प्रेक्षकांच्या डोक्याशी 'समांतर'

फार दिवसांपूर्वी टीव्हीवर 'समांतर' नावाची एक भयानक मालिका दाखवली जात असे. त्या नावाचा धसका मनात होताच, पण तरीही दिग्दर्शक म्हणून बर्‍याच दिवसांनी दिसलेले अमोल पालेकर यांचे नाव, शर्मिला टागोरचा मराठीतला पहिला चित्रपट हे एक आकर्षण, आणि एकंदरीत काहीतरी 'आंधी' च्या जवळपास जाणारा मामला असणार असा एकूण झालेला समज (आणि 'सकाळ' मधली मनमोकाट प्रशंसा) या भांडवलावर हा चित्रपट पहायचा असे ठरवले.
एकतर हा चित्रपट मराठी आहे हे कळायला अंमळ उशीरच लागला. मराठी लोक असे बोलतात ही एक नवीनच ज्ञानात भर पडली . 'माहीती असतं जर की तू इतकी बोलतेस गंगेशी, तर लपून नसलो का बसलो मी तिच्या कुशीत' हे मराठी -अगदी बोलीभाषेतले मराठी आहे म्हणे! आम्ही आपले 'आता तेवड्यासाटी कशाला कांद्याला बिसमिल्ला? व्हय, व्हय, पाटलाच्या वाड्यावर र्‍हाऊन बोलायला शिकलायसा!' असले संवाद म्हणजे मराठी संवाद असे समजून होतो.तेंव्हा हे कार्पोरेट मराठी समजायला जरा अवघडच गेले. त्यात चित्रपट नेमका कशाविषयी आहे, हे कळायच्या आतच मध्यांतर झाले. (मध्यांतरात खाल्लेले सँडविच बाकी झकास होते!) म्हटले गल्ली चुकतो एखादा सुरवातीला. नंतर येईल वळणावर. आपला माणूस आहे, वाया नाही जायचा! कसले काय आणि कसले काय! या कार्पोरेट टायकून केशव वझेचा काय प्रॉब्लेम आहे तेच कळेना. गतायुष्यात अर्धवट राहून गेलेली भावनिक गुंतवणूक आणि उत्तरायुष्यात त्याची सव्याज परफेड करावी की नाही असा गुंता असा या चित्रपटाचा विषय आहे, या निष्कर्षाप्रत येतो तोच हा वझे अचानक इच्छामरणाची भाषा करायला लागला. त्याचा जरा काही सूर लागतो न लागतो तोच परत त्याच्या अपूर्ण प्रेमप्रकरणाचा फ्लॅशबॅक दिसायला लागला. एकूण काही टोटलच लागेना. असे एकदा या पायावर तर एकदा दुसर्‍या पायावर असे करताकरता एकदम धाडकन चित्रपट संपलाच...
शांतारामी सांकेतिकतेतून सुटलेला मराठी चित्रपट ग्रामीण तमाशापटात अडकला. त्यातून सुटून तो बेर्डट, कोठारड्या आणि पिळगावकरी विनोदात अडकला आणि आता तर तो भव्य दिव्य निर्मितीमूल्ये असलेल्या आणि कोटी कोटी रुपयांची भाषा करणार्‍या कार्पोरेट कल्चरचा धनी झाला आहे. उत्कृष्ट लोकेशन्स, चकचकीत गाड्या, उत्तम कपडे घातलेली पात्रे आणि चित्रपटातले निम्मे संवाद हे कोणीतरी कोणाशी मोबाईल फोनवर केलेले संभाषण असले सगळे आता या 'समांतर' मध्ये आहे. पण हे सगळे 'हातभर दाढी, आतमध्ये माणूसच नाही' या छापाचे. चित्रपट संपल्यावर पडलेल्या अनेक प्रश्नांपैकी सर्वात ठळक म्हणजे अमोल पालेकरसारख्या माणसाला असले सगळे का करावेसे वाटले असेल हा. आणि शर्मिला टागोरचे म्हणाल तर तिच्याऐवजी कुणी उषा नाईक किंवा सरला येवलेकर असती तरी चालले असते. मध्यंतरापूर्वी फक्त 'त्यांना पेनिसिलीनची ऍलर्जी आहे' हा एक संवाद आणि मध्यंतरानंतर चित्रपटाच्या शेवटी एक अत्यंत अगम्य दीर्घसंवाद - ते संवादही कुणाच्या तरी आवाजात 'डब' केलेले - एरवी वय लपवण्यासाठी प्रयत्नपूर्वक केलेल्या मेक अपसह काही बाटल्या ग्लिसरीन आणि अत्यंत भावहीन चेहरा ( आता ती भूमिकेची गरज वगैरे असेल तर कल्पना नाही हो!) याला शर्मिला कशाला पाहिजे?
सौमित्रची गाणी आणि अविनाश चंद्रचूडचे संगीत चित्रपटाला उचलायचा प्रयत्न करतात. पण अत्यंत जडजंबाळ, पुस्तकी संवाद आणि सांकेतिकतेच्या मोहात सापडून हाती उरलेली दुर्बोधता यातून त्यांच्या हाती उचलायला येते ते एका अत्यंत कंटाळवाण्या चित्रपटाचे जडशीळ झालेले मढे. ते उचलण्याची ताकद बाकी या गीतकार -संगीतकारांमध्येही नाही.
मनासारखे जगून झाले की जगण्याची सक्ती नसावी ,असे या चित्रपटात केशव वझे वारंवार म्हणतो. मनासारखे चित्रपट काढून झाले की असले चित्रपट काढण्याचीही माणसाला सक्ती नसते हे बाकी पालेकरांना उमजलेले दिसत नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

