मराठीमधून "बॅचलर ऑफ मास मिडीआ" (बीएमेम) : दीपक पवार यांचा प्रतिसाद

संदर्भ : उपक्रमावरचा हा लेख आणि त्यावरील चर्चा :
http://mr.upakram.org/node/1859

खाली दीपक पवार यांचा प्रतिसाद देत आहे :

उपक्रम वरील मित्रानो ,

“लोकसत्ता” तल्या माझ्या लेखाला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद . मागच्या आठवड्यात शासनाची परवानगी मिळविण्यासाठी आणि मग त्याआधारे विद्यापीठातली कार्यवाही वेगात होईल यासाठी प्रयत्न झाले . आता यावर्षी थोडे उशिरा का होईना , पण मराठी बीएमएम सुरु होईल . याच काळात घरात लग्न असल्याने ईमेल पाहणं , उत्तर देणं हे करु शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व .

माझ्या लेखावर आलेल्या काही प्रतिक्रिया या कामाचं स्वरुप समजून घेण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या आहेत . काही या कामात कशी मदत करता येईल याची विचारणा करणार्‍या आहेत. तर काहींना या कामाबद्दल आक्षेप आहे . काही वेळा मूळ व्यक्तीच्या नावाने तर काही वेळा टोपण नावाने प्रतिक्रिया आल्या आहेत . शक्य तिथे वैयक्तिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वप्रथम पार्श्वभूमी :

गेली बरीच वर्षे बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) हा मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्णत: इंग्रजीतून सुरु होता. तो मराठीतून आणण्यासाठी मराठी पत्रकाराचं शिष्टमंडळ मराठी अभ्यास केंद्राने नेलं. त्यानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना व मराठीकरण सुरु झालं . मूळ इंग्रजी अभ्यासक्रमात मराठी , महाराष्ट्र यांना अजिबात स्थान नव्हतं . कारण तो जाहिरात कंपन्यांना बॅकऑफिसला लागणारी मुलं मिळावीत या उद्दिष्टाने बनवला होता. विद्यापीठात अनेक अडथळे पार करत तो मंजूर झाला. आता शासनानेही त्याला मंजूरी दिलीय. आता इंग्रजी , मराठी दोन्ही अभ्यासक्रम सारखेच आहेत .

आजानुकर्ण यांचा या प्रयत्नांना पाठिंबा आहे. त्याबद्दल त्यांचे आभार . अभ्यास केंद्राच्या विविध कृतिगटांची माहिती या पत्रासोबत दिली आहे. तसेच इतर काही उपयुक्त माहितीही दिली आहे. त्यावरुन आपण आमच्याशी कशा पद्धतीने जोडून घेऊ शकता याचा आपल्याला अंदाज येईल.

मी पार्श्वभूमी आधीच स्पष्ट केली आहे. दोन वेगळे अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे ज्याला इंग्रजी बीएमएम शिकायचंय त्याला तो नक्कीच शिकता येईल . पण त्यात संभाषण कौशल्य आणि अनुवाद कौशल्य या दोन विषयपत्रिकांमध्ये मराठीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याला आणि महाराष्ट्राचं राजकारण , समाजकारण यांचा समावेश होण्याला झालेला विरोध याचं मराठीद्वेष्टेपण असंच वर्णन केलं पाहिजे. विरोध करणार्‍यांमध्ये अमराठी आहेत हा योगायोग नाही . आपण दिलेला पोलिटिकली स्मार्ट , डिप्लोमॅटिक आणि सटल् राहण्याचा सल्ला योग्यच आहे. पण काहीवेळा त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीही वापरुन पाहाव्या लागतात. सनदशीर लढ्याच्याच नव्या पद्धती तयार कराव्या लागतात.

माझ्या लेखाच्या संपादकीय किंवा वार्ताहारीय शैलीची चिकित्सा करणारी एक प्रतिक्रिया आहे. चळवळीची गरज म्हणून जेव्हा लेखन केलं जातं , तेव्हा त्याची शैली तपासायला वेळ नसतो. मात्र या लेखातलं प्रत्येक वाक्य तथ्यात्मक आहे हे मी मुद्दाम नमूद करु इच्छितो. काही तपशील लेख अधिक स्फोटक होऊ नये म्हणून दिलेला नाही. त्यात या मंडळींनी विद्यापीठ आणि इतर यंत्रणांना लिहिलेल्या पत्रांचा समावेश आहे.

