मराठीद्वेष्ट्यांची बनवाबनवी लोकसत्ता- १७ जून २००९, विशेष लेख

मराठीद्वेष्टय़ांची बनवाबनवी

लोकसत्ता- १७ जून २००९, विशेष लेख

गेले काही दिवस बीएमएमच्या (बॅचलर ऑफ मास मीडिया) मराठीकरणाने कार्यकर्त्यांना झपाटलंय. एका अभ्यासक्रमाचे मराठीकरण करण्यासाठी वर्षभर विविध पातळ्यांवर झगडावं लागतं, हे दु:खद तरीही अपरिहार्य आहे, याचं कारण विद्यापीठात आणि इतरत्र मुबलक आढळणारे झारीतले शुक्राचार्य. या सगळ्यांना सरळ करण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग वापरण्याचा पर्याय सुरुवातीपासूनच उपलब्ध होता. पण दोन कारणांनी तो नाकारणं श्रेयस्कर होतं. एक म्हणजे मराठी माणसाच्या आक्रमक, दहशतवादी चेहऱ्याबद्दल गळा काढणाऱ्या विचारवंतांना, माध्यमांना त्यामुळे आयतंच कोलीत मिळालं असतं. दुसरं म्हणजे एकदा दमबाजी करून सुटण्यातला हा प्रश्न नाही. त्यासाठी शासन- प्रशासनातल्या खाचाखोचा समजून घेऊन योग्य त्या ठिकाणी मराठीद्वेष्टय़ांना चाप लावण्यासाठी सतत अभ्यास लागतो, हस्तक्षेप करावा लागतो. त्यासाठी ज्या व्यवस्थेला बदलायचंय तिच्याशी संवादाचे दरवाजे खुले ठेवावे लागतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न जसा मराठी भाषेचा आहे तसा मराठी पत्रकारितेचाही आहे, त्यामुळे मराठी अभ्यास केंद्राने पत्रकारांच्या वतीने लढण्यापेक्षा पत्रकारांना हा लढा आपला वाटेल यासाठी प्रयत्न केले. हे करत असताना राजकीय, पक्षीय, अस्पृश्यता पाळली नाही. राज ठाकरेंनी गरज पडेल तिथे मदतीचं आश्वासन दिलं. भारतकुमार राऊत, संजय राऊत या शिवसेनेच्या खासदारांनी समर्थनांची पत्रं दिली. डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांनी पत्रकांद्वारे समर्थन दिलं. सुप्रिया सुळे आणि राजेश टोपेंनी मराठी बीएमएमच्या फायली वेगात हलतील हे पाहिलं. त्यामुळे सर्व छुपे, उघड डाव मोडून पुनर्रचित अभ्यासक्रमासह इंग्रजी आणि मराठी बीएमएमचा मार्ग मोकळा झाला आहे.

इथे या कथेने नवं वळण घेतलंय. वर्षांनुर्वष नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती, अंमलबजावणी, अभ्यासमंडळं, विद्वत-परिषद यांवर वर्णी याला सरावलेल्या दक्षिण मुंबईतल्या धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक महाविद्यालयांना या वेगवान बदलांचा जाच झाला. त्यांची खरी आणि दाखवायची दु:खं वेगळी होती. खरं दु:ख इंग्रजी बीएमएमच्या मांडीला मांडी लावून मराठी बीएमएम सुरू झाल्याचं! आतापर्यंत मराठीतून उत्तरं लिहिण्याची सवलतही या अभ्यासक्रमात नव्हती. त्यामुळे मराठीचा अभ्यासक्रम ही कल्पनाच मानवणार नसल्यामुळे आधी तो येणं कसं अव्यवहार्य आहे हे पटवून देण्याचे प्रयत्न झाले. विविध माध्यमांतल्या मराठी पत्रकारांनी हे युक्तिवाद उधळून लावल्यावर मग नवा अभ्यासक्रम आखला गेला. त्यातही तो फक्त मराठीला लागू व्हावा आणि इंग्रजीसाठी मात्र जुनाच अभ्यासक्रम असावा असा प्रयत्न विद्वत-परिषदेच्या पातळीवरही झाला त्यामुळे ‘मराठी बीएमएम’ ही सामान्य वकुबाच्या मुलांसाठीची दुय्यम दर्जाची पदवी आहे, असा संदेश देण्याचा मार्ग मोकळा होणार होता. अभ्यास केंद्राने तोही हाणून पाडला. आता नवा अभ्यासक्रम लागू करण्यावाचून पर्याय नाही हे लक्षात आलेली दक्षिण मुंबईतली एच. आर., के. सी., जयहिंद, सोफिया आणि झेव्हियर्स ही महाविद्यालयं चिडली. कुणालाही न विचारता बीएमएम चालवणाऱ्या या महाविद्यालयांचं नेतृत्व प्रा. व्हिस्पी बालापोरिया, प्रा. वरलक्ष्मी, प्रा. मार्गारिटा कोलासो आणि प्रा. नंदिनी सरदेसाई या प्राध्यापकांनी स्वत:कडे घेतलं. झेव्हियर्स महाविद्यालयाचे फादर फ्रेझरही त्यात होते. पण नंतर ते बहुधा उघडपणे त्यात यायला बिचकले असावेत. या प्रत्येकाचं स्वत:चं दु:ख आहे. प्रा. बालापोरिया यांच्या मते त्यांनी हा अभ्यासक्रम सुरुवातीला तयार केलाय, त्यामुळे पुनर्रचनेत त्यांचं अमूल्य (! ) मत हवंच होतं. प्रा. वरलक्ष्मी आणि प्रा. कोलासो या आपापल्या महाविद्यालयात बीएमएमच्या समन्वयक आहेत. बरीच र्वष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मराठी आहेत. प्रा. नंदिनी सरदेसाई यांचं समाजशास्त्रातलं ज्ञान विद्यापीठाने वापरलं नाही म्हणून त्यांचा राग आहे. अशी या ‘माध्यम-विचारा’बाबत सुरुवातीपासूनच निवृत्त झालेल्या मंडळींची गट्टी जमली आहे, गेल्या दोन आठवडय़ात मूठभर मंडळींच्या दादागिरीचं अमर्याद दर्शन त्यांनी घडवलं आहे.

