नाजुक रुपडे ठाकठीकीचे

विन्दा करंदिकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगांवकर (त्यांच्या) तरुणपणी कविता वाचनाचे कार्यक्रम करावयाचे. मजा यावयाची. तिघांच्या कवितेत फरक असावयाचाच पण सादरीकरणही निरनिराळे असावयाचे.आमचे जास्त आवडते वसंत बापटच.पक्का कोकणस्थ,आणि सेवादलातल्या कलापथकामुळे समोरच्याला काय हवे ते अचूक देण्याची उपजत जाणीव. पैकी बापटांनी कविता लिहणे लवकर बंद केले, विंदांनी काव्यबाह्य लेखनाला सुरवात केली व मंगूअण्णांनी भावगीते पाडावयाचे ठरविले व नंतर तर बोलगाणी सारख्या टुकार (For the gallery) रचनाही केल्या. एकदा पापडाकरिता लेखणी झिजवावयाची ठरवले की काय होणार म्हणा. आपले नशीब की निदान अनेक भावगीतेही छान लिहली. पण कविता संपलीच. ही झाली माझी मते.आता कोणी कविता व भावगीत यात फरक असतो कां (कीं नसतोच) व असल्यास काय त्यावर अवष्य लिहावे. तरुण वयात ज्यांच्या अनेक कविता तोंडपाठ होत्या त्या कवींची एकेकच कविता देणे किती अवघड जाते, कसे सांगणार ? शिवाय पन्नास वर्षांत वाचकांच्या आवडीनिवडीही बदललेल्या असणारच;असो. बापटांपासून सुरवात करू.
अभिजात या एका शब्दात बापटांच्या कवितेचे वर्णन करता येईल. संस्कृतची छाप पहिल्यापासून दिसून येते.लेखनात समरगीते, कला पथकाकरता लेखन, लावण्या व तत्सम रचना, दीर्घ कविता, भावकविता आणि भावगीते, वगैरे वगैरे.आज त्यांची एक लावणीवजा कविता बघू.

नाजुक रुपडे ठाकठीकीचे, संभावित टाकमटिकली,
किती पाहिले तरी निवेना, नजर आमुची वखवखली.
चोळीवरती सोळा ऐने, आठांना दुनिया दिसली,
नजर जराशी घुटमळली, तो पदर चोंबडा करी चुगली.
ओठटिपीचा रुमाल इवला, घडी तयाची घुसमटली,
हळहळ वाटून हृदय म्हणाले, हाय! तुझी जागा चुकली.
झुलणारी शेलाटी कंबर, पितांबर बळकट कसली,
तकतकता केतकी पोटर्‍या, वीज नसांमधूनी घुसली.
झणत्कारता तुझी पाऊले, कानांना पाने फुटली,
तुला पाहता एक पांपणी,शिणली अन् अलगद मिटली.
सन अठराशेमधे पुण्याला, गाठ जर का असती पडली,
धडगत नव्हती, तुझी साजणी, हुकली गं, संधी हुकली.
वसंत बापट (संग्रह .... आठवत नाही)
रुपडे नाजूक आहेच पण ठाकठीकीचे आहे, सगळे कसे जागच्या जागी आहे. टाकमटिकली असले तरी संभावित आहे हे आवर्जून सागितले आहे. ऐन्यांच्या चोळ्या, आरसे बसवलेल्या चोळ्या,आता दिसत नाहीत म्हणा, पण होत्या. कवीराजांनी सोळा मोजले; तक्रार काय तर आठांनाच जग दिसले! बाकी पदराआड लपलेले. आता तेथे नजर घुटमळणारच हो, म्हणून काय चोंबड्या पदराने तेही झाकून टाकावयाचे? रुमाल इवलासाच आहे पण(तंग) चोळीमध्ये तो घुसमटणार नाही तर काय. हळवे हृदय म्हणणारच, अरे तुझी (रुमालाची कीं हृदयाची?) जागा चुकली गड्या. हा हंत हंत, ती घट्ट नेसलेली नऊवारी पातळे, त्या सिंहकटी कमरा,त्या केतकी पोटर्‍या.पाहून बसणारा झटका !( काय गुंडोपंत, आता फक्त आठवणीतच ठेवावयाचे ना?) हा बापटांचा वसंता काय तीला पाहून डोळा मारणार? छे छे. त्याचे म्हणणे, तसे काही नाही हो.( अनिमिष) पहात राहिल्यामुळे पांपणी शिणली आणि अलगद मिटली बिचारी.त्याची तक्रार एकच आहे, गाठ पडावयाचीच होती तर निदान पेशवाईत, पुण्यात, पडली असती, तर किती
बरे झाले असते. मग तीची धडगत राहिली असती काय? रावबाजींच्या कारकिर्दीत संधी गमावलीच नसती!

