मराठीचे शिलेदार

मराठीचे शिलेदार
श्री. निनाद यांनी हा एक चर्चेचा / माहिती गोळा करावयाचा लेख उपक्रमवर लिहला होता. तेव्हापासून हा विचार मनात घोळत होता कीं य़ा यादीतील मान्यवर कोण असावेत ?
निवड सर्वथा वैयक्तिक असणार हे उघडच आहे. तरी पण प्रत्येकाला काही निकष पहिल्यांदि ठरवावे लागतीलच व त्या निकषांवर घासून पाहूनच यादी करावी लागेल. मी स्वत: माझे निकष व यादी देत आहे. आपणही आपली विचार मांडावेत. सुटसुटितपणा रहावा म्हणून १० ते १५ जण निवडणे बरे होईल. मी निवड करतांना पुढील गोष्टी विचारात घेतल्या.

[१] काल ..... मराठीच्या सुरवातीपासून एकविसाव्या शतकापर्यंत. प्रातिनिधीक लेखक निवडले जावेत.
[२] कस आणि विपुलता[ quality and quantity] लेखन कसदार पाहिजेच पण ते विपुलही पाहिजे. चार चांगले अभंग/कविता/कथा लिहणारा यात येणार नाही.
[३] काळाची कसोटी..... किमान २००-४०० वर्षे ते लोकांच्या वाचनात राहिले पाहिजे.
[४] वाचकांची कसोटी.... किमान हजारो लोकांनी ते वाचले/ऐकले पाहिजे. त्यांना ते आवडले पाहिजे.
[५] लेखनाचा विषय .... आध्यात्मिक,पौराणिक, ललित,काव्य, गद्य, वगैरे.
[६] स्थल मर्यादा....... कोठे लिहले ?
[७] परिक्षेची तयारी ... कोणी हा लेखक का निवडला असे विचारले तर सांगता आले पाहिजे.
यात आणखी भर घालता येईल.माझ्यापुरते एवढे पुरे. थोडे विवेचन.
कस हा सर्वार्थाने वैयक्तिक मुद्दा. मी धरून चालतो कीं सौंदर्यशास्त्र [संस्कृतमधून आलेले ] व ग्रामिण बोलीभाषा यांचा मिलाफ़ झाला तर दुग्धशर्करा योग.
विपुलता कशी ठरवणार ? २०,००० पेक्षा जास्त काव्य [अभंग, ओवी, आर्या यांना काव्य म्हणावयाची प्रथा होती ] लिहणारे १०-१५ कवी मराठीत सहज सापडतील. टोकाची भूमिका घेतली नाही तरी यावरून कल्पना यावी. काळाच्या कसोटीला उतरणारे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास सहज डोळ्यासमोर येतात. प्रश्न १९-२० व्या शतकातील लेखकांचे काय करावयाचे ? आजचे लोकप्रिय लेखक पु.ल. यांचे उदाहरण घेतले तर लक्षात येईल कीं ते आजच कालबाह्य होऊ लागले आहेत. सर्वोदय चळ्वळ, गिरगाव-
मुगभाटातल्या चाळी नाहिशा झाल्यावर तुझे आहे तुजपाशी, बटाट्याची चाळ या सारखे लेखन नव्या पिढीला कळतच नाही. २५ वर्षांनंतच्या त्यांचे आकलन होणॆ अशक्यच आहे. जरा अतिशयोक्ती करावयाची तर हे लेखन बाविसाव्या शतकातील वाचकाला महानुभाव साहित्या सारखेच वाटॆल ! [ नाही पटले ? आ बैल मार मुझे !] विषय हा थोडा अडचणीचा भाग आहे कारण अठराव्या शतकापर्यंत गद्य व ललित लेखन जवळजवळ नगण्यच होते. [पद्य : गद्य :: ९५ : ५] त्यामुळे लालित्य पहावयाचे ते पद्यातच ! स्थल हा
मुद्दा मी निवडला कारण मला तंजावरचे लेखन आपणासमोर आणावयाचे आहे. [अंमळ खोडसाळपणा : आरे भाषा किती जण जाणतात ?] आणि [७] बद्दल विचारून पहा.तर आता यादी. मला थोडे सोपे जाणार कारण पहिल्यांदि लिहित असल्याने ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास आणितुकाराम येऊन जाणारच. तेव्हा आपण ते सोडून
इतरांची यादी देणे उचित.

१] मुकुंदराज .... मराठीचा आद्य कवी
२] म्हाइंभट ..... महानुभाव वाङ्मय
३] ज्ञानेश्वर ..... आध्यात्मिक
४] नामदेव ..... " "
५] एकनाथ ....... " "
६] तुकाराम........ " "
७] रामदास........ " "
८] वामन पंडित ... " " व पौराणिक
९] मोरोपंत.. ........ " "
१०] होनाजी.......... शाहिर परंपरा
११] माधवस्वामी ...दक्षिण हिन्दुस्तान

शरद

[

लेखनविषय: दुवे:

Comments

रामदास आणि नुसते आध्यात्मिक?

रामदास आध्यात्मिक आणि वास्तववादी कर्मयोगी संत. एकनाथ आध्यात्मिक आणि ललित काव्यलेखक.
होनाजीचा या यादीत समावेश करायचा तर रामजोशी, सगनभाऊ आणि पठ्ठे बापूराव का नकोत?
माधवस्वामी (तिरुवेळंदूरकर)अद्वैती यांचे नाव या जंत्रीत घेतले हे फार योग्य झाले. --वाचक्‍नवी

अतिशय सुरेख चर्चाविषय

या चर्चेत भर घालण्यासाठी माझा काडीचाही अभ्यास नाही. मात्र ही चर्चा पुढे चालावी असे वाटते.

माधवस्वामी यांचे नाव मी प्रथमच वाचत आहे. त्यांच्याबाबत अधिक माहिती वाचायला आवडेल.

निदान पुढची अनेक वर्षे ज्यांचे लेखन वाचले जावे, काळाच्या कसोटीवर टिकून राहावे असे वाटते असे मला माहीत असलेले लेखक म्हणजे शेजवलकर आणि राजवाडे (इतिहाससंशोधक), जी.ए. कुलकर्णी (कथालेखक), शंकर पाटील (कथा-कादंबरी), कुरुंदकर (वैचारिक लेखन व समीक्षा) आणि गंगाधर गाडगीळ (कथालेखक). पंचतंत्र, कथासरित्सागर आणि बौध्द जातक कथा याही म्हटले तर कालातीत आहेत. यनावाला सरांनी मागे ओळख करुन दिलेले गाथा सप्तशती मिळवून वाचायला आवडेल.

पुलंचे लेखन कालबाह्य होत आहे की नाही हा मोठ्या चर्चेचा विषय होईल. उदा. मागील काही महिन्यांत मी वुडहाऊसची २ पुस्तके वाचण्याचा चिकाटीने प्रयत्न केला. मात्र जमले नाही. (वुडहाऊस हा संपूर्ण आवडावा लागतो हे पुलंचे विधान मला वारंवार आठवत होते.) जे माझ्याबाबतीत वुडहाऊसचे झाले आहे तेच येणार्‍या पिढ्यांच्या बाबतीत पुलंचे होईल का?

मी आधुनिक वगैरे कविता फारशा वाचल्या नाहीत. त्यामुळे कवींबाबत माझ्या मताला काहीच अर्थ नाही. :)

मात्र वाचक्नवी यांनी म्हटल्याप्रमाणे रामदासांबरोबरच ज्ञानेश्वर, तुकाराम यांनाही केवळ अध्यात्मिकतेमध्ये बंदिस्त करणे चुकीचे वाटते. तुकारामांनी अध्यात्माबरोबरच लोकजागृती, ललित स्वरुपाचे मनोरंजन अशा प्रकारचे अभंगही रचले आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१

मुळ विषयावर बोलण्याइतका माझा व्यासंग नाहि.. फक्त कर्णाच्या पुढील वाक्याला अनुमोदन....

पुलंचे लेखन कालबाह्य होत आहे की नाही हा मोठ्या चर्चेचा विषय होईल

+१
माझ्यामते पुलंनी आपला मुद्दा मांडायला घेतलेले स्थळ-वस्तु आता बदलल्या असल्या तरी त्यांना जे म्हणायचे होते ते अजूनहि लागू पडते - भेटते -अनुभवता येते.... आणि माझ्यामते मराठी आहे तशीच राहिली तर त्यांचे लेखन २०० वर्षांनंतरहि लागु पडावे..

तसेहि... स्थळ, वस्तु वगैरेच्या पलिकडे कालनिरपेक्ष लिहिणे कोणाला जमले आहे? मला तर एकहि उदाहरण आठवत नाहि.. (ज्ञानेश्वरांच्या काळात चाळ, ट्राम असती तर माझ्यमते हटकून अभंगात भेटली असती :) )

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

लाट देश आणि इतर

लाट देश
लाट्यायन ब्राह्मणांची वस्ती दक्षिण गुजराथमध्ये होती.लाटयायनचा अपभ्रंश लाट [ व पुढे लाड ]. त्यावरून ह्या भागाला लाटदेश असे नाव पडले. इ.स. ७१२ मध्ये महंमद कासीमने सिंधवर स्वारी केल्यावर गुजराथवरही आक्रमण होईल या भीतीने पुष्कळसे लोक महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात जाऊन राहिले.यांमधील जमातीना लाड ब्राह्मण, लाड सोनार, लाड साळी, लाड मराठे,लाड तेली इत्यादी नावे पडली. लाड ब्राह्मणांची जानवी मुसलमान राजकर्त्यांनी हिरावून घेतली व त्यांमधील उपनयन संस्कारही बंद पडले.
ते वैश्य मानले जाऊ लागले. १९२० च्या सुमारास परत त्यांनी उपनयन संस्कार, जानवी वगैरे स्विकारले आणि आता ते ब्राह्मण म्हणूनच ओळखले जातात.

राम जोशी, सगन भाऊ इ. का नाहित ? काहीच हरकत नाही. शाहिर संप्रदायाचा एक प्रतिनिधी म्हणून होनाजी.

पु.लं.चे भविष्य. अपेक्षितच होते. मला फ़क्त सांगा कीं गडकरी, कोल्हटकर यांचे वाङ्मय [विनोदी] किती जणांना लक्षात आहे ?
शरद

पटले आहे!

पटते आहे.

मला वाटते की काळाच्या गतीशी जुळवता येणारे लिखाण हे बहुदा भक्ती मार्गावरचेच असते.
त्यामुले पुलंचे लिखाण कालौघात समजणारच नाही यात अर्थ आहे.

गडकरी, कोल्हटकर ही नावेच आज पुसट झाली आहेत.
लिखाण इरिलेव्हंट ठरते आहे.

नवीन पीढीला सिंधु रडते का हेच समजत नाही...

"तळीराम हॅज प्रॉब्लेम. नॉट सिंधु- हि नीड्स टु डिल विथ, लिव्ह हर अलोन"

अशी वाक्ये येतात.

शंकर पाटलांच्या कथांमधले अनेक धागे, विनोद नव्या पीढीला कळणेच शक्य नाही.

आपला
गुंडोपंत

तळीराम की सुधाकर?

गुंडोपंत,

तळीरामाच्या दारुच्या प्रॉब्लेममुळे सिंधू रडत असावी असे वाटत नाही. तिचा आक्षेप सुधाकराच्या मद्यपानाबाबत असावा असे वाटते. अर्थात तुम्हाला तळीराम आणि सिंधू यांबाबत काही विशेष माहिती असल्यास कल्पना नाही. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कालबाह्य झाले नाही ते...

कालबाह्य झाले नाही ते रामायण महाभारत, गीता आणि संतवाङ्‍मय! उपनिषदे आणि तत्त्वज्ञानाच्या विविध शाखा. --वाचक्‍नवी

अजुन काहि

तसेच बायबल, कुराण.. आणि त्याचबरोबर कामसुत्र, आयुर्वेद, इसापनीती, पंचतंत्र, अलीबाबा आणि चाळीस चोर, सिंडरेला-रपुंझेल आदि बालवाड्मय वगैरे वगैरे

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

बायबल आणि कुराण

बायबल हे मार्क, मॅथ्यू आणि ल्यूकसारख्या संतांनी लिहिले तेव्हा ते संतवाङ‌मयच ! कुराण म्हणजे तरी काय, परमेश्वराने महंमदाला वेळोवेळी आवश्यकतेनुसार ज्या आज्ञा दिल्या त्यांचा महंमद पैगंबरांच्या मृत्यूनंतर केला गेलेला संग्रह. मुख्यत्वे, पैगंबरांची मते व ध्येये या विषयी माहिती सांगणारा ग्रंथ म्हणजे कुराण. त्यातल्या काही गोष्टी महंमद पैगंबराच्या काळातच कालबाह्य झाल्या होत्या. त्या त्यांनी वेळोवेळी सुधारून सांगितल्या. पण अनुयायांचे काय, त्यांनी त्यांचे जुने आणि नवे असे दोन्ही विचार ग्रंथात अंतभूत केले. त्यामुळे कुराण अंशत: कालबाह्यच!. तसेच बायबलसुद्धा, विशेषत: जुना करार. बायबल कालबाह्य आणि अवैज्ञानिक नसते तर शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांना ख्रिस्ती धर्ममगुरूंचा त्रास सहनच करावा लागला नसता.
कामसूत्र अंशत: कालबाह्य, बाकीचे ग्रंथमात्र चिरंजीव.--वाचक्‍नवी

 
^ वर