कुटुंब नियोजन

गेल्या काही वर्षांत लग्न झालेल्या सुखवस्तू जोडप्यांना एकापेक्षा अधिक मुलं नको असतात असं आढळून आलं आहे. किंबहुना त्याबद्दल ती आग्रही असतात. पण या हट्टामुळे भविष्यांत काही जवळची व लांबची रक्ताची नाती कशी इतिहासजमा होणार आहेत ते पहा.

ज्या कुटुंबात एकुलता एक मुलगा किंवा एकुलती एक मुलगीच आहे त्या कुटुंबांतील मुलामुलींना सख्खा भाऊ व सख्खी बहीण हे नातं काय असतं ते समजणार नाही. अशा एकुलत्या अपत्याचं लग्न दुसर्‍या कुटुंबातील एकुलत्या एक अपत्याशी झालं व त्यांनाही एकएकच अपत्य झालं तर त्या मुलांना भाऊ व बहीण याशिवाय काका, आत्या, मामा, व मावशी ही नाती काय असतात तेही उमगणार नाही. त्यामुळे चुलतभाऊ, आतेभाऊ, मावसभाऊ, मामेभाऊ, म्हणजे काय तेही कळणार नाही. दीर, नणंद, भावजय, ही नातीही अस्तित्वात राहणार नाहीत.

ही सर्व रक्ताची नाती टिकवायची असतील तर प्रत्येक जोडप्याला दोन मुलगे व दोन मुली अशी किमान चार मुलं हवीत.

मध्यंतरी ऑस्ट्रेलियाच्या एका मंत्र्यानी, "प्रत्येक जोडप्यानी एक मूल आईसाठी, एक वडिलांसाठी व एक देशासाठी अशा किमान तीन मुलांना जन्म द्यावा" असं आपल्या जनतेला आवाहन केल्याचं वाचनात आलं होतं. दुसर्‍या एका बातमीप्रमाणे आजकाल आपल्याकडे आईवडील मुलाला सैन्यात पाठवायला फारसे तयार नसतात. असं म्हणतात की खडकवासल्याच्या एन् डी ए मधेही आजकाल प्रशिक्षणार्थींच्या जागा रिकाम्या राहतात. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याचं आवाहन अगदीच दुर्लक्ष करण्यासारखं नाही. याचा अर्थ प्रत्येक जोडप्याला किमान पाच मुलं असायला हवीत.

(ह. घ्या) 'सावत्र' हे नातं टिकवायचं असेल तर द्विभार्या प्रतिबंधक कायदा रद्द व्हायला हवा. अपत्यं असलेल्या विधवा, विधुर व घटस्फोटितांनी आवर्जून पुनर्विवाह करावेत.

हे लिखाण किती गंभीरपणी घ्यायचं ते तुम्हीच ठरवा.

लेखनविषय: दुवे:

Comments

अर्थ

हॅ हॅ हॅ. अंगवस्त्र शब्दाचा अर्थ मुलांच्या लक्षात यावा म्हणून आता मी अंगवस्त्र ठेवणार आहे. तसेच वेश्या म्हणजे काय हे कळण्यासाठी 'तिकडे' एक शैक्षणिक सहल काढावी म्हणतो.

थोडं सिरिअस. टिकवून ठेवायचं ते काय आणि का याचा विचार व्हायला हवा.

हॅहॅहॅ

तसेच वेश्या म्हणजे काय हे कळण्यासाठी 'तिकडे' एक शैक्षणिक सहल काढावी म्हणतो.

'तिकडे' वरुन आठवलं. आमच्याकडे एक श्री. आंबेकर म्हणून आहेत, आमचे ते मित्रही आहेत. 'तिकड'चा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. ते तुम्हाला माहित आहे का ?

मागणी-पुरवठा की उत्क्रांतिवाद ?

मागणी-पुरवठ्याच्या सिद्धांताची आणि उत्क्रांतिवादाची सांगड घालायला हवी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

न+अती

नाती = न+अती.
गेल्या काही दशकांपुर्वी लग्न झालेल्या, न झालेल्या जोडप्यांनी अतिरेक केल्याने नाती जरा अती झाली आहेत कदाचित. :) म्हणून सध्या न+अती असा विचार सुरु आहे बहुतेक. :)


हं

नात्यांचा गोतावळा असला आणि तो एकत्र जमला की मला तरी छान वाटते. माझ्या पुढील पिढीला मला हा जो आनंद मिळाला/मिळतो त्याच्या निम्मा आनंद तरी नक्कीच नसेल. अर्थात यात आनंद वाटावा की नाहि हा प्रत्येकाच्या भोवतालच्या वातावरणाचा, जडणघडणीचा व स्वभावाचा भाग झाला.

तसेच, माणसे कमी जोडण्यात फक्त कमी झालेल्या नात्यांचा वाटा नसून बदललेल्या आयुष्यमानाचा-जीवनपद्धतीचा, बदललेल्या आयुष्याच्या वेगाचा आणि मुख्य म्हणजे बदललेल्या मानसिकतेचा देखील वाटा आहे.

असो. यावर बरंच लिहिता येईल पण कालाय तस्मै नमः म्हणून सोडून आपापल्या फ्लॅटचे लॅच बंद करून घरात चौकोनी-त्रिकोणी कुटुंबाने बसून रहायचं झालं

बाकी नाती हवीहवीशी वाटतात त्यांच्यासाठी: स्वतःला चार मुलं असायची गरजच काय? दोन स्वत:ची व दोन दत्तक घेतल्यास हा प्रश्न सुटु शकेलसे वाटते.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

नवी नाती?

दोन स्वत:ची व दोन दत्तक घेतल्यास हा प्रश्न सुटु शकेलसे वाटते.
त्यातून दत्तक मुलगा/ मुलगी, दत्तक भाऊ/ बहीण वगैरे नात्यांची आणखी एक शृंखला तयार करता ये ईल. दत्तक काका, दत्तक मामा वगैरे असतात का? पूर्वीच्या काळी ज्यांना मूल नसे असेच लोक बहुधा मुलगा दत्तक घेत असत त्यामुळे एवढे जंजाळ होत नसावे.

माझ्या लहानपणी आमच्या एकत्र कुटुंबात दिवाळीला निदान पंचवीस तरी 'घरातली' माणसे असायची. ती सगळी या ना त्या कामाला लागायची. त्याखेरीज कोणतेही काम न करणारे जावई, साडू, व्याही वगैरेसारखे 'पाहुणे' वेगळे. आता 'गेले ते दिन गेले' असे वाटत असे तरी ते दिवस पुन्हा यावेत असेही वाटत नाही. कालय तस्मै नमः

नाती

प्रत्येक जोडप्यानी एक मूल आईसाठी, एक वडिलांसाठी व एक देशासाठी अशा किमान तीन मुलांना जन्म द्यावा

देशासाठी मूल द्यावे ही कदाचित देशप्रेमापोटी मारलेली भावनिक हाक समजता येईल पण एक मूल आईसाठी आणि एक मूल वडिलांसाठी हा काय प्रकार आहे ते कळले नाही. मला वाटले की मूल/ मुले हे/ही आई-वडिल या दोघांचे/ची असते/तात. इथे घटस्फोटानंतरची तरतूद करणे सुरु आहे काय?

असो.

'सावत्र' हे नातं टिकवायचं असेल तर द्विभार्या प्रतिबंधक कायदा रद्द व्हायला हवा.

गरज नाही. समाजात घटस्फोटांचे आणि पुनर्विवाहांचे प्रमाण वाढले आहे आणि वाढत राहिल. काही नाती आपल्या समाजात आणखीही वाढतील ती अशी - हाफ ब्रदर, हाफ सिस्टर, हाफ ब्रदरची स्टेप सिस्टर वगैरे.

बरोबर

काही नाती आपल्या समाजात आणखीही वाढतील ती अशी - हाफ ब्रदर, हाफ सिस्टर, हाफ ब्रदरची स्टेप सिस्टर वगैरे.

