कृतिका नक्षत्र

लोकहो,

कृतिका हे नक्षत्रमालेतील तिसरे नक्षत्र आहे. इंग्रजीत याला ’ईटाटारी’ असे म्हणतात.

हे त्रिपाद नक्षत्र असून याचा पहिला चरण मेषेत तर पुढील तीन चरण हे वृषभेत येतात. या चार चरणांचे चरणस्वामी अनुक्रमे गुरू, शनी, शनी आणि गुरू हे आहेत.

हे नक्षत्र क्रूर, अधोमुखी आणि सुलोचनी आहे. नक्षत्राचा स्वामी रवी, राशीस्वामी अनुक्रमे मंगळ व शुक्र असल्यामुळे या नक्षत्रात रवीचा करारीपणा, मंगळाचा तापटपणा तर शुक्राचे सौंदर्य यांचा सुरेख संगम झालेला दिसून येतो. दैवत अग्नी असल्यामुळे या नक्षत्रावर जन्मणार्‍या व्यक्ती प्रखर तेजाच्या व कोपिष्ठ असतात.

या नक्षत्रावर जन्मलेल्या पुरूषांचा बांधा मजबूत आणि आकर्षक असतो. शरीर घट्ट व पीळदार असते. हाडापेराने मजबूत असतात. जीवनशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.

या व्यक्ती पराक्रमी, धाडसी, निग्रही तसेच करारी असतात. कोणत्याही संकटाला न डगमगता धैर्याने तोंड देऊन त्या महत्तम पदास पोहोचलेल्या आढळून येतात. हे नक्षत्र राक्षसगणी, क्रूर व कष्टप्रद असले तरी प्रचंड कार्य करणारे, प्रसिध्दी देणारे आणि उच्चपदाला नेणारे आहे.

स्त्रियांनाही हे नक्षत्र शरीरप्रकृती आणि सौंदर्याच्या दृष्टीने चांगले असते.

शरीराचा प्रत्येक भाग उठावदार असतो. अवयव पीळदार व घट्ट असतात. चेहरा त्रिकोणी व उभट, कपाळ भव्य पण जरा पुढे आलेले असते. नाक जरा मोठे असते. चेहरा सुंदर व आकर्षक असतो.

त्या सौंदर्यवान असतात, मात्र त्यांच्या सौंदर्यात शुक्राचा नाजूकपणा किंवा कोमलपणा दिसून येत नाही, तर त्यांच्या सौंदर्यात उग्रपणा व रागीटपणा दिसून येतो.

कृतिकेचे सौंदर्य हे लवंगी मिरचीप्रमाणे तिखट सौंदर्य आहे.

चेहर्‍यावर तर एकप्रकारची बेपर्वाई दिसून येते. यांचे चालणे व बोलणे देखील कसे ऐटबाज व ठसकेबाज असते. स्वभाव मानी, रागीट, करारी, दुराग्रही, कुर्रेबाज व जरा गर्विष्ठ असतो. बोलणे जरा फटकळ असते.

दुसर्‍यांना घालूनपाडून बोलण्यात किंवा त्यांचा पाणउतारा करण्यात त्यांना फार मजा वाटते. तरीही या स्त्रिया महत्वाकांक्षी, पराक्रमी व कर्तृत्ववान असतात.

स्वतंत्र वृत्ती त्यांना जास्त प्रिय असते. पतीपरायण असणे जडच. उलट पतीनेच पत्नीपरायण असावे अशी यांची अपेक्षा असते.

रंगसंगतीपेक्षा भडक रंगाचा पोशाख, तसेच उंची व भारी वस्त्रापेक्षा आधुनिक फॅशनचा, शरीराचा प्रत्येक अवयव उठून दिसणारा तंग पोशाख यांना जास्त आवडतो.

खर्‍या मौल्यवान अलंकारांपेक्षा कृत्रिम व दिखाऊ अलंकार यांना आवडतात.

कृतिका म्हणजे खरोखरचं एक फटाकडी, रागाने फणफणलेली सुंदर स्त्री. म्हणूनच या कृतिकेच्या तिखट सौंदर्यावर, ठसकेबाज बोलण्यावर व डौलदार कमनीय चालीवर भाळणारे महाभाग कमी नाहीत.

या नक्षत्रात रवी असता उत्तम फल मिळते. त्या व्यक्ती पराक्रमी, महत्वाकांक्षी आणि शूर असतात. अधिकारयोगाला हा रवी फार चांगला. रवी पापग्रहाने बिघडल्यास जुलूम, अन्यायी व पाशवी अत्याचार करणार्‍या असतात.

चंद्र असता चंचल, मानी, उतावळा व धडपड्या स्वभाव दिसतो.

मंगळ शरीरप्रकृतीला उत्तम पण स्वभावाने अतिशय तापट, हट्टी आणि खुनशी असतात.

बुधाला हे नक्षत्र अनुकूल नाही.

गुरू असता शरीरप्रकृती, पराक्रम, मानसन्मान, शिक्षण या सर्व दृष्टीने अनुकूल असतो.

शुक्र असता, विलासी, शरीरसौख्य, सौंदर्य, चैनबाजी यांना चांगला असतो. स्वभाव रजोगुणी असून कामवासना जास्त असते. शुक्र बिघडल्यास व्यसनाधीन होतात. वैवाहिक सौख्य मिळत नाही. कारण यांचे लक्ष स्वत:च्या बायकोपेक्षा इतरांच्या बायकांकडे जास्त असतं. प्रेमभंग आणि घटस्फोटाचे प्रसंग येतात.

शनी असता पराक्रमी, धडपड्या आणि कष्टाळू असतो. मात्र मेषेत असता कष्ट पडले तरी धन भरपूर मिळते.

राहू असता महापराक्रमी, कर्तृत्ववान व निधड्या छातीचा असतो. मात्र राहू बिघडलेला असेल तर हे लोक स्मगलिंग, चोरटा व्यापार, अथवा इतर समाजविघातक धंदे करणारे असतात.

केतूला हे नक्षत्र साधारणच. श्रम फार व पैसे कमी ही अवस्था. हर्षल असता उपद्व्यापी आणि लहरी असतो. विजेवर चालणार्‍या यांत्रिक कामासंबंधीच्या व्यवसायाला चांगला असतो.

नेपच्यून वृषभ कृतिकेत बागायत, शेतीवाडी यांना चांगला असतो.

या नक्षत्रावर होणारे रोग उष्ण प्रकृतीचे, दाहक, वेदनायुक्त आजार असतात. अतिउष्णतेमुळे अंगाची लाही होणे, डोळे जळजळणे, नाकातून किंवा हिरडीतून रक्त येणे, पडणे, खरचटणे, कापणे, भाजणे, शस्त्रांच्या जखमा होऊन तीव्र स्वरूपाचा रक्तस्त्राव होणे, गळा वा घसा सुजणे, अन्ननलिकेला फोड येणे, मूळव्याध, मोतिबिंदू हे होत.

स्त्रियांच्या कुंडलीत शुक्र या नक्षत्रात असता, पाळीच्या वेळी अतिरिक्त रक्तस्त्राव दाखवतो (मेष कृतिकेत). या नक्षत्रात शनी, मंगळ, राहू असून ते अशुभ स्थानात असता अपघातात, खूनापासून येणारे मरण दाखवतो.

या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती कितीही प्रयत्न केले तरी सापडत नाही.

मुंजी, विवाह, बारसे वगैरे शुभ कार्याला हे नक्षत्र वर्ज्य असले तरी इतर अनेक गोष्टींना चांगले आहे.

शस्त्रक्रियेसाठी हे नक्षत्र फार चांगले, तसेच "प्लॅण्ड सिझेरियन"साठी सुध्दा हे अनुकूल आहे.

तसेच हिंस्त्र पशुंना पकडणे, सापाचे विष काढणे इत्यादीसाठी हे वापरले जाते.

अधोमुखी नक्षत्र असल्यामुळे विहिरी, तलाव खोदणे, पुरलेले द्रव्य बाहेर काढणे, इमारतीच्या पायाभरणीसाठी खोदकाम करणे इत्यादी कार्यांना प्रशस्त आहे.

मात्र इतर शुभ व मंगल कार्यांना हे नक्षत्र वर्ज्य करावे.

आपला,
(सविस्तर) धोंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

कृतिका

धोंडोपंत,
मला वाटत होतं की कृतिका म्हणजे प्लेडीस् हे नक्षत्र आणि ते सहा फिकट तार्‍यांचा पुंजका असून आख्याइकेप्रमाणे सप्तर्षींच्या (घाबरून) पळून गेलेल्या सहा बायका असलेलं नक्षत्र आहे (अरुंधती पळून न गेल्याने ती तेवढी वसिश्ठां बरोबर सप्तर्षींमध्येच आहे). गंमत म्हणजे मी म्हणतोय ते कृतिका नक्षत्र खरोखरंच जवळ जवळ असलेल्या नवनिर्मित तार्‍यांपासून बनलेलं आहे. त्याचं एक सुंदर छायाचित्र इथे बघा -
http://news.yahoo.com/photo/070413/480/c0f8a86b11ff402c9a36bd3f77aca928

सुंदर चित्र

कृत्तिकेची माहिती मनोरंजक वाटली. एखाद्या नक्षत्रावर एखादी गोष्ट हरवणे म्हणजे काय?

खिरे, चित्र आवडले. कृत्तिका म्हणजे प्लेडिस, साध्या दुर्बिणीतूनही सुंदर दिसतात.

कृत्तिका

नमस्कार.
कृत्तिके संबंधी अधिक माहिती अवकाशवेध या सुंदर आणि माहितीपूर्ण संकेतस्थळावर वाचता येईल. (http://www.avakashvedh.com/bharatiya/03.htm)
-- (खगोलप्रेमी) लिखाळ.

उत्तम दुवा

उत्तम दुवा आहे, आणि ते संकेतस्थळ पण छान दिसतय. धन्यवाद!

त् + त् + इ

पंत,
माहिती आवडली. नावातील लहानशी चूक सुधारून घ्यावी कृतिका नव्हे कृत्तिका हवे.
खिरे म्हणतात तसे कृत्तिका म्हणजे प्लेडिसच.
- दिगम्भा

या पुस्तकात पान क्र.२१ वर तिसर्‍या प्यार्यात जसे च्या तसे आहे.

नमस्कार धोंडोपंत,
लेखमाला चांगली आहे, परंतु
कृतिका नक्षत्र या लेखात,
'या व्यक्ती पराक्रमी, धाडसी, निग्रही तसेच करारी असतात. कोणत्याही संकटाला न डगमगता धैर्याने तोंड देऊन त्या महत्तम पदास पोहोचलेल्या आढळून येतात. हे नक्षत्र राक्षसगणी, क्रूर व कष्टप्रद असले तरी प्रचंड कार्य करणारे, प्रसिध्दी देणारे आणि उच्चपदाला नेणारे आहे.

स्त्रियांनाही हे नक्षत्र शरीरप्रकृती आणि सौंदर्याच्या दृष्टीने चांगले असते.

शरीराचा प्रत्येक भाग उठावदार असतो. अवयव पीळदार व घट्ट असतात. चेहरा त्रिकोणी व उभट, कपाळ भव्य पण जरा पुढे आलेले असते. नाक जरा मोठे असते. चेहरा सुंदर व आकर्षक असतो.'

हे वाक्य, जोतिषालंकार पंचांग गणितमार्तंड माननिय श्री. प्रभाकर आंबेकर लिखित 'नक्षत्र जोतिष' (तृतियावृत्ती १६ मे १९९६, चंद्रवल्लभ प्रकाशन, पुणे.) या पुस्तकात, पान क्र.२१ वर तिसर्‍या परिच्छेदात जसे च्या तसे आहे.
आपण या पुस्तकाचा लेखमालेसाठी वापर करत असाल तर उत्तम आहे, परंतु वापर केल्यावर श्रेय/संदर्भ देणे ही आपले कर्तव्यच आहे. संदर्भ देण्याने लेखकाची व लिखाणाची विश्वासार्हता वाढते.
मात्र, जोतिषात अनेक ग्रंथांमध्ये पुनरुक्ति असते.
या न्यायानुसार आपले विचार इतर ग्रंथांतून आले असल्यास,
तसे नमूद करणे योग्य राहिल असे आमचे म्हणणे आहे.

आपला विनम्र,
गुंडोपंत

नक्षत्रलोक

नक्षत्र लोक हे पं महादेव शास्त्री जोशी यांचे पुस्तक फार् सुन्दर आहे

 
^ वर