रामायण-महाभारत आधारित साहित्य
रामायण-महाभारत आधारित साहित्य
आज एका नव्या चर्चेला सुरवात करावयाची आहे. प्रथम विषयाची मर्यादा सांगतो.
"हे साहित्य रामायण-महाभारत यावर आधारित असावे. म्हणजे रामायणातील राम,सीता, वाली, जंबूक इत्यादी पात्रे किंवा महाभारतातील कर्ण, अर्जून, घटोत्कच,कृष्ण-बलराम,द्रौपदी इत्यादी पात्रे यांना प्रमुख घटक धरून लिहलेले साहित्य. साहित्यात काव्य,कथा, कादंबरी, नाटक इत्यादींचा समावेश केला जावा." उदाहरणार्थ गीत-रामायण (काव्य), राधेय (कादंबरी), स्वयंवर-सौभद्र (नाटक).
आता लेखकाला ही पात्रेच घेऊन आपण लिहावे असे का वाटत असावे ? याचे एक कारण असे असावे कीं त्याला खात्री पटलेली असते कीं आपली प्रतिभा उच्च दर्जाची आहे असे गृहीत धरले तरी वाल्मीकि-व्यास यांच्याकडे बघतांना आपली टोपी खाली पडणार आहे. तेंव्हा नवीन रामायण-महाभारत लिहावयाच्या ऐवजी त्यातला एखादा लहान भाग घेऊन त्यावर लिहावे हे बरे. शिवाय पात्रे बहूजनांना, नव्हे सर्वांना, माहीत असतात हा एक फायदाच. हीही शक्यता लक्षात घेतली पाहिजे लेखकाला मनोमन वाटते कीं सीतात्याग ही रामायणातील घोडचूक आहे आणि सीतेला न्याय देण्याकरिता तरी मला लिहले पाहिजे. आणखीही कारणे असू शकतील. आतापर्यंत अनेकांनी लिहले आहे आणि पुढेही अनेक लिहणार आहेतच.
असे साहित्य लिहताना लेखकाने काय पथ्ये पाळावीत याबद्दल आपले मत काय ? काही विचार मी मांडतो.
(१) संपूर्ण भाषांतर किमान दोनदा वाचावे.
(२) काहीही पथ्ये किंवा बंधने नसावित. एखाद्या पथनाट्यात असे दाखवावयास हरकत नाही कीं सीता वनातून
थेट माहेरी, जनकाकडे, गेली व तेथून तीने रामावर पोटगीचा दावा ठोकला.
(३) साहित्य कालबाह्य नसावे. रामायणात रेलवे येऊ नये, पीनल कोड नसावे वा राम-लक्ष्मणाने फ़ोनवर बोलू नये.
(४) मुद्दा (३) चाच पुढचा भाग म्हणजे रूढी, नीती-नियम, धार्मिक पद्धती यात बदल करू नये.
(५) अकारण कोणाच्या भावना दुखावू नयेत.
मी श्री. तारा वनारसे यांनी शूर्पणखेवर लिहलेल्या "श्यामिनी" या कादंबरीवर पुढचा लेख लिहणार आहे.
विनंती ही कीं प्रतिसाद देतांना असेच प्रत्यक्ष उदाहरण (जसे कीं गीतरामायण) द्यावे.
शरद
Comments
बाली मधील केचक नृत्य
बालीमधे, कोणत्याही तालवाद्याशिवाय करण्यात येणार्या केचक नृत्यात, रामायणाचीच कथा उलगडली जाते. या कथेत शेवटी रावणाबरोबर युद्ध होते ते रामाचे नसते. वानरांचा राजा सुग्रीव व रावण यांच्यात तुंबळ युद्ध होते व सुग्रीव, रावण वध करतो. कदाचित रावणासारख्या शत्रूला मारण्यासाठी सुग्रीवच पुरेसा असल्याने रामाने युद्धात भाग घेतला नाही असे तर सुचवायचे नसेल?
चन्द्रशेखर
थोडक्यात...
...हे वरील मुद्दा क्र. २मध्ये बसावे.
पण मग हे मुद्दा क्र. १शी सुसंगत होईल का?
मुळात 'संपूर्ण भाषांतर' म्हणजे नेमके कशाचे संपूर्ण भाषांतर? बालीमधील केचक नृत्यात रामायणाच्या 'मूळ संहिते'चा (अशी काही चीज असल्यास) आधार घेत असावेत, की रामायणासंबंधीच्या स्थानिक परंपरांचा? (तसेही केचक हे लोकनाट्य/लोकनृत्य मानता यावे,आणि अशा बाबतीत कथानक मूळ संहितेबरहुकुम असण्याऐवजी स्थानिक परंपरांशी सुसंगत असावयास हरकत नसावी. मग 'संपूर्ण भाषांतर', आणि तेही 'किमान दोनदा', का वाचावे लागावे बरे?)
मुळात मुद्दा क्र. १ आणि २ हे परस्परसुसंगत आहेत काय?
मुद्दा क्र. ३ बद्दलही काही शंका आहेत. रामायणात विमान येऊ शकते तर आगगाडी का येऊ नये? तसेही महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनप्रसंगी वगैरे जर आधुनिक प्रसंगांना रामायणाच्या रूपकात सादर करणारे नाटक वगैरे बसवायचे झाले, तर हनुमान सीतेला छाती फाडून ओळख दाखवतो याऐवजी आयडेंटिटी कार्ड दाखवतो असे दाखवले, तर बिघडले कोठे? (असे प्रयोग झालेले आहेत असे ऐकिवात आहे.) तसेही हे मुद्दा क्र. २मध्ये बसते असे वाटते. म्हणजे मुद्दे क्र. २ आणि ३ हे परस्परविसंगत आहेत काय?
दुसरी एक गोष्ट पाळण्याकडे (दूरचित्रवाणीमालिकांमध्ये वगैरे आणि कदाचित नाटकांतसुद्धा) कल दिसतो, तो म्हणजे फारसी, अरबी किंवा इंग्रजी वगैरेंमधून आलेले शब्द वगळून त्यांऐवजी संस्कृतोद्भव शब्दांची योजना. यामागील तत्त्व मला कळलेले नाही. नाटक जर आधुनिक मराठीत बसवायचे, तर त्यात आधुनिक मराठीत प्रचलित असणारे शब्द वापरण्यास हरकत का असावी? मग ते कोठूनही आलेले असले तरी? अगदी फारसी किंवा इंग्रजीतूनसुद्धा? द्रौपदीने (किंवा जी कोणी असेल तिने) प्रासादाच्या वातायनापाशीच का बसले पाहिजे? महालाच्या खिडकीशी बसले तर बिघडले कोठे? किंवा राजाने द्वारपालास आदेश देण्याऐवजी दरवानाला हुकुम का सोडू नये? उद्या रामायणावर आधारित असे एखादे नाटक जर इंग्रजीत किंवा फारसीत (किंवा अगदी पोर्तुगीजमध्येसुद्धा) बसवायचे झाले, तर त्यात इंग्रजी किंवा फारसी (किंवा पोर्तुगीज) शब्द येतीलच ना? मग मराठीत नाटक बसवताना मराठीत रुळून मराठीच झालेले इंग्रजी किंवा फारसी (किंवा पोर्तुगीज) शब्द का चालू नयेत?
मुळात साहित्य लिहिताना साहित्याचा उद्देश काय आहे हे लक्षात घ्यायला हवे असे वाटते. शेवटी ऐतिहासिक नाटक किंवा कादंबर्या म्हणजे जर (त्यांतील दाखले हे 'पुरावे' म्हणून मानता येत नाहीत या अर्थाने) 'इतिहास' नव्हेत (आणि असूही नयेत!), तर त्यांतील बारीकसारीक तपशिलांचे माफक आधुनिकीकरण केले, तर बिघडले कोठे? विशेषतः (संगीत नाटकांप्रमाणे) 'दोन घटका करमणूक' हाच जर मुख्य उद्देश असेल तर? नक्की आठवत नाही, पण 'सौभद्रा'तील स्त्रीपार्ट्या लुगडी आणि पोलकी नेसत नसत काय? महाभारतकालीन स्त्रियांची वेशभूषा नक्की कशी होती? आणि मग एखाद्या 'सौभद्रा'त लुगडी नेसू शकत असतील, तर दुसर्या एखाद्या नाटकात समजा एखादी साबूदाण्याची खिचडी किंवा बटाट्याची भाजी उपासाला खाल्ली (तसाही कोणाला पत्ता लागणार आहे?) किंवा एखाददुसरा फारसी किंवा इंग्रजीतून आलेला मराठी शब्द वापरला, तर नेमके काय बिघडले? ऑडियन्सला जोपर्यंत चालून जाते तोपर्यंत काय हरकत आहे?
मुद्दा क्र. ४ हे मुद्दा क्र. ३चेच एक्स्टेन्शन असल्याने त्याचा समाचार वर घेतलेलाच आहे.
मुद्दा क्र. ५ तत्त्वतः मान्य होण्यासारखा आहे. 'अकारण' हा यातील कळीचा मुद्दा आहे आणि 'जाणूनबुजून' हे अध्याहृत आहे. अन्यथा कोणाच्या भावना कशाने दुखावल्या जाव्यात हे कोणी सांगावे?
भाषांतर
विसरलो. रामायण हे वाल्मीकीचे व महाभारत हे व्यासांचे. संस्कृत येत नसल्यास त्यांचे भाषांतर.
श्री.चंद्रशेखर यांनी मांडलेला मुद्दा मला मान्य नाही व या उद्देशानेच मी (१) लिहला आहे. त्याचे काय आहे कीं मूळ रामायण विविध भाषांमध्ये रुपांतरीत झाले तेंव्हा प्रत्येकाने मनसोक्त बदल केले
आहेत. तुलसी रामायण व वाल्मीकि रामायण यांत भरपूर फरक आहे. तेंव्हा बालीत न जाताही
प्रादेशिक भाषांमधील रुपांतरे हीही विचारत घेऊ नयेत असे मला वाटते. फार कशाला वाल्मीकीचे
रामायण व महाभारतातले रामायण यांतही फरक आहे. अर्थात माझे मुद्दे विचाराला चालना देण्या
पुरतेच. प्रत्येकाने आपणास काय वाटते ते मांडावे. पहिल्या दोघांनी उदाहरणे देऊन सुरवात केली
हे उत्तमच. (१) ते (५) चा विचार एकाच वेळी व्हावा असेही नाही.
शरद
व्यास आणि वाल्मिकी
राम-रावण आणि कौरव-पांडव हे ऐतिहासिक पुरुष मानले तर वाल्मिकी आणि व्यास यांनी महाकाव्य रचताना नायक आणि खलनायक दाखवण्यापोटी कोठे कोठे कल्पित प्रसंग घालून मुद्दा क्र. १ ते ५ नुसार(मुद्दा १ बदलून तेथे इतिहास पडताळून असे घेता येईल) महाकाव्ये चटकमटकदार बनवली त्याचे संदर्भ कसे मिळतील? :-)
इतर लेखकांकडे आणि त्यांच्या साहित्याकडे वळण्याआधी व्यास आणि वाल्मिकी यांच्या लेखनातील सत्यासत्यता पडताळणे अधिक इंटरेष्टींग वाटते.
महाभारतकालीन स्त्रियांची वेशभूषा नक्की कशी होती?
श्री. पर्स्पेक्टिव्ह यांच्याशी मी सहमत आहे.
राजा रवी वर्मा यांनी पुराणातले प्रसंग चित्रित करताना त्यांना सर्वात योग्य वाटलेली वेषभूषा म्हणून नऊवारी लुगडे सर्व स्त्रियांना दिले. याचा अर्थ त्या काली ही वेषभूषा त्या काली होती असा होत नाही. त्याच पद्धतीने कोणी नवीन रामायण लिहिले आणि त्यात रामाने जीन्स घातल्या म्हणून कथा वस्तूची सुंदरता कमी होत नाही. मी आधी उल्लेखलेल्या बाली मधील केचक नृत्यात राम सीता हे पूर्णपणे थाई किंवा कंबोडिया देशातील राम सीता यांच्या सारख्या वेषभूषेत असतात. त्याने कुठेच रसभंग झाल्याचे अनुभवले नाही.
चन्द्रशेखर
महाभारतकालीन स्त्रियांची वेशभूषा नक्की कशी होती?
श्री. पर्स्पेक्टिव्ह यांच्याशी मी सहमत आहे.
राजा रवी वर्मा यांनी पुराणातले प्रसंग चित्रित करताना त्यांना सर्वात योग्य वाटलेली वेषभूषा म्हणून नऊवारी लुगडे सर्व स्त्रियांना दिले. याचा अर्थ त्या काली ही वेषभूषा त्या काली होती असा होत नाही. त्याच पद्धतीने कोणी नवीन रामायण लिहिले आणि त्यात रामाने जीन्स घातल्या म्हणून कथा वस्तूची सुंदरता कमी होत नाही. मी आधी उल्लेखलेल्या बाली मधील केचक नृत्यात राम सीता हे पूर्णपणे थाई किंवा कंबोडिया देशातील राम सीता यांच्या सारख्या वेषभूषेत असतात. त्याने कुठेच रसभंग झाल्याचे अनुभवले नाही.
चन्द्रशेखर
थोडासा संभ्रमित
हा चर्चाप्रस्ताव वाचून मी थोडा संभ्रमित झालो आहे.
काहीच पथ्ये किंवा बंधने नसावीत हे पथ्य कसे? येथे काहीतरी अंतर्गत विरोध होतो आहे.
आणि "पोटगी" हा प्रकार तसा पाहिला तर आधुनिक आहे. (म्हणजे रामायण अनेक शतके लिहून बदलत गेले असले, तरी, पैकी बहुतेक काळात पोटगीची प्रथा नसावी.) उदाहरणातली पोटगी कथा कोणी लिहिली तर मुद्दा क्र. ४चे उल्लंघन होते.
खरे म्हणजे मुद्दा क्र. २ने बाकी सगळ्या मुद्द्यांबाबत माझ्या मनात संभ्रम उत्पन्न झाला आहे.
आता थोडे हलके घेणे : मुद्दा ५ बद्दल - आजकाल कोण कशाबद्दल दुखावला जाईल, सांगता येत नाही. रामाने बाळपणी चंद्र हवा म्हणून हट्ट केला ही कथा जुनी आहे, म्हणून बरे. नाहीतर "मर्यादापुरुषोत्तम राम बाळपणी हट्टी होता म्हणणार्याने मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद सोडावे" वगैरे आंदोलने खचित झाली असती.
शंका निरसन
(१) आचार्य धनंजय, आपण संभ्रमात पडावे असे मी काय लिहणार? अहो, मी लिहले आहे कीं
"लेखकाने काय पथ्ये पाळावीत याबद्दल आपले विचार मांडा. काही विचार १,२,३..हे विचार स्वतंत्र आहेत. एक म्हणेल पथ्ये नकोत, दुसरा म्हणेल लेखन कालबाह्य नको, त्यात रेल्वे, फोन नकोत,तिसरा म्हणेल भावना दुखवू नका. माझा आग्रह एवढाच की तुमचा विचार मांडताना उदाहरण द्या.
(२) चंद्रशेखरजी, आपण बालीचे उदाहरण दिलेत. तेथे वेषभुषाच नव्हे तर कथानकातही बदल आहे (जसा की महाभारतातही आहे). आपणास त्यात रसभंग होतो असे वाटले नाही. छान. एकाने आपला विचार सोदहरण मांडला.
(३) श्री.पर्स्पेक्टिव यांना रेल्वे, आयडेंटिटी कार्डही चालेल. उत्तम. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार.
(४) श्री. प्रियालीताईंना आधारित साहित्यापेक्षा वाल्मीकि-व्यासांतच जास्त रूची. आवड एकेकाची.
(५) सौभद्रात वेषभुषा काय असावी हा मुद्दा. जीन्स-फ़्रॉक असावा की नसावा यावर आपले मत द्या. रामायण-महाभारतकालीन कपडे हा विषय नाही. कोणी सांगावे, २५ वर्षांनंतरच्या द्रौपदी नाटकात नायिका एकवस्त्रा येईलसुद्धा!
(६) १ ते ५ हे काही विचार आहेत (माझे नव्हेत). मला काय वाटते ते तर अजून लिहावयाचेच आहे.
शरद
सौभद्र
शरदजी आता रामायण महाभारतात सौभद्र नाटक कुठुन आणलेत?. ती तर किर्लोस्करांची कवीकल्पना आहे. अर्जुनाची एक बायको श्रीकृष्णाची बहिण होती असे कोणी कवीने ठरवले व तसे महाभारतात घुसडले. किर्लोस्करांनी तीच कल्पना वापरली
चन्द्रशेखर
रामरावणयुद्ध
विदिशाला गेलो असतांना मी एक हिंदी भाषेतले पुस्तक वाचले. (एकदाच आणि ते सुद्धा जलद गतीने, त्यामुळे श्री.शरद यांच्या नियमात माझे वाचन देखील बसणार नाही. डॉ.कोहलींनी काय काय आणि किती वेळा वाचले ते मला ठाऊक असणे शक्यच नाही.) डॉ. नरेन्द्र कोहली यांनी लिहिलेले हे पुस्तक २००४ साली प्रकशित झाले आहे. श्रीराम आणि रावण यांचे युद्ध हा या पुस्तकाचा विषय आहे. या युद्धाच्या तयारीपासून अंतापर्यंत सर्व घटना त्यात त्यांनी आपल्या कल्पनेतून तपशीलवार रंगवलेल्या आहेत. या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे की त्यात कोठल्याही दैवी चमत्काराला किंवा अनैसर्गिक कृत्याला थारा दिलेला नाही. त्यातले कोणतेही पात्र आकाशात उडत नाही, अदृश्य होत नाही किंवा कोणाच्या नाकातून आत शिरून कानातून बाहेर वगैरे निघत नाही. वाल्मिकींनी लिहिलेले रामायण या नावाने जो ग्रंथ आज उपलब्ध आहे त्याचे संकलन गेल्या शंभर दीडशे वर्षातल्या विद्वानांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर केले असणार. त्यात जर शाप, उ:शाप, वरदान, उड्डाण, सूक्ष्मरूप धारण करणे, प्रगट होणे वगैरे गोष्टी असतील तर कोहलींचे पुस्तक त्याला धरून नाही.
या पुस्तकात सुद्धा अखेर रावणच मरतो, त्याचे आधी कुंभकर्ण, इंद्रजीत वगैरे मरतात, बाण लागून लक्ष्मण मूर्छित होतो आणि संजीवनी बुटीने तो बरा होतो वगैरे घटना घडतात. म्हणजे मूळ कथेच्या गाभ्याला धक्का लावलेला नाही. राम ही ऐतिहासिक व्यक्ती असली (किंवा असे गृहीत धरले) तरी त्याच्या जीवनकाळातले समाजजीवन कसे होते, कोणकोणते तंत्रज्ञान त्या काळात उपलब्ध होते आणि रोजच्या वापरात होते याबद्दल मला कसलीच ऐतिहासिक माहिती नाही. पण जे चित्र डॉ.कोहली यांनी रंगवले आहे ते आधुनिक नक्कीच नाही. माझ्या मते सगळ्याच पौराणिक कथा काल्पनिक असतात आणि त्या रचणा-या कवी किंवा लेखकांनी आपापल्या कल्पनेतून त्यात निरनिराळ्या प्रकारची चित्रे रंगवलेली असतात. डॉ.कोहली यांनी असाच एक प्रयत्न केला आहे. जे कांही आहे त्यात आपसात विसंगती नाही. ते कालबाह्य आहे की नाही हा गूढ प्रश्न आहे.
रामायणकालात ज्या रूढी, नीतीनियम प्रचारात होते असे आज समजले जाते, त्यात विशेष फरक केलेला दिसत नाही. समुद्रात दगड टाकून सेतू बांधणे अशासारख्या अचाट कल्पना त्यात नाहीत. लंकेपर्यंत पोचण्याचा कोहली साहेबांनी लिहिलेला मार्ग त्या मानाने किंचित अधिक विश्वसनीय वाटतो. तो देखील संभवनीय वाटत नसला तरी त्यात विज्ञानाने सप्रमाण सिध्द केलेल्या नियमांचे उल्लंघन होत नाही. पण असे करण्याने अनेक लोकांच्या भावना दुखावल्या जाणे शक्य आहे. तसे होणे अकारण आहे की सकारण आहे यावर मतभेद होऊ शकतात.
या धाग्याचा मुख्य उद्देश मला कळलेला नाही हे मी आधीच स्पष्ट करतो. पण या निमित्याने मी वाचलेल्या एका वेगळ्या प्रकारच्या पुस्तकाची मला आठवण झाली म्हणून ती माहिती या प्रतिसादातून देत आहे.
अर्जुन-सुभद्रा
श्री शरद यांनी मागच्या एका लेखात अर्जुन कृष्णापेक्षा १८ वर्षांनी लहान असल्याचे म्हणले आहे. बलराम हा कृष्णाचा मोठा भाऊ असे किर्लोस्कर त्यांच्या नाटकात म्हणतात आणि सुभद्रा लहान बहिण. ती जरी कृष्णापेक्षा ८ वर्षांनी लहान असे मानले तरी अर्जुनाने त्याच्यापेक्षा १० वर्षे जास्त वय असलेल्या स्त्री बरोबर विवाह केला असेल् हे असंभवनीय वाटते.
चन्द्रशेखर
याहून अधिक
अर्जुन आणि सुभद्रेच्या वयातील अंतर याहूनहि अधिक असावे असे वाटते. कुणीतरी (कुरूंदकर???) व्यवस्थित गणित मांडून त्यांच्या विवाहसमयी अर्जुन सुमारे ५० तर सुभद्रा सुमारे १८-२१ वर्षे वयाची असावी असे दाखवले आहे. यास्तव त्यांचा विवाह हा प्रीतिविवाह असण्याची शक्यता कमीच आहे असा तर्क मांडला होता. हा विवाह केवळ कृष्णाच्या राजकारणाचा भाग या दृष्टीने पाहिला जाऊ शकतो.
नक्की लेखक व पुस्तक आठवत नाही. आठवल्यास इथे देईन.
भैरप्पांचे 'पर्व' (प्र.का.टा.आ.)
(प्रतिसाद एकाहून अधिक वेळा आल्याने काढून टाकला आहे)
भैरप्पांचे 'पर्व' (प्र.का. टा. आ.)
(प्रतिसाद एकाहून अधिक वेळा आल्याने काढून टाकला आहे)
भैरप्पांचे 'पर्व'
भैरप्पांचे 'पर्व' अवश्य वाचावे. मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. सर्व चमत्कारांना फाटा देऊन फक्त घटनांच्या आधारे महाभारत उभे केले आहे. क्वचित् त्यांची पात्रे आपल्या पारंपारिक गृहितकांना छेद देऊन वागतात तेवढे खटकते (उदा. भीमाचे धृतराष्ट्राबद्दलचे हीन् उद्गार) पण एकुणच एक 'वस्तुनिष्ठ' महाभारत एक शक्यता म्हणून पहायला हरकत नसावी.
अवांतरः
या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा ढाचा अथवा फॉर्म. खांडेकरांनी 'ययाती' मधून लोकप्रिय केलेला निवेदनाचा ढाचा आणखी पुढे नेऊन त्यांनी एक अधिक प्रवाही ढाचा दिला आहे. सामान्यपणे निवेदनाच्या फॉर्ममध्ये एका पात्राचे निवेदन संपून दुसर्याचे चालू झाले की काही घटनांची पुनरावृत्ती होते. जर इथे दृष्टीकोनातील फरक दाखवणे हा उद्देश नसेल तर हे कादंबरीच्या प्रवाहाला खंडित करते. भैरप्पांच्या कथेत एका पात्राच्या निवेदना कडून दुसर्याच्या निवेदनाकडे हे अधिक सहज होते. पहिल्याच्या निवेदनाच्या अखेरिस दुसर्याचे आगमन् होते. पहिला दुसर्याबद्दल सांगत असतानाच दुसरा कथेचा धागा उचलून आपले निवेदन चालू करतो. यात कथाही एकाच दिशेने चालत रहाते. दुसर्याच्या निवेदनामुळे एरवी आवश्यक ठरणारे कथेचे 'रिवाइंडिंग' टळते. असो एवढे विषयांतर पुरे.
आगरी रामायण
वेगळे रामायण म्हणले की जॉनी रावत चे "आगरी रामायण" हटकून आठवते.. तेच हो ते सुरसुरी बाण वाले ;)
(नागरी)ऋषिकेश