सुरुवातीला त्यांनी कुलगुरू डॉ. खोले यांना जाब विचारला. विद्यापीठांतर्गत विविध व्यासपीठांवर चर्चा होताना, मराठी वृत्तपत्रांतून चर्चा होताना तोंड का उघडलं नाही, असा प्रश्न त्यांना कुलगुरूंनी आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी विचारला तेव्हा ते निरुत्तर झाले. नंतर त्यांनी राज्यपाल व कुलपती एस. सी. जमीर यांच्याकडे या अन्यायाविरुद्ध धाव घेतली. राज्यपाल ईशान्य भारतातले, म्हणून ईशान्य भारतातून येणाऱ्या मुलांची नव्या अभ्यासक्रमाने होणारी गैरसोय हा मुद्दा तयार केला गेला. मराठीचं काही बरं झालं की ज्यांना खुपतं असे बरेच अमराठी सनदी अधिकारी महाराष्ट्र शासनाने पगार देऊन पोसले आहेत. माहिती तंत्रज्ञानात मराठीचा अजिबात शिरकाव होऊ न देणारे क्षत्रपती शिवाजी, भ. प्र. सिंह, मराठी शाळांचा बोजवारा उडवणारे संजयकुमार हे त्यापैकी काही. राजभवनातल्या अशाच अमराठी अधिकाऱ्यांना गाठून या प्रश्नाचं गांभीर्य वाढवलं. राज्यपालांनी सुज्ञपणाने या मंडळींना विद्यापीठाशी पुन्हा बोला असं सांगितलं.
सोमवार, ८ जून रोजी प्रकुलगुरू ए. डी. सावंत यांनी बैठक बोलावली तेव्हा या त्रस्त मंडळींनी त्यांना भंडावून सोडलं. त्यांच्या सुदैवाने अभ्यास मंडळाचे सदस्य, मराठी पत्रकार पुरेसे आक्रमक असल्याने त्यांना गप्प बसवणं शक्य झालं. संवादकौशल्यं आणि अनुवादकौशल्यं या दोन विषयांमध्ये इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तीन भाषांचा अंतर्भाव केला होता. परराज्यांतून आलेल्या बापडय़ा मुलांना या तीन भाषांचं ओझं सोसणार नाही, शिवाय इथे ते शिकतील म्हणजे इथे नोकरी करतीलच असं नाही, असे युक्तिवाद करत इंग्रजीसोबत फक्त एकच भाषा द्या असा त्यांनी आग्रह धरला. अभ्यास केंद्राची भूमिका आधीही मराठी अनिवार्य असावी अशी होती, आजही आहे. पण बैठकीतल्या पत्रकारांचं असं म्हणणं पडलं की, किरकोळ दुरुस्त्यांसह पुनर्रचित अभ्यासक्रमाला मान्यता आणि मराठी बीएमएम यंदापासून सुरू होणं, असे दोन मोठे निर्णय झाल्याने आपण मोठी मजल मारली आहे. त्यामुळे काही महाविद्यालये पर्याय घेत असतील तर या खेपेला तडजोड म्हणून ते स्वीकारू. पण याच बैठकीत मी दक्षिण मुंबईतल्या या महाविद्यालयांच्या टीकेमागचे हेतू तपासले पाहिजेत, अशी भूमिका मांडली होती पण प्र-कुलगुरूंना सहमती घडवून आणायची असल्याने हा वाद नको होता. मुळात माध्यम अभ्यासाची पदवी किंवा प्रत्यक्ष माध्यमांमध्ये काम यातलं काहीही नसणाऱ्यांची दखल विद्यापीठाने घ्यायलाच नको होती. तशी ती घेतल्यावर विद्यापीठाने त्यांच्या काही सूचनांची दखल घेऊन इतिवृत्त बनवलं. त्यावर सही करायला या मंडळींनी नकार दिला. कारण त्यांना त्यात आता आणखी बदल हवे होते. ते होत नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी एका परंपरागत मराठीद्वेष्टय़ा इंग्रजी वृत्तपत्राकडे जाऊन एकांगी बातमी छापून आणली. अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे निमंत्रक प्रा. संजय रानडे यांना घेरण्याचे प्रयत्न त्यांनी नव्या दमाने सुरू केले. दरम्यान या मग्रुरांच्या तुष्टीकरणासाठी विद्यापीठाने इतिवृत्तांत ‘इंग्रजी किंवा हिंदी किंवा मराठी’ असा बदल केला. हे कळल्यावर आम्ही कुलगुरूंना सांगितलं की, हा बदल लागू झाला तर या महाविद्यालयांना त्याचे परिणाम वेगळ्या मार्गाने भोगावे लागतील. आम्ही यातून बाजूला झालो, तर हा प्रश्न संपूर्णत: राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना यांच्या आखाडय़ात जाईल. त्यानंतर त्याचे जे काही परिणाम होतील त्याची जबाबदारी आमची असणार नाही. कुलगुरूंनी तो बदल बाद केला. (इतिवृत्ताची प्रत आम्हाला मिळालेली नाही, पण कुलगुरू दिलेला शब्द पाळतात, असा बीएमएमच्या बाबतीत अनुभव आहे. )

