आजचा आवाज

'आजचा आवाज' हे मराठी सारेगमप चे नवे पर्व आहे. आजचे आघाडीचे गायक घेउन सुरू झालेली ही स्पर्धा आता चांगलीच रंगत आहे. सुरुवातीला, लिट्ल चॅम्पशी तुलना आणि लहान मुलेच किती छान गात होती वगैरे ऐकायला मिळाले पण आता मात्र स्पर्धा रंगत आहे. तसा हा कार्यक्रम मला अतिशय आवडत असला तरी त्यातल्या दोन गोष्टी खटकतात.

१. पल्लवी जोशी साधे साधे मराठी शब्द इंग्रजीत का बोलते? आजकाल शहरांमधुन सगळेच असे मराठी बोलू लागले आहेत हे खरे आहे परंतू कार्यक्रमाचे सुत्रसंचालन म्हणजे काही घरी चाललेल्या किंवा कॉलेज कट्ट्यावरच्या गप्पा टप्पा नाहीत त्यामुळे अशी भाषा वापरणे मला अतिशय अयोग्य वाटते.

२. हृदयनाथ मंगेशकरांचे ह्या क्षेत्रातील प्रभुत्व आणि मनोरंजक किस्से ह्यामुळे कार्यक्रमात अधिक मजा येते हे जरी खरे असले तरी 'लता मंगेशकर' ह्या नावाचा चाललेला अतिरेक खटकतो. कधी कधी तर लता मंगेशकर हा जप इतका अविरत चालू असतो की ही सारेगमप आहे की मंगेशकर गौरवार्थ गायन कार्यक्रम आहे असा प्रश्न मला पडतो. एका भागात तर लता मंगेशकरांच्या वेण्या किती छान आहेत ह्यावर स्तुतीसुमने उधळली गेली. लता मंगेशकरांची प्रतिभा हे नक्कीच शंभर नंबरी सोनं आहे पण तरीही मॉ सरस्वतीचा चाललेला इतका उदो उदो तुम्हालाही खटकतो का?

जाता जाता: तुम्हाला ह्यातील कोणता गायक/गायिका सर्वात जास्त आवडतो हे ही जाणून घ्यायला आवडेल?

Comments

पटलं!

तुमचा पहिला मुद्दा मनापासून पटला. पल्लवी खूपच इंग्रजी शब्द वापरते, काहीही गरज नसताना. एका मराठी कार्यक्रमात तिचे असे बोलणे रसभंग करणारे वाटते. आशा करुया की प्रेक्षकांची ही भावना तिच्यापर्यंत पोचेल आणि ती तशी सुधारणा करेल!

हृदयनाथांचे बोलणे ऐकणे मनोरंजक आणि माहितीपूर्ण जरी असले तरी कधीकधी खूपच पाल्हाळ लावतात ते! हृदयनाथांच्या अशाच एका भाषणाला कंटाळून मी शेवटी IPL ची match लावली, २ ओव्हर बघून परत आलो तर अजून यांचे भाषण चालूच होते! :) (ही अतिशयोक्ती नाहीये!).

खरंय

हृदयनाथांचे बोलणे ऐकणे मनोरंजक आणि माहितीपूर्ण जरी असले तरी कधीकधी खूपच पाल्हाळ लावतात ते!

खरंय तुमचं. पंडितजींचे किस्से म्हणजे बर्‍याचदा चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला असं बर्‍याचदा होत असतं. भावसरगमच्या प्रेक्षकांना ह्याची सवय असते! :)

हिम्मत

चालायचेच!

मंगेशकर कुटुंबिय शक्य तो आधी फक्त स्वतःचे (च) कौतुक करतात.
अगदीच अशक्य झाले तर(च) इतर मंगेशकरांचे.

इतर स्पर्धक गायक, संगितकारांचे कौतुक सोडा, उल्लेखही केला जात नाही.

ही तर त्यांच्या गायकीच्या धंद्याची रीत आहे.
काय करणार?

आता आदिनाथाचे तरी कौतुक कमी आहे हे काय थोडके आहे?

पल्लवी, इतक्यात लंडनच्या पिक्याडली सर्कसवरूनच पडली असावी अशीच टॉक करते नाऊ अ डेज, यु नो!

आपला
गुंडोपंत

सहमत

दोन्ही मुद्द्यांशी सहमत आहे.

लता मंगेशकरांची प्रतिभा हे नक्कीच शंभर नंबरी सोनं आहे पण तरीही मॉ सरस्वतीचा चाललेला इतका उदो उदो तुम्हालाही खटकतो का?

खटकतो तर खरा पण क्षम्य वाटावा असही आहे.
प्रकाश घाटपांडे

छ्या!

घाटपांडे साहेब तुम्ही सुद्धा क्षम्य असे म्हणावे?

अरेरे...!
आता विवेकवादासाठी आम्ही पामरांनी कुठे बरे पाहावे?

आपला
गुंडोपंत

खटकतो

पल्लवी जोशींचे बोलणे आणि मंगेशकर फ्यामिलीचा उदो उदो खटकतो. महाराष्ट्रात मंगेशकर फ्यामिली आणि खळेकाका वगळता कोणीच चांगली गाणी केलेली नाहीत असा दाट गैरसमज होण्याची शक्यता या कार्यक्रमामुळे होऊ शकते.

या कार्यक्रमात माझी आवडती गायिका मधुरा दातार आहे. (विभावरी सुद्धा चांगली आहे... पुष्करही फार छान होता. पण) मी एसेमेस करताना मधुराच्या नावाने पाठवीन.

[गेले अनेक दिवस कार्यबाहुल्यामुळे कार्यक्रमाचे काही भाग पाहता आले नाहीत. सध्या स्पर्धेत कोण शिल्लक आहे? सुरेश वाडकरांच्या डोक्यावरुन हिंदीचे भूत घसरले की अजून तसेच आहे?]


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सध्या

सध्या स्पर्धेत रानडे, आपटे, दातार, नातू आणि परब हे शिल्लक आहेत आणि नुकत्याच झालेल्या कॉलबॅक भागातुन भेलांडे बाई आणि गोडबोले-पाठक बाईंनाही आत घेतले आहे.

वाडकरांचे हिंदीचे भूत अजूनही तसेच्य आहे.

अवांतर : वाडकरांची बोलायची शैलीच अशी आहे की कार्यक्रमापुर्वी/चालू असताना ते दोन पेग (किमान) लावून बसतात म्हणून असे बोलतात? मागे यूट्यूब वर कुठल्यातरी गाण्याखाली परिक्षकांची सोब्रायटी टेस्ट घेण्यात यावी अशी कमेंटही आली होती :)

ह्म्म्.. मलाही..

ओह थँक गॉड, अजुन कोणाला असं सेम वाटतंय! माझी नेहेमीची शंका आहे! इतकी वर्षं मराठी/हिंदी मधे काढून् या माणसाला साधी वाक्यं जुळवताना इतका त्रास का व्हावा? :|
मला मंगेशकरांचे बोलणे कधी कधी नको वाटते. ते त्यांचे आणि दिदींचे कौतुकही नको वाटते! गाणी जी त्या मंचावर सादर केली आहेत ती राहीली बाजूला आणि यांच्या आठवणीच् जास्त..
खूप लोकांचा हा खूप दुखरा हळवा वगैरे भाग आहे माहीतीय.. पण नेहेमी नेहेमीच असे बोर होते! तो गाण्याचा कार्यक्रम/स्पर्धा अजिबात वाटत नाही मग.. त्याबाबतीत मला देवकी पंडीत् आणि गुप्तेचीच जोडी आवडेल.. देवकी गाण्याविषयीही सिरीअसली बोलायची आणि अवधूत लाईव्हनेस टिकवायचा..

मधुरा दातार - नाद खुळा

गेल्या काही दिवसांत हुकलेले थोडे भाग पाहिले. मधुराने स्पर्धेत जोरदार मुसंडी मारली आहे असे दिसते. सलग ३ वेळा झकास गुण मिळाले. लवलव करी पातं तर एकदम छप्परतोडच म्हटले आहे. हसल्यावर इतकी छान दिसते म्हटल्यावर तिचं गाणं चांगलंच असणार.

आमचा इंटरन्याशनल यसयमयस तिलाच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मधुरावर अन्याय

मामा भाच्यांची जोडी आशाबाईंच्या गाण्यांना प्राधान्य देणाऱ्या मधुरावर फार अन्याय करत आहे असे वाटते. तिने फारच अप्रतिम गायले की आता चांगले म्हणावेच लागेल असे हतबल भाव चेहऱ्यावर आणून गुण देतात आणि बाकीच्या वेळी अनावश्यक आणि असंबद्ध टिप्पण्या करुन तिचा हिरमोड करण्याचा प्रयत्न करतात हे स्पष्ट कळून येते. माँ सरस्वतीची गाणी निवडणाऱ्या विभावरी-अमृता यांच्यावर मामा भाचे जास्तच मेहेरबान आहेत हेही कळते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मराठी कार्यक्रम

हे तुम्हाला कुठे आणि कसे दिसतात अमेरिकेत? ;-) बराच ढ प्रश्न आहे पण उत्तर मिळेल अशी अपेक्षा करते.

कदाचित

कदाचित इथे किंवा असे.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

सारेगमप इंटरनेटवर

यू ट्यूब वर या भल्या गृहस्थाने नियमितपणे सारेगमपचे सगळे भाग अपलोड केले आहेत.
"नक्षत्रांचे देणे"चेही अनेक कार्यक्रम त्यांनी अपलोड केले आहेत.
हे खातेही त्यांचेच आहे - पण सध्या ते निलंबित आहे.

बाकी - आमचे मत आपटे बाईंना!

अमित

यू ट्यूब

यू ट्यूब वर या भल्या गृहस्थाने नियमितपणे सारेगमपचे सगळे भाग अपलोड केले आहेत.

माझा स्रोत हा हाच युट्यूब वरील भला माणूस आहे.

इतर निरीक्षणे

मंगेशकरांचे किस्से रटाळ असतात हे खरेच. शिवाय तिथेही कंपूबाजी चाललेली असते असे आमचे निरीक्षण आहे.
खळेकाका / सलील चौधरी वगैरेंची गाणी कोणी गायली तर - "खळ्यांची सुंदर चाल आहे. " अशी माफक प्रतिक्रिया.
स्वतःचे गाणे गायले गेले तर "अतिशय अवघड गाणं आहे हे. तुम्ही बरं म्हटलंत. ज्ञानेश्वरांनी इथे ......." (१५ मिनिटे भाषण. )
पण बाबूजी / माणिक वर्मा / श्रीधर फडके किंवा इतर कंपूबाहेरील लोक यांचा नामोल्लेखही टाळला जातो. आणि हे वारंवार होत असल्याने योगायोग नसावा अशी शंका येते.

एकदा तर त्यांनी एक शेर सांगितला - तो कधी संपला आणि त्याचा अर्थ काय हे कुणालाच कळले नाही :))

वाडकर त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रतिक्रिया देतात. ("सरस्वती माँ" सोडून :) )

असो, तरी आम्हाला हा कार्यक्रम आवडतो! रानडे किंवा आपटे जिंकतील असे वाटते आहे.

अमित

सगळी निरिक्षणे मस्त...

"तुम्ही बरं म्हटलंत. ज्ञानेश्वरांनी इथे ......." (१५ मिनिटे भाषण. )
एकदा तर त्यांनी एक शेर सांगितला - तो कधी संपला आणि त्याचा अर्थ काय हे कुणालाच कळले नाही :))

ह.ह.पु.वा!!

पण बाबूजी / माणिक वर्मा / श्रीधर फडके किंवा इतर कंपूबाहेरील लोक यांचा नामोल्लेखही टाळला जातो.

पूर्ण सहमत!!

:)

कार्यक्रम बघणे सोडले आहे.
जाम बोअर होते

(गुळाची चव न समजणारा) ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

:))

कार्यक्रम बघणे सोडले आहे.

मी त्याहीपेक्षा बरी गोष्ट केली. प्रपंच, श्रीयुत गंगाधर टिपरे ह्या सारख्या मालिका संपल्यावर "झी मराठी" ला कायमचा राम राम ठोकला. त्यामुळे पल्लवी जोशीची भेसळलेली मराठी ऐकण्याचा दुर्धर प्रसंग माझ्यावर कधी आलाच नाही. :))

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय?“
“नाही महाराज."
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

“संतोष. परम संतोष."

हा हा

सहमत आहे. खरतर गाण्याचा कार्यक्रम पहायचा का? हा एक मोठा प्रश्न आहे. असे कार्यक्रम रेडिओवर व्हायला हवेत. गाणार्‍याचा आवाज आणि शब्द याला महत्व आहे तर ऐकणे योग्य आणि त्यासाठी रेडिओ योग्य. गाणे ऐकण्यासाठी, वेडीवाकडी तोंडे आणि एकमेकांचे लाडेलाडे कौतुक यामध्ये पाहण्यासारखे काय आहे?






