मम सुखाची ठेव..(प्रास्ताविक)

राम राम उपक्रमींनो,

सर्वप्रथम सर्व उपक्रमींना वर्षप्रतिपदेच्या शुभेच्छा! हे वर्ष सर्व उपक्रमींना सुखासमाधानाचे, भरभराटीचे व आनंदाचे जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

या आधी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातील बंदिशींवर आधारीत 'मम सुखाची ठेव' ही लेखमालिका येथे उपक्रमावर सुरू करतो आहे.

मंडळी, आपलं हिंदुस्थानी रागसंगीत हा आपल्या संस्कृतीने जगाला दिलेला एक अनमोल ठेवा आहे. अनेक रागरागिण्यांनी आपलं रागसंगीत नटलं आहे. आणि त्या रागसंगीतातील नानाविध, एकापेक्षा सुरेख बंदिशींमुळे आपल्या रागरागिण्या नटल्या आहेत. मला माझ्या सुदैवाने आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक गुरुजनांकडून, गुणीजनांकडून या बंदिशी ऐकायला मिळाल्या आहेत, शिकायला मिळाल्या आहेत. या बंदिशींची आपल्याला ओळख करून देणे, ऐकवणे आणि जो आनंद मला या बंदिशींमुळे मिळाला तो आपल्या सर्वांत वाटणे हा या लेखमालिकेचा एकमेव उद्देश आहे.

या कामात आजच्या तरूण पिढीतली अभिजात संगीत गायिका आणि माझी गुरुभगिनी सौ वरदा गोडबोले हिची मला मोलाची मदत मिळाली आहे. या लेखमालिकेत येणार्‍या सर्व बंदिशी तिने गायचे कबूल केले आहे जेणेकरून वाचकांना श्रवणाचा आनंद मिळू शकेल. माझ्या विनंतीखातर आपल्या व्यस्त दिनक्रमातून या बंदिशी गायची जबाबदारी तिने स्विकारली आहे याबद्दल मी तिचा ऋणी आहे.

बंदिश -

बंदिश म्हणजे काय हो? याचं अगदी ढोबळ स्वरुपात उत्तर द्यायचं झालं तर धृवपद आणि एक अंतरा असलेलं त्या त्या रागातील चक्क एक गाणं! असं मी उत्तर देईन. राग ही संकल्पना अर्थातच खूप मोठी आहे. परंतु बंदिशींमुळे त्याचं स्वरूप, त्याचा स्वभाव, त्यातली मेलडी इत्यादी गोष्टींची श्रोत्यांना पटकन ओळख होऊ शकते. आपल्या ख्यालसंगीतात बडा ख्याल आणि छोटा ख्याल असे दोन प्रकार सांगितले आहेत. बडा ख्यालाचं स्वरूप अर्थातच विलंबित असतं, ज्यात रागविस्तार/रागविचार अधिक विस्ताराने मांडला जातो. छोटा ख्यालाचं स्वरूप हे द्रुत असतं आणि बडा ख्यालाच्या मानाने मर्यादित असतं. परंतु त्यातही संपूर्ण रागाचं एक छोटेखानी चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बंदिशी या बडा ख्यालातही असतात, छोटा ख्यालातही असतात. आपण या लेखमालिकेत छोटा ख्यालातील बंदिशी पाहणार आहोत. वर उल्लेख केल्याप्रमाणे या बंदिशींमुळे रागस्वरुपाशी/रागचित्राशी उपक्रमाचे श्रोते चटकन फॅमिलियर होऊ शकतील, आनंद घेऊ शकतील असा विश्वास वाटतो!

माझे मानसगुरू भारतरत्न, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांना आणि उपक्रमाच्या सर्व मायबाप वाचकांना आणि रसिक श्रोत्यांना वंदन करून या लेखमालिकेची सुरवात करतो आहे. लेखमलिकेत उल्लेख केलेली बंदिश वाचकांना आवडली किंवा नाही, कशी वाटली, सबंधित राग कसा वाटला इत्यादी संदर्भात काही प्रतिक्रिया आल्या तर मला त्या आवडतील.

कळावे,

लोभ असावा, तो वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा!

आपला,
(गाण्याबजावण्यातला) तात्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

शुभेच्छा

अतिशय सुंदर प्रकल्प.

अनेकोत्तम शुभेच्छा!

पुढचा भाग कधी येतोय?

शुभेच्छा

तात्या, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अतिशय चांगला आणि विधायक उपक्रम चालू केला आहे. त्या बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. पुढील भागांची आतुरतेने वाट बघत आहे.

बिपिन कार्यकर्ते

असेच बोल्तो !

तात्या, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अतिशय चांगला आणि विधायक उपक्रम चालू केला आहे. त्या बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. पुढील भागांची आतुरतेने वाट बघत आहे.

या

उपक्रमाला माझ्याकडून शुभेच्छा
अभिनंदन!
नूतन वर्षाच्या शुभेच्छा...
एक सूचनावजा शंका : बंदिश म्हणूनच जर गायचे असतील तर बडे आणि छोटे ख्याल दोन्हीही घ्यायला काय हरकत आहे? बडे ख्यालसुद्ध बंदिशीच असतात ना... विस्ताराच्या सोयीसाठी त्या ठायीत् म्हटल्या जात असल्या तरी सुद्धा त्यांचाही समावेश यात न करण्यामागे काही खास कारण आहे का?

--(एकतालातली)अदिती

काही भाग संपादित. प्रतिसाद लेखाच्या/चर्चेच्या विषयाशी संबंधित असतील याची सर्वांनी कृपया काळजी घ्यावी.

विषयाशी संबंध

काही भाग संपादित. प्रतिसाद लेखाच्या/चर्चेच्या विषयाशी संबंधित असतील याची सर्वांनी कृपया काळजी घ्यावी.

अदिती व बेसनलाडू यांचे प्रतिसाद मूळ प्रस्तावातील वाक्यांशी संबंधितच होते. मूळ चर्चाप्रस्तावात लेखकानेच विषयांतर करून वाचकांचा अपमान करणारी वाक्ये लिहिली आहेत ती वेळीच काढून टाकली असती तर हा प्रसंग आला नसता.

असो.

विनायक

सहमत

सहमत आहे! मूळ प्रस्तावातील वाक्यांना धरुन केलेले लेखन विषयांतर नाही. मूळ वाक्य तसेच पण प्रतिसाद मात्र उडवल्याने गैरसमज होऊ शकतात. असो!

वा!

सुरेख योजना. वेळात वेळ काढून हे लेख लिहीताय. वाचायला उत्सुक आहे.

मस्त प्रकल्प

पाडव्याच्या दिवशी सुरू केलेला हा उपक्रम. पुढील भागांची वाट बघतो आहे.

असेच

असेच म्हणतो. सहमत आहे.

तात्या, अगदी बोलल्याप्रमाणे

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मालिका सुरु केलीत तर!
नवीन उपक्रमाला शुभेच्छा! :)
ही मालिका वाचून गाण्याचा अधिक आनंद घेता यावा ह्या उद्देशाने माझ्यासारख्या कानसेनांनाही समजायला सोपे जाईल अशा तर्‍हेने विवेचन आले तर बहार येईल.
उदा. रागावर लिहिताना बंदिशी बरोबरच त्या त्या रागातल्या हिंदी/मराठी चित्रपटातल्या काही गीतांचा उल्लेख केलात (गाणेही तिथेच ऐकायला मिळाले तर स्वरांना सुगंध!) तर ते गाणे अमुक अमुक रागामधले आहे हे समजेल आणि गाणं थोडंफार समजून ऐकण्याने लज्जत वाढेल.

चतुरंग

सहमत

चतुरंगांशी सहमत आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर ही मालिका वाचायला मिळाली हे फार आवडलं

-(संगीतप्रेमी) माधवी

मूळ लेखातील

संपादनाविषयी शंका/सूचना इ. यापुढे फक्त व्यक्तिगत निरोपातून 'संपादन मंडळ' या सदस्यनामावरच कळवावे.

सर्व सदस्यांना निवेदन

उपक्रमावर लेखाच्या किंवा चर्चेच्या विषयाशी संबंधित नसलेले, व्यक्तिगत रोख असणारे किंवा व्यक्तिगत पातळीवर जाणारे आणि परस्परांविषयी किंवा इतर सदस्यांना उद्देशून व्यक्तिगत स्वरूपाचे लेखन होणे अपेक्षित नाही. व्यक्तिगत स्वरूपाची टीका लेख/चर्चा/प्रतिसाद किंवा खरडवह्यांतील नोंदी यापैकी कोणत्याही प्रकारे होणे अपेक्षित नाही.

उपक्रमावर लेखन करताना, कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखनाच्या सर्वमान्य शिष्टाचाराचे पालन करणे अपेक्षित आहे. लेख , चर्चा आणि प्रतिसाद याद्वारे होणारे लिखाण सार्वजनिक स्वरूपाचे राहील याची काळजी प्रत्येक सदस्याने घ्यावी अशी अपेक्षा आहे. या व्यासपीठाचा वापर जबाबदारीने व्हावा परस्परांमधील व्यक्तिगत हेवेदावे व मतभेद व्यक्त करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करु नये. तसेच खरडवह्यांच्या सुविधेचा जबाबदारीने वापर करावा.

संपादनाविषयी शंका/सूचना/आभार इ. यापुढे फक्त व्यक्तिगत निरोपातून 'संपादन मंडळ' या सदस्यनामावरच कळवावे.

सूचना देऊनही जाणीवपूर्वक अश्या स्वरूपाचे लेखन होत असेल तर तसे करणार्‍यांच्या सदस्यत्वावर नाइलाजाने काही निर्बंध आणणे आवश्यक होऊ शकते. तेव्हा सर्व सदस्यांनी कृपया या गोष्टीचे भान ठेऊन उपक्रमाच्या धोरणाशी सुसंगत असेच लेखन करून कृपया सहकार्य करावे.

लेखाचे संपादन

वरील लेखात बदल केला आहे.

आता लेखनविषयक वाद येथेच थांबवावा ही सर्व सदस्यांना विनंती. काही सूचना असल्यास व्यक्तिगत निरोपाद्वारे कळवावे.

- संपादन मंडळ

 
^ वर