नाम ए अलि बेडा पार लगा झुलेलालण!

राम राम मंडळी,

http://www.youtube.com/watch?v=IPIV6GjuPTY

या दुव्यावर रुना लैलाने गायलेलं आणि प्रसिद्ध केलेलं 'ओ लाल मेरी पत रखियो भला झुलेलाल' हे प्रार्थनागीत आपल्याला ऐकता येईल. सिंधी, पंजाबी लोकात हे गीत अत्यंत श्रद्धापूर्वक ऐकलं जातं, गायलं जातं. सिंधी, पंजाबी स्त्रीपुरुष बर्‍याचदा हे गाणं ऐकतांना डोकं झाकून घेतात. मुस्लिम समाजतही हे गाणं अत्यंत श्रद्धापूर्वक गायलं जातं.

का ते माहित नाही पण मला या गाण्यात नेहमीच एक विलक्षण सामर्थ्य जाणवतं. ईश्वर आहे किंवा नाही हा भाग वेगळा. पण या गाण्यातली सात्विकता मन सुखावून जाते. आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी या गाण्यामुळे मिळते असं मला वाटतं.

शुद्धगंधार, गधपपग ही संगती, पंचमावरील स्थैर्य, गंधारावरील न्यास, केवळ या तीन-चार गोष्टींवर हे सबंध गाणं उभं आहे. प्रत्येक कडव्याच्या एका ठराविक ठिकाणी गधपपग ही संगती समेनंतर ऑफबीट जाऊन लयीला एक सुरेख वळणदार स्पर्श करून पुन्हा पुढची ऑफबीट सम दाखवते, हे या गाण्यातलं शक्तिस्थान आहे. सुरावट आणि लय या दोन गोष्टी खर्‍या तर एकमेकांत गुंतलेल्या गोष्टी असतात, नव्हे तश्या त्या असाव्या लागतात! परंतु या गाण्यात त्या एकमेकात गुंतलेल्या असूनही समांतर काम करतात असं मला वाटतं! क्या बात है.... गाणं ऐकताना दिल खुष होऊन जातो. मन भरून पावतं! मंडळी, ही सगळी आपल्या कल्याण थाटाची, यमनाची जादू बरं का! क्या केहेने.. !!

दुवा दिलेल्या चित्रफितीमध्ये रुना लैलानी हे गाणं खूप छान गायलं आहे. ही बया माझी खूप लाडकी गायिका आहे. सुरेल गाते. भक्तिभाव, कल्याणाची सात्विकता, उत्साह, आणि जोश यांचं एकाच वेळी दर्शन या गाण्यामध्ये फार छान तर्‍हेने अनुभवायला मिळतं. अर्थात, ही सर्व माझी मतं. आपली आपण अवश्य कळवा.

आज बर्‍याच दिवसांनी हे गाणं ऐकलं आणि मला आमचा फक्रुभाई आठवला. फक्रुभाई हा मुंबईच्या प्रसिद्ध मोहमदअली रस्त्यावरचा मिठाईवाला. मंडळी, आमचा फक्रुभाई हे गाणं अत्यंत सुरेख गायचा. रोज्याच्या दिवसात रात्री महमदअली रोडवर चक्कर टाकावी. कधी कधी फक्रुभाईची छान तार लागलेली असायची. फिरनी, इमरती मिठाईची दे धम्माल सुरू असायची. फक्रुभाई आपले बाजिंदे घेऊन भर रस्त्यावरच बैठक मारायचा आणि मनसोक्त गायचा! तोंडातला पानाचा तोबरा सांभाळत, "आओ तात्यासेठ, जरा हमारे सूर मे सूर मिलाओ" असं मिश्किलीने म्हणायचा! ;)

गेल्याच वर्षी फक्रुभाई वारला. आज जालावर मुशाफिरी करत असताना हे गाणं कानी पडलं आणि फक्रुभाईच्या आठवणीने नकळत डोळ्याच्या कडा ओलावल्या.

असो!

झुलेलालने आमच्या फक्रुभाईचा बेडा पार केला इतकंच आपण म्हणू शकतो! दुसरं काय?!

--तात्या अभ्यंकर.

लेखनविषय: दुवे:

Comments

व्वा!!

तात्या बॅक ऑन ट्रॅक!!!

आवडलं!! असेच लेख येऊ द्या तात्या!!!

वाट पाहतो आहोत.

पल्लवी

तात्या ...सुंदर.

तात्या,तुमच्या लेखनावर आम्ही वाचक जे प्रेम करतो ते यामुळेच.आम्हाला रुला लैलानी कळते की नाही तो भाग अलहीदा.पण तुम्ही आम्हाला गायन असो की,लेख .तुम्ही ज्या पद्धतीने वाचकांना ते सर्व्ह करता ना ! तेव्हा तात्या तुम्ही ग्रेट ठरता. असेच उत्तम लेख येउ द्या.

झूलेलाल

लाल शाहबाज़ कलंदर उर्फ झुलेलाल हे बाराव्या शतकातील मोठे मुसलमान संत होते. ते नक्की इराणातील होते की अफगाणास्तानातील याबद्दल मला विशेष माहिती नाही परंतु ते सेहवण, सिंध (सध्याचा पाकिस्तान) प्रांतात येऊन स्थायिक झाले आणि पुढे तेथेच वारले.

रुनाचे गाणे हे त्यांच्यासाठीच आहे. हे गाणे एक पाकिस्तानी गायिका रेश्मा हिच्या आवाजात आणि थोड्या वेगळ्या चालीतही मी ऐकले आहे.

गाण्यात हेच शब्द आहेत:

'ओ लाल मेरी पत रखियो भला झुलेलाल'
सिंदडी दा सेहवण दा सखि शाहबाझ कलंदर.

सिंधी, पंजाबी हिंदू आणि मुसलमान लोक झुलेलालना खूप मानतात. आपल्या दैवतांसमोर बोडक्या डोक्याने जाऊ नये हा प्रघात असल्याने डोक्यावर रुमाल बांधतात किंवा पदर घेतात.

असे लेख लिहा. रुनावरही अधिक लिहा. माझी अत्यंत आवडती गायिका आहे. तिच्यातली ग्रेस (अरेरे! काय झालं माझ्या मराठीला) इतर कोणातही नाही.

ग्रेस

ग्रेस = डौल?
सन्जोप राव

डौल

चांगला आहे. मला लालित्य (बिलित्य?) असे शब्द आठवत होते. डौल साधासरळ बरा आहे.

"सखी"चा अर्थ

इथे एक गोष्ट मुद्दाम लक्षात घेण्याजोगी आहे.
येथील "सखी" हा उर्दू(अ/फा) शब्द आहे. त्याचा अर्थ उदार, दानी असा आहे. ज्याचे वर्णन चालले आहे तो त्याच्या भक्तांना जे जे हवे असेल ते ते सढळ हाताने भरभरून देणारा आहे हा निर्देश केला आहे. "अक्रम" या शब्दाचा अर्थही असाच होतो.
- दिगम्भा

धन्यवाद

"सखी" हा उर्दू(अ/फा) शब्द आहे. त्याचा अर्थ उदार, दानी असा आहे.

यावर मी विचार केला होता की हे सखी कुठून येते मध्येच परंतु काही कळले नव्हते. ती उकल केल्याबद्दल धन्यवाद.

सखी

भक्तांना जे जे हवे असेल ते ते सढळ हाताने भरभरून देणारा

सखी आणि साकी या शब्दांमध्ये काही संबंध आहे का?

सखी नव्हे, सकी.

सखी नाही हो.सकी.

पार एक्सलन्स.

तात्याजी,

अत्यंत उत्कृष्ट लेखन आणि अगदी योग्य शब्दात आपण गाण्याचे रसग्रहण केले आहे. It's just par excellence! आंतरजालावर अशा दर्जाचे लेखन क्वचितच वाचायला मिळते.

श्रीमती रुना लैला सुंदर गातात. हे गाणे माझेही खूप आवडते गाणे आहे. वडिलांची बदलीची नोकरी असल्यामुळे माझ्या लहानपणीचा काही काळ उल्हासनगरच्या सिंधी वस्तीत गेला आहे. तिथे हे गाणे बर्‍याचदा ऐकले आहे. परंतु आज आपले लेखन वाचून हे गाणे अधिकच आवडू लागले आहे. 'नाम ए अलि बेडा पार लगा झुलेलालण!' हे या लेखाचे शीर्षक अत्यंत लक्षवेधी आणि समर्पक आहे. फक्रुभाईंना माझीही आदरांजली!

प्रियालीताईंचा प्रतिसाददेखील मला महत्वाचा वाटला. त्यांनी लाल शाहबाज़ कलंदर उर्फ झुलेलाल यांच्यावर अजूनही काही अभ्यासपूर्ण लेखन करावे अशी त्यांना विनंती.

ईश्वरी.

अवांतर माहिती

डीजे अकबर सामी याच्या जलवा - २ या रिमिक्स अल्बममध्ये विसोबांनी सांगितलेल्या गाण्याचे रिमिक्स ऐकायला मिळेल.

ह्याच अल्बममध्ये जगप्रसिद्ध ढगाला लागली कळ चे रिमिक्स आहे.

तळटीपः हा उल्लेख केवळ माहितीसाठी आहे.

आभार/उतरे..

पल्लवी, सर्कीटदादा, बिरुटेसाहेब, प्रियाली, ईश्वरी, योगेश,

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाकरता अनेक अभार..

पल्लवी,

तात्या बॅक ऑन ट्रॅक!!!

धन्यवाद, पण चलता है. कधी कधी ट्रॅक सोडून बेताल, बेलगाम, आणि बेफाम होण्यातही मजा असते! ;)

सर्कीटदादा,

ह्या प्रकारच्या गायकीलाच सूफी गायकी म्हणतात का ?

मला सुफी गायकीबद्दल फारशी माहिती नाही, पण आपण म्हणता तसंच असावं असं वाटतंय.

नसरत फते अली खान ह्यांच्या गायकीत आणि वरील गाण्यात खूप साम्य जाणवते.

हो, मलाही जाणवते. नसरतसाहेबदेखील जोरदारच गायचे. तसे अकालीच वारले.

बिरुटेसाहेब,

तात्या, तुमच्या लेखनावर आम्ही वाचक जे प्रेम करतो ते यामुळेच.

धन्यवाद बिरुटे साहेब. पण आपण नेहमी माझी जरा जास्तीच स्तुती करता असं वाटतं. महाविद्यालयीन दिवसातदेखील मी सर्व प्राध्यापकांचा लाडका होतो. आपणही प्राध्यापक आहात, आमचे संजोप राव सरही प्राध्यापक आहेत. एकंदरीत प्राध्यापक मंडळींचं आणि माझं बरं जमतं असं म्हणायचं! ;)

प्रियाली,

'वादावाद्या, भांडणं, आणि मारामार्‍या सोडून दे आणि पुन्हा मनसोक्त लिही' असा सल्ला दिल्याबद्दल आणि वेळीच सावरल्याबद्दल तुझे विशेष आभार मानतो. अलिकडे माझा तोल खूप सुटला होता, लेकीन आपने हमारे साथ बहोत अच्छी दोस्ती निभायी और हमे संभाला! ;)

आम्हाला इतिहासाच्या पानांत घेऊन गेल्याबद्दल ईश्वरीसारखं मीही तुला थँक्यू म्हणतो!

ईश्वरी,

अत्यंत उत्कृष्ट लेखन आणि अगदी योग्य शब्दात आपण गाण्याचे रसग्रहण केले आहे. It's just par excellence! आंतरजालावर अशा दर्जाचे लेखन क्वचितच वाचायला मिळते.

अरे बापरे माझ्या! अहो असे 'पार एक्सलन्स' सारखे मोठमोठे शब्द वापरू नका हो! जे काय सुचले ते चार शब्द खरडले आहेत एवढंच!

असो! एकंदरीत हे गाणं वेड लावणारं आहे. एक वेगळीच धुंदी या गाण्यात आहे एवढं मात्र खरं!

आपला,
तात्यासाई!

स्वागत

तात्या,
लेख झकास उतरला आहे.
रूना लैलाने हे गाणे टीव्हीवर नाच वगैरे करून लोकप्रिय केले खरे, पण जुन्या काळापासून बहुतेक कवाली गायक ते आवडीने गातात. जाताजाता: कवाली या शब्दाचा मूळ अर्थ भजन असाच आहे (नातिया कवाली - नात म्हणजे आपले भिक्षुक श्लोक म्हणत असत तसे फकीरांनी वगैरे म्हणायचे काहीतरी). कव्वाल्या आधी भक्तीपरच असायच्या असे वाटते.
तुमच्या शास्त्रीय संगीतामधून घडीभर इकडे आलात. आमच्या (आम्हा जनतेच्या) सुगम संगीतात तुमचे स्वागत करतो.
असेच लिहीत रहा. भांडणा-मारामारीत हा आनंद नाही.
- दिगम्भा

दिगम्भा साहेब,

रूना लैलाने हे गाणे टीव्हीवर नाच वगैरे करून लोकप्रिय केले खरे,

दिगम्भासाहेब, वरील वाक्यातील 'नाच वगैरे करून' हे शब्द जरा कोकणस्थी टोला हाणल्यासारखे वाटले बरं का! नाही, मी पण कोकणातला आहे म्हणून म्हटलं! ;)

जाताजाता: कवाली या शब्दाचा मूळ अर्थ भजन असाच आहे (नातिया कवाली - नात म्हणजे आपले भिक्षुक श्लोक म्हणत असत तसे फकीरांनी वगैरे म्हणायचे काहीतरी). कव्वाल्या आधी भक्तीपरच असायच्या असे वाटते.

ही माहिती मला नवीन आहे. धन्यवाद...

तुमच्या शास्त्रीय संगीतामधून घडीभर इकडे आलात. आमच्या (आम्हा जनतेच्या) सुगम संगीतात तुमचे स्वागत करतो.

बास काय दिगम्भासाहेब? अहो अशी सापत्न वागणूक नका देऊ आम्हाला. तुमच्या सुगमसंगीताचे आम्हीही प्रेमी आहोत म्हटलं! ;)

त्या दुनियेतले भीमण्णा जरी आमचे मानसगुरू असले तरी या दुनियेतल्या बाबुजींनाही आम्ही गुरूस्थानीच मानतो. तेव्हा तुमच्या सुगमसंगतीच्या पंगतीमध्ये आमचा पाट असा वेगळा मांडू नका. आम्हीही तुमच्या जोडीनेच जेवायला बसू म्हटलं! फार फार तर सख्खा चुलतभाऊ दोन दिवस राहायला आलाय असं समजा. आणि चुलतभाऊ म्हणजे तुमच्याच दशातला! ;)
काय? खरं की नाही? ;)

असो, प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. आपण सुफी गायकीबद्दलही काही लिहाल अशी माझी अपेक्षा होती. 'ओ लाल मेरी..' या गाण्यासंदर्भात सुफी गायकीचा मुद्दा मिलिंदाने उपस्थित केला असून तो मला valid वाटला. पण मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. आपल्याला असल्यास आपण अवश्य लिहा.

असेच लिहीत रहा. भांडणा-मारामारीत हा आनंद नाही.

अहो भांडणा-मारामारीतली मजा वेगळी! पण ठीक आहे, आता वाद नको...;)

आपला,
(दशातला!) तात्या.

सुंदर गाणे.

हे काय तात्या? जीवलगा कशी रे येशील तू नंतर एकदम सिंधी गाणे?

लेख मात्र नेहमीप्रमाणेच सुरेख आहे. सांगितिक असूनही यावेळेस लेखाचा विषय थोडासा अनवट वाटला. यावरून तुमची गाण्यातली बहुश्रुतता दिसते. प्रियाली आणि इतरांप्रमाणेच रुना लैला ही माझीही अतिशय आवडती गायिका आहे. तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन हे गाणे ऐकले. गाणे खरंच खूप छान आणि उल्हसित करणारे आहे.

कधी कधी फक्रुभाईची छान तार लागलेली असायची. फिरनी, इमरती मिठाईची दे धम्माल सुरू असायची. फक्रुभाई आपले बाजिंदे घेऊन भर रस्त्यावरच बैठक मारायचा आणि मनसोक्त गायचा! तोंडातला पानाचा तोबरा सांभाळत, "आओ तात्यासेठ, जरा हमारे सूर मे सूर मिलाओ" असं मिश्किलीने म्हणायचा! ;)

वा तात्या, डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. जाता जाता दोनचार वाक्यातच रंगवलेले फक्रुभाईचे व्यक्तिचित्रही खासच!

अवांतर - बांजिंदे आणि साजिंदे हे समानार्थी शब्द आहेत का?

माधवी.

छान लेख

तात्या,

लेख आवडला.

तात्या छान लिहिलेय!

