शेवाळ्यापासून तेल

शेवाळे

डबक्यात, तळ्यात साचलेल्या पाण्य़ात तरंगणारे हिरवे शेवाळे. दुरुन दिसते छान, पण त्या पाण्यात पाय बुडवावा असे काही वाटणार नाही. तर असे हे शेवाळे, उद्याचा जगाचा आशादीप. पंचवीस वर्षांनंतर तुम्ही मोटार चालवत असाल तर समजा की ही या शेवाळ्याचीच कृपा. हे शेवाळे असते तरी काय ?

शेवाळे हे एक झाड आहे म्हणावयाला हरकत नाही.लहानच, अगदी एकपेशीय पासून ते गुंतागुंतीचे भाग असलेले.पण तरीही झाडच. याच्या लाखो, शब्दश: लाखो, जाती आहेत. आता झाड म्हटले की शाळेत काय शिकलो ते आठवा. झाड हवेतून कार्बन डायॉक्साईड व जमिनीतून पाणी घेते व सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बोहाड्रेट्स, प्रथिने, साखर, तेल तयार करते. बस, शेवाळे हेच करते.फक्त पाण्य़ात वाढते म्हणून जमीनीची गरज नाही. महत्वाची गोष्ट : कार्बन डायॉक्साईड घेते व तेल निर्माण करते. माणसाची आजची सर्वात जास्त गरजेची गोष्ट. म्हणून तर झाडे तोडू नका. जंगल्रे वाढवा.हे काम शेवाळॆ करणार आहे.

सगळीच झाडे काही गळिताची नसतात. काही झाडेच जसे शेंगदाणा, तीळ, करडई तेलाकरिता उपयोगी असतात तसेच सर्व शेवाळ्यांपासून तेल मिळत नाही. तसेच जांच्या पासून तेल मिळते त्यांच्या मध्येही निरनिराळ्या जातींमध्ये निरनिराळ्या
प्रमाणात तेल मिळते. हे प्रमाण २% ते ५०% इतक्या फरकात असते. गळिताच्या बीयांमध्ये १५% ते ४०% तेल असते हे लक्षात घेतले की ५०% तेल किती महत्वाचे हे कळेल. इथेच तेल बीया व शेवाळ्य़ाची तुलना करू.

प्रथम गळिताबद्दल बघू. झाड म्हटले की जमीन, तीचा पोत, पाणी किती व केंव्हा मिळणार, हवामान इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. पाणी म्हणजे गोडे पाणी, समुद्राचे चालत नाही. मोठा अवघड प्रश्न. उद्याची युद्धे पाण्यावरून होणार आहेत हे लक्षात घेतले की याची गंभीरता ध्यानात येते. तसेच तापमान हे ही महत्वाचे. सहाराच्या वाळवंटात काही पिकवणे अवघडच, नाही का ?

आता शेवाळ्याबद्दल बघू. याला जमीनीची गरज नाही. पाण्यात वाढते. पाणी गोडे किंवा खारे(समुद्राचे) चालते.तापमानाबद्दही फार लाड नाहीत. अगदीच धृव प्रदेशातील थंडी नसली म्हणजे झाले.(तिथेही शेवाळे असते, पण ते आपल्या उपयोगाचे नाही.) आणखी एक फरक म्हणजे जॅट्रोफा-करंज लावलेत तर ३-५ वर्षे थांबावयास पाहिजे. शेवाळ्याची लागवड केली की तीन आठवडय़ात तेल मिळावयास सुरवात.

आता दोहोंमधील काही समान गोष्टी पाहू. दोहोंतही संकरित जाती निर्माण करता येतात. दोघांनाही नत्र, पोटॅश, फॉस्फरस,धातू, इत्यादी (थोडक्यात खते ) दिलीत तर त्यांची वाढ जोरात होते.हवेतून, पाण्यातून त्याना विषबाधा होऊ शकते. अशा हल्ल्यांना तोंड देण्याची क्षमता कमी जास्त असते आणि हायब्रीड बियाण्यासारखेच जास्त उत्पन्न देणार्‍या जाती कमी प्रतिकार क्षमतेच्या असतात. अर्थात यात आश्चर्यकारक काहीच नाही कारण शेवाळे हेही झाडच.

अमेरिकेत सरकारतर्फे शेवाळ्यावर संशोधन करावयास वीस वर्षांपूर्वी सुरवात झाली. अल्पावधीत अकल्पित आणि आश्चर्यकारक तेल उत्पादनाची शक्यता समोर आली आणि सरकारने ते काम खाजगी कंपन्यांकडे दिले. आज अनेक कंपन्या यात कार्यरत असून तुम्हाला Turn Key Projects देतात. त्यांचा प्लॅंट घ्या, शेवाळ्याचे बीज पैदा करा, एक महिन्यात बायोडिझेल विकावयास सुरवात करा. तुम्ही म्हणाल " जॅट्रोफा आणि शेवाळे यांची लागवड करण्यात फरक काय? जॅट्रोफा जास्त वेळ घेतो, एवढाच ना ? तीन बर्षे म्हणजे फार मोठा काळ नाही". मोठा फरक फ़क्त वेळेतच नाही, उत्पन्नात आहे. कसा तो बघा. तुलनेकरिता दर हेक्टरी दर वर्षी तेलाचे उत्पन्न काय मिळते याचा तक्ता बघा.
सोयाबीन........५००लिटर
मोहरी ...........५७२
सूर्यफ़ूल........ ९५२
एरंड ...........१४१३
जॅट्रोफा ....... १८९२
ऑईल पाम..५९५०
चायनीज टॅलो९०००
तुलनेने शेवाळ्यापासूनचे तेल उत्पन्न २५,००० लिटर आहे ! आणि यावर काम करणार्‍या प्रयोगशाळेतील संशोधक म्हणतात की हे ५०,००० लिटरपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त वाढणे अशक्य नाही. या प्रकारचे उत्पन्न खरेच झाले तर फ़क्त पुणे जिल्ह्यात सगळीकडे शेवाळे-तेल करा; सर्व हिंदुस्थानाची तेल गरज भागेल.( गणित कोण करणार आहे ?चुकभुल लक्षात घेवून
आशयच बघा.) तर आता निर्मितीकडे वळू.याचे दोन प्रकार,(१) उघड्यावर, शेतीसारखी तळी तयार करून, (२) बंदिस्त जागेत कारखान्यासारखी. हवेतील कार्बन डायॉक्साईड वापरता येतो. पण जास्त उत्पादनासाठी औष्णिक वीज केंद्रे, सिमेंट कारखाने, अशा ठिकाणांशेजारची जागा निवडतात कारण तेथे निर्माण होणारा का.डॉ. सरळ वापरता येतो. खत म्हणून शहरांचे सांडपाणी, थोडे शुद्ध करून, वापरता येते.

पद्धत १. (उघड्यावर)
शेतात चर खणून, त्यात पाणी साठवावयाचे, त्यात खते,शेवाळ्याची बीजे, का.डॉ. सोडावयाचा. अधून मधून पाणी हलवावयाचे. ठरावीक दिवसांनी शेवाळे काढून त्यातील तेल निराळे करावयाचे. उरलेल्या भागाचा खत म्हणून उपयोग होतो.जनावरांचे खाद्य,
इंधन म्हणूनही उपयोग होईल. नवीन प्रयोगांनुसार इथेनॉल मिळवणे शक्य आहे. तसे झाले तर बायो डिझेलला लागणारी दोनही रसायने एकत्रच मिळतील. या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे कमी खर्च.तोटे हे की हवेतून इतर शेवाळी हल्ला करू शकतात, नियंत्रण कमी रहाते व गुणवत्ता खालच्या दर्जाची.

पद्धत २.(कारखान्यात)
ही एक close circuit पद्धत आहे.cells मद्ध्ये शेवाळे वाढवतात.सूर्य प्रकाश बाहेरून आणावा लागतो.(solar collectors) प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असल्याने गुणवत्ता व उतारा जास्त.खर्च फार जास्त. पण तेल व इथेनॉल एके ठिकाणीच मिळत असल्याने एकदम बायो डिझेलच बाहेर पडेल.

शेवटी महत्वाची बाब म्हणजे आज शेवाळ्यापासूनचे बायो डिझेल बाजारात आलेले नाही. पण प्रभात दूर नाही.
लेख केवळ ओळख करून देणे एवढ्यापुरताच आहे. जास्त माहिती जालावर उपलब्ध आहे.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

साठवलेले पाणी

हे शेवाळ्याचे पीक घ्यावयाचे म्हणजे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठवावी लागणार. त्यातून होणारी डासांची निर्मिती कशी थांबविणार?
ही पीक रोगराई पसरू शकेल का?
चन्द्रशेखर

डास्

डासांना किंवा त्यांच्या अंड्याना खाणारे शेवाळेसुद्धा अस्तित्वात आहे असे ऐकले होते, त्यांच्यापासून तेलही मिळाले तर एका दगडात दोन पक्षी मारली जातील.
या गोष्टी जर एवढ्या सुलभ असतील तर टाटा, बिर्ला आणि अंबानी यांनी त्यांचे कारखाने लावयचा विचार अजून कसा केला नाही?

भारतातील बरेच

तलाव त्यानिमित्ताने स्वच्छ झाले तरी मिळवले.

--------------------------X--X-------------------------------
गडद जांभळं, भरलं आभाळ,
मृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||

लघु उद्योग्

लघू उद्योग म्हणून सरकारने ह्याला प्रोत्साहन द्यायला हवे. भारतात ह्यावर् काही संशोधन झाले आहे काय?

- चंबा

उत्तम!

चांगली ओळख करून दिलीत.
तुलनेने शेवाळ्यापासूनचे तेल उत्पन्न २५,००० लिटर आहे
हे वाचून फारच आश्चर्य वाटले. इतके तेल?

मग वाट कशाची आहे?
काही तरी गोची आहे असे वाटते.

कुणी काढली आहे ही आकडेवारी?

असो, आता शेवाळ्याकडे मी पुढच्यावेळी जरा गांभीर्याने पाहीन :)

आपला
(एकेकाळी मनमुराद बुलेट मध्ये खनिज तेल उडवलेला)
गुंडोपंत

माहितीपूर्ण लेख

मराठीत शेवाळे म्हणजे ओलसर ठिकाणी हवेत वाढणार्‍या काही वनस्पती, आणि पाण्यात वाढणार्‍या वनस्पती, अशा दोन्ही प्रकारांना म्हणतात.

वरील लेखातल्या वनस्पती पाण्यात वाढणार्‍या "आल्गा" सृष्टीतल्या आहेत, असे वाटते.

जीवसृष्टीतील ऊर्जानिर्मितीचा मोठा अंश समुद्रातील आल्गा करतात. त्यांची लागवड करून तेल उत्पादन करायची कल्पना विचारार्ह आहे.

पुन्हा प्रदूषण, जमिनीचे किंवा सागराचे क्षेत्र आडवणे, रासायनिक खते कशी मिळवायची वगैरे प्रश्न उत्पन्न होतातच. पण हे सर्व सोडवण्यासाठी कोणी संशोधन करते आहे, असे ऐकून बरे वाटले.

 
^ वर