घन ओथंबुन येती

घन ओथंबून येती
वनात राघू घिरघिरती
पंखावरती
सर ओघळती
झाडांतुन झडझडती

घन ओथंबुन झरती
नदीस सागरभरती
डोंगरलाटा
वेढित वाटा
वेढित मजला नेती

घन ओथंबुन आले
पिकात केसर ओले
आडोशाला
जरा बाजूला
साजण छेलछबेला
घन होऊन बिलगला
ना.धों महानोर
या महानोरांचे एक वैशिष्ट्य़: यांच्या कवितेला निसर्ग,खेडे, शेत, पाऊस, पीकपाणी इ. यांतून बाहेरच पडता येत नाही. स्वत: कवीलाही आणि म्हणून वाचकालाही.खेड्याचे दु:ख ते कवीचे दु:ख, ओल्या जमीनीचा आनंद तो ह्याचा आनंद,शेताचे सृजन ते ह्याचे सृजन!
कवी काव्य का लिहतो ? "अनुभवांच्या अभिव्यक्तीची आंतरिक निकड" हा एक निकष मानला तर समजणे थोडे सोपे जाईल. हा कवी खेडेगावात जन्मला,शेतकरी म्हणून वाढला.कविता लिहल्या, विधान परिषदेत गेला, तरी शेतकरीच राहिला.त्यामुळे सगळे अनुभव या गोष्टींशीच निगडीत. हा लळा इतका गाढ कीं कवी व निसर्ग एकरूपच होऊन गेले आहेत असे वाटावे.दोन उदा.बघून मग वरील कवितेकडे वळू.
(१)या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
(२) ज्वार उभार, गर्भार,
हिरव्या पदराला जर,
निर्‍या चाळताना वारा
घुसमटे अंगभर.
पहिल्यात मेघांनी भुईला दान दिले व पाणी कवीच्या डोळ्यात आले तर दुसर्‍यात ज्वार गर्भार! माणुस निसर्गात व निसर्ग मानवात एकरूप होऊनच कवितेत येतात. या वर जरा जास्त लिहावयाचे असल्याने येथे थांबू व कवितेकडे वळू.
घन ओथंबुन आल्यावर प्रथम कवी वनात बघतो, मग आजुबाजुला नदीनाल्यात व शेवटी शिवारात..एकदा कावळे, कबुतरे व पोपट कसे उडतात ते बघाच व मगच ’घिरघिरती’ याचा आनंद लुटा. पंखांवरचे पाणी झाडावर झडझडते यात झ व ड याची पुनरुक्ती महत्वाची नाही, जोरदार पावसात झाडाखाली भिजण्याकरिता उभे रहा व झडझडणारे पाणी उपभोगा.
आता हा पाऊस नदीत पडतो आहे.त्याने नदीला सागरभरती आणली, नदी ही सागरासारखी झाली आहे आणि लाटा डोंगरलाटा झाल्या आहेत. मला पहिल्यांदी ही अतिशयोक्ती वाटली पण या पावसाळ्यात नदीत बोट उलटी होऊन ३६ स्त्रीया बुडल्याचे वाचून या डोंगरलाटांची कल्पना आली. नदीवर पाणी भरावयाला जाण्याच्या वाटा आता वाटा रहिल्या नाहीत, ते ओसंडून वाहाणारे ओढे झाले आहेत. रोजची पायाखालची वाट पाण्याने वेढली नाही, तीच्यांबरोबर हीही वेढली गेली आहे.निसर्गाबरोबरची समरुपता तीलाही संगतीने घेऊन जात आहे.
खरी बहार तिसर्‍या कडव्यात आली. शिवारातल्या फुलांतले केसरच ओले झाले असे नव्हे; ही भिजली व तीला आठवण कसली झाली ? साजणाची,छेलछबिल्या,साजणाची. जरा आडोशाला बिलगणार्‍या साजणाची. आणि इथे हा घनच साजण झाला आहे.खरा रसिक दिसतो नाही? (तेच पुरुष भाग्याचे!)
कवितेत निसर्ग व माणुस आपापल्या भुमिका कशा सहजतेने बदलतात पहा.लयही नैसर्गिक आहे.मिळाली तर ध्वनिमुद्रिका ऐका, नाही तर स्वत: गुणगुणा.मजा येते.
या मालिकेतला शेवटचा ५वा लेख जरा मोठा आहे.म्हणजे कविताच मोठी आहे.गदिमांचा "जोगिया". तो दिवाळी अंकाकरिता.
धन्यवाद.
शरद

Comments

छान!

भारतात पावसाळा हा स्वतंत्र ऋतू असल्याने पाऊस म्हंटलं की वेगळाच नॉस्टॅलजीया येतो. खेड्यातला असो, गावातला असो, मुंबईतला असो पाऊस एक वेगळाच माहोल तयार करतो. महानोरांच्या बहुतेक कविता ह्या पावसाशी निगडीत असल्याने त्यातले चित्रदर्शी वर्णन वाचले की मलातरी नॉस्टॅलजीक व्हायला होते.

शरदरावांचे रसग्रहण आवडले. "अनुभवांच्या अभिव्यक्तीची आंतरिक निकड" हे अगदी चपखल.

गाणे इथे ऐका :

सहमत

शरद यांचे रसग्रहण आवडले. दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.

रसग्रहण

रसग्रहण सुंदर झाले आहेच. पण गाण्याचा दुवा दिल्याने कवितेचा जास्त चांगला आनंद उपभोगता येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे गाणे, गायक, संगीतकार इ. यांचा तोच तोचपणा असलेला शब्द बंबाळ लेख वाचण्यापेक्षा खुपच छान वाटते आहे. एकजण रसग्रहण करतो आणि रसग्रहणाचा आनंद उपभोगणारे त्यात आणखी भर घालत आहेत.
महानोरांची आणखी काही काव्ये यावीत आणि असेच दुवे सुद्धा :)


रसग्रहण आणि गाणेही

शरद यांनी केलेले रसग्रहण आवडले, आणि गाण्याच्या दुव्याबद्दल कोलबेर यांचे आभार.

वा!

नदी साजणी, घन साजण. वा! पाल्हाळ न लावता सोप्या भाषेत केलेल उत्तम रसग्रहण. एक विचारायचे होते. "अनुभवांच्या अभिव्यक्तीची आंतरिक निकड" म्हणजे काय? फारच प्राध्यापकीय असल्यामुळे अवतरणचिन्हांत दिले की काय? अनुभवांना मांडण्यांची तीव्र खाज म्हणायचे आहे असे समजतो.

या महानोरांचे एक वैशिष्ट्य़: यांच्या कवितेला निसर्ग,खेडे, शेत, पाऊस, पीकपाणी इ. यांतून बाहेरच पडता येत नाही.

हे महानोरांचे वैशिष्ट्यही आणि मर्यादाही असे तर सुचवायचे नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

रसग्रहण

रसग्रहण सुंदर झालेले आहे. कविता म्हणजे "अनुभवांच्या अभिव्यक्तीची आंतरिक निकड" हे विशेष आवडले. चपखल वाटले.

एक प्रश्न : महानोरांच्या एका संग्रहाचे नाव "वही" असे आहे. या शब्दाचा माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे अर्थ म्हणजे छोट्या लांबीच्या वृत्तात लिहिलेली लावणी. याचे एक लोकप्रिय उदाहरण : "चांद केवड्याची रात - आलीया सामोरा - राजा माझ्या अंबाड्याला - बांधा हो गजरा". तर वरील ऐकीव माहिती बरोबर आहे काय ? असल्यास , या वृत्ताबद्दल नेमके काय सांगता येईल ?

सुरेख

रसग्रहण. बनांत राघू घिरती आहे की भिरती? अर्थात दोन्ही शब्द चालून जावेत. भिरती असेल तर बोरकरांनी पाखरांसाठी वापरलेला कोकणी शब्द भिरीं आठवतो. (सांज दाटली शिरीं, परतली घरा भिरीं, सावळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा).

'जोगिया'वरील तुमचा लेख वाचण्यास उत्सुक आहे. 'रतिक्लांत' हा शब्द त्या कवितेत ज्या चपखल जागी येतो, त्याला तोड नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

+१

भिरती असावे.

पण रसग्रहण सुंदर. जोगियाच्या रसग्रहणाची वाट पाहते आहे.

सुंदर रसग्रहण...

सुंदर रसग्रहण...

भारतरत्न लता मंगेशकरांनी गायल्यामुळे या कवितेचं सोनं झालं आहे!

पंखांवरचे पाणी झाडावर झडझडते यात झ व ड याची पुनरुक्ती महत्वाची नाही,

परंतु गाणं ऐकल्यावर असं जाणवतं की गायकीत लयीचा प्रवाहीपणा राखण्याकरता ती पुनरुक्ति महत्वाची ठरते.

लयही नैसर्गिक आहे.

सहमत..

आणि गाण्यात लयीची ती नैसर्गिकता 'भिरभिरती', 'झडझडती', 'सागरभरती', 'छेलछबेला', 'बिलगला' या शब्दांमधून अगदी छान जाणवते. गाण्याची चालही तशीच सहजसुंदर आणि नैसर्गिक. 'येती', 'झरती', 'आले' इत्यादी शब्दातली 'सारेरेग' ही संगती लतादिदींच्या गळ्यातून सुरेखच गेली आहे..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

वा आणि अरेरे

नेहेमीप्रमाणेच सुरेख विवेचन. दुव्याकरता कोलबेर यांचेही आभार.
अरेरे अशासाठी की पुढचा लेख शेवटचा का म्हणून? अजून बर्‍याच कविता/बरेच कवी शिल्लक आहेत. लेखणी आखडती घेऊन आम्हा वाचकांवर अन्याय करू नये ही विनंती.

