पुणेरी पर्याय?

स्वाइन फ्लू, वाह्तुकीच्या समस्या, वायू प्रदूषण, साठलेल्ल्या व न उचललेल्या कचर्‍यापासून होणारा धोका इत्यादीसाठी पुणेकरांनी शोधलेला पर्याय!

लेखनविषय: दुवे:

Comments

बाप रे !

वरील रस्त्यावरील रहदारी पाहता एखादा पादचारी रस्त्यावरुन हेल्मेट घालूनही रस्ता सुरक्षीतपणे पार करेल याची शाश्वती वाटत नाही.

-दिलीप बिरुटे

हेल्मेटसक्तीला वैतागलो आहे.

मुख्य मुद्दा असा आहे की ज्या वेळेस एखादा कायदा किंवा नियम शासन किंवा महानगरपालिका करतात त्यावेळी सर्व सुबुद्ध नागरिकांनी तो पाळावा अशी अपेक्षा असते.

सहमत आहे. पण, त्यातील काहीच नियमांचा कधी-कधी खूप अतिरेक होतो हो, आमच्या औरंगाबादेत हेल्मेटसक्तीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाला खूप महसूल पोलिसांनी मिळवून दिला असावा. आणि सध्या तेवढाच एकमेव उद्योग त्यांचा चालू आहे.

-दिलीप बिरुटे

सहा आसनी

सहा आसनी भरमसाठ धुर सोडणार्‍या डुक्कर रिक्षांना कधी पी.यु.सी. तपासणीसाठी पकडलेले पाहिले आहे? महसुल गोळा करण्याचे प्रकार आहेतच. पण आपण नियम पाळले तर हे असले महसुल गोळा करणे आपण थांबवू शकतो ना?
सध्या महसूल मंत्री कोण आहे? असे महसूल साधारणपणे कधी गोळा केले जातात याचा अभ्यास केल्यास रोचक निरिक्षणे मिळावीत.


सहा आसनी

सहा आसनी भरमसाठ धुर सोडणार्‍या डुक्कर रिक्षांना कधी पी.यु.सी. तपासणीसाठी पकडलेले पाहिले आहे?

कधीच नाही. पोलिसांना कट मारुन जातील. दहा-दहा रुपयात कोणत्याही स्टॉपवर सोडणार्‍या या डुक्कर रिक्षा इतक्या गच्च भरुन पोलिंसासमोरुन जातील तरी त्यांना दिसत नाही. पण टू व्हीलरवाला बिना हेल्मेटचा दिसला की आसुरी आनंद मी पोलिसांच्या चेहर्‍यावर पाहिला आहे. थांबा उद्या फोटो टाकतो त्यांच्या कार्याच्या एखाद्या झलकीचा.

>>आपण नियम पाळले तर हे असले महसुल गोळा करणे आपण थांबवू शकतो ना?
हे मान्य आहे.

अवांतर : पोलिसांना प्रत्येक दिवशी एक वसूलीचे ठराविक टार्गेट देतात म्हणे ?
(घाटपांडे साहेब पोलिसांच्या सेवेतून स्वे. निवृत्त झाले आहेत आता त्यांनी खरं सांगायला हरकत नाही )

-दिलीप बिरुटे

उघड गुपित

बिरुटे सर अशी (उघड) गुपिते फोडु नका. साधारण पणे तिसर्‍या आठवड्यात आर् ए ( रिफ्रेशमेंट अलाउन्स)[आहारा भत्ता] आला नाही कि पोलिसाची अशी चिडचिड होते. मग त्याला असा असुरी आनंद होतो. तेवढीच तोडपानी.
प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ

वैतागुन कस चालेल. नियम व्यवहार्य असतील तर ते पाळण्याची सक्ती/ आस्था असणे गैर नाही. एसटी/बस/रेल्वे यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेउ नये हा असलेला नियम शासनाने पाळावा. काय होईल? जनताच बोंब मारेल.
नियमाचे पालन करता येईल अशी सामाजिक सुरक्षितता आहे का? पुण्यात लाल दिव्याला गाडी थांबवली तर मागचा बोंब मारतो."चल चल माहितिय आला मोठा नियम पाळणारा?" पुर्वी पुण्यात सिग्नल पाळण्याची एखाद्याची इच्छा असेल तर् त्याला तसे करण्याची मुभा होती. आता वाहतुकीचे नियम पाळल्यामुळेच एखाद्याचा जीव धोक्यात येउ शकतो. नियम न पाळणार्‍यांवर कारवाई न होण्याचे प्रमाण इतके मोठे आहे कि ते नियम पाळणारा मुर्ख ठरतो. इतर् नियम पाळोत वा न पाळोत आपण आपले (शक्य तितके) नियम पाळावे हे उत्तम.
प्रकाश घाटपांडे

वा वा

बिरुटे साहेब
म्हणजे तुमच्या गावात तुम्ही चक्क कायदा पाळता?
सध्या पुण्यात नसलेला एक पुणेकर
चन्द्रशेखर

कायद्याची भीती

बिरुटे साहेब
म्हणजे तुमच्या गावात तुम्ही चक्क कायदा पाळता?

नियम पाळतोय ते पोलिसांच्या धाकाने, या पुर्वी दोनदा शंभर रुपयाचा दंड भरलाय.
अख्या महाराष्ट्रात आमच्या शहरासारखी हेल्मेट सक्ती नसेल असे माझे मत आहे.

-दिलीप बिरुटे

गर्व से कहो..

माझ्या देशबांधवांनो,
वरील चित्रफित पाहून निराश होऊ नका. झाला असाल तर ही रशियातील चित्रफित पहा. आपल्या भारतभूमधील चित्रफितीमध्ये एक शिंगल आक्शिडन पन झालेला नाय. आणि इथे पहा कसे धडाधड मोटारींना उडवत आहेत.

शेवटी तेथे पाहिजे जातीचे. :प्
गर्व से कहो...

----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32

संशोधनाचा विषय

लोकांची नावे घेऊन लिहिते म्हणून माफ करावे.

आरागॉर्न, चाणक्य, प्रकाश घाटपांडे, चर्चाप्रस्तावक प्रभाकर नानावटी, पर्स्पेक्टिव, चंद्रशेखर या चर्चेत हिरिरीने भाग घेणार्‍या सर्व व्यक्ती आजी माजी पुणेकर आहेत. तरीही काही प्रतिसादांतून बिगर पुणेकर लोकांवर केलेले शरसंधान बघून या चर्चेत किती बिगर पुणेकर अतिशहाण्या लोकांनी भाग घेऊन पुणेकरांवर टिका केली हे कळून घ्यायला आवडेल.