:)

बरं झालं पूर्वसूचना दिलीत ;)
आता "रिटा" नामक प्रकारहि चांगला नसावा हा माझा तर्कहि कोणीतरी बरोबर आहे असं सांगावं :)

बाकी आज सकाळमधे संध्या गोखले मात्र वेगळा दृष्टीकोन मांडतात

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

'समांतर गल्लाभरू'

आमचा अमोल पालेकर गोलमालसोबतच गेला. बाकी सध्या त्याचं व इतरांचं जे काही चाललंय ते 'समांतर गल्लाभरू' ह्या सदराखाली मोडतं. एकंदर मल्टिप्लेक्सियाग्रस्त, सुखवस्तू, हळव्या मध्यमवर्गाला मजा येते आहे ना. मग झाले. चालू द्या!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत आहे!

रधो कर्वेंवरील चित्रपटासारखे अपवाद सोडले तर आमचा अमोल पालेकर गोलमालसोबतच गेला.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

भयानक!!!

नाही, नाही... मी परिक्षणाबद्दल नाही बोलत आहे. चित्रपटाबद्दल बोलतोय. कध्धीच बघणार नाही. चांगले सँडविच तर कुठेही मिळेल. तेवढ्याकरता एवढा त्रास नाही घेणार.

@ऋषिकेश - 'रिटा'बद्दल मलाही असेच वाटते आहे.

बिपिन कार्यकर्ते

चुरचुरीत परीक्षण

चुरचुरीत परीक्षण मस्त आहे.

प्रेक्षकांमध्ये टोकाचे भिन्न प्रतिसाद उत्पन्न करू शकणारा चित्रपट आहे असे दिसते आहे. मिळाला तर बघीनच म्हणतो.

परिक्षण छान आहे.

परिक्षण छान आहे.
ऋषिकेशने दिलेल्या सकाळमधील दुव्यावरचा लेख वाचला. त्यांचे म्हणणणे चांगले आहे. आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाटते आहे.
एरवी सकाळ मधले 'फिल्मी दुनिया' या नावाचे सदर मी चुकूनही धुंडाळले नसते. ऋषिकेशचे आभार मानतो.
--लिखाळ.

उत्सुक

परीक्षण वाचून चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

... अविनाश चंद्रचूडचे संगीत चित्रपटाला उचलायचा प्रयत्न करतात.

चित्रपटाचे संगीत आनंद मोडक यांचे आहे की अविनाश चंद्रचूड यांचे?

परीक्षण

परीक्षण चुरचुरीत झाले आहे. शैलीकार लेखकाच्या दर्जाला साजेसे.

मात्र लेख वाचताना, अनेक ठिकाणी ठेचकाळलो. लेखात चित्रपटातल्या मराठी भाषेविषयी गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. मात्र ज्या "कांदे नि बिस्मिल्ला"चे दाखले " म्हणजे मराठी संवाद" असे दिले गेले आहेत तशा स्वरूपाची भाषा ही कितीही सुरेख असली तरी प्रस्तुत चित्रपटाच्या संदर्भात कदाचित विसंगत ठरली असती अशी शंका मला चाटून गेली.

या चित्रपटाच्य आधीच्या परंपरांमधल्या काही टाकाऊ गोष्टींचा (शांताराम , बेर्डे, कोठारे इ. इ. ) दाखला दिला गेल्यावर लगेच , हा चित्रपट "तो भव्य दिव्य निर्मितीमूल्ये असलेल्या आणि कोटी कोटी रुपयांची भाषा करणार्‍या कार्पोरेट कल्चरचा धनी " झाल्याबद्दलची छद्मयुक्त संभावना इथे केली गेली आहे. आता जर का या चित्रपटाचा संदर्भ तसा असेल तर त्यास्वरुपाच चित्रण त्यात येणे योग्यच आहे असे मला वाटले खरे. पालेकरांनी "आक्रित" हा , (बहुदा मानवत येथील) हत्याकांडावरचा चित्रपट बनवल्याचे स्मरते. त्यात त्यांनी कोटी कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट् कल्चर चे दर्शन घडवल्याचे स्मरत नाही.

पण अत्यंत जडजंबाळ, पुस्तकी संवाद आणि सांकेतिकतेच्या मोहात सापडून हाती उरलेली दुर्बोधता यातून त्यांच्या हाती उचलायला येते ते एका अत्यंत कंटाळवाण्या चित्रपटाचे जडशीळ झालेले मढे.

हा मुद्दा अगदी जरूर मान्य होण्यासारखा आहे. मात्र इथे , प्रस्तुत परीक्षणलेखकाच्या एका जिव्हाळ्याच्या विषयाचा (एरवी अस्थानी वाटेल असा) उल्लेख करावा लागेल. जीएंच्या भाषेवर - अगदी संवादांवरसुद्धा - दुर्बोधतेचे , जडजंबाळपणाचे आरोप झालेत. बाकी सुबोधतेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, "Everything should be made as simple as possible, but not simpler." असे एक वचन आठवले.

पुन्हा एकदा दर्जेदार परीक्षणाबद्दल आभार. (तेव्हढा उषामावशी नाईक किंवा सरलाआत्ते येवलेकर यांचा अपमान टाळता आला असता ! ;-) )

हम्म..

परीक्षण खुसखुशीत पण एकांगी वाटले. काही प्रतिक्रिया वाचूनही आश्चर्य वाटले. अमोल पालेकर इतके नावडते आहेत (आणि असल्यास का?) याची कल्पना नव्हती. चित्रपटसृष्टीतील सुजाण अभिनेत्यांमध्ये जी काही मोजकी नावे आहेत त्यात त्यांचे नाव घ्यायला हवे असे वाटते. गोलमाल, छोटीसी बात यांच्या काळात अमिताभच्या तोडीची लोकप्रियता असताना नंतर जाणीवपूर्वक ती इमेज तोडण्यासाठी वेगळे चित्रपट करणे यात त्यांचे वेगळेपण दिसून येते. इमेज न तोडता आल्यामुळे अमिताभसारख्या सशक्त अभिनेत्याने नंतर स्वतःची कशी वाट लावून घेतली हे वेगळे सांगायला नको.

चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे त्यावर मत देणे शक्य नाही. सध्याचा मराठी चित्रपट अनासपुरी, एकसुरी, बाष्कळ विनोदांमध्ये अडकलेला आहे असे वाटते. (श्वास, वळू, टिंग्या यासारखे सन्माननीय अपवाद वगळता.) या पार्श्वभूमीवर समांतर किंवा रीटा असे वेगळे चित्रपट येणे स्वागतार्ह असावे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकार मराठीत काम करायला तयार होतात हे मराठी चित्रपटांच्या बदलत्या परिस्थितीचे निदर्शक मानायला हवे. हळूहळू मराठी चित्रपट दक्षिणेप्रमाणे सशक्त झाल्यास स्वागतार्हच आहे.

मी रीटाबद्दलही आशावादी आहे. :-)

----
"मेरा कंपिटीशन यहां के डायरेक्टरोंसे नही है, हॉलीवूड से है. स्पिलबर्ग, कपोला..."

काही खुलासे आणि काही क्षमस्व

चित्रपटाचे संगीत आनंद मोडक यांचे आहे की अविनाश चंद्रचूड यांचे?
चित्रपटाला संगीत आनंद मोडक यांचेच आहे. श्रेयनामावलीत चंद्रचूडांचेही नाव वाचले; ते स्वतंत्र संगीतदिग्दर्शन करतात, म्हणून त्यांचे संगीत असावे असे वाटले. कदाचित ते सहायक संगीतकार असतील, पण क्षमस्व.
या चित्रपटातील भाषेला माझा आक्षेप आहे तो ती ग्रामीण ढंगाची, गावठी, मराठी मातीतली नाही म्हणून नव्हे. या चित्रपटाची पार्श्वभूमी लक्षात घेता या चित्रपटातले मराठी संपूर्ण शहरी, इंग्रजी प्रभावाखालचे असावे, हेही मान्य. पण किमान वाक्यांची रचना ही बोलीभाषेशी इमान राखणारी असावी अशी अपेक्षा (पालेकरांच्या) चित्रपटाकडून ठेवावीशी वाटली. जी.एंवर केलेला दुर्बोधतेचा आणि जड भाषेचा आरोप खरा आहे असे जरी मानले तरी लेखन हे माध्यम आणि चित्रपटातले संवाद हे माध्यम यात फरक असतो, असावा, असे वाटते. माडगूळकर, पु.लं, तेंडुलकर यांनी या दोन्ही माध्यमांसाठी लेखन केले, पण त्यांनी हे भान कधी सुटू दिले नाही. दळवी अशा लिखाणाला 'परफॉर्मिंग क्वालिटी' असे म्हणतात. संध्या गोखलेंचे हेच संवाद वाचायला कदाचित बरे वाटले असते, पण चित्रपटात ते अत्यंत अवघडलेले आणि कृत्रीम वाटले. माझा आक्षेप आहे तो याला. हे संवाद म्हणजे एखाद्याने इंग्रजीत विचार करावा आणि त्या विचारांवर मराठी संवाद लिहावेत, तसे आहेत. आपण नेहमी असेच करतो, असे गोखले यांनी म्हटलेही आहे.

(तेव्हढा उषामावशी नाईक किंवा सरलाआत्ते येवलेकर यांचा अपमान टाळता आला असता ! ;-) )
सरला येवलेकर आणि उषा नाईक या माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत येऊन गेलेल्या कित्येक सपकसुंदर्‍यांपेक्षा त्यांच्यात लसणीच्या झणझणीत चटणीसारखे तेच ते 'इट्ट्' कितीतरी अधिक आहे असे मला वाटते. मूळ लेखात त्यांचा उल्लेख उपहासाने केल्यासारखा वाटतो खरा, पण पालेकरांनी खरेच त्यांच्यासारख्या कुणाला तरी घ्यायला हवे होते असे मला वाटते.
अमोल पालेकर इतके नावडते आहेत (आणि असल्यास का?) याची कल्पना नव्हती. चित्रपटसृष्टीतील सुजाण अभिनेत्यांमध्ये जी काही मोजकी नावे आहेत त्यात त्यांचे नाव घ्यायला हवे असे वाटते. गोलमाल, छोटीसी बात यांच्या काळात अमिताभच्या तोडीची लोकप्रियता असताना नंतर जाणीवपूर्वक ती इमेज तोडण्यासाठी वेगळे चित्रपट करणे यात त्यांचे वेगळेपण दिसून येते.
यात ज्या प्रतिसादाचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे त्या प्रतिसादकर्त्याचे (आणि माझेही) अमोल पालेकर हे अत्यंत आवडते कलाकार आहेत, असे (मला तरी) वाटते. म्हणून तर अमोल पालेकरांकडून अपेक्षा ठेवाव्याशा वाटल्या. एरवी मनोजकुमारने 'क्लार्क' नावाचा प्रकार काढला आणि त्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या बुजुर्ग अशोककुमारला देशभक्तीपर गाण्यावर पडल्या पडल्या नाच करायला लावले. बोलले कुणी काही यावर?
सध्याचा मराठी चित्रपट अनासपुरी, एकसुरी, बाष्कळ विनोदांमध्ये अडकलेला आहे असे वाटते.
सहमत आहे. भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे, मकरंद अनासपुरे यांनी बेर्डे, सराफ, सचिन आणि कोठारेंचीच छळपरंपरा पुढे चालवली आहे असे वाटते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकार मराठीत काम करायला तयार होतात हे मराठी चित्रपटांच्या बदलत्या परिस्थितीचे निदर्शक मानायला हवे. हळूहळू मराठी चित्रपट दक्षिणेप्रमाणे सशक्त झाल्यास स्वागतार्हच आहे.
नुसते हिंदीतले कलाकार मराठीत काम करायला तयार झाले म्हणून मराठी चित्रपट सशक्त कसा होईल ते कळाले नाही. अमिताभ बच्चनने 'अक्का' या मराठी चित्रपटात काम केले. यापूर्वीही जॉनी वॉकर, मेहमूद अशा अभिनेत्यांनी मराठी चित्रपटांत कामे केली होती. तनुजाचाही 'झाकोळ' आठवतो. यांनी मराठी चित्रपट काही फार पुढे गेला असे वाटत नाही' उलट आज हे चित्रपट कुणाच्या लक्षातही नाहीत. 'समांतर' मधले शर्मिला टागोरची भूमिका अशीच नगण्य आहे.

