बायो डिझेल

बायो डिझेल
आजकाल सर्वत्र चर्चिल्या जाणार्‍या या इंधनाची माहिती घेवू. खनिज तेल भूगर्भात तयार व्हावयाला लाखो वर्षे लागली व त्याचे साठे अजून पन्नासएक वर्षात संपून जाणार हे सर्वांना कळून चुकले आहे.उर्जेचा हा साठा संपल्यावर पर्याय काय ?
सूर्य उर्जा, पवन उर्जा, अणू उर्जा हे माहित असलेले व वापरातही असलेले स्त्रोत. त्यांच्यावर संशोधन चालू आहे व त्यातील प्रगतीही आशादायक आहे. त्याच बरोबर खनिज तेलाला आणखी एक पर्याय म्हणून आले बायो-डिझेल. आता जो कोणता नवीन पर्याय शोधावयाचा तो परत परत उपलब्ध झाला पाहिजे. जसे, झाड तोडा, लाकूड जाळून उर्जा मिळवा, नवीन झाड लावा, परत उर्जा मिळवा. ऊसापासून साखर मिळते,साखरेपासून अल्कोहोल, ते इंधन म्हणून वापरा, ऊस परत लावा, अल्कोहोल मिळेल,तसेच बायोडिझेलचे. आता थोडे रसायनशास्त्र.

कोणतेही तेल, (शेंगदाणा, करडई, खोबरेल, पाम,सोया, एरंडी) घ्या(१००). त्यात मिथेनॉल(१२) व थोडेसे सोडिअम हायड्रॉक्साइड(१.५) घाला. २४तास ठेवा.तुम्हाला बायोडिझेल(९५), ग्लिसरिन(१०) इतर साका,गाळ मिळॆल, वरचे बा-डी ओतून घ्या. संपले. सोपे आहे ना? मी घरी करून पाहिले. अमेरिकेत बरेच जण करतात असे वाचले. व्यावसायिक पद्धतीने करताना थोडे फरक करतात. गरम करणे, स्टरर वापरणे, वगैरे. वेळ कमी लागतो,शुद्धता वाढते.पण पद्धत एकच.

तेलबीयांपासून मिळणारे तेल १०० टक्के नैसर्गिक व परतपरत मिळणारे. मिथेनॉल कृत्रिम तयार करावे लागते पण कमी लागते. तसेच अल्कलीचा त्रास थोड्या प्रयासाने मिटविता येतो. ग्लिसरिन हीच डोकेदुखी आहे. बर्‍याच उद्योगात ते वापरतात पण उद्या ते लाखो टन तयार होऊ लागले तर त्याचे काय करणार ? प्रयोग चालू आहेत; आज तरी जळण हाच उपयोग दिसतो.
त्या करिताही ते फार चांगले नाही ! असो.

