उपक्रमींचा (ओसरू लागलेला) लेखन उत्साह

काही दिवसांपूर्वी मला असे जाणवले की पूर्वी जितक्या सातत्याने मी उपक्रमवर लिहीत असे तितक्या सातत्याने हल्ली मी उपक्रमवर लिहीत नाही. हा निरुत्साह फक्त माझ्याच बाबतीत आहे की सार्वत्रिक आहे हे पाहण्यासाठी उपक्रमवर प्रसिद्ध होणार्‍या लेखनाचे संख्यात्मक विश्लेषण केले. त्यांत खालील गोष्टी आढळून आल्या.

उपक्रमवर पहिले लेखन १५-०३-२००७ ला प्रसिद्ध झाले. त्याला १५-०३-२००९ ला दोन वर्षे पूर्ण होत आहेत.

या दोन वर्षांत उपक्रमींची संख्या १७०० च्या वर गेली आहे. (चू. भू. दे. घे.)

"नवे लेखन" या सदराखाली दिलेल्या तपशीलावरून असे दिसते की या दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे १५०० मूळ लेखने (यांत लेख व चर्चाप्रस्ताव जवळजवळ निम्मे निम्मे आहेत) व सुमारे २५००० प्रतिसाद सदरांत मोडणारी लेखने प्रसिद्ध झाली आहे. १५-०३-२००७ पासून दर सहा महिन्यांच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेख व चर्चाप्रस्ताव यांची लेखनसंख्या खालीलप्रमाणे आहे :
सहामाही ---------------------------------लेखनसंख्या
१५-०३-२००७ ते १४-०९-२००७------------------- ६००
१५-०९-२००७ ते १४-०३-२००८------------------- ३३०
१५-०३-२००८ ते १४-०९-२००८------------------- ३१५
१५-०९-२००८ ते १४-०९-२००९------------------- २५५ (अपेक्षित)
-------------------------------------------------------
एकूण ---------------------------------------१५००
--------------------------------------------------------

उपक्रमची सदस्यसंख्या दिवसेंदिवस वाढत आसतांना लेखनसंख्या कमीकमी होत जाणे उत्साह ओसरल्याचे लक्षण नाही काय?

उपक्रमींचा ओढा मूळलेखन करण्यापेक्षा प्रतिक्रिया देण्याकडे असावा असे वाटते.

आपणास काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

संख्यात्मक विश्लेषण आवडले

उपक्रमवर लिहिण्याचा वयक्तिक आमचा उत्साह अजून तरी मावळलेला नाही. मात्र दोन संकेतस्थळावर सारखेच प्रेम असल्याने इथे टाकावे की ,तिकडे असे होते. कधी-कधी प्रतिसाद काय टाकायचा असा एक आळशी विचारही डोकावतोच. पण किंचित असे वाटते की उपक्रमवर नवीन लेख प्रतिसादाचा वेग जरी मंदावला असला तरी ही अवस्था फार दिवस राहात नाही. जुन्यांबरोबर,नवीन सदस्यांनी नव-नवीन लेखन आणि प्रतिसाद (माहितीपूर्ण) लिहिले पाहिजेत असे वाटते.

-दिलीप बिरुटे

नेमके कसे मोजले?

"नवे लेखन" या सदराखाली दिलेल्या तपशीलावरून असे दिसते की या दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे १५०० मूळ लेखने (यांत लेख व चर्चाप्रस्ताव जवळजवळ निम्मे निम्मे आहेत) व सुमारे २५००० प्रतिसाद सदरांत मोडणारी लेखने प्रसिद्ध झाली आहे.

हे आपण नेमके कसे मोजले? आपला लेख १७०० वा आहे. त्यावरून उपक्रमावर सध्या १७०० लेख/ चर्चा आहेत. त्यापैकी काही अप्रकाशित केल्या असतील. त्या दोनशे असतील का याबाबत मला विशेष माहिती नाही पण आपण ते गणले असतील तर कौतुक आहे. :-)

पहिल्या सहा महिन्यांत उपक्रमावर ७२५ लेख प्रसिद्ध झाले असले तरी ते सर्वच लेख उपक्रमाच्या धोरणांत बसणारे होते असे वाटत नाही. शेवटच्या सहा महिन्यांत मला २७१ लेख दिसत आहेत. (१५ तारखेला अद्याप ५ दिवस बाकी आहेत. या संख्येत उपक्रमाच्या दिवाळी अंकातील सुमारे १५ लेखही घेता यावेत. २८६ झाले.) आपण संपूर्ण वर्षांत १५-०९-२००८ ते १४-०९-२००९------------------- २५५ (अपेक्षित) या संख्येची निश्चिती कशी केली ते कळण्यात आले नाही.

असो. याविषयावर यापूर्वीही सर्किट यांनी चर्चा केली होती. प्रश्न उपक्रमावर किती लेख यावेत यापेक्षा उपक्रमावर कसे लेख यावेत असा हवा होता. उपक्रमाची सदस्यसंख्या कशी वाढवावी असा हवा होता. जर सदस्यसंख्या मर्यादित असेल तर लिहिणारे लोक तेच तेच असतात. त्यापैकी काही लोक निरुत्साही होण्याची शक्यता आहे, काही लोक इतर कामांत गुंतण्याची शक्यता आहे. उपक्रमाच्या धोरणांनुसार लेख लिहायचे झाले तर हे काम एखादा अनुभव किंवा रोजच्या घडामोडींवर भाष्य करणार्‍या ४ ओळी लिहिण्याएवढे चटकन होणारे नाही.

येथे धनंजय यांनी त्यांचा लेटेष्ट लेख लिहायला किती वेळ घेतला याचा डेटा दिला तर उपयुक्त ठरावा. त्यातून जे लेखक विनापाश आहेत ते संकेतस्थळासाठी, लेखनासाठी, क्रिएटिविटीसाठी (मराठी गंडलं आहे) अधिक वेळ देऊ शकतात हा एक मुद्दाही लक्षात घेण्याजोगा आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, उपक्रमाची निर्मिती झाली तेव्हा उपक्रमा व्यतिरिक्त केवळ मायबोली आणि मनोगत अस्तित्वात होते. तरीही, उपक्रमावर प्रथम आलेले बरेचसे सदस्य हे मनोगती होते असे म्हणण्यास वाव आहे. मनोगताचा तात्पुरता पडता काळ या काळात असल्याने उपक्रमावर लेखांची संख्या अधिक दिसत असावी. यानंतर मिसळपाव आले. आनंद घारे यांनी आपल्या लेखात जी शंका व्यक्त केली आहे आणि त्यावर जी उत्तरे आली त्यावरून हे स्पष्ट आहे की लिहिणार्‍याला, प्रतिसाद मिळावे ही आशा असते. असे भरघोस प्रतिसाद ललित लेखन, रोजच्या घडामोडी किंवा काही कळीच्या विषयांना मिळतात. साहजिकच, असे विषय जेथे चर्चिले जातात तेथे सदस्यांचा ओढा जाणे आले.

आता पुन्हा चर्वितचर्वण झालेला प्रश्न असा की उपक्रमाने आपली धोरणे बदलावीत का असा कोणाला पडला असेल तर माझे स्पष्ट उत्तर असे की अजिबात बदलू नयेत. गेल्या ५ दिवसांत उपक्रमावर १३ लेख/ चर्चा आहेत. ज्याप्रमाणे, मनोगताचा पडता काळ सरून तेथे हल्ली दर्जेदार लेखन दिसते त्याप्रमाणेच उपक्रमावरील निरुत्साहही कमी होईल अशी आशा आहे.

धोरणात जरा लवचिकता

उपक्रमाच्या धोरणात जरा लवचिकता यायला पाहिजे असे वाटते. म्हणजे जरा ललित लेखनासाठी एक स्वतंत्र विभाग यायला काय हरकत आहे. ( प्रयोग करुन पाहण्यास काय हरकत आहे) आता इतर संस्थळे असतांना त्याची काय गरज असे त्याचे उत्तर असेल पण निव्वळ माहितीपूर्ण लेखन / प्रतिसाद करायचा म्हणजे ,जरा अनेकांना जड जात असावे असे वाटते.

>>मनोगताचा पडता काळ सरून तेथे हल्ली दर्जेदार लेखन दिसते
बरं झालं आठवण करुन दिली. नाहीतर वरील नावाचे एक मराठी संकेतस्थळ आहे त्याचे चक्क विस्मरण झाले होते.

-दिलीप बिरुटे

अरेच्चा

बरं झालं आठवण करुन दिली. नाहीतर वरील नावाचे एक मराठी संकेतस्थळ आहे त्याचे चक्क विस्मरण झाले होते.

हा हा..:))

मात्र दोन संकेतस्थळावर सारखेच प्रेम असल्याने इथे टाकावे की ,तिकडे असे होते.
अरेच्चा मग हे दुसरे संकेतस्थळ कुठले बरे? मायबोलीवर तुम्ही दिसला नाहीत!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नमोगत

बरं झालं आठवण करुन दिली. नाहीतर वरील नावाचे एक मराठी संकेतस्थळ आहे त्याचे चक्क विस्मरण झाले होते.

:-) आपल्याला कदाचित नमोगत असा शब्द आठवत असावा.

तसे मी , "मनोगत बिरुटे" आणि "नमोगत बिरुटे" अशा शब्दांवर गूगल शोध घेतला. (कुडोस टू उपक्रम गूगल शोध) बरेच दुवे मिळाले. तुम्हीही बघा, बरेच काही आठवून जाईल. ;-)

सवंगपणा करण्यासाठी?

उपक्रमाच्या धोरणात जरा लवचिकता यायला पाहिजे असे वाटते. म्हणजे जरा ललित लेखनासाठी एक स्वतंत्र विभाग यायला काय हरकत आहे.

कशाला हवी ललित लवचिकता? सवंगपणा करण्यासाठी?

प्रियाली मनोगताबद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. 'मूर्ख मदारी आणि त्याची शहाणी माकडे' हा लेख सध्या माझ्याकडे तयार आहे. पण तो लिहिण्यासाठी ही जागा नाही. तो लेख मनोगतावरच टाकायला हवा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

प्रियाली यांच्याशी सहमत आहे.

दर्जा आणि लोकप्रियता यांचे गुणोत्तर व्यस्त असते असे म्हणतात. 'नवे लेखन' मध्ये आलेले ताजे लेखन पाहिले तर अग्निबाणांची निर्मिती हा घारे सरांचा वैज्ञानिक लेख, लोकसंख्यावाढीचे संख्याशास्त्रीय विवेचन करणारा धनंजय यांचा लेख, शरद यांनी सुरु केलेली शब्दालंकारांची मालिका, विंजिनेर यांचे पुस्तक परीक्षण त्याचबरोबर ओबामा यांचे भाषण (राजकारण), चपात्या मऊ कशा होतील (पाककृती-विज्ञान), उबुंटू अनुभव (संगणक) असे अनेक चांगले लेख वाचायला मिळतील.

उगीच वेळ घालवण्यासाठी फालतू गप्पा टप्पा मारुन उपक्रमाचे ओरकुट करण्यापेक्षा असे निवडक चांगले लेख असतील तर उत्तमच असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

उगीच वेळ घालवण्यासाठी फालतू गप्पा टप्पा मारुन उपक्रमाचे ओरकुट करण्यापेक्षा असे निवडक चांगले लेख असतील तर उत्तमच असे वाटते.

सहमत आहे.

सदस्य संख्या आणि प्रतिसाद संख्या ह्याच्या मोहात पडून गाळ वाढवण्यापेक्षा गुणवत्तेवर भर असावा. मागे धनंजय ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे गारगोट्या शोधायला हजारो दगडं उचलून वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी चांगलं वाचण्यात तो वेळ जावा.

सध्यातरी उपक्रमावर ती परिस्थिती नाही ह्याचा आनंद वाटतो. मिळणार्‍या मोकळ्यावेळात उपक्रम पुरेसे खाद्य पुरवत आहे.

सहमत

प्रियाली आणि अजानुकर्णाच्या मतांशी सहमत आहे. त्या दोघांनी बरेच मुद्दे मांडले आहेतच. तुम्ही म्हणत आहात ते खरे असेलही कि उपक्रमींना प्रतिसाद द्यायला जास्त आवडते. चर्चांमध्ये हिरीरीने भाग घेऊन त्यावर आलेले काही प्रतिसाद पाहिलेत तर काही प्रतिसाद हे लेखांच्या तोडीचे असतात हे मान्य करावे लागेल. तसेच विषय वैविध्य हा एक मुद्दा आहेच. उगाच आपलं "सचिनने नाबाद १६३ धावा काढल्या - अजुनही मास्टर ब्लास्टर" याच प्रकारचे अनेक चर्चा विषय एकाच वेळी आलेले मी तरी उपक्रमावर कधी पाहिले नाही.
चर्चांवर आलेले प्रतिसाद हे लेखन उत्साहच दाखवणारे आहेत. अर्थात प्रत्येकाचा विश्लेषण करण्याचा आणि एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असु शकतो. याच सोबत उपक्रमावर नवे समुदाय, त्यांच्या वाढणारी सदस्य संख्या इत्यादी मुद्दे लक्षात घेता येतील.


लेख कमीच.

लेख खरोखरच कमी झाले आहेत. यनावाला पूर्वीसारखे लिहीत नाहीत, त्यांची कोडी नसल्याने चुकल्याचुकल्यासारखे होत आहे.
अनु हजेरी लावतात, पण लिहीत नाहीत. अनेकजण अन्यत्र प्रसिद्ध झालेले स्वत:चे लेख इथे डकवतात. ते तिथे वाचले असल्याने त्यावर प्रतिसाद कमी येतात. सदस्यांच्या संख्येत भर पडली असली तरी, लेखकांच्यात तितकी नाही.
--वाचक्‍नवी

कसे मोजले ते लक्षात आले.

लेख चर्चा कशा मोजल्या ते लक्षात आले.

सुमारे १५०० च्या दरम्यान लेखने आणि अंदाजे समान चर्चा आणि लेख ही माहिती बरोबर आहे.

गणित

२५ गुणिले ६० = १५०० असेच मोजले का?

त्या हिशोबाने नेमका आकडा १४८६ असा सांगता येईल.

म्हणजेच १७००-१४८६ = २१४ उडवलेले लेख/चर्चा.

आता ह्या २१४तील किती लेख सर्किटरावांचे होते आणि किती उडण्यात त्यांचा हातभार होता हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होईल. :)

अवांतर : असाच हिशोब आम्ही आणखी एका स्थळाबद्दल (मिसळपाव.कॉम) मांडला असता एकूण लेख ६,६०० पैकी ५,८०० लेख शिल्लक आढळले. म्हणजेच ८०० लेख उडल्याचे दिसुन आले. टक्केवरीत बोलायचे झाल्यास १२.१२% लेख सदर संकेतस्थळावरुन उडवले जातात. उपक्रमा बाबतीत तीच आकडेमोड केली असता हा दर १२.०५% आढळून आला.

ह्याचा अर्थ मराठी संकेतस्थळांवरील लेख नष्ट होण्याचा सरासरी दर १२ टक्क्याच्या आसपास असावा. नोंद घेण्याजोगी बाब म्हणाजे ह्या विश्लेषणातील दुसरे स्थळ हे प्रशासकिय निर्बंधांबाबतीत शिथिल असण्यासाठी प्रसिद्ध आहे (शिव्या अपशब्द वापर ह्याबाबतीत अतीशय सैल धोरणे ). उपक्रमावरील धोरणे त्यामानाने बरीच कडक आहेत आणि विशीष्ठ पठडीतील लेखांनाच ठेवण्याचा आग्रह आहे. असे असुनही लिखाण नाकारले जाण्याचा दर दोन्हीकडे सारखाच आहे हे पाहून अंमळ आश्चर्य वाटले.

हेच विश्लेषण आणखी काही महिन्यांनी करुन आकडे तपासुन बघीतल्यास दोन्ही संकेतस्थळांच्या ट्रेंड विषयी अधिक माहिती मिळेल असे वाटते.

आपला
(विश्लेषक) कोलबेर

असेच मोजले

२५ गुणिले ६० = १५०० असेच मोजले का?

हो. सकाळी माझ्या एकदम लक्षात आले नव्हते, नंतर आले. आकडा सुमारे १५०० भरतो. (दिवाळी अंकाचेही घेऊ ;-)

उपक्रमावरील धोरणे त्यामानाने बरीच कडक आहेत आणि विशीष्ठ पठडीतील लेखांनाच ठेवण्याचा आग्रह आहे.

उपक्रमावर पाककृती, कविता, विडंबने, कथा या सर्वांनाच ना आहे. पहिल्या ६ महिन्यांत उपक्रमाची धोरणे लक्षात न आल्याने असे काही ललित लेखन अप्रकाशित न केल्याचे दिसेल पण त्याचे कारण संकेतस्थळ नवे असणे, प्रशासकीय कारभाराचा ताळमेळ बसायला थोडा अवधी लागणे, काही सदस्यांनी त्या काळात घातलेला गोंधळ असे बरेच असावे.

नोंद घेण्याजोगी बाब म्हणाजे ह्या विश्लेषणातील दुसरे स्थळ हे प्रशासकिय निर्बंधांबाबतीत शिथिल असण्यासाठी प्रसिद्ध आहे (शिव्या अपशब्द वापर ह्याबाबतीत अतीशय सैल धोरणे ).

हम्म! :-)

बरोबर

संकेतस्थळ नवे असणे, प्रशासकीय कारभाराचा ताळमेळ बसायला थोडा अवधी लागणे, काही सदस्यांनी त्या काळात घातलेला गोंधळ असे बरेच असावे.

ही गोष्ट लक्षात आल्यानेच आणखी काही कालावधीने ही आकडेमोड पुन्हा करुन बघता येईल असे नमूद केले. आणखी ६ एक महिन्यांमध्ये दोन्ही स्थळांवरील किती लेख नविन आले आणि किती उडवले गेले ह्याचा हिशोब सध्याच्या आकडेवरुन मांडणे शक्य होईल.

आणखी एक महत्वाचा मुद्दा आत्ताच लक्षात आला तो म्हणजे मिसळपाव.कॉम येथे बरेच लेख हे उडवलेले नसले तरी अप्रकशित केलेले आहेत.

ज्यामुळे ते उपलब्ध नसले तरी ट्रॅकरवर त्यांची नोंद असल्याने उपलब्ध लेखात ते गणले गेले. म्हणजेच वास्तवात १२.१२ हा दर खूपच जास्त असू शकतो. ह्या विषयी ठोस आकडेवारी देणे मात्र अवघड आहे. (उपलब्ध लेख -अप्रकाशीत लेख अशी मोजणी करण्याची कुणाकडे सोपी युक्ती असल्यास ते शक्य होईल. )

तिथल्या विद्यमान संपादकांना हा विदा मिळवणे कदाचित शक्य असावे :)

त्यांनी हे आकडे पुरवल्यास अधिक सुस्पष्ट विश्लेषण करता येईल..

चर्चा आणि नवे लेखक

नव्या लेखकांनी लिहिण्यास सर्व प्रकारचे प्रोत्साहन आपण दिले पाहिजे, या बाबतीत लेखकाशी सहमत आहे.

मुळात नवीन असे लेख लिहायला वेळ लागतो हे प्रियालींचे म्हणणे मी अनुभवलेले आहे. हल्लीच लिहिलेला एक लेख मनात आठवडाभर घोळवावा लागला, आणि विदा संकलन, आलेखचित्रे बनवणे, लिहिणे यात एक पूर्ण सुटीचा दिवस लागला. पूर्वीच्या माझ्या मूळ-नवीन लेखांबद्दलही माझा असाच अनुभव आहे. त्यामुळे लेखकांना माझ्यासारखाच वेळ लागत असला, तर महिन्या-दोन महिन्यांत एखादाच लेख लिहिता येईल.

नव्या सदस्यांचे कुठल्या विषयाबद्दल आधीच मनन झाले असेल, तर त्यांनी ते लेख जरूर लिहावेत.

काही मुद्दे

शरदरावांचे निरीक्षण आवडले. तर्कशुद्ध वाटले.

उपक्रमाची आहेत ती उद्दिष्टे आणि ती सांभाळून चाललेली स्थळाची एकंदर वाटचाल हे सगळे योग्य वाटते. काही मुद्दे :

उपक्रमावर क्रमाक्रमाने कमी होत गेलेल्या नव्या धाग्यांच्या वेगाबद्दलचा मुद्दा मान्य केला तर प्रश्न असा आहे की हे मुळात वाईट आहे का ? असल्यास कितपत वाईट आहे ? हा घटलेला वेग किती कमी झाला तर त्याची गणना "वाईटा"मधे होईल ?

तर माझ्या मते , कुठल्याही संस्थळावरील कार्यरत सदस्यसंख्या आणि त्यांनी बनवलेले नवे धागे यांचा वेग कमी होत असेल तर ते वाईट. इथे ऊठसूट एकेका ओळीचे धागे नकोत, सोम्यागोम्याचे कौल नकोत इ. इ. मुद्दे पटण्याजोगे आहेत. पण त्याज्य आहे ते नाकारताना (किंवा ते इथे येत नाही याचा आनंद साजरा करताना ) यायला हवे ते पुरेसे येते आहे का याचे विश्लेषणही करायला हवे. तर , उपक्रमाच्या धोरणात बसेल , इथल्या दर्जाला सुसंगत असे धागे (इतर संस्थळांच्या आणि उपक्रमाच्या भूतकालाच्या तुलनेने) कमी का होतात / त्यांचा वेग कमी का आहे ?

- एक ढोबळ कारण म्हणजे अर्थातच ललित लिखाण (गद्य आणि पद्य) यावरची बंदी . या मुद्द्यावर बोलण्याची गरज नाही. उपक्रमाच्या बायबल मधे हे कोरून ठेवले आहे. **
- एक आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे : प्रसिद्धी. मनोगत , मिसळपाव , मायबोली यांच्या सौम्य धोरणामुळे , अर्थातच सदस्यसंख्या जास्त. हे जास्त सदस्य मग त्यांच्या परिचयाच्या लोकांना संस्थळाबद्दल सांगतात; पर्यायाने जास्त लोक तिथे येत रहातात. नव्या धाग्यांची संख्या वाढत रहाते. उपक्रमाचा "माउथ पब्लिसिटी"चा भाग कमी , कारण एकूण प्रवाह पुरेसा जोमदार नाही.
- इथल्या प्रतिसादांची संख्या. बर्‍याचदा धाग्यांच्या वाचनांची संख्या दोनेकशे असते परंतु प्रतिसाद पाचही नसतात. आता , अर्थातच "प्रतिसाद मिळविण्याकरता लिहिणे सवंगपणाचे लक्षण आहे" वगैरे वगैरे मुद्दे पूर्णपणे मान्य केले, तरी , आपल्यापैकी कितीजण असे , प्रतिसादांबद्दल पूर्णपणे निर्विकार राहून आपली लिहिण्याची मोट चालवत ठेवतो ही मला शंका वाटते. याचा अर्थ , या दुर्दैवी धाग्यांना वाचणारे वाचतात , परंतु त्यावर मत व्यक्त करावे कुणालाही वाटत नाही. हाच ट्रेंड ३-४दा चालू राहिला तर लेखकाचे अवसान गळू शकते .( प्रस्तुत मुद्दा मी माझ्या स्वतःच्या सवंग प्रतिसादलोलुपतेला स्मरून केला आहे असे समजावे म्हणजे त्याच्या सत्यासत्यतेबद्दल वाद घालण्याचे कारण उरत नाही ! ;-) )

