मान्सून धमाका
मान्सून धमाका! भव्य प्रदर्शन व विक्री, २०%, ३०%, ४०%... सूट!!! पावसाळा सुरू झाला की अशा जाहिराती आपण पेपरमध्ये वाचतो. भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन, मुंबई, दिल्ली नंतर आपल्याच गांवात सर्वात प्रथम हे भव्य प्रदर्शन येत आहे. मुंबई, दिल्ली च्या नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. अशा आशयाच्या ह्या जाहिराती.
प्रदर्शन बघणे न बघणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
हे प्रदर्शन ज्या पटांगणावर भरते तिथे लाकूड आणि टिनपत्र्याच्या तकलादू शेड्स/स्टॉलस् उभारल्या जातात. छतावर पंखे, झगमगीत कापड,झूंबर लावून छत सजवलले जाते. जमिनीवर लाल गालीचे टाकून प्रदर्शन बघायला येणार्यां चे लाल पायघड्या टाकून स्वागत केले जाते. कुंड्यानमधिल शोभिवंत झाडे, कारंजे लावून आल्हाददायक कृत्रिम वातावरण तयार केलेले असते. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकं असतात. जवळपास सर्वच मोसमात ह्या प्रकारचा देखावा प्रदर्शनांमध्ये पाहायला मिळतो.
पावसाळ्यात जमिन ओली झालेली असते. पाऊस पडत असेलतर जागोजागी चिखल झालेला असतो. लाल पायघड्या ओल्या झालेल्या असतात. डोक्यावर ट्प ट्प पाणी पडत असतं, पत्रे फाटलेले असतात. वीजयंत्रणा निट काम करत नाही. असे बरेच त्रास नागरिकांना व स्टॉलधारकांना होत असतात. तरीपण प्रदर्शन बघायला तूफान गर्दी असते.
५-६ वर्षापूर्वी पाऊस आला की मजा वाटायची. पण आता मला पावसाची थोडी भीती वाटते. कधी कसा पाऊस पडेल हे सांगता येत नाही. वीजांचा कडकडाट होत मुस़ळधार पाऊस पडला की खूप भीती वाटते. ह्या बेफाम पावसाचे मी काही वाईट अनुभव घेतले आहेत. त्यामूळे पावसाचा आनंद लुटण्याची जागा आता भीती ने घेतली आहे.
मागच्या वर्षी मी नाशिकच्या डोंगरे वस्तीगॄहाच्या मैदानावर असलेले प्रदर्शन बघायला गेले होते. दुपारची वेळ होती. पाऊस पडून गेला होता. चांगले ऊन पडले होते. प्रदर्शन बघत असताना. थोडा रिमझिम पाऊस पडायला सुरूवात झाली. ह्या रिमझिम पावसाची जागा कधी वीजांचा कडकडाट होऊन मुसळधार पावसाने घेतली हे कळलेच नाही. मी एका स्टॉलजवळ उभी राहून काही वस्तू बघत होती. त्या स्टॉलवरच्या छताखाली पाणी गळत होते म्हणून स्टॉलधारकाने आयोजकांकडे तक्रार केलेली होती. अशाप्रकारच्या तक्रारी २-३ दिवसांपासून बर्याच आल्यामुळे आयोजकांनी त्याची डागडूजी करायचे काम तिथे काम करणार्या कामगारांवर सोपवली होती.
त्यातील एक कामगार एवढया पावसात पटकन छतावर चढला अणि काही काम करायला घेणार येवढ्यात वीजेचा कडकडाट झाला आणि वीज छतावर काम करणार्या कामगाराच्या अंगाला स्पर्श करून गेली. तो कामगार छतावर कोसळला आणि धबकन आवाज झाला. माझे लक्ष छताकडे गेले तेंव्हा मला एक पाय छताच्या पत्र्यातून खाली लोंबकळताना दिसला. मन सुन्न झाले. थोड्याच वेळात तिथले वातावरण बदलले. लोकांचा आरडा ओरडा, रडारड सुरू झाली. ५-६ मिनीटे झाली कोणाला काहीच सूचत नव्हते. कोणी छतावर जाऊन त्या कामगाराचे काय झाले हे पण बघितले नव्हते. मिडियाचे लोक,रूग्णवाहिका मैदानावर होत्या पण कोणी एकदम पुढे आले नाही. ५-६ मिनीटांनी काही कामगार छतावर चढले आणि एक कोळसा झालेला मृत देह खाली आणला. त्या देहाला रूग्णवाहिकेत टाकून पुढच्या कामकाजासाठी घेऊन गेलेत.
ह्या प्रसंगामुळे मनात खूप प्रश्न आले. त्यातील हे काही प्रश्न:
तो कामगार तिथे नसता तर काय झाले असते?
त्याच्यामुळे आपले प्राण वाचलेत का?
एक माणूस सोडला तर तिथ उपस्थित असलेल्या कोणाला काहीच कसे झाले नाही. देवाने असे का केले असेल?
वीज शहरात कशी काय पडली? (माझा भाबडा समज होता. वीज फक्त शेतात पडते.)
ह्या ठिकाणी http://www.cessind.org/images/LIGHTNING-BROCHURE.pdf) " title="vij">वीज प्रतिरोधक यंत्र (Lightning Arrester) लावले असते तर हा प्रसंग घडला असता का?
वीज ह्या क्षेत्रात पडू नये ह्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी?
त्या कामगाराचे काय नांव होते? त्याच्या घरच्यांचे पुढे काय झाले? त्याचा विमा काढला होता का?
ह्या प्रश्नांसोबतच मी घरी परत गेली. टिव्ही लावला, टिव्हीवर ह्या प्रसंगाची काही बातमी दाखवतात का हे बघण्याचा प्रयत्न केला. डोळ्यांसमोर बघितलेले विदारक दृश्य काही केल्या जात नव्हते. मला वाटले होते मिडीयावाले आता हे टिव्हीवर दाखवतील. रेडियोवर ही बातमी ऐकायला मिळेल. माझ्यामते ही त्या दिवसातली नाशिकमधील "ब्रेकिंग न्यूज" होती. आज नाहीतर दुसर्या दिवशीच्या गांवकरी, देशदूत, सकाळ, लोकमत ह्या पेपरांमध्ये पहिल्या पानावर ठळक बातमी असेल. माझा अंदाज फोल ठरला. एका पेपरमध्ये नक्की कोणता पेपर होता ह्याचे नावं आता मला आठवत नाही, पण दुसर्या की तिसर्या पानावर लहानशी ही बातमी होती.
नाशिकच्या कमीत कमी १००-२०० लोकांनी ह्या प्रसंगाचा अनुभव घेतला होता पण त्याची मिडीयाने दखल घेतली नव्ह्ती.
का बंरे असे झाले असेल? ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रशासनावर ताशेरे ओढले जाणार होते म्हणून ह्या प्रसंगाची वाच्यता मिडीयाने कुठेही केली नाही? का? इतर नागरिकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून ही बातमी प्रसिद्ध केली नाही असे होते का?
अशा प्रसंगाला नागरिक आणि प्रशासनाने खबरदारीचे कोणते उपाय योजले पाहिजेत?
सार्वजनिक समारंभात असे मैदानावर तंबू ठोकून कार्यक्रम होत असतात त्यावेळी सुद्धा बरेच छोटे मोठे अपघात पाऊस आल्यामुळे होत असतात. त्यावर ही प्रशासनाने काही अटी नागरिकांच्या सुरक्षेसाठी घालून द्यायला पाहिजे. ह्या अटी फक्त कागदांवरच नको. प्रत्यक्ष अंमलात आणायला पाहिजे.
पेपर मध्ये वाचायला मिळालेली वीज प्रतिरोधक यंत्र बसवण्याबद्दलची ही एक बातमी प्रत्येक पाच किलोमीटरवर वीज प्रतिरोधक यंत्र बसवा
Comments
सुंदर लेख
आपल्या लेखातील थोड्याच मुद्यांबद्दल लिहित आहे.
१.ह्या ठिकाणी http://www.cessind.org/images/LIGHTNING-BROCHURE.pdf) " title="vij">वीज प्रतिरोधक यंत्र (Lightning Arrester) लावले असते तर हा प्रसंग घडला असता का?
ही यंत्रे, सर्व इमारती तात्पुरती बांधकामे यावर लावणे अत्यंत आवश्यक असते. सिंगापूरमधे मी बघतो की १००% इमारतींना हे लावलेले असते. आपल्या येथे कोणतेही नियम न पाळण्याची जी अत्यंत गचाळ सवय आपल्या सगळ्यांना लागलेली आहे त्याचेच हे दुष्परिणाम आहेत.
२. सर्व कामगारांचा विमा वर्कमेन कॉम्पेन्सेशन कायद्याप्रमाणे काढणे बंधनकारक असते. परंतु खात्रीलायकपणे या कामगाराचा विमा नसणार आहे. परत वरचाच मुद्दा.
३.या सर्व प्रदर्शनांमधे तेचतेच स्टॉल असतात. ही प्रदर्शने बघायला जाणे म्हणजे वेळेचा पूर्ण अपव्यय असतो.
४. वीज कुठेही पडू शकते. तिला शहर, गांव, झाड असा प्रीफरन्स नसतो.खूप सपाट जमिनीवर एखादे झाड असले तर तिथे वीज पडण्याची शकयता आधिक.
५. देव विजा वगैरे पाडत नाही. त्या विद्युतशास्त्राच्या नियमानुसार पडतात.
६. असे म्हणतात की माणसाला कुत्रा चावला तर ती बातमी नसते पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते. त्या पद्धतीनेच वीज पडून माणूस मेला ही महत्वाची बातमी वर्तमानपत्रासाठी नसते. आपण तिथे हजर् असल्याने ती आपल्याला महत्वाची वाटली.
चन्द्रशेखर
बातमी
६. असे म्हणतात की माणसाला कुत्रा चावला तर ती बातमी नसते पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते. त्या पद्धतीनेच वीज पडून माणूस मेला ही महत्वाची बातमी वर्तमानपत्रासाठी नसते. आपण तिथे हजर् असल्याने ती आपल्याला महत्वाची वाटली.
मी तिथे हजर असल्यामुळे मला प्रदर्शनाच्या ठिकाणी वीज पडली हे कळले. एकच माणूस मेल्यामुळे ही बातमी मोठी झाली नाही? जर ह्या ठिकाणी एखाद्या नागरिकाच मृत्यू झाला असता तर ती बातमी झाली असती का?
आज ह्या किंवा त्या गावात वीज पडली आणि त्यात एका शेळीचा किंवा बैलाचा किंवा गाईचा किंवा शेतकर्याचा मृत्यू झाला होता वैगरे बातम्या हे पेपर वाचल्यामुळे किंवा टिव्हीवरच्या कार्यक्रमांमधूनच समजतात.
नागरिक?
तो कामगार नागरिक नव्हता काय? बांग्लादेशी, नेपाळी किंवा पाकिस्तानी होता काय?
माफ करा, आणि विषयाशी अवांतर आहे, पण भाषा थोडी खटकली.
नागरिक
कामगार हा नागरिकच आहे ह्यात काही वाद नाही. . मी इथे नागरिक म्हणजे प्रदर्शन बघायला आलेले नागरिक असा अर्थ अभिप्रेत आहे.
काही उत्तरांचा प्रयत्न (चूभूद्याघ्या!)
वीज परिसरातील सर्वात उंचावर असलेल्या वस्तूवर पडण्याची शक्यता सर्वाधिक असते, असे वाटते. तो कामगार तेथे नसता, तर वीज पत्र्यावर पडली असती. कामगार पत्र्यापेक्षा उंचावर असल्यामुळे कामगारावर पडली.
पत्र्यावर पडली असती तर जोपर्यंत कोणी एखाद्या वाहकाद्वारे (conducting material, जसे धातू) किंवा स्पर्शाने पत्र्याच्या प्रत्यक्ष संपर्कात नाही, तोपर्यंत कोणाला प्रत्यक्ष धोक्याची भीती नसावी, असे वाटते. पत्र्याने ढालीसारखे काम केले असते. वीज प्रतिरोधक यंत्राचे (असल्यास) काम फक्त पत्र्यापेक्षाही उंचावर राहून वीज पत्र्याऐवजी/स्टॉलऐवजी आपल्याकडे आकर्षित करून नंतर जमिनीपर्यंत पोहोचवणे (proper grounding करणे).
नाही! (मात्र त्याने जीव फुकटचा गमावला.)
पत्र्याने ढालीचे काम केलेच असते. त्याने फक्त पत्र्यापेक्षा उंचावर जाऊन वीज आपल्यावर ओढवून घेतली, इतकेच म्हणता येईल.
तो सर्वाधिक उंचावर गेल्यामुळे त्याच्यावर वीज कोसळली. तो तेथे गेला नसता तर त्याच्यासकट कोणालाही बहुधा काहीही झाले नसते. देवाचा यात काहीही संबंध नाही.
वीज कोठेही पडू शकते. पण शहरात आजूबाजूला आपल्यापेक्षा उंचावर असणार्या वस्तू (इमारती, झाडे वगैरे) शेतापेक्षा किंवा मोकळ्या मैदानापेक्षा खूपच अधिक असल्याकारणाने प्रत्यक्ष आपल्या अंगावर पडण्याची शक्यता त्या मानाने खूपच कमी असते, इतकेच.
वीज प्रतिरोधक यंत्रापेक्षा अधिक उंचीवर कामगार गेला असता तरीही हे घडण्याची शक्यता खूपच होती. (किंबहुना त्या स्थितीत बहुधा प्रतिरोधकाचा बहुधा काहीही उपयोग झाला नसता.) तसेच पत्र्यावर परंतु वीजप्रतिरोधकापेक्षा कमी उंचीवर कामगार गेला असता तरीही झाले नसतेच याची शाश्वती नाही; फक्त, त्या स्थितीत वीज कामगाराऐवजी प्रतिरोधकावर पडण्याची शक्यता अधिक राहिली असती, इतकेच.
याबद्दलची माहिती आंतरजालावर शोधल्यास मिळू शकेल असे वाटते. तूर्तास माझ्याजवळ दुवे नाहीत, परंतु शोधल्यास सापडू शकतील असे वाटते. सापडल्यास चिकटवतो.
(अवांतर: गावाबाहेर मोकळ्या रस्त्यावरून बंदिस्त गाडीने जात असता वादळ होऊन विजा चमकू लागल्या, तर - जोपर्यंत आपण गाडीच्या कोणत्याही धातूच्या भागाशी संपर्कात येत नाही तोपर्यंत - गाडीबाहेर येऊन उघड्यावर आडोसा शोधण्यापेक्षा बंदिस्त गाडीतच आपण विजेपासून अधिक सुरक्षित असतो, असे कळते. गाडीची धातूची बॉडी ही विजेपासून सुरक्षाकवचासारखे काम करते. अर्थात, जोपर्यंत या सुरक्षाकवचाशी आपण स्पर्शाने संपर्कात येत नाही तोपर्यंतच.)
काही दुवे
'विजा चमकत असताना सुरक्षेसाठी घेण्याची काळजी' याबद्दल बर्यापैकी माहिती पुढील दुव्यांवर मिळू शकेल. (पहिल्या दुव्यावर काहीशा संक्षेपात आणि सारांशरूपाने आणि काहीशी त्रोटक; बाकीच्या दुव्यांत काहीशा विस्ताराने.)
दुवा क्र. १
दुवा क्र. २
दुवा क्र. ३
किंचित सुधारणा
तो सर्वाधिक उंचावर - आणि उघड्यावर - गेल्यामुळे त्याच्यावर वीज कोसळली. तो तेथे गेला नसता तर पत्र्याच्या स्टॉलसारख्या आडोशाच्या जागी त्याच्यासकट कोणालाही काहीही होण्याची शक्यता त्यामानाने खूपच कमी होती.
(अर्थात पत्र्याला स्पर्श होऊन विजेचा धक्का वगैरे शक्यता येथे लक्षात घेतलेली नाही. कामगाराने छतावर चढून वीज आपल्यावर ओढवून घेतल्यानंतरही इतरांना तो धोका होताच. त्यामुळे त्या कामगाराने वीज स्वतःवर ओढवून घेऊन कोणालाही वाचवले नाही; स्वतः मात्र फुकट जीव गमावला.)
(लक्षात ठेवण्याचे मूळ तत्त्व: वीज ground होण्याच्या path of least resistance मध्ये काहीही आले की त्याला पडणार्या विजेचा धोका संभवतो.)
(अर्थात देवाचा याच्याशी काहीही संबंध नाहीच. असलाच, तर कर्माचा आहे.)