आजानुकर्ण यांनी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील मराठी शाळांची जी स्थिती मांडलीय त्याच्याशी मी पूर्णत: सहमत आहे. किंबहुना या प्रश्नाचं गांर्भीय लक्षात घेऊन मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी आमचा एक कृतिगट काम करतो. त्यासाठीचा एक कृतिआराखडा एक वर्षापूर्वी शासनाला सादर केला. विनाअनुदानित शाळांची दुकानदारी बंद व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय . मराठी शाळांमधल्या गळतीचं एक कारण आपल्या मुलांना इंग्रजी आणि तंत्रज्ञानाचं योग्य शिक्षण मिळणार नाही अशी पालकांच्या मनातली भीती. ती जावी यासाठी मराठी माध्यमातल्या मुलांसाठी , शिक्षकांसाठी इंग्रजीच्या कार्यशाळा आम्ही घेतो. पण हे प्रयत्न आणि विद्यापीठीय स्तरावरचे प्रयत्न एकाच वेळेस व्हायला हवेत . आपण राजकीय नेत्याच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा उल्लेख केला आहे. गेल्या दहा वर्षात ही परिस्थिती अधिक हाताबाहेर गेली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मध्यम आणि उच्च मध्यमवर्गांची मुलं अगदी अपवादाने जातात हे खरंच आहे . आजवर ज्यांनी मराठीचे झेंडे खाद्यांवर घेतले अशा लेखक, पत्रकार , राजकारण्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं . त्यामुळे बोलण्यावागण्यात विसंगती निर्माण झाली. त्याची फळे आज कार्यकर्ते म्हणून आम्हांला भोगावी लागताहेत. आज मराठीचा आग्रह धरला की लोक तुमची मुलं कोणत्या माध्यमात जातात असा प्रश्न विचारतात. माझी आणि माझ्या सहकार्‍यांची मुलं मराठी माध्यमातच शिकतात. त्यामुळे आम्हांला त्याबद्दल काही बोलण्याचा थोडाफार अधिकार मिळतो. हा रेटा वाढवून त्याचं शासकीय धोरणात रुपांतर करायला लावणं हाच मराठीच्या यापुढच्या काळातल्या चळवळी यशस्वी होण्याचा आधार असणार आहे.

या प्रकारच्या चळवळीला पोषक संदर्भसाहित्याचं विश्लेषण करणे , आवडलेल्या उपक्रमासाठी (महाराष्ट्रात असाल तर ) वेळ देणे किंवा याप्रकारच्या चळवळींना आर्थिक पाठिंबा देणे अशा विविध मार्गांनी आपण आमच्याशी जोडून घेऊ शकता. आपण ज्या राजकीय नेत्यांचा उल्लेख केलाय त्यातल्या अनेकांची मुलं मराठी माध्यमात शिकत नाहीत, शिकलेली नाहीत याची आम्हांला कल्पना आहे. पण कदाचित त्यामुळेच त्यांना मराठीची बाजू उघडपणाने घेणं भाग पडतं. समर्थनाच्या पत्रांनी त्याचं भाषेवरचं प्रेम सिद्ध होत नाही हे खरंच आहे. पण त्यांना पूर्ण डावलून सुद्धा पुढे जाता येणं कठीण आहे. त्यामुळे शक्य तिथे सहकार्य , आवश्यक तिथे विरोध असं करतंच पुढे जावं लागतं.

शिक्षणाच्या माध्यमाच्या निवडीसाठी भाषेविषयीचं प्रेम हा एक निकष आहेच . पण त्यामागे शिक्षणशास्त्र व मानसशास्त्राचा आधारही आहे. मराठी साहित्यावर इंग्रजीतून पीएच.डी. जरुर व्हावी . पण इंग्रजीतल्या मोठ्या लेखकांवर मराठीतून संशोधन झालं तर मराठी वाढेल. इंग्रजी भाषेत भर घालण्यासाठी जगभरातून लोक प्रयत्न करताहेत . मराठीसाठी मात्र आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत . भाषा – प्रेम मूलत: शिक्षणाने जगते. साहित्य – व्यवहार हा एकूण भाषा व्यवहारातला महत्त्वाचा पण छोटा भाग आहे. भाषा व्यवहारातून संपली तरी लोक त्यातून साहित्यनिर्मिती करु शकतात. (उदा० संस्कृत , पाली ) मराठीचं असं होऊ नये अशी आमची इच्छा आहे.

श्री. अण्णा चिंबोरी यांच्या प्रतिक्रियेच्या दर्जाबद्दल इतर सहभागी मंडळीनी आपली मतं दिलीच आहेत . त्यामुळे त्याची पुनरुक्ती करत नाही. एखादं आंदोलन यशस्वी झालं तर त्याबद्दल सहभागी झालेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि आंदोलनाचे टप्पे मांडणे यांत थयथयाटी आगपाखड , स्वत:चीच पाठ थोपटून घेणे , आरती ओवाळणे अशी घृणास्पदता कुठे दिसते हे मला कळत नाही. प्रतिक्रिया देणार्‍याच्या आकलनाच्या मर्यादेबद्दल मला लेखक म्हणून काही करता येणार नाही.

दीपक पवार मुंबईतच राहतात. जग कुठे चालले आहे हे मला नीट कळते. पण ते कुठे जाण्यात आपल्या समाजाचे हित आहे आणि ते साधण्यासाठी काय केले पाहिजे याचा अधिकचा मी विचार करतो. चिंबोरी यांनी केल्यामुळे जातीय उल्लेख करणं भाग पडतंय . पवार आडनावाच्या माणसाला, धोतरे , शेंड्या , जानवी सांभाळण्यात रस असणार नाही एवढं किमान भान ठेवलं असंत तर प्रतिक्रिया लेखकाचा बाष्कळपणा निम्यावर आला असता.

बदलत्या युगात प्रगती करण्यासाठी मराठीसह इंग्रजीचीही आवश्यकता आहे. मराठी टाळणं हे प्रगतीचं लक्षण आहे असं आम्ही मानत नाही. इंग्रजी शिकणं आणि इंग्रजीतून शिकणं या दोन पूर्णत: वेगळ्या गोष्टी आहेत . ( लेखकाने एनसीईआरटीने प्रकाशित केलेला प्रा०यशपाल समितीचा अहवाल पाहायला हरकत नाही .)

मुलांनी इंग्रजीतून शिक्षण घेऊ नये असं आमचं म्हणणं नव्हतं आणि नाही. मराठीतून बीएमएम शिकणार्‍या मुलांनाही अनिवार्यपणे इंग्रजी शिकायला लागावं अशी सोय मुद्दामच या अभ्यासक्रमात केली आहे. मराठीतून शिकणार्‍या मुलांनी इंग्रजीपासून दूर जाऊ नये असं हेतूत: केलं आहे. त्यामुळे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रश्नच नाही. पवार , ठाकरे कुलोत्पन्नांची प्रमाणपत्रं नसती तर यशस्वी व्हायला वेळ लागला असता ,पण यश मिळालंच असतं. ज्या अभ्यासक्रमाबद्दल फारशी कल्पनाच नाही तो फालतू आहे असं म्हणून त्याची हेटाळणी करणं हे पूर्वग्रहदूषित मानसिकतेचं लक्षण आहे. राज ठाकरेंच्या कार्यपध्दतीबद्दल प्रतिक्रिया-लेखकाला आक्षेप असतील तर त्याने त्यांच्या पक्षाच्या संकेतस्थळावर ते थेट नोंदवायला हरकत नाही . पण आमच्या कामातल्या यशाचा राज ठाकरेंच्या आंदोलनाशी बादरायण संबंध जोडण्यासाठी कल्पनाशक्तीला ताण देण्याचं कारण नाही. भौतिक प्रगतीसाठी स्वदेश सोडणार्‍यांनी ते जिथे आहेत तिथून भाषासंवर्धनाचं काम केलं तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे ? परदेशस्थ मराठी माणसांकडून अजूनही खूप अपेक्षा आहेत. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी साहित्य –विकास आणि भाषाविकास यातला फरक लक्षात घेणे.

श्रीमती सुप्रिया सुळे आणि राऊतद्वय यांनी मराठीतून शपथ घेतली नसेल तर आपण त्यांच्यावर जरुर टीका करा. पण चळवळी चालवणार्‍यांना वैचारिक सोवळेपण पाळून चालत नाही . त्यात थोडी तडजोड असेल , पण या सहकार्यासाठी आम्ही आमच्या भूमिकेत तडजोड करत नसू तर कुणी आक्षेप घेणयाचं कारण नाही.

बाबासाहेब जगताप यांनी पत्रकारीतेचं शिक्षण आणि प्रत्यक्ष मराठी पत्रकारीता यांच्या संबंधांबद्दल आत्मीयतेनं लिहिलंय. मराठी वर्तमानपत्रांतली , वृत्तवाहिन्यांवरची भाषा इंग्रजाळलेली आहेच. त्यात बदल करावे असे आम्ही आमच्या माध्यमातल्या मित्रांना सुचवतोच . त्यादृष्टीने एक उपाय सुचवावासा वाटतो. जागरुक वाचक , प्रेक्षकांनी एकेक मराठी वृत्तपत्र , वृत्तवाहिनी निवडून दिवसभरात त्यांनी वापरलेल्या इंग्रजी शब्दांची यादी त्यांच्या मुख्य संपादकांना पाठवावी. पत्राची भाषा आवाहनाची असावी. सातत्याने असे प्रयत्न केले तर यश मिळेल. माध्यमांमधले लोक उघडपणे तुमच्या सूचनांचं श्रेय तुम्हांला देणार नाहीत . पण बदलाची मानसिकता तयार होईल.

काही जणानी राममोहनच्या धाडसाचं कौतुक केलंय त्याबद्दल आभार . त्याच्या उपजीविकेसाठी एखाद्या पाठ्यवृत्तीच्या शोधात आम्ही आहोतच . आपल्या परिचयात यासाठी सहकार्य करणार्‍या व्यक्ती असतील तर जरुर कळवा. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू.

आपणां सर्वांशी संवाद साधून आनंद वाटला . आपल्या प्रतिसादाचे सातत्यपूर्ण सहकार्यात रुपांतर होईल असा विश्वास वाटतो. काहीजणांच्या प्रतिक्रियांवर उत्तर द्यायचं अनवधानाने राहून गेलं असेल तर क्षमस्व . आपण माझ्याशी deepak@marthivikas.org वर संपर्क साधू शकाल. आपण महाराष्ट्रात राहत असाल तर सक्रीय कार्यकर्ते म्हणून आमच्याशी जोडून घेऊ शकाल . आर्थिक सहकार्य शक्य असेल तर धनादेश “मराठी अभ्यास केंद्र्” या नावाने काढावा. आमचं काम निष्ठेने आणि पारदर्शकपणे चालते आणि चालेल याची हमी देतो.

आपला स्नेहांकित ,

दीपक पवार

अध्यक्ष , मराठी अभ्यास केंद्र

लेखनविषय: दुवे:

Comments

काही शंका

बीमेमच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा- संस्कृती यांचा समावेश असावा हे मान्य. पण सबंध अभ्यासक्रम मराठीत असण्याचे नेमके काय फायदे आहेत ते समजले नाही.

आज बीए, बीकॉम वगैरे अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमात असतात. त्यापैकी नोकरीत कोणाला प्राधान्य मिळते हे उघड आहे. मराठी मीडियमवाल्यांना नोकरी मिळवताना त्रास होतो. अशाच प्रकारे इंग्रजी माध्यमातून बीमेम केलेले ब्राह्मण आणि मराठी माध्यमातून केलेले ते शूद्र अशी वर्णव्यवस्था आपल्याला अपेक्षित आहेका? आपण तसे समजणार नाही हे खरे असले तरी नोकरी देणारे असेच समजणार हे नक्की.

उद्या परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी कोणाला जास्त उपलब्ध होतील? अर्थातच इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांना. त्यामुळे मराठी माध्यमातून अभ्यासक्रम सुरू केल्याने आजच्या मराठी माणसाचा इगो सुखावला तरी त्यातून शिक्षण घेणार्‍या पिढ्या नक्कीच दूषणे देतील.

१९४० किंवा ५०च्या दशकात बाळासाहेब खेरांनी ५ वी ऐवजी ८ वी पासून इंग्रजी सुरू केले याबद्दल आजतागायत सर्व लोक, खासकरून जे त्या काळात शिकले ते, त्यांना दूषणे देत आले आहेत.
त्यामुळ भविष्यात वाईटपणाचे धनी होण्यापेक्षा आजच वाईटपणा घेऊन मराठी माध्यमाला विरोध करणार्‍यांना पाठिंबा द्यावासा वाटतो.