तर मग यावर काय उपाय करता येतील ?

- माउथ पब्लिसिटी : आपल्या मित्र-मैत्रिणिंना स्थळाबद्दल सांगत रहाणे. मुळात उपक्रमावर लिहीणारे हेच "दर्जेदार" असणे गृहित धरले असल्याने , ते ज्याना सांगतील तेही दर्जेदार असतील असे यामागचे गृहितक आहे. आणि दुर्दैवाने तसे दर्जेदार ते न निघाले तर कात्री चालवणारे चालवतीलच. ;-)

- सक्रीय सभासदांना कार्यरत रहाण्याचे आवाहन : जे आहेत त्यांनी थोडे अधिक लिहिले तरी इथली ऍक्टीव्हिटी वाढेल. काही नाही तर जे सोडून जाण्याच्या विचारात आहेत त्यांना तरी थांबवण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. तुम्हाला नवे धागे उघडण्याइतका अवसर नसेल तर आहेत त्या धाग्याना किमान एखादा प्रतिसाद तरी द्यावा. अर्थात "सहमत् आहे !" अशा प्रकारचे जुजबी प्रतिसाद असण्यापेक्षा नसलेले चांगलेच !

** ललित लिखाण येऊ नये हे धोरण मला समजते. पण पाककृतीही येऊ नयेत यामागची कारणी मीमांसा मला कळत नाही. पोळ्यांवरचा लेख चालतो ; पण पाककृती असा विभाग का नसावा हे त्या "पॉवर्स् दॅट् बी"ना ठाऊक.

मुद्दे

बरेचसे मुद्दे विचारकरण्याजोगे असले तरी पटण्यासारखे नाहीत. यायला हवे ते पुरेसे येते आहे का याचे विश्लेषण हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडी निवडीवर करता येईल. मला सध्यातरी वैयक्तिकरित्या वरती नमूद केल्याप्रमाणे उपक्रम पुरेसे (किंबहुना जास्तच) खाद्य पुरवते.

धनंजयांचा नवा लेख आणि त्यावरील प्रतिसाद हे १ लेख म्हणून जरी गणले गेले असले तरी त्याचे वाचन मूल्य हे माझ्यासाठी खूपच अधिक आहे. हा 'एक' लेख आणि त्यावरील चर्चा मला एक पूर्ण दिवस वैचारिक खाद्य पुरवू शकतात. उपक्रमावर आजकाल नव्या लेखांचा वेग मंदावला असला तरी बहुतांशी लेख हे वरील लेखासारखे असल्याने मला 'यायला हवे ते' पुरेसेपेक्षा जास्त वाटते. (त्यामुळे घारे सरांचे अग्निबाणावरील लेख वगैरे अजून ब्याकलॉग मध्येच आहे.)

प्रतिसादांबाबतीतही तसेच आहे. लेखनाला प्रतिसाद आलेले कुणालाही आवडतात पण तिथेही निव्वळ किती प्रतिसाद आले ह्यापेक्षा काय प्रतिसाद आले हे मी जास्त महत्वाचे मानतो. +१,+२....+१० असे १० प्रतिसाद येण्यापेक्षा १च प्रतिसाद जो नेमके काय आवडले हे सांगतो, तो ह्या १० प्रतिसादांना भारी पडू शकतो.

शेवटचा मुद्दा सक्रिय राहण्याचा, तर त्याबबतीत इथे चालक/प्रशासक/ वाचक हे सगळेच आपापला वेळ आणि व्याप सांभाळून मनोरंजन/ज्ञानलालसा ह्या उद्देशाने येतात. तेव्हा ते त्यांच्या परीने सक्रिय राहता येईल तितके असतातच त्यासाठी वेगळे आवाहन करण्याची गरज नाही असे मला व्यक्तिशः वाटते.


पोळ्यांवरचा लेख चालतो ; पण पाककृती असा विभाग का नसावा हे त्या "पॉवर्स् दॅट् बी"ना ठाऊक.

छायाचित्र टिका चालते पण म्हणून कलादालन असा विभाग सुरू करुन त्यात 'माझी बेंगळूरू ट्रीप' अश्या शिर्षकाखाली असंबद्ध चित्रे चिकटवणे चालत नाही, तसेच काहीसे असावे. ;)

प्रतिसाद

हा धागा उपक्रमावरचा उत्साह ओसरू लागला आहे किंवा कसे या विषयावर आहे. माझे विवेचन माझ्या किंवा इतर कुणाच्या वैयक्तिक आवडीनिवडीला धरून नव्हे तर मूळ धाग्यावर प्रतिसाद म्हणून लिहिलेले आहे.

तुमच्या पुढील मुद्द्यांना प्रतिसाद द्यायचा तर सर्वसामान्यपणे मी हेच म्हणेन की , उपक्रमाच्या दर्जाबद्दलच्या उद्दिष्टाबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. पण आंतरजालीय संस्थळांचे माध्यम हे इंटरऍक्टीव्ह माध्यम आहे. त्याची शक्ती ही संवादात आहे. तसे नसते तर वृत्तपत्रे , मासिके यांच्या छापील आवृत्ती आणि इंटरनेट आवृत्ती , विविध ब्लॉग्स् यांच्यापलिकडे अशा संस्थळाना काही कारण उरले नसते. प्रस्तुत स्थळावर या संवादाची प्रक्रिया मंदावल्यासारखी वाटली. ती का नि कशी याचे मी माझ्या परीने विश्लेषण केले आहे.

बाकी इथे येणारे आपापला वेळ सांभाळून येतात हे मान्यच आहे. मात्र त्याकरता वेगळ्या संवादाची गरज नाही - पर्यायाने हा "ओसरत्या उत्साहाचा" मूळ मुद्दा उठवावा हेच अनावश्यक आहे - या विधानाला चुकीच्या अर्थाने एलिटीस्ट् (मराठी शब्द) वास आहे.

अवांतर : उपक्रमाबद्दलच्या संवादात इतर संस्थळांचे सोयीस्कर मुद्द्यांपुरते उल्लेख येणेही रोचकच.

बरोबर आहे

बरोबर आहे. मुद्दा हा आहे की उत्साह ओसरु लागला आहे तो संख्यात्मक की गुणात्मक. संख्यात्मक असल्यास त्यामध्ये चिंता करण्यासारखे काहीही नाही (तसेच संख्यात्मक उत्साह वाढत असला तर त्यात शेखी मिरवण्यासारखेही काही नाही तसे)

प्रश्न आहे गुणात्मक उत्साह ओसरतो आहे का ते. माझ्या मते हे ज्याच्या त्याच्या आवडीवर आणि उपलब्ध वेळेवर अवलंबून आहे. मला वौयक्तिरित्या गुणात्मक उत्साह ओसरतो आहे असे वाटत नाही इतकेच. (थोडी फार तेजी मंदी चालायचीच)

हा मुद्दा उठवुच नये असे माझे अजिबात् म्हणणे नाही उलट अश्या प्रकारच्या चर्चा संकेतस्थळांना चेतना देतात असं माझं मत आहे. माझे एकट्याचेच ह्या चर्चेतले प्रतिसाद बघा :)

उपक्रमाबद्दलच्या संवादात इतर संस्थळांचे सोयीस्कर मुद्द्यांपुरते उल्लेख येणेही रोचकच.

सोयिस्कर हा शब्द खटकला. एखाद्या गोष्टी विषयी टीका टिप्पणी करताना त्या सारख्या इतर गोष्टींचा उल्लेख आणि माफक तुलना येणे स्वाभाविकच आहे असे मला तरी वाटते.

धन्यवाद

माझे मुद्दे सकारात्मक रीतीने समजून घेऊन त्याचा (उपहासासारख्या "स्वस्त आणि मस्त" आणि प्रस्तुत संदर्भात अनुचित अशा साधनाच्या आहारी न जाता) परामर्श घेतल्याबद्दल कोलबेर यांचा आभारी आहे. अशा प्रकारच्या चर्चेला इथे वाव आहे म्हणून इथे येणे आवडते आणि म्हणूनच इथे जास्त चांगले कसे काम होईल याबाबत आस्था वाटते.

आहेत तेच वाचायला कष्ट

अहो सुनीतकाका, इथे जे लेख येतात तेच वाचायला माझ्यासारख्या सामान्याला कष्ट पडतात. एक लेख दोन वेळा-चार वेळा वाचायला लागतो तेव्हा कळल्यासारखा वाटतो. दिवसाला जर असे लेख आणि प्रतिसाद टपाटपा पडू लागले तर पंचाईत होईल हो आम्हा गरीबांची. उपक्रमावर जे लेख येतात आणि ज्या संख्येने येतात त्यावर मी खूश आहे असं नाही पण भारंभार लेख आणि प्रतिसाद नकोत बुवा. वाचून कळले की श्वास घ्यायला उसंतही द्या.

ही संवादाची प्रक्रिया म्हणजे काय ते काही कळलं नाही. "काल भाजीला फोडणी घातली का?" "आमच्या शेजारची मनी व्याली आहे." असे संवाद उपक्रमावर होत नाहीत त्याचे आम्हाला कौतुक आहे. लेखांवरील प्रतिसादांचं म्हणत असाल तर एखादी चर्चा २-३ प्रतिसादांत संपत असेल तर ते त्या चर्चेचं यश माना की. नाहीतर, आहेतच १०१+ प्रतिसाद घेऊन मारूतीच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणार्‍या चर्चा.

पोळीची चर्चा चांगली होती. मला उपयुक्त वाटली आणि वाचल्याक्षणी कळली. त्याला "मीही पोळ्या करून पाहिल्या. वातड झाल्या नाहीत." असा प्रतिसाद देण्याची गरज मला -वाचकाला- आणि चर्चेच्या लेखकाला नसावी हो.

-राजीव.

उपक्रमाचे वेगळेपण

मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. मात्र उपक्रमाने जाणीवपूर्वक एक मर्यादा आखून घेऊन त्यातच जे चांगले ते देण्याचे धोरण ठेवले आहे हे मला आवडते. (आधी या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करणार्‍यांमध्ये मीही होतो मात्र आता जे आहे ते चांगले आहे असे वाटते.) उपक्रमावर येणारा प्रतिसाद हा केवळ तोंडदेखला नसून वाचकाने तो लेख वाचून घेऊन, समजून घेऊन दिला आहे याची खात्री लेखकालाही असते. (हा झेब्रा आहे याला पट्ट्यापट्ट्यांचा घोडा म्हणून हिणवू नका असे काहीसे जीएंनी म्हटलेच आहे). नाहीतर प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या कवितेला छान विडंबन म्हणून वा वा असे प्रतिसाद दिले तर तो लेखकासाठीही अवघड प्रसंग असतो. :)

पाककृती येऊ नयेत याचे कारण मला वाटते मनोगतावर, मायबोलीवर अनेक चांगल्या पाककृती उपलब्ध आहेत. पोळ्यांवरच्या लेखात मला वाटते पोळीच्या पाककृतीपेक्षा पोळी कडक होण्याची कारणे (वैज्ञानिक व इतर) अपेक्षित होती. जी अपेक्षा पूर्ण झाली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

पोळ्यांवरच्या लेखात मला वाटते पोळीच्या पाककृतीपेक्षा पोळी कडक होण्याची कारणे (वैज्ञानिक व इतर) अपेक्षित होती. जी अपेक्षा पूर्ण झाली.

अगदी सहमत. उपक्रमाच्या लवचिकतेचे हे उदाहरण म्हणता येईल. पाककृती कडे वेगळ्या दृष्टीने कसे पहाता येईल याचे ते उदाहरण आहे. मला स्वतःला हा लेख (प्रतिक्रियांमुळे) माहितीपुर्ण वाटला
प्रकाश घाटपांडे

लेखमाला..

अभ्यासपूर्ण चर्चा आवडली..

लौकरच हिंदुस्थानी रागसंगीतातील बंदिशी, त्यातील आम्हाला दिसलेले सांगितिक बारकावे व सौंदर्यस्थळे, कुणाची बंदिश आहे, पारंपारिक आहे किंवा कसे, इत्यादी सर्वांबद्दल माहिती देणारी एक लेखमालिका उपक्रमावर लिहायचा विचार आहे..

बंदिशींची निवड अर्थातच आम्ही करू. हिंदुस्थानी रागसंगीत गाणार्‍या सौ वरदा गोडबोले यांनी या लेखमालिकेकरता बंदिशी गाण्याचे आम्हाला कबूल केले आहे. प्रत्येक लेखासोबत त्या त्या बंदिशी गायल्याच्या दृक्-श्राव्य ध्वनिफितीचा यू नळीवरील दुवाही आम्ही देऊ, जेणेकरून वाचकांना श्रवणाचा आनंद घेता येईल..

आपले हिंदुस्थानी रागसंगीत म्हणजे अतिशय वैविध्यपूर्ण, वैशिष्ठ्यपूर्ण, आणि एकापेक्षा एक सुरेख अश्या बंदिशींचा खजिना! या लेखमालिकेच्या निमित्ताने त्या खजिन्याचा एक धावता आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न राहील..

सौ वरदा गोडबोले या आमच्या गुरुभगिनी आहेत हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. त्यांना अण्णासाहेब रातंजनकर प्रतिष्ठानