एका वर्षात ३ ग्रहणे

सध्या काही हिंदी वाहिन्यांवर एका वर्षात ३ ग्रहणे आली तर जगात कश्या वाईट घटना घटतात, या विषयावर चर्चा झाल्याचे बघीतले.

काही वाईट घटना:
- महाभारत काळात व्दारका बुडाली
- पहिले महायुद्ध
- अमेरीकेने जपानवर केलेला अणुबाँब हल्ला

२००९ सालची भारता दिसणारी ३ मोठी ग्रहणे आहेत.

१) २६/०१/२००९ - सूर्य ग्रहण
२) २२/०७/२००९ - सूर्य ग्रहण
३) ३१/१२/२००९ - चंद्र ग्रहण

उपक्रमावरच्या ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी ह्या ग्रहणांचा भारतातल्या जनतेवर काय परीणाम होणार आहे, याचा काही अभ्यास केला आहे का? असल्यास काय परीणाम होणार आहे?

Comments

ग्रहण

महाभारत काळात व्दारका बुडाली

महाभारत काळात इसवीसन नव्हते व यंदाची ग्रहणे एकाच वर्षात म्हणजे एकाच इसवी सनात आहेत.. तेव्हा याचा काहीही संबंध असावा असे वाटत नाही. बाकी ज्योतिषीच जाणोत

बाकी कोणी ग्रहण बघायला जातंय का? मला तिकीटेच नाहि मिळाली :(

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

'एकाच वर्षात'चा नेमका अर्थ

महाभारत काळात इसवीसन नव्हते व यंदाची ग्रहणे एकाच वर्षात म्हणजे एकाच इसवी सनात आहेत.. तेव्हा याचा काहीही संबंध असावा असे वाटत नाही. बाकी ज्योतिषीच जाणोत

'एकाच वर्षात'चा नेमका अर्थ कसा घ्यावा यावर बरेच अवलंबून आहे.

'एका पंचांगवर्षात' (calendar year अशा अर्थी - मग ते पंचांग हिंदू चांद्र, ग्रेगोरियन, हिजरी अथवा भारतीय सौर, कोणतेही असो) असा अर्थ घेतल्यास, कोणते पंचांग प्रमाण मानावे याने फरक पडू शकेल.

मात्र 'लागोपाठ येणार्‍या तीन ग्रहणांपैकी पहिले ग्रहण आणि तिसरे (शेवटचे) ग्रहण यांच्यात एका वर्षाहून अधिक काळ लोटलेला नाही' असा अर्थ घेतल्यास प्रमाण पंचांगाचा फारसा संबंध येत नसल्याने त्याने फरक पडू नये, असे वाटते. ('एक वर्ष' म्हणजे तीनशे पासष्ट दिवस, की बारा चांद्रमास, या व्याख्येच्या निश्चितीसाठी आणि किमानपक्षी दुसर्‍या व्याख्येच्या बाबतीत बारा चांद्रमासांचा कालावधी नेमका कसा निश्चित करावा यासाठी 'कोणते पंचांग प्रमाण' याचा किंचित संबंध येऊ शकेल, एवढ्याच कारणासाठी 'प्रमाण पंचांगाचा फारसा संबंध न येण्या'विषयीच्या शब्दप्रयोगाचे प्रयोजन. म्हणजे केवळ scale ठरवण्यापुरता 'कोणते पंचांग ग्राह्य' याचा संबंध; point of origin ठरवण्यासाठी नव्हे.)

(थोडक्यात, 'सरकलेल्या संदर्भचौकटीचा फंडा'?)

वर्षात की महिन्यात?

एकाच महिन्यात तीने ग्रहणे वाईट अशा आशयाचा लेख "सकाळ"मध्ये वाचल्याचे आठवते. त्यात महाभारत युद्धाआधी एका महिन्यात तीन ग्रहणे झाल्याचे लिहिले होते. काळ बहुधा इ. स. पू. ३०२९ असा काहीसा होता.

विनायक

शंका

सूर्यग्रहण हे केवळ अमावास्येच्या दिवशी तर चंद्रग्रहण हे केवळ पौर्णिमेच्या दिवशी घडू शकते, असे काहीसे कधीतरी वाचल्याचे आठवते. (यामागील शास्त्रीय कारणमीमांसा नीटशी कळली नाही आणि आता आठवतही नाही. कदाचित श्री. आनंद घारे किंवा श्री. धनंजय किंवा अन्य कोणी यावर प्रकाश पाडू शकतील असे वाटते.)

मात्र या कारणास्तव, एका महिन्यात खगोलशास्त्रीयदृष्ट्या केवळ एकच पौर्णिमा आणि एकच अमावास्या येणे शक्य असल्यामुळे, एका महिन्यात तीन ग्रहणे होणे अशक्य आहे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

अवांतर: आपल्या हिंदू चांद्रपंचांगात कोणत्याही दिवशी तिथी नेमकी कोणती मानावी याबद्दलचे संकेत इतर कालगणनापद्धतींपेक्षा थोडे वेगळे असल्याने तिथीचा क्षय (म्हणजे मधली एखादी तिथी गायब होणे) आणि तिथीची वृद्धी (म्हणजे एकच तिथी लागोपाठ दोन दिवस येणे) असे प्रकार घडू शकतात, आणि म्हणून एखाद्या महिन्यात तिथीच्या वृद्धीने एकापेक्षा अधिक पौर्णिमा अथवा अमावास्या येणे शक्य आहे. (अधिक सखोल माहितीअभावी यावर अधिक प्रकाश पाडण्यास मी असमर्थ आहे. या विषयात ज्यांचा सखोल अभ्यास आहे अशा व्यक्ती अधिक माहिती देऊ शकतील असे वाटते.) परंतु अशा पद्धतीने केवळ कालगणनापद्धतीच्या चमत्कृतीमुळे येणार्‍या एकाहून अधिक पौर्णिमा अथवा अमावास्या या खगोलशास्त्रीयदृष्ट्या एकाहून अधिक पौर्णिमा अथवा अमावास्या मानता येणार नाहीत असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

कुशंका

मात्र या कारणास्तव, एका महिन्यात खगोलशास्त्रीयदृष्ट्या केवळ एकच पौर्णिमा आणि एकच अमावास्या येणे शक्य असल्यामुळे, एका महिन्यात तीन ग्रहणे होणे अशक्य आहे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

१. एका पौर्णिमेला चंद्रग्रहण, त्यापुढील अमावास्येला सूर्यग्रहण आणि त्यापुढील पौर्णिमेला पुन्हा चंद्रग्रहण

किंवा

२. एका अमावास्येला सूर्यग्रहण, त्यापुढील पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि त्यापुढील अमावास्येला पुन्हा सूर्यग्रहण

असे होणे खगोलशास्त्रीयदृष्ट्या शक्य आहे का? माहीतगारांनी कृपया प्रकाश पाडावा.

कारण, तसे शक्य असल्यास, वरील एका प्रतिसादात (मीच) मांडलेल्या 'सरकत्या संदर्भचौकटीच्या फंड्या'प्रमाणे 'एका महिन्यात तीन ग्रहणे होणे शक्य आहे' ('एका महिन्याच्या कालावधीत' अशा अर्थाने) असे कदाचित मानता येईल. (तरीही लागोपाठच्या दोन कालावधींमधला अंत्यबिंदू नेमक्या कोणत्या कालावधीचा भाग मानावा या मुद्द्यावरून याबद्दल थोडा साशंक आहेच.) त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तरावर बरेच अवलंबून आहे.

सूर्यग्रहणाच्या आजूबाजूला

कित्येकदा दोन चंद्रग्रहणे होतात, असे मला वाटते. (मागे आनंद घारे यांनी चंद्राच्या गतींबद्दल लेख लिहिला होता. त्यातून याविषयी काही ढोबळ विचार करता येऊ शकेल.)

एका चांद्र महिन्यात जास्तीतजास्त दोन ग्रहणे होऊ शकतात. एक अमावास्येला आणि एक पूर्णिमेला.

तिथीचा क्षय किंवा वृद्धी

तिथीचा क्षय: आजच्या सूर्योदयाच्यावेळी जर प्रथमा असेल, आणि जर त्या दिवसभराच्या काळात द्वितीया लागून संपली आणि उद्याच्या सूर्योदयाला तृतीया लागलेली असली, तर द्वितीयेचा क्षय झाला असे समजतात.
वृद्धी: नुकतीच सुरू झालेली प्रथमा जेव्हा पुढच्या सूर्योदयालाही शिल्लक असते तेव्हा लागोपाठ दोन दिवस सूर्योदयाला प्रथमा असल्याने, तिची वृद्धी झाली असे समजण्यात येते. प्रत्यकात कुठलीही तिथी गाळली जात नाही किंवा दोनदा येत नाही.
एका इंग्रजी महिन्यात कदाचित दोन चंद्रगहणे आणि एक सूर्यग्रहण येऊ शकेल, एका चान्द्रमासात शक्यच नाही.--वाचक्‍नवी

स्पष्टीकरणासाठी विनंती

सूर्योदयाच्या वेळची तिथी ती त्या दिवसाची तिथी, एवढे अंधुकसे (ऐकीव माहितीच्या आधारावर) माहीत होते. परंतु एखाद्या वेळची तिथी ही कशी ठरवायची, त्यामागील नेमका आधार काय, याची कल्पना नाही. त्यावर नेमका प्रकाश टाकता आल्यास चांगले होईल.

आजच्या सूर्योदयाच्यावेळी जर प्रथमा असेल, आणि जर त्या दिवसभराच्या काळात द्वितीया लागून संपली आणि उद्याच्या सूर्योदयाला तृतीया लागलेली असली, तर द्वितीयेचा क्षय झाला असे समजतात.

'दिवसभराच्या काळात द्वितीया लागून संपली' म्हणजे नेमके काय?

(थोडक्यात, एखादी तिथी संपून दुसरी तिथी नेमक्या कोणत्या क्षणी सुरू झाली, हे कशाच्या आधारावर ठरते?)

कृपया अधिक प्रकाश पाडावा.

चंद्राची चंचल व स्थिरगती आणि तिथी.

तिथीचा क्षय वा वृद्धी होण्याचे मुख्य कारण चंद्राची चंचल वा स्थिरगती. चंद्र २४ तासात कमीतकमी साडेअकरा अंश तर जास्तीतजास्त सव्वापंधरा अंश चालतो. जेव्हा चंद्राची गती अत्यंत जलद असेल तेव्हा तिथीचा(आणि नक्षत्राचाही!) क्षय होतो आणि अतिशय मंद असेल तेव्हा वृद्धी. रवीपासून चंद्राचे १२ अंश अंतर पूर्ण झाले की एक तिथी पूर्ण झाली. एकूण अंश ३६०, म्हणून महिन्यात ३० तिथ्या असतात.
सूर्य कोणत्याही राशीत असो, त्यापासून चंद्र जितक्या अंश अंतरावर असेल त्या अंतरावरून तिथी ठरते. अमावास्येला सूर्य-चंद्र एकत्र असतात. चंद्र सूर्याच्या १२ अंश पुढे गेला की एक तिथी संपते. सूर्यास्ताच्या वेळी चंद्र डोक्यावर आला की त्या क्षणी सप्तमी संपून अष्टमी लागली असे समजावे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आकाशाचे १५ भाग करावेत. बरोब्बर सूर्यास्ताला चंद्र ज्या क्रमांकाच्या भागात असेल ती (शुक्लपक्षातली) तिथी. कृष्णपक्षात सूर्योदयाच्या वेळी चंद्र ज्या क्रमांकाच्या भागात असेल तो क्रमांक ३० मधून वजा केला की त्यावेळची तिथी मिळते.
किचकट आहे, पण याहून कुणी सोपे करून सांगितले तर बरे होईल.--वाचक्‍नवी

दुवा

हा दुवा बघा. इथे ३० दिवसात तीन ग्रहणे म्हटले आहे. सकाळात एका महिन्यात तीन असे म्हटले होते.

<दुवा>

थोडक्यात...

...'एका महिन्याच्या कालावधीत' असा अर्थ योग्य आहे तर!

(तरीही अंत्यबिंदू हे कोणत्या कालावधीत मानायचे यावरून थोडा साशंक आहेच. म्हणजे मध्यरात्र-ते-मध्यरात्र (किंवा मध्यान्ह-ते-मध्यान्ह किंवा सकाळी दहा वाजता-ते-चोवीस तासांनंतर सकाळी दहा वाजता) असा एक दिवस मानल्यास त्यातील सुरुवातीची मध्यरात्र (अथवा जो असेल तो उगमबिंदू) हा त्या दिवसाचा भाग तर शेवटची मध्यरात्र (अथवा जो असेल तो अंत्यबिंदू) हा पुढील दिवसाचा उगमबिंदू म्हणून त्या दिवसाचा भाग न मानला जाता पुढील दिवसाचा भाग मानला जातो, तसेच काहीसे. पण लागोपाठ येणार्‍या पौर्णिमा-अमावास्यांना ग्रहण-ग्रहण-ग्रहण असे एकंदरीत शक्य आहे तर!)

साधारण ९ वर्षांत

हे असे होते. (म्हणजे चंद्रग्रहण-सूर्यग्रहण-चंद्रग्रहण अशी तीन ग्रहणे.) पण सूर्यग्रहण जगात थोड्या भागात दिसते, चंद्रग्रहण त्या मानाने थोड्या मोठ्या भागात दिसते. ज्या ठिकाणी त्या वर्षी सूर्यग्रहण दिसते, त्या ठिकाणी आधी मागे चंद्रग्रहणे दिसतात.

(माझ्या एका मित्राने सांगितले की शनि जन्माच्या कुंडलीतल्या घरात परत आला की जीवनात महत्त्वाच्या घटना घडतात. नोकरी लागत/जाते, लग्न होते, मूल होते, वगैरे. आता शनि प्रत्येकाच्या पत्रिकेत साधारण जन्मानंतर ३० वर्षांनी जातो. तिथे अडीच वर्षे राहातो. आता "तीस वर्षांच्या आसपास अडीच वर्षांत आयुष्यातली कुठलीतरी महत्त्वाची घटना घडते," असे कोणी म्हटल्यास कोण खंडन करायला धजावेल? मी तरी नाही धजावणार.)

साडेसाती...

(माझ्या एका मित्राने सांगितले की शनि जन्माच्या कुंडलीतल्या घरात परत आला की जीवनात महत्त्वाच्या घटना घडतात. नोकरी लागत/जाते, लग्न होते, मूल होते, वगैरे. आता शनि प्रत्येकाच्या पत्रिकेत साधारण जन्मानंतर ३० वर्षांनी जातो. तिथे अडीच वर्षे राहातो. आता "तीस वर्षांच्या आसपास अडीच वर्षांत आयुष्यातली कुठलीतरी महत्त्वाची घटना घडते," असे कोणी म्हटल्यास कोण खंडन करायला धजावेल? मी तरी नाही धजावणार.)

शनीच्या साडेसातीच्या फंड्याशी याचा संबंध आहे काय? (म्हणजे ती अडीच वर्षे अधिक त्याच्या लगेचच आधीची आणि लगेचच नंतरची प्रत्येकी अडीच वर्षे अशी एकूण साडेसात वर्षे?)

पण 'शनी पत्रिकेत जाणे' म्हणजे नेमके काय? (साडेसाती हा प्रकार आयुष्यात दोनदा तीस वर्षांच्या अंतराने लागतो असे ऐकले होते, असे वाटते. जन्मानंतर तीस वर्षांनी नसावा, असे वाटते. चूभूद्याघ्या.)

वेगवेगळ्या देशांतील फरक

वर माझ्या मित्राने सांगितलेली कल्पना त्याने कुठल्यातरी पाश्चिमात्य मासिकात वाचली.

शनी पत्रिकेत कुठल्यातरी घरात असतो. (म्हणजे जन्माच्या वेळी कुठल्यातरी राशीत असतो.) पुन्हा त्या घरात कधी येणार? ~३० वर्षांनी.

"साडेसाती"मध्ये शनी चंद्रराशीत किंवा त्याच्या आजूबाजूच्या दोन राशींमध्ये असतो. प्रत्येक राशीत २.५ वर्षे=३*२.५=७.५ वर्षे. (चंद्र)रास म्हणजे जन्माच्या वेळेला चंद्र जीत असतो ती रास. जर जन्मताना शनी चंद्राच्या राशीत नसला तर तो तिथे काही वर्षांनी पोचतो. मग पुन्हा तीस वर्षांनी घिरटी मारून तिथे पोचतो. वरील स्थितीपेक्षा हे थोडे वेगळे आहे - तिथे शनी त्याच्या जन्माच्या वेळच्या स्थानावर परततो.

शनीचा परिभ्रमणकाळ (रेव्होल्यूशन पीरियड) ~३० वर्षे आहे. इतकेच म्हणायचे आहे.

---------------------------------------------------
तुम्हाला ठाऊक होते का? जगातली साधारण २५% मुले शनीच्या साडेसातीतच जन्मतात! कारण चंद्र महिन्यातील ३/१२अंश काळ शनीच्या आसपास असतो. या मुलांची पुढची साडेसाती ~३० वर्षाच्या वयातच येते. योगायोगाने वरील दोन वर्णने अशा मुलांसाठी पटतात.

एका महिन्याचा कालावधी

एका महिन्याचा कालावधी म्हणजे-- उदाहरणार्थ, आज सकाळी दहा वाजल्यापासून पुढच्या महिन्यात आजच्याच तारखेला सकाळी दहा वाजेपर्य़ंत. अशा काळादरम्यान तीन ग्रहणे होऊ शकतील. --वाचक्‍नवी

नाही बॉ!

उपक्रमावरच्या ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी ह्या ग्रहणांचा भारतातल्या जनतेवर काय परीणाम होणार आहे, याचा काही अभ्यास केला आहे का? असल्यास काय परीणाम होणार आहे?

नाही बॉ! असा काही अभ्यास मी तरी केलेला नाही. आणि जैमिनिय प्रकाराचा अभ्यास करण्या इतका वेळही मजपाशी नाही.
तीन चार जन्म मिळून मग मला सगळ्या शाखांचा अभ्यास करणे जमेल असे वाटते.

आपला
गुंडोपंत

३ ग्रहणे

सूर्य मालिकेतील, सूर्य, एक ग्रह आणि त्याचा उपग्रह हे त्यांच्या भ्रमणकक्षेत फिरत असताना ते अशा स्थानांवर पोचतात जेंव्हा एकाची सावली दुसर्‍यावर पडते किंवा एक दुसर्‍या दोघांच्या मधे येतो. या काळात जे अतिभव्य आणि कल्पनेच्यापेक्षाही सुंदर असे अवकाश दृष्य आपल्या नजरेस पडते त्याचा रसास्वाद घेण्याचे सोडून काहीतरी खुळचट कल्पनांवर आधारित गोष्टींचा कीस काढत बसणे मला तरी रुचत नाही आणि योग्यही वाटत नाही.
चन्द्रशेखर

रोचक

अरे वा बरीच रोचक माहिती मिळाली.. धन्यवाद

मात्र, तूर्तास माझ्या दृष्टीने महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्या ओळखीत कोणी पटणा/त्याभागात ग्रहण बघणे अरेंज करतेय का? (म्हणजे करताहेत बरेच मात्र एवाना जागा फुल्ल झालेल्या आहेत :( )
मला रेल्वेचे आरक्षण नाहि मिळाले :( तेव्हा अश्या एखाद्या संस्थेतर्फे जाईन म्हणतो.. कोणाच्या महितीत जागा शिल्लक असेल तर खरड/व्यनीने कळावा.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

ऐका वर्षात की ऐका चांद्र महीन्यात?

एका वर्षात होणार्‍या ३ पेक्षा अधीक ग्रहणांबद्दल बरीच वेगवेगळी माहित वाचायला मिळते. उदाहरणादाखल हा दुवा पाहा.

http://khabar.josh18.com/news/15187/9

टिव्हीवर ज्या पद्धतीने ही माहिती दाखवतात त्यामुळे खुप मनोरंजन होते.

मला पडलेला प्रश्न, ऐका वर्षात की ऐका चांद्र महीन्यात? ह्याचे अजुनतरी मला काही उत्तर मिळाले नाही.

चान्द्र महिन्यात? शक्य नाही.

एका चान्द्रमासात साडे एकोणतीस दिवस असतात. त्यात दोन पोर्णिमा किंवा दोन अमावास्या असणे शक्य नाही. तेव्हा एका चान्द्रमासात तीन ग्रहणे शक्य नाहीत. ३१ दिवसांच्या काळात तीन ग्रहणे शक्य आहेत. --वाचक्‍नवी

७ ग्रहणे

मी पूर्वी केव्हातरी वाचल्याने सामान्यत: वर्षात ७ ग्रहणे होतात. त्यातील चंद्रग्रहणे सर्वत्र (ग्रहणकाळात चंद्र दिसत असलेल्या सर्व ठिकाणी) दिसतात. सूर्य ग्रहणे मात्र सर्वत्र दिसत नाहीत. त्यामुळे ३ ग्रहणांचे एवढे काय कौतुक ते कळत नाही.

There can be from four to seven eclipses in a calendar year, which repeat according to various eclipse cycles, such as the Saros cycle.

वरील वाक्य विकिपिडियातील आहे. किमान संख्याच ४ आहे. तीन ग्रहणे म्हणजे काहीच नाही. सगळी चर्चा म्हणजे वाहिन्यांचा टाइमपास आणि अंधश्रद्धा प्रसार वाटतो.

अभ्यासनीय विषय?

काही वाईट घटना -

१) लातूरचा भूकंप
२) लादेनने जुळे मनोरे पाडले
३) तमिळनाडूला बसलेला सुनामीचा फटका
४) मुंबैवरील दहशतवादी हल्ला..

इत्यादी..

वरील घटना घडल्या त्या त्या वर्षी तीन ग्रहणे लागली होती का?

अ) लागली असतील तर तीन ग्रहणे आणि वाईट घटना यांचा संबंध असून तो एक अभ्यासनीय विषय आहे असे म्हणावयास हरकत नाही,

ब) लागली नसतील तर, 'एका वर्षी तीन ग्रहणे लागोत वा न लागोत, वाईट घटना या घडतच असतात. सबब तीन ग्रहणांचा आणि वाईट घटनांचा काडीमात्र संबंध नाही!' असे म्हणावयास जागा आहे..

- महाभारत काळात व्दारका बुडाली
- पहिले महायुद्ध
- अमेरीकेने जपानवर केलेला अणुबाँब हल्ला

या घटना घडल्या त्या वर्षी काही चांगल्या गोष्टीही घडल्या असण्याची शक्यता आहे. सबब, 'एकाच वर्षी तीन ग्रहणे आणि चांगल्या गोष्टी' यांचा आपसात काही संबंध आहे किंवा कसे, हादेखील एक अभ्यासनीय विषय होऊ शकतो..

आपला,
(नियतीवर श्रद्धा असलेला) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अवांतर

सध्या काही हिंदी वाहिन्यांवर एका वर्षात ३ ग्रहणे आली तर जगात कश्या वाईट घटना घटतात, या विषयावर चर्चा झाल्याचे बघीतले.

त्या 'काही वाहिन्या' म्हणजे फक्त इंडिया टिव्ही असेल. भिकार आणि अंधश्रद्धेने बुजबुजलेल्या बातम्या देण्यात त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही.
--------------------------X--X-------------------------------
गडद जांभळं, भरलं आभाळ,
मृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||

आईबीएन-7

इंडिया टिव्ही आणि आईबीएन-7

कालचे चंद्र ग्रहण

काल ७/७/ २००९ चंद्र ग्रहण झाले. भारतात ते दिसणार नसल्यामुळे काही वाइट प्रकार घडल्याचे ऐकण्यात आले नाही.

दा.कॄ. सोमणांनी लोकांना टिव्हीवर दाखवल्या जाणार्‍या भितीदायक चर्चेकडे जास्त लक्ष देऊ नये असा सल्ला दिलेला आहे.

अनुभव

दोन ग्रहणांचा आपण सगळ्यांनीच अनुभव घेतला. काही वाईट घटना न घडल्याने आधी दाखवलेल्या घटनांशी तुलना करायला मिडीयाला एकही "ब्रेकिंग न्यूज" मिळाली नाही. हे एक बरे झाले.

 
^ वर