कोकण प्रवास

माझे कोकणात पूर्वी बरेचदा येणे जाणे असल्याने प्रवासाच्या दृष्टिने माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्या इथे नमुद करू इच्छिते.

१) कोकण रेल्वे - हिचे नाव बदलून गोवा - मंगळूर रेल्वे करायला हरकत नाही. कारण गाड्यांना कोकणात थांबे कमी. बर्‍याच स्थानकांवर गाड्या थांबत नाही. काही ठिकाणी तर किमान राजापुर सारख्या महत्त्वांच्या स्थानकांवर तरी ही रेल्वे थांबवावी म्हणून लोकांना आंदोलने करावी लागली. मुख्य महसूल गोवा आणि पुढच्या भागातील स्थानकांवर उतरणार्‍या प्रवाशांकडून. २) एकच रुळ असल्या कारणाने लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य. बरेचदा गाड्यांच्या वेळापत्रकात गडबड झाली की लहान अंतरावर जाणार्‍या गाड्यांना बाजूला ठेऊन लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुढे काढले जाते. ३) भुसभुशीत जमीन पोतामुळे दरडी कोसळणे, रुळावरून गाडी घसरणे इ. प्रकार घडतात (विशेषत: पावसाळ्यात). ४) बरीचशी स्थानके मूळ गावापासून बरीच लांब. त्यामुळे रेल्वे तिकिट दर कमी असले तरी पुढे रिक्षाने त्याच्या २-३ पट पैसे टाकून आपल्या गावाला जाणे म्हणजे पैशाचा अपव्यव तर होतोच पण रिक्षा मिळाली नाही तर टेम्पो वैगरेने किमान महामार्गाने तरी कसबसे यावे लागते. मगच पुढचे वाहन मिळू शकते. उदा. आमच्या गावाला जर जायचे असेल तर आडवली ह्या स्थानकावर (इथे कोकण रेल्वेच्या काही मोजक्याच गाड्या थांबतात) उतरून (रु. १००) रिक्षाने किंवा टेम्पोने लांज्यापर्यंत (रु. १००) आणि मग एस्टीने किंवा ती मिळाली नाही तर पुन्हा स्थानिक रिक्षाने (रु. १००) गावापर्यंत पोहोचावे लागते. ५) सुट्ट्यांच्या दिवसात आरक्षण मिळणे कठिण. आरक्षण असले तरी बरेचदा गाडीत इतकी प्रचंड गर्दी असते की जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. असो.

दुसरा पर्याय खुष्कीच्या मार्गाचा - बरेच जण स्वत:च्या वाहनाने कोकणात जातात. मात्र सार्वजनिक वाहतुकीने जायचे असेल तर एस्टीने जाणे सर्वाधिक सुरक्षित. कारण प्रशिक्षित चालक आणि बस पंक्चर (मराठी?) झाली तर तातडीने जवळपासच्या आगारातून दुसर्‍या बसची सोय केली जाते. तिसरे महत्त्वाचे म्हणजे चालकांना दारू पिण्यास मनाई आहे. तसेच एस्टी ठरल्या वेळेला निघते. प्रवासी (सीटा) भरेपर्यंत खोळंबा करत नाही. तसेच एस्टिचे जाळे सर्वदूर पसरले आहे. एका ठिकाणी गेले कि
दुसर्‍या ठिकाणी जावयाची एस्टी संबद्ध (Connected) एस्टी त्याच आगारात मिळू शकते. आम्ही आजही कोकणात जाताना लाल रंगाच्या / एशियाड एस्टीने जाणे पसंद करतो. पण चांगल्या स्वच्छतागृहांचा अभाव हे मात्र एस्टी प्रवास टाळण्यास कारणीभूत ठरू शकते.

कोकणात खाजगी ट्रॅव्हलर्सच्या व्होल्व्हो वाहतुकीने जाणे हे मात्र एक दिव्य आहे. १) गाड्या बेदम हाणणे. वेगाची ऐशी तैशी. १ दिवसात एकच वाहन चालक एकाच गाडीला सहज ६००-७०० कि.मी.चा प्रवास घडवतो. २) अशिक्षित चालक ३) व्यसनी चालक ४) बसमधील प्रत्येक सीट भरेपर्यंत जागोजागी गाडी थांबवणे. ५) नंतर वाट्टेल तशी गाडी हाणून वेळेची भरपाई करणे. ६) गाड्या केवळ महागड्या धाब्यांवरच थांबवणे जिथे अनेकदा जेवण शिळे, बेचव असते किंवा उपलब्ध नसते. ७) अपघात झाला तर प्रवाश्यांसाठी विमा संरक्षण नसणे. ८) क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे. ९) प्रवाश्यांशी दादागिरी / पैशावरून भांडणे. १०) ह्या खाजगी गाड्या अनेकदा भंगारातून सेकंडहँड घेतलेल्या असतात. त्यांची पुरेशी देखभाल केलेली नसते. ११) टुकार मराठी चित्रपट भसाड्या आवाजात लावणे.

तिसरा मुद्दा येतो तो महामार्ग १७ वरील रस्त्यांची स्थिती आणि वाहतुक खोळंबा (Traffic Jam) ह्यांचा.

सध्या कोकणातील मुख्य रस्ते नारायणकृपेने चांगले झाले आहेत. मात्र अनेक ठिकाणी ते रुंदीला कमी आहेत. वडखळ नाका वैगरे अशी ठिकाणे आहेत जिथे हमखास वाहतुक खोळंबा होतोच होतो. तसेच घाटात अशिक्षित चालकांमुळे / डुलकी लागल्यामुळे होणारे अपघात, खाजगी वाहतुकदारांच्या बेफाम गाड्या हाकण्यामुळे होणारे अपघात, पावसाळ्यात रस्ते निसरडे झाल्याने अपघात अश्या अनेक कारणामुळे अनेकदा प्रवास ५-६ तास विलंबाने होतो. जो प्रवास एर्‍हवी ८ तासांत होतो त्याला कधीकधी १४-१६ तास सुद्धा लागतात. तसेच पावसाळ्यात कित्येकदा पूर येतात. प्रवास अधिकच अवघड ठरतो.

ह्या सर्व गोष्टींना चांगला पर्याय हा जलवाहातुकीचा ठरू शकतो. कोकणातील मुख्य बंदरांचा सर्वांगीण विकास करणे त्यासाठी महत्त्वाचे ठरेल. १) गाळ काढणे २) व्यावसायिक जेट्टी बांधणे ३) संबद्ध वाहतुकीचा योग्य पर्याय ठेवणे. उदा. गेटवेला अलिबाग तिकिट काढले तर रेवस पर्यंत बोटीने प्रवास करावा लागतो आणि तिच बोट कंपनी पुढे त्याच तिकिटात अलिबाग पर्यंत आपल्या बसने लगेच नेऊन सोडते. ४) वेगवेगळ्या प्रकारची वाहतुक उपलब्ध करणे उदा. सामान्य, जलद, ऐषो-आरामी इ. तसेच वेगवेगळ्या प्रवासी आणि पर्यटन योजना जाहीर करणे. ५) व्यापारी वाहतुकीसाठी गोद्या बांधणे.

ह्या पर्यायामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल ह्यात शंका नाही मात्र त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी. (क्रमश:)

लेखनविषय: दुवे:

Comments

तरीही भुरळ घालणारे कोकण

सृष्टीलावण्या यांनी कोकण पर्यटनातल्या नेमक्या अडचणींवर बोट ठेवतांनाच सध्या कोकणप्रवासाचे उपलब्ध असलेले सर्वात योग्य साधनही सुचवले आहे. कोकणात फिरतांना येणा-या या अडचणीं कोकणी माणसाला नित्याच्याच असल्याने त्यांचे दूःख समजू शकतो. पण पून्हा म्हणावेसे वाटते कोकण कितीही दूर्गम व अडचणीचे असो. ते मनाला भुरळ घालून जाते. हे निरागस निसर्गसौंदर्य आपण सर्वांनीच जिवापाड जपायला हवे.

जलवाहतुक

कोकणप्रवासाचे उपलब्ध असलेले सर्वात योग्य साधनही सुचवले आहे.

जलवाहतुक सुचविण्याचे कारण की कोकणप्रान्त हा किनारपट्टीवर आहे. खरे तर कोकण रेल्वे हा एक अद्भूत प्रयोग होता आणि त्यापाठी अवाढव्य परिश्रम सुद्धा होते हे मान्य केले तरी कोकण रेल्वेच्या ऐवजी जल वाहतुकीचा पर्याय आर्थिक व भौगोलिक दृष्ट्या अधिक चांगला होता असे मला वाटते. अर्थात तज्ज्ञ-मते ह्याहून वेगळी असू शकतात.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

कोकणात लवकर र्येउन जा

ह्या पर्यायामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल ह्यात शंका नाही मात्र त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी.
---------
स्वर्गिय बरिस्टर नाथ पै, कुसुमताई अभ्यन्कर , मधु दन्डवते, काही प्रमाणात सुरेश प्रभु सोडता अन्य कोकणातिल राजकरण्यानी कमरेचे सोडून डोक्याला गुन्डाळले आहे. आमचे नेते म्हणावेत अशी कुणालाही लाज वाटावी अशी .

कोकणाचा येत्या काही वर्षात येउ घातलेल्या उर्जा प्रकल्पा मुळे , आमची पुढची पिढी कोकणात राहील असे म्हणणे धाडसाचे होइल. तरी सर्व वाचकाना नम्र विनन्ती आहे की त्यानी सर्व वहातुकीच्या साधनान्ची गैरसोय स्विकारून एकदा तरि आयुष्यात कोकणात येउन जावे व त्याची नोन्द कुठेतरि लिहुन ठेवावी म्हणजे तुमची पुढिल पिढी तुमच्या नाकर्ते पणा बद्दल नक्कीच धिक्कार करील

धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्‍या दुष्‍कृत्‍यांपेक्षा सज्‍जनांची निष्क्रीयता जास्‍त भयावह

मी आपली तळमळ समजू शकते.

त्याची नोन्द कुठेतरि लिहुन ठेवावी म्हणजे तुमची पुढिल पिढी तुमच्या नाकर्ते पणा बद्दल नक्कीच धिक्कार करील

रायकरकाका, जेव्हापासून कृपाशंकर सिंह यांनी कोकणात ८०,००० एकर (देव करो आणि हा आकडा खोटा ठरो) जागा घेतल्याचे कळले आहे तेव्हा पासून मनाला टोचणी लागलेली आहे. कोकणात भविष्यात काय बघावे लागेल ह्याची कल्पनाच करवत नाही.

असो. मला जर विचाराल तर कोकणात जायच्या कल्पनेनेच मला इतका आनंद होतो की प्रवासाचा त्रास वै. काही होत नाही आणि लाल एस्टी तर मला प्राणप्रिय आहे. स्वस्त पण मस्त.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

उत्तम विवेचन

सर्व प्रकारांचे उत्तम विवेचन. पुर्वी मुंबई ते रत्नागिरी प्रवासी वाहतुक बोटीने होती असे ऐकले आहे. आता प्रवासी जलवाहतुक उपेक्षित का झाली? क्रमशः असल्याने पुढील भागात विवेचन येईल अशी अपेक्षा आहे.
प्रकाश घाटपांडे

कारणे

आता प्रवासी जलवाहतुक उपेक्षित का झाली?

१) केवळ मोठ्या महत्त्वाच्या बंदरांमधून दळण वळण. कोकणात महत्त्वाच्या बंदरांवर उतरले तर इतर ठिकाणी जायला संबद्ध वाहतुक सेवा नाही. २) जुन्या काळच्या बोटींच्या मंदगतीमुळे लागणारा वेळ ३) पावसाळ्यात बंद असणारी जलवाहतुक. आमचे नातेवाईक ८०-९० वर्षापूर्वी पावसाळ्यात मुंबईत यायचे झाले तर बैलगाडीने अणुस्कुरा घाटातून लांजा-गगनबावडा-कोल्हापुर (जो प्रवास दिव्य होता) व पुढे मुंबई असा द्रविडी प्राणायाम करीत. ४) "गाव तिथे एस्टी" धोरण. रस्ते वाहतुक सक्षम झाल्यावर नेमक्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एस्टी सोयीची व्हायला लागली. ५) त्यावेळी, अगदी अलिकडच्या काळात १९८५ पर्यंत जास्त चारचाकी खाजगी गाड्या नव्हत्या. पद्मिनी, अँबेसेडार आणि महिन्द्रा जीप्स उपलब्ध होत्या आणि त्याही मोजक्याच लोकांकडे, त्यामुळे रस्त्याचा प्रवास सोयीचा होता. वाहतुक खोळंबा हा प्रश्नच नव्हता.

(अवांतर : अर्थात आजही कोकणातील सगळेच रस्ते उत्तम आहेत असे नव्हे :) आमच्या गावाला जायचे तर आजही एस्टीने ओबड धाबड कच्च्या रस्त्यावरून हिंदकळत जावे लागते आणि आपण गावात पोहोचेपर्यंत लाल मातीत संपूर्ण न्हाऊन निघतो. विचित्र वळणांवर व तीव्र उतारांवर ते एस्टीचे अवजड धुड सुरक्षित चालवणे हे केवळ एस्टीच्या चालकांनाच जमू शकते ह्यात तीळमात्र शंका नाही. )

मागील पिढीतील अनुभववृद्ध माणसे ह्या विषयावर अधिक प्रकाश टाकू शकतील.
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

 
^ वर