सन्जोप राव
ये सारा जिस्म बोझ से झुककर दोहरा हुवा है
मैं सजदे में नही था, आपको धोखा हुवा है

हिंदी

नुसते हिंदीतले कलाकार मराठीत काम करायला तयार झाले म्हणून मराठी चित्रपट सशक्त कसा होईल ते कळाले नाही. अमिताभ बच्चनने 'अक्का' या मराठी चित्रपटात काम केले. यापूर्वीही जॉनी वॉकर, मेहमूद अशा अभिनेत्यांनी मराठी चित्रपटांत कामे केली होती. तनुजाचाही 'झाकोळ' आठवतो. यांनी मराठी चित्रपट काही फार पुढे गेला असे वाटत नाही' उलट आज हे चित्रपट कुणाच्या लक्षातही नाहीत. 'समांतर' मधले शर्मिला टागोरची भूमिका अशीच नगण्य आहे.
नुसत्या या गोष्टीमुळे सशक्त होणार असे अभिप्रेत नव्हते. :) त्याला अर्थातच इतर गोष्टीही हव्यात.
अक्कामध्ये अमिताभची भूमिका किंवा जॉनी वॉकर/मेहमूद यांची भूमिका प्रमुख होती किंवा कसे कल्पना नाही. ज्याप्रमाणे दक्षिणेत संधी मिळाल्यावर बरेच कलाकार तिकडे करीअर करतात तसे इथेही व्हावे ही अपेक्षा. त्या दृष्टीने हा बदल चांगला वाटला.

----
"मेरा कंपिटीशन यहां के डायरेक्टरोंसे नही है, हॉलीवूड से है. स्पिलबर्ग, कपोला..."

चुरचुरीत

लेख चुरचुरीत आहे. मराठी चित्रपट विनाकारण वैचारिकतेचा आव आणतात तेव्हा ते नकोसे वाटतात. पालेकरांचा कैरी आणि बनगरवाडीही डोक्यात गेले होते. अनाहत पाहू शकलो नाही. (नंतर आलेले पाहिलेच नाहीत.)

मात्र सचिनचे चित्रपट मला आवडत होते. सचिनचे जुने चित्रपट (बनवाबनवी, माझा पती करोडपती, एकापेक्षा एक वगैरे उत्तम मनोरंजक होते असे माझे मत आहे.) करोडपतीमधल्या कॅप्टन बाजीराव रणगाड्याचे बेअरिंग अशोक सराफने फारच सुरेख घेतले आहे. बनवाबनवीतील 'धनंजय माने घरात आहेत का' हा प्रसंग आणि करोडपतीतील दारु पिऊन घातलेला निळू फुलेंबरोबरचा गोंधळ हे दोन प्रसंग अशोक सराफच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट विनोदी प्रसंग असावेत

भरत जाधव हा बाय चान्स कलाकार झाला आहे असे वाटते. अनासपुरे तसा गुणी आहे. (त्याचा गाढवाचं लग्न झकास होता)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर