काहीतरी पॉझिटिव्ह – भाग एक

मी लिहित असलेल्या, पर्यावरणाची कृष्ण विवरे, या लेखमालेला माझ्या अपेक्षेच्या बाहेर प्रतिसाद आले. त्यातला एक प्रतिसाद मला अतिशय आवडला. त्या प्रतिसाद लेखकाने मला लिहिले होते की “काहीतरी पॉझिटिव्ह पण लिहा. वाचायला आवडेल.” मी त्या वाचकाला लगेच कळविले होते की, मी निराशावादी नाही. जरूर प्रयत्न करीन. पण हा विषयच असा आहे की यात चांगले काही लवकर सापडतच नाही. पाश्चिमात्य वा काही सुधारलेल्या इतर राष्ट्रांच्या चंगळवादाच्या व आपल्यापुरते बघण्याच्या संवयी, मानवी अधाशीपणा (Greed) आणि व्यापार व उद्योग जगताचे प्रचारकार्य (Lobbying) यांच्या प्रभावापुढे, आपण आपले बलस्त्रोत्र व पर्यावरण यांची न भूतो: न भविष्यति: अशी हानी करतो आहोत याचे जगातल्या देशांना आकलनच होत नाही की काय असे वाटायला लागते. संशोधकांनी अक्षरश: लाखांनी, अतिशय व्यापक स्वरूपात या संबंधी शोध निबंध लिहिले आहेत. ते जालावर उपलब्ध आहेत. प्रसार माध्यमे त्यांचे काम उत्तम रित्या करत आहेत. पण पाहिजे ती पाउले मात्र उचलली जात नाहीत अशी परिस्थिती आहे.

असे जरी असले तरी काही काही संस्था व लोक हे आपल्या परीने खूप चांगला प्रयत्न करत आहेत. त्यांना थोडेफार यशही प्राप्त झाले आहे. अशा काही हिरव्या कोंबांची ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आपण कापसाच्या कृष्ण विवरापासून सुरवात केली होती तेंव्हा इथेही आपण कापसापासूनच सुरवात करूया.

गुजरातमधल्या शेतकर्‍यांनी बारडोलीच्या आंदोलनापासूनच् इतिहास घडविला आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत, तीव्र टंचाईच्या परिस्थितीपासून दुधाच्या महापूरापर्यंतचा क्रांतीकारक बदल, याच शेतकर्‍यांनी घडविलेला आहे. त्यामुळे कापसाच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यासाठी गुजराती शेतकर्‍यांनी कंबर कसली आहे हे त्यांच्या या इतिहासाला साजेसेच आहे. कच्छ्मधले 59 वर्षाचे एक शेतकरी श्री. प्रभात भाई हे असेच एक शेतकरी आहेत. त्यांची स्वत:ची कापूस पिकविणारी 30 एकर जमीन आहे. या शिवाय ते ‘ऍग्रोसेल’ (Agrocel ‘Pure and FairCotton Farmers’ Association) या संस्थेचे अध्यक्ष आहेत. या ‘ऍग्रोसेल’ ने 2007-2008 मध्ये कच्छ जिल्ह्यातील 12400 एकर जमीन हरित कापूस उत्पादनाखाली आणली. कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक यांचा वापर न करत्ता त्यांनी वनस्पतीजन्य कीटकनाशके, कचर्‍यापासून बनविलेले कॉम्पोस्ट खत, शेणखत आणि मेलेल्या जनावरांच्या शिंगापासून बनविलेली खते यांचाच वापर केला आहे. या सगळ्या वापरामुळे त्यांना पिकासाठी लागणारे पाणी पूर्वीच्या निम्मेच लागले. आधीच्या वर्षांत प्रथम त्यांचे एकरी उत्पादन निम्मेच झाले. पण खते आणि कीटकनाशकांवरचा खर्च इतका कमी झाला की निम्म्या उत्पादनातूनसुद्धा मिळालेला फायदा तेवढाच राहिला होता. या सर्व अनुभवातून धडा घेऊन हे शेतकरी पुढे जात आहेत.
2007 मधे जगभर कपडे विकणार्‍या मार्क्स ऍन्ड स्पेन्सर्स या प्रसिद्ध कंपनीने आपल्या सेंद्रिय कापसाच्या ‘फेअरट्रेड’ ब्रॅन्डच्या कपड्यांसाठी ‘ऍग्रोसेल’चे संपूर्ण उत्पादन(6500 टन) विकत घेण्याची तयारी दाखविली होती. पण ‘ऍग्रोसेल’ ने त्यांना फक्त 300 टन कापूस विकून बाकीचा इतरांना विकला व आपण या व्यवसायात किती तयार आहोत याची चुणूक दाखविली. मार्क्स ऍन्ड स्पेन्सर्स त्यांच्या या ब्रॅन्डसाठी कापड भारतातूनच विणून घेतात. या मिल्सना, शेवटी माली, कॅमरून आणि सेनेगल(या देशांत पण आता हरित कापसाखाली शेत जमिन आली आहे.) या आफ्रिकन देशांकडून आणावा लागला.

शेल फाउंडेशन व मार्क्स ऍन्ड स्पेन्सर्स यांच्या सहकार्याने कापसाचे ‘फेअरट्रेड’ हे मानक विकसित झाले आहे. जे शेतकरी, या मानकाच्या पद्धतीनुसार, म्हणजे सेंद्रिय आणि पाण्याचे नियोजन केलेल्या, कापसाचे उत्पादन करतील त्यांनाच ‘फेअरट्रेड’ हे नाव लावता येते. अरविंद मिल्स किंवा वर्धमान मिल्स आता फेअरट्रेड कापडाचे उत्पादन करू लागल्या आहेत. मार्क्स ऍन्ड स्पेन्सर्स शिवाय, मॅक्स हाउलर, ऑक्सफॅम व व्हेरीकॉट या सारखे काही युरोपियन ब्रॅन्ड आता फेअरट्रेड कपडे विकू लागले आहेत.

फेअरट्रेड कापसाची किंमत शेतकर्‍यांना आलेल्या उत्पादन खर्चावर आधारित असते व या शिवाय क़ाही टक्के रक्कम ही त्या शेतकर्‍यांच्या सहकारी संघाला पाणीबंधार्‍यांसारखी कामे करण्यासाठी जास्त देण्यात येते. फेअरट्रेड चळवळ आता गुजरातनंतर ओरिसातही मूळ धरू लागली आहे.
आपण हा हिरवा कोंब जोमाने वाढेल व आंतर्राष्ट्रीय कापूस व्यापाराच्या कृष्ण विवरात नामशेष होणार नाही एवढी आशा जरूर करू शकतो.
21 जून 2009

लेखनविषय: दुवे:

Comments

हुर्रे!

धन्यु!
आता सेंद्रिय आणि पाण्याचे नियोजन केलेल्या, कापसाचे उत्पादन karaNarya (कसे लिहायचे?) शेतकरी बांधवांना कोण कसे लुटतेय ते सांगा बघु.

एम् ऍन्ड एस्

वा! फेयरट्रेडचे काम भारतातही आहे हे वाचून बरे वाटले. त्यांच्या पत्रकांत आफ्रिकी, दक्षिण अमेरिकी देश जास्त दिसतात. मार्क्स ऍन्ड स्पेन्सर्सचे फेयरट्रेड कपडे वापरत असल्याचा विशेष आनंद झाला.

karaNaaRya = करणार्‍या

फेअरट्रेड कपडे

गुजरातमधले हरित कापूस पिकवणारे शेतकरी अतिशय कमी प्रमाणात कापूस, मार्क्स & स्पेन्सर्स फेअरट्रेड ला विकतात कारण त्यांच्या कापसाला भारतात जास्त किंमत मिळू शकते. आफ्रिकी व दक्षिण अमेरिकेतील देशांतील शेतकरी या बाबतीत थोडे असहाय्य असावेत. त्यामुळे फेअरट्रेड मधे त्यांचा कापूस जास्त वापरला जातो. परंतु बहुतेक सर्व फेअरट्रेड कापड भारतातच विणले जाते.

फेअरट्रेड कपडे वापरल्याबद्दल आपले अभिनंदन.

चन्द्रशेखर

सकारात्मक

सकारात्मक / आशादायी लेख आवडला. अश्या लेखांची देखील एक लेखमाला होउन जाउ दे. :-)

लेख आवडला

लेख आवडला.. बरे वाटले असे वाचुन

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

लेख आवडला

लेख आवडला. अशी अजून माहिती घ्यायला आवडेल.

--लिखाळ.
आपले ते माहितीपूर्ण लेखन इतरांचे ते ललित :)

 
^ वर