आक्षेप कायम

एखाद्या गटाशी विशेषरीत्या निगडित नसलेल्या दोषाकरिता त्या गटास प्रतीकात्मक मानून केलेले सरसकट दोषप्रदान हे कोणीही केलेले असले तरी निषेधार्हच आहे. असे दोषप्रदान करणारी व्यक्ती ही स्वतः त्या गटातील आहे अथवा नाही हा अत्यंत गौण मुद्दा आहे.

प्रदूषण किंवा स्वाइन फ्लू ही एखाद्या शहराची खासियत म्हणण्यासारखी समस्या नाही. अशा परिस्थितीत - आणि विशेषतः एखाद्या शहराचे नाव काढले असता चर्चेस अनिष्ट वळण लागण्याचा प्रघात असताना - फारसे काही स्पष्टीकरण न देता अशा शहराशी दूरान्वयानेही संबंध नसलेले एखादे चित्र त्या शहराच्या नावावर खपवून देऊन चर्चाप्रस्ताव ठेवणे हे - कोणीही केलेले असले तरी - संशयास्पद आहे, आणि अशा देवदत्त संधीचा फायदा अशा प्रतीकात्मक गटावर (पक्षी या ठिकाणी शहरावर) सरसकट तोंडसुख घेण्यासाठी - 'शहाणपण शिकवण्यासाठी', कुत्सित मतप्रदर्शन करण्यासाठी - करणे हे निषेधार्ह आहे, असे वाटते. हे कोणी केले याला महत्त्व नसून असे करण्यामागील perceived हेतूबद्दल आक्षेप आहे.

या मुद्द्यावरून आतापावेतो झालेल्या टीकेत निदान मला तरी कोठेही या वृत्तीवर (अशी वृत्ती कोणाकडूनही प्रदर्शित झाली असली तरी) टीका वगळल्यास दुसरे काहीही - आणि विशेषतः बिगरपुणेकरांवर शरसंधान वगैरे - दिसलेले नाही. पुणेकरांच्या (किंवा कोणत्याही विशिष्ट गटाच्या) नावाने सदान्‌कदा खडे फोडून त्यांना शहाणपण शिकवू पाहणार्‍यांची 'आम्ही जास्त शहाणे 'वृत्ती ही कोणाकडूनही (बिगरपुणेकरांकडून अथवा खुद्द पुणेकरांकडून / त्या विशिष्ट गटाबाहेरील व्यक्तींकडून अथवा त्या विशिष्ट गटातील व्यक्तींकडून) दर्शवली गेली तरी तिचा निषेध आहे. (निषेध वृत्तीचा आहे, व्यक्तीचा नाही. गंभीर हेतूने, समस्यानिवारणाच्या किंवा समस्याविवेचनाच्या कारणाकरिता केलेल्या कोणत्याही रास्त चर्चेस - अथवा टीकेससुद्धा - आक्षेप नाही.)

या चर्चाप्रस्तावावरील माझा आक्षेप कायम आहे.


"Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely." -Lord Acton's dictum.

संधी देवाने दिली आहे?

देवदत्त संधीचा फायदा
ही संधी देवाने दिली आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? तुम्हाला असे म्हणायचे असल्यास माझ्या तुमच्या ह्या वक्तव्यावर आणि देवावर आक्षेप आहे. आणि तो तुम्ही तुमचे वक्तव्य मागे घेईपर्यंत कायम राहील.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आक्षेप मान्य / दिलगिरी

माझ्या विधानातील 'देवदत्त' हा शब्द मी मागे घेत आहे. माझ्या विधानातील या शब्दाच्या वापरातून देव, देवभक्त आणि नास्तिक या तिघांचीही मने अनवधानाने दुखावली गेली, त्याबद्दल या तिन्ही पक्षांकडून मला कदापि क्षमा होणे नाही (आणि होऊही नये) याची मला सखेद जाणीव होत आहे. (ती जाणीव करून दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.) पण तरीही या तिन्ही पक्षांची मी (शक्य झाल्यास) क्षमा मागू इच्छितो आणि या शब्दाच्या वापराबद्दल दिलगिरी व्यक्त करू इच्छितो.

स्वीकारली

जितक्या अनवधानाने 'देवदत्त' वापरला गेला तितक्याच खुल्यादिलाने दिलगिरीही व्यक्त केली. देवांचे, देवभक्तांचे माहीत नाही. पण मी तरी तुमची ही दिलगिरी मी स्वीकारत आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लेट गो

स्वाईन फ्लू ही एखाद्या शहराची समस्या नाही असे कोणत्या जोरावर म्हटले गेले ते विशेष कळले नाही. अर्थातच, स्वाईन फ्लूवर चर्चेतील चित्र हा पर्याय किंवा विनोद आहे असे वाटत नाही. परंतु, दोन दिवस ही चर्चा येथेच राहिल्यावर अचानक उठून धागा संपादित करण्याची मागणी करणे म्हणजे "लेट गो" वृत्ती नसणे असा होऊ शकतो. मागे एकदा वाहनांना दरवाजे नसण्याच्या चर्चेत एका सदस्यांनी पुण्यातील लोकांविषयी लिहिल्यावर अनेकजणांनी त्याला प्रत्युत्तर केले होते. म्हणजेच चर्चा पुण्यावर (किंवा विशिष्ट गट म्हणू.. हा शब्द मला बर्‍यापैकी आवडत नाही तरीही) नसेल पण यदाकदाचित, पुण्यावर गेली तर संपादित करायची असा होतो का? कारण पुण्याविषयी कोणी काही बोलले तर ते दूषित ग्रह ठेवून असते, त्यात विनोद किंवा उपहास नसतो असे मानावे का काय? पुण्यावर ताशेरे ओढले जातात आणि मुंबई, नागपूरला गोंजारले जाते असेही नाही. ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे आणि दोन्ही बाजूंनी सारखाच वाद घातला जातो. त्यात पुण्याला दोन पैशे अधिक आणि मुंबईला दोन पैशे उणे असे वाटत नाही.

जर बिगरपुणेकरांवर शरसंधान नसेल आणि चर्चेत भाग घेणार्‍या सर्व व्यक्ती पुण्यातीलच असतील तर अशाप्रकारची चर्चा करण्यास त्यांना काय भाग पाडते आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे वाटते. त्यांच्या समस्या त्यांना उपरोधिक लिहिण्यास भाग तर पाडत नाही ना हे देखील जाणणे महत्त्वाचे आहे कारण एखादा बाहेरचा दुरून तुम्हाला हसू शकतो पण ज्याच्यावर भोगण्याची पाळी येते तो असे म्हणत असेल तर तो अतिशहाणपणा असेलच असे नाही. पुणेकरांच्या नावाने खडे फोडून अतिशहाणपणा वगैरे म्हणताना (आणि मूळ प्रतिसादात फक्त पुण्याचाच उल्लेख आहे. इतर कोणत्याही तत्सम शहराचा आणि तथाकथित गटाचा नाही) शरसंधान केलेले नाही असे मला व्यक्तिशः वाटत नाही. अनेकदा, अशाप्रकारच्या चर्चा सुरु झाल्यावर दोन्ही गट हिरिरीने भाग घेतात. बाष्कळ चर्चा आहे यावर काय वेळ घालवायचा अशी बर्‍याच लोकांची वृत्ती दिसत नाही. अशावेळी वादी आणि प्रतिवादी दोन्ही गट अतिशहाणपणाच दाखवत असतात (किंबहुना, नेटावर आपले मत मांडणारी प्रत्येक व्यक्ती अतिशहाणपणाच करत असते असे मला वाटते.) फक्त मी शहाणा आणि माझ्या समोरचा अतिशहाणा एवढाच फरक असतो. चर्चा नंतर वहावत जातात.

या चर्चेत अनेकांनी मते मांडली. पैकी बरेचसे प्रतिसाद आक्षेपार्ह नाहीत, गांभीर्याने लिहिलेले आहेत. दोन दिवस चर्चा चालवली गेली. ज्यांनी धागा संपादित करावे अशी मागणी केली त्यांचेही प्रतिसाद दोन दिवस चर्चेत आहेत. सर्वांनीच विषय बंद करायचे मनावर घेतले, चित्र "कचरा गाडीवर बसलेल्या कावळ्यापेक्षाही" बाष्कळ आहे असे म्हणून सोडून दिले तर सर्वांचाच वेळ वाचेल असे वाटते.

माझा वेळ उगीच फुकट गेला अशी सध्या भावना मनात येत आहे. असो.

नेमके

जर बिगरपुणेकरांवर शरसंधान नसेल आणि चर्चेत भाग घेणार्‍या सर्व व्यक्ती पुण्यातीलच असतील तर अशाप्रकारची चर्चा करण्यास त्यांना काय भाग पाडते आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे वाटते. त्यांच्या समस्या त्यांना उपरोधिक लिहिण्यास भाग तर पाडत नाही ना हे देखील जाणणे महत्त्वाचे आहे कारण एखादा बाहेरचा दुरून तुम्हाला हसू शकतो पण ज्याच्यावर भोगण्याची पाळी येते तो असे म्हणत असेल तर तो अतिशहाणपणा असेलच असे नाही.

मुद्दा कळाला पण यासाठी नेमके काय करायचे ते लक्षात आले नाही. समस्या असतील तर त्यांना सोडवण्याचा हा मार्ग नक्कीच नाही.
काही कारणास्तव जुने स्कोअर सेटल करणे यासाठीही (मराठी सायटी) मसावर असे मार्ग वापरले जातात असा अनुभव आहे.
----
"कॅमरे में रील चले या न चले, स्टीव्हन कपूर ऐसा डायरेक्टर है जिसके दिमाग में हमेशा रील चलती रहती है."

हास्यास्पद चर्चा

मुखवट्यांच्या नावाखाली वाहतूक, स्वाईन फ्लू यांच्या आडून पुणेकरांवर तोंडसुख घेण्याची अनेकांची युक्ती आवडली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गांभीर्य

मुळात चर्चा प्रस्तावकाने हा प्रस्ताव गांभीर्याने मांडलेला नाही. प्रस्तावकाचे अगोदरचे लेखन हे गंभीर असल्याने त्याकडे इतरांनी जरा गांभिर्याने पाहिले आहे/असावे. अहो प्रस्तावकाने उपक्रमावर चढवलेले हे पहिलेच चित्र आहे. नव्याची नवलाई काही असते की नाही? चित्रातील मास्क जरा गमतीशीर दिसतात एवढाच त्यातला भाग आहे.
दुसरी गोष्ट अशी कि चर्चा अगदी काटेकोर,कडक इस्त्रीतील झाली पाहिजे असे थोडे आहे. कधी कधी मुळ मुद्यापेक्षा आनुषंगिक मुद्यांचीच चर्चा ही उपयुक्त / मनोरंजक असते. आता याला कुणी भरकटणे म्हणणार असेल तर अशा 'बहकण्यात' देखील मौज असते.
मी मोर्चा नेला नाही
मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा
कधी नोंदवलेला नाही
अस व्हायला नको ना
ऐका आयुष्यावर बोलु काही संदीप खरे यांची कविता

प्रकाश घाटपांडे

नंतर

प्रस्ताव गंभीरपणे नसता तर विरंगुळा वगैरे सदरात टाकायची हरकत नव्हती. आणि नंतर हेल्मेटकडे वळवून येनकेनप्रकारे पुण्याला झोडपणे हा उद्देश स्पष्ट दिसतो आहे.

----
"कॅमरे में रील चले या न चले, स्टीव्हन कपूर ऐसा डायरेक्टर है जिसके दिमाग में हमेशा रील चलती रहती है."

लेले आणि नेने

पुण्यात राहणारे लेले आणि नेने या आडनावाची माणसे, नावाचा शिक्का करायला गेली तर फक्त ले किंवा ने या अक्षराचाच करतात, असा एक सुविख्यात किस्सा आहे. तोच शिक्का दोनदा मारून संपूर्ण आडनाव उमटवता येत असेल, तर मोठ्या शिक्क्याचा खर्च का करायचा? हल्लीचे लेले आणि नेने नवरा-बायकोंमध्ये एकच मास्क घेतात. ज्याने किंवा जिने मास्क घातला आहे त्याला बाधा झाली असेल तर त्या मास्कमुळे दुसरा सुरक्षित राहतो, आणि मास्क न घातलेल्याला बाधा झाला असेल तर मास्कवाला मास्कमुळे सुरक्षित, अशी विचारसरणी. आहे की नाही पुणेरी काटकसर?--वाचक्‍नवी

आता पुरे

प्रत्येकाला वेगळ्या शब्दांत सांगायला हवे काय? :-(

पुणेरी नव्हे चित्पावन!

"..... लेले आणि नेने इतके चिक्कू की ते आपल्या आडनावाचा रबर stamp फक्त 'ले' किंवा 'ने' चाच करून घेतात. ....."

चिं . वि. जोशी (चित्पावन!)

रोचक उद्धृत

हे शब्दशः उद्धृत (verbatim quote) आहे काय? असल्यास चिं.विं.च्या नेमक्या कोणत्या पुस्तकातील कोणत्या प्रकरणातील आहे, आणि त्या प्रकरणातील त्याचा मागचापुढचा संदर्भ याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल काय?

हे शब्दशः उद्धृत नसल्यास नेमके शब्दशः उद्धृत शोधून ते आणि त्यामागील संदर्भ देऊ शकाल काय?


"If you can't stand the heat, get out of the kitchen." - Harry S. Truman?

शब्दशः उद्धृत नसावे

हे वाक्य (फुसका विनोद!) सुधीर गाडगीळ यांच्या मोजून मापून कोकणस्थ, लोकसत्ता संस्कृती विशेष (४ नोव्हेंबर १९९९ - पा. ४-५), या लेखातून घेतलेला आहे.
चू.भू.दे.घे.

फुसका विनोद

हा विनोद फुसका आहे. स्वस्तात किंवा स्वस्त टाळ्या घेण्यासाठी, हशा पाडण्यासाठी पुण्यासारखा पर्याय नाही!

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

यांत एवढे..

यांत एवढे रागवायचे काय कारण आहे? सरदारजी जसे सरदारजींवरचे विनोद ऐकून-वाचून मनसोक्त हसतात, तसे इतरांनी का करू नये?--वाचक्‍नवी

वाचक्‍नवींशी सहमत

यांत एवढे रागवायचे काय कारण आहे? सरदारजी जसे सरदारजींवरचे विनोद ऐकून-वाचून मनसोक्त हसतात, तसे इतरांनी का करू नये?
हेच म्हणतो !

माझं मत

सरदारजी जसे सरदारजींवरचे विनोद ऐकून-वाचून मनसोक्त हसतात, तसे इतरांनी का करू नये?

कारण ते "इतर" सरदारजी नाहीत.

महाजालावर जाडे, तिरळे, काटकुळे, दात पुढे आलेले, टकले आणि अश्या नानाविध प्रकारांची माणसे - ज्यांची नावे घेण्याचीही आम्हाला दडपशाहीमुळे भीती वाटू लागली आहे - त्यांच्यावर विनोद करू नयेत कारण वरचेच. ते जसे असतील तसे पण ते, सरदार नाहीत.

-राजीव.

"लेटिंग गो": एक तत्त्वचिंतन / अतिशहाणपणाच्या बचावात...

"लेट गो"बद्दल देण्यात आलेला सल्ला अतिशय स्तुत्य आणि ग्राह्य आहे. त्या अनुषंगाने प्रस्तुत चर्चाविषय माझ्याही बाजूने येथेच संपवू इच्छितो. मात्र या सल्ल्याबरोबरच इतरही काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, त्यांचा परामर्श घेणे येथे आवश्यक आहे असे वाटते.

परंतु, दोन दिवस ही चर्चा येथेच राहिल्यावर अचानक उठून धागा संपादित करण्याची मागणी करणे म्हणजे "लेट गो" वृत्ती नसणे असा होऊ शकतो.

सर्वप्रथम, अशी कोणतीही "मागणी" केलेली नाही. हा धागा संपादित करण्याच्या लायकीचा आहे असे मत (कदाचित अप्रत्यक्षरीत्या) जरूर सूचित केलेले आहे, आणि तो त्याप्रमाणे (मागणीविना) संपादित झालेला नाही याबद्दल खेद आणि आश्चर्य जरूर व्यक्त केलेले आहे. मात्र, त्याप्रमाणे काही कृती करावयाची किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे संपादकांच्या अधीन आहे, याची पूर्ण जाणीव आहे. किंबहुना, "अर्थात, संपादनमंडळाचा याविषयी जो काही निर्णय होईल तो मला आगाऊ मान्य आहे. याविषयी अधिक चर्चा करण्याची इच्छा नाही." या विधानांतून हे पुरेसे स्पष्ट आहे (आणि ज्याबद्दल सल्ला देण्यात आला आहे ती "लेट गो" वृत्ती तेव्हाच पुरेशी स्पष्टपणे प्रदर्शित केलेली आहे) असे वाटते. याउपरसुद्धा आलेल्या "लेट गो" वृत्ती न दर्शवण्याबद्दलच्या विधानाने आत्यंतिक खेद होतो.

प्रस्तुत मत-खेद-आश्चर्य-प्रदर्शनास आज काही दिवस उलटून गेल्यानंतर आजपर्यंत या धाग्याचे कोणतेही संपादन झालेले नाही. असे संपादन न करण्याचा निर्णय हा संपादनमंडळाच्या पूर्णपणे अधिकारात आहे याची पूर्ण जाणीव आणि आदर ठेवूनच त्याबद्दल (अगोदर केलेल्या विधानांबद्दल जेथे गैरसमज होत आहेत असे वाटले तेथे स्वतःच्याच तत्त्वास डावलून दिलेल्या माफक स्पष्टीकरणात्मक विधानांव्यतिरिक्त) कोणतेही अधिकचे विधान केलेले नाही अथवा ही तथाकथित "मागणी" त्यानंतर उचलून धरलेली नाही, तसेच त्यानंतरही आलेल्या उलट्यासुलट्या प्रतिसादांबद्दल (जो माझ्या मते वेगळा विषय होऊ शकतो) अशी कोणतीही "मागणी" केलेली नाही, हे चाणाक्ष निरीक्षकांच्या सहज लक्षात यावे.

मात्र, माझी (पक्षी: कोणत्याही सदस्याची) कोणतीही अपेक्षा, मांडलेले मत अथवा मागणीसुद्धा ग्राह्य मानून त्यावर अंमलबजावणी करण्यास बांधील नसण्याचा संपादनमंडळाचा अधिकार मान्य करून आणि त्याबद्दल यथायोग्य आदर ठेवूनसुद्धा, मुळात माझी (पक्षी: सदस्याची) अशी अपेक्षा, मत अथवा मागणी मी (पक्षी: सदस्याने) मांडणे यात काही गैर असावे, किंवा ते माझ्या (पक्षी: सदस्याच्या) अधिकारकक्षेबाहेर असावे, असे निदान मला तरी वाटत नाही. किमानपक्षी, तसे ते असल्यास (पक्षी: गैर अथवा सदस्याच्या अधिकारकक्षेबाहेर) तसे ते असू नये असे निदान मला तरी वाटते.

"लेट गो" याचा अर्थ एखाद्या खटकणार्‍या गोष्टीबद्दल आक्षेप न नोंदवता गप्प बसणे असा नसून, एकदा आक्षेप नोंदवल्यानंतर एका मर्यादेपलीकडे अधिक न ताणता सोडून देणे असा व्हावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

दुसरे म्हणजे, चर्चा दोन दिवस राहिल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्याबद्दलचा मुद्दा अप्रस्तुत आहे असे वाटते. याला अनेक कारणे देता येतील, परंतु चटकन लक्षात येणारी काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे:

  • सर्वप्रथम, एखाद्या न पटलेल्या गोष्टीबद्दल आक्षेपाचे मत व्यक्त करण्यास असे कोणतेही statute of limitations अस्तित्वात आहे किंवा असावे (येथे 'असावे' या शब्दाचा अर्थ 'असू शकेल' आणि 'असले पाहिजे' अशा दोन्ही प्रकारे घेता यावा), असे वाटत नाही. अशा एखाद्या आक्षेपार्ह गोष्टीविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी एखादे statute of limitations जरूर असू शकते, परंतु अशा कार्यवाहीच्या मागणीअभावी केवळ आक्षेप अथवा निषेध व्यक्त करण्यासाठी, किंवा अशी कार्यवाही होणे इष्ट होते असे अथवा अशी कार्यवाही न झाल्याबद्दल खेद अथवा आश्चर्य व्यक्त करणारे निव्वळ मत व्यक्त करण्यासाठी, असे कोणतेही statute of limitations असण्याचे काही कारण दिसत नाही अथवा प्रघातात बसत असावे असे वाटत नाही.
  • आक्षेपाचे मत मांडण्यास लागणार्‍या वेळाची अनेक वैध कारणे असू शकतात. जसे: Knee-jerk reaction (याला मराठीत 'प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया' म्हणावे का?) न देता विचारपूर्वक, शक्य तितकी संयत, मोजूनमापून केलेली आणि सुनियोजित शब्दबद्ध प्रतिक्रिया (considered and measured reaction) द्यावीशी वाटणे. (हे नेहमीच शक्य होते असे नाही.) अशी प्रतिक्रिया योजताना त्या प्रतिक्रियेस न्याय देण्याकरिता त्यात पुरेसे श्रम, जीव, विचार आणि वेळ ओतावासा वाटणे. पोटापाण्याच्या आणि इतर कामांकरिता आणि व्यक्तिगत आयुष्याकरिता खर्चाव्या लागणार्‍या वेळामुळे असा पुरेसा सलग वेळ मिळण्यामागील अडचण. (कामातील व्यग्रतेची अडचण अनेकांना असू शकते. किंबहुना प्रस्तुत प्रतिसादाकरिता लागलेल्या दिरंगाईकरिताही हेच कारण देता येईल.) प्रतिसादातून आपल्या भावना मांडण्यापूर्वी त्या नेमक्या काय आहेत हे सर्वप्रथम स्वतःच व्यवस्थित आणि नि:संदिग्धपणे समजून घेण्यासाठी द्यावा लागणारा वेळ. आपण जे मांडतो ते आपल्या स्वतःलाच पटले आहे आणि त्यात आपल्या स्वतःलाच काही चूक दिसत नाही हे स्वतःच पडताळण्यासाठी द्यावा लागणारा वेळ. एखाद्या गोष्टीबद्दल काहीतरी खटकणे किंवा त्याचा त्रास होणे, नेमका कशाचा त्रास होत आहे ते कळणे आणि ते कळल्यानंतर तो व्यक्त केलाच पाहिजे इतक्या पराकोटीचा आहे याची जाणीव होणे या सर्व प्रक्रियेकरिता लागणारा वेळ. वगैरे वगैरे.

थोडक्यात, आक्षेपाचे मत मांडण्यासाठी वेळ लागण्यात अथवा जेवढा लागेल तेवढा वेळ घेण्यात काही गैर आहे असे वाटत नाही.

मागे एकदा वाहनांना दरवाजे नसण्याच्या चर्चेत एका सदस्यांनी पुण्यातील लोकांविषयी लिहिल्यावर अनेकजणांनी त्याला प्रत्युत्तर केले होते. म्हणजेच चर्चा पुण्यावर (किंवा विशिष्ट गट म्हणू.. हा शब्द मला बर्‍यापैकी आवडत नाही तरीही) नसेल पण यदाकदाचित, पुण्यावर गेली तर संपादित करायची असा होतो का?

कोणतीही चर्चा संपादित करावी की नाही (किंवा संपादित केल्यास अथवा न केल्यास ती कोणत्या निकषांवर संपादित करावी अथवा करू नये) याबद्दलचा निर्णय अंतिमतः संपादनमंडळाचा आहे. ती चर्चा संपादित करण्याच्या लायकीची आहे असे मत असण्याचा आणि ते व्यक्त करण्याचा, किंवा ती तशी संपादित झाली नाही म्हणून खेद किंवा आश्चर्य व्यक्त करण्याचा, अधिकार सदस्यांस असावा, असे वाटते. (मग असे मत अथवा असा खेद किंवा आश्चर्य रास्त असो वा अस्थानी असो.) असे मत ग्राह्य आहे किंवा नाही हे ठरवून त्यास अनुसरून कृती करणे अथवा न करणे हे अर्थातच संपादकांच्या अधिकारकक्षेत आहे, आणि म्हणूनच अशी कोणतीही कृती करण्यास संपादनमंडळ बांधील नाही, हे ओघानेच आले, आणि या बाबीचा पूर्ण आदर आहे. मात्र संपादनमंडळास कदाचित ग्राह्य होऊ शकणार नाही म्हणून मुळात अशी अपेक्षा अथवा मागणी सदस्याने करू नये अथवा असे तीव्र मत मांडू नये हे सयुक्तिक वाटत नाही.

(अवांतर: या निमित्ताने, पूर्व जर्मनीतील जून १९५३च्या उठावाबद्दलची ब्रेश्टची (हा तोच ब्रेश्ट, ज्याच्या Die Dreigroschenoperवर पु.लं.नी 'तीन पैशांचा तमाशा' बेतले होते.) एक रोचक उक्ती आठवते:

After the uprising of the 17th of June
The Secretary of the Writers Union
Had leaflets distributed in the Stalinallee
Stating that the people
Had thrown away the confidence of the government
And could win it back only
By redoubled efforts. Would it not be easier
In that case for the government
To dissolve the people
And elect another?

असो. संपादनमंडळाने इतकी टोकाची भूमिका घेतलेली आहे असे म्हणण्याचा माझा मुळीच उद्देश नाही, आणि असे म्हटल्यास ते तथ्यास धरूनही होणार नाही. परंतु माझ्या म्हणण्याचा रोख यातून लक्षात यावा, एवढीच अपेक्षा आहे. उभयपक्षी अधिकारकक्षा आणि तज्जन्य अपेक्षा या सर्वांसाठी सुस्पष्ट असाव्यात अथवा व्हाव्यात, एवढेच म्हणणे आहे. या अधिकारकक्षांची आणि तज्जन्य अपेक्षांची उजळणी करावयाची झाल्यास, आपली मते आणि अपेक्षा मांडण्याचा अथवा स्पष्ट करण्याचा अधिकार सदस्यांस असावा, ती योग्य आहेत अथवा नाहीत ते ठरवून त्यांवर कार्यवाही करावी की नाही हे ठरवणे अर्थातच संपादनमंडळाच्या अधिकारक्षेत्रात असावे आणि आहेच, त्याबद्दल आदर असावाच, परंतु त्यामुळे मुळात आपली मते किंवा अपेक्षा मांडण्याच्या सदस्यांच्या अधिकारास प्रत्यवाय येऊ नये, एवढीच माफक अपेक्षा आहे.)

याच मुद्द्यावरून आणखी एक गोष्ट मांडावीशी वाटते. जनतेच्या कोणत्याही बाबतीत मत किंवा अपेक्षा असण्याचा आणि किमानपक्षी ते व्यक्त करावेसे वाटण्याच्या गरजेचा आदर करणार्‍या कोणत्याही समाजव्यवस्थेत सहसा "वाचकांच्या पत्रव्यवहारा"ची एक परंपरा असते. रूढीप्रमाणे अशी "वाचकांची पत्रे" ही संपादकास उद्देशून लिहिली जावीत असा संकेत आहे. या "वाचकांच्या पत्रव्यवहारा"त व्यक्त केलेली मते अथवा अपेक्षा या नेहमीच रास्त असतात असे नाही. तसेच रास्त असल्याससुद्धा त्यातील बाबी या नेहमीच संपादकांच्या कार्यकक्षेत असतातच, असेही नाही. अनेकदा त्यात मध्यपूर्वेतील परिस्थिती किंवा भारताचे पडखाऊ परराष्ट्रीय धोरण यांवरील टीका किंवा कोठल्यातरी गल्लीतील फुटलेल्या पाण्याच्या नळामुळे नागरिकांना होणार्‍या त्रासाच्या समस्येकडे त्वरित लक्ष दिले जाण्याबद्दलची अपेक्षा अंतर्भूत असते. आणि मध्यपूर्वेतील परिस्थितीबद्दल अथवा भारताच्या पडखाऊ परराष्ट्रीय धोरणाबद्दल संपादकास वैयक्तिकरीत्या जबाबदार धरणे अथवा फुटलेल्या नळाच्या समस्येकडे त्वरित लक्ष दिले जाण्याची अपेक्षा वैयक्तिकरीत्या संपादकाकडून करणे हे कोणत्याही निकषाने तर्कसुसंगत नसले, तरी अशी पत्रे ही प्रसिद्धीकरिता संपादकासच उद्देशून लिहिली जावीत, ही सर्वमान्य परंपरागत प्रथा आहे. किंबहुना अशा पत्रांचे नाममात्र उत्तरदायित्व हे संपादकपदाबरोबर आपोआपच येते, असे म्हणता येईल.

(किंबहुना, नेटावर आपले मत मांडणारी प्रत्येक व्यक्ती अतिशहाणपणाच करत असते असे मला वाटते.)

या चर्चेच्या निमित्ताने किमानपक्षी हे तत्त्व सर्वपक्षी मान्य होऊन निर्विवाद प्रस्थापित व्हावे अशी आशा आहे. किंबहुना, तसे ते सर्वपक्षी मान्य नसणे हेच या आक्षेपांमागील मूळ कारण असून, असे तत्त्व निर्विवाद प्रस्थापित झाल्यास सर्व आक्षेप समूळ नष्ट व्हावेत याची खात्री आहे.

फक्त मी शहाणा आणि माझ्या समोरचा अतिशहाणा एवढाच फरक असतो.

व्यक्तिगत पातळीवर या विधानाबद्दल मी दोन कारणांसाठी तीव्र निषेध नोंदवू इच्छितो. सर्वप्रथम, 'मी शहाणा' असा दावा मी कोठेही केलेला नाही. दुसरे म्हणजे, 'मी अतिशहाणा (आहे)' असा दावा करण्याची शक्यता (आणि पात्रता) असताना 'मी (केवळ) शहाणा (आहे)' असा दावा करून मी स्वतःकडे कमीपणा घेऊ शकतो हा आरोप माझ्याकरिता अत्यंत अपमानास्पद आणि क्लेशदायक आहे. किंबहुना, 'मी अतिशहाणा आणि माझ्या समोरचा दीडशहाणा' या तत्त्वास अनुसरूनच आजवर वागत आलेलो असल्याने हा मी माझ्या कारकीर्दीचा अवमान आणि या कारणास्तव माझ्या इभ्रतीस हानिकारक समजतो.

मात्र, 'मी (पक्षी: कोणताही सदस्य) अतिशहाणा (आहे)' हे मी (पक्षी: संबंधित सदस्याने) मान्य करूनसुद्धा, इतरांचा अतिशहाणपणा चालवून न घेण्यास किंवा इतरांच्या अतिशहाणपणास आक्षेप घेण्यास त्यामुळे मला (पक्षी: संबंधित सदस्याला) प्रत्यवाय येऊ नये. किंबहुना (शूराने गायलेल्या शूराच्या पोवाड्याप्रमाणे) अनेकदा एक अतिशहाणाच दुसर्‍या अतिशहाण्याच्या अतिशहाणपणाचे निदान (स्वानुभवसिद्धतया) करू शकतो, आणि अतिशहाणपणाकरिता (Similia similibus curantur या तत्त्वास अनुसरून) अनेकदा होमियोपथीच्या उपचाराने गुण येतो, असे निदर्शनास येते.

तसेही, 'मी (पक्षी: कोणताही सदस्य) अतिशहाणा आहे', या बाबीच्या आधारावर - by virtue of अशा अर्थी - 'अतिशहाणपणा करणे हे योग्य आहे' हे आपोआप प्रस्थापित होत नाही. त्यामुळे, १. 'मी अतिशहाणा आहे' हे इतरांच्या अतिशहाणपणाचे समर्थन अथवा बचाव होऊ शकत नाही, आणि २. इतरांच्या आक्षेपार्ह वाटलेल्या अतिशहाणपणाबद्दल आक्षेप घेण्याचा माझा (पक्षी: कोणत्याही सदस्याचा) हक्क अबाधित राहतो.

