कृत्रिम कोळसा

कृत्रिम कोळसा ( वृक्ष वाचवण्याचा एक प्रयत्न )

अजूनही ग्रामीण भारतात अन्न शिजवावयाला लाकूड, गोवर्‍या, कोळसा यांना फ़ारसा पर्याय नाही. कमी होत जाणार्‍या पशू धनामुळे व शेण जाळण्या ऐवजी खत म्हणून वापरावयास सुरवात झाल्यामुळे गोवर्‍या दुर्मिळ होत आहेत. लाकडाच्या व कोळशाच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोडले जात असल्याने पर्यायी इंधन शोधणे अतिशय गरजेचे आहे.

खनीज तेलाचा विचार करावयाची गरज नाही व गॅस खेडोपाडी पोचण्यास वेळ लागणार असल्याने तोही सोडून द्या. भारतात उपलब्ध असलेला एकमेव पर्याय म्हणजे दगडी कोळसा. याचे प्रचंड साठे उपलब्ध आहेत. पण तो घरच्या स्वयंपाकाकरिता निरुपयोगी कारण त्याची High calorific value. हे एक वदतो व्याघात: चे उदाहरण आहे. कोळसा जास्त उष्णता देईल तर खरे म्हणजे फ़ायद्याचेच. पण त्यामुळे स्वयंपाकाची भांडी खराब होतात. त्याचाही फार उपयोग नाही.

बरेच वर्षांपूर्वी मावळातल्या शेतक‍यांना चार पैसे जास्त मिळावेत म्हणून काय करता येईल या बद्दल विचार चालला होता. भाताचे तुटपुंजे उत्पन्न व मातीमोल भावात विकावे लागणारे पावसाळी गवत एवढीच कमाई. बाकी काही नाही तरी निदान गवताचे पैसे जास्त मिळावेत असा विचार करतांना एक कल्पना सुचली. low calorific value म्हणून निरुपयोगी असलेले गवत व दगडी कोळसा एकत्र केले तर कमी खर्चात चांगले इंधन मिळावे. यात आणखी एक फ़ायदा असा होता की भुसकन जळणारे गवत व सावकाश जळणारा कोळसा यांच्या मिश्रणापासून घरात योग्य असे इंधन मिळणार होते.प्रयोग करावयाचे ठरविले.

आणखी एक अडचण होती. दगडी कोळसाही फार स्वस्त नव्हता. चौकशी केल्यावर कळले की याची खर (broken pieces, powder) फार स्वस्तात मिळते. कारण औद्योगिक क्षेत्रात ती निरुपयोगी असते, नव्हे त्रासदायक असते. माझा फ़ायदा हा की दगडी कोळसा कुटावयाचा खर्च वाचला. म्हणजे कच्च्या मालाचा प्रश्न सुटला; गवत व दगडी कोळशाची खर.आता हे एकत्र कसे करावयाचे ? त्याचेही सोपे उत्तर मिळाले. पूर्वी बंबात जाळावयाला " कांडी कोळसा" मिळावयाचा. लाकडी कोळशाची खर व शेण यांचा घट्ट काला extruder मध्ये घालून त्याची कांडी करत व तीचे तुकडे बंबात वापरत. लवकर जळतो म्हणून यंपाकाकरिता निरुपयोगी. तेंव्हा शेण वगळून एक inorganic binder निवडला व कामास सुरवात केली.

कामशेतहून गवताचे भारे आणले. मशिनवर बारीक करून घेतले. मालधक्याजवळून दगडी कोळशाची खर आणली. खर गवत व बाइंडर सिग्मा मिक्सरवर एकत्रित केले. एक hand extruder पैदा केला व त्यातून कृत्रीम कांडी कोळसा तयार केला.

खेडेगावात ५-६ घरात व दोन धाब्यांवर तंदूरी करता वापरावयाला दिला. सर्वांनी लाकडी कोळशासारखा आहे असे सांगितले.कुठलाही agro waste व दगडी कोळशाची ( हल्ली निरुपयोगी असलेली) खर यांच्या उपयोगाने असा कोळसा तयार करता येईल. जागा व यंत्रसामुग्री फार लागत नाही. कुशल कामगारांची गरज नाही. एखाद्या तालुक्यापुरताच ग्राहकवर्ग समोर ठेवून,दिवसाला १-२ टन उत्पादन केले तर शेतकर्‍याच्या गवताला किंमत, १०-२० जणांना रोजगार व उद्योजकाला योग्य नफा मिळू शकेल.

पुढे काय झाले ? काही नाही. ज्या NGO Trust करिता सगळा खटाटोप केला त्यांचा सहभाग पुढे मिळाला नाही. वेळ, पैसा खर्च झाला पण स्वांत: सुखाय केले एवढा आनंद मिळाला. काही दिवसांपूर्वी श्री. चाणक्य यांच्या समुदायाकरिता लिहावे असा विचार केला होता पण हा काही high tech project नाही व खेडॆगावात जावून करावा लागेल असे लक्षात घेवून सोडून दिले.
आज श्री. चंद्रशेखर यांच्या लेखामुळे, वृक्षतोड कमी करण्यासाठी, काय शक्य आहे हे आपणासमोर मांडावे असे वाटले.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

कृत्रिम कोळसा

आपला लेख आवडला. आपणास आलेले फ्रस्ट्रेशन अनाठायी आहे असे वाटते. आपण जर पुण्यात असलात तर डॉ. आनंद कर्वे यांची जरूर भेट घ्यावी. ते उसाच्या पोयट्यापासून कोळसा बनवित आहेत व त्याची व्यापारी तत्वावर विक्री करत आहेत. त्यांना यांत बरेच यश मिळाले आहे.
चन्द्रशेखर

हाय टेक

प्रयोग उल्लेखनीय आहे. आपल्याला हायटेकची नाही तर अश्याच कल्पना सत्यात आणायची गरज आहे. हा लेख त्या समुदायात जावा ही विनंती. तसेच हा प्रयोग परत करण्या करिता तसेच याला फक्त प्रायोगीक स्वरुप न राहता व्यावसायिक स्वरुप येण्यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास करु. अशा प्रयोगांसाठी माझी शक्य ती मदत द्यायला मी तयार आहे. पण हे असे प्रयोग होणे आणि यश आल्यास त्यांना व्यावसायिक रुप देणे गरजेचे आहे. मला वाटते की अनेक उपक्रमींना यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायला आवडेल.


आयडिया आवडली

हा कोळसा आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्याला प्रत्यवाय दिसत नाही.
तुम्ही केलेल्या प्रयोगाचा जमाखर्च कसा होता? भांडवल किती लागले?
कृत्रिम कोळसा आणि बाजारात मिळणारा लाकडी कोळसा यांच्या
विक्री किमतीची तुलना येथे दिलीत तर उत्तम.

असहमत्

तेल किंवा गॅस पेक्षा आर्थिक दृष्ट्या सरस आहे. घरगुती वापराच्या गॅसवर सबसिडी असते ती काढुन बघा. environmental concern too.

तांत्रिक माहिती

कृत्रिम कोळसा

हे प्रयोग मी १५-२० वर्षांपूर्वी केले होते. त्यामुळे त्या वेळचे आकडे अंदाजाने देतो. आज महागईमुळॆ किंमती बदलल्या तरी तुलनात्मकरीत्या फार फरक पडू नये.कृत्रिम कोळसा लाकडी कोळश्यापेक्षा दीड ते दोन रुपये स्वस्त पडावयास पाहिजे. संपूर्ण PROJECT REPORT येथे देणे अवघड आहे.थोडक्यात बघू.
(१) कच्चा माल
गवत .... रु.४००/टन
दगडी कोळसा (खर) रु.५००/टन
बाइंडर....रु. ९०००/टन
(२) मिश्रणाचे प्रमाण १००:१००: २० ( ही प्रमाणे बदलू शकतात.)
(३) उतारा ९०-९५%
(४) यंत्र सामुग्री
क्रशर १ ( गवत, चोयटे, वगैरे बारीक करावयाला) रु,२५,०००
मि़क्सर १ रु. ३०,०००
एक्स्कृडर १ रु, ४०,०००
प्रेस १ (गवताच्या बेल, गठ्ठे करावयाला} रु. २५,०००
(५) शेड १००० फ़ूटवर्ग ( छप्पर पाहिजे, भिंतींची गरज नाही.) प्रसाधन,कचेरी
(६) वीज १० कि.वॅट.
(७) मोकळी जागा १०,००० फ़ूटवर्ग.
(८) कामगार ३-४
(९) उत्पादन १-५ टन/दिवस
(१०) गिर्‍हाईक .... गृहिणी, धाबे, वसतीगृहे इत्यादी
(११) सबसिडी ... non-conventional fuel म्हणून सरकारकडून मिळावयाची शक्यता,

आजचे आकडे मिळवावयास सर्व्हे करावयास लागेल.
तांत्रिक माहिती कोणालाही मोफत.
मी पुण्यात रहातो. हे काम डॉ. कर्व्यांनी सुरू करावयाच्या फार आधीचे आहे. देवदयेने मला पैसा व वेळ भरपूर मिळाला व कोणत्याही तर्‍हेचे फ्रस्टेशन येण्याचा प्रसंग कधी उद्भवला नाही. स्वांत:सुखाय हेच खरे.
कोणला जास्त माहिती पाहिजे असेल तर फोन करा. मी मोकळाच असतो.
शरद

छान

आपला लेख म्हणजेच कृत्रीम कोळसा प्रकल्प आवडला.

शक्य असल्यास प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत व्हावा ही इच्छा. फक्त प्रदुषणाबद्दल शंका आहेत. वसतीगृह,धाबे येथे सूर्यशक्तीवर आधारीत उर्जावापर प्रदुषणाचा विचार करता आधीक चांगला असेल असे वाटते जरी खर्च जास्त असला तरी.

शंका

शंका असणे योग्य आहे. पण दुर्गम भागात इतर इंधने मिळणे शक्यच नाही तिथे प्रदुषण हा मुद्दा गौण ठरतो. तिथे आधी इंधन काय हे महत्वाचे. तिथे सर्वात जास्त वापरले जाणारे इंधन म्हणजे लाकुड. आणि प्रदुषणाच्या प्रश्ना इतकाच लाकुडतोडीचा प्रश्न गंभीर. सौरउर्जा उपलब्ध आहे. पण त्याबद्दलचे प्रयोग आणि वापर या बद्दल आनंदी आनंद आहे भारतात. सध्या सॅमसंगने सौरउर्जेवर चालणारा भ्रमणध्वनी भारतात विक्रीला काढला आहे.


धुराचे प्रमाण

या प्रयोगातील कोळश्याला धुराचे प्रमाण किती होते ?
फक्त प्रदुषणाबद्दल शंका आहेत.... हे प्रदुषण खनीज तेल ज्वलनापेक्षा कमीच असावे.
तुमच्या प्रयोगात डॉ. कर्व्यांच्या प्रयोगातील कोळसा करण्यासाठी लागणारे जळण वाचतेय.
या प्रोजेक्टची किंमत् कमी करता आली तर हा चांगला कुटीरोद्योग होऊ शकेल्. मी स्वतः या प्रकारच्या प्रयोगात् interested आहे.
समक्ष भेटण्याची इच्छा आहे.

उत्तम प्रयोग

याबाबत आधी संशोधन आणि मग व्यवसायीकरण होणे जरुरीचे.

संशोधन - प्रदूषणाबद्दल
व्यवसायीकरण - उत्पादन->(मालवाहातुक)->पुरवठा आणि विक्री ही कार्यक्षम शृंखला निर्माण करण्याबाबत कार्य

या विषयी जर कोणी काम करायचे ठरवले, तर मला मदत करायला आवडेल.

+१

या विषयी जर कोणी काम करायचे ठरवले, तर मलाही मदत करायला आवडेल.

 
^ वर