पु.शि.रेगे यांची दुसरी कविता देण्यात उद्देश असा होता की आणखी कुणी रसिकाने तीचा आस्वाद मांडावा. असो. श्री. आनंदयात्री यांच्या विनंतीवरून मीच प्रयत्न करतो.(बाकी पु.शि.ना हात लावणे अंमळ अवघडच म्हणा.)
तेव्हा तू म्हणाली होतीस,"चांदणं जेव्हा पाण्यात डुंबतं, तेव्हा आपण कोणी बोलावयाचं नसतं,कारण, ते एकटं असतं."
सरळ वाचल तर एक वाक्य; प्रत्येक शब्दाचा अर्थ सहज कळणारा. आता भावतरंग पाहू. तो व ती दोघेच आहेत.तळ्याच्या काठी आहेत व पौर्णिमेची रात्र आहे. कसे सुचवले ? पाणी आहे म्हणजे तलाव,नदी वा समुद्रही असू शकेल. पण चांदणं उपभोगावयाचे असेल तर नदी-समुद्र उपयोगाचे नाहीत, शांत जलाशयच पाहिजे. चांदण डुंबतं आहे म्हणजे भरपूर चांदणं असलेली पौर्णिमाच पाहिजे. दोघेच असणार कारण हा "मूड" रेव्ह पार्टीचा नक्कीच नाही. काही वेळ शांततेत, हातात हात घालून बसल्यानंतर तो म्हणतो,"तेव्हा तू म्हणाली होतीस".... म्हणजे कोणे एके काळी अशाच एकांतात तो बोलावयास सुरवात करणार तोच तीनेच सुरवात केली होती.
आज ती बोलत नसली तरी त्याला त्या वेळचा तीचा शब्द नि शब्द आठवत आहे.काय म्हणाली होती ती? " चांदणं जेव्हा पाण्यात डुंबतं", इथे लक्षात घेण्यासारखा शब्द्प्रयोग आहे, डुंबतं, इतर वेळी आपण "चांदणं पडल होते" असे म्हणतो.इथे ते पडत नाही, पाण्यात डुंबावयाला खाली उतरल आहे.इथच कां? जलाशय निरव आहे, दुसर कोणी नाहीये, तेव्हा चांदण्याला
वाटत या एकांतात जलविहाराला हरकत नाही,कोणी पहावयाला नाही.तीचे डुंबणे पहावयाला हे दोघे आहेत पण ते तीला माहीत नाही. तेव्हा, त्या वेळी हा काहीतरी बोलावयास सुरवात करणार असे वाटल्याबरोबर तीने हलकेच त्याला सांगितले या वेळी कोणी काही बोलावयाचे नसते "आपण"सुद्धा.खरे म्हणजे अशा वेळी दोघांना गुजगोष्टी करावयास आवडणार नाहीत कां? त्या करताही ती दोघे इतक्या दूरवर आले असतील. तरीही ती त्याला मना करते. कारण... ती कारण देते," "ते एकटं असतं". चांदण्याला वाटत असत की तेथे कोणी नाही व म्हणूनच ते पाण्यात उतरल आहे. आपल्या बोलण्याने जर तीच्या लक्षात आले कीं आजूबाजूला लोक आहेत तर ती शरमून जाईल. तीचा मोकळेपणा नाहिसा होईल. हे अतिक्रमण आहे व आपल्या सभ्यपणाला शोभणारे नाही." ही मर्यादा एका स्त्रीच्याच लक्षात प्रथम येते! चांदण पाण्यात उतरल्याने निर्माण झालेले हे भावतरंग किती हळुवारपणे चित्रीत झाले आहेत!
शरद

Comments

सुंदर.....!

सुंदर रसग्रहण.
'आठांना दुनिया दिसली' 'आठांना' म्हणजे कोणाला ?

कविता व भावगीत यात फरक असतो कां (कीं नसतोच) व असल्यास काय त्यावर अवष्य लिहावे.

