एक नाट्यगीत

नाट्यगीत
"चंद्रिका ही जणू..या गीताचा अर्थ सांगता येईल काय? ते मानापमान नाटकात आहे." एका गृहस्थानीं मला विचारले.त्यांना पूर्ण गीत येत नव्हते.समग्र गीतातील शब्द समजले तर अर्थ लावणे शक्य असावे असे मला वाटले. नाट्यगीत म्हणजे काही आत्मनिष्ठ कविता नव्हे.["समईच्या शुभ्र कळ्या.." या आरती प्रभूंच्या कवितेवर मी कर कर विचार केला. पण अर्थाचा मागमूस लागला नाही.मध्यवर्ती कल्पना काय तेच कळत नाही.]वामन पंडित, मोरोपंत,परशुरामतात्या गोडबोले,चंद्रशेखर,कृष्णशास्त्री चिपळोणकर यांच्या वृत्तबद्ध कवितेत संस्कृतप्रचुर अवधड सामासिक शब्द कितीही असले तरी योग्य अन्वय करून अर्थ लावता येतो.तसा नाट्यगीतांचा अर्थ लावणे शक्य असावे.
"मराठी नाट्यगीते"(सं.बाळ सामंत) या पुस्तकात "चंद्रिका.." पुढीलप्रमाणे आहे:
चंद्रिका ही जणू ठेवी या स्नेहे कमलांगणी।
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी।ध्रु।
चंद्रसदननभमंडला मेघांनी वेढियले।
शोभाधन विपुल ते लपविता कोपे भरले।
शोधित वेगे दशदिशा भूवरी सकल आले।
आता निकरे सरसावले दिसत ही या क्षणी।
यावर विचार करून पुढील प्रमाणे अन्वय लावला.अध्याहृत वाटलेले शब्द कंसात घातले आहेत.मला खूप वेळ लागला. कांहीना पहिल्या वाचनातसुद्धा अन्वय प्रतीत होऊ शकेल.अन्वयात घालावे लागणारे अध्याहृत शब्द थोडे असावे. फ़ार दूरान्वय असू नये.
अन्वय:: चंद्रसदननभमंडला (एकदा) मेघांनी वेढियले.(त्या) श्यामला मेघां तस्कर मानोनी, कुमुदबांधव ही(आपली) चंद्रिका जणू कमलांगणी स्नेहे (लपवून) ठेवी.(असे) लपविता ते विपुल शोभाधन कोपे भरले. दशदिशा शोधीत ते सकल (शोभाधन) वेगे भूवरी आले.(ते) आता निकरे सरसावले (आहे असे) या क्षणीही दिसत आहे.
काही शब्दांचे अर्थ: चंद्रिका = चांदणे. कमलांगण = सरोवर , कमळाचा अंतर्भाग. असे अर्थ होऊ शकतील. मला इथे सरोवर अर्थ योग्य वाटतो. कुमुदबांधव = चंद्र. तस्कर = चोर.
अर्थ: चंद्राचे घर जे आकाश त्याला एकदा ढगांनी वेढा घातला.त्या काळ्या ढगांना चोर समजून चंद्राने आपले चांदणे या सरोवरात मोठ्या प्रेमाने दडवून ठेवले. अशाप्रकारे दडवून ठेवल्यामुळे त्या चांदण्याला राग आला. तेव्हा दशदिशा धुंडाळीत ते सगळे चांदणे पृथ्वीवर आले. ते आता सर्वशक्तीनिशी सरसावले आहे असे या क्षणीही दिसत आहे.
(नाटक पाहिले/वाचले नसल्याने गीताचा नाट्यप्रसंग ठाऊक नाही.त्यामुळे शेवटच्या ओळीचा अर्थ समाधानकारक वाटत नाही. पण सर्वसाधारण अर्थ बहुधा असाच असावा.)
ज्यांनी मानापमान पाहिले/ वाचले असेल त्यांतील कोणी योग्य अर्थ द्यावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

ठीकच

काही संगीत विषयात औरंगजेब असतात तर काही काव्यात, चालायचेच!

नाट्यगीतांचा आस्वाद या ऐवजी 'कवितेचे तर्कशास्त्र' अशी लेख माला सुरु होईल की काय अशी 'भीती' वाटते आहे! ;))

आपला
कुचकट
गुंडोपंत

ठीकच

काही संगीत विषयात औरंगजेब असतात तर काही काव्यात, चालायचेच!

नाट्यगीतांचा आस्वाद या ऐवजी 'कवितेचे तर्कशास्त्र' अशी लेख माला सुरु होईल की काय अशी 'भीती' वाटते आहे! ;))

आपला
कुचकट
गुंडोपंत

आस्वाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आपण नाट्यसंगीताचा आस्वाद घेतो म्हणजे ते ऐकतो तसेच कधी गुणगुणतो.अशावेळी त्या गीतातील शब्द समजले तसेच अर्थही समजला तर अधिक चांगले नाही काय? अर्थ समजल्यामुळे आस्वादात बाधा येण्याची शक्यता नाहीच.उलटपक्षी आस्वाद अधिक चांगल्यारीतीने घेता येईल. श्री.गुंडोपंतांनासुद्धा हे पटावे.

क्रोधून भूमीवर उतरले ते मेघच

क्रोधून भूमीवर उतरले ते मेघच, असा अन्वय अधिक सयुक्तिक वाटतो.

(याच नाट्यगीताचा अन्वय केलेला दुवा मिसळपावावर अनेक महिन्यांपूर्वी बघितला होता. कोणी शोधून येथे दिल्यास बरे होईल.)

मिपा वरील दुवा

(याच नाट्यगीताचा अन्वय केलेला दुवा मिसळपावावर अनेक महिन्यांपूर्वी बघितला होता. कोणी शोधून येथे दिल्यास बरे होईल.)

मिसळपाववरील दुवा

पर्यायी अन्वय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
क्रोधून भूमीवर उतरले ते मेघच, असा अन्वय अधिक सयुक्तिक वाटतो. असे श्री. धनंजय यांच्या प्रतिसादात आहे. हा पर्याय मला सुचलाच नाही. शोभाधन दडवून ठेवल्याचे समजतातच मेघ रागाने दशदिशा धुंडाळत पृथीवर आले असा अर्थ ठीक दिसतो.
"चंद्रिका ही जणू.." या प्रारंभीच्या शब्दांमुळे हे गीत कुणा स्त्रीला उद्देशून आहे असा पूर्वसमज झाल्याने मी त्या अर्थाकडे वळलो

उत्सुक..

"चंद्रिका ही जणू..या गीताचा अर्थ सांगता येईल काय?

अर्थ नाही सांगता येणार, परंतु हे पद करीमखासाहेब फार सुदर गायचे त्याची या निमित्ताने आठवण झाली. त्याची ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहे.
अण्णाही फार छान गातात..

बाकी, अर्थ समजून घ्यायला उत्सुक आहे..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय?
नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

अजून एक रंगलेली चर्चा

अगदी याच गाण्यावर मी सुरू केलेली एक चर्चा :
http://www.misalpav.com/node/5762

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

भामिनी=चंद्रिका

अर्थ साधा सरळ आहे. स्त्रीमुखावर चंद्राचा आरोप कवी फार पुरातन काळापासून करत आले आहेत.धैर्यधर भामिनीला पहातो व त्याला एकदम वाटते " आकाशीचा चंद्र भूवर का आला ?
आता यनावालांनी दिलेला अर्थ लावा : काळे ढग हे चोर, ते चंद्रिकेला चोरावयास आले, चंद्राने
तीला वाचवावयाचे म्हणून भूवर आणले (ती ही भामिनी), नभमंडली ते विपुल धन न मिळाल्याने
खवळलेले ढग आता भूवर त्वेशाने , वेगाने धावून आले आहेत. (थोडक्यात "मानू कोणता चंद्रमा"
हा प्रश्न बर्‍याच रसिकांना पडतो!)
शरद (येथे चांदणे सापडेल)

संपूर्ण अर्थ मराठीत

श्री यनावालांनी दिलेल्या अर्थापेक्षा थोडा निराळा अर्थ मला वाटतो तो असा :
धैर्यधराला आकाशात काळे ढग दाटून आल्यामुळे चंद्र दिसत नाही परंतु जमीनीवर भामिनी दिसते.
त्याला वाटते ही आकाशातून धरणीवर आलेली चंद्रिकाच.का आली बरे ? तो म्हणतो " मेघांना
विपुल शोभाधन असलेली चंद्रिका पळवावयाची आहे; म्हणून त्यांनी चंद्रसदन नभमंडल वेढियले. परंतु कुमुदबांधव ह्या श्यामल तस्करांना ओळखून आहे. त्याने स्नेहभरे ही चंद्रिका लपवून छपवून येथे भूमंडळावर आणून कमलांगणी ठेवली.मेघांना ते विपुल धन लपविल्यामुळे नभमंडळात सापडले नाही व त्यामुळे कोपे भरून ते सकल, वेगाने, भूमंडळी आले व आता या ठिकाणी निकरे सरसावलेले दिसतात."
शरद

सुसंगत अर्थ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"शोभाधन विपुल ते लपविता कोपे भरले।"
याचा अर्थ "आपल्याला कोंडून ठेवल्यामुळे ते शोभाधन(चांदणे) रागावले " असा मी चुकीचा केला. इथे "विपुल शोभाधन लपविता ते(मेघ) कोपे भरले." असा अन्वय करणे उचित होते. श्री.धनंजय तसेच श्री.शरद यांनी हा पर्याय सुचवल्यामुळे आता सुसंगत अर्थ लागला.अस्वस्थता संपली. "उपक्रम" वर लेख टाकल्याने मला हा लाभ झाला.

चारुदत्त आफळे

हे गाणे प्रसिद्ध किर्तन्कार श्री. चारुदत्त आफळे सुन्दर म्हणतात व शिवाय गाताना ते त्याचा सुन्दर अर्थ पण सान्गतात. अर्थात मला तो अर्थ येथे मान्डणे निव्वळ अशक्य आहे. मराठी नाट्यसन्गताची वाटचाल असा एक कार्यक्रम ते सादर करतात. ज्याना सन्धी मिळेल त्यानी तो कार्यक्रम जरूर ऐकावा .

धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्‍या दुष्‍कृत्‍यांपेक्षा सज्‍जनांची निष्क्रीयता जास्‍त भयावह

 
^ वर