रामायण महाभारत आधारित साहित्य-२

आज माझे विचार मांडण्यासाठी एका कादंबरीचा उपयोग करत आहे.श्यामिनी ही कादंबरी शूर्पणखेवरची. लेखिकेला शूर्पणखा हे नाव मुद्दाम,हास्यास्पद वाटावे म्हणून ठेवलेले वाटते.लेखिकेला ते रामायणात कोठे सापडलेच नाही. त्यामुळे बारसे करून नाव ठेवले श्यामिनी.. ही रावणाची बहिण, सोळा सतरा वर्षांची अल्लड,रुपवान,गान-नृत्यात प्रवीण, अशी दंडकारण्याची स्वामिनी. तीला हा भाग सम्राट रावणाने आंदण म्हणून दिलेला. तर अशा या श्यामिनीची ही कथा.
कथेत तीन पात्रे महत्वाची. जानकी, श्यामिनी व तिसरा अर्यमा. हा रामायणात नाही. हा एका
आर्य ऋषीला अनार्य पत्नीपासून झालेला मुलगा. उजळ वर्णाचा,उत्तम संस्कृत येणारा. वडिलांना अनार्य स्त्रीशी लग्न केले म्हणून बहिष्कृत केले व हा त्यांच्या बरोबर अनार्यांत वाढला.बाकी किरकोळ
पात्रे आहेत ती कथेत मालमसाला भरावयाला.
कादंबरी तीन भागात लिहली आहे. प्रत्येक भाग हा या तीन व्यक्तींमध्ये एकेकाला प्राधान्य देऊन
लिहलेला. पहिला "जानकी". सुरवात राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात प्रवेश करतात तेंव्हापासून सुरू होते.वनवास संपण्यास आता दीडदोन वर्षेच शिल्लक राहिली आहेत. दंडकारण्यात, म्हणजे अनार्यांच्या राज्यात, ते आपली पर्णकुटी बांधतात तीही अनार्य राजांची, खर-दुषण यांची, परवांगी न घेता. अनार्य या शिष्टाचाराच्या भंगाकडे सौजन्याने दुर्लक्ष करतात.येथे पहिला भाग संपतो.
दुसर्‍या भागात सुरवात होते ती शूर्पणखा-नव्हे-श्यामिनी दंडकारण्यात येते तेंव्हापासून. तीला या
उत्तरेकडून आलेल्या तीघांबद्दल कुतुहल वाटते. ती प्रथम सीतेला भेटते व तीच्याशी मैत्री करावयाचा प्रयत्न करते. भाषेच्या अडचणीमुळे सीतेला काही समजत नाही व ती हा दक्षिणेकडील राजकन्येचा उद्दामपणा आहे अशा समजुतीने श्यमिनीला उडवून लावते. तरीही जिद्दीने, रामावर मन बसलेल्या श्यामिनीने, सर्व लवाजम्यासकट रामाची भेट घेतली. या वेळी अर्यमा जवळ असल्याने भाषेची अडचण नसते, तो दुभाष्याचे काम करतो. पण रामालाही या भेटीबद्दल फारसा उत्साह नसतो. ही भेटही तशी निष्फलच ठरते. राम श्यामिनीकडे दुर्लक्ष करतो पण लक्ष्मणाला सावध करतो कीं हे अनार्य पर्णकुटीच्या फार जवळ आलेले आहेत तेंव्हा जानकीच्या सुरक्षेकरिता सावध राहिले पाहिजे. श्यामिनी रामाला आपली मनोकामना कळवते पण राम निर्भत्सनाच करतो. श्यामिनीवर प्रेम करणारा अर्यमा निघून जातो.
श्यामिनी मग स्वत:च रामाला भेटावयास येते,रागाच्या भरात सीतेवर धावून जाते व मग लक्ष्मण तीचे नाक-कान कापून तीला हाकलून देतो. खर-दुषण आपल्या सैनीकांसह रामावर हल्ला करतात पण त्यांची भाले, तलवारीसारखी प्राथमिक हत्यारे रामाच्या दूरगामी धनुष्यबाणांपुढे टिकाव धरू शकत नाहीत. श्यामिनी लंकेत जाते व रावण रामाला जिव्हारी जखम झाली पाहिजे म्हणून सीतेला पळवून लंकेत आणतो.श्यामिनी दुसरा भाग संपतो.
तिसर्‍य़ा भागाचे नाव अर्यमा. झालेली हकिकत कळल्यावर श्यामिनीला भेटावयाला तो लंकेत जातो. श्यामिनी त्याची भेटही घेत नाही.विमनस्कपणे तो दंडकारण्यात वर्षानुवर्षे एकटा फिरत रहातो. राम-सीता अयोद्धेला जातात, सीता वाल्मीकीच्या आश्रमात जाते व त्या आश्रमात मुनी आपले रामायण लव-कुशांना शिकवत असतांना ऐकतो व शूर्पणखेचा हेटाळणीचा भाग ऐकून त्वेषाने आपली बाजू मांडतो. वाल्मीकि त्याला काव्य लिहावयाला प्रोत्साहन देतात व तो "रावणायण" नावाचे महाकाव्य अनार्यांची बाजू मांडण्याकरिता लिहतो.पण दंडकारण्यात एक प्रचंड भूकंप होतो व त्यात त्याचे काव्य व तो स्वत:ही नाहिसा होतो. पीडित-दलितांची गाथा भविष्यकाळाकरिता उरत नाही.

ही कादंबरी का लिहली हे लेखिकेने विस्ताराने दिले आहे.पहिल्यांदी आपण रामायणाचा अभ्यास केला व अनेक जाणत्यांना विचारून शंकांचे निरसन करून घेतले असेही नमूद केले आहे.या अभ्यासातून लेखिकेने काढलेले नित्कर्ष असे :
(१) रामायण म्हणजे आर्यांनी अनार्यांवर म्हणजे भारतातील मूळ रहिवाश्यांवर केलेल्या आक्रमणाची, वसाहतवादाची कथा. यातील युद्ध हे आर्य-अनार्य यांच्यामधील युद्ध होय.
(२) हा वसाहतवाद म्हणजे, युरोपिअन लोकांनी रेड इंडिअन लोकांची केलेली ससेहोलपट, इन्का साम्राज्याचा अपहार, ऑस्ट्रेलिआतील मावरी लोकांची गळचेपी; आर्यांनी येथील मूळ रहिवासी अनार्यांच्या केलेल्या हेलणेशी व हुसकावणीशी तुलना करण्यासारखी आहे.
(३) लेखिका असाही मुद्दा मांडते की आर्य जिंकले कारण त्यांच्याकडे वरचढ बुद्धीमत्ता होती किंवा त्यांची संस्कृती श्रेष्ट होती म्हणून नव्हे तर त्यांच्याकडे परिणामकारक शस्त्रे होती. The gun was the culprit. राम जिंकला व खर-दुषण हरले कारण रामाकडे धनुष्य-बाण होते व खर दुषणांकडे गदा, तलवारी सारखी छातीला छाती भिडवून लढण्याची हत्यारे.
(४)रावणाच्या अंतर्गृहात दीर्घकाळ बंदिवासात राहूनही सीतेचे शील अकलंकित राहिले यात वाल्मीकीने रावणाचे स्त्रीदाक्षिण्य मान्य केले आहे.
(५) शूर्पणखा अनार्य नसती तर श्रीरामाने तीला निराळी वागणुक दिली असती.