शिवाय 'सरोगेट' (मराठी?) मातांची संख्याही वाढत राहणार. कृतिम रेतनातून (आर्टिफिश्यल इनसेमिनेशन) निर्माण झालेल्या भावंडांना काय म्हणायचे? त्यांच्या मायबापांना काय म्हणायचे?

एकच अपत्य

या प्रश्नाकडे, देशाच्या एकंदर लोकसंख्येवर होणारा याचा परिणाम या दृष्टीनेही बघता येईल.
कोणत्याही देशातल्या लोकसंख्येमधे, वयांचा योग्य बॅलन्स (उदा. म्हातारी माणसे जास्त नसणे ) टिकून रहाणे आवश्यक असते. नाहीतर देशात काम करणारी माणसे कमी होत जातात. त्याचप्रमाणे देशाची लोकसंख्या टिकून राहण्यासाठी बर्थ रेट 2.1 मुले प्रति जोडपे एवढा कमीत कमी असणे आवश्यक असते. बहुतेक प्रगत देशात हा आता 1.45 ते 1.9 यामधे गेला आहे (अमेरिका सोडून) या सर्व देशांना पुढच्या 15 ते 20 वर्षात वर्क फोर्स ची प्रचंड कमतरता भासणार आहे. चीनमधेही एक मूल ही पॉलिसी आता हळूहळू बदलावीच लागत आहे.

आपल्याकडे अडचण येऊ नये, कारण बरीच मंडळी अजूनही क्रिकेट टीम तयार करण्याच्या मागे निदान उत्तरेकडॆ तरी असतात.

चन्द्रशेखर

अमेरिकेत किती आहे?

बहुतेक प्रगत देशात हा आता 1.45 ते 1.9 यामधे गेला आहे (अमेरिका सोडून) या सर्व देशांना पुढच्या 15 ते 20 वर्षात वर्क फोर्स ची प्रचंड कमतरता भासणार आहे.

अमेरिकेत हा रेट किती आहे?

माझ्या शेजार्‍याला सध्या सहा मुले आणि एक कुत्रा* आहे.

*अमेरिकन लोक पाळीव प्राण्यांना आपल्या पोटच्या पोरांप्रमाणेच वागवतात. अनेकांना त्यांच्या कुत्र्याला कुत्रा म्हटले की राग येतो असा अनुभव आहे.

पंचाईत....

अमेरिकन लोक पाळीव प्राण्यांना आपल्या पोटच्या पोरांप्रमाणेच वागवतात. अनेकांना त्यांच्या कुत्र्याला कुत्रा म्हटले की राग येतो असा अनुभव आहे.

छान निरीक्षण आहे...मजा आली! पण मग कुत्र्याबाबत बोलायचे झाले तर काय करावे? कुत्र्यांना पोटच्या पोराप्रमाणे वागवतात म्हटल्यावर कुत्राही मुलगाच झाला आणि मग तुम्ही आज सकाळी तुमच्या मुलाला साखळीने बांधून फिरायला का आणले नाही? असं विचारल्यावरही रागच येण्याचा संभव आहे. :-)
एकंदरीत मोठीच पंचाईत होऊन बसली आहे....

-सौरभ.

==================

सहमत

:)
छान निरिक्षण.. आम्रिकेत आहेत ती नाती तोडून पाळीव प्रांण्यांशी नाती जोडणार्‍या व्यक्ती बघितल्या आहेत.
माझी एक युजर तिच्या ३ घटस्फोटांनंतर आपल्या ६ कुत्र्यांबरोबर रहात आहे, ज्यांना तीने प्रत्येकाला एक स्वतंत्र खोली दिली आहे :)

यावरून "कुत्रे माणसाला पाळतात का माणसे कुत्र्याला पाळून असतात" हे एक मालक जातीला तुच्छ लेखणारे एक अविनोदी जातीवाचक वाक्य आठवले (उपक्रमाच्या धोरणात बसतं ना हे वाक्य?)

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

टोटल फर्टिलिटी रेट (टी.एफ्.आर)

अमेरिकेतला २००८ मधला टी.एफ. आर २.१ आहे
चन्द्रशेखर

 
^ वर