पर्यावरणाची कृष्ण विवरे – भाग 2

मागच्या वर्षी माझ्या मुलीने, बरेच कप्पे असलेले एक लाकडी टेबल बाजारातून खरेदी केले. टेबल दिसायला मोठे छान होते. कप्यांची हॅंडल्स, टेबलाच्या चेरी रंगाच्या पॉलिशवर, खुलुन दिसत होती. छोट्या बाळाचे सर्व कपडे या कप्यांच्यात नीट मावत होते व टेबलाच्या पृष्ठभागावर बाळाचे कपडे बदलणे खूपच सोइस्कर होते. माझ्या मुलीला या टेबलाची किंमत त्याच्या उत्पादनाच्या दर्जाच्या मानाने बरीच स्वस्त वाटली होती व यामुळे एक चांगली खरेदी पदरात पडल्याचे समाधान वाटले होते. काही महिन्यानंतर छोट्या बाळाच्या, तीन वर्षांच्या, मोठ्या बहिणीच्या असे मनात आले की ही कप्यांची हॅंडल्स, लोंबकळून झोका घ्यायला मोठी छान आहेत. तिने तिचा विचार लगेच अंमलात आणला. आता या सगळ्यात विशेष काय आहे असे कोणीही विचारेल आणि मलाही ते मान्य आहे. पण विशेष घडले ते नंतर. माझी नात ज्या कप्यांच्या हॅंडल्सना धरून लोंबकळत होती त्या लाकडी कप्प्याचे चक्क दोन तुकडे झाले. माझ्या मुलीला अर्थातच त्या टेबल बनविणार्‍यांचा आणि विकणार्‍यांचा खूपच राग आला. विक्रेत्याने त्या मोडलेल्या टेबलाचे निरिक्षण केले व ते टेबल अयोग्य वापराने मोडल्याचे निदान केले. त्याच्या मताने ते कपाट MDF चे बनविलेले आहे आणि त्याचा उपयोग निरनिराळ्या गोष्टी ठेवण्यासाठी करावयाचा आहे. व्यायाम प्रकार करण्यासाठी( जरी व्यायाम करणारी व्यक्ती 3 वर्षाची असली तरी) ते नाही. त्यामुळे ते टेबल बदलून दुसरे देणे त्याला शक्य नाही. माझ्या मुलीला ते टेबल कचर्‍यामधे फेकून देण्याशिवाय पर्यायच नव्हता.

MDF(Medium density Fiberboard) चा शोध मला असा लागला. माझ्या मुलीने जेंव्हा या टेबलाची गोष्ट मला सांगितली तेंव्हा माझ्यातला तपासनीस जागा झाला आणि लाकडाऐवजी वापरल्या जाणार्‍या या मटेरियल्सच्या बद्दल मी माहिती मिळवली. माझ्या शोधात मला MDF बरोबर पार्टिकल बोर्ड, चिपबोर्ड व ब्लॉकबोर्ड अशी पर्यायी उत्पादनांची एक श्रेणीच सापडली. या आधी मला प्लायबोर्डबद्दल माहिती होतीच. प्लायबोर्डचा तक्ता, अनेक पातळ लाकडी काप, उच्च तपमान व दाबाच्या परिस्थितीत, सरसाने एकमेकाला चिकटवून तयार करतात. परंतु प्लायबोर्डचा तक्ता हा लाकूडच असतो. त्याचे काही गुणधर्म तर लाकडापेक्षाही जास्त चांगले असतात. पार्टिकल बोर्ड, चिपबोर्ड व ब्लॉकबोर्ड हे, दोन लाकडी तावांमधे, भुस्सा, लाकडाचे बारिक तुकडे व लाकडाचे भंगार यांचे सरसाच्या सहाय्याने केलेले मिश्रण भरून बनविलेले, एक सॅंडविच असते. या उलट MDF चे उत्पादन करताना, लाकडाचे बारिक तुकडे प्रेशर कुकरमधे शिजवून त्यांचा लगदा करतात व या लगद्याचे युरिया फॉर्माल्डाइड किंवा मेलामाइन सारख्या सेंद्रिय पदार्थांबरोबर मिश्रण करून, लाकडासदृष्य दिसणारे तक्ते बनवितात.

लाकडाचे दोन महत्वाचे गुणधर्म आहेत लवचिकता व आघात झाल्यास फाटण्याला असलेला विरोध. हे गुणधर्म मॉड्युलस ऑफ रप्चर(MOR) व मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटि (MOE) या दोन पॅरामीटर्सनी सूचित केले जातात. MDF च्या बाबतीत, हे पॅरामीटर्स लाकडाच्या एक चतुर्थांश असतात तर इतर उत्पादनांच्या बाबतीत, हे पॅरामीटर्स लाकडाच्या फक्त एक अष्टमांश असतात. म्हणजेच ही सर्व पर्यायी उत्पादने, लाकडापेक्षा बरीच कमकुवत असतात. माझ्या नातीच्या व्यायामामुळे, टेबल का तुटले याचे हे सोपे सरळ उत्तर आहे. परंतु हा विषय आपण येथेच सोडून देऊ. या सर्व पर्यायी उत्पादनांचे मुख्य फायदे आहेत, त्यांची अतिशय कमी किंमत, त्यांच्यावर काम करण्याची सुलभता आणि त्यांच्यातून तयार केलेल्या वस्तूंचा उच्च दर्जा.

प्रथमत: लाकडाला असलेले हे सर्व पर्याय खूपच चांगले आहेत असेच माझे मत झाले. यांचा वापर जेवढा वाढेल तेवढाच लाकडांचा जगभरातला खप कमी होईल. बेसुमार चाललेली लाकुडतोड कमी होईल व उजाड होत चाललेली जंगले वाचतील असे मला वाटले.प्रत्यक्षात घडते आहे बरोबर याच्या उलट.

जर आज आपण कोणत्याही प्रगत देशातल्या एखाद्या मोठ्या दुकानाला भेट दिली, तर अतिशय सुंदर दिसणार्‍या लाकडांच्या वस्तूंची एक विशाल अशी श्रेणीच बघायला मिळते. यात स्वयंपाकघरातील कागदी रुमालांची गुंडाळी अडकविण्याचा स्टॅंडपासून, घरातले मोठे फर्निचर दिसते. या शिवाय बांधकामात वापरण्यात येणारे जमिनीवरची लाकडी टाइल्स, भिंतीसाठी मोठे तक्ते व दरवाजे हे असतातच. ही सर्व उत्पादने दिसण्यास अतिशय उत्कृष्ट, घरी अगदी जुजबी हत्यारे वापरून जुळणी करता येतील अशा किट स्वरूपात व अतिशय कमी किंमतीला उपलब्ध असतात.

फर्निचर उद्योगात झालेल्या या एका छोट्याश्या क्रांतीमुळे, ग्राहकांची ही उत्पादने वापरण्याची पद्धतच बदलत चालली आहे. पूर्वीचे आपल्या घरांच्यातले फर्निचर जर आपण आठवले तर एकतर ते अतिशय महाग असे आणि त्या कुटुंबाला त्या फर्निचरविषयी एक आत्मियता असे. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला ते सुपुर्त करण्यात येई. आताचे नवीन फर्निचर एक नवीन मंत्र घेऊनच येते. तो मंत्र म्हणजे, जोडा- वापरा- फेकून द्या. हे फर्निचर खूप दिवस टिकत नाही व फेकूनच द्यावे लागते. यामुळे जगभरची फर्निचरची मागणी सतत वाढते आहे. ग्राहकाच्या दृष्टीने तर ही एक पर्वणीच आहे. काळ आणि फॅशन यांच्यानुसार बदलणारे फर्निचर आणखी आणखी स्वस्त मिळते आहे. ते वापरायचे आणि नको असले की सरळ फेकून द्यायचे. मग यात तक्रार करण्याजोगे तरी काय आहे?

फक्त एक छोटीशी अडचण आहे. या आधुनिक फर्निचरची जगभरची मागणी सतत वाढत आहे. इ.स, 2006 मध्ये जगभरातले लाकडी फर्निचरचे उत्पादन US$ 270 बिलियन पर्यंत वाढले. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे मागची 10 वर्षे हे उत्पादन दरसाल 30% या गतीने वाढत आहे. जगभरच्या जंगलांच्या दृष्टीने ही फारच धोकादायक बाब आहे. या शिवाय पंधरा वीस वर्षांपूर्वी फर्निचर बनविण्यास उपयुक्त अशा साग, पाइन, अक्रोड आणि शिसम या प्रकारच्याच लाकडांना मागणी असे. आता MDF सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व प्रकारच्या लाकडाला मागणी आहे.

आता आपण चीन मधील यांगझी नदीच्या दक्षिण किनार्‍यावर असलेल्या ‘झांगजियागांग’ ( Zhangjiagang City) शहराचा एक फेरफटका करू. हे शहर ‘जिआंगसू’ ( Jiangsu Province) प्रांतात आहे व चीनमधल्या शांघाय, नानजिंग, सुझॉअ आणि वुशी सारख्या प्रमुख शहरांच्या जवळ आहे. या शहारात असलेल्या प्रक्रिया उद्योगाने मागच्या वर्षी US$12 बिलियन उलाढाल केली. यापैकी एक मोठा वाटा लाकडी वस्तू बनविणार्‍या कारखान्यांचा आहे कारण या शहराच्या आसपास लाकडी वस्तू बनविणारे असंख्य कारखाने आहेत. इ.स 2005 मधेच चिनी लाकडी वस्तू उद्योगाने US$51 बिलियन उलाढाल व US$13 बिलियन निर्यात हे पल्ले गाठले होते. त्यामुळे ‘झांगजियागांग’ मधील लाकूडवस्तू उद्योग हा एकूण चिनी लाकूड वस्तू उद्योगाचा मोठा भाग असल्याने आपल्या अभ्यासासाठी पुरेसा होईल.

झांगजियागांग शहराजवळ एक आधुनिक बंदर विकसित झाले आहे. या बंदरावरच्या सीमाशुल्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या आंकड्यांनुसार 2008 सालच्या पहिल्या सहा महिन्यात US$ 410 मिलियन किंमतीचे व 1.642 मिलियन घन मीटर एवढ्या संख्येचे लाकडी ओंडके चीनमधे फक्त या बंदरातून आयात केले गेले. ही सगळी आयात वैध स्वरूपाची असली पाहिजे हे स्पष्ट आहे. दुसर्‍या एका अहवालानुसार संपूर्ण चीनमधली लाकडी ओंडक्यांची आयात आता प्रतिवर्ष, 45 मिलियन घन मीटर्स या आंकड्यापर्यंत पोचली आहे. यातील बहुतेक सर्व आयात, गरीब विकसनशील देशांकडून, तोडलेले वृक्ष या स्वरूपातीलच आहे. या शिवाय लाकडी भुस्सा व लाकडाचे लहान तुकडेही (चिप्स) चीन मोठ्या प्रमाणात आयात करतो.

सर्वात खेदाची गोष्ट ही आहे की यापैकी बहुतेम ओंडके हे निर्यात करणार्‍या देशांच्या नकळत व कोणत्याही प्रकारचे सीमा शुल्क न भरता, किंबहुना चोरी केलेलेच, चीनमधे येतात. अर्थातच पर्यावरण टिकविण्याची कोणतीही काळजी या वृक्षतोडीमध्ये घेतली जात नाही. ब्राझिल, कंबोडिया, कॅमरून, कॉंगो-ब्राझव्हील, विषुववृत्तीय गिनी, गॅबन, इंडोनेशिया, ब्रम्हदेश, पापुआ न्यू गिनी आणि सॉलोमन बेटे या गरीब व विकसनशील देशांकडून चीनला होणारी ओंडक्यांची निर्यात कमीत कमी 80% ही चोरलेली व अवैध प्रकारची असते. मलेशिया व रशिया या देशांच्या निर्यातीत हे प्रमाण थोडे कमी म्हणजे 50% ते 60% आहे.

या आयातीची व्याप्ती आणि श्रेणी मी जेंव्हा बघितली तेंव्हा झांगजियागांग शहराजवळ मध्य असलेले एक नवीन पर्यावरणीय कृष्ण विवर मी बघतो आहे ही गोष्ट माझ्या ध्यानात आली. माझ्या मनात साहजिकच हा विचार आला की पृथ्वीच्या पाठीवरची हिरवी जंगले हे कृष्ण विवर किती दिवसात गिळंकृत करणार? या गतीने जर जंगले नष्ट होत असली तर ती काही फार दिवस टिकणार नाहीत हे एखादे लहान मूलही सांगू शकेल. असे म्हणतात की एक छायाचित्र हे हजार शब्दांच्या तोडीचे असते. जे कोणी वाचक अजूनही आशावादी असतील त्यांनी खाली दिलेल्या दुव्यांवरची छायाचित्रे जरूर बघावीत.

http://www.treehugger.com/files/2006/12/the_hidden_cost_2.php
http://www.flickr.com/photos/eia/2493443586/

दुर्दैवाने, सर्वच प्रगत राष्ट्रे जंगलांच्या या विध्वंसात महत्वाची भूमिका बजावत आहेत. स्वस्त लाकडी फर्निचरला या राष्ट्रांच्यात असलेली मागणी वाढतच आहे व ही मागणी चिनी फर्निचर उद्योगाला संजीवनीच बनत आहे. ही मागणी जोपर्यंत वाढत रहाणार तोपर्यंत चिनी फर्निचर उद्योगाची वाढ व विकास हा होतच रहाणार.

नॅशनल जिओग्राफिक मासिकातील एका अभ्यासाप्रमाणे ‘बोर्निओ’ या बेटावरचे निम्मे जंगल आतापर्यंत नष्ट झाले आहे आणि लाकडी ओंडक्यांचे उत्पादन करणारी ‘लो लॅन्ड’ जंगले 2010 पर्यंत नष्ट होतील. ब्राझिल, कंबोडिया, कॅमरून, कॉंगो-ब्राझव्हील, विषुववृत्तीय गिनी, गॅबन, इंडोनेशिया, ब्रम्हदेश, पापुआ न्यू गिनी आणि सॉलोमन बेटे या देशातील जंगलांची हीच अवस्था होण्यासाठी आडकाठी कसली आहे? असा प्रश्न जर कोणी विचारला? तर “कोणतीच नाही” हेच उत्तर असू शकते. पण हे केंव्हा घडेल? असे जर मला कोणी विचारले तर उत्तर देणे खरोखरच कठीण आहे कारण मला असे प्रामाणिकपणे वाटते की जर जंगलांचा विध्वंस याच गतीने होत राहिला तर ही गोष्ट आपल्याला वाटते आहे त्यापेक्षाही लवकर होईल.

कदाचित आपल्या सर्वांच्या आयुष्यकालात सुद्धा !
18 जून 2009

लेखनविषय: दुवे:

Comments

मांडणी फार छान आहे.

पर्यावरणविषयक दोनही लेख अतिशय परिणामकारक. मांडणी फार छान आहे. पुढे वाचायला आवडेल.

माझा असा समज होता की युरोप-अमेरिकेत मुद्दमहून वनशेती केली जाते आणि त्यामधून निघणार्‍या लाकडाचाच वापर तेथील बाजारात केला जातो. जर्मनीमध्ये अनेक डोगरांवर पद्धतशीरपणे केलेली वृक्षांची तोडणी दिसते तसेच काही ठिकाणी नवी लागवड सुद्धा दिसते. पण इथल्या वापराला तेवढे लाकूड पुरत नसणार असे दिसते.
--लिखाळ.

सहमत

अतिशय सुरेख मांडणी. मनोरंजक पद्धतीने फार छान माहिती दिली आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असेच म्हणतो

माहितीपूर्ण लेख वाचनीय आहेत.

हेच म्हणतो.

पर्यावरणाची कृष्ण विवरे या लेखमालेतील दोनही भाग खूप रोचक आहेत.

लेखमाला आवडते आहे.

खुमासदार शैलीतील

खुमासदार शैलीतील माहितीपूर्ण लेख... पुढील भागासाठी उत्सुक आहे

पण लाकडी फर्निचर न घेता इतर वस्तुंपासून बललेलं फर्निचर वापरलं तर पर्यावरणावर त्या फर्निचरच्या कच्च्या मालामुळे होणारे दुष्परिणाम आहेतच की. समजा एखादे धातुपासून बलनलेले फर्निचर वापरले तर ते खाणीतून काढणे, इतर प्रोसेसिंग करणे आदींवर जितकी वीज व पाणी/तेल नष्ट/खर्च होते (त्या कारखान्यांमुळे निर्माण होणारे विषारी/घातक वायु वेगळेच) त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी कमी हानीकारक निश्चितच नसावी..

तेव्हा पर्यावरणाची कमीतकमी हानी होण्यासाठी कशापासून बनलेले (टिकाऊ) फर्निचर वापरावे यावर कोणी प्रकाश टाकु शकेल का? [जर कोणी फर्निचर वापरू नका हा सल्ला देत असेल तर मला तो व्यवहार्य वाटत नाहि :) ]

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

लाकडी फर्निचर

लाकडाचे फर्निचर वापरू नका असा वेडगळ सल्ला कोणी देईल असे मला वाटत नाही. आणि दिला तर तो कोणी मानणारही नाही.
प्रश्न फक्त आहे किती झाडे आपण यासाठी नष्ट करावयाची? जर नष्ट केलेल्या झाडांइतकी नवीन झाडे आपण परत वाढवू शकलो तर काही अडचणच नाही. ते होत नाही हीच तर मूळ समस्या आहे.
चन्द्रशेखर

वेडगळ का?

लाकडाचे फर्निचर वापरू नका असा वेडगळ सल्ला कोणी देईल असे मला वाटत नाही. आणि दिला तर तो कोणी मानणारही नाही.

मला या सल्ल्यात काहि वेडगळ वाटत नाहि.. मात्र असा सल्ला देणार्‍याला तितकाच उत्तम पर्याय देता आला पाहिजे .. आणि जर तो पर्याय पर्यावरणाची कमी हानी करणार असेल तर तो ऐकून घ्यायच्या आधीच सल्ल्याला वेडगळ ठरविणे कितपत योग्य आहे?

जर नष्ट केलेल्या झाडांइतकी नवीन झाडे आपण परत वाढवू शकलो तर काही अडचणच नाही. ते होत नाही हीच तर मूळ समस्या आहे

याबद्दल सहमती आहेच

(वेडगळ)ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

लाकडाचे फर्निचर

लाकडाइतके सर्वोत्तम मटेरियल् कोणतेही नाही. त्याला पर्यायी असलेले धातू, प्लस्टिक्स या कशालाच् त्याची सर येणे शक्य नाही. त्यामुळे या वस्तूंचे केलेले फर्निचर लाकडापेक्षा कमी दर्जाचेच् होते.
चन्द्रशेखर

कबूल.. मात्र ..

लाकडाइतके सर्वोत्तम मटेरियल् कोणतेही नाही. त्याला पर्यायी असलेले धातू, प्लस्टिक्स या कशालाच् त्याची सर येणे शक्य नाही. त्यामुळे या वस्तूंचे केलेले फर्निचर लाकडापेक्षा कमी दर्जाचेच् होते.

कबुल!
मात्र लाकडाला केवळ धातू, प्लस्टिक्स इतकेच पर्याय आहेत याची मला खात्री नाहि. एखादा जर मला लाकडी फर्निचर वापरू नको म्हणत असेल तर त्याला पुर्वग्रहाने थेट वेडगळ सल्ला ठरवून उडवून न लावता त्याने सुचविलेला/ले पर्याय विचारात घेऊ इच्छितो इतकेच!

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

सुंदर लेख

सुंदर लेख,
विचार करायला लावणारा.

अजून येवू देत!
लाकडाचा अवैध व्यापार ही मोठी समस्य आहे पण त्या कडे लक्ष देण्यास मोठ्या आर्थिक सत्तांना अजिबात रस नाही. यात दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेचा बळी 'सध्या' जातो आहे. (भारताचा आणि आशियाचा या आधीच गेला आहे!)

आपला
गुंडोपंत

एम.डी.ऎफः

लाकडाला पर्याय

श्री. चंद्रशेखर यांनी आपल्या लेखात लिहलेल्या काही गोष्टी पटण्या सारख्या नाहीत.
(१) लाकूड व MDF यांची तुलना .
लाकूड MDF
MOE (N/mm2) 4800 -8800 2400-3200
MOR ( " " ) 40-90 30-35
लाकडाची ताकद ते कुठल्या झाडाचे त्यावर अवलंबून असते तसेच MDF मध्ये कोणते रेझिन बाइंडर म्हणून वापरले व किती वापरले त्यावर त्याची ताकद अवलंबून असते.पूर्वी सरस वापरत, नंतर UF,MF व आता Isocynates. ताकद बदलत जाते.व असे तक्ते इंप्रिग्नेट केले तर त्यांची ताकद लाकडापेक्षाही जास्त असू शकते. म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचा तक्ता तुम्हाला
मिळवता येतो. तेंव्हा MDF ची ताकद लाकडाच्या १/४,१/८ असते असे सर्वसाधारण नित्कर्ष काढणे योग्य नव्हे. आता कमी किंमतीत हलका माल मिळेल व चांगल्या वस्तूला जास्त पैसे मोजावे लागतील हे सर्व वस्तूंच्या बाबतीत दिसून येते. तेंव्हा स्वस्तातल्या टेबलाचा टिकावूपणा सागाच्या टेबलाएवढा नसणार हे आलेच.

(२) लाकडाच्या ओंडक्यापासून वस्तू करावयाची म्हणजे भुस्सा, बारीक तुकडे असे वाया जाणारे प्रकार आलेच. यांचे प्रमाण ३० ते ६० टक्के कितीही असू शकते. पूर्वी( शक्य असेल) तर जळण एव्हढाच उपयोग होता. आता त्यांपासून नवीन वस्तू होतात हे महत्वाचे. तेव्हडे लाकूड वाचलेच.शिवाय हल्ली असे बोर्ड करावयाला Agro waste म्हणजे गवत, तण,बारीक फांद्या,गव्हाचे-
तांदुळाचे तूस, उसाचे चोयटे सर्व काही वापरता येते.याचा मुख्य फायदा म्हणजे उद्या वन संपत्ती (झाडे) मिळेनाशी झाली तरी तुमच्या घरी फ़र्निचर असेल!

(३) स्वस्त मिळत असल्याने चांगल्या स्थितीतले फ़र्निचर फ़ेकले जाते. हा अमेरिकन लोकांचा रोग आहे. ते चांगल्या स्थितीतली गाडीही फ़ेकून देतात.या माजाला तूर्तास तरी इलाज दिसत नाही.

(४) या व अशा अनेक विनाशकारी विषयात चीनकडे विवर म्हणून बघणे सोडून द्या. खरा गुन्हेगार अमेरिकाच आहे. दर माणसी अमेरिकन माणूस किती उर्जा खर्च करतो हे पाहिल्यावर इतरत्र पहाण्याची गरजच नाही.

(५) भारतापुरते बोलावयाचे झाले तर recycling , मग ते धातूचे असो वा प्लास्टिकचे, हा प्रथम श्रेणीचा संशोधनाचा विषय व्हावयाला पाहिजे.

शरद

काहिसे अवांतर

शरदरावांशी सहमत!

बाकी रिसायकलिंगवरून काहिसे अवांतर आठवलं.. मागे आय आय टी तील विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक रिसायलिंगचा नाहि मात्र फेकून दिलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करण्यासंबंशी एक पेपर लिहिला होता.(त्यालाहि ४-५वर्षे झाली म्हणा आता) त्यानुसार ह्या पिशव्या रिसायकल करण्याऐवजी (पुन्हा पिशव्या बनविण्या ऐवजी.. कारण त्या प्रक्रीयेत खूप प्रदुषण होते असा दावा होता) रस्त्यांसाठीचे डांबर बनविताना काही प्रकारच्या (पातळ ते मध्यम) पिशव्या त्यात टाकल्यास डांबराचा दर्जा सुधारतो.. शिवाय काँक्रीटच्या दोन ब्लॉकना जोडताना साधे डांबर वापरले जाते ते काहि पावसाळ्यांनंतर निघते अथवा काहि रस्त्यांवर खूप अवजड वाहने जातात तिथे रस्त्याला खड्डे पडतातच.. तिथे जर आयटीवाल्यांनी सुचविलेले जाड प्लॅस्टिक वितळवून --> त्यावर काहि प्रक्रिया करून --> डांबरात मिसळले तर ते अत्यंत टिकाऊ अधेजिव्ह बनते व अजून एका प्रक्रियेने डांबर काहिसे लवचिक (इलास्टिक) बनते ज्याच्या लवचिकतेमुळे/तन्यतेमुळे अवजड वहाने त्याला न तोडता फक्त आकुंचन प्रसरण करवतात व रस्ता अधिक टिकतो..

अर्थात सरकारपक्षी ह्या पेपरची प्रसारमाध्यमांपुढे दखल घेतली गेली.. पुढे काय झालं कळलं नाहि

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

लाकूड व एम.डी.एफ

श्री शरद् यांच्या प्रतिसादाबद्दल आभार.
१. एम.ओ.आर व एम.ओ.इ चे आकडे मी यू.एस डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर यांच्या वूड हॅन्डबूकच्या प्रकरण ४ व १० मधून घेतलेले आहेत व ते असे आहेत
मटेरियल एम.ओ.आर( किलो पास्कल) एम.ओ.इ(किलोपास्कल)
सागाचे लाकूड ८० ते १००० १०००० ते १२०००
प्लायवूड २० ते ४८ ७००० ते १५०००
पार्टिकल बोर्ड ११ १७२५
एम्.डी.एफ २४ २४००

या आकड्यावरून मी १/४ व १/८ हे रेशो घेतले आहेत.
२. एम्.डी.एफ च्या उपयुक्ततेबद्दल काहीच विवाद नाही. त्याच्या कमी किंमतीच्या फर्निचर मुळे चंगळवादाला प्रोत्साहन मिळते आहे.

३. अमेरिका व इतर प्रगत् राष्ट्रे कृष्णविवराचे कारण असली तरी ते विवर चीन मधेच आहे
धन्यवाद
चन्द्रशेखर

माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद

माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद आवडीने वाचतो आहे.

 
^ वर