माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग १

माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य
भाग १

लेखक – विंग कमांडर (नि) शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१०४९.
(‘हवाईदलातील माझ्या आठवणी व किस्से’ या आत्मकथनातील काही अंश)मी काही लेखक नाही. भारतीय हवाई दलातील कार्यकालात ललित लेखन करायला तसा वाव मिळत नाही. तरीही काही ना काही कारणाने माझ्या हातून लेखन घडत गेले. मागे वळून पाहताना हे सर्व मीच लिहिले का? असा प्रश्न कधी कधी पडतो. त्या माझ्या लिखाणासंबंधी काही किस्से, हकिकती यांची नोंद करणे हा या लिखाणाचा हेतू आहे.

अनेकदा मला विचारले जाते, ‘काहो तुम्हाला तुमच्या नाडी भविष्यात पुस्तके लिहिणार असे लिहिले होते का’ ? त्यावर माझे उत्तर ‘नाही’ असे आहे. अगदी ओझरता देखील उल्लेख कोणी नाडी महर्षींनी केला नव्हता! हे असे कसे काय? असा प्रश्न वाचकांना स्वाभाविकपणे पडेल!
मी नाडी ग्रंथ भविष्याशी कसा जोडला गेलो? जानेवारी १९९४ च्या सुमाराला, तेंव्हा माझी बदली चेन्नई (मद्रास) पासून ३० किमी लांब तांबरम या उनगरात झाली होती. त्या आधी प्रथम पत्नी छायाच्या अपघाती निधनानंतर, १९७६ साली नोव्हेंबर महिन्यात, माझ्या मेव्हणा - अविनाश रानडे - व मी लॅमिंग्टन रोडवरील छायाशास्त्री बाबूभाई जोशींच्या भृगु संहितेचा अनुभव घ्यायला गेलो होतो. (त्यावेळी घडलेला किस्सा माझ्या नाडी भविष्य – चक्राऊन टाकणारा चमत्कार आवृती क्र १ - या नेहा प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तकात वाचायला मिळेल.)
त्यानंतर पुन्हा अशा भविष्य कथनाच्या वाटेला जाण्याचा योग आला नव्हता. एकदा संतोष ओक यांच्या पुण्यातील ऑफिसमधे गप्पा मारत असताना, (माझे चुलत काका व थोर इतिहास तज्ज्ञ स्व. पुरुषोत्तम नागेश ओक - ज्यांचा ‘ताजमहाल’ हे प्राचीन शिवमंदिर आहे असे पुराव्यानिशी प्रस्थापित करणारा सिद्धांत प्रसिद्ध आहे.- संतोष त्यांचे चिरंजीव) तेथे आलेल्या सौ. ज्योती सातपुतेंनी ‘मी कांचिपुरमला जाणार आहे’ असे सहज म्हटले. त्यावर मी चे्टेने म्हटले, ‘आत पुण्यात साड्याची दुकाने काय कमी पडली? म्हणून तुम्ही कांचिपुरमला साड्याखरेदीस जाणार? कारण माझ्या लेखी कांचिपुरम हे साड्यांसाठीच प्रसिद्ध असल्याने अन्य काय काम असणार? असा माझ्या बोलण्याचा रोख होता. ‘मी नाडी ग्रंथ भविष्य बघायला जाणार आहे’. असे म्हणून नाडी ग्रंथ भविष्याचा विषय निघाला.
त्यानंतर त्या आपल्या आई व बहिणी समावेत मद्रासला आल्या त्यावेळी त्यांचे यजमान ब्रिगेडियर ओटीएच्या पासिंग आऊट परेडसाठी हजर झाले होते. त्यांच्या समावेत मला पहिला नाडी ग्रंथ भविष्याचा पहिला अनुभव मिळाला. तोपर्यंत माझी तांबरमच्या नाडी केंद्राची तोंड ओळख झाली होती. त्या केंद्रातील वरिष्ठ नाडी वाचक श्री. शिव षण्मुगम (सध्या त्यांचे पुणे व नवी दिल्लीत नाडी केंद्रे आहेत.) त्यानी त्या दिवशी ५-६ जणांच्या नाडी पट्ट्या शोधल्या. त्यातल्या एका पट्टीचे वैशिष्ठ्य असे होते की पहिल्या बंडलातील पहिलीच पट्टी होती ज्या पट्टीमधे त्या व्यक्तीचे वर्णन एकदम फिट्ट जुळले होते. शोधायला दुसरी पट्टी वाचायची गरजच पडली नाही. अशा तऱ्हेने पहिल्या पट्टीतच भविष्य सापडावे हे ‘लाखोत एक’ घडते असे म्हटले गेले. कदाचित पुढील काळात या भविष्य पद्धतीचा जारीने अभ्यास करायला उद्युक्त करायला ही पट्टी देखील कारणीभूत झाली असावी!
सुरवातीला माझे, मग पत्नी, आई, बहिणींचे, त्या नंतर मग अन्य नातलगांचे असे करत नाडी ग्रंथ भविष्याच्या शोधाचे वर्तूळ वाढत गेले. या बाबतचा रस अधिकाधिक वाढत गेला. आमच्या क्वार्टरपासून तांबरम नाडी केंद्र ४ किमीवरील असल्याने मला वरचेवर भेटी द्यायला सहज जमले. सुरवातीला या कामात काही काळे- बेरे असावे अशा सर्वसामान्यांना वाटणाऱ्या शंका मलाही भरपूर आल्या, त्या प्रत्येक संशयाचे निराकरण करायला बऱ्याचदा मी माझ्या तमिळ मित्रांना त्या केंद्रात कसून शोध घ्यायला नेत असे. कधी त्यांना नाडी केंद्रात बाहेर आपली वेळ येण्यासाठी बसलेल्या गिऱ्हाईकाला गंडवून काही माहिती काढायला केंद्रातर्फे कोणाला घुसवून बसवलेले असते का? कधी कोणाला नाडी वाचकांवर लक्ष ठेवायला तर कधी खोली बाहेर कोणी त्या नाडीकेंद्राचा माणूस माहिती गोळा करण्याच्यामिशाने फिरतो का? कोऊरांनी केलेल्या आरोपाप्रमाणे खरोखरच नाडीकेंद्रातील काही लोक एका खोलीत बसून ग्राहकाकडून विविध मार्गानी मिळवलेली माहिती, त्याचे नाडी ग्रंथ भविष्य काही कोऱ्या पट्ट्यावर ऐन वेळेवर कोरुन लिहून ती नवी बनवून तयार केलेली ताडपट्टी नाडी वाचकाच्या हातात लपवून-छपवून देतो का? माझ्या तमिळ मित्रांना येण्या-जाण्याला देखील ते केंद्र सोईचे होते. शिवाय अशा हेरगिरीसदृष्य शोधकामात त्यांना फार स्वारस्य वाटे व मी त्यांना सहभागी करून घेतो याचा अभिमान ही वाटे.
रोज संध्याकाळी प्रश्नांची एक यादीच बरोबर घेउन मी केंद्रात पोहोचत असे. नाही नाही त्या शंका काढून मी अनेक केंद्रांच्या असंख्य फेऱ्या मारत असे. तमिळ लिखाणाची खात्री करून घेण्यासाठी तमिळ मित्रांना बरोबर नेत असे. उदा. पट्टीत खरोखरच भविष्य लिहिलेले असते का? नावाची शहानिशा केली का? शांती दीक्षा कांडात खरोखरच उपाय करताना पैशांचा उल्लेख असतो का? अन्य देशीय, धर्मीयांच्या पट्या तपासल्या का? यांच्या पट्ट्यात त्यांची नावे कशी लिहिलेली असतात? त्यांना कोठे शांती-दिक्षा करायला सांगितले जाते? अनेक प्रश्न विचारून हो-नाही करण्यापेक्षा सरळ पट्टीतील व्यक्तींची नावे वाचून पट्या का शोधल्या जात नाहीत? त्यामुळे नाडी केंद्रांवर आपणाकडून माहिती काढून तीच परत आपणांला पट्टीतून सांगितली जात आहे असा बहाणा करत असल्याचा संशयवजा आरोप केला जातो याची कारणे शोधली.
मद्रास विद्यापीठाच्या, कोन्नमेरा आदि पुस्तकालयांना भेटी दिल्या. अड्यार येथील थिऑसॉफिकल सोसायटीच्या पुस्तकालयाचा सभासद झालो. हे सर्व करत असताना मी कधी कधी त्या तमिळमित्रांना म्हणे, ‘हे काम तुम्हा तमिळांनी करायचे आहे’! असो.
शेवटी सर्व प्रश्नांची समाधानपूर्वक उत्तरे मिळाली. फोटो मिळवून त्यातून हवाईदलाव्यतिरिक्त अनेक तमिळ जाणकारांकडून पट्टीतील मजकूर वाचून ग्राहकाला दिल्याजाणाऱ्या ४० पानी वहीत तोच मजकूर लिहून दिलेला असतो. असा निर्वाळा मिळाल्यावर सकृतदर्शनी काही खोटारडेपणा नाही. अशी पूर्ण खात्री झाली तेंव्हाच हे महान भविष्य कथन खरोखरीच अनेक प्राचीन महर्षींच्या दिव्यदृष्टीचा चमत्कार आहे असा निःसंशय निर्वाळा दिला. माझा नकारात्मक दृष्टीकोनाकडून सकारात्मक विचाराकडे झालेला प्रवास एका अर्थाने अदभूत म्हणावा लागेल. कारण महर्षी कोणी माझे काका-मामा लागत नव्हते की नाडीकेंद्राचा मी मिंधा नव्हतो. नाडी खरोखरच सर्व बनवाबनवी आहे असे माझ्या शोधकामात दिसते असते तर मी तसे मानले असते. नव्हे आज ही मोकळेपणाने मान्य करायला मी तयार आहे. कारण माझा दृष्टीकोन सुरुवातीपासून एकांगी नव्हता व आजही नाही. याच भूमिकेतून मी डॉ. जयंत नारळीकरांना प्रत्यक्ष भेटून नाडी ग्रंथ भविष्य पुस्तकाची प्रत सप्रेम भेट दिली होती व या नाडी ग्रंथ भविष्याचे आपल्यातर्फे शोधकार्य करण्याला आवाहन केले होते. त्यांना त्यानंतर या कामाचा पाठपुरावा करणारी ५ पत्रे ही पाठवली गेली. (तो सर्व पत्रव्यवहार पुढे ’बोध अंधश्रद्धेचा’ या पुस्तकात सविस्तरपणे वाचायला मिळेल) आज माझ्यावर मी नाडी ग्रंथ भविष्याचा व नाडीकेंद्राचा प्रवक्ता आहे किंवा त्यांनी तयार केलेला पित्त्या असावा किंवा आहे असा खोडसाळ आरोप आकसाने वा वैचारिक बांधिलकीमुळे केला जातो.
असे शंकेखोर मला तांबरमच्या हवाईकेंद्रातही भेटले.

एक होता मराठी मित्र. त्याचे सासूसासरे त्याच्याकडे आपल्या मुलीच्या बाळंतपणासाठी आहे होते. कधी कधी गप्पा मारायला ते आमच्याकडे येत. नाडीचा विषय निघाला. माझे अनुभव ऐकून ते भारावले. नंतर काही दिवसांनी परत भेटले. तेंव्हा म्हणाले, ‘माझा अजिबात विश्वास नाही असल्या गोष्टींवर. पण तुम्ही एवढे संगितले म्हणून परिक्षा घेतली. सुरवातीला वाटले की तुमचे व नाडीवाल्यांचे साटेलोटे असले पाहिजे. पण जेंव्हा त्या पट्टीतून माझ्या पत्नीचे बोलवायचे सोडून खरे नाव नाव आले तेंव्हा माझी खात्री झाली की ओकांचा या नाडीवाल्यांशी काही एक संबंध नाही’. मतपरिवर्तन झाल्याने त्यांनी नंतर माझ्या काही लेखांचे आपणहून हिंदीत अनुवादाचे काम ‘महर्षींची तेवढीच सेवा’ म्हणून केले. त्यांचे जावईबापू मात्र तरीही अजून नाडी भविष्याला बकवास मानते होते. सासरेबुवांचा अनुभव मानायला तयार नव्हते. ‘सर, जब मुझे बच्चा होगा तब मैं आपके युंडू-गुंडू महर्षींयों को ऐसे छकाऊंगा. मैं अपने बच्चे का नाम इस तरह रखूंगा के आपके नाडीवाले - ढूँढते रह जाएंगे’. (त्याकाळात सर्फच्या जाहिरातीत असावरी जोशीच्यामुखी डाग-धब्याबाबत अशी पंच लाईन बरीच गाजली होती.) अशी त्याची त्यावेळी प्रतिज्ञा होती. मध्यंतरीच्या काळात त्याची नाडीपट्टी सापडली. ‘मुलगी होईल’ असे भाकित खरे आले. त्याने म्हटल्याप्रमाणे मुलीचे नाव खूप खटपटीकरून, शोधाशोध करून मुलीचे नाव ईशिता ठेवले. त्या काळात हे महाशय स्कूटरवरून घसरून पडले नि हात फ्रॅक्चर करून बसले. ‘तुला अपघात होण्याची शक्यता आहे सांभाळून राहा’ असे अगस्त्य महर्षींचे कथन खरे आले. तेंव्हापासून ‘सब झूट है’ असे हिरिरीने म्हणणारा माझा मित्र नाडी भविष्याचे इतके गुणगान करू लागला. ज्याला त्याला म्हणू लागला, ‘तांबरम की पोस्टींग में नाडी भविष्य जरूर देख के आना’. नंतर काही वर्षांनी श्रीनगरच्या पोस्टींगमधे आमची परत भेट झाली. तेंव्हा त्याने ठेवलेले मुलीचे नाव नाडी पट्टीत येते का ते, ती १४-१५ वर्षांची मोठी झाल्यावर जरूर पाहणार असा त्याचा निर्धार होता.
‘सुखवर्षारानी’ इतके लांबलचक, किंवा ‘मे शूई’ सारखे चिनी, ‘तो मे ऊ इवाजावा, जोबु ए मात्सु’, ‘नोरिहितो ओकाडा’ अशी जपानी, ‘स्टेलामेरी, झुबैदाबेगम’ अशी परधर्मियांची नावे जर जशीच्या तशी पट्टीत लिहून येत असतील तर त्याच्या मुलीचे जे नाव आहे ते तो पाहील तेंव्हा येणारच अशी त्याचीही आता खात्री झाली आहे. असो.
दुसरी एक व्यक्ती होती विंग कमांडर गोविंदची पत्नी - अनुराधाजी, 'नाडीवाडी सब बकवास है।' असे सुरवातीला म्हणणारी नंतर तिचे मत पालटले. मग तिच्या सांगण्यामुळे अर्धे तांबरम एयर फोर्स स्टेशन नाडी भविष्य पाहून आले असावे !

या संदर्भात नाडी ग्रंथ भविष्य पाहिले की तमिळ भाषेत संबंधित पट्टीवरील मजकूर लिहिलेल्या ४० पानी वही आणि कॅसेटची पारायणे केली. नातेवाईकांना वाचायला सोईचे व्हावे यासाठी त्यातील मजकूर प्रत्येक कॅसेट मधील इंग्रजीतील भविष्य कथन थांबत थांबत ऐकत मी ते मराठीत भाषांतरित करत असे. कालांतराने त्याची एक जाडसर फाईल बनली. एकादा पुण्याच्या एका ट्रिपमधे साप्ताहिक सह्याद्रीच्या कार्यालयात माझी अरुण ताम्हनकरांशी गाठ पडली. प्रथम भेटीत ट्यूनिंग जमले. मी हवाईदलातील असल्याचे ऐकून त्या नोकरीतील रंजक किस्से-कहाण्या लिहा असा सल्ला त्यांनी दिला. नोकरीत असताना परवानगी शिवाय लिहिता येणार नाही पण हे पहा नाविन्यपूर्ण आहे असे म्हणून माझ्या हातात त्यावेळी चुकुन असलेली नाडी ग्रंथ भविष्य कथनाची फाईल त्यांना मी दाखवली त्यांनी चाळून, ‘मला लेख द्या मी छापतो’, असा प्रस्ताव मांडला. पुढे तो लेख छापून आला. नंतर असे मी लेख लिहित गेलो. आश्चर्य असे की पहिल्या लेखानंतर पुढील एकही लेख सा.सह्याद्रीमधून छापून आला नाही त्याचे एक कारण अरुण ताम्हनकरांचे अकाली निधन असावे. असो.
पुढे ते सर्व लेख नाडी भविष्य – चक्राऊन टाकणारा चमत्कार या नावाने नेहा प्रकाशनतर्फे कसे प्रकाशित झाले त्याचे सविस्तर वर्णन नंतर येईल.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

आपले लेखन मस्तच आहे. अजून वाचायला आवडेल.
नाडे भविष्यावर आमचे घाटपांडे साहेब अगदी टपून बसलेले असतात. त्यांच्या लेखी हा भंपकपणा आहे. आणि असे काही घडत नसते वगैरे वगैरे .

आपलाही प्रवास याच 'नसते' विचारातून - नाडी भविष्य 'असते' विचाराकडे झाला आहे हे वाचून आनंद वाटला.

या केंद्राची अजून संपर्क विषयक माहिती येथे देता येईल काय?

आपला
गुंडोपंत

बघतो मी ही जरा पडताळून

प्रस्थापितांनी मान्य केलेल्या गोष्टी मी आजवर कित्येक वेळा बिनदिक्कत "बाबा वाक्यं प्रमाणम्" करत आलोय.
हे जरा वेगळे प्रकरण आहे. बघतो परीक्षा नाडीवाल्यांची. अंगठ्याशिवाय काहिही न देणे, किंवा एकाच नाडीकेंद्राच्या दोन शाखेतुन सारखेच भविष्य येत आहे ना वगेरे पडताळून पाहतो, किंवा सुचल्यास अजुन काही (घाटपांडे आदी प्रभृतींनी केलेल्या लिखाणाची मदत होईल कदाचित). म्हणजे निदान माझी तरी खात्री पटेल. (फार फार तर १००० एक रुपये अक्कलखाती जमा होतील.)
अन् भविष्य जाणुन घेण्याची आणि जे सांगितलंय त्याला खोटे ठरविण्याची इच्छा आहे.
जमत असेल तर द्या पाहु दोन पत्ते. मुंबई पुण्यातले द्या. तसदी बद्दल माफी असावी. पण तुम्ही देताल असे वाटले आणि बाकी उपक्रमीही काही उपक्रम करू इच्छित असतील तर त्यांनाही मदत होईल.

अरेरे

मग तिच्या सांगण्यामुळे अर्धे तांबरम एयर फोर्स स्टेशन नाडी भविष्य पाहून आले असावे

अरेरे!!! आपले सैन्याधिकारी आपले निर्णय या नाड्या बघुन घेत नसतील म्हणजे मिळवले.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

हा हा हा!!

अरेरे!!! आपले सैन्याधिकारी आपले निर्णय या नाड्या बघुन घेत नसतील म्हणजे मिळवले.

हा हा हा!!
हा टोला सहीच टाकलास तु ऋश्या! अर्थात त्यांनी वैयक्तिक निर्णय घेण्यास तुझी ना नसावी. हिरव्यागार युनिफॉर्म खाली ती पण माणसेच आहेत बरं. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.

तसेही अधिकार्‍यांचे माहिती नाही आणि ते असे निर्णय घेत असतील असे दिसतही नाही, पण राजकारणी मात्र नक्कीच घेतात यात शंका नाही!
आणि आपले परराष्ट्र धोरण पाहिले तर ते अगदी उठून (बसून, झोपून कसेही!) दिसण्यासारखे आहे!

युद्धाचे म्हणशील तर आजवर भारतीय जवान उत्कृष्ठच आहेत असे मी मानेन!
त्यातही भारत हरलेले एकमेव युद्ध म्हणजे चीन. पण त्यावेळी चूक जवानांची नव्हती - त्यावेळी नेहरू आणि कृष्णा मेनन आपल्या नाड्या मॉस्कोहून तपासून घेत होते!

आपला
नाडीपंत
आवांतर: हा तुझा टोला तितकासा योग्यही वाटत नाही. तू काम संपवून घरी आल्यावर, तुला, काय करतोस हे विचारण्याचा हक्क तुझ्या कंपनीला नाही. आणि मग तू चतुर्थीला अथर्वशीर्ष का म्हणतोस? ते स्तूतीपर काव्य तू म्हणतोस म्हणजे तू पण वरिष्ठांची स्तूती करून काम काढत असणार, असे म्हंटले तर?

बरोबर, मात्र ...

हा तुझा टोला तितकासा योग्यही वाटत नाही. तू काम संपवून घरी आल्यावर, तुला, काय करतोस हे विचारण्याचा हक्क तुझ्या कंपनीला नाही.

बरोबर, मात्र जर मी माझे कंपनीतील निर्णय मी एखाद्या कंपनीबाह्य व्यक्ती / स्त्रोतावर आधारीत माहितीमधून घेत असेन व त्यामुळे कंपनीवर परिणाम होणार असेल तर कंपनीला विचारायचा हक्क आहेच.
माझे वाक्य "आपले सैन्याधिकारी आपले निर्णय या नाड्या बघुन घेत नसतील म्हणजे मिळवले." असे आहे
माझा आक्षेप सैन्याधिकार्‍यांनी नाड्या बघणे याला नसून त्यांनी त्यांचे निर्णय - जे पर्यायाने देशाला तारक/मारक आहेत -अश्या नाड्या बघून घेऊ नयेत अशी "अपेक्षा" व्यक्त केली आहे. (अर्थातच माझ्या प्रतिक्रीयेतून ते आपले निर्णय तसे घेतात असा माझा दावा असल्याचे दिसत नाहि)

एखाद्याच्या वैयक्तीक निर्णयांचा जर माझ्यावर परिणाम होणार असेल तर तो होऊ नये अशी जाहिर अपेक्षा बाळगण्यात काय अयोग्य?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

एक शंका

मी जर एखादा ठसा फॅक्स ने पाठवला किंवा कागदावर घेऊन पोष्टाने पाठवला तर मला नाडी मिळेल काय?
(मी हाताच्या १० बोटांच्या ठश्याव्यतीरिक्त काहीही माहिती देणार नाही.)

चमत्कार!

तेंव्हाच हे महान भविष्य कथन खरोखरीच अनेक प्राचीन महर्षींच्या दिव्यदृष्टीचा चमत्कार आहे असा निःसंशय निर्वाळा दिला.
एकविसाव्या शतकाच्या उबंरठ्यावर असताना तरी या जगात चमत्कार घडत नाहीत हे मान्य करायला हवे. घटनेमागील नैसर्गिक कार्य-कारणभाव कळत नसल्यास वा हातचलाखी लक्षात येत नसल्यास चमत्कारांची भलावण केली जात असते. समाजातील अभिजन अशा गोष्टींचे उदात्तीकरण करू लागतात. सामान्य लोक अभिजनांचे अनुकरण करत असल्यामुळे फसवेगिरी करणार्‍यांचे फावते व पुणे, दिल्लीसारख्या ठिकाणी शाखा काढून ठाण मांडून धंदा करू लागतात. मग आपण यालाच प्राचीन महर्षींच्या दिव्यदृष्टीचा चमत्कार असे म्हणू लागतो.सारासार विचार, विवेक बुद्धी, तर्क, प्रयोग, सांख्यिकीय अंदाज व विश्लेषण, सामान्य ज्ञान (common sense) इत्यादींच्या सहाय्याने अशा चमत्कारांची भांडाफोड करणे सहज शक्य आहे. परंतु त्यासाठी हेकेखोरपणा सोडून देण्याची गरज आहे. यापेक्षा जास्त भाष्य करण्याची गरज नाही.

गरज?

यापेक्षा जास्त भाष्य करण्याची गरज नाही.

'यापेक्षा जास्त भाष्य करण्याची इच्छा नाही ' हे अधिक योग्य वाटत.
प्रकाश घाटपांडे

सहमत्!

प्रभाकरांशी सहमत आहे!

ऋषिकेशची भावना ही पोहोचली, विंग कमांडर लोकही असा विचार् करत् असतील् असे वाटले नव्हते. असो! (कदाचीत गुंडोपंत म्हणतात् त्याप्रमाणे ती ही माणसेच, पण आम्ही मात्र त्यांना माणसांपे़शा काही जास्तच समजत् होतो!)

 
^ वर