यादी) जीर्णोद्धाराचा खर्च सरकारी तिजोरीतून झाल्यास त्यात काहीच गैर नसावे.

सहमत. आणि असे करावे की नाही हे ठरवताना यातील एखादी गोष्ट 'उदंड जाहली' हा निकष असू नये.

हा मुद्दाच फालतू आहे.

नेमके हेच दर्शवण्याचा प्रयत्न होता. हातभाराबद्दल आभारी आहे.

अगदी अमेरिकेसारख्या देशातही मतप्रदर्शन, दृढ किंवा ठिसूळ कसेही असो, करण्याचा अधिकार/स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे असे वाटते. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.

अगदी! आणि नेमक्या याच स्वातंत्र्याचा पूर्ण उपयोग करून 'हल्ली समाजास आपले हित कशात आहे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे असे वाटते.' हे सुचवण्याचे आणि 'काही मूठभर लोकांनी आपल्या विचारसरणीप्रमाणे समाजहित ठरवण्याचे दिवस कधीच सरलेले असल्याची कुणकुण आहे.' हा आगाऊ सल्ला देण्याचे साहस केलेले आहे.

पारावरचा मुंजा

मला प्रामुख्याने अपेक्षित असलेली प्रार्थनास्थळे म्हणजे हिंजवडीच्या शिवाजी चौकातील पत्राचे शेड असलेले गणेशमंदीर (याला पत्र्या गणपती म्हणावे काय?) पिंपरी चौकातील शनीमंदीर व चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारी गल्लीबोळात असलेली तत्सम मंदीरे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वेगळी चर्चा

मला वाटतं या अशा गोष्टींसाठी वेगळी चर्चा हवी. शहरांमधील पायाभूत सुविधा सुयोग्य करताना कोणते निर्णय निर्दयपणे घ्यावेत? आम्हाला या प्रार्थना स्थळांइतकाच झोपड्यांचा प्रश्न सुद्धा जटिल वाटतो. तिथे आणखीन फिल्टरेशन येत आणि धर्म+जात पुढे येते.






काहिशी असहमती

कुठल्याच मंदिराचे/मशिदीचे/गुरुद्वाराचे/चर्चचे/सिनॅगॉगचे/अग्यारीचे/देरासरचे/वगैरेचे पुनर्निर्माण/जीर्णोद्धार करूच नये असे मत माझे असल्याने मुद्दा क्र. १ वर काही टिपण्णी करीत नाही.

इथे हे वाक्य ज्या संदर्भाने आले आहे त्याच्याशी सहमत. मात्र या इमारतींचे जतन होणे मला भविष्यातील ऐतिहासिक-सामाजिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटते. एखादा समाज कसा आहे हे त्याने बांधलेल्या विविध स्थापत्यांवरुनहि कळते. त्यामुळे सरकारने जिर्णोद्धार करूच नये यापेक्षा जिर्णोद्धारासाठी एखाद्या इमारतीशी आधारभूत जात-धर्म याऐवजी त्यातील कला हा निकष असावा असे वाटते

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

सहमत

त्यामुळे सरकारने जिर्णोद्धार करूच नये यापेक्षा जिर्णोद्धारासाठी एखाद्या इमारतीशी आधारभूत जात-धर्म याऐवजी त्यातील कला हा निकष असावा असे वाटते

सहमत. तसेच कुठल्याच प्रार्थनास्थळास सार्वजनिक सोयीसाठी (रस्ता रुंदीकरण वगैरे) पाडण्यास सरकारने हयगय करू नये. प्रार्थनास्थळे आणि सार्वजनिक प्रसाधनगृहे (यांचा जीर्णोद्धार अवश्य व्हावा.) यांचे प्रमाण कमीत कमी एकास एक असेल यासाठी विशेष मोहीम राबवली जावी.

काही शंका

तसेच कुठल्याच प्रार्थनास्थळास सार्वजनिक सोयीसाठी (रस्ता रुंदीकरण वगैरे) पाडण्यास सरकारने हयगय करू नये.

- दिल्लीचे राष्ट्रपतीभवन हे मुळात ब्रिटिश राजवटीत व्हाइसरॉयचे निवासस्थान म्हणून बांधण्यात आलेले होते. एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवासाकरिता म्हणून बांधण्यात आलेली ही जगातील सर्वात मोठी इमारत आहे, असे कळते. स्वातंत्र्योत्तर काळात या इमारतीतील मुळात व्हाइसरॉयच्या निवासाकरिता म्हणून असलेला कक्ष हा या किंवा कोणत्याही कारणासाठी वापरला गेलेला नाही, स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती आपल्या निवासासाठी अन्य कोणता आणि त्याहून बराच लहान असा कक्ष वापरतात, आणि या इमारतीतले बरेच कक्ष वापरात नाहीत असे कळते. या इमारतीभोवतीचे आवारही प्रचंड आहे असे कळते.

आज भारतात अनेक जणांना रहावयास घर नसता एखादी सार्वजनिक निवासयोजना ही एक सार्वजनिक सोय मानता यावी. अशा परिस्थितीत राष्ट्रपतीभवन पाडून त्याजागी व त्यासभोवतालच्या परिसरात अनेक बहुमजली घरे बांधून किमानपक्षी दिल्लीतील बेघरांचा प्रश्न निकालात काढता येईल. राष्ट्रपतींकरिता फारतर एखादा मोठा बंगला कोठेतरी बांधता येईल. अशी एखादी योजना राबवावी काय?

- ताजमहाल ही वास्तूही अशीच बरीच (अन्यथा उपयुक्त ठरू शकेल अशी) जागा व्यापते. कोणत्याही जिवंत माणसास तिचा काहीही उपयोग नाही. तिचीही अशीच विल्हेवाट लावावी काय?

(या वास्तू पाडल्यास तेथे खरोखरच सार्वजनिक बांधकामे होऊन गरजूंस स्वस्त दरात मिळून सार्वजनिक फायदा होईल, की बिल्डरमंडळी आणि अन्य 'रसिकजन' (interested partiesचे पूर्णपणे off-the-mark परंतु शब्दशः भाषांतर) केवळ त्यात आपली पोळी भाजून घेतील, या बाबीचा येथे विचार केलेला नाही.)

- राष्ट्रीय ऐतिहासिक/सांस्कृतिक वारसा नावाचा काही प्रकार अस्तित्वात असतो काय?

- प्रस्तुत काळातील स्थानिकांच्या उपासनेचा भाग नसल्याकारणाने कोणाच्याही वापरात नाहीत अतएव कोणासही निरुपयोगी या कारणास्तव बामियानच्या बुद्धमूर्ती भंगणार्‍या तालिबानींचे आपणही अनुकरण करावे काय?

स्पष्टीकरण

आज भारतात अनेक जणांना रहावयास घर नसता एखादी सार्वजनिक निवासयोजना ही एक सार्वजनिक सोय मानता यावी. अशा परिस्थितीत राष्ट्रपतीभवन पाडून त्याजागी व त्यासभोवतालच्या परिसरात अनेक बहुमजली घरे बांधून किमानपक्षी दिल्लीतील बेघरांचा प्रश्न निकालात काढता येईल. राष्ट्रपतींकरिता फारतर एखादा मोठा बंगला कोठेतरी बांधता येईल. अशी एखादी योजना राबवावी काय?

ताजमहाल ही वास्तूही अशीच बरीच (अन्यथा उपयुक्त ठरू शकेल अशी) जागा व्यापते. कोणत्याही जिवंत माणसास तिचा काहीही उपयोग नाही. तिचीही अशीच विल्हेवाट लावावी काय?

प्रस्तुत काळातील स्थानिकांच्या उपासनेचा भाग नसल्याकारणाने कोणाच्याही वापरात नाहीत अतएव कोणासही निरुपयोगी या कारणास्तव बामियानच्या बुद्धमूर्ती भंगणार्‍या तालिबानींचे आपणही अनुकरण करावे काय?

कलेचा निकष वापरण्याविषयी मी सहमत आहे. ॠषिकेश यांनी कलेच्या निकषाबद्दलचे विधान हे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तुंविषयीचा मुद्दा मांडून केलेले आहे. तेव्हा त्यांच्या कलेच्या निकषात ऐतिहासिक वारसा जतन करणे अपेक्षित असावे असा माझा कयास आहे. राष्ट्रपतीभवन किंवा ताजमहाल असा निकष वापरल्यास पाडले जातील असे वाटत नाही.

सार्वजनिक सोय पाहतांना माझ्यासमोर पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावरील तुकाराम पादुका चौकातील मंदिर होते. मागील वीस-पंचवीस वर्षात अनेक उकिरड्याच्या जागेचा उद्धार करणारी मंदिरे अस्तित्त्वात आलेली आहेत. त्यांना पाडतांना अनेकदा हितसंबंध गुंतलेले आणि श्रद्धाळू लोक विरोध करतात. अशा प्रसंगी सरकारने न डगमगता प्रार्थनास्थळे पाडावीत. नाशिकमधील काळाराम मंदिर रस्त्याच्या वाहतुकीस अडथळा आणते म्हणून ते पाडावे असे विधान कला/ ऐतिहासिक महत्त्व हा निकष वापरल्यास अयोग्य ठरावे.

सार्वजनिक सोयीकडे अनेक प्रकारे बघता येईल. श्रीमंत लोक मोठाल्या घरांत राहतात आणि काही लोक पदपथावर झोपतात तेव्हा श्रीमंत लोकांची घरे पाडून पदपथावरील लोकांची व्यवस्था करणे ही सार्वजनिक सोय आहे काय? मालमत्ता हक्कांची पायमल्ली न होणे ही त्याहून मोठी सार्वजनिक गरज असल्याने तसे करणे सार्वजनिक सोयीत अडथळा आणण्यासारखे आहे. पण नेमून दिलेल्या क्षेत्रफळापेक्षा घराचे क्षेत्रफळ जास्त असल्यास त्या जास्त क्षेत्रफळावर कर लादणे आणि त्या कराच्या महसूलावर बेघरांसाठी पर्याय निर्माण करणे हे कदाचित सार्वजनिक दृष्ट्या जास्त सोयीचे ठरू शकेल.

राष्ट्रीय ऐतिहासिक/सांस्कृतिक वारसा नावाचा काही प्रकार अस्तित्वात असतो काय?

असा प्रकार असावा. माझ्या आजोबांच्या काळातील टाइपरायटर आमच्या घरात अजुनही आहे. आम्ही त्याचा वापर करत नाही पण कौटुंबिक वारसा म्हणून तो जपून ठेवलेला आहे. त्याचप्रकारे राष्ट्रीय ऐतिहासिक/सांस्कृतिक वारसाही असावा असे वाटते. आमच्या गावाच्या घरातील वाड्याची पडझड झाल्याने तो पाडून काही नातेवाईकांनी नवीन घरे बांधली आहेत. (येथे सोयीनूसार वारसा निकालात निघाला आहे.)

ल्यूटनच्या दिल्लीत असे करता येत नाही

अशा परिस्थितीत राष्ट्रपतीभवन पाडून त्याजागी व त्यासभोवतालच्या परिसरात अनेक बहुमजली घरे बांधून किमानपक्षी दिल्लीतील बेघरांचा प्रश्न निकालात काढता येईल. राष्ट्रपतींकरिता फारतर एखादा मोठा बंगला कोठेतरी बांधता येईल. अशी एखादी योजना राबवावी काय?

ल्यूटनच्या दिल्लीसाठी (बहुधा राष्ट्रपती भवन आणि काही इमारती वगळून) अशी योजना अमलात आणण्याचा विचार झाला होता. मोठमोठे बंगले पाडून तिथे तुम्ही म्हणता तशी योजना राबवण्याचा विचार होता. पण ह्या हेरिटेजवाल्यांमुळे तूर्तास ल्यूटनच्या दिल्लीला धक्का लावता येणार नाही. हेरिटेजवाले चूक की बरोबर हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.

मालमत्ता हक्कांची पायमल्ली न होणे ही त्याहून मोठी सार्वजनिक गरज असल्याने तसे करणे सार्वजनिक सोयीत अडथळा आणण्यासारखे आहे.

घटनादत्त मूलभूत अधिकारांत मालमत्तेचा हक्क आता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक गरज असल्यास मोठे बंगले पाडता येतील असे वाटते. घटनातज्ज्ञांनी अधिक माहिती द्यावी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सुधारणा

घटनादत्त मूलभूत अधिकारांत मालमत्तेचा हक्क आता येत नाही.

मूलभूत अधिकार नसला तरी तो अजुनही कायदेशीर अधिकार आहे. (४४व्या सुधारणेतील पुढील वाक्य पहा: In view of the special position sought to be given to fundamental rights, the right to property, which has been the occasion for more than one amendment of the Constitution, would cease to be a fundamental right and become only a legal right. दुवा)

सरकार सोडून अन्य कोणास मालमत्ता हिरावून घेता येत नसावे. तसेच सरकारने मालमत्ता हिरावून घेणे अन्याय्य वाटल्यास न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागता येणे शक्य असावे. समजा कुठल्या देशाचा कायदा मालमत्तेचा हक्क कायद्याने मान्य करत नाही. अशा देशातही सार्वजनिक सोय (देशाचे कल्याण वाढवणारी) ही मालमत्ता हक्क असावेत अशीच असेल. कायद्याच्या मान्य अथवा अमान्य करण्याने या तत्त्वात फारसा फरक पडू नये. (हे माझे मत आहे. इतरांची मते वेगळी असू शकतील.)

