पाहुणेर

पाहुणेर
प्रत्यक्षातले विश्व, कवीच्या कल्पनेतले विश्व तसेच आणखी एक विश्व कवितेत आढळते,भावविश्व. शाळेत आपण शिकलेल्या कविता प्रत्यक्षातल्या विश्वाचे काव्यात्वक वर्णन केलेल्याच असत. जरा नंतरच्या काळात कल्पनेतले विश्वही परिचयाचे होऊं लागते. उदाहराणर्थ "शाळेस रोज जातांना, मज विघ्ने येती नाना" या कवितेपासून "फूलराणी"चे कल्पनेतील विश्वही आपल्या
परिचयाचे झालेले असते.भावविश्वाची ओळख जरा मोठेपणी, जाणून उमजून कविता वाचावयाला सुरवात केल्यावरच होऊं लागते.त्यातही ज्यांना "भावगीते" म्हणतात तीच जास्त परिचयाची असतात. गदिमा., शांता शेळके, पाडगांवकर यांची भावगीते सुंदर भावकविताही असूं शकतात; पण तरीही भावगीत व भावकविता यात सूक्ष्म फरक राहतोच. आज श्री. पुरुषोत्तम पाटील यांची एक निनांतसुंदर भावकविता पाहू.

पाहुणेर

येणार्‍यासाठीं
लगबग पहांट....चुळुक झुळुक सडा
हलकेसे स्वस्तिक, फुलकीशी रांगोळी
अन् थोडा दळदार सूर्य....

थांबलेल्यासाठीं
एकुलता पाट, सुगरण ताट
अन् नखलेल्या कोंवळ्या पानांचा
थोडा बेतशीर केशरविडा....

जाणार्‍यासाठीं
अर्ध्या-उघड्या दाराआडचा
ओझरता इरकली पदर
अन् कांकणांची थोडी अस्वस्थ किणकिण....
पुरुषोत्तम पाटील (तळ्यांतल्या साउल्या,१९७८)

हे निसर्गचित्र आहे कीं भावचित्र याचा संभ्रम पाडावा असे हे मोहक आणि रेखीव पण धूसर चित्र.
पन्नासेक वर्षांपूर्वीचे खेडेगावातले एक लहानसे घर, समोर एक छॊटेसे अंगण आणि पहांटे हळुवारपणे सडा घालणारी... अरे. पण हीचे वर्णन तर कोठेच नाही ! लगबग आहे ती येऊं घातलेल्या पाहुण्याच्या स्वागताची, पाहुणेराची ! त्याच्याकरता सडा चुळुकझुळुक, हलकी फुलकी स्वस्तिक-रांगोळी, सूर्य मात्र दळदार !
पाहुणा आला, त्याच्या भोजनासाठी घरातला एकुलता एक पाट व समोरील ताटात सुगरणीने केलेला स्वयंपाक. कोवळी पाने नखलून कोवळ्या पानांचा केशरविडा केला, पण तोही बेतशीर.
पाहुणा निघाला, पण त्याला निरोप द्यावयाला अंगणाच्या फाटकापर्यंत जाता येत नाही. अर्ध्या उघड्या दारातूनच बघावयाचे तेही ओझरतेच. हृदयातील अस्वस्थता दाखवणार किणकिणारी कांकणे!
तो "पाहण्याकरिता" आला होता? असावा नाही ? वाटते खरे तसेच. पण कवी तर त्याच्या विषयी वा तीच्या विषयी काहीच सांगत नाही. सगळे तुमच्यावरच सोडलेले. म्हणून तर चित्र धूसर पण मोहक आणि रेखिवही. कोणत्याही सहृदय रसिकाला तीच्या भावविश्वात सहज नेणारे.
ही किमया कशाने साधली? मला वाटते या शब्दचित्रात रंग भरले आहेत विशेषणांनी. पहांटेपासून लगबग तीची पण पहांटच लगबग होते. सड्याचा आवाज, चुळुकझुळुक, नादमयी होतो. रांगोळी हलकी फुलकी होते आणि सूर्य दळदार. सुगरण ती पण ते आपल्याला कळते सुगरण ताटामुळे. कोवळी पाने? असतील,असतील. डोळ्यासमोर येते तीचीच कोवळिक. तीची आतुरता दिसते अर्ध्या दारामागच्या "इरकली" पदराने. आज तीने खास इरकली साडीचे घडी मोडली,येणार्‍याकरता व किंचित थरथरणारे हात,ते जाणवतात किणकिणत्या कांकणांनी! जणुं सगळ्या निर्जीव वस्तु आज तीच्याकरता सजीव झाल्या आहेत.
काव्यात तुलना अप्रस्तुत असतात कारण बर्‍याच वेळी त्या फसव्याच ठरतात. पण तरीही तुम्हाला भा.रा.तांब्यांची " नववधू"
आठवली असेलच.दोहोंची तुलना केलीत तर दोन भावविश्वांच्या मांडणीतला फरक प्रकर्षाने जाणवेल.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर कविता...

मला वाटते वरील कविता अभ्यासक्रमात होती. कविता वाचून मला नेमाड्यांची खालील कविता आठवली.

कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो,
कसा सडा घालता माझ्या अंगणाचा कोपरा कोपरा खुलेल असा.
कशी सजवता तुळशीवृंदावनाची दर्शनी बाजू
खुडता मंजिऱ्या दुपारच्या सुकलेल्या मऊ नखांनी
रोज नव्या हातावर केलेल्या कापसाच्या वातींनी लावता
माझ्या पाताळघरातला अंधार प्रार्थणारी
देवघरातील आंदणाची उभी समई.

आत बाहेर येता जाता कसल्या गुणगुणता आरत्या
पुसट शब्दांच्या, सुरांच्या वेणीत अर्थ गुंफून टाकून.
तो अर्थ मी चाचपू पाहतो. पाहतो तेव्हा -
भिंतीला खेटून उभा असलेल्या माझ्या डोक्यावरच्या पिंपळाची
फांदी फांदी ओरडणा-या कावळ्यांनी काळीकुट्ट लदलेली असते.

कुणासाठी ही अबोल संथ वाटपाहणी.
उंबरठ्यात रुतवलेल्या बांगड्यांच्या नक्षीलाच कळणारी
तुमच्या आंगठ्यांची लवलव कुणासाठी?
किती दिवस हे आरशालाच माहित असलेले
तुमचे कोरीव कुंकवाच्या चांदणीखालचे
पहाटचे फटफटीत कपाळ...

मलाही कळू द्या तुमची उभार दृष्टीघोळ जवळीक.
न्हाणीपासून आतपर्यंत उमटलेल्या पावलांची आणि
परकरांच्या किनारीवर भरलेल्या बिनपायांच्या मोरांची भुलावण
मलाही कळू द्या.

का पदर घालून असता माझ्यासमोरही सकाळ संध्याकाळ
सदा कपाळापर्यंत, ह्या आपल्याच आपल्याच घरात.

चेहराच नसलेल्या अपुऱ्या शिल्पासारख्या बेसूर बायांनो
माझे अंगण पांढरे झाले तुमच्या रांगोळ्यांनी.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अन् नखलेल्या कोंवळ्या पानांचा थोडा बेतशीर केशरविडा...

अन् नखलेल्या कोंवळ्या पानांचा
थोडा बेतशीर केशरविडा...

शरदजी क्या बात है? खरोखर फारच सुंदर कविता आणि तुमचे रसग्रहणही साजेसे.
चन्द्रशेखर

सुरेख

सुरेख विवेचन .. आवडले.

असेच म्हणतो

सुरेख विवेचन .. आवडले.

मेजवानी

येणार्‍या, थांबलेल्या, जाणार्‍यासाठींची ही कविता मस्त फुलली आहे.. खूपच आवडली

वाचणार्‍यासाठी मेजवानीच! :)

इतके छान रसग्रहण व कविता दिल्याबद्दल आभार

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

सुंदर

व्वा शरदजी, खूप सुंदर कविता! कवितेत एका स्त्रीच्या भावनात्मक कृती जरा ऍबस्ट्रॅक्ट(मराठी?) तरी स्पष्ट चित्र डोळ्यापुढे येईल अश्या मांडलेल्या आहेत.

आपण केलेले रसग्रहण सुद्धा छानच.

वा!

शरदराव,
सुरेख कविता आणि तितकेच सुरेख विवेचन. कविता उमगण्यासाठी कल्पना किती महत्वाची असते हे आपल्या विवेचनातून स्पष्ट होते.
(इथे क्या बात है अशी दाद द्यावीशी वाटत होती पण हल्ली तिचा इतक्या वेळा कैच्याकै उपयोग केला जातो की तिच्या अर्थामागची उस्फूर्तता कुठेतरी बोथट झाली आहे असे वाटते.)

----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"

+१

भारी कविता व रसग्रहण!

आवडल्या

दोन्ही कविता भारी.

सुरेख

रसग्रहण बहारदार आहे.

एक प्रश्न : आमच्या घरी "कलिंगड दळदार आहे" असे म्हणत असू - म्हणजे रसाळ, तरी भरगच्च (लेवाडे नाही), तुकतुकीत रंगाचे... मला कोवळ्या सूर्यासाठी हे विशेषण या अर्थाने आवडले. पण हाच सामान्य अर्थ आहे काय? (शरद यांनी "दळदार" विशेषणाचा खास उल्लेख केला आहे, म्हणून अधिक कुतुहल वाटत आहे.)

लेवाडे

हा शब्द अनेक वर्षांनी वाचला. लेवाडाचे शब्दकोशातील अर्थ-- लेचापेचा, कमजोर, ढिला; लेबडा, लेंभळा, नेभळा. --वाचक्‍नवी

दळदार

ते सांगावयाचे राहिलेच कीं. दळदार म्हणजे भरीव, गच्च. विसविशीत, फोपसे नसलेले. श्री.
धनंजय म्हणतात त्याप्रमाणे चांगल्या कलिंगडाचे विशेषण. येथे हलकी-फुलकी रांगोळी-स्वस्तिक हे तीचे निर्देशक तर दळदार हे राजबिंड्या, मर्दानी "येणार्‍याचे".
शरद

थोडक्यात उत्तम!

शरदराव, साध्यासोप्या भाषेतले रसग्रहण फार आवडले. थोडक्यात उत्तम! तुम्ही मराठीचे प्राध्यापक वाचस्पती (प्राडॉ) नक्कीच नसाल, अशी दाट शंका वाटते आहे. बाकी साध्या कवितेत आणि भावकवितेत फरक काय आहे हो? हा हायकूसारखा वेगळा फॉर्म आहे काय?

ह्या आनंददायी उपक्रमाच्या पुढच्या भागाची वाट पाहतो आहे. (अर्थात महाभारतावरील तुमचे लेखनही, मते पटो न पटो, कमी आनंददायी नव्हतेच!)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर