मम सुखाची ठेव..(१)

मम सुखाची ठेव..(प्रास्ताविक)

राम राम मंडळी,

मम सुखाची ठेव च्या पहिल्या भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत!

या भागात आपण यमन रागाच्या दोन बंदिशी पाहणार आहोत. राग यमन! याबद्दल मी काय बोलू? मन प्रसन्न करणारा एक अतिशय हळवा राग. यमन म्हणजे आपल्या हिंदुस्थानी रागसंगीताची ओळख! रागसंगीतात 'परंतु या सम हा..' असं ज्याचं वर्णन करावं असा यमन!

पहिली बंदिश आहे -

ननदीके बचनवा सहे न जाए (गायन सौजन्य : सौ वरदा गोडबोले)
(इथे ऐका)

अस्थाई -

ननदीके बचनवा सहे न जाए
सोच सोच कछु न जाए हमसो
उमंग उमंग असूवन बरसत नीर

अंतरा -

एक तो बैरन मोरी सास ननदिया
दोलनिया, जेठनिया, रैनदिन
सब मिल हमसन जियरा मोरा डरावे..

मंडळी, ही बंदिश आम्हाला पं गजाननबुवा जोश्यांच्या घरातून मिळाली. पं गजाननबुवा जोशी यांच्याबद्दल पुन्हा केव्हातरी सवडीने! गजाननबुवांसारख्या संगीतक्षेत्रातील आभाळाएवढ्या मोठ्या माणसांवर लिहिणे हा एका वेगळ्या लेखमालिकेचा विषय होऊ शकेल!

आज गजाननबुवांश्या शिष्य परिवारात ही बंदिश अगदी हमखास गायली जाते. पं अंतुबुवा जोशी हे गजाननबुवांचे वडील. ग्वाल्हेर परंपरेतील एक दिग्गज गवई. त्यांनी ही बंदिश बांधली, अशी माझी माहिती आहे.

ननदीके बचनवा सहे न जाए..! नणंदेचं फणकारायुक्त बोलणं सहन होत नाही असं सांगणारा ओघवता यमन आहे हा! :) बंदिशीत उभं केलेलं यमन रागाचं स्ट्रक्चर अत्यंत आकर्षक आहे, यमनाचं प्रसन्न दर्शन घडवणारं आहे! 'कछु न' या शब्दात अगदी क्षणभराकरता येणारा तीव्र मध्यम, सोच सोच किंवा उमंग उमंग या शब्दजोड्या, दोलनिया, जेठनिया हे शब्द कानाला खूप छान लागतात.

एक तो बैरन मोरी.. या अंतर्‍यातून होणारा आरोहातील खुला अविष्कार, 'जियरा मोरा डरावे' तला लयीचा सुंदर आघात या सगळ्या गोष्टींमुळे ही बंदिश एखाद्या छान रांगोळीसारखी वाटते! आमची वरदा अर्थातच फार सुरेख गाते हे वेगळं सांगायला नको..

आता यमनातली पुढची बंदिश पाहू -

मै वारी वारी जाऊंगी.. (गायन सौजन्य : सौ वरदा गोडबोले)
(इथे ऐका)

अस्थाई -

मै वारी वारी जाऊंगी प्रितम पर
जब आवेंगे मोरे मंदरवा

अंतरा -

फुलबन सेज सजाऊंगी वो दिन
प्राणपिया जब मोरे घर आवे
गरे डारुंगी मोतीयन के हरवा..

ही बंदिश आग्रा घराण्याचे एक दिग्गज, उस्ताद विलायत हुसेन खासाहेबांनी बांधलेली आहे. त्यांनी बांधलेली ही पहिली बंदिश आहे. ती इतकी लोकप्रिय झाली की आजही अनेक गायक-गायिका ही बंदिश गातात. संगीत क्षेत्रात आभाळाइतकं मोठं नांव असलेले आचार्य श्रीकृष्ण नारायण तथा अण्णासाहेब रातंजनकर यांच्या घरी खासाहेबांचं नेहमी येणंजाणं असे. अण्णासाहेबांच्याच सांगण्यावरून/आग्रहाखातर खासाहेबांनी ही बंदिश बांधली. स्वत: अण्णासाहेबांनीदेखील एकाहून अश्या सुरेख बंदिशी बांधल्या आहेत, त्याही आपण पुढे या लेखमलिकेत पाहणार आहोत. या बंदिशींचं डेमो दाखवणारी वरदा गोडबोले, हिला 'Asthetic aspects of Aacharya Ratanjankar's compositions' या विषयाचा अभ्यास करण्याकरता केन्द्र सरकारची विशेष शिष्यवृत्ती मिळाली आहे हे सांगायला मला आनंद वाटतो!

मै वारी वारी जाऊंगी..! बंदिशीची 'मै वारी वारी'ची उठवणच अगदी लयदार आणि झोकात ठेवली आहे. 'जाऊंगी' हा शब्द समेकरता अगदी चपखल वाटतो. मोरे मदरवा ह्या शब्दातून बोलतानेच्या मध्यमातून थेट बंदिशीच्या मुखड्याप्र्यंत दर्शन देत जाणारी यमनची स्वरवेल हा बंदिशीचा एक विशेष मानता येईल. फुलबन सेज सजाऊंगी ही ओळ टीप आणि टिपेपासून पुढे अगदी तार गंधारापर्यंतचं समाधान देऊन जाते! गरे डारुंगी मोतीयनके हरवा हे शब्द तर सुरेखच आहेत, शिवाय मोतीयन के हरवा तली बोलतान बंदिशीतला प्रवाहीपणा शेवटपर्यंत राखते!