आता तेलाकडे वळू. तेलबीयांकडून तेल मिळते. पण तेलाचे प्रमाण सर्व बीयांत सारखे नसते. १८ ते ३५ % इतका फरक पडू शकतो. तसेच प्रत्येक पीकाचे हेक्टरी उत्पन्न कमीजास्त असते. जमीन, हवामान, पाण्याची उपलब्धता याचाही विचार करावा लागतो.याचा परिणाम म्हणजे अमेरिकेत सोया तेल वापरतात तर मलेशियात फक्त पामची लागवड करतात. तेथे शेकडो हेक्टर जमिनीवरील जंगले तोडून पामची लागवड केली गेली! महाराष्टापुरते बोलायचे तर जॅट्रोफा (मुगली एरंड)ची शिफारस करण्यात आली.
शुद्ध फसवणूक. बर्‍याच जणांनी यात हात धुवून घेतले. कसे ते पहा. प्रथम सांगितले, कोरडवाहू जमिनीत होते, पावसावर अवलंबून रहाण्याची गरज नाही, एवढे उत्पन्न मिळते, असा भाव मिळेल. सगळे खोटे. पाणी नसेल तर झाड येते पण खुरटलेले. झाडाला फळे उशिरा येतात व कमी लागतात.तेलाचे प्रमाण घसरते. तसेच भावाबद्दलही अवास्तव आकडे दिले. बर्‍याच शेतकर्‍यांनी मार खाल्ला. कारण हे झाड तीन वर्षांनंतर हळूहळूउत्पन्न देते. मग आले यंत्र निर्माण करणारे,तांत्रिक सल्ला देणारे.त्यांनी भरमसाट पैसे लावून key project उभे करून दिले. फक्त तेलच नव्हते! उद्योजक बुडाले.मग mitcon.शासकीय सल्लागार! त्यांनी तर शेतकरी, उद्योजक यांच्याकरिता रु. ५००० (फक्त) घेऊन एक कार्यशाला उघडली. मी चौकशीला गेलो." शिकवणारे कोण" तर सांगता येईना, शेती शाळेतले कोणीतरी येणार होते ! effluent treatment चे काय ? तसे काही नसतेच म्हणॆ. नवापुरला माझ्या मित्राच्या कारखान्यात आम्ही ५००० लिटरच्या दोन ट्रायल्स घेतल्या होत्या व केवळ या कारणामुळे बंद करून टाकले होते. मी तेथे हे सांगितल्यावर त्याचा साधा प्रश्न " मग तुम्ही इथे आलाच कशाला ?" हे सोडा. या सर्वांचे "महागुरू" कोण? महाराष्ट्र शासन. त्यांनी सांगितले " जॅट्रोफाच्या लागवडीकरता काही हजार हेक्टर वनजमीन आम्ही देणार " दुसर्‍या दिवशी काही मंत्री महोदयांच्या चिरंजिवांनी कंपन्या स्थापल्या ! पुढे काय झाले सांगावयाची गरज आहे का? पण इथेच
कशाला? अमेरिकेत या वावटळीत पीकांच्या लागवडीत/उपयोगात इतके बदल घडले की तेथेही आरडाओरड सुरू झाली म्हणे.अमेरिकानिवासींनी आम्हाला माहिती पुरवावी.

हेक्टरी तेलबीयांचे उत्पादन, बीमधील तेलाचे प्रमाण, तेल काढण्याच्या पद्धतीने पडणारा फरक, निरनिराळ्या देशांमधील बा-डीचा वापर असली टेबल्स देता येतील (व आमच्या अभ्यासाचा उजेड पाडता येईल) पण त्याचा काही फारसा उपयोग नाही. त्या ऐवजी "शेवाळ्यापासून तेल " हा दुसरा भाग पुढच्या लेखात.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

ह्म्म

आणखी माहिती वाचायला आवडेल. पुण्यात टाटा मोटर्सच्या बस बायोडिझेलवर चालतात. पण ते त्यांना मिळते कोणाकडून हे माहित नाही. परत मागच्या लेखातल्या मुद्यांप्रमाणेच. व्यावसायिक दृष्टीकोनाने पहायला हवे. आपल्या येथे शासन आले की संपलेच.






लेखन त्रोटक वाटले.

आणखी विस्ताराने सर्व बाबी समजावून सांगाव्यात.
पर्यायी इंधन हा एक फसवा, भ्रष्टाचारी मार्ग आहे का?
जत्रोफापेक्षा करंजा जास्त किफायतशीर आहे का?
की सिमारुबा ग्लाउका?
की बायोडिझेल हेच एक मोठे कृष्णविवर आहे?
वगैरे...

छोटेखानी

छोटेखानी पण प्रभावी लेख.

शासनाच्या गैरव्यवहाराचे अजुन एक उदाहरण पाहून अतिशय वाईट वाटले.

तेल बिया उत्पादन

एका महत्वाच्या विषयावरचा माहितीपूर्ण लेख
पर्यायी डिझेल तयार करण्यासाठी तेल बियांची लागवड ही मोठी फसगत करणारी कल्पना आहे. बियांच्या व्यापारी लागवडीसाठी चांगली जमीन, पाणी सर्वच लागते. त्यामुळे बायो डिझेल पर्यावरणास खूप मदत करणारे आहे ही कल्पनाच भ्रामक आहे.
चन्द्रशेखर

बैलगाडी

याचा कुणी सखोल अभ्यास केला तर कदाचित हे आपणांस नुकसानकारक आहे असे समोर येईल. (जगात पुरेसे अन्न उत्पादित होते का हो? मका आणि उसापासुन किंवा ईतर धान्यापासुन ईथेनॉल बनविणे ही तसेच नुकसानकारक)
जमीनीचा उपयोग चारा अन्न वगेरे साठी करणेच योग्य.

(बैलगाडी पुरस्कर्ता)
आपला नम्र

थोडी जास्त माहिती

(१) श्री.विसुनाना
सर्व बाबी समजावून सांगाव्यात. आपणाला कोणत्या बाबी, उदा. व्यावसायिक तयार करणे, अर्थकारण, पर्यावरणावरील परिणाम,बद्दल माहिती पाहिजे हे कळले तर तसा प्रयत्न करीन. अशा लेखांची सुरवात प्राथमिक माहिती अशीच रहाणार/रहावी.
पर्यायी इंधन हा एक फसवा, भ्रष्टाचारी मार्ग आहे का? अजिबात नाही.माणसे फसवी, भ्रष्टाचारी आहेत, मार्ग नव्हे. आज जत्रोफापासून इंधन मिळवणे फार किफायतशीर म्हणता येणार नाही. पण शेवाळ्यापासून केलेले नक्कीच उपयोगाचे होणार आहे.
करंजा-जत्रोफा तुलना. ही तुलना करावयाला करंजाची व्यावसायिक लागवड झाली पाहिजे. तर काहीतरी सरासरी काढता येईल. माझ्या माहितीप्रमाणे एका झाडापासून ९ ते ९० किलो बी मिळते ! लागवड सोडाच, १-२ झाडेसुद्धा कोणी मुद्दाम लावत नाही.
सिमारुबा ग्लाउका.. विसुनाना,अहो मला साधे विन्ग्रजी येत नाही,लॅटिन कुठून कळणार ? समजेल असे नाव सांगा,( हे विसुनाना माझी फिरकी घेत आहेत की परिक्षा ? ज्यांना तेलबीयांची लॅटिन नावे सहज फेकता येतात त्यांच्याकडे मी समिधा घेऊन
शिकावयास जाण्यास तयार आहे.)
(२) श्री.चंद्रशेखर
बा-डि करता तेलबीयांची लागवड म्हणजे फसवणुक असे मला वाटत नाही. हे तंत्रज्ञान विकसीत होत आहे. सुरवातीला efficiency कमी असणारच. त्याने घाबरून जाण्य़ाचे किंवा विरोध करण्याचे कारण नाही. या तंत्रज्ञानाच विकास म्हणजे शेवाळ्यापासून तेल. इथे तुम्ही , कुठलेही पाणी, कुठलीही जमीन,कमीतकमी वापरून, तेल तयार करता व महत्वाचे म्हणजे कच्चा माल म्हणून कार्बन डायॉक्साईड वापरता. बोला. आता तुमची हरकत नाही ना ? हे तंत्रज्ञान पूर्ण विकसित झाले की कोण तेलबीया
वापरणार आहे?
(३) आपला नम्र
मी वर सांगितल्याप्रमाणेच मक्यापासून इथेनॉल ही सुरवात आहे. शेवटी कुठल्याही कार्बोहायड्रेट पासूनच इथेनॉल मिळवावयाचा प्रयत्न आहे. धिर्धरा दिर्धरा हडबडु गडबडु नका. कृपावंत निसर्ग कार्बोहायड्रेट कमी पडू देणार नाही.

शरद

तेलबियांची लागवड

मला असे वाटते की मी माझा मुद्दा योग्य तर्‍हेने मांडला नसावा.
लागवडीयोग्य जमीन, पाणी या सारखे स्त्रोत डिझेल उत्पादनासाठी वापरायचे का? हा मुख्य मुद्दा आहे. माझ्या मते ते वापरू नयेत्. डिझेल हे उर्जा निर्मितीसाठी वापरले जाते. उर्जा निर्मितीसाठी इतर अनेक पर्याय ( अणू शक्ती, सोलर पॉवर, विन्ड पॉवर) विकसित करणे शक्य आहे. जमीन आणि पाणी हे अन्न निर्मितीसाठी मुख्यत्वेकरून वापरावे असे मला वाटते.
चन्द्रशेखर

 
^ वर