ताक : आपल्या लेखांची मालिका करून एका जागी सापडतील अशी सोय करता आल्यास फारच बरे.
---

मर्यादा, वही वगैरे

(१) हे महानोरांचे वैशिष्ट्य व मर्यादाही असे सुचवावयाचे तर नाही?
अजिबात नाही. एक वैशिष्ट्य एवढेच दाखवावयाचे आहे.कवीच्या मर्यादा दाखवावयाला मी प्राध्यापक नाही हो.
(२) वही.. माझ्याकडची हरवली, कोणी पळवली म्हणत नाही. पण त्यात उल्लेख आहे असे अंधुक आठवते. त्या प्रमाणे वही म्हणजे लोकगीतांचा संग्रह.
(३) घिरती... घिरणे= घिरट्या मारणे
(४) अरेरे... प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. पांचवर का थांबतो याचे कारण
मागेच दिले आही.
शरद

अवतरणचिन्हांचा वापर का

(१) हे महानोरांचे वैशिष्ट्य व मर्यादाही असे सुचवावयाचे तर नाही?
अजिबात नाही. एक वैशिष्ट्य एवढेच दाखवावयाचे आहे.कवीच्या मर्यादा दाखवावयाला मी प्राध्यापक नाही हो.

नाही हो. तुम्ही प्रा. आणि डॉ. नसल्यामुळे इतके चांगले आणि सुगम रसग्रहण करू शकता हे माहीत आहे.

"अनुभवांच्या अभिव्यक्तीची आंतरिक निकड"

इथे अवतरणचिन्हांचा वापर का झाला हे कळत नाही. हे दुसऱ्या कुणाचे शब्द आहेत काय? असल्यास अवतरणचिन्हांचा वापर करणे योग्यच आहे, असे वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लय भारी.

शरद काका रसग्रहन आवल्डे जरशीक अजून भर घालाय पाह्यजेन.
नाधोच्या निसर्गकविता वाचून माणूस येडा व्हतो.
महानोराच्या कवितायनी वाचकाला पुन्हा निसर्गाच्या जवळ ओढून आनलं आस्स माझ मत हाये.
तसंबी केशवसूत बालकवी ना.घ.देशपांडे बोरकर इंदिरासंत यायच्याबी निसर्गकविता मोठ्याच व्हत्या.
त्यायच्याच पावलावर पाऊल नाधोनी टाकले.
नाधोच्या निसर्गकविता गाण्याच्या रुपानं ओठाशी खेळत्या राह्यल्या.
'जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजतो' याची मला ध्यान आली.

महे मराठीचे सर म्हणायचे. 'महानोरांनी निसर्गाला एक शक्ती न मानता त्याला देह दिला
आहे. त्यायचा जिवंतपणाचा प्रत्यय त्यायच्या कवितेतून पाह्यला मिळतो'

रानातल्या कविता, वही, पळसखेडची गाणी, अजिंठा, अशा सार्‍या कवितासंग्रहामधून
राना-शेतीची, पाखरा-शिवाराची, हिरव्या निसर्गाची, नागमोडी वाटा वळणाची
गोष्ट त्यायच्या कवितेत र्‍हाती. आन ती मलाबी आवडती.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

चिंब पावसानं रान झालं आबादानी...

शरदरावांच्या रसग्रहणाच्या चिंब पावसानं उपक्रमाचं रान आबादानी झालं आहे असं म्हणून थांबतो. :))


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अजून भर

बाबूराव, आणखी भर पाहिजे, मान्य.पण जरा लक्षात घ्या की उपक्रम हा
शाळेतला वर्ग नव्हे.सुजाण,रसिक मान्यवरांचे व्यासपीठ आहे. तेंव्हा
बर्‍याच गोष्टी सुचवून,सोडून द्यावयाच्या असतात. नदी(-मय झालेली)
सजणी ..मेघ साजण इथे पोचल्यावर छेलछबेला श्याम मेघ व कुंजवनातला मेघश्याम समोर येणारच! मी काय सांगणार? आता
केशवकुमार-बालकवी-बोरकर-पाडगांकर (इंदिरा नाही ) व महानोर-नेमाडे-चंद्रकांत पाटील या दोन काव्य प्रवाहांवर लिहीत आहे. आपले विचार जरा विस्ताराने लिहून तयार ठेवा.
शरद

आमचा राम-राम् घ्यावा

बाबूराव, आणखी भर पाहिजे, मान्य.पण जरा लक्षात घ्या की उपक्रम हा
शाळेतला वर्ग नव्हे.सुजाण,रसिक मान्यवरांचे व्यासपीठ आहे.

बरं भो. सुजाण आन मान्यवर नसल्यामुळे आम्ही आपली रजा घेतो. :-)

कापूस आन् सोयाबीनवर पडेल बोंड अळींचे नियंत्रण कसे करावे.
त्याची माहिती कुठे भेटन हो.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

रसग्रहण आवडले.

ना.धों महानोर यांचे नाव धो.धो.महानोर पाहिजे होते असं पु.ल. विनोदाने म्हणायचे

 
^ वर