आणखीही काही मुद्दे आहेत पण ते सोडून देऊ(.रामायण काळी अनार्यांची संस्कृती कशी होती याबद्दल मला माहीती नाही. सर्वश्री चंद्रशेखरजी, धनंजय, प्रीयाली आदी अधिकारी व्यक्तींनी ती माहीती पुरवली तर मजसारखाच इतरांनाही फायदा होईल.जेव्हा आर्य भारतात आले त्यावेळी त्यांनी प्रथमच्या रहवाश्यांना कशी वागणुक दिली तेही समजावून दिले तर बरे होईल. उदा. दास वा गुलाम या पद्धतीची सुरवात तेंव्हा झाली का ?) मला वरील ५ मुद्दे वाल्मीकि रामायणाच्या आधारे तपासून बघावयाचे आहेत.इथे फक्त वाल्मीकि रामायणाचाच आधार घ्यावयाचा.
(१) राम व रावणातले युद्ध हे आर्य-अनार्य यांच्यामधील युद्ध : साफ चूक. रावण अनार्य नव्हे, शुद्ध ब्राह्मण. त्याची वंशपरंपरा पुढील प्रमाणे. ब्रह्मदेव-पुलस्त्य-विश्रवा-रावण. रावण हा ब्रह्मदेवाचा पणतू.त्याला अनार्य म्हणणे ही घोडचूक.(उत्तरकांड,सर्ग९) रावणाची आई कैकसी ही राक्षस कूळातली पण त्यामुळे रावण अनार्य होत नाही.मयासूराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली ती त्याची वंशपरंपरा पाहून (उत्तरकांड, सर्ग१२).
(२) आता युरोपिअन लोकांच्या वसाहतवादाशी केलेली तुलना पाहू. युरोपिअन लोकांना साम्राज्य स्थापून संपत्ती आपल्या देशात आणावयाची होती.रामाने वाली व रावणाचा वध केला पण जिंकलेली राज्ये सुग्रीव व बिभीषण यांना दिली. तेथून एक पैसा देखील अयोध्येला आणला नाही. त्याने किष्किंधा वा लंकेत युद्धानंतर पाऊलही टाकले नाही.(किष्किंधा कांड सर्ग २६ व युद्धकांड सर्ग १२१) अयोध्येला लवकर पोचावयाचे म्हणून बिभीषणाने पुष्पक विमान रामाला दिले; तेही रामाने परत पाठवून दिले. राज्याभिषेकानंतर रामाने किष्किंधावासी व लंकावासींचा सत्कार असंख्य रत्ने व इष्ट वस्तू देऊन केला.(युद्धकाण्ड सर्ग १२८).म्हणजे कोणी कुणाला काय दिले असेल तर ते रामानेच दिले आहे.
(३) शस्त्रास्त्रे : खर-दुषणापासून रावण-इंद्रजीतापर्यंत सर्वजण धनुष्यबाण वापरत होते व त्यांना निरनिराळी अस्त्रेही माहीत होती.अर्थात तलवार, गदा इत्यादी वापरात होतीच. गंमत म्हणजे रामाकडील वानरच धनुष्य बाण वापरताना दिसत नाहीत! म्हणजे शस्त्रास्त्रे दोन्ही बाजूंकडे होती, फक्त राम श्रेष्ट धनुर्धर होता.
(४) रावणाचे स्त्रीदाक्षिण्य : उत्तरकांडातील सर्ग ६ पाहिला म्हणजे रावणाचे स्त्रीदाक्षिण्य कळून येते. ..देव व दानव यांच्य कन्या मार्गामद्ये त्याने हरण केल्या. कन्या असो वा स्त्री जी म्हणून सुंदर त्याच्या दृष्टी पडेल तिच्या बांधवांचा वध करून तो राक्षस त्या विमानात तिला अडकवून ठेवूं लागला; आणि ह्याप्रमाणे नाग, राक्षस,असूर, मानव, यक्ष व दानव यांच्या कन्या त्याने विमानात घातल्या.... सीता अकलंकित राहिली याचे कारण नलकुबेराने त्याला दिलेला शाप. शाप असा " मदनाने पीडित होऊन हा (रावण) जर निरिच्छ स्त्रीवर बलात्कार करूं लागला तर त्याच्या मस्तकाचे सात तुकडे उडून जातील".या शापाला भिऊन रावणाने सीतेला त्रास दिला नाही.
(५) अनार्य नसती तर ... वाल्मीकींना एखादी आर्य स्त्री शूर्पणखेसारखे वागेल असे वाटलेच नाही. त्यामुळे अशी तुलनाच करता येत नाही.
शूर्पणखा ही विश्रवाची मुलगी, त्याच्या घरात वाढलेली आणि तीला संस्कृत बोलता येत नाही ही कल्पनाच अनाकलनीय वाटते. सर्व कादंबरीचा पायाच विस्कळीत होतो.
असो. थोडी जास्तच लांबण लागली. पण मला मांडावयाच्या मुद्द्यांच्या पुष्टीकरणाकरिता एक उदाहरण दिले.
वनारसेबाईंनी वाल्मीकि रामायण (संस्कृत वा त्याचे भाषांतर) दोनदा वाचले असते तर या ढोबळ चूका टाळता आल्या असत्या. जर शूर्पणखेचे ( हे तीचे नाव उत्तरखंड सर्ग ९ मध्ये दिले आहे) लग्न झाले होते, तीच्या नवर्‍याला रावणानेच मारले(उत्तर्कांड सर्ग २४) व लंकेतल्या स्त्रीया तीचा थेरडी म्हणून धिक्कार करतात हे त्यांनी वाचले असते तर तीला सोळा सतरा वर्षांची सुकुमार कन्या करावयाचे धाडस त्यांना झाले नसते.
रामायणातील कथेत फोन येऊ नये असे मला वाटते कारण कालविपर्यास. रामायणकालातच नव्हे तर १०० वर्षांपूर्वीही जी गोष्ट अस्तित्वात नव्हती ती कशाकरिता उपयोगात आणावयाची ? नाटकात साडी सकच्छ असावी कीं विकच्छ ही बाब व टेलिफोन या गोष्टी सारख्याच कां ? इंद्रजीत व लक्ष्मण AK47 घेऊन लढत आहेत ही कल्पना पटते कां?" सीतेने पोटगीचा दावा ठोकणे" मला विनोदी नव्हे तर हास्यास्पद वाटते.
समजा रामायणावरून अशी कल्पना सुचली की एका अनार्य राजकन्येचे एका आर्य राजपुत्रावर, भले त्याचे लग्न झालेले असेना का, प्रेम बसले व त्याने तीला झिडलारली म्हणून तीने त्याचा सूड घेतला. ठीक आहे, कादंबरीच काय महाकाव्य लिहा, नको कोणी म्हटले ? पण त्यात राम-सीता-रावण आणू नका म्हणजे झाले.असे ठोस बदल करण्यात तुम्ही वाल्मीकीवर अन्याय करता. त्याच्यासमोर असलेल्या अनेक पर्यायांपैकी एक त्याने निवडला. तुम्हाला तो पटला नाही/आवडला नाही तर दुसरे महाकाव्य लिहा. रामायणात ढवळाढवळ कशाला ? इथे कॉपीराईट्चा प्रश्न नाही. एका कलावंताच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतीची मोडतोड करण्याचा हक्क कुणालाच नसावा.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम लेख्

शरद
अतिशय मुद्देसूद व सुंदर बांधणी केलेला लेख्.
आपले विचार मला फारसे पटले नाहीत. पिग्मालियनला पु.ल. नी फुलराणीची वेषभूषा चढविली म्हणजे त्यानी शॉ च्या कलेची मोडतोड केली किंवा बेकेटच्या थीम वर मराठीकरण करून कोणी नाटक लिहिले किंवा बॉलीवूडवाल्यांनी चित्रपट बनवला तर मूळ नाटकात ढवळाढवळ केली हे नाही मला पटत. परंतु आपले विचार माझ्यापेक्षा खचितच निराळ्या पद्धतीने केलेले असू शकतात याचा मी आदर करतो.
चन्द्रशेखर

सहमत पण

अतिशय मुद्देसूद व सुंदर बांधणी केलेला लेख्.

या बद्दल सहमत. पण बाकीची तुलना पटली नाही.
लेखाच्या शेवटचे काही मुद्दे मला पटले. आता सांगतो तो मुद्दा थोडा अवांतर आहे. रामायण-महाभारत यांना पकडून साहित्य निर्मिती हा एक साहित्य विश्वातल्या उद्योग निर्मितीचा भाग आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. काहीसे डायना सारखे. ती असताना नसताना तिचा वापर बातम्या आणि कादंबर्‍या या करिताच जास्त झाला. अर्थात हे झाले व्यक्ति केंद्रित आणि अलिकडच्या काळातले उदाहरण. आपल्याकडे या महाकाव्यांवर लोकांची अपार श्रद्धा असल्याने तो धंद्याचा एक हुकमी एक्का आहे.
जाता जाता एक प्रश्न. शुर्पणखा हेच राम-रावणाच्या उद्धाचे उगमस्थान का? की इतर काही कारणे होती? आर्य-अनार्य हा एक चांगला चर्चेचा मुद्दा आहे. असे मानले जाते की आर्य भारतात आले आणि अनार्यांना त्यांनी दक्षिणेकडे विस्थीपीत केले. (हे माझे मत नाही आणि या क्षणी माझ्याकडे पुरावा नाही. ) हे सत्य मानले तर अनार्य भारतात सर्वत्र होते याचे काही पुरावे-खुणा आहेत का?






अनार्य

असे मानले जाते की आर्य भारतात आले आणि अनार्यांना त्यांनी दक्षिणेकडे विस्थीपीत केले.

आर्यांचे प्राचीन वांगमय म्हंजी वेद. हे वांगमय आर्यांनी सप्तसिंधूत राहनार्‍या आर्यांनी लिव्हले.
ते जर बाहेरुन आले असे समजले असते तर आधी जिथं ते होते तिथं त्यांनी काय लिव्हलं असतं का नाय ?
भारत सोडून त्यांचे वांगमय कुठे सापडते का ? नाय सापडत. तव्हा ते इथलेच.

चेन्नई मधील सरस्वती रिसर्च सेंटरचे डायरेक्टर डॉ.एस. कल्यान रामन यांनी सरस्वती नदी यावर संशोधन केले हाये.
त्याच्यात त्यायनी असे म्हणले हाये की सरस्वती नदी आणि दृषंद्वती या नद्यांचा परिसर ह्यो आर्यांचे ठिकाण् हाये.
मातर मह्याकडंबी याबद्दल काय पुरावा नाय :(

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

लेख आवडला, आणखी थोडे

श्यामिनीबद्दल पूर्वी वाचले होते. बहुधा म.टा., लोकसत्ता मध्ये लेख होता.

लेखिकेला शूर्पणखा हे नाव मुद्दाम,हास्यास्पद वाटावे म्हणून ठेवलेले वाटते.लेखिकेला ते रामायणात कोठे सापडलेच नाही. त्यामुळे बारसे करून नाव ठेवले श्यामिनी.. ही रावणाची बहिण, सोळा सतरा वर्षांची अल्लड,रुपवान,गान-नृत्यात प्रवीण, अशी दंडकारण्याची स्वामिनी.

माझ्याकडील प्रतीत तरी शूर्पणखा असाच उल्लेख आहे. लेखिकेला तो सापडला नसल्यास तिच्याकडे वाल्मिकी रामायणाची वेगळी प्रत असावी काय असे वाटले. तरीही, आपल्या पोटच्या पोरांची नावे आनंदाने किंवा मोठेपणाने शूर्पणखा वगैरे कोणी ठेवत असेल असे वाटत नाही. येथे तीन मते मांडता येतात.

१. नवसाला झालेल्या किंवा दृष्ट लागू नये म्हणून मुलांची नावे दगडू, धोंडू ठेवण्याची पद्धत होती. त्याप्रमाणे काही रीतींनुसार शूर्पणखा, कुंभकर्ण वगैरे ठेवली असावीत.
२. कुचेष्टेने किंवा त्यांच्या गुणा/दुर्गुणामुळे त्यांना ही नावे बहाल करण्यात आली असावीत. उदा. मंदोदरीचे नाव तिचा गर्भकाल ९ महिन्यांपेक्षा जास्त असल्याने ठेवण्यात आले होते. अर्थातच, असे नाव जन्मापासून असणे अशक्य वाटते.
३. लेखकाने (कवीने) आपल्या मनाप्रमाणे स्वातंत्र्य घेऊन खलनायकी प्रवृत्ती ठळक व्हावी म्हणून भाटगिरी केली असावी.

शूर्पणखा सोळा सतरा वर्षांची कन्या असावी असे वाटत नाही. विकीवर तिचे जन्मनाम "मिनाक्षी" होते आणि ती मातेप्रमाणे (कैकसी) रुपवान होती असे उल्लेख दिसले.

रामायण हे आर्य-अनार्यांची लढाई असे वाटत नाही. (तसे आर्य-अनार्य शब्दांबद्दल माझे काही आक्षेप आहेत पण प्रचलीत असल्याने मी देखील हे शब्द वापरते.) कारण जर राम आर्य असेल तर तितकाच रावणही आर्य आहे. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण आणि राम हा क्षत्रिय, त्यामुळे राम रावणापेक्षा उच्चवर्णिय होता असे म्हणणे पटत नाही. परंतु, रावण ही उपाधी मानली असता आणि असे अनेक रावण/ लंकाधिश पूर्वी झाले असतील असे मानले तर लंका हे एक एस्टॅब्लिश्ड राज्य असावे आणि रामाने त्याला शह दिला असावा. राम-रावणाची लढाई ही राजकीय वाटते. विशेषतः, एतद्देशीयांना (रानातील जमाती) रावणाने जवळ केले असावे आणि त्याला शह देण्यास रामाने वानरांना जवळ केले असावे असे तर्कही मांडता येतील.

शस्त्रास्त्रांबद्दल बोलायचे झाले तर रावण हा सम्राट होता हे विसरून चालणार नाही. मेघनादाने इंद्रावर जय मिळवल्याने त्याचे नाव इंद्रजीत पडले होते. जो मनुष्यगण गरज लागल्यास देवांची मदत घेत असे त्यांना हरवणे रावणाला अशक्य नव्हते. रावण हरला तो त्याच्या गर्वाने आणि निष्काळजीपणाने. याचबरोबर, रावणाकडे पुष्पक विमान होते. त्याने ते कुबेराकडून हडप केलेले असले तरी कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ आणि हडप केलेले विमान वापरण्याची क्षमता रावणाकडे होती हे विसरता येत नाही. (हे पुष्पक नावाचे विमान होते असे गृहित धरून लिहिले आहे. प्रत्यक्षात ही देखील मला कवीकल्पना वाटते.)

सीता अकलंकित राहिली याचे कारण नलकुबेराने त्याला दिलेला शाप. शाप असा " मदनाने पीडित होऊन हा (रावण) जर निरिच्छ स्त्रीवर बलात्कार करूं लागला तर त्याच्या मस्तकाचे सात तुकडे उडून जातील".या शापाला भिऊन रावणाने सीतेला त्रास दिला नाही.

ही देखील कवीकल्पनाच वाटते. येथे एक उदाहरण हिंदी चित्रपटातील खलनायकाचे देता येईल. खलनायक कोणीही असो - स्मगलर, देशद्रोही, दहशतवादी, राजकारणी - स्त्रियांच्याबाबत तो लंपट असायलाच हवा. वाल्मिकींनीही रावणाला यापेक्षा वेगळा रंगवलेला नाही. फक्त सीतेचे चारित्र्य अबाधित का राहिले हे सांगण्यास त्यांनी (किंवा नंतर त्यात भर घालणार्‍यांनी) नलकुबेराच्या आणि रंभेच्या शापाचे एक कथानक चिकटवून दिले.

प्रत्यक्षात रावण हा प्रतिष्ठित राजा. त्याच्या लंकेतील स्त्रिया असुरक्षित होत्या वगैरे असे काही दिसत नाही. तो तरुण लढवय्या वयातील पोरांचा बाप. बायकोशी त्याचे संबंध वाईट होते असे उल्लेख नाही. कदाचित त्याला इतक्या मोठ्या वयात सीतेत वैषयिक रस नसावाच. एक ट्रॉफी म्हणून तो सीतेचा वापर करत असावा इतकेच.

शूर्पणखा ही विश्रवाची मुलगी, त्याच्या घरात वाढलेली आणि तीला संस्कृत बोलता येत नाही ही कल्पनाच अनाकलनीय वाटते. सर्व कादंबरीचा पायाच विस्कळीत होतो.

अं? मला वाटले की शूर्पणखा इंग्रजी बोलत असे कारण माझ्याकडील इंग्रजी प्रतीतील सर्वच पात्रे इंग्रजी बोलतात. कठिण आहे.

असो. मला वाटते वनारसे बाईंनी श्यामिनी ही कादंबरी लिहिली आणि आपल्या पद्धतीने वेगळे कथानक रचले तर त्यात काहीच गैर नाही. रणजित देसाईंपासून शिवाजी सावंतांपासून अनेकांनी हे केले आहेच. शूर्पणखेने रावणाला इमेल करून किंवा ऑर्कुट (उपक्रमावर) खरड पाठवून आपली कहाणी सांगितली असे लिहिले तरी माझी हरकत नाही परंतु जर त्या रामायणाचा अभ्यास करून असे काही अभ्यासपूर्ण लिहिले असे म्हणत असतील तर पटत नाही.

माझ्याशी सहमत ?

चंद्रशेखर यांनी फ़ुलराणीचे उदाहरण दिले. मी त्यात स्वरसम्राज्ञीची भर घालतो. दोनही नाटके शॉच्या नाटकावर बेतली आहेत. पण त्यात कोठेही काल/स्थलविपर्यास केलेला दिसत नाही. दोनही नाटके महाराष्ट्रातील कथानके म्हणून दाखवली जातात. पात्रांची नावे, पोषाख, स्थळे, रीतीरिवाज मराठी आहेत. थोडक्यात इंग्रजी बीज असलेली, मराठी गोष्टच सांगितली आहे. यात
कोठेही पौंड-पेन्स, लंडन ब्रिज,बीथओव्हन असले पाश्चात्य उल्लेख नाहीत. मला वाटते ही उदाहरणे "राजकन्येने राजपुत्राचा सूड घेणे" या मला मान्य असलेल्या कल्पनेशीच मिळतीजुळती आहेत.
शरद

 
^ वर