थोडी मदत हवी होती..

राम राम मंडळी,

येथील काही उर्दू भाषेच्या जाणकारांची मला थोडी मदत हवी होती.

'रंजीश ही सही..' ही माझी अत्यंत आवडती गझल. यमन रागाचं फार सुरेख दर्शन या गझलेत होतं. अगदी मेहदी हसन साहेबांपासून अनेक उत्तमोत्तम गझल गायक ही गझल आवडीने गातात.

बंगाल कोकिळा रुना लैला ही माझी अत्यंत आवडती गायिका. आज जालावर मुशाफिरी करत तिने गायलेली ही गझल माझ्या पाहण्या-ऐकण्यात आली.

मंडळी,

http://www.youtube.com/watch?v=sBOBUKHD4S0

या दुव्यावर रुना लैलाने गायलेली ही गझल आपल्याला पाहता-ऐकता येईल. मला उपक्रमावर (हो, आदरणीय, थोर, वगैरे वगैरे तात्या अजून उपक्रमावरच आहेत!;) या गझलचं सांगितिक रसग्रहण करायची इच्छा आहे. पण एखाद्या गाण्याचं किंवा गझलचं नुसतं सांगितिक रसग्रहण माझ्या मते करता येत नाहीत, तर त्यातील शब्दांचे अर्थही लक्षात घ्यावे लागतात. म्हणजे संगितकारानी शब्दार्थानुसार एखादी सुरावट कशी बांधली आहे हे लक्षात येते. पण मला उर्दू भाषा येत नसल्यामुळे मला या गझलचा अर्थ नीट समजलेला नाहिये.

येथील कुणी जाणकाराने मला या गझलचा अर्थ समजावून सांगितल्यास त्याची मला या गझलचे सांगितिक रसग्रहण करण्यास मदत होईल.

कुणी करेल का मला मदत? इथेच प्रतिसादत्मक रुपात त्या गझलचा आणि त्यातील शब्दार्थांचा अर्थ सांगावा म्हणजे इतर उपक्रमींनाही त्याचा फायदा होईल.

वाट पाहात आहे!

हा सगळा घाट केवळ यमन रागाच्या प्रेमापोटी! ;)

आपला,
(यमनवेडा!) तात्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

हे चालेल का

विसोबापंत,

मला संगीतातले राग वगैरे काही कळत नाहीत.

मला एकच राग माहित आहे. तो म्हणजे "राग अनावर".

(रागीट) बापू

प्रतिसादातील अनावश्यक भाग काढून टाकण्यात येत आहे. कृपया विषयाशी संबंधित प्रतिसाद द्यावा ही विनंती - उपसंपादक.

इंग्रजी चालेल?

इंग्रजी चालेल? अर्थ इथे मिळू शकेल.

सवडीने मराठीत अर्थ वाचायला/द्यायला आवडतील.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

इप्रसारण

www.eprasaran.com ह्या ऑनलाईन आकाशवाणीवर एक गझलविषयक कार्यक्रम सोमवारी झाला. ह्या कार्यक्रमामध्ये पहिलीच गझल "रंजिश ए सही" ही होती. त्यामध्ये गझलेचा अर्थ, चाल वगैरेंबद्दल माहिती होती. शनिवार व रविवारी सोमवार ते शुक्रवारचे कार्यक्रम पुनःप्रसारित केले जातात. तेव्हा हा कार्यक्रम येत्या शनिवार व रविवारी पुन्हा ऐकता येऊ शकतो तो जरूर ऐकावा. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम रात्री साडेआठाला सुरू होईल. शनिवारी सोमवार ते शुक्रवार ह्या तर रविवारी शुक्रवार ते सोमवार अश्या क्रमाने कार्यक्रमांचे पुनःप्रसारण होते.

सध्या गजलेचे शब्द (अर्थ नंतर मिळेल)

आधारासाठी मूळ गाणे (गजल) येथे लिहून काढले आहे.
- आत्ता तेवढा वेळ नाही , अर्थ इतरांनी दिला नाही तर सोमवारी मी देईन.
[उर्दूतील नुक्तायुक्त अक्षरे नीट टंकित करता येत नसल्यामुळे आणि परिणामी शब्द शुद्ध स्वरूपात पोचवू शकत नाही यामुळेही मनाला क्लेश होत आहेत, पण नाइलाज आहे. उपक्रमरावांनी मनावर घेऊन सोय करावी ही विनंती.]

