अभ्यासक्रमांचे मराठीकरण...केल्याने होत आहे रे...

महाराष्ट्र माझा ह्या अंकात राममोहन खानापूरकर ह्यांचा प्रसारमाध्यमांच्या अभ्यासक्रमाच्या मराठीकरणासंदर्भातील लेख छापून आला आहे तो इथे देत आहे.

अभ्यासक्रमांचे मराठीकरण...केल्याने होत आहे रे...
बी.एम. एम. चा (बॅचलर ऑफ मास मीडिया) सनदशीर लढा

कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचे सत्यनारायण मुंबईतील ‘साऊथ बॉम्बे’ आणि ‘सबर्बस’ मध्ये राहणारे ‘ग्लोबल’ विद्वान नवनवीन पद्धतीने घालत असतात. मराठी भाषेचा दुस्वास आणि मराठी अस्मितेचे वावडे हे या पूजनातील नियमीत मंत्रपाठ. सध्यातर जागतिकीकरणाचे स्तोत्र कॉस्मोपॉलिटनच्या आख्यानात मिसळून स्वभाषेतून ज्ञानोपासना हे कसे ‘बॅकवर्डपणाचे’ लक्षण आहे याचा उघड पक्षपाती प्रचार शैक्षणिक संस्थांमधूनच होत असतो. ‘मराठीचा आग्रह धरणे म्हणजे संकुचितपणाचे लक्षण’ हे मराठीलाच न्याय्य संधी नाकारून ‘सिद्ध करायचे’, हे या सर्व तथाकथित ‘ग्लोबल’ ज्ञानोपासकांचे व्यवच्छेदक लक्षण. पुन्हा या ‘ग्लोबल’ विद्वानांना बळ मिळते ते आपल्याच राज्यशासनाकडून आणि मराठी बुद्धीवंतांकडून. महाराष्ट्र-राज्याच्या निर्मितीनंतर गेली पन्नास वर्षे मराठीला ज्ञान आणि व्यवहार क्षेत्रांत त्यागून अडगळीत टाकण्याचे काम ईमाने-ईतबारे आपल्याच विचारवंतांनी आणि शासनाने केले आहे. स्वभाषेची एवढी घोर उपेक्षा स्वकीयांकडूनच होत असताना जर उच्च-शिक्षणात ज्ञानशाखांच्या मराठीकरणाला गंज न चढला तरच नवल.

अशा उदासीन पार्श्वभूमीवर ‘मराठी अभ्यास केंद्र’ या मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी विधायक प्रयत्न करणा-या संस्थेने मुंबई उच्च-शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या मराठीकरणासाठी सनदशीर मार्गांनी प्रयत्न करण्याचे ठरविले. दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत मराठी भाषेचा व्यवहारातील वापर वाढवण्यासाठी ‘संगणकावर मराठी’, ‘मराठी शाळांचे सक्षमीकरण’, ‘ मराठीतून रोजगार-निर्मिती’ अशा विविध कृती-गटांमधून काम केले जाते. मराठीचा ज्ञानभाषा म्हणून विस्तार करणे हे सामाजिक न्यायाच्या तत्वाला अनुसरुन आहे ही अभ्यास केंद्राची भूमिका असून बदलत्या काळानुरुप लोकांच्या मानसिकतेचा विचार केंद्रस्थानी ठेवूनच मराठीकरणाची मांडणी केलेली आहे. आजही आपल्या बहुतांश भाषिक चळवळी या प्रामुख्याने अस्मितेच्या गाळात अडकल्यामुळे भाषेचे नेमके प्रश्न काय आणि त्यांची उकल कशी करायची यासंदर्भातील कार्यपद्धतीत भाषाप्रेमींमध्ये वैचारिक गोंधळ आढळून येतो. आक्रमक धोरणाने प्रश्न सुटल्याचा भास होत असला तरी भविष्यातील ढिसाळ नियोजनामुळे आणि विचारशून्यतेमुळे तोच प्रश्न पुन्हा अधिकच गंभीर स्वरूप धारण करतो. निदान मराठीच्या बाबतीत तरी गेल्या चाळीस-पन्नास वर्षात हाच अनुभव आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि वाणिज्य क्षेत्रांत व्यावसायिक जगच मराठीला प्रतिकूल असल्यामुळे या ज्ञानशाखांमधील अध्यापकांवर आजही आळस, अनास्था आणि अनिच्छा यांचा जबरदस्त अंमल आहे. कायदा व विधीसारख्या लोकसेवा क्षेत्रांतसुद्धा मराठी वकीलच ‘कायद्याचं बोलण्यासाठी’ आजही ‘माय लॉर्डची’ मिंड आळवत असल्यामुळे हा विषय शिकवणारे प्राध्यापकच मराठीतून शिकवणे वेळेचा अपव्यय मानतात. तरीदेखील अशा अमराठी वातावरणात काही असे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत ज्यांना तयार आणि विस्तारणारी बाजारपेठ आहे; मीडियाचे क्षेत्र हे त्यापैकीच एक. बी.एम. एम. चा (बॅचलर ऑफ मास मीडिया) पदवी अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने २००१-०२ मध्ये सुरु केला. मुंबई विद्यापीठांतर्गत पहिल्यांदाच मीडिया विषयासाठी पदवी स्तरावर एखादा अभ्यासक्रम आणला जात असल्यामुळे त्याचा दर्जा हा प्रामुख्याने या अभ्यास-मंडळातील सदस्यांच्या पात्रतेवर अवलंबून होता. असे असतानादेखील ‘साऊथ बॉम्बेतील’ मीडियाशी काडीमात्र संबंध नसलेल्या ‘ग्लोबल विद्वानांनी’ सुरुवातीपासूनच हा अभ्यासक्रम ‘ताब्यात घेतला’ होता. नेहमीप्रमाणेत ह्या सर्व बनावात त्यांना ‘मराठी वृत्तपत्रांना भवितव्य नाही’ म्हणून गळा काढून ढिम्म बसून राहणा-या काही मराठी विचारवंतांची साथ होतीच. बीएमएमच्या संपूर्ण इंग्रजीतील अभ्यासक्रमामुळे इंग्रजी साहित्य शिकवणा-या अतिरिक्त अध्यापकांचे व्यावसायिक पुनर्वसन होणार होते. तसेच या अभ्यासक्रमाची रचना करताना जाहिरात कंपन्यांना स्वस्तदरात मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी चुकीच्या पध्दतीने जाहिरात हा विषय पत्रकारीतेला पर्याय म्हणून तिस-या वर्षात दिला गेला. संपूर्णपणे पाश्चात्य संस्कृती, इतिहास, घटना आणि समाजव्यवस्थेला स्मरुन तयार केलेला हा तीन वर्षांचा इंग्रजी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या माथी मारला गेला. मराठी भाषा, समाज, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या समाजकारणाला या अभ्यासक्रमापासून हेतुपुरस्सर शेकडो योजने दूर ठेवले होते. मराठी पत्रकारीतेची प्रदीर्घ परंपरा आणि स्थानिक समाजरचनेची धादांत उपेक्षा करणा-या या अभ्यासक्रमाचे पितळ उघडे पाडण्यासाठी धीरोदात्तपणे आणि संयमाने प्रत्येक पाऊल टाकणे गरजेचे होते. जुलै-ऑगस्ट २००८ मध्ये म.न.सेच्या आंदोलनामुळे मुंबईत मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले होते. या तापलेल्या तव्यावर बीएमएमच्या प्रश्नाचा जरी तात्कालिक निकाल लावता आला असता, तरी दीर्घकालीन नियोजनासाठी ही नीती लाभदायक नव्हती. मात्र म.न.सेने मराठीच्या मुद्द्यावरुन जे रान उठवले होते त्याचा परिणाम मराठीचा आकस धरणा-यांवर झाला होता एवढे मात्र निश्चित.

