"गांधीगिरी"- दुसरी बाजू

"बापू सांगतात, 'हात उगारणे सोपे आहे; माफी मागणे त्यापेक्षा कितीतरी कठीण आहे.'" 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपट पाहून गांधीगिरीने भारावून गेलेले एक गृहस्थ भावुकपणे बोलत होते. मध्यंतरी या चित्रपटाने थोडी खळबळ माजवली होती. बाँबस्फोट खटल्यांत दोषी ठरलेल्या संजय दत्तला तेवढीच अनुकूल प्रसिद्धि.
थोडा विचार केला तर बापूंच्या तोंडचे वरील वाक्य हे संपूर्ण सत्य नसून अर्धसत्य आहे हे लक्षांत येईल. ते, ज्याला नेहमी हात उगारण्याची सवय आहे त्याच्याबाबतींत खरे आहे. पण ज्याला नेहमी पड खाऊन अन्याय सहन करीत राहायची खोड आहे त्याला माफी मागणे सोपे आहे. त्याच्यासाठी हात उगारणे तेवढेच कठीण आहे जेवढे हात उगारण्याची सवय असणार्‍याला माफी मागणे.
खरे तर जो वेळ पडल्यास हात उगारू शकतो त्याच्या माफी मागण्याला किंमत असते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर अहिंसा परिणामकारक ठरण्याची शक्यता तिचे पालन करणार्‍याच्या (वेळ पडल्यास) हिंसा करण्याच्या क्षमतेच्या प्रमाणांत असते.
गरज आहे ती सवय मोडण्याची व सारासार विचारशक्ति शाबूत ठेवून परिस्थितिनुसार "फुलांहून कोमल व वज्राहून कठोर" बनण्याची किमया आत्मसात करण्याची.
आपल्याला गांधीही हवेत व गीता सांगणारा श्रीकृष्णही हवा.
आपणांस काय वाटते?
(वरील लेख मनोगतवर टाकला होता पण तो अशा ठिकाणी प्रकाशित करण्यांत आला की बहुतेक वाचक व सदस्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. म्हणून येथे टाकला आहे. धन्यवाद.)

लेखनविषय: दुवे:

Comments

पटते

"खरे तर जो वेळ पडल्यास हात उगारू शकतो त्याच्या माफी मागण्याला किंमत असते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर अहिंसा परिणामकारक ठरण्याची शक्यता तिचे पालन करणार्‍याच्या (वेळ पडल्यास) हिंसा करण्याच्या क्षमतेच्या प्रमाणांत असते."
हे वाक्य १००% पटते.

सहमत

विवेचन सुरेख आहे. दुबळ्यांच्या दयेला काही अर्थ नसतो अशा अर्थाचे वाक्य वाचल्याचे आठवते.
राजेंद्र

हे पटले

आपल्याला गांधीही हवेत व गीता सांगणारा श्रीकृष्णही हवा. - हे एकदम बरोबर आहे

प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात. त्यामुळे कराल तसे विवेचन आहे. गांधी महान असतील. ते नाकारत नाहीच. पण म्हणून् गांधींची प्रत्येक गोष्ट बरोबर नाही. माझ्या मताच्या बाजुने बोलणारा मला नेहमीच बरोबर वाटतो. पण ते चुक वाटणारे सुद्धा तेवढेच असतील.

राग मानू नका. पण हा निसर्ग नियम आहे. गांधीजींचे अनुयायी अनेक असल्याने त्याचा गवगवा जास्त झाला इतकेच. अन अजुनही त्याचा वापर/गैरवापर होत आहेच.

वर्ज्य

श्री. शरदराव कोर्डे यांस,

आपले मुद्दे पटले.

गांधी हा विषय आम्हाला वर्ज्य असल्यामुळे आमचे मत आम्ही येथे देत नाही. क्षमस्व.

आपला,
(मूक) धोंडोपंत

(वरील लेख मनोगतवर टाकला होता पण तो अशा ठिकाणी प्रकाशित करण्यांत आला की बहुतेक वाचक व सदस्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. म्हणून येथे टाकला आहे. धन्यवाद.)

हे चांगले केलेत.

आम्ही मनोगताबद्दल काही मत व्यक्त करू इच्छित नाही. कारण व्यक्तिगत अनुभवातून तयार झालेली मते सार्वजनिक व्यासपीठावर मांडणे आम्ही आता कायमचे बंद केले आहे.

आमचे त्या व्यवस्थापनाशी काहीही मतभेद असले तरी मनोगताबद्दल आमच्या मनात जिव्हाळा आहेच.

मनोगताने माहितीजालावर मराठीभाषेसाठी केलेले कार्य महान आहे, हे वास्तव आहे. आणि आम्ही ही गोष्ट अनेक ठिकाणी मनोगत सोडल्यावरही कायम सांगत असतो, हे ही वास्तव आहे. असो.

पण तुमच्या उपक्रमावर हा लेख प्रकाशित करण्याच्या कृतीचे आम्ही स्वागत करतो.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

गांधी हेच सर्वात जास्त हिंसक होते

अहिंसा ही गांधी ची देण नसून गांधी आधी हजारो वर्षापुर्वी महात्मा महावीर व महात्मा बुध्द ह्यांची देण आहे, पण आधुनिक जगतामध्ये (१९०० नंतर आज पर्यंत) गांधी ह्यानी अहिंसेचे महत्व जगाला पटवून दिले हे कोणीच नाकारु शकत नाही पण षंढपणा व अहिंसा ह्यामधील नाजूक रेखा त्याच मानवाच्या लक्षात येते ज्याच्या अंगी बळ आहे हे जग मान्य आहे, काही जागी तुम्ही अहिंसेने उत्तर देउ शकत नाही हा जगाचा नियम आहे उदा. पाकिस्तान व आजकाल बांगलादेश !

बाकी मी गांधीगीरी ह्या शब्दाचा देखील विरोध करतो कारण वर दिलेच आहे.

गांधी ह्यानी खरे तर फक्त अहिंसेचा मार्ग स्वीकारला पण ह्याचे महत्व हिंदू समाजाला खुप पुर्वी पासुन माहीत होते.

दुसरी बाजू जे जे वाचन मी ईतिहास बद्द्ल केले आहे त्या नुसार गांधी हेच सर्वात जास्त हिंसक होते त्या काळी...... ( आठवा खिलापत चळवळ, भगतसिंग व राजगुरु ह्यांची फाशी, चलेजाव आंदोलन, पाकीस्तान साठी ५५ कोटी, जे हिंदू पाकीस्तानातून जीव वाचवून पळुन आले होते त्यांना दिल्लीच्या जामा मशीदी वरुन भाषणामध्ये दिलेला सल्ला ! )

राज जैन

गोंधळात टाकणारा प्रतिसाद

आपला प्रतिसाद थोडा गोंधळात् टाकणारा वाटला. 'सर्वात' म्हणजे कोण? (यात हिटलर ही आला काय? तोही तात्कालिकच होता असे वाटते.)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

गुरु गोविंदसिंग

गुरु गोविंदसिंग म्हणतात 'असमर्थावर हिंसेचा प्रयोग करणे चूक आहे, पण समर्थाचा अन्याय सहन करणे हे देखील तितकेच अक्षम्य आहे.'

बाकी माफी स्वतःच्या पटलेल्या चुकीबद्दल मागितली जाते. त्यामुळे 'हिंसा' व 'माफी' हे एकमेकांचे पर्याय नसल्याने या हून हे सोपे म्हणण्यात फारसा राम नाही. बापूंना 'चूक दडपण्यापेक्षा चूक कबूल करायला मोठी हिंमत लागते' असे काहिसे अपेक्षित असावे.

चित्रपटातील संवाद गांधींच्या शिकवणुकीवरून जसा च्या तसा उचलला आहे का? असल्याच तो संदर्भ सोडून तर वापरला गेला नाही ना? चित्रपटात यातील विचारांशी गांधीजी सहमत असतील/असतीलच असे नाही असा निर्वादक (घरगुती डिस्क्लेमर;)) आहे का?

दुर्बलांच्या 'क्षमेला' क्षमा म्हटलेच जात नाही असे वाटते. क्षमा करण्यासाठी 'क्षम'ता असावी हा अर्थ अभिप्रेतच आहे असे वाटते.

अहिंसा म्हणजे 'विरोध न करणे' नव्हे. गांधींचा 'वज्राहून कठोर' होण्यास विरोध होता हे पटत नाही. त्याचे उपोषण हे किती कठीण होते याची साक्ष इतिहासच देतो.

जाता जाता: 'माफी मागण्या'पेक्षा 'परवानगी मागणे' जास्त अवघड आहे असे वाचल्याचे स्मरते.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

माफी व परवानगी

जाता जाता: 'माफी मागण्या'पेक्षा 'परवानगी मागणे' जास्त अवघड आहे असे वाचल्याचे स्मरते.

'तो' यांस,
माझ्या वाचनांत "परवानगी मागण्यापेक्षा माफी मागणे चांगले" अशा अर्थाचे वाक्य आले आहे. यांत व्यावहारिक शहाणपणा असावा. परवानगी मागितल्यास ती मिळेलच याची खात्री नसल्यामुळे आपल्याला पाहिजे ते करता येईलच असे नाही. म्हणून आपल्याला हवे ते करून मोकळे व्हावे व जरूर पडल्यास माफी मागावी. केलेले पुसून टाकणे बहुतेक वेळा शक्य नसते.

क्षमा शोभती ...

येथे एक हिंदीतील सुभाषीत आठवलं ते देत आहे.
बाकी गांधी या विषयावर बोलण्यासारखं काही बाकी नाहीये.

क्षमा शोभती उस भुजंग को , जिसके पास गरल हो |
उसको क्या जो विषहीन, दंतविहीन ,विनीत सरल हो||

भुजंग - साप
गरल - विष

क्षमा ही त्याच सापाला शोभून दिसते ज्याच्या जवळ जहाल विष आहे.
ज्याच्याजवळ विष नाही, दात नाहित आणि जो सरळ(निरुपद्रवी) आहे त्याला नाही.

नीलकांत

दोन सुभाषिते

क्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति।
अतृणे पतितो वह्निः स्वयमेवोपशाम्यति॥

ज्याच्या हातात क्षमेचे शस्त्र आहे त्याचे दुर्जन काय वाकडे करू शकतो? गवत नसलेल्या जागी पडलेला विस्तव आपोआप विझून जातो.

क्षमा बलमशक्तानाम् शक्तानाम् भूषणम् क्षमा।
क्षमा वशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति।॥

क्षमा हे अशक्तांचे बल तर सशक्तांचे भूषण आहे, क्षमेने सर्व जगाला वश केले आहे. क्षमेने काय साध्य होत नाही?

स्रोत : सुभाषितानि ही संस्कृत अनुदिनी.

अर्थात हे आजच्या काळात कितपत लागू आहे (किंवा शंभरएक वर्षांपूर्वी कितपत लागू होते) याची शंकाच आहे.

सुंदर काव्यपंक्ती

काव्यपंक्तीतला ताल आणि अर्थ सुंदर आहे.

उत्तम

आपले विचार पटले
- विजय

कृष्णाचा अवतार

कृष्णाचा स्वातंत्रपूर्व कालीन अवतार हेच गांधीजी आहेत.
गांधींना नावे ठेवणे सहज साध्य आहे पण त्यांनी जी लाईफस्टाईल फॉलो केली होती ती करणे आपल्यापैकी कोणास जमणार आहे ?
कृष्णानेच गितेत म्हटले आहे की जेव्हा जेव्हा धरतीवर अधर्म होईल तेव्हा मी अवतार घेईन.
इंग्रजांनी भारतीयांवर केलेले अत्याचार हेच भारतीयांसाठी अधर्म व ह्या अधर्माचे निराकरण करण्यासाठी जन्मलेले गांधीजी हेच कृष्णाचा अवतार.

कृष्ण आणि गांधी

खरं तर मी या विषयावर (गांधींवर) लिहीने टाळतो. पण वरिल तुलना स्वस्थ बसु देई ना !

कृष्ण म्हणजे माझा आदर्श पुरुष. राम आणि कृष्णाची साधारणतः तुलना होत असते, येथे मात्र कृष्ण आणि गांधीची तुलना होतेय. कुणी कुणाशी तुलना करावी हे ज्याचे त्याचे मत, मात्र कुठेतरी काही तरी साम्य-भेद असावेत ना?

कृष्णाचे तत्व होते सत्याचा विजय , मग भलेही वेळ प्रसंगी हव्या त्या मार्गाचा अवलंब करायला हरकत नाही. त्याने साम, दाम, दंड, भेद आदी सर्व वापरले. कुटनिती वापरली मात्र जे ठरवले ते अगदी तसेच घडवून आणले. अनेक उदाहरणे देता येतील मात्र येथे विषयांतर होण्याची भिती आहे. एक मात्र नक्की कृष्णाला साध्य आणि साधन या विषयी संभ्रम नव्हता.

याच वेळी गांधीनी मात्र आपली जीवनशैली आणि आपली मते या बाबत खुप आग्रही मत प्रतिपादन केलेले दिसून येते. केवळ देश स्वातंत्र्य करने हे त्यांचे साध्य नव्हतेच मुळी अश्याच थाटात ते काम करित असत. त्यांना आणि काही कामे करायची असतीलही मात्र देश स्वतंत्र व्हावा अशी सार्‍या भारतियांची इच्छा होती. गांधींचीही होतीच मात्र ती त्यांना हव्या त्या मार्गानेच हवी होती.

अन्यथा १९२० सालचे असहकार आंदोलन ऐन भरात असतांना चौरूचौराच्या शुल्लक कारणावरून ते आंदोलन मागे घेतले गेले नसते. सगळ्या काँग्रेसचा विरोध असतांना आणि आंदोलन ऐन भरात असतांना ते आंदोलन मागे घेतल्या गेले. त्यानंतर १९३० पर्यंत भारतात मोठं आंदोलन झालेलं नव्हतं. कारंण काँग्रेसचे अध्यक्ष जरी दरवर्षी निवडल्या जात असत तरी गांधी नावाचं सत्ताबाह्य रिमोट कंट्रोल निर्माण झालेलं होतं तेच सगळा कारभार पाहत असत.

दुसर्‍या महायुध्दाच्या काळात जेव्हा सुभाषबाबू सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांना हीच वेळ आहे इंग्रजांविरुध्द उठाव करण्याची आणि आपलं स्वातंत्र्य मिळवण्याची असं पटवून देत होते तेव्हा गांधी मात्र , हा इंग्रजांशी केलेला विश्वासघात आहे असं म्हणून त्या काळात कुठलंही आंदोलन करायला नकार देत होते. असे अनेक उदाहरणे देता येतील की ज्यावरून गांधीना आपली मते, आपली मुल्ये ही आपल्या साध्या पेक्षा मोठी झालेली दिसून येतील.

मी येथे गांधीच्या विरोधात बोलतोय , म्हणजे मी गांधीचा द्वेश करतो असं मुळीच नाही. मात्र आंधळेपणाने त्यांना डोक्यावरही घेत नाही. गांधी अतिशय कसलेले नेते होते. एक मुरलेले राजकारणी, एक अनुभवी कुटनिती कार होते. त्याकाळात गांधीच्या एवढा लोकमान्यता आणि नेते मंडळीचीं मान्यता मिळालेला एकमेव नेता म्हणजे गांधी.

खरं तर नव्या भारतीय इतिहासात अखिल भारताचा पहिला नेता होण्याचं भाग्य आणि कर्तुत्व गांधींचं होतं.

मात्र देश आणि स्वातंत्र्य याबाबत त्यांची तंळमळ मला काही ठिकाणी प्रश्न विचारण्यास भाग पाडते. असो.

त्यांच्या जीवशैली बद्दल सरोजनी नायडू यांचे एक वाक्य प्रसिध्द आहे.
"यांना (गांधीना) गरिब ठेवण्यासाठी किती पैसा खर्च करावा लागतो हे आमचं आम्हाच ठाऊक."

नीलकांत

तुलना

कृष्णाचे तत्व होते सत्याचा विजय , मग भलेही वेळ प्रसंगी हव्या त्या मार्गाचा अवलंब करायला हरकत नाही. त्याने साम, दाम, दंड, भेद आदी सर्व वापरले. कुटनिती वापरली मात्र जे ठरवले ते अगदी तसेच घडवून आणले.

"फळाची अपेक्षा न करता कर्म करित राहा." असे इतरांना सांगणारा कृष्ण इच्छित फळासाठी वाट्टेल-ते करायला कसा धजला असेल?

असे अनेक उदाहरणे देता येतील की ज्यावरून गांधीना आपली मते, आपली मुल्ये ही आपल्या साध्या पेक्षा मोठी झालेली दिसून येतील.

"शेवट गोड ते सर्वच गोड" ला गांधींचा विरोध होता असे वरील वाक्यांवरून वाटले. हे हिंदू संस्कृतीला धरूनच आहे असे वाटते ज्यात 'कर्माला' अनन्यसाधारण महत्व आहे.

जाता जाता: ही तुलना संतोष पवार रचित यदाकदाचित (१) नाटकाच्या शेवटी केली गेल्याची पाहण्यात आहे. यातील संवाद कदाचित या साम्य/भेदावर अधिक प्रकाश टाकू शकतील.
अवांतर: महाभारत हा इतिहास नसून ते महाकाव्य आहे असे तो मानतो. अशी तुलना या ही कारणाने अयोग्यच आहे.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

अपेक्षा

"फळाची अपेक्षा न करता कर्म करित राहा." असे इतरांना सांगणारा कृष्ण इच्छित फळासाठी वाट्टेल-ते करायला कसा धजला असेल?

माझ्या मते फलाची अपेक्षा करू नका म्हणजे कर्म करताना फलाची अपेक्षाच कर्म करण्यात बाधा व्हायला नको. पण अर्थातच कुठलेही काम करताना त्याचे फल काय मिळेल याविषयी विचार करायलाच हवा. गीतेचे विशेष म्हणजे ह्या (आणि इतरही) बाबतीत प्रत्येकाचे विवेचन वेगळे आहे. (ओपन टू अदर इंटरप्रिटेशन्स)

पटले !!

थोडे उशिरा पण अभिनंदन !!

 
^ वर