तात्यासाहेब,

'ओ लाल मेरी पत रखियो भला झुलेलाल'
सिंदडी दा सेहवण दा सखि शाहबाझ कलंदर.

हे गाणं लहान पणी खूप वेळा ऐकलं होतं.

त्यावेळी शहराच्या आम्ही रहायचो त्या भागात बरेचसे सिंधी लोक रहायचे. त्यामूळे ऐकलं गेलं.
पण सदैव कर्ण्यावर मोट्या आवाजात ऐकल्याने किंम्मत राहिली (कळली?) नव्हती.
(असं माझं ' गणराज रंगी नाचतो' या गाण्याचं पण झालं होतं!)

पण आता परत एकदा 'ऐकण्यासाठी' ऐकलं; आणी, वा दिल खुष झाला!
बालपणीच्या अनेक आटवणींना जरा मनाच्या काठावर बसून पहायला आटवायला मिळालं
जिलेबी चा वास, इमरतीची ताटं, मिरवणूकी सगळं परत आठवून गेली.
खरंच खूप छान वाटलं!
आणी बरं का तात्या, ते 'सिंधी आपण वेगळे' असं काही नसतं हो,
जे मनाला भावतं ना ते सगळं आपलंच असतं नाही का?
आपला
(गाण्यात रमलेला) गुंडोपंत

शब्द

गाणं ऐकताना दिल खुष होऊन जातो. मन भरून पावतं

सहमत. गाणे ऐकवल्याबद्दल धन्यवाद तात्या.
कोणी सगळे शब्दही सांगावे.

दमादमचे शब्द

इथे वाचा.

हे कळले नाही

नमस्कार,
आपण दिलेल्या दमादमचे शब्द या दुव्याच्या ठिकाणी
Duma dum mast kalandar, ali da pehla number
असे वाचनात आले.
यातील 'अलि दा पेहला नंबर' हे काही कळले नाही.
ही रचना तुलनेने नवीन आहे का?
असा इंग्रजी शब्द या रचनेत कसा आला आहे?
कि, फक्त यमका पुरता वापरला आहे?

आपला
(बुचकळ्यात) गुंडोपंत

अलि दा पहिला नंबर

हे बहुधा रुनाने स्टेजवर नाचून (माझा शब्द नाही, वर व्यक्त केल्याप्रमाणे :) ) म्हटलेल्या गाण्यात आले असावेत. (रिमिक्स इ.) हेच गाणे मी रेश्मा नावाच्या एका पाकिस्तानी लोकगायिकेच्या (जसे बांधकाम करणारे कामाठी ही जमात असते त्याप्रमाणे पाकिस्तानातील एका बांधकाम करणार्‍या जमातीतील लोककलाकार आहे.) आवाजात ऐकले असता त्यात पहिला नंबर हे शब्द ऐकलेले नाहीत. हे गाणे ही संथ चालीने म्हटले जाते.

परंतु रुनाने त्याला एक वेगळे वलय दिले.

नक्की कोणता शब्द?

(वा लगेच प्रतिसाद!)

मग त्या पाकिस्तानी लोकगायिकेच्या
गाण्यात कोणता शब्द त्या
'अलि दा पहिला नंबर' च्या ठिकाणी योजला होता?

आपला
(त्वरित)गुंडोपंत

नाही आठवत :)

नाही आठवत हो, फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दूरदर्शनवर पाहिले होते एवढे मात्र आठवते(म्हणजे त्यावेळेस दुसर्‍या वाहिन्याच नव्हत्या). बाकी विसरुन गेले परंतु याच गायिकेने 'लंबी जुदाई' हे गाणे गायल्याचेही आठवले.

दुवा

मूळ गाणे असे असावे. दुवा

धन्यवाद!

धन्यवाद!
मिळाले शब्द!

गाण्यात जोर आणण्या साठी नंबर हे यमक चांगले बसत असावे.
;)
आपला
गुंडोपंत

प्रकाटाआ

प्रकाटाआ.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

आभार..

माधवी गाडगीळ, प्राजक्ती, गुंडोपंत, मृदुला,

प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

प्रियाली,

गाण्याच्या शब्दांचा दुवा दिल्याबद्दल तुझे आभार..

तो,

प्रतिसाद ने देता, उलट दिलेला प्रतिसाद काढून टाकल्याबद्दल आपले विशेष आभार! :))

तात्या.

 
^ वर