आता या त्रस्त स्त्रियांनी कोर्टाची पायरी चढायची धमकी दिलीय. अभ्यास मंडळातले सहापैकी तीन सदस्य इंग्रजी वृत्तपत्रांशी संबंधित असतानाही मराठी वृत्तपत्रं आणि पत्रकार यांचं प्रभुत्व असल्याचा कांगावा केला जातोय. ‘घाईने, पुरेसा विचार न करता केलेला अभ्यासक्रम’ अशी टीका करत, अमराठी राजकीय प्रशासकीय ताकदींचा वापर करून सगळी प्रक्रिया रद्दबातल करायचा त्यांचा डाव आहे. डॉ. खोले आजवर तरी त्याला बधलेले नसले तरी गरज आहे ती विद्यापीठाने यांना धडा शिकवण्याची. त्यांच्या मराठीद्वेष्टेपणामागचं राजकीय अर्थकारण व त्याचे प्रणेते यांना समाजापुढे उघडं पाडण्याची. ते करण्याचं धाडस विद्यापीठात आहे का?
बीएमएमच्या या लढय़ात राममोहन खानापूरकर हे सोफिया महाविद्यालयातील बीएमएमचे शिक्षक धाडसाने उभे राहिले. त्यासाठी त्यांनी व्यवस्थापनाचा रोष पत्करला. ते पुन्हा तिथे नोकरीला जाऊ शकणार नाहीत हे उघड आहे. ‘भाषेचा प्रश्न’ हा नुसता चर्चेचा नाही तर स्वत:चं करिअर, सुखसोयी पणाला लावण्याचाही आहे, याची तटस्थपणाने या आणि अशा लढय़ांकडे पाहणाऱ्या मराठी समाजाला जाणीव व्हावी म्हणून हे सांगत आहे. आजही या आंदोलनाला रस्त्यावरच्या आंदोलनाचं रूप देणं सहजशक्य आहे. पण सनदशीर आंदोलनं करणाऱ्याच्या मागे समाज स्वत:हून उभा राहतो असं आतून वाटतं. समूहशक्ती काही वेळा दमबाजीसाठीही लागत असेल पण ती बहुतेकदा लागते ती रचनात्मक उभारणीसाठी. मराठी भाषा, आणि संस्कृतीच्या इतक्या लढाया लढायच्या आहेत की जितके हात सोबत येतील तितके हवेच आहेत.

राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना तो आपल्या आणि शासनाच्या असंवेदनशीलतेचा सुवर्णमहोत्सव आहे याची जाणीव स्वस्थ बसू देत नाही. बीएमएमचं आंदोलन हा त्या अस्वस्थतेचाच परिपाक आहे. अशा आंदोलनांना बळ द्यायचं की नाही याचा निर्णय समाजाने घ्यायचा आहे.

दीपक पवार

deepak@marathivikas.org

लेखनविषय: दुवे:

Comments

माहिती हवी - बीएमएम अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य काय आहे?

पुणे विद्यापीठात एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्वी फक्त इंग्रजी माध्यमात उपलब्ध होता, हे स्वानुभवाने माहीत आहे. अजूनही बहुधा इंग्रजी माध्यमातच आहे.

अशाच अनेक इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रमांपैकी हासुद्धा एक अभ्यासक्रम - की असे नाही? मराठी अभ्यास केंद्राने एम् बी बी एस् इंग्रजी अभ्यासक्रमाच्या जुन्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून बी एम् एम् च्या नव्या अभ्यासक्रमाकडे लक्ष केंद्रित का केले असावे, याबद्दल कुतूहल वाटते.

मला तरी असे वाटते, की उद्या जर पुणे विद्यापीठात एम बी बी एस चा अभ्यासक्रम मराठीत बनवण्यासाठी आंदोलन झाले, तर माझ्या आवडत्या प्राध्यापकांपैकी अनेक या विषयी आक्षेप घेतील. त्यांच्यापैकी अनेक अमराठी आहेत. (सैन्यातले अधिकारी असल्यामुळे देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत.) अशा परिस्थितीत त्यांच्या मराठीद्वेषाबद्दलही साधारणपणे असाच लेख लिहिला जाईल काय?

मागे या बाबतीत एक लेख उपक्रमावर आला होता :
अभ्यासक्रमांचे मराठीकरण...केल्याने होत आहे रे...
तेव्हापासून हे कुतूहल माझ्या मनात आहे. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी याच अभ्यासक्रमाबद्दल आंदोलन होण्यासारखी विशेष परिस्थिती काय आहे? माझ्या इंग्रजी माध्यमात शिकवणार्‍या वैद्यकीय प्राध्यापकांना तेवढ्यासाठी "मराठीद्वेष्टे" म्हटले जाऊ नये, अशी मनोमन इच्छा आहे. मग या बीएमएम प्राध्यापकांना मराठीद्वेष्टे म्हणण्यासाठी अन्य अभ्यासक्रमांपेक्षा वेगळी काय विशेष परिस्थिती आहे, ते जाणून घ्यायला आवडेल.

+१

संपादकीय आणि वार्ताहार शैली

वरील लेख संपादकीय शैलीत आहे. वार्ताहार शैलीतला या संदर्भातला लेख उपलब्ध आहे काय?

संपादकीय शैली ही कुठलीतरी बाजू घेऊन मांडणारी असते. त्यामुळे अशा प्रकारची वाक्ये तिथे ठीक असतात :

एक म्हणजे मराठी माणसाच्या आक्रमक, दहशतवादी चेहऱ्याबद्दल गळा काढणाऱ्या विचारवंतांना, माध्यमांना त्यामुळे आयतंच कोलीत मिळालं असतं.

हे लोक कोण आहेत? वार्ताहारीय भाषा साधारण तथ्यात्मक असती -
या बाबतीत श्री. अमुक, प्रा. तमुक, आणि दैनिक ढमुक वृत्तपत्रांनी मराठी अभ्यासक्रमाविरुद्ध भूमिका घेतली आहे.

आणखी काही उदाहरणे :
संपादकीय शैली :

झेव्हियर्स महाविद्यालयाचे फादर फ्रेझरही त्यात होते. पण नंतर ते बहुधा उघडपणे त्यात यायला बिचकले असावेत.

वार्ताहारीय शैली (अर्थात अशी घटना झाल्याची शहानिशा करून) : या प्राध्यापकांच्या समूहामध्ये झेवियर विद्यालयाचे फादर फ्रेझर पूर्वी होते, पण आता ते नाहीत. श्री. अमुकतमुक यांनी माहिती दिली, की फादर फ्रेझर हे बिचकून उघडपणे मागे झाले आहेत, पण एका गुप्त चर्चेत त्यांचे मत पूर्वीचेच आहे.
(नाहीतर फादर फ्रेझर यांचे उघड आणि गुप्त मत काय आहे, आणि बदलायचे कारण बिचकणे आहे, की दुसरे काही हे कसे कळणार?)

संपादकीय शैली :

प्रा. नंदिनी सरदेसाई यांचं समाजशास्त्रातलं ज्ञान विद्यापीठाने वापरलं नाही म्हणून त्यांचा राग आहे.

वार्ताहारीय शैली (अर्थात अशी घटना झाल्याची शहानिशा करून) : प्रा. नंदिनी सरदेसाई यांनी पूर्वी वक्तव्य केले आहे, की विद्यापीठाने त्यांच्या समाजशास्त्रातील विशेषज्ञानाची कदर केली नाही.
(कारण प्रा. सरदेसाईंनी कुठलेतरी वक्तव्य, निषेधपत्र वगैरे लिहिल्याशिवाय "त्यांना याविषयी राग आहे" हे कळणार तरी कसे?)

हा लेख "मतप्रदर्शन" म्हणून ठीक असला तरी इतिवृत्तांत देणारा एखादा लेखही वाचायला आवडेल.

हेतूबाबत शंका नाही

दीपक पवार यांच्या हेतूंबाबत शंका नाही. मराठीच्या प्रेमापोटीच ते हा प्रकार करत आहेत. मात्र प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरच मराठी शाळांची अवस्था दयनीय आहे. या शाळांची पुढे काय परिस्थिती असेल हे सांगायला ज्योतिषांची गरज नाही.

एक उदाहरण देतो. मी १९९९ साली एचएससी पास झालो. तेव्हा मंचर गावात इंग्रजी माध्यमाची एकही प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा नव्हती. (तेव्हा इंग्रजी बालवाड्या केजी वगैरे फक्त सुरु झाल्या होत्या. जशी मुले पुढे सरकतील तसा पुढच्या वर्गांचा मागणीनुसार पुरवठा करण्याची योजना असावी.) मंचरपासून काही अंतरावर अत्यंत सुमार दर्जाचे शिक्षण देणाऱ्या दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा होत्या. (त्यापैकी एक शाळा माननीय खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या संस्थेची.) ह्या दोन्ही शाळा सुमार अशासाठी की तोपर्यंत तिथे फक्त दहावीपर्यंत शिकवले जायचे व ती मुले उच्चमाध्यमिक शिक्षणासाठी आमच्या शाळांमध्ये यायची तेव्हा त्यांच्यातील टॉपरलाही सोपे इंटिग्रेशन्स जमत नसत, किंवा खारे वारे मतलई वारे यातील फरक समजत नसे. त्या तुलनेत मंचरमध्ये असलेले आमचे रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय फार चांगले होते. शिक्षकवर्ग शाळेतले बदल्यांचे वगैरे राजकारण सांभाळूनही झपाटून काम करणारा होता. सामान्यपणे दरवर्षी एसएससी परीक्षेत एक किंवा दोन मुले पुणे बोर्डाच्या मेरीट लिस्टमध्ये येत. बहुतेकांना पुण्यातील चांगल्या इंजिनियरिंग किंवा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळे. (एचएससीमध्ये ही मुले मेरीटमध्ये नसत याचे कारण बारावीसाठी पर्यायी इलेक्ट्रॉनिक/संगणकशास्त्र वगैरे व्यावसायिक अभ्यासक्रमांची अनुपलब्धता व त्यामुळे मराठी व भूगोल किंवा जीवशास्त्र असे विषय घ्यावे लागत. मात्र तरीही निव्वळ गणित-शास्त्र विषयांच्या मार्कांवर प्रवेश मिळवणे शक्य असल्याने बऱ्यापैकी कॉलेज मिळणे शक्य असे.) मात्र ह्या सर्व परिस्थितीतही ज्यांची दुसरी किंवा तिसरी पिढी आता शाळेमध्ये जाणार आहे असे लोक गावापासून दूर अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करायचे. तिथल्या जागा भरल्या गेल्या की मग गावातील शाळेत प्रवेश घेतला जायचा. ही १९९९ ची परिस्थिती बऱ्यापैकी गाव असलेल्या परंतु निमशहरी अशा भागातील आहे. आता मंचरसह आजूबाजूच्या परिसरात ४ ते ५ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. अनेक पहिल्या पिढीतील शिकाऊ पोरेही त्या शाळांमध्ये जातात.

आजकाल शिकलेल्या पालकांपैकी किती जण आपल्या पाल्याला मराठी शाळांमध्ये घालण्यास तयार आहेत याचीही आकडेवारी पाहण्याची काही गरज नाही. ओळखीच्या चार लोकांना विचारले तरी खात्री करता येईल. अगदी नाईलाज म्हणूनच (इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही किंवा फी परवडत नाही किंवा इंग्रजी माध्यमाची शाळाच नाही वगैरे) मुलांना मराठी शाळांमध्ये घालण्यात येते. मराठी शाळांच्या शिक्षणाचा दर्जा काय आहे हे मला प्रत्यक्ष माहीत नाही मात्र अनेक लोकांकडून ऐकल्याप्रमाणे तिथेही बोंब आहे. (इंग्रजी माध्यमांच्या शाळांबाबत मात्र नेहमीच चांगले ऐकायला मिळते हेही एक नवलच.)

या सर्व पार्श्वभूमीवर पदवी स्तरावर मराठीतून शिक्षण देण्याचा (बरावाईट) अट्टाहास केल्याने काय होणार आहे हे समजून घेण्यास मी कमी पडतो आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरु झाल्याने मराठी माणसाचा अहंकार तात्पुरता सुखावेल पण उद्या इंग्रजी माध्यमातील पिढी शिक्षण घेण्यास आल्यावर पदवीसाठी ते कोणत्या भाषेतला अभ्यासक्रम स्वीकारतील?

या सर्व आंदोलनाला माझ्यासारख्यांनी कशा प्रकारचा पाठिंबा द्यावा अशी पवार यांची मागणी आहे हे समजले तर बरे होईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

राज ठाकरेंनी गरज पडेल तिथे मदतीचं आश्वासन दिलं

राज ठाकरे, भारतकुमार राऊत, संजय राऊत, सुप्रिया सुळे, राजेश टोपे यांची मुले कुठल्या कुठल्या मराठी शाळांमध्ये शिकतात हे सांगा? ज्ञानप्रबोधिनी, नवीन मराठी शाळा की नूमवी?

केवळ समर्थनाची पत्रे दिल्याने भाषेविषयीचे प्रेम सिध्द होत नाही म्हणावें.

आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!

+१

संपूर्ण सहमत.

फार पूर्वी एका याहुग्रुपवर मी अपरिपक्व विचारांतून "मराठी साहित्यशारदेची सेवा करून उपजीविका चालवणार्‍या (थोडक्यात म्हणायचे तर मराठीच्या जीवावर सरकारी मलिदा खाणार्‍या) आणि आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालणार्‍या साहित्यिकांना झोडावे का?" असा प्रश्न टाकला होता. त्यावेळी पण असेच काहीसे मत बहुतेक वाचकांनी व्यक्त केल्याचे स्मरते.

--------------------------X--X-------------------------------
सिंह एकटाच प्रतिसाद देतो. डुकरे मात्र त्या प्रतिसादावर कळपाने टीका करतात. महानवल : एका झोपडपट्टी संकेतस्थळावर केवळ डुकरेच प्रतिसाद देतात.

शाळा

शिक्षणाच्या माध्यमाच्या निवडीसाठी भाषेविषयीचे प्रेम हा एकमेव निकष ठरवणे कितपत योग्य आहे? मराठी साहित्यावर इंग्रजी माध्यमातून पी.एच.डी. करता येत असेल तर तसे केल्याने करणार्‍याचे मराठी प्रेम उणे गणले जावे का ? की फ्रेंच इंग्रजी ऐवजी मराठीतून शिकणे मराठी प्रेम दर्शवते?

भाषा-प्रेम शिक्षणाने जगते की साहित्याने?

भाषेच्या 'समर्थनात बोलल्याने/लिहील्याने' त्या भाषेच्या 'माध्यमातून शालेय शिक्षण घेतल्यापेक्षा' अधिक प्रेम सिद्ध होते अशी त्याची धारणा आहे.

यांची मुले कुठल्या भाषांतले साहित्य वाचतात हा प्रश्न जास्त संयुक्तिक आहे असे वाटते. (याहूनही मराठी साहित्य वाचतात का हा प्रश्न उजवा आहे, इंग्रजी साहित्य अधिक आवडणे/वाचणे याचा अर्थ मराठीवरचे प्रेम कमी असणे असा होत नसावा.)

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

बीएमएमच्य

बीएमएमच्या या लढय़ात राममोहन खानापूरकर हे सोफिया महाविद्यालयातील बीएमएमचे शिक्षक धाडसाने उभे राहिले. त्यासाठी त्यांनी व्यवस्थापनाचा रोष पत्करला. ते पुन्हा तिथे नोकरीला जाऊ शकणार नाहीत हे उघड आहे
काढा नवीन कॉलेज मग!
काय तर सोपस्कार लागतात त्याच्यासाठी?
थोडे कागदी घोडे. बस्स. पैसा वगेरे मुद्दा गौण आहे.
लोहा गरम है,....
एक उदाहरण ही तयार होईल.

स्वभाषा आणि स्वदेश त्याग गर्हणीय?

प्रस्तुत चर्चाप्रस्तावामध्यें पदवी पातळीवरील एकां विषयाच्या अभ्यासक्रमामध्यें मराठी माध्यमाची सोय नांही यांबाबत थयथयाटी आगपाखड केलीं आहें. स्वतः केलेल्या आंदोलनांच्या तथाकथित यशस्वितेवरुन स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा, स्वतःचीच आरती ओवाळण्यासारखा हा एकंदर घृणास्पद प्रकार आहें.

हे दीपक पवार महाशय मुंबई-महाराष्ट्रात राहतात की कॅलिफोर्नियामध्ये ही प्राथमिक शंका लेख वाचल्यावाचल्या आली. उठसूट असे उमाळें दहाबारा वर्षांनंतरही जेटलॅग न गेल्याने परदेशांत येत असतात. आज जग कुठें चालले आहे याचा काही विचार लेखकाने केल्याचे दिसत नांही. आपण अद्याप आपली धोतरे-शेंड्या-जानवी सांभाळण्यातच कितीं दिवस मग्न राहणार आहोत या विचारानें खेद वाटल्यावाचून राहवले नांही.

येथें कांही प्रश्न आपोआपच उपस्थित होणार. बदलत्या युगात प्रगती करण्यासाठी इंग्रजी भाषेचे साहाय्य आवश्यक नाहीं असे श्रीयुत पवार यांचे म्हणणे आहे कां? चीन-जपानसह सर्व राष्ट्रे इंग्रजी अभ्यासासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात गुंतलेले आहेत, आणि हे महाशय महाराष्ट्रातील चक्रे उलटी फिरवण्यासाठी कां प्रयत्न करत आहेत?

आज इंग्रजी भाषेत मराठी मुलांनी शिक्षण घेऊ नयें यासाठी इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचें. पवार-ठाकरेकुलोत्पन्नांची प्रमाणपत्रें आणून त्यांना या मुद्द्याचा त्यांच्या स्वार्थी राजकारणात कसा उपयोग होईल याची सोय बघायचीं. उद्या या मुलांना फालतू अभ्यासक्रमाचे हलक्या दर्जाचें शिक्षण मिळाल्यामुळें नोकर्‍या मिळाल्या नाही कीं पुन्हा राज ठाकरे यांना मराठीच्या नावाखाली जाळपोळ करुन डोकी भडकवण्यासाठी इंधन पुरवायचें असे हे एकंदरीत दुष्टचक्र आहें.

पवार म्हणतांत तसा स्वभाषेचा त्याग - स्वतःच्या भौतिक प्रगतीसाठी कां होईना पण - करणे हा भाषाद्वेषाचा प्रकार असेल तर स्वदेशाचा त्याग करुन परदेशात राहणारे बांधव राष्ट्रद्रोहाचे कृत्य करतात कां? भाषाद्वेष आणि राष्ट्रद्रोह या दोन प्रकारांमध्ये अधिक गर्हणीय कृत्य कोणते असे श्रीयुत पवार यांना वाटतें? तात्त्विक पातळीवर स्वभाषात्याग आणि स्वदेशत्याग यात कांय फरक आहें? स्वदेशाचा त्याग करायचा आणि भाषाभिमानाचे फुकाचे स्तोम माजवायचें किंवा स्वभाषेचा त्याग करुन राष्ट्रप्रेमाचे पोकळ पोवाडे गायचें याला दांभिकपणा हाच एकमेव शब्द आहें.

मी वर विचारलेल्या प्रश्नांना पूरक असें अनेक प्रश्न विचारतां येतील. श्रीमती सुळे किंवा राऊतद्वय यांनी संसदेवर निवडून आल्यानंतर कोणत्या भाषेत शपथ घेतली याचे उत्तर यांच्या भाषाप्रेमाचे बेगडी स्वरुप दाखवेल.

आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!

आचरटपणा

दीपक पवार यांनी वेळोवेळी मराठी वृत्तपत्रांतून मराठीबाबतच्या सरकारी अनास्थेला वाचा फोडली आहे. वरील संपूर्ण प्रतिसाद आचरट आहे. धोतरे शेंड्या सांभाळण्यापेक्षा कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळावे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? राजकारणी लोक मदत करतील वा न करतील, ज्यांना काम करायचे आहे त्यांनी ते करायला काय हरकत आहे?

(स्फोटक विधाने करुन भांडणे लावण्याचा आणि वर गंमत पाहण्याचा हा प्रकार वाटतो.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शंभर टक्के सहमत

वरील संपूर्ण प्रतिसाद आचरट आहे.
अजाणुकर्णांच्या या मताशी शंभर टक्के सहमत आहे. मराठी माध्यमातून असलेल्या शिक्षणाचा दर्जा खालावलेला असतो हे फक्त एखादा करंटा मराठी माणूसच म्हणू शकतो. शेंडी जानवे संभाळण्याचा प्रकार चुकीचा हे मान्य पण पिढ्यानपिढ्या स्वत्वात भिनलेली भाषा ही कालपरत्वे आपसूक बदलत असते. आपल्या नाकर्तेपणाने व अज्ञानाने तिला नैसर्गिकपणे बदलू देण्यापेक्षा तिचे हातपाय छाटून तिला हवा तसा आकार देऊन पून्हा हे काळानुरुप आहे हे म्हणणे सर्वथा अयोग्य. मराठी वृत्तपत्रात येणारे भविष्यातील पत्रकार हे मराठीच्या सर्व कळा जाणून घेऊनच तयार झाले पाहिजेत. मराठी वृत्तपत्रांनीच मूळात पत्रकारांना नोकरी देतांना त्याचा पत्रकारीता अभ्यासक्रम मराठी माध्यमातून झाला आहे का हे पहायला हवे.

प्रतिसाद

श्री. पवार यांना या व्यासपीठावर उत्तरे देण्याची विनंती केलेली आहे.

हे दीपक पवार महाशय मुंबई-महाराष्ट्रात राहतात की कॅलिफोर्नियामध्ये ही प्राथमिक शंका लेख वाचल्यावाचल्या आली.
माझ्या माहितीप्रमाणे "हे दीपक पवार महाशय" मुंबईतील एका महाविद्यालयात शिकवतात.

मराठी माध्यम

अभ्यासक्रम कुठल्याही माध्यमात शिकवला तरी त्याच्या दर्ज्यामध्ये काही फरक पडू नये अशी अपेक्षा असते. तरीसुद्धा ह्या अभ्यासक्रमात जर जाहिराततंत्र, दूरदर्शन कार्यक्रमांचे संचालन आणि वृत्तसंकलन वगैरेंचा समावेश असेल तर या बाबींवर माध्यमाचा निश्चित परिणाम होतो असे म्हणायला हरकत नाही.
आजमितीला नियतकालिकात छापून येणार्‍या बहुसंख्य मोठ्या आकाराच्या जाहिराती मूळ हिंदी -इंग्रजीत लिहून नंतर मराठीत भाषान्तरित केलेल्या असतात. त्यातले कृत्रिम मराठी वाचवत नाही. दूरदर्शनवरील तमाम मराठी जाहिरातीत गचाळ मराठी भाषा वापरलेली असते. यांवर वर्तमानपत्रांतून अनेक लेख येत असतात, तरी त्यांत यत्किंचितही सुधारणा झाल्याचे आढळत नाही. याचे कारण, अभ्यासक्रमात मराठीला यत्किंचितही स्थान नाही हेच असले पाहिजे. अभय परांजपे यांचे लोकसत्ता-व्हिवामधले 'दवंडी'या नावाने येणारे लेख (उदा. २८ मेचा) वाचावेत. http://www.loksatta.com/daily/20090419/lr03.htm हाही दुवा उघडून पाहिला तरी मराठी भाषेच्या दुर्दशेची कल्पना येईल.
आपण स्वत:ला उदारमतवादी आणि सर्वधर्मसहिष्णू समजतो. त्यामुळे धर्म आणि देशभक्ती यांचा काहीही परस्पर संबंध नसतो अशी आपली ठाम समजूत असते. सावरकरांनी धर्मान्तर म्हणजेच देशान्तर ही कल्पना मांडली होती. हिंदुस्थानाच्या ईशान्य भागांकडे या दृष्टीने लक्ष द्या हे त्यांनी दाताच्या कण्या करून सांगितले होते. धर्मान्तरित झालेल्या लोकांत देशद्रोहाची लागण कशी होते हे आपण प्रत्यही पाहतो. असाच प्रकार अभ्यासक्रमाच्या माध्यमाचा असतो. इंग्रजीतून अभ्यासक्रम शिकलेली मुले मराठीचे कधीही भले करू शकणार नाहीत.--वाचक्‍नवी

लोडेड विधान

इंग्रजीतून अभ्यासक्रम शिकलेली मुले मराठीचे कधीही भले करू शकणार नाहीत.