विनायक

असेच मत

माझेही असेच मत आहे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावर मराठीतून शिक्षण योग्य आहे. मात्र पदवीसाठी हा अट्टाहासच आहे असे वाटते. मध्यंतरी इमेलद्वारे आलेल्या एका लेखाचे तुटकेफुटके भाषांतर द्यावेसे वाटते.

७४वे कन्नड साहित्य संमेलन उडुपी येथे झाले. संमेलनात चर्चिलेले विषय आणि शेवटी काढलेला निष्कर्ष हे पूर्णपणे अपेक्षितच होते. कन्नड भाषेचे 'रक्षण' करा. कन्नड भाषेला 'जतन' करा. कन्नड भाषेला 'वाचवा'. अशा हजारो घोषणा देण्यात आल्या.

अशा प्रकारच्या घोषणा या साधारण दोन प्रकारच्या व्यक्तींकडून देण्यात येतात. १. बुद्धीमंत २. बुद्धीमंद

बुद्धीमंत हे स्वत:ला हुशार आणि विद्वान मानत असले तरी भाषा वाचवणे म्हणजे नक्की काय करणे याबाबत त्यांचे स्वत:चेच विचार स्पष्ट नसतात. भाषा वाचवण्यासाठी केलेल्या उपायांचे परिणाम काय होतील हे पाहण्याइतकी दूरदष्टी त्यांच्याकडे नसते. तर बुद्धीमंद लोक हे त्यांचे भाषेविषयीचे तथाकथित प्रेम आणि अभिमान हा वेगवेगळ्या सभा, मोर्चे आणि इतर भाषांमधील फलक फाडणे, त्यांना काळे फासणे. बसवर दगडफेक करणे किंवा स्वत:ला अधिक शूर मानत असल्यास ती बस जाळून टाकणे यासाठी वापरतात.

भाषा ही संस्कृतीचे वाहन आहे. संस्कृतीचा प्राण आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेले विचार, ज्ञान हे भाषेमध्ये प्रकट होते. मूर्त स्वरुप घेते. हे विचार पुढे अनेक पिढ्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये संक्रमित होतात. याच विचारांमध्ये समूहजीवन आणि वैयक्तिक आयुष्य प्रभावित करण्याची, त्याला दिशा देण्याची ताकद असते. कुवेम्पु, पंपा, बेंद्रे, बसवेश्वर, पुरंदरदास, कारंथ आणि इतर अनेकांचे विचार आपल्याला उपलब्ध आहेत याचे बहुधा सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी कन्नड भाषेच्या माध्यमातून आपले विचार प्रकट केले.

'जतन', 'संरक्षण', 'वाचवा' या शब्दांचे नक्की अर्थ काय आहेत? सर्व व्यवहार हे कन्नडमधूनच व्हावेत? जगातील सर्व तांत्रिक ज्ञान कन्नडमध्ये भाषांतरित करावे? कन्नड भाषेच्या किती तथाकथित रक्षणकर्त्यांना मद्य आणि मध्य यामधला फरक माहिती आहे? मोले-मोळे किंवा मले-मळे या शब्दांमधले फरक ते छातीठोकपणे सांगू शकतात का? अतिशय घाणेरड्या कन्नडमध्ये हे लोक देत असलेल्या घोषणा पाहून मला त्यांचा तिरस्कार वाटतो.

कन्नड वाचविण्याच्या नावाखाली एकामागून एक येणारे राज्यकर्ते शिक्षणव्यवस्थेशी खेळ करत आहेत. शालेय शिक्षण केवळ कन्नड भाषेतून असावे असे फतवे काढत आहेत. कोणतेही नियंत्रण नसलेल्या अशा निर्णयांमुळे आपल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना तांत्रिक व शास्त्रीय ज्ञान योग्य प्रकारे कसे मिळेल? अशा निर्णयांमुळे आपल्या मुलांचे किती नुकसान होत आहे याची आपल्याला कल्पना आहे का?

कन्नड वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकडे पाहिल्यास, कन्नड प्रसारमाध्यमांमध्ये मी रोज पाहतो तेव्हा एकही व्यक्ती आपले संपूर्ण वाक्य शुद्ध आणि योग्य कन्नडमध्ये बोलत नाही. वाक्यातील महत्त्वाचा गाभा हा इंग्लिशमध्ये असतो. मुलाखतकार, निवेदक, कलाकार सर्वांची हीच स्थिती आहे. कन्नड चित्रपटांची नावे इंग्लिशमध्ये असतात. चित्रपटप्रसारासाठी देण्यात येणार्‍या मुलाखती इंग्लिशमध्ये किंवा कांग्लिशमध्ये असतात. चित्रपट कलाकारांची नावेही इंग्लिशमध्ये असतात. अशा वित्तपिपासू लडदू प्रसारमाध्यमांमुळे कन्नड भाषा जतन होत आहे का? माझ्या मते तर अशा गोष्टींमुळे एका सुंदर भाषेची आणि त्याच्याशी निगडीत प्रगतीशील संस्कृतीची आपण विटंबना करत आहोत.

कर्नाटकात बाहेरून येणार्‍या लोकांना कन्नड शिकावे असे वाटण्यासाठी आपण काय करत आहोत? अशा लोकांशी असहकार पुकारणे, व्यवहार करण्यास नकार देणे ह्या गोष्टी तर अतिशय धोकादायक आहेत. अशा गोष्टी केल्याने आपली संस्कृती, प्रतिमा आणि अर्थकारणावर खूप वाईट परिणाम होईल. कन्नड भाषा फुलण्यासाठी अधिकाधिक लोकांनी ती प्रेमाने, आनंदाने आणि उत्साहाने वापरणे आवश्यक आहे.

जागतिकीकरण ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. नव्या विचारांसाठी कवाडे उघडताना आपल्याला आपल्या श्रद्धा आणि जुने विचार यांचे कठोर परीक्षण करणे हे क्रमप्राप्त असते. सध्या अस्तित्वात असलेल्या संस्कृतीमध्ये तणावही निर्माण होत असतात. मात्र असे तणाव आणि प्रश्न निर्माण झाल्यावर आपण काय करतो हे खूप महत्त्वाचे आहे. या परिस्थितीचा अनुकूल वापर करून घेऊन आपली प्रगती कशी होईल हे पाहण्यासाठी स्वत:मध्ये बदल करायचे की स्वत:ला जगापासून कोंडून घेऊन नंतर दगडफेक करायची?

कन्नड ही प्रादेशिक भाषा आहे. तिला भौगोलिक मर्यादा आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, अर्थकारणामध्ये - कर्नाटक असो वा बाहेर - इंग्लिश ही अत्यावश्यक भाषा आहे. कन्नडचा वापर करून आपण खूप मोठी तांत्रिक आणि शास्त्रीय मजल मारू शकू हे मानणे मूर्खपणाचे आहे.

बहुभाषिक असण्याचे अनेक फायदे आहेत हे सर्वच जण जाणतात. मी त्यात काही नवीन सांगत नाही. मात्र नवीन भाषा शिकण्याची प्रक्रिया जर आनंददायी आणि स्वेच्छेने केली असेल तरच ती व्यवस्थित होऊ शकते. कन्नड भाषेला 'जगू' द्या. 'जगवू' नका. कन्नड वापरणे ही 'कूल थिंग' होणे आवश्यक आहे. मात्र ते केवळ प्रेमानेच होऊ शकते. दबावाने नाही.

याआधी हा लेख येथे लिहिला होता.



बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असे ना का!

अट्टाहासच आहे
खुप सारे अभ्यासक्रम चालतात
त्यात एक भर.
पन् यांना त्रास बराच झाला असे दिसते.
त्या मागचा त्यांचा उ द्देश वाचल्यावर त्यांनी एवढा त्रास घेतला याचे कौतुक आहे.

अन् त्यांना विरोध करणार्‍यांचा उद्देश पाहिला कि वाईट वाटते.

उत्तर

उत्तर वाचले. येथे दिल्याबद्दल मुक्तसुनीत यांचे आभार. सविस्तर प्रतिसाद सवडीने देतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आपण माझ्याशी .. वर संपर्क साधू शकाल.

जम्या नै
डीमन् रीप्लाईड्

आर्थिक सहकार्य

आर्थिक सहकार्य शक्य असेल तर धनादेश “मराठी अभ्यास केंद्र्” या नावाने काढावा. आमचं काम निष्ठेने आणि पारदर्शकपणे चालते आणि चालेल याची हमी देतो.
लगता है मिटर चालु हो गया.
marathivikas.org साईट् अंडर कंस्ट्र्क्शन आहे.

deepak@marthivikas.org च्या ऐवजी
deepak@marathivikas.org वाचावे

 
^ वर