असो,

तर मंडळी, ही लेखमालिका म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या श्रवणभक्तित/शिक्षणात मला ज्या बंदिशीं आवडल्या त्या इथे देण्याचा एक प्रयत्न. आपल्याला आवडल्या किंवा नाही ते अवश्य सांगा. या बंदिशी म्हणजे माझ्या आयुष्यातील एक फार मोठं विश्रांतीस्थान आहेत. ही मम सुखाची ठेव आहे!

-- तात्या अभ्यंकर.

लेखनविषय: दुवे:

Comments

श्रवणीय!

दोन्ही चिजा श्रवणीय आहेत.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

+१

असेच म्हणतो.

छान!!!

छान ओळख. दोन्ही बंदिशी आवडल्या. खूप छान राग आहे.

एक शंका : 'ननदीके बचनवा' या ध्वनिमुद्रणातला शेवटचा काही भाग कापला गेला आहे का?

बिपिन कार्यकर्ते

वा!

"श्रवणीय" लेख! अर्थ कळून घेत आहे. खूपच आवडली, ही सुरूवात. आमच्याकडे अजून गुढीपाडवा साजरा होतो आहे, आणि अशा वेळी या मालेची यमनने केलेली ही सुरूवात आवडली. ही लहानशी मैफलच आमच्यासाठी आणली यासाठी तात्यांचे आणि सौ. वरदा गोडबोले यांचे अनेक आभार. बंदिशी खूप आवडल्या हे वेगळे सांगायला नकोच.

"सब मिल हमसन जियरा मोरा डरावे " इतक्या छान सुरेल बंदिशीतही नणंदा, मोठी जाऊ, सासू कशा हिलाच एकटीला छळतात, त्याचे वर्णन! :)

सहमत आहे

"श्रवणीय" लेख! अर्थ कळून घेत आहे. खूपच आवडली, ही सुरूवात.

वाचनाबरोबर ऐकायलाही मिळाल्यामुळे छान वाटले.

ही लहानशी मैफलच आमच्यासाठी आणली यासाठी तात्यांचे आणि सौ. वरदा गोडबोले यांचे अनेक आभार. बंदिशी खूप आवडल्या हे वेगळे सांगायला नकोच.

सहमत आहे. पुढील भागांची प्रतीक्षा आहे.

आभार..

प्रतिसाद नोंदवणार्‍या रसिक उपक्रमी वाचकांचा मी आभारी आहे.

बिपिनराव, या वेळेस मी वरदाला फक्त अस्थाई-अंतराच गायला सांगितला होता. पुढील वेळेस थोड्या विस्ताराने गायला सांगेन. तूनळीवर एकावेळेस १०मब पेक्षा अधिक ध्वनिमुद्रण चढवता येत नाही अशी माझी कल्पना होती म्हणून मी तिला खूप मर्यादित स्वरुपात गायला सांगितले होते. परंतु आता असे समजते की तूनळीवर १० मिनिटांपर्यंतचे ध्वनिमुद्रण चढवता येते. सबब, पुढील भागाकरता वरदाला त्या त्या रागाचा आलाप-तानांसह थोडाफार विस्तारही करायला सांगेन. त्यामुळे श्रवणाचा आनंद थोडा अधिक मिळेल..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

वा!

सुरेख!! क्या बात है तात्या.

(प्राभवित) माधवी

तात्या आणि वरदा गोडबोले यांचे आभार

श्रवणीय चिजा आहेत. पुन्हा ऐकत आहे.

हेच

बंदीशी आवडल्या. लेखमाला नक्कीच उत्सुकता वाढवणारी आहे.

तात्या तसेच गायीका सौ वरदा गोडबोले यांचे आभार.

फार सुरेख गातात

फार सुरेख गातात वरदाताई. मन प्रसन्न झाले.

सुरेल

लेख. दोन्ही बंदिशी आवडल्या. लेखाचे शीर्षकही सुरेख निवडले आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आभार..

प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्व रसिकांचे आभार..

या उपक्रमाकरता वरदा गोडबोले हिचेच प्रामुख्याने डेमो राहील, परंतु अधनंमधनं राम देशपांडे, रघुनंदन पणशीकर, राहूल देशपांडे यांच्याही घरी जाऊन काही खास बंदिशींचं मी ध्वनिमुद्रण करणार आहे. ही सगळी मंड़ळी माझ्या गणगोतातली आहेत आणि या कामाकरता मला निश्चित मदत करतील असा विश्वास आहे.

त्याचबरोबर डॉ अरूण कशाळकर, पं मधुकर जोशी यांच्या सारख्या बुजुर्गांकडे जाऊनही काही खास चिजांचं ध्वनिमुद्रण मी करेन जे या लेखमालेकरता अत्यंत मोलाचे ठरेल..

असो..

सर्वं रसिकंचे पुन्हा एकदा आभार..

आपला,
(चिजाबंदिशीतला, गाण्याबजावण्यातला) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

आवडली

दोन्ही गाणी आवडली!

 
^ वर