मंदिरांचे व्यवस्थापन पाहण्यासाठी काही वेळा धर्मादाय संस्था असतात. या संस्था मालमत्ता बाळगून असतात. या मालमत्तेवर सरकारने अतिक्रमण करावे काय? मला वाटते करू नये पण मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर लादले जावेत. मात्र बर्‍याचदा प्रार्थनास्थळे सरकारी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण करतात. त्यावेळी या प्रार्थनास्थळांचा अनधिकृत भाग पाडतांना सरकारने हयगय करू नये.

कला कशी मोजणार?

एखाद्या इमारतीशी आधारभूत जात-धर्म याऐवजी त्यातील कला हा निकष असावा असे वाटते.

एखाद्या इमारतीतील कला कशी मोजणार? हिंदूंची कलात्मक मंदिरे मुसलमानांनी पाडली आहेत असा दावा केला जातो. त्यामुळे सामान्यपणे मुसलमानांच्याच मशीदी/प्रार्थनास्थळे जास्त कलात्मक आहेत तेव्हा निव्वळ कला हा निकष लावला तर गोची होईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सरकारी धोरण ठरवताना धर्म नको

एखाद्या इमारतीतील कला कशी मोजणार?

याबाबत मला ज्ञान नाहि. मात्र स्थापत्यशास्त्रज्ञ याबाबतीत काहि प्रकाश पाडु शकतील.

हिंदूंची कलात्मक मंदिरे मुसलमानांनी पाडली आहेत असा दावा केला जातो.

हेच तर सांगणे आहे. कोणतीही इमारत ही हिंदूची/मुसलमानांची/.... वगैरेंची नसून केवळ त्या धर्माचे लोक त्या त्या इमारतींत तिथे प्रार्थनेसाठी जमतात इतकेच ध्यानात घ्यावे. (जीर्णोद्धाराच्या वेळी त्यांची वेगळी व्यवस्था करावी) मास्त्र धोरण बनवितेवेळी त्या इमारतींचे धार्मिक महत्त्व लक्षात घेण्यापेक्षा स्थापत्याच्या दृष्टीने स्थिती लक्षात घेतली तर जिर्णोद्धारासाठी एक ठोस नियम/धोरण बनविता येऊ शकेल. "धर्म" आधार मानला तर एका धोरणापेक्षा राजकारण होण्याची शक्यता अधिक वाटते

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

हम्म

स्थापत्य शास्त्रज्ञांपेक्षा प्लॅनर्स.

>सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हे जनतेच्या पैश्यातून करावे, सरकारने त्याकरीता खर्च करू नये असे महात्मा गांधीजींनी सरकारला करण्यास का भाग पाडले?

सोमनाथ मंदिराबद्दल माहिती नाही. पण असे गांधीजींनी केले असल्यास उलट बरा पायंडा पाडला असे म्हटले पाहिजे.

मला यासंबंधी विशेष माहिती नाही, पण शक्यतोवर सरकारने हे खर्च करू नयेत असे वाटते. जेथे अजूनही धार्मिक पूजापाठ चालतात अशा स्थानांचे पुनरूज्जीवन करायचे असल्यास ते जनतेने स्वतःच्या पैशातून करावे असे सुचवणे योग्यच आहे.

यावरून थोडे अधिक वाचायचे असले तर ते येथे मिळेल -
http://www.bc.edu/schools/law/lawreviews/meta-elements/journals/bclawr/4...

उत्तरे देणे अशक्य

या प्रश्नांची उत्तरे माझ्यामते उपक्रमावरीलच काय सध्या हयात कोणतीही व्यक्ती देऊ शकणार नाहि. कारण गांधी तसे का वागले याचे उत्तर फक्त
गांधीच देऊ शकतील. त्याच्या झालेल्या खूनामुळे आता तेही शक्य नाहि
आपण फारतर फक्त अंदाज वर्तवू शकतो मात्र अश्या एक ठाम हेतू डोळ्यासमोर ठेऊन मांडलेल्या चर्चेत माझा अंदाज/मत मांडून स्वतःचा आणि इतरांचा वेळ घालवु नये या निष्कर्षाप्रत आलेलो आहे.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

काही मुद्दे

वर ऋषिकेशने म्हणल्याशी सहमत. त्याही पुढे जरी अगदी या सर्व संदर्भात गांधीजी चुकीचे वागले असते तरी त्यांची हत्या समर्थनीय ठरत नाही.

खराटा/नितीन यांनी मांडलेल्या मुद्यांसंदर्भातः

गांधी ५५ कोटी रु पाकिस्तानला द्यावेत यासाठी उपोषणाला बसले नाहीत. त्यांनी जानेवारी १९४८ मध्ये केलेले उपोषण ५५ कोटींसाठी नव्हते. ते हिंदु मुस्लिम यांच्यात सौहार्द निर्माण करावे यासाठी होते.

हे वाक्य थोडेसे बदलून म्हणावेसे वाटते की, "गांधी ५५ कोटी रु पाकिस्तानला द्यावेत, केवळ यासाठी उपोषणाला बसले नाहीत. त्यांनी जानेवारी १९४८ मध्ये केलेले उपोषण ५५ कोटींसाठी नव्हते. ते हिंदु मुस्लिम यांच्यात सौहार्द निर्माण करावे यासाठी होते." या संदर्भात विकीपिडीयापासून ते अनेक पुस्तकी संदर्भ आहेत. खाली एक उदाहरणादाखल देत आहे (पृ. ९५).

प्रा. कुरुंदकरांच्या शब्दांत सांगायचे तर लखनौ कराराच्या पुढे पाउलही न टाकणारे (आणि स्वातंत्र्यानंतर ते ही रद्द करणारे)गांधी/नेहरू हे मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारे आणि धार्मिक आधारावर मुस्लिमांना १/३ जागा देणारे टिळक आदि काँग्रेस नेते महान मुत्सद्दी हे कसे मान्य व्हावे?

कुरूंदकरांनी बरेच काही लिहीले आहे त्याबद्दल वेगळाच धागा चालू करावा लागेल. गांधीजींच्या यशाचे श्रेय पण त्यांनी काही अंशी टिळकांना दिलेले आहे. म्हणूनच एका वाक्याने त्यांचे सर्व म्हणणे समजते असे वाटत नाही.पण एकंदरीतच त्यांच्या सारखे स्वतंत्र बुद्धीने लिहीणारे विरळाच होते आणि आहेत.

कुठल्याच मंदिराचे/मशिदीचे/गुरुद्वाराचे/चर्चचे/सिनॅगॉगचे/अग्यारीचे/देरासरचे/वगैरेचे पुनर्निर्माण/जीर्णोद्धार करूच नये असे मत माझे असल्याने मुद्दा क्र. १ वर काही टिपण्णी करीत नाही.

हे वाक्य देखील माझ्या पुरते थोडे बदलून असे करेनः कुठल्याच मंदिराचे/मशिदीचे/गुरुद्वाराचे/चर्चचे/सिनॅगॉगचे/अग्यारीचे/देरासरचे/वगैरेचे पुनर्निर्माण/जीर्णोद्धार सरकारी आणि पर्यायाने करदात्याच्या पैशाने करूच नये असे मत माझे असल्याने मुद्दा क्र. १ वर काही टिपण्णी करीत नाही.

____________


भारत - पाकिस्तान निर्माण झाल्यावर त्यानंतर होणाऱ्या हिंसाचाराची पूर्वकल्पना नव्हती का? आणि असेल तर झालेल्या हिसाचाराला जवाबदार कोण? कॉंग्रेस, महात्मा गांधी की ब्रिटीश? लाखो लोक मारणे आणि एखाद्या निर्णयामुळे लाखो लोक मारले जाणे सारखे नाही का? सारखे नसेल तर का नाही?

हा विषय फार क्लिष्ट (काँप्लेक्स) आहे. चूका निश्चितच झाल्या आहेत पण त्यांचा विचार करताना आजच्या काँग्रेस आणि इतर सर्वच राजकारण्यांच्या चुकांशी त्यांची तुलना करणे योग्य वाटत नाही. सत्तेच्या वादातूनच हे झाले असे वाटत नाही. गांधीजींचे काही विचार हे सामाजिक स्तरावर अमलात आणण्यासाठी जास्त योग्य होते आणि आहेत असे मला वाटते. मात्र जेंव्हा स्वातंत्र्यासाठीच लढा चालू असतो तेंव्हा त्यातील प्रत्येक विचार योग्य होता असे वाटत नाही. दुर्दैवाने आपण त्यांच्या हयातीत स्वातंत्र्यचळवळीतील राजकारण करताना देखील फक्त त्यांच्याच वर अवलंबून राहीलो आणि त्यांच्या पश्चात स्वातंत्र्योत्तर त्यांच्या कुठल्याच विचारांचा सामाजीक विकासासाठी उपयोग न करता (कुसुमाग्रजांनी म्हणल्याप्रमाणे) "त्यांचे चित्र सरकात्री भिंतीला खिळवून ठेवले," आणि केवळ गांधीहत्येचा उपयोग राजकीय कारणांसाठी करत ठेवला...

अजून सुधारणा

>>गांधी ५५ कोटी रु पाकिस्तानला द्यावेत, केवळ यासाठीउपोषणाला बसले नाहीत.

हे वाक्य अजून सुधारायला हवे.
गांधी ५५ कोटी रु पाकिस्तानला द्यावेत, यासाठी उपोषणाला मुळीच बसले नाहीत. असे हवे.

अर्थात ते ५५ कोटी पाकिस्तानला द्यावेत असे त्यांचे मत नक्कीच होते.

नितिन थत्ते

महात्मा गांधी

महात्मा गांधी हे अति कुशल असे राजकारणी (सुपर स्ट्रॅटेजिस्ट पोलिटिशियन) सर्वप्रथम होते.

त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा पूर्ण विचार करून व त्याचे दूरगामी परिणाम काय होतील हे लक्षात घेऊनच घेतलेला असे. त्यांच्या कोणत्याही निर्णयामागचे तर्कज्ञान जाणणे इतर उथळ राजकारण्यांना कधीच शक्य झाले नाही.
त्यामुळे वरील मुद्यांमागचे त्यांचे विचार आता कधीच समजणे शक्य नाही. पण एवढी खात्री मनापासून बाळगण्यास हरकत नाही की हे निर्णय राष्ट्राचे दूरगामी हित लक्षात घेऊनच त्यांनी घेतले असणार.

चन्द्रशेखर

अवांतर..

duty_calls

---

मार्मिक

फार मार्मिक आहे. तुम्हीच काढले आहे का? आर यू कमिंग टू बेड कोण विचारते आहे? वैनी की... असो. हिंदुत्व, गांधी, ५५ कोटी, सावरकर, हिटलर, नथूराम म्हटले की आंतरजालीय जिभांना नुसते पाणी सुटत असते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

इफ ओन्ली

फार मार्मिक आहे. तुम्हीच काढले आहे का?
इफ ओन्ली! कला म्याडम आम्हाला एवढ्या अवगत असत्या तर काय पाहिजे होते? हे चित्र एक्सकेसीडी या व्यंगचित्रांच्या मालिकेतील आहे. कमिंग टू बेड? असे त्या कळ बडवण्यार्‍याचे अर्धांग विचारीत असावे असा आमचा अंदाज आहे. यावरून आमचा द्रष्टेपणा दिसून येतो. :प्

---

माझा ही एक वेगळ्या विषयावरचा मुद्दा

गांधीजींच्या चर्चेत जिर्णोद्धाराच्या उपचर्चेला सुरुवात झाली आहे. :) सरकारने त्यावर पैसा खर्च करावा अथवा करु नये हा एक मुद्दा आहेच. जर कोणत्याच धर्मासाठी काही सरकारने करायचे नसेल तर पहिले पाऊल म्हणून सरकारी खर्चाने बाहेरच्या देशात जाऊन धर्मकार्य करणार्‍या अनुदानांवर सुद्धा बंदी यायला हवी नाही का? तो सुद्धा करदात्यांचाच पैसा आहे.






भरकटला

धागा गांधींवरून देवळांवर् घसरला आहे. त्यामुळे वाघ्या यांना अपेक्षित चर्चा होत नाहिये.

नितिन थत्ते

गांधी चर्चा

गांधींवरच्या चर्चा अशाच भरकटतात. त्यात नवल काहीच नाही. गांधी समर्थक आणि विरोधक आणि मधले यामधले कोणीच कधीच माघार घेत नाही. गांधींची मते अमान्य करता येत नाहीत आणि गांधीच्या चुका सुद्धा महान आहेत हे ही मान्य करता येत नाही. त्यामुळे गांधींवरच्या चर्चा या मुद्यांभोवतीच फिरत राहतात अथवा भरकटतात.






:)

त्यामुळे वाघ्या यांना अपेक्षित चर्चा होत नाहिये.

:)
इथे वाघ्या यांना "चर्चा" अपेक्षित होती का फक्त गांधीविरोध? असा विचार मनात आला

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

 
^ वर