(उलटपक्षी, याच न्यायास अनुसरून, माझ्या अतिशहाणपणास अशा प्रकारे आक्षेप घेण्याचा अधिकारही इतर अतिशहाण्यांस आपोआपच राहतो - Let us be fair. अर्थात, असा आक्षेप घेणार्‍या इतर अतिशहाण्यांस त्यांच्याही अतिशहाणपणाची प्रेमळपणे आठवण करून देण्याचा मार्ग मला नेहमीच उपलब्ध राहतो, परंतु तो मार्ग मी माझ्या अतिशहाणपणाचे समर्थन अथवा बचाव म्हणून वापरू शकत नाही. किंबहुना हा मार्ग वापरल्याने माझ्या अतिशहाणपणाचे समर्थन होऊ शकते असा माझा दावाही नाही, आणि अशा प्रकारे माझ्या अतिशहाणपणाचे समर्थन किंवा बचाव करण्याची इच्छा किंवा गरज मला भासत नाही.)

या चर्चेत अनेकांनी मते मांडली. पैकी बरेचसे प्रतिसाद आक्षेपार्ह नाहीत, गांभीर्याने लिहिलेले आहेत. दोन दिवस चर्चा चालवली गेली. ज्यांनी धागा संपादित करावे अशी मागणी केली त्यांचेही प्रतिसाद दोन दिवस चर्चेत आहेत.

एखाद्या चर्चेतील सहभाग, आणि विशेषतः त्यातील एखाद्या प्रतिसादातून निघालेल्या उपमुद्द्यास उत्तरात्मक (आणि बहुधा खंडनात्मक किंवा अवांतर) उपप्रतिसाद, याचा अर्थ मुळातील चर्चाप्रस्तावास अनुमोदन अथवा अनुमती असा होऊ नये असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

किंबहुना, एखाद्या चर्चेस विरोध करण्यासाठी अथवा त्या चर्चेत उपस्थित होणार्‍या मुद्द्यांचे अथवा उपमुद्द्यांचे खंडन करण्यासाठी (किंवा कोणत्याही कारणाविना, परंतु विशेषतः पूर्वोल्लेखित कारणांसाठी) त्या चर्चेत सहभागी होण्याने मुळात त्या चर्चेवर अथवा चर्चेच्या मसुद्यावर आक्षेप घेण्याच्या अथवा त्याबद्दल निषेध नोंदवण्याच्या अधिकारास प्रत्यवाय येऊ नये, असेही वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

सर्वांनीच विषय बंद करायचे मनावर घेतले, चित्र "कचरा गाडीवर बसलेल्या कावळ्यापेक्षाही" बाष्कळ आहे असे म्हणून सोडून दिले...

(चर्चाविषयाच्या संदर्भाविना) प्रस्तुत चित्र "कचरागाडीवर बसलेल्या कावळ्या"च्या चित्राहूनही बाष्कळ (किंवा फालतू) आहे, याबद्दल दुमत नाही. किंबहुना हेही दर्शवून द्यावयाचे होते. Quod Erat Demonstrandum!

...तर सर्वांचाच वेळ वाचेल असे वाटते.

सर्वांचा वेळ वाचण्याबाबतची तळमळ अर्थातच स्तुत्य आहे, परंतु आपापला वेळ कसा कारणी लावावा अथवा लावावा किंवा लावू नये याबद्दल वैयक्तिक मतभिन्नता अथवा व्यक्ती तितकी मते असण्याची शक्यता नजरेसमोर येते. (चूभूद्याघ्या.)

बाकी, "लेट गो"च्या स्पिरिटला अनुसरून चर्चाविषय न वाढवण्याच्या सद्हेतूने मूळ चर्चाविषयाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या इतर मुद्द्यांचा प्रतिवाद (शक्य असूनसुद्धा आणि माझी बाजू समर्थरीत्या मांडली न जाण्याचा किंवा समजली न जाण्याचा धोका पत्करूनही) करू इच्छीत नाही.


"If you can't stand the heat, get out of the kitchen." - Harry S. Truman?

अरे देवा!

या प्रतिसादात कोणाचेही (किंवा माझेच) निषेध, अभिनंदन, हॅप्पी बर्थ डे किंवा इतर काही केलेले असेल तर मला ते बहुधा मान्य आहे कारण इतका मोठा प्रतिसाद वाचण्याची माझी कुवत, क्षमता, शक्ती वगैरे नाही. मी प्रतिसाद वाचला नाही आणि वाचण्याची शक्यताही नाही. तेव्हा, चालू दे.

तरीही जाता जाता दोन वाक्ये नजरेस पडली.

'मी अतिशहाणा आणि माझ्या समोरचा दीडशहाणा' या तत्त्वास अनुसरूनच आजवर वागत आलेलो असल्याने हा मी माझ्या कारकीर्दीचा अवमान आणि या कारणास्तव माझ्या इभ्रतीस हानिकारक समजतो.

माफ करा. घोर चूक झाली. आपल्या इभ्रतीला हानी पोहोचवण्याचा माझा कोणताही इरादा नाही.

शूराने गायलेल्या शूराच्या पोवाड्याप्रमाणे

सैतानाने गायलेला सैतानाचा पोवाडा माहित होता. सैतान शूर झाले की शूर सैतान झाले याबद्दल विशेष कल्पना नाही. असो.

प्रतिसाद आवडला / आभार / आक्षेप

या प्रतिसादात कोणाचेही (किंवा माझेच) निषेध, अभिनंदन, हॅप्पी बर्थ डे किंवा इतर काही केलेले असेल तर मला ते बहुधा मान्य आहे कारण इतका मोठा प्रतिसाद वाचण्याची माझी कुवत, क्षमता, शक्ती वगैरे नाही. मी प्रतिसाद वाचला नाही आणि वाचण्याची शक्यताही नाही. तेव्हा, चालू दे.

अत्यंत प्रामाणिक प्रतिसाद! कलियुगात इतका प्रामाणिक प्रतिसाद अतिशय दुर्मिळ. मनापासून आवडला.

(किंबहुना असे काही होईल याची थोडीबहुत कल्पना होतीच. आणि नेमक्या याच कारणास्तव सहसा कधीही कोणालाही कशाचेही सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे कष्ट घेत नाही - तसेही कोणी वाचत नाही, वाचले तर कोणाला समजत नाही, आणि एकंदरीत कोणालाही काहीही फरक पडत नाही.)

असो. प्रामाणिक प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

तरीही जाता जाता दोन वाक्ये नजरेस पडली.

महत्त्वाचा - आणि कळण्यासारखा - भाग तेवढाच होता. (तेवढा भाग कळला असावा असे प्रतिसादावरून वाटते. चूभूद्याघ्या.) बाकीचे वाचले नाही किंवा कळले नाही तरी काहीही फरक पडत नाही. (निदान मला तरी.)

माफ करा. घोर चूक झाली. आपल्या इभ्रतीला हानी पोहोचवण्याचा माझा कोणताही इरादा नाही.

आभारी आहे. That is all that matters - if it matters.

सैतानाने गायलेला सैतानाचा पोवाडा माहित होता.

चुकीच्या दुरुस्तीबद्दल मनापासून आभारी आहे.

सैतान शूर झाले की शूर सैतान झाले याबद्दल विशेष कल्पना नाही.

या विधानातून "सैतान" आणि "शूर" या दोन mutually exclusive categories आहेत - अर्थात सैतान हे शूर असू शकत नाहीत आणि शूर हे सैतान असू शकत नाहीत - असे सूचित होत असल्याकारणाने, एक (स्वयंघोषित) शूर सैतान या नात्याने या वाक्यास माझा तीव्र आक्षेप आहे.

असो.


"If you can't stand the heat, get out of the kitchen." - Harry S. Truman?

अवांतरः आक्षेप, निषेध/ स्वतंत्र चर्चाविषय वगैरे

अत्यंत प्रामाणिक प्रतिसाद! कलियुगात इतका प्रामाणिक प्रतिसाद अतिशय दुर्मिळ. मनापासून आवडला.

धन्यवाद!

खालील प्रतिसाद अवांतर असून तो स्वतंत्र चर्चाविषय म्हणून चांगला चालवता येईल अशी अटकळ आहे.

या विधानातून "सैतान" आणि "शूर" या दोन mutually exclusive categories आहेत - अर्थात सैतान हे शूर असू शकत नाहीत आणि शूर हे सैतान असू शकत नाहीत - असे सूचित होत असल्याकारणाने, एक (स्वयंघोषित) शूर सैतान या नात्याने या वाक्यास माझा तीव्र आक्षेप आहे.

शूर सैतान या शब्दांचा तीव्र निषेध करते. हे दोन्ही शब्द एकत्र जोडल्याने किंवा सैतानाला शौर्याचे विशेषण दिल्याने शूरांवर आणि सैतानावर मोठा अन्याय होत आहे असे माझ्या निदर्शनास येते.

सैतानाची शूर अशी अवहेलना केलेली पाहून मनाला आत्यंतिक यातना झाल्या.

सैतानाने सैतानासारखेच वागावे. लुच्चेगिरी, लबाडपणा, फसवेगिरी, घमेंड, दुष्टपणा, क्रौर्य, डांबीसपणा, फाजीलपणा आणि इतर हे सैतानेचे गुण आहेत. त्याला शौर्याचा दुर्गुण लावून सैतानाचा अपमान करू नये ही विनंती.

संदर्भासाठी विकिवरील डेविल, ल्यूसिफर, शैतान वगैरे लेख वाचावेत.

प्रतिवाद करा पण प्रतिसाद आवरा :)

पर्स्पेक्टिव ,आपल्या प्रतिसादाला दाद द्यावी वाटली.

संपादकाच्या संपादनाबद्दल लिहिता-लिहिता, म्हणजे शब्दांचा छळ करता-करता थेट जर्मनीचा उठाव, 'तीन पैशांचा तमाशा' तथ्य, संपादनाचे अधिकार, परराष्ट्रीय धोरण,पाण्याच्या नळामुळे नागरिकांना होणार्‍या त्रास, असे विविध माहितीपूर्ण प्रतिसादाने हसावे की रडावे कळेना. माहितीपूर्ण संस्थळावरील एक माहितीपूर्ण सन्माननीय सदस्य कसे असावेत याचा प्रत्यय आला.

आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू।।
शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका।

आज तुकाराम महाराजांना आपला प्रतिसाद पाहून आपल्या अभंगातील अर्थाचा हेतू पूर्ण झाला असे वाटले असेल. :)

विनंती : आता कोणताच उपप्रतिसाद लिहू नका ही नम्र विनंती..! आता दीर्घ प्रतिसाद आणि तोही एका दमात वाचण्याची शक्ती माझ्यात राहिलेली नाही. (ह.घ्या )

-दिलीप बिरुटे

होमियोपथी

संपादकाच्या संपादनाबद्दल लिहिता-लिहिता, म्हणजे शब्दांचा छळ करता-करता थेट जर्मनीचा उठाव, 'तीन पैशांचा तमाशा' तथ्य, संपादनाचे अधिकार, परराष्ट्रीय धोरण,पाण्याच्या नळामुळे नागरिकांना होणार्‍या त्रास, असे विविध माहितीपूर्ण प्रतिसादाने हसावे की रडावे कळेना. माहितीपूर्ण संस्थळावरील एक माहितीपूर्ण सन्माननीय सदस्य कसे असावेत याचा प्रत्यय आला.

होमियोपथी विसरलात वाटतं, सर!

उपचार करून घ्यायला हवेत... होमियोपथीचे...माझ्यावर हो! प्रतिसादाची साईझ बघून टरकलो.

-राजीव.

कायदे आझम पर्स्पेक्टिव!

बॅरिस्टरसाहेब, तुम्ही खरेच एखाद्या कायदेमंडळात का जात नाही? खरे तर तुम्ही एखाद्या घटनामंडळात जायला हवे होते. तुमचा प्रतिसाद सोलता-सोलता थकून गेलो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

एक शंका

This comment has been moved here.

शब्द लक्षात घ्यावेत.

स्वाइन फ्लू, वाह्तुकीच्या समस्या, वायू प्रदूषण, साठलेल्ल्या व न उचललेल्या कचर्‍यापासून होणारा धोका इत्यादीसाठी पुणेकरांनी शोधलेला पर्याय!

हा पर्याय (बहुदा अनिवासी) पुणेकर बुद्धिमंतांनी शोधला आहे.

पण इथे पुणेकरांवर थोडा अन्याय झाल्यासारखे वाटते.

पण तो कुठे राबविलेला आहे त्याची नीटशी कल्पना फोटोवरून येत नाही. लेखक महोदय अधिक माहिती देतील अशी आशा आहे..

(स्वगत : असे मास्क घालून फिरण्याने जर श्वासावाटे जर शुद्ध हवा गेली तर कदाचित् त्यानेही पुणेकर आजारी पडतील. नकोच ती जोखीम पत्करायला ! :) ;) )
--------------------------X--X-------------------------------
नाही निर्मळ जीवन, काय करील साबण |
तैसे 'चित्त' शुद्ध नाही तेथ बोध करील काई ||

 
^ वर