मोहिमेतील सुरुवातीच्या डावपेचांचा भाग म्हणून पत्रकारीतेतीलच ‘एखाद्या गोष्टीची बातमी झाली तरच लक्ष वेधून घेता येते’ या मूलतत्वाचा वापर करण्याचे अभ्यास केंद्राने ठरवले. मुळात बीएमएम अभ्यासक्रमातील मराठीला लावलेली हेतुपुरस्सर कात्री आणि अकार्यक्षम अभ्यासमंडळामुळे कोणत्याही माध्यमासाठी ह्यात ‘बातमी’ ठासून भरली होती. लोकसत्ताचे शिक्षण- प्रतिनिधी तुषार खरात यांनी बीएमएमचे वाभाडे काढणारी प्रदीर्घ वृत्तमाला चालवली. ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी या मोहिमेचे मह्त्व जाणून नेतृत्व स्वीकारले आणि मुंबई विद्यापीठाला त्यांच्या भाषिक कर्तव्याची जाणीव करुन देणारा दीर्घ लेख वृत्तपत्रात लिहिला. मराठी अभ्यास केंद्रालादेखील या मराठीकरणामागचा हेतू ‘इंग्रजीपासून पळवाट नसून मराठीचे सक्षमीकरण हा आहे’ ही भूमिका वेळोवेळी प्रसिध्द करावी लागली. दोन-तीन महिने चाललेल्या या बातमी-सत्रामुळे पहिल्यांदाच हा मुद्दा विद्यापीठ- वर्तुळात, लोकांत आणि माध्यमांमध्ये चर्चेस आला. त्याचा ईष्ट परिणाम असा झाला की ज्यांच्या व्यवसायाशी हा मुद्दा थेट निगडीत आहे त्या मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधील पत्रकारांना बीएमएमच्या मराठीकरणाचे व्यावहारिक महत्त्व लक्षात आले. एकंदरीतच या अभ्यासक्रमाच्या भविष्यातील सुनियोजीत वाटचालीसाठी मराठी माध्यमातील अनुभवी लोकांच्या सक्रिय योगदानाची नितांत आवश्यकता होती. किंबहुना येणा-या काळात ह्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासमंडळावर अशा अनुभवी लोकांचा भरणा असणेच अधिक हितावह आहे. वृत्तपत्रांमधील बातम्यांनंतर मराठी अभ्यास केंद्राने मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधील नामवंत संपादक, ज्येष्ठ पत्रकार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बीएमएमच्या मराठीकरणाचे निवेदन त्यांना सादर केले आणि विद्यापीठाकडे चर्चा करण्यासाठी माध्यम-प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची स्थापना केली. या शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू आणि दिनू रणदिवे, ‘महाराष्ट्र टाइम्सचे’ ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, ‘ईकॉनॉमिक्स टाईम्सचे’ राजकीय संपादक गिरीश कुबेर, ‘महानगरचे’ कार्यकारी संपादक युवराज मोहिते, ‘प्रहारचे’ संपादक आल्हाद गोडबोले, ‘झी मराठीचे’ संचालक नितीन वैद्य, ‘लोकसत्ताचे’ विनायक परब, प्रसाद मोकाशी, ‘नवाकाळच्या’ जयश्री खाडिलकर, ‘सकाळचे’ संपादक विनायक पात्रुडकर यांचा समावेश होता. या सर्व पत्रकारांच्या पुढाकारामुळे आणि एकजुटीमुळे बीएमएम मराठीकरणाच्या मोहिमेला नैतिक अधिष्ठान लाभले.

