माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग ४
माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य
भाग ४
नाडीवरील मराठीतील पहिले पुस्तक
ऑगस्ट 94च्या सुमारास माझ्या ऑफिसमधे एक नवा सहकारी स्क्वाड्रन लीडर रविशंकर म्हणून पोस्टींगवर आला. त्याच्या आधीचा स्क्वाड्रन लीडर गोविंदराजचा किस्सा ही अजब आहे. (स्क्वाड्रन लीडर गोविंदराजला काही कारणाने हवाईदलातील नोकरी सोडायची होती. खूप खटपट करूनही यश येत नव्हते. शिवाय त्याला संतान नव्हते याची खंत होती. माझ्या नाडी ग्रंथ भविष्यावरील बोलण्यातून त्याने नाडी ग्रंथ पाहिले. त्यात त्याला सांगण्यात आले होते की नोकरी सोडण्याची खटपट थांबव. शांतीदीक्षा कर. तुला पिता बनण्यची संधी मिळेल. पुढे काही वर्षांनी त्याचे मला आवर्जून लिहिलेले पत्र मिळाले. त्यात त्याने म्हटले होते, ‘सर मी नोकरी सोडायचा नाद सोडला आणि विशेष म्हणजे मला नुकतीच मुलगी झाली’. हे कळवण्यासाठी हे पत्र.) असो.
मधल्याकाळात मी एकटा ऑफिस सांभाळत होतो. त्यामुळे रजा घेण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र रविशंकर आल्याने सुटी घेण्याची आपापसात चर्चा झाली. ‘आत्ताच तु्म्ही सुटी घेतलीस तरी चालेल’ असे माझी लीव्ह सँक्शन करणाऱ्या कमांडिंग ऑफिसरने म्हटले. त्याच वेळी प्रॉव्हिडंड फंडातील काही रक्कम माझ्या हाती आली होती. असे होत - हातात मराठी लेखांची फाईल, २० हजार व १५ दिवसांची रजा असे जुळून आले. लगोलग एका पहाटे मी पुण्याच्या रेल्वेस्टेशनवर उतरलो. पाय टेकताच ही ट्रिप नाडी भविष्यासाठी असे म्हणून दगडू शेठ हलवाई गणपती मंदिरात लेखांची फाईल गणेशाच्या पायापाशी ठेवली व म्हणालो की यापुढे मी लेखक म्हणून नव्हे तर महर्षींच्या कार्याचा नोकर म्हणून या पुस्तकाकडे पाहीन.
नातेवाईकांकडे मुक्काम ठेवला. अप्पा बळवंत चौकातील एकेका प्रकाशकांच्या भेटीला लागलो. त्यांचा प्रतिसाद फारच निरुत्साहजनक होता. ते म्हणायचे, ‘लेखक म्हणून आपले नाव नाही. लेखनाचा विषय कोणाला परिचित नाही, शिवाय आपणाला हवे तसे पुस्तक मासिकाच्या क़िंवा साप्ताहिकाच्या आकारात काढायची प्रथा नाही. माफ करा’ असे म्हणून मला वाटेला लावले जायचे. काहींनी इतके करून पुस्तक छापायचेच असेल तर पदरचे पैसे घाला व छापा असे सुचवले. काहींनी पुस्तकाची किंमत ५०-६० रुपये पर्य़ंत जाईल. असे म्हटल्यावर मला निराश होण्याशिवाय पर्याय नव्हता. साधारण ६० पानाचे, साप्ताहिकाच्या आकाराचे, सामान्यांना विकत घेता य़ेईल अशा १०-१२ रुपयाच्या माफक किंमतीचे पुस्तक, तेही १५ दिवसात छापून तयार होणे शक्य नाही, नाहक प्रयत्न थांबवा. असा सल्ला प्रत्येकाने दिला. खूप फिरलो. शेवटी एकांनी टाळायचे म्हणून, ‘प्रभात, सकाळ मधे पहा ते अशी बाहेरची कामे करतात’ असा उपाय सांगितला. मी निराश. करता करता शेवटचा प्रयत्न म्हणून दै. सकाळला भेटावे असे वाटले.
मध्यरात्र उलटलेली. रात्रपाळीला येणाऱ्या एकांची मी वाट पहात थांबलो होतो. ते आले. चर्चा झाली. म्हणाले, ‘आम्ही करू’. उत्साह वाढला. मी एक हजार प्रतींच्या हिशोबाने बोलत होतो, कॅलक्युलेटरवर आकडेमोड झाली. ते म्हणाले, ‘१० हजार प्रतींना साधारण ६० हजार लागतील’. मी पटकन उठत म्हणालो. ‘शक्य नाही. मी फक्त एक हजार प्रतींच्या तयारीने आलो आहे’. ते म्हणाले. ‘अहो आमचे न्यूज पेपरचे प्रिंटिंगचे मशीन आहे. ते जरा जरी उशीरा बंद केले तरी शेकडो प्रती आपसूक छापल्या जातात. इतक्या कमी प्रती आम्ही छापू शकत नाही’.
‘बराय’ म्हणत मी उठलो. का कोणास ठाऊक ते म्हणाले, ‘एक हजार नाही पण पाच एक हजारपर्यंत मी खाली येईन. पहा विचार करून’ मनात गणित केले. तीस हजार रुपये म्हणजे आपल्या २० हजारात १० हजाराची भर हवी. इतके पैसे ताबडतोब उभारणे शक्य नव्हते. शिवाय पाच हजार प्रतींचे गठ्ठे नेणार कुठे? विकणार कसे? कोणाला? या साध्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. ‘जर जाहिराती मिळवता आल्या तर पहा. तेवढाच आपल्यावरील भार कमी होईल’. त्यांनी सुचवले.
जास्त विचार न करता, मी हो म्हणालो. १५ हजाराचा विसारा दिला. त्यांनी लगेच माझ्या लेखांची फाईल डीटीपी विभागात दिली. तेथे १०-१५ जण अविरत टायपिंगचे काम करणाऱ्यांच्या हातात ते कागद वाटले गेले. ‘उद्या ११ वाजता या. पहिल्या प्रूफ रीडिंगला’ असे सांगण्यात आले. दुसऱयादिवशी पोहोचलो तर ते सर्व कागद डीटीपी होऊन तयार होते. मी एका टेबलवर प्रूफ रीडींग करायला सुरवात केली.
नातेवाईक, मित्रांनी शब्द टाकला पटापट जाहिराती मिळत गेल्या. अनिल उपळेकरांनी पुस्तकाच्या लेआऊटचे काम हाती घेतले. मुखपृष्ठाचे काम त्यांच्या ओळखीने दिलिप इंगळेला दिले गेले. पुस्तकाचे नाव काय देणार? त्यांनी विचारले तोपर्यंत नावाचे नक्की झाले नव्हते. तो म्हणाला, ‘नाडी भविष्य’ टाकतो. “चक्राऊन टाकणारा चमत्कार” असे वर म्हणू या. म्हणजे चमत्काराला न मानणारे चवताळून उठतील! पहा मान्य होतय का ते? ’ मला विचार करायला वेळ नव्हता. ‘कर तुला वाटेल तसे’ म्हणून मी फिरून प्रूफरीडींगच्या कामात दंग होत असे. एकदा त्याने म्हटले, ‘डोक्यावर पेटी व हातात फिरकीचा तांब्या घेऊन शांतीदिक्षा करायला निघालेल्या धोतरवाल्या रेल्वेप्रवाश्याचे ‘खलील‘ कडुन एक कार्टून टाकू या का? जरा वाचकाला मनमोकळे वाटेल’. त्याप्रमाणे कार्टून तयार झाले. तिकडे पाने भराभर पॉझिटिव्ह केली जात होती. या दरम्यान मी संदेश एजन्सीच्या खऱ्यांना भेटलो. त्यांनी ‘अशी मासिकाच्या आकारातील पुस्तके आम्ही विकत नाही’ असा त्यांचा सूर धरला. मी अनोळखी. शिवाय विषय कोणालाच माहित नसलेला. पुस्तकची काही पाने वाचायला द्यायला देखील शिल्लक नव्हती. तरी ते म्हणाले, ‘मी उचलतो माल. खपली तर रक्कम पाठवीन चेकने’. मी आनंदाने मान्य केले.
चेन्नईहून पत्नी व मुले आवर्जून आली. आई व एक बहीण सांगलीहून आली. काका, पु. ना. ओकांना अध्यक्ष करून, पुस्तक तयार करण्यात हातभार लावणाऱ्या सर्व संबंधितांना गोळा करून, प्रकाशनाचा छोटेखानी कार्यक्रम ९ सप्टेंबर १९९४च्या गणेशचतुर्थीच्या संध्याकाळी आखला. आज दि ३-४ सप्टेंबर २००८ च्या गणेश चतुर्थीला हे लिहित असताना, १४ वर्षांचा काळ किती पटकन लोटल्याचे जाणवले. त्या दिवशी टेंपोने ४५०० प्रती संदेश एजन्सीच्या खऱ्यांनी उचलल्या. ५०० प्रती लेखक म्हणून मी बरोबर नेल्या. पत्रकार परिषद घेतली. नंतर वर्तमानपत्राच्या जगतातील एक एक गमतीजमती, छक्केपंजे कळून येऊ लागले.
पुस्तकाने खूपच भरारी मारली. कारण मला दोन महिन्यात पुस्तक विक्रीच्या रकमेचा ड्राफ्ट मिळाला. नंतर कळाले की कित्येकांनी ते पुस्तक विकत घेऊन त्याच्या झेरॉक्स प्रती लोकांना शेकड्यांनी वाटल्या. तांबरम किंवा अन्य नाडीकेंद्रात पुस्तक वाचून चेन्नईपर्यंत आलेले लोक त्यांच्याकडील हाताळून चोळामोळा झालेली प्रत दाखवत व म्हणत की आपल्यामुळे आम्ही इथे आलो. नाडी भविष्य असे काही असते याची माहिती मिळाली. आपल्याला आला तसा आम्हालाही अनुभव मिळाला. आपले आभार मानावे तितके थोडे आहेत. मी त्यांना म्हणत असे की आभार त्या महर्षीचे माना. ही सर्व त्यांच्या आशीर्वादाची करामत आहे. प्रेरणा त्यांनी दिली. मी फक्त लेखणी चालवली.
त्यानंतर या पुस्तकाचा तमिळ अनुवाद कसा अजब रितीने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला, तो किस्सा फारच और आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पट्टीवरील शोधकार्याने व त्यानंतर अनेक महर्षींच्या ना़डी पट्टीतून मिळालेल्या आदेशांमुळे माझ्यासारख्या सामान्य वकूबाच्या व्यक्तीकडून या पुस्तकांच्या मराठीतील पुढील आवृत्त्या, शिवाय प्रथम हिंदी व नंतर इंग्रजीतून या पुस्तकाची आपसूक झालेली निर्मिती, त्या निमित्ताने अनेक नामी व प्रज्ञावंतांची झालेली ओळख व मैत्री एक चमत्कारच मानली पाहिजे.
Comments
ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वरांच्या पट्टीवरील शोधकार्याने व त्यानंतर अनेक महर्षींच्या ना़डी पट्टीतून मिळालेल्या आदेशांमुळे माझ्यासारख्या सामान्य वकूबाच्या व्यक्तीकडून या पुस्तकांच्या मराठीतील पुढील आवृत्त्या, शिवाय प्रथम हिंदी व नंतर इंग्रजीतून या पुस्तकाची आपसूक झालेली निर्मिती, त्या निमित्ताने अनेक नामी व प्रज्ञावंतांची झालेली ओळख व मैत्री एक चमत्कारच मानली पाहिजे.
ज्ञानेश्वरांच्या पट्टीवर काय लिहिले आहे याची उत्सुकता लागली आहे. जन्मगाव तसेच समाधीस्थान कुठले? - आपेगाव की आळंदी, आयुष्य नेमके किती वर्षांचे? काही लोक ते देवगिरीच्या यादव राजांचे राजकवी होते असे मानतात. तसेच ज्ञानेश्वरीकार ज्ञानेश्वरांना निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ही भावंडे नव्हती तसेच त्यांनी २१ व्या वर्षी समाधी घेतली हे खरे नाही तर त्यांना दीर्घायुष्य लाभले , तसेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव हेच ग्रंथ खरे ज्ञानेश्वरांचे तर बाकी रचना दुसर्या ज्ञानेश्वरांच्या असे अनेक परस्परविरोधी समज प्रचलित आहेत म्हणून त्यांच्या पट्टीत काय लिहिले आहे हे शक्य असल्यास इथे लिहावे. पुस्तकात लिहिले असल्यास ते कसे विकत घ्यायचे (अमेरिकेतून) याबद्दल मार्गदर्शन करावे.
विनायक
प्रश्नाचे उत्तर ?
माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनहि मिळालेले नाहि
नाडीपट्टी आदेश देते का फक्त भविष्य सांगते?
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
ज्ञानेश्वर आणि नाडी भविष्य
नाडी ग्रंथांचा अभ्यास करा मग कळेल.
आपण यासाठी Naadi Predictions या इंग्रजी पुस्तकातील प्रकरण २० पहावे. गूगल बुक्सवर आपणांस या पुस्तकाचा परिचय व कसे प्राप्त करावे याचे मार्गदर्शन होईल. आपल्याला अपेक्षित उत्तरे कदाचित मिळणार नाहीत तरीही वाचायला काय हरकत आहे?
जरूर
जरूर! आपणास याचे उत्तर माहित नाहि असे दिसते. मी जरून अभ्यास करून तुम्हालाहि सांगतो.
मात्र कुठले ग्रंथ? लेखक, नाव, भाषा, किंमत कळेल का?
ह्या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी काहि अभ्यासक्रम / एखाद्या विद्यापिठात हा विषय आहे का? नसल्यास कोणती व्यक्ती ह्या ग्रंथाचा अभ्यास करून घेते?
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
ज्ञानेश्वर आणि नाडी भविष्य
नाडीग्रंथांचे वाचन करावे, त्यासाठी नाडी केंद्रांना भेट देणे आवश्यक आहे. इच्छा असेल तर पुढाकार घ्या. योग्य ते मार्गदर्शन माझ्याकडून मिळवता येईल.
घरीच मिळू शकतील का?
हे ग्रंथ बाहेर उपलब्ध का नाहित?
माझ्या व्यस्त कामामुळे मला नाडीकेंद्रात जाणे शक्य नाहि त्यामुळे हे ग्रंथ मला अभ्यासासाठी घरीच मिळू शकतील का?
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
अनुभव घ्यायला प्रत्यक्ष जावे लागेल
नाही. त्याचा अनुभव घ्यायला प्रत्यक्ष जावे लागेल. नाडी ग्रंथावरील माहितीची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यासाठी वर उल्लेख केलेली वेब साईट पहावी.
आदेश देते का भविष्य सांगते?
या छोट्याशा प्रश्नाच्या उत्तरासाठी मला अख्खा दिवस मोडणे कठिण दिसते आहे. तुमचे नाडीकेंद्रांवर वारंवार जाणे होत असेलतच. आपण नाडीकेंद्रांवर कोणालातरी विचारून या प्रश्नाचे उत्तर द्याल का? काहि दिवसांनंतर सवडीने दिले तरी चालेल
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
अनुभव घ्यायला प्रत्यक्ष जावे लागेल
प्रश्न आपल्याला पडलेला आहे. उत्तर आपण मिळवावे अणि मला कळवावे.
खोटे?
जर "नाडीतून आदेश मिळतो का भविष्य सांगितले जाते" या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित नाहि तर मग तुम्हि लेखात असे (खोटे?) का लिहिले आहे की मला आदेश मिळाला म्हणून?
ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्याच्या त्या प्राथमिक चुका
आपणाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मी आयते का द्यावे
मिस्टर, आपणाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मी आयते का द्यावे आणि मला खरे का खोटे ठरवायचे जागतिक हक्क आपणाला कोणी दिले?
कारण लेखक तुम्ही आहात
कारण मिस्टर, लेख तुम्ही लिहिला आहे. वाचकांना त्या अनुशंगाने पडलेल्या प्रश्नांना उत्तरे/संदर्भ द्यायचे नसतील तर उपक्रमासारख्या स्थळांवर लेख का बरे लिहावे? फक्त जाहिरात म्हणून? तुमचा फक्त जाहिरात हा उद्देश असावा असे मला वाटत नाहि.. तुम्हालाहि चर्चा करायची इच्छा आहे असे मला वाटाते. तेव्हा चर्चेपसून पळ न काढता लेखकाने लेखात जे लिहिले आहे त्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत ही अपेक्षा
मी कोणालाहि खोटे बोललेलो नाहि.. खोटे पुढील प्रश्नचिन्ह तुम्हि नजरेआड का बरे केले असावे?
ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्याच्या त्या प्राथमिक चुका
नाडी
नाडीपट्टी आदेश देते का फक्त भविष्य सांगते?
माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला असलेली माहिती सांगतो. नाडीपट्टी भविष्य सांगतेच आणि आवश्यक तेथे आदेशही देते. तुमच्या अत्यंत व्यस्त कारभारातून वेळ काढून जरी तुम्ही नाडीकेंद्रावर गेलात तरीही तुम्हाला त्याचा काहीही उपयोग नाही. कारण तुम्हाला जर तर्काची आवड असेल तर तुम्हाला स्वतःला नाडीपट्टी वाचता येणे आवश्यक आहे. (तुमचा नाडीवाचकावर विश्वास बसणे कठीणच दिसते! त्यामुळे स्वत: अनुभव घेणे आवश्यक आहे.)
सदर पट्टी ही कूटग्रंथ लिपीमध्ये लिहिलेली असते. ही लिपी ग्रंथ लिपीपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे मलादेखील वाचण्याची सवय थोड्या कष्टानेच झाली. एक नमूद करू इच्छीतो की मी स्वत: नाडीवाचक नाही, तुमच्यासारखाच एक तर्कप्रेमी आहे. (पेशाने वकील असणे म्हणजेच तर्कप्रेमी असणे असे माझे काही मित्र म्हणतात)
हैयो हैयैयो!
धन्यु!
धन्यु, हैयो हैयैयो!
असे साधे व नीट उत्तर प्रस्तूत लेखकाने आधीच दिले असते तर पुढील (वि)संवाद झालाच नसता.
पुन्हा एकदा आभार.
ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्याच्या त्या प्राथमिक चुका
प्रीव्ह्यूमध्ये २० वे प्रकरण नाही
आपण यासाठी Naadi Predictions या इंग्रजी पुस्तकातील प्रकरण २० पहावे. गूगल बुक्सवर आपणांस या पुस्तकाचा परिचय व कसे प्राप्त करावे याचे मार्गदर्शन होईल. आपल्याला अपेक्षित उत्तरे कदाचित मिळणार नाहीत तरीही वाचायला काय हरकत आहे?
गूगल बुक्सच्या प्रीव्ह्यू मध्ये ज्ञानेश्वरांवरील २० वे प्रकरण पान ११३ पासून सुरू होते आणि प्रीव्ह्यू १०५ या पानाशी संपतो. त्यामुळे वाचता आले नाही. आपण इंग्रजी पाने स्कॅन करून व्य. नि. ने पाठवाल का?
विनायक
ज्ञानेश्वर आणि नाडी भविष्य
जरूर. आपणांस इच्छा असेल तर <naadiguruonweb.org> वर माझ्या संदर्भातील पानांवर आणखी अन्य माहिती मिळेल. संत ज्ञानेश्वरांवरील प्रकरण तेथेही उपलब्ध नाही.
मराठीतही ते सध्या नेटवर उपलब्ध नाही. हिंदीतील 'ना़ड़ी ग्रंथ भविष्य - चौंकादेनेवाला चमत्कार' या पुस्तकात कदाचित असेल तर पहावे. मीही शोधतो. कारण माझ्या नकळत ही पुस्तके साईटवर टाकली गेली आहेत.
नाडी ग्रंथांचा भांडाफोड
नाडीग्रंथांच्या खरेपणावर शोधकार्य करण्यास उत्सुक सभासदासाठी
सोबतचा फोटो तमिळ जाणकारांकडून वाचून घ्यावा व त्यांचे मत कळवावे.
हे कूटतमिळ् लिपीमध्ये சசிகாந்த் (शशिकांत) असे लिहिले आहे.
हे कूटतमिळ् लिपीमध्ये சசிகாந்த் (शशिकांत) असे लिहिले आहे.
ச = श
சி = शि
கா = का
ந் = इन्
த் = इत्
சசிகாந்த் = शशिकांत
हैयो हैयैयो!
हैयोहैयैयो यांच्या प्रात्यक्षिकासह दिलेल्या प्रतिक्रियेचे स्वागत
प्रिय मित्र हो,
आज हैयोहैयैयो यांच्या प्रात्यक्षिकासह दिलेल्या प्रतिक्रियेचे मी स्वागत करतो. कारण आत्तापर्यंत काही व्यक्तिगत निरोप सोडता अन्य सदस्यांकडून फक्त कुत्सित टीका-टिपणी व दुर्लक्ष करून अनेकदा नाडी भविष्यला हिणवले गेले.
आता निदान एका मराठी व तमिळ जाणकाराकडून स्वतंत्ररित्या वरील फोटोतील नावाच्या मजकूराची शहानिशा केली गेली आहे.
'नाडीच्या ताडपट्ट्यात नावे वगैरे काहीही लिहिलेले नसते. आपल्याकडून माहिती काढून तीच माहिती ताडपट्यातून मिळवून सांगत असल्याचा बहाणा केला जातो' असा सर्व सामान्य आक्षेप घेऊन ज्या व्यक्ती व संस्था नाडी भविष्य थोतांड आहे दावा करतात. त्यांच्या हैयो हैयैयो यांच्या प्रतिसादावर काय प्रतिक्रिया आहेत?
खालील तऱ्हेची प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे.
हैयै हैयैयो या एकांनी जरा प्रतिसाद काय दिला ओकांना! (कदाचित ते ओकांसारखे नाडी केंद्रवाल्यांचे पित्ते असण्याचा संभव नाकारता येत नाही!) पण म्हणून अजून तमिळतज्ञ लोकांनी कुठे दिलाय तसा निर्वाळा? आणि जरी तसा निर्वाळा भविष्य काळात तज्ञांनी दिला की नाडीताडपट्यात विवक्षित व्यक्तीबाबतचा मजकूर भविष्यकथन असतो. तरी आमची मते फक्त तर्क व मतप्रणालीला बांधली गेली असल्याने आम्ही व्यक्तिशः व संस्थांतर्गत नाडी भविष्याच्या सत्यतेला मानू इच्छित नाही व मानण्याची गरजही नाही!
लिहित राहावे आणि एक प्रश्न
नमस्कार, आपला व्य. नी मिळाला. आपल्या लेखाच्या निमित्ताने होणार्या टीका टीपण्या नाडीपट्टी विषयाकडे पाहण्याच्या दृष्टीवर अवलंबून आहेत. भविष्यावर तर हजारोवर्षापासून भली बुरी चर्चा होत आहे. मुहूर्त,शकुन,योग, पुण्यकाळ, आणि भविष्यावर विसंबून असणारे जसे अनेक आहेत तसे त्या विषयालाही नावे ठेवणारे अनेक आहेत. वयक्तीक माझे म्हणाल तर मला भविष्याचे कुतूहल जरुर आहे, पण विश्वासाचा अभाव आहे. नाडीपट्ट्यातून् भविष्याचे कथन होते की तर्क करता येते या पेक्षा या विषयातील काही अनुभव वाचायला मिळतात म्हणून तरी आपली लेखमाला मला वाचायला आवडते तेव्हा लिहित राहा....!
आम्ही आमच्या तुकोबांचे फॅन आहोत् ते म्हणतात-
विठ्ठलाचे नाम घ्यावें ! पुढे पाऊल टाकावें ||
अवघा मुहुर्त शकून | र्हदयी विठ्ठलाचें ध्यान ||
ऐसा पाहिजे हा योग | लाभा उणें काय मग ||
तुका म्हणे हरिच्या दासा |शुभ काळ सर्व दिशा ||
तेव्हा खरा प्रगतीचा मार्ग आम्हाला हाच वाटतो.तेव्हा पुन्हा एकदा आपणास लिहितो की, तरिही आपण आपल्या विषयाचे विवेचन करावे, आमच्या नसेल पण नाडीपट्टीवरील लेखन कोणाच्या तरी उपयोगाचे नक्कीच असेल असे वाटते.
अवांतर : आपण नाडीपट्टीवरुन'उपक्रमवर' या व्यासपीठावर उपक्रमींचे काही भविष्य कथन करु शकता का ? मी हे गंभीरपणे लिहिले आहे.
मार्गदर्शन करू शकेन
आपण नाडीपट्टीवरुन'उपक्रमवर' या व्यासपीठावर उपक्रमींचे काही भविष्य कथन करु शकता का ? मी हे गंभीरपणे लिहिले आहे.
उत्तर - मी कोणाचेच नाडीपट्टीवरून भविष्य कथन करत नाही.कारण माझा त्या विद्येचा अभ्यास नाही. फक्त नाडी ग्रंथांची ओळख सामान्यांना व्हावी यासाठी लेखन करतो. ज्या उपक्रमींना आपले नाडी ग्रंथभविष्य पहावे असे वाटत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क केला तर त्यांना मी हवे ते मार्गदर्शन करू शकेन.