हे विधान कमालीचे लोडेड वाटते. प्रतिसादातील पहिल्या परिच्छेदाशी सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विधान परत घेतले.

इंग्रजीतून अभ्यासक्रम शिकलेली मुले मराठीचे कधीही भले करू शकणार नाहीत.
माझे विधान त्या विशिष्ट अभ्यासक्रमाबद्दल होते. पण लोडेड वाटत असेल तर मी ते परत घेत आहे. 'कधीही'च्या ऐवजी 'कदाचित' लिहिले असते तर विधान तेवढे प्रक्षोभक वाटले नसते.--वाचक्‍नवी

दवंडी

अभय परांजप्यांचे लेख --येथे आणि येथे आहेत. --वाचक्‍नवी

धन्यवाद

चांगले लेख आहेत. पोटतिडकीने लिहिल्याचे जाणवते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हेच म्हणतो.

दोन्ही लेख चांगले आहेत. दुव्याबद्दल धन्यवाद.

गुन्ह्याची कबूली केली

दोन्ही लेख छान आहेत परंतु ही पावसाळ्यातील अळंब्यांसारखी वाढणारी टीव्ही चॅनेल्स आणि जाहिराती क्षणभर बाजूला ठेवून मराठी माणसांच्या मुखत्यारपत्रांचे सर्वप्रथम काहीतरी करणे गरजेचे आहे. ;-) (म्हणजे काय करायचे ते माहित नाही बॉ!)

परवाच त्या शायनी अब्राहमच्या खटल्यातील प्रमुख बातमी म.टाने या प्रकारे दिली -

शायनीने केली गुन्ह्याची कबूली.

असो.

बर्गरला आतमध्ये श्रीखंड लावून खाल का?

बर्गरला श्रीखंड लावून सरमिसळ आणि भेसळ करण्याची गरज वाटत नाही कारण बर्गर हा चमचमीत आणि तिखट पदार्थ श्रीखंडासारख्या गोड पदार्थासह एकत्रित बरा लागणार नाही (कदाचित) परंतु क्रिम फिल्ड डोनटमध्ये गोड क्रिम ऐवजी श्रीखंड आणि बर्गरमध्ये अस्सल भारतीय ;-) व्हेजिटेबल कटलेट चांगले लागेल असे वाटते.

सरमिसळीशिवाय आजची मराठी भाषा बनलेली नाही. मराठीत अन्य अनेक भाषिक शब्दांची सरमिसळ आहेच. इंग्रजीचीही होणारच परंतु सरमिसळ करताना पदार्थ चविष्ट लागतो का आणि चविष्ट लागला तरी पूर्वापार चालत आलेली पाककृती टाकाऊ किंवा सहज विसरून जाण्याजोगी आहे का हे पाहणे गरजेचे आहे. श्रीखंड डोनटमध्ये चांगले लागते म्हणून श्रीखंड पुरी विसरून जाण्यात शहाणपण नाही तसेच.

माझ्या ऑफिसातला शिपाई घरी फोन करून आपल्या आईला जर ‘ममी मला आज जरा लेट होणार आहे’ असं सांगत असेल तर मला वाटतं यामागे आपला न्यूनगंड आहे.

येथे नेमका न्यूनगंड कोणता ते कळले नाही. आई आणि उशीर ऐवजी ममी आणि लेट हे शब्द वापरणे की शिपायाने या इंग्रजी शब्दांचा सर्रास उपयोग करणे?

शायनी अब्राहम

परवाच त्या शायनी अब्राहमच्या खटल्यातील प्रमुख बातमी म.टाने या प्रकारे दिली -

शायनी अब्राहम? की आहुजा? व्याकरण सोडा निदान तपशील तरी बरोबर द्यावा ह्या वृत्तपत्रांनी...

तपशीलात चूक

तपशीलात चूक म. टा.ची नाही माझी झाली.

शायनी अब्राहम (विल्सन) ही अधिक ओळखीची असल्याने ;-) गडबड झाली.

चुकीची कबुली "करते."

मोनिका कात्रे

मोनिका कात्रे यांच्या १९ अप्रिल च्या लोकरंगमधील पत्राचा दुवा मी वर दिला होता. तो कुणी उघडून वाचल्याचे दिसत नाही. तिथेही चित्रवाणीवरील वाहिन्यांत दिसणार्‍या अशुद्ध मराठीबद्दल चीड व्यक्त केली आहे. ह्या सर्वाचे कारण म्हणजे मास मीडियाच्या अभ्यासक्रमात मराठीला स्थान नसणे हेच असले पाहिजे.
छोट्या पडद्यावरील मुग्धा वैशंपायन आणि हदयनाथ मंगेशकर या दोघांनाच, माझ्या मते, चांगले मराठी बोलता येते. अजून कुणी असेल जर जरूर कळवा.--वाचक्‍नवी

महानगरपालिकान्च्या इन्ग्रजी शाळा

राज्यकर्ते मराठी असूनहि महानगरपालिका इन्ग्रजी माध्यमाच्या शाळा का उघडतात?

 
^ वर