कविता ही वेगवेगळ्या प्रकाराची असावी. जसे, भावकविता, नवकविता, साम्यवादी कविता, दलित कविता, आदिवासी कविता, इत्यादी. भावना आणि त्या भावनेची गेयशब्दातील अभिव्यक्ती ही भावगीतात महत्वाची असते असे वाटते.

कवीतेतील फरकच करायचा तर, प्राचीन कविता आणि नवीन कवीतेतला फरक पाहा. प्राचीन कविता ही बहूतांशी कथनपर, वर्णनपर होती. कवीच्या व्यक्तीगत भावनांना किंवा अनुभवांना स्थान नसे, पण नव्या कवितेत कवी आपल्या व्यक्तीनिष्ठ भावना व विचार व्यक्त करतो. रचनेचे स्वरुप बदलले.कवितेतील आशय बदलला. अभिव्यक्तीची नवी माध्यमे शोधून काढली. त्यामुळे काव्याची भावोत्कटता वाढली. प्राचीन कवितेत आत्मनिष्ठ अंश फक्त संत कवींनी व्यक्त केला. एरवी बहुतेक प्राचीन काव्य आख्यानपर असून कथेतील त्या त्या पात्रांच्या भावना व्यक्त करण्याचे कार्य कवींनी केले. सारांश प्रत्येक कविता ही भाव व्यक्त करणारी असेल पण सर्वच कवितांना भावकविता म्हणन्याबाबत मी सांशक आहे.

-दिलीप बिरुटे

वा!

शरदराव,
आपण मराठी शिकवता का कल्पना नाही. पण शिकवत नसाल तर पोरांचे फार नुकसान होते आहे असे वाटते.
कविता आणि विवेचन फारच सुरेख. वाचून हे गाणे आठवले.

----
"मेरा कंपिटीशन यहां के डायरेक्टरोंसे नही है, हॉलीवूड से है. स्पिलबर्ग, कपोला..."

शिरसी मा लिख मा लिख

आठांना दुनिया दिसली..
बहुतेक चोळीत लक्ष गुंतल्यामुळे लेखाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. असो. आठ आयन्यांना पदराने
झाकल्यामुळे त्यांना दुनिया दिसली नाही.
(उपक्रमपंत: हा प्रतिसाद उडवावयाला माझी हरकत नाही.)
शरद

लक्ष आहेच.

बहुतेक चोळीत लक्ष गुंतल्यामुळे लेखाकडे दुर्लक्ष झालेले दिसते.

लेखाकडे लक्ष आहेच.पण खालील शब्दावरुन नजर हटत नाहीहे !
वखवखलेली नजर, झुलणारी शेलाटी कंबर,तकतकणार्‍या केतकी पोटर्‍या, तंग चोळीत घुसमटणारा रुमाल,
थोंड थोडं समजून घेत आहे. ;)

-दिलीप बिरुटे
(रसिक)

आणखी आणखी एक षटकार

शरदराव, वावा.

कवीराजांनी सोळा मोजले; तक्रार काय तर आठांनाच जग दिसले! बाकी पदराआड लपलेले. आता तेथे नजर घुटमळणारच हो, म्हणून काय चोंबड्या पदराने तेही झाकून टाकावयाचे? रुमाल इवलासाच आहे पण(तंग) चोळीमध्ये तो घुसमटणार नाही तर काय. हळवे हृदय म्हणणारच, अरे तुझी (रुमालाची कीं हृदयाची?) जागा चुकली गड्या. हा हंत हंत, ती घट्ट नेसलेली नऊवारी पातळे, त्या सिंहकटी कमरा,त्या केतकी पोटर्‍या.पाहून बसणारा झटका !.... .....पाणी आहे म्हणजे तलाव,नदी वा समुद्रही असू शकेल. पण चांदणं उपभोगावयाचे असेल तर नदी-समुद्र उपयोगाचे नाहीत, शांत जलाशयच पाहिजे. चांदण डुंबतं आहे म्हणजे भरपूर चांदणं असलेली पौर्णिमाच पाहिजे.

तुम्ही ज्या रसिकतेने रसग्रहण केले आहे त्याला तोड नाही. आणखी आणखी एक षटकार. "सन अठराशेमधे पुण्याला, गाठ जर का असती पडली!" हीच ओळ सध्या गुणगुणतो आहे सध्या.

सध्याच्या काळात प्रेम आणि सगळं काही काउंटवर मिळाल्यासारखे मिळतं. तिथे काय अशा भावनांचे, कवितांचे मोल!

आपण मराठी शिकवता का कल्पना नाही. पण शिकवत नसाल तर पोरांचे फार नुकसान होते आहे असे वाटते.

आरागॉर्न, ह्यांच्याशी वरील वक्तव्याशी पूर्णपणे सहमत आहे. एकंदरच मराठी शिकणाऱ्या मुलांचे किती नुकसान होते आहे ह्याची कल्पना करवत नाही.

कवितेच्या वर्गीकरणांना अवाजवी महत्त्व द्यायला नको असे मला वाटते. शेवटी चांगल्या कवितेची ओळख पटली तरी पुरे!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मस्तच

छान कविता आणि रसग्रहण .. खूपच मस्त

आपण मराठी शिकवता का कल्पना नाही. पण शिकवत नसाल तर पोरांचे फार नुकसान होते आहे असे वाटते.

+१७६०

बाकी ,

चांदणं जेव्हा पाण्यात डुंबतं, तेव्हा आपण कोणी बोलावयाचं नसतं,कारण, ते एकटं असतं

मधे चांदण्याच्या एकटं असण्याच कारण पुढे करत आहे कारण "आता एकटे आहोत तर (कदाचित नेहेमीसारखा! ;) ) बोलत बसु नकोस.. तर काहि गोष्टी न बोलता कर असे तर तीला सांगायचे नसेल?

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

रसग्रहण सुंदर

उत्तान, म्हणून अतिरंजनही मिष्किल आणि प्रामाणिक होणारे गीत आहे. रसग्रहण आवडले.

(शरदरावांना बोलगीते फारशी आवडत नाही असे दिसते... चालायचेच.)

छान रसग्रहण

लेख आवडला.

परंतु पाडगांवकरांच्या 'पापडाच्या कवितेचा' उल्लेख खटकला. त्या कविता पावसाळा नुकता कुठे सुरू होतो न होतो त्या सुमारास येत आणि त्या मातीचा ओला सुगंध घेऊन येत एव्हढे मला आता आठवते आहे. त्या 'लिज्जत' ने स्पॉन्सर केल्या असत एवढाच त्यांचा व पापडाचा काय तो संबंध. पण तत्कालिन इतर कवींनी त्याची 'पापडांच्या' कविता अशी मत्सरी संभावना केली, ठणठणपाळांनी त्याची त्यांच्या नेहमीच्या खुशखुशीत शैलीत रेवदी उडवली, आणि ते बिरूद कायम झाले. खरे तर मला वाटते तो जाहिरातीचा एक चांगला सुसंकृत प्रयत्न होता.

ज्या प्रा. बापटांचे तुम्ही गुणगान गायले आहे, तेही पुढे जाहिरातींसाठी कॉपी लिहीत होते. आणि ह्यात मला अजिबात काही वाईट अथवा चूक आहे, असे वाटत नाही. विषय निघाला म्हणून हा उल्लेख केला आहे, व त्यात मला बापटसरांचा अपमान मुळीच अभिप्रेत नाही. उलट अत्यंत भोंगळ अशा हिंदीमिश्रीत कॉप्या येऊ लागण्याच्या सुरूवातीच्या काळात (८० च्या मध्यावर) जर काही ठाकठीक मराठीतील कॉप्या असल्या, तर त्या त्यांनी लिहीलेल्या असाव्यात.

बापट

प्रा. बापटांचे तुम्ही गुणगान गायले आहे,
शरदरावांनी बापटांचे गुणगाण गायले असले तरी बापटांच्या कवितेवर अनुकरणाचा आरोप केला जातो. कुसुमाग्रज, मर्ढेकर, बालकवी, पु.शि.रेगे यांच्या अनुकरणात त्यांची कविता गुरफटली गेली असेही म्हटल्या जाते. सामान्य अनुभव (उगाच) असामान्य करण्याचा प्रयत्न कवितेच्या बाबतीत बापटांनी केला, बापटांनी प्रचारीपद्य लिहिले असेही म्हटल्या जाते. लावणी आणि नाट्यकाव्याला त्यांची प्रतिभा अनुकुल होती. इतकीच मला माहिती आहे. जाणकारांनी या विषयावर भर घालावी.

-दिलीप बिरुटे

लिज्जत पापड

वा प्रदीपजी. इतकी जूनी आठवण कोणीतरी जागृत ठेवली आहे हे पाहून खरेच आनंद झाला. अहो, मंगुअण्णा हा शब्दप्रयोगसुद्धा ठणठणपाळांचाच. मी बापडा कापी मारण्यापलीकडे काय लिहणार?
मासिकाच्या मलपृष्टावर येणारी कविता व त्यावेळचे रम्य रेखाचित्र अजूनही मन सुखावते. प्रथम ती कविता वाचूनच अंक उघडत असू.लेखक वा कोणताही कलाकार चांगले काय देतो ते घ्यावे हे मान्य.त्यामुळे सत्यकथा काय पाच-पंचवीस रुपये देत असेल त्यावर कवीने समाधान मानावे असे मी म्हणत नाही. त्यामुळे बापट-पाडगांवकर यांनी काव्यापलिकडे काय लिहले यात मी सांगण्यासारखे काही नाही.
पण तरीही...
श्री.धनंजय यांना "बोलगाणी"चा उल्लेख पटलेला दिसत नाही. आता तुम्ही सांगा "जिप्सी"च्या दर्जाची एकतरी कविता त्या पुस्तकात आहे कां? जरा लिहा कीं.
शरद

सहमत

जरा लिहा कीं.
सहमत आहे. दुर्दैवाने या विषयावर लिहीण्यासारखे आमच्याकडे काही नाही. वसंत बापट म्हटले की आम्हाला गगन सदन आठवते, इतकेच. किंबहुना यामुळेच सर्व प्रतिसाद आम्ही आशाळभूतपणे वाचत आहोत. तरी जाणकारांनी लिहिताना संकोच करू नये ही विनंती.

----
"मेरा कंपिटीशन यहां के डायरेक्टरोंसे नही है, हॉलीवूड से है. स्पिलबर्ग, कपोला..."

सहमत

सहमत आहे.
शरदरावांचा लेख आवडला. जाणत्यांनी अजून लिहावे म्हणजे आम्हासारख्या अजाणत्यांना वाचायला मिळेल.
--लिखाळ.

अनुकरण

..यांच्या अनुकरणात त्यांची कविता गुरफटली गेली असेही म्हटल्या जाते.
नवीन माहिती. प्रा.डॉक्टरांनी कोणी, कोठे म्हटल्या ते सांगितले तर मला खचित आवडेल. त्या निमित्ताने परत कविताही वाचल्या जातील व
अभ्यासही होईल.
बापटांचे गुणगाण फक्त एका वाक्यात एका "अभिजात" या विशेषणाने
केले आहे!
बापट यांनी प्रचारकी काव्य लिहले हे मीही सांगितले आहे. तरुणपणी
स्वातंत्र्यलढा व सेवादलाच्या कलापथकाकरिता त्यांनी लेखन केले.
"सदैव सैनीका, पुढेच जायचे,
न मागुती तुला, कधी फिरायचे."
अशा ओळी अजूनही लक्षात आहेत.
शरद

कोणी कोणास म्हटले

द.भी. कुलकर्णी यांचे 'दोन परंपरा' पुस्तकात वसंत बापटांवरचा लेख आहे. त्यात द.भी म्हणतात की, '' बिजली व 'सेतु' (तुम्ही दिलेली कविता सेतु काव्यसंग्रहातील आहे) या काव्यसंग्रहाचा विचार केला व त्यातून वसंत बापट यांची प्रकृती शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे मोठा संभ्रम पडतो. त्याचे एक कारण म्हणजे केलेले अनेक कवींचे अनुकरण. बापटांवर प्रभाव पडला आहे तो कुसुमाग्रजांचा. बीजली ला प्रस्तावनाही कुसुमाग्रजांचीच आहे. शब्द, वृत्त, अलंकार, विषयाची निवड, मांडणी या सर्वच बाबतीत कुसुमाग्रज बापट यांच्यात किती साम्य आहे याची कल्पना येते.'' उदा. -
दिशास्तींनो चंद्रमुखींनो पुन्हा पुन्हा सांगा
सांगा पुनश्च अभिमाने
निळवंतीवर निशाण अमुचे नाचत जाईल
यापुढे डौलत डौलाने
(बिजली: तिची ही कहाणी)

वरील ओळी कुसुमाग्रजांच्या वळणाची आहे. तर खालील ओळी बालकवींच्या कवितेत शोभण्यासारख्या आहेत.

शरदामधील पहाट आली तरणीताठी
हिरवेहिरवे चुडे चमकती दोन्ही हाती....
फुलाफुलांची हनु करुवाळित अल्लड चाले
तृणातृणांशी ममतेने अस्फुट बोले.
(सेतु: सेतु: १:२)

वरील एकेके कवितेवरुन अनुकरणाच्या निष्कर्षावर पोहचता येणार नसले तरी, लेखातील अनेक कवितांमधून कधी कुसुमाग्रज, मर्ढेकर, पु.शि.रेगे डोकावतात. त्याचे चांगले विश्लेषण वाचायला मिळते. आणि असे असले तरी, त्यांचे मोठेपण नाकारतोय कृपया असाही अर्थ घेऊ नये.
वसंत बापटांच्या कवितेवर भली बुरी संदर्भासहीत चर्चा व्हावी, म्हणून तर म्हणालो की, जाणकारांनी अधिक भर घालावी.

-दिलीप बिरुटे

अनुकरण

धन्यवाद,सर.वसंत बापट यांनी जवळजवळ विसेक संग्रह/पुस्तके लिहली.बिजली(१९५१) हा पहिला व सेतू(१९५७) दुसरा संग्रह.
अशा सुरवातीच्या संग्रहातील कवितेतील एखाददुसरे कडवे घेऊन त्यावर याचे,त्याचे वळण दिसते हे म्हणणे थोडे ओढून ताणून वाटते. आता तुम्ही एखादी चांगली निसर्ग कविता घेतलीत, कुणाचीही, तर मी सुद्धा त्या कवितेत बालकवींचे वळण दिसते असे दाखवू शकेन. शिवाय एक कवी ५-१० निरनिराळ्या कवींचे अनुकरण करतो म्हणणे अंमळ मनोरंजकच ठरावे. उदाहरण बघावयाचे आहे ? गदिमांचे घेऊं.
गीतरामायण...तुलसीदासांच्या तुलसीरामायणाचे अनुकरण.
दिसे ही सातार्‍याची तर्‍हा ...राम जोशीचे अनुकरण.
चंद्रावरती दोन गुलाब... माधव ज्युलिअनांचे अनुकरण. (हसून घ्या.)
कविता गुरफटली हे म्हणणे अतिरंजित वाटते.
अवांतर: द.भींचे नाव आले म्हणून. वा.ल., द.भी., गो.म., व.दि.,भीमराव... थोड्क्यात मराठीचा प्राध्यापक असलेला कुठलाही कुलकर्णी घ्या. तो टीकाकारच का होतो ? (अचूक उत्तर देणार्‍यास एक
डोसा व कॉफी )
शरद

सहमत आहे

>>सुरवातीच्या संग्रहातील कवितेतील एखाददुसरे कडवे घेऊन त्यावर याचे,त्याचे वळण दिसते हे म्हणणे थोडे ओढून ताणून वाटते.
म्हणून तर म्हटले जाणकारांनी भर घालावी. पण सुरुवातीच्या काव्यसंग्रहात काही प्रभाव नक्की आहे, तो शोधला पाहिजे. [बिजली,सेतु आणि अकरावी दिशा]

गदिमांचे उदाहरण आणि मराठीतील समीक्षक सर्व कुलकर्णीच का हे निरीक्षण तर लैच भारी. :)

अवांतर : प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहिण्याऐवजी नवीन प्रतिसाद का लिहिता हो ?

-दिलीप बिरुटे

द.भी........अध्यक्ष...!

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी द.भि. कुलकर्णी

दभींना टीकाकारांची मतं कामाला आली वाटतं......!

-दिलीप बिरुटे

टीकाकार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद प्रश्न करतातः"मराठीचा प्राध्यापक असलेला कुठलाही कुलकर्णी घ्या. तो टीकाकारच का होतो ? "
उत्तरः शके बाराशे बारोत्तरे..|ज्यांनी मराठी टीका रचली त्यांचे उपनाम कुलकर्णी! त्यामुळे कुलकर्णी कुलोत्पन्न अनेक मराठीप्राध्यापक टीकाकार झाले ही शक्यता नाकारता येत नाही!!

 
^ वर