एकीकडे पत्रकारांची या मुद्द्यावर एकजूट होत असतानाच दुसरीकडे लोकसत्तेतील बातम्यांमुळे बीएमएमचे ‘साऊथ बॉम्बे’ अभ्यासमंडळ सावध झाले. जी मराठी वृत्तपत्रे त्यांच्या लेखी गौण होती त्यांनीच डोळ्यासमोर काजवे चमकवल्यामुळे अभ्यासमंडळातील मक्तेदारी टिकवण्यासाठी त्यांना हालचाल करणे भागच होते. मात्र मराठी-निरक्षर असल्यामुळे लोकसत्ता हे वृत्तपत्र त्यांच्या ‘एलिट’ जगात बसत नाही आणि प्रत्युत्तर ‘टाईम्समधून’ देऊन उपयोगाचे नाही हा साक्षात्कार झाल्यामुळे त्यांची पंचाईत झाली होती. तेव्हा आपल्या कंपूतील काही मराठी-साक्षरांचा शिखंडीसारखा वापर करुन मराठीकरणाचा आग्रह कसा मागासलेला आहे हे ‘छापून आणण्याचा’ केविलवाणा प्रयत्न या अभ्यासमंडळाकडून करण्यात आला. मराठीतील काही झारीतील शुक्राचार्यदेखील त्यांची बाजू मांडायला तत्पर होतेच. जागतिकीकरणाच्या काळात मराठीचा आग्रह ग्लोबल मीडियाच्या दृष्टीने कसा घातक आहे असा प्रतिवाद त्यांच्याकडून केला गेला. मात्र बदलत्या काळानुसार भाषिक चळवळींना जागतिक घडामोडींचे परिमाण लाभले पाहिजे हा विचार मराठी अभ्यास केंद्राने वेळोवेळी सुस्पष्ट केला होता. त्यासाठी ‘मराठीसह इंग्रजी’ ह्या वस्तुनिष्ठ संकल्पनेवर मराठीचा ज्ञानभाषा म्हणून विस्तार होणे आवश्यक आहे या अभ्यास केंद्राच्या विचारांमध्ये सुरुवातीपासूनच एकवाक्यता होती. मात्र मराठीच्या आग्रहाची ही मेख समजावून न घेताच इंग्रजीची मिरासदारी करणारे मराठीप्रेमींच्या नावाने कडाकड बोटे मोडत होते. एकतर भाषावार प्रांतरचनेनंतरदेखील राज्यभाषा म्हणून उच्चशिक्षणात मराठी यावे असे इंग्रजीची पालखी वाहणा-या आपल्या मराठी बुध्दीवंतांना कधीच वाटले नाही. आपले ज्ञानशिखरावरील उच्च स्थान त्यामुळे ढळेल ही भीती जशी होती तशीच स्वभाषेतील विचारवंत ही ओळख त्यांना प्रतिगामीपणाची वाटत आली आहे.

बीएमएमच्या मराठीकरणाची मोहिम सुरु झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाची मुंबई विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत भेट घडवून आणण्यात मराठी अभ्यास केंद्र यशस्वी झाले. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. विजय खोले यांची भेट घेऊन ‘बीएमएम’च्या मराठीकरणासाठी पुढील मागण्या केल्या. अ)पत्रकारितेच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा तात्काळ स्वीकार. आ) मराठी पत्रकारितेशी संबंधित मंडळींचा समावेश असलेलं स्वतंत्र अभ्यासमंडळ. इ) सध्या जिथे बीएमएम शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजी उपलब्ध आहे तिथे मराठी पत्रकारिता, मराठी भाषा, महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय, आर्थिक सांस्कृतिक इतिहास इ. चा समावेश असलेल्या अभ्यासपत्रिका अनिवार्यपणेअंतर्भूत कराव्यात. ई) पत्रकारिताविषयक अभिजात व समकालीन महत्त्वाच्या ग्रंथांच्या मराठी अनुवादासाठी कालबद्ध योजना आखून शिष्यवृत्त्या देण्यात याव्यात. उ) शैक्षणिक वर्ष जून २००९-१० पासून या बदलांची अंमलबजावणी करण्यात यावी. कुलगुरु हे भाषाप्रेमी आणि मराठीकरणाचे महत्त्व जाणून घेणारे असल्यामुळे या मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे तर लगोलग महत्त्वाची बैठक घेऊन बीएमएम अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी भाषेत सध्या उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमातही मराठी संस्कृती, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हे महाराष्ट्राशी निगडीत असलेले नवे विषय अनिवार्य म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. ‘बीएमएम’च्या तीन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्यांत मराठीकरण करण्याची सूचना पत्रकारांनी यावेळी केली. पहिल्या सत्राच्या अभ्यासक्रमाचे तात्काळ मराठीकरण करून तो येत्या शैक्षणिक वर्षांपासून लागू करावा आणि इतर सत्रांचे मराठीकरण पुढील विविध टप्प्यांमध्ये करावे, असेही सुचविण्यात आले. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात बीएमएमच्या पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाचा मराठी अनुवाद करून तो विद्वत परिषदेत मांडला जाणार आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाअंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये, विशेषत: मराठी व्यवस्थापन असलेल्या महाविद्यालयांमध्ये ‘बीएमएम’चा मराठीतून अभ्यासक्रम सुरू झाल्यास त्याच्या अंमलबजावणीसाठी मराठी अभ्यास केंद्र सर्वतोपरी सहकार्य करेल.

व्यावहारीक मराठीकडे दुर्लक्ष करुन भाषेला कथा-कविता-कादंब-यांच्या वाड्मयीन अडगळीत टाकल्यामुळे मराठीला गंज चढला आहे. जोपर्यंत या भाषेचा ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा म्हणून विस्तार होत नाही तोपर्यंत भाषेची अक्षम्य हेळसांड थांबणार नाही. त्यासाठी भाषेच्या प्रश्नांची नेमकी जाण हवी आणि उद्दीष्टपूर्तीनंतरचे दीर्घकालीन नियोजन हवे. भाषिक आंदोलनांच्या दीर्घकालीन लढ्यासाठी तात्कालिक घोषणाबाजी, अस्मितेचे आवाहन आणि उग्र प्रतिक्रियांच्या मर्यादा लक्षात यायला हव्यात. आपल्या नियोजनशून्यतेचा फायदा गेली अनेक वर्षे कॉस्मोपॉलिटन संस्कृतीच्या नावाखाली मराठीची गळचेपी करणा-यांनी उचलला आहे. विद्यार्थ्यांपासून सारेच त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यांच्या विळख्यातून सुटण्यासाठी बीएमएमची मोहिम सनदशीर मार्गाने आणि सयुक्तिक मांडणी करुन मराठी अभ्यास केंद्राने यशस्वी केली. येणा-या काळात स्वभाषेच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणा-या सर्वांनाच भाषिक आग्रहाची सैद्धांतिक चौकट निश्चित करावी लागेल. त्याचबरोबर भविष्यकाळात अशी समस्या उद्भवू नये यासाठी साधन-सुविधांच्या व्यवस्थेकडेसुद्धा अभ्यास केंद्राने लक्ष पुरवले. मराठीकरणाचे काम हे गेल्या चार-पाच दशकांचे प्रलंबित काम आहे, एवढेजरी आपण लक्षात घेतले तरी येणा-या काळातील सातत्य टिकवण्यासाठी अशा आंदोलनातील संयमाचे महत्त्व अधोरेखित होईल. बीएमएमच्या मराठीकरणाला खीळ बसावी म्हणून अनेक गट कार्यरत होते. पण तरीदेखील हे आंदोलन यशस्वी करुन या सर्व मराठी-विरोधी गटांना त्यांच्या मराठीवरील आकसाबद्दल आत्मचिंतन करण्याची संधी या मोहिमेने दिली आहे.

राममोहन खानापूरकर

(कार्यवाह- मराठी अभ्यास केंद्र)

मो. ९८२०० ४००६६, ई-मेल ram.research@gmail.com

लेखनविषय: दुवे:

Comments

आधी एम् बी बी एस्, आता बी एम् एम् सुद्धा!

आधीच पुणे विद्यापीठाने एम् बी बी एस् चा पूर्ण अभ्यासक्रम इंग्रजीत महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाच्या माथी मारला होता. (स्वानुभवाने सांगतो.) आता मुंबई विद्यापीठाने बी एम् एम् चा अभ्यासक्रमही इंग्रजी करून कहर केला आहे.

(पण मराठी अभ्यास केंद्राने एम् बी बी एस् अभ्यासक्रमाच्या जुन्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून बी एम् एम् च्या नव्या अभ्यासक्रमाकडे लक्ष केंद्रित का केले असावे, याबद्दल कुतूहल वाटते.)

 
^ वर