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्मोरहेदुनिया ही निभाने के लिये आ

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो जमाने के लिये आ

कुछ तो मेरे पिन्दारेमुहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ

इक उम्र से हूं लज्जते गिरियां से भी महरूम
ऐ राहतेजां मुझ को रुलाने के लिये आ

अब तक दिलेखुशफहम को तुझ से हैं उम्मीदें
ये आखरी शम्'एं भी बुझाने के लिये आ

भरीचे दोन शेर

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज जताने के लिये आ

जैसे तुम्हें आते हैं न आने के बहाने
ऐसेही किसी रोज न जाने के लिये आ

शायरः अहमद "फराज"
- दिगम्भा

तो, वरदा, दिगम्भा साहेब,

तो, वरदा, दिगम्भा साहेब,

आपल्याला धन्यवाद ...

दिगम्भा साहेब,

आधाराकरता म्हणून मूळ गाणे आपण इथे लिहिलेत हे फार चांगले केलेत. आपण विस्तृत अर्थ येत्या सोमवारी द्याच, परंतु for the time being, मला अडलेले शब्द खालीलप्रमाणे -

१) रंजिश
२) मरासिम
३) रस्मोरहेदुनिया (म्हणजे जनरीत?)
४) सबब (म्हणजे कारण, कारणे?)
५) पिन्दारेमुहब्बत
६) भरम
७) लज्जते गिरियां से भी महरूम (ही सबंध एकच Phrase आहे का? यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय?)
८) ऐ राहतेजां
९) दिलेखुशफहम
१०) शम्'एं

दिगम्भा साहेब, विस्तृत अर्थाची वाट पाहात आहे. आपण खूप मेहनत घेत आहात याची मला जाणीव आहे. या गझलचा विस्तृत अर्थ देऊन आपलं काम पूर्ण होईल आणि माझं सुरू होईल! ;)

आपला,
(आभारी) तात्या.

मरासिम

मरासिम म्हणजे विंग्रजीत रिलेशनशिप.

"आँखो से आसूओं के मरासिम पुराने है... मेहमाँ अगर ये आये तो चुभता नही धुआ..."

इति गुलजार... मरासिम अल्बम.

चू.भू.दे.घे.

धन्यवाद..

धन्यवाद योगेशजी,

तात्या.

रंजिश

किसी रंजिश को हवा दो के में जिन्दा हुं अभी
मुझको एहेसास दिला दो के में जिन्दा हुं अभी

~ सुदर्शन फाकिर

रस्म-ओ-राह-ए-दुनिया
म्हणजे जगराहाटी. रस्म (रुढी), ओ (व, दिल-ओ-जा, रंज-ओ-गम प्रमाणे) राह (रुळलेली वाट, चालीरिती), ए - (च्या, शाह-ए-जहां, मल्लिका-ए-तरन्नुम प्रमाणे.)

सबब
दिल धडकने का सबाब याद आया
वोह तेरी याद थी, अब याद आया

~नसीर काझ्मी

राहत-ए-जां

जीवात जीव आणणारा. राहत (सुटका करणे, मोकळीक देणे)

मरासिम - ओळख, खूण, संकेत

क्या कहें कितने मरासिम थे हमारे इस से
वो जो इक शख्स है मुंह फेर के जाने वाला

~ अहमद फराज

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

अर्थ

१) रंजिश
दुखः

२) मरासिम
familiar

३) रस्मोरहेदुनिया (म्हणजे जनरीत?)
जनरीत

४) सबब (म्हणजे कारण, कारणे?)
कारण

५) पिन्दारेमुहब्बत
अभीमान, ego प्रेमातला

६) भरम
भरम रख - लाज राख

७) लज्जते गिरियां से भी महरूम (ही सबंध एकच Phrase आहे का? यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय?)
लज्जत - गोडी
गिरिया - अश्रु
महरूम - वन्चित

स्वतःच्या आसवात भिजण्यातली मजा

८) ऐ राहतेजां
राहत - चैन - हिन्दिमधील

९) दिलेखुशफहम
खुश असलेल दिल

अर्थ

माझ्या आकलनानुसार, कुवतीनुसार अर्थ देतो आहे---

रंजिश- भांडण, दुरावा, तंटा
मरासिम- संबंध (रस्म पासून मरासिम)
रस्मोरहेदुनिया दिगंभा म्हणतात ती जनरीत

सबब कारण, (कारणे साठी असबाबही वापरतात)
पिन्दारेमुहब्बत - पिंदार म्हणजे इगो. पिंदारे -मुहब्बत --- मुहब्बत का इगो
भरम -भ्रम
लज़्ज़ते गिरियां -- अश्रूंची लज्जत (गिरियाँ अश्रू)
महरूम - वंचित
८) ऐ राहतेजां - जान को राहत (मदत, आराम, सुकून) देनेवाले
दिलेखुशफहम - गोड समजुतीत असलेल्या हृदयाला (खुश म्हणजे चांगले, उत्कृष्ट असे अर्थही आहेत. जसे खुश-बू ) किंवा जिस दिल को खुशफहमी हुई है ऐसा दिला.फहम - हा शब्द फहमीदन ह्या धातूपासून/क्रियापदापासून तयार झाला आहे. फहमीदन म्हणजे समजणे
१०) गझलेत शम्मे म्हणतो असे वाटते. शमाचे बहुवचन. (दिव्याची ज्योत:)

मरासिम/मोहीम

मरासिमचा अर्थ जवळीक असा वाटला. पण इथे पाहता तो संकेत, ओळख (पेहेचान, आयडेन्टिटी) असा दिसला.

अर्थात हे दोन्ही अर्थ त्याला माहित असलेल्या मरासिमच्या सार्‍या वापरात चालून जातात. :)

हीच उर्दूची लज्जत म्हणावी काय?

राहत साठी चपखल मराठी शब्द आपल्या प्रतिसादात नाही पाहून 'अफसोस' वाटला (दिलासा असावा ना?). उर्दू शब्दांसाठी चपखल मराठी शद्ब अशी ही मोहीम राबवावी काय?

(अवांतर : मोहीम चे मूळ कशात आहे?)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

आभार..

चित्तोबा आणि तो यांचे आभार..

तात्या.

भरीचे शेर

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज जताने के लिये आ

जैसे तुम्हें आते हैं न आने के बहाने
ऐसेही किसी रोज न जाने के लिये आ

हे दोन शेर माझ्याकडे असलेल्या ध्वनिफीतीमध्ये उपलब्ध नाहीत. हे शेर केवळ लिखित स्वरुपातच आहेत की माझ्याकडील ध्वनिफीत ही पूर्ण नाही?

मेहदी हसनच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात

हे शेर आलेले आहेत.
एका संकेतस्थळावर मला ते लिखित स्वरूपात मिळाले.

- दिगम्भा

काही शब्दांचे अर्थ

मला कळलेले काही शब्द.

रंजिश म्हणजे दु:ख, त्रास, त्रागा.
मरासिम नातं, नात्याचा अभ्यास
सबब म्हणजे कारण
भरम म्हणजे येथे विचार कर असा अर्थ अभिप्रेत असावा.
शम्'ऐं यात शम् म्हणजे ज्योत.

पल्लवी

सविस्तर अर्थ (मला उमजलेला)

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ
--> "रंजिश ही" असे जरी वर लिहिले असले तरी पहिला शब्द मला नेहमी "रंजिश्शी" असाच ऐकू येतो. पण रंजिश्शी असा शब्द उर्दूत नाही.
रंज म्हणजे दु:ख, कष्ट, त्रास, इ. असले तरी रंजिश म्हणजे मनोमालिन्य, मनमुटाव, नाराजगी, अप्रसन्नता असा अर्थ शब्दकोशात मिळतो (उत्तर प्रदेश हिंदी संस्थान प्रकाशित, मुहम्मद मुस्तफा खां "मद्दाह" यांचा कोश, १९७७).
प्रिया येऊन परत जाणार हे निश्चित, त्यामुळे पुढे वाढून ठेवलेले दु:ख अटळ आहे. नात्यात समज-गैरसमज झाले आहेत, नाराजी झालेली आहे ती दूर व्हावी असेही मागणे नाही, ती तशीच असूदे. तरीही भेट घडावी ही तीव्र इच्छा आहे. मन दुखावले जाणार असले तरी त्यासाठी का होईना एकदा ये, सोडून परत जाण्यासाठी असूदे पण ये, असे शायर म्हणतो आहे.

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्मोरहेदुनिया ही निभाने के लिये आ
---> मरासिम म्हणजे संबंध. रस्मोराह म्हणजे भेटीगाठी, रस्मोरहेदुनिया म्हणजे एकमेकांना भेटत जावे अशी जी जगाची रीत आहे ती.
पूर्वीसारखे संबंध आता उरले नाहीत, आता भेटावेसेसुद्धा वाटत नसेल, भेटून करायचे काय?
असे असले तरी जगरहाटी म्हणून, एक शिष्टाचार पाळायचा म्हणून तरी ये.

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो जमाने के लिये आ

--? खफा म्हणजे रागावलेला
आता आपल्यामध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे त्याचे कारण कुणाकुणाला सांगत बसू मी? तू माझ्यावर रागावलेली असशील तरी निदान जगाचा समज तसाच रहावा म्हणून तरी ये.

कुछ तो मेरे पिन्दारेमुहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ
--> पिंदार म्हणजे अभिमान, गर्व किंवा मनात करून घेतलेली कल्पना, भरम म्हणजे आपला भ्रम, समज
माझ्या प्रेमाचा मला अभिमान वाटतो, तो जरी पोकळ असला तरी तो माझा भ्रम तसाच राहू दे ना, कधीतरी तूसुद्धा माझी समजूत काढण्यासाठी ये (नेहमी मीच काय यायचे?)

इक उम्र से हूं लज्जते गिरियां से भी महरूम
ऐ राहतेजां मुझ को रुलाने के लिये आ
--> वेदना होत असल्या की माणूस कण्हतो, आर्तपणे ओरडतो, रडतो, अश्रू ढाळतो. आपले दु:ख उघडपणे व्यक्त करतो (त्यानेव्ही जरा बरे वाटते, क्षणभर दु:खाचा विसर पडतो). याला गिरिया, गिर्या असे म्हणतात. कवी इतका दु:खाने ग्रासला आहे की त्याच्या तोंडून दु:खोद्गारही निघत नाही. महरूम म्हणजे वंचित, एखादी गोष्ट न मिळालेला. ते दु:खाने रडण्या ओरडण्याचे किंचित सुखही त्याला बराच काळ मिळालेले नाही. म्हणून तो म्हणतो आहे, थोडे रडू आले तरी माझ्या जिवाला बरे वाटेल, त्यासाठी तरी ये. राहत म्हणजे सुकून, रिलीफ, दु:खातून-संकटातून आराम, विश्रांती मिळणे. राहतेजां म्हणजे जिवाला राहत, आराम देणारी.

अब तक दिलेखुशफहम को तुझ से हैं उम्मीदें
ये आखरी शम्'एं भी बुझाने के लिये आ
--> फहम म्हणजे समज (गलतफहमी म्ह. गैरसमज), खुशफहम म्हणजे गोड समज. माझ्या गोड(गैर)समज करून घेतलेल्या मनाला अजून वाटते आहे की तुझे माझ्यावर प्रेम आहे, अजून तुझ्याकडून काही आशा उरलेल्या आहेत. कशाला शिल्लक ठेवतेस त्यांना तरी, निदान त्या आशा ज्योती विझवण्यासाठी येऊन जा. शम्'एं हे शम'अ (ज्योत) चे अनेक वचन.

भरीचे दोन शेर

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज जताने के लिये आ
--> अर्थ उघड आहे. प्रेम लपवणे हाही प्रेमाचाच भाग असतो. जताना म्हणजे जाणवून देणे. प्रेम संपूर्णपणे लपवले तर ते आहे हे तरी कसे कळणार?

जैसे तुम्हें आते हैं न आने के बहाने
ऐसेही किसी रोज न जाने के लिये आ
--> अर्थ उघड आहे. न येण्याचे जर बहाणे करता येतात तर न जाण्याचेदेखील करता येणार नाहीत का?

संजोपरावसाहेबासारखे रसग्रहण करण्याचे सामर्थ्य माझ्यापाशी नाही. पण एक व्यावहारिक गरज तरी भागेल/भागावी एवढाच प्रयत्न आहे.
बाकी उर्दू शायरी असे शब्दार्थ-वाक्यार्थ देऊन थोडीच समजते? ती आतमध्ये जाणवण्याची, झोंबण्याची आणि चटका लागण्याची गोष्ट आहे. आणि प्रत्येकाला लागणारा तिचा अर्थही वेगळा असला तर त्यात नवल नाही.

- दिगम्भा

आभार..

आवडाबाई, पल्लवी, दिगम्भा,

आपले आभार..

दिगम्भाशेठ,

आपण विस्तृत अर्थ दिला आहे त्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच कामाला लागतो. बघू कसं जमतं ते..

तात्या.

हा एक मेहदी हसन साहेबांचा दुवा!

तात्या
हा एक दुवा अजून गावला!

हे जुने चित्रण आहे. चित्रपटाचे नाव मला माहित नाही.

http://www.youtube.com/watch?v=adBGsnYiaZk&mode=related&search=

मेहदी हसन साहेबांचा आवाज आहे का हा? हे पण खुपच ताकदीने गायलेले आहे.
या गाण्यांत जरा गुंतूनच चाललो आहे. सदैवच ऐकवेसे वाटतेय आता!
आपला
(गझलमय!) गुंडोपंत

धन्यवाद गुंड्याभाऊ..

;)

मेजवानी.

तात्या, रंजिश ही सही वर नक्की लिहा. या गाण्याचे तुम्ही केलेले रसग्रहण म्हणजे माझ्यासारख्या वाचकांना मेजवानीच असणार आहे!

ईश्वरी.

देवगडचा हापूस

तात्यांच लिखाण एकदम yummieeeee असतं देवगडच्या हापुस आंब्यासारखं.

पल्लवी

धन्यवाद,

ईश्वरी, पल्लवी,

कवतिक केल्याबद्दल धन्यवाद! ;)

पल्लवी,

यमी की ममी ते माहीत नाही, पण चांगलं लिहायचा प्रयत्न करेन..

आंबा हापूसचा निघतो की रायवळचा ते बघायचं ! ;)

आपला,
(देवगडचा आंबेवाला) तात्या.

 
^ वर