कार्यक्रम

काही टाळता न येण्यासारख्या कारणांनी अलीकडे या कार्यक्रमाचे काही भाग बघावे लागले आणि हरहर शिवशिव असे काहीसे झाले. वाडकर कधीच आवडले नव्हते आणि आता तर ते असह्य झाले आहेत. पंडितजी कलप लावल्यापासून जरा बरे दिसतात का?
अवांतरः पल्लवी जोशीच्या इंग्रजीइतकाच मूळ चर्चाप्रस्तावातील 'सुत्रसंचालन' हा संकुचित लघु खटकला. मूळ प्रस्तावलेखक हे संपादन करतील का?
सन्जोप राव
"मूढांचे सम्राटपद मिरवतांना आम्हाला प्रज्ञावंतांच्या पंक्तीत स्थान नाही याचे शल्य सतत विद्ध करत असते. उत्तरनगरात चालणारी मीमांसा आमच्या आकलनाबाहेरची असली तरी तिथली आभा आम्हाला नित्य आकर्षित करत असते." - निशापती महाराज

संकुचित लघु

चर्चा प्रस्ताव संपादन करण्याची सोय प्रस्तावलेखकाला नसते. तस्मात मी मा.संपादकांना योग्य ते बदल करण्याची विनंती करतो. परंतु लेखनातील एक किरकोळ चूक पल्लवी जोशी ह्यांच्या इंग्रजाळलेल्या सूत्रसंचालाइतकी का खटकावी हे समजले नाही.

हे म्हणजे एखाद्या भुरट्या चोराला पकडून तुझे कृत्य कसाबच्या कृत्याइतकेच गंभीर आहे असे म्हणण्या सारखाच अतिरेक झाला. :)

:)

हे म्हणजे एखाद्या भुरट्या चोराला पकडून तुझे कृत्य कसाबच्या कृत्याइतकेच गंभीर आहे असे म्हणण्या सारखाच अतिरेक झाला. :)

हा हा हा :))

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका (प्रसंगी गंभीर दोष)

असे नाही

काढायचाच म्हटला तर प्रत्येक गोष्टीतून वाकडा अर्थ काढता येतो.
सुत्रसंचालन हे वाचताना खटकते. अर्थपूर्ण आणि महत्वाच्या अशा या चर्चाप्रस्तावात इतकी बारीकही चूक असू नये असे वाटल्याने केलेली ही सूचना. भुरटा चोर आणि कसाब ही तुलना हे प्रतिसाददात्याने घेतलेले स्वातंत्र्य.
सन्जोप राव
"मूढांचे सम्राटपद मिरवतांना आम्हाला प्रज्ञावंतांच्या पंक्तीत स्थान नाही याचे शल्य सतत विद्ध करत असते. उत्तरनगरात चालणारी मीमांसा आमच्या आकलनाबाहेरची असली तरी तिथली आभा आम्हाला नित्य आकर्षित करत असते." - निशापती महाराज

अँकरींग करताना इंग्लीश वर्डस्

पल्लवी जोशी अँकरींग करताना इंग्लीश वर्डस् वापरते हे मी नोटीस केले नव्हते. आता नेक्स्ट एपिसोडला पाहतो ;)

मंगेशकरांचे किस्से हा आधी ठरवून केलेला अविभाज्य घटक दिसतो. तीच तीच जुनी गाणी हे आता आकर्षण राहणार नाही तर त्या सोबत किस्से सांगितले तर लोकांचे रंजन होऊन टिआरपी साठी उपयोग होईल असा हेतू असावा. ते जे किस्से-माहिती देतात ती मी आधी ऐकलेली नाही. मी भावसरगम ऐकला नसल्याने तसे असेल. पण आता आता मलासुद्धा त्यांनी पटकन किस्सा सांगावा असे वाटायला लागले आहे.

सुरेश वाडकर बारकाईने ऐकतात तरी त्यांच्या सुचना देण्याची रटाळ पद्धत, उपमा शोधण्याची हौस अगदी कंटाळवाणी. त्यांनी केलेल्या कोठल्याही साध्या विनोदाला सर्वांनी भरपूर हसायचे असाही ठराव केलेला दिसतो :) त्यांचे मामासाहेबांची स्तुती आणि सरस्वतीमॉ हे अती कंटाळवाणे आहे.

हृषिकेश रानडे आणि विभावरी, मधुरा हे चांगले वाटतात.

-- लिखाळ
या प्रतिसादासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत :)

माझं मत..

हृदयनाथ मंगेशकरांचे ह्या क्षेत्रातील प्रभुत्व आणि मनोरंजक किस्से ह्यामुळे कार्यक्रमात अधिक मजा येते हे जरी खरे असले तरी 'लता मंगेशकर' ह्या नावाचा चाललेला अतिरेक खटकतो.

हम्म! प्रत्येकाची मतं!

लता मंगेशकरांची प्रतिभा हे नक्कीच शंभर नंबरी सोनं आहे पण तरीही मॉ सरस्वतीचा चाललेला इतका उदो उदो तुम्हालाही खटकतो का?

नाही, मला नाही खटकत.

धन्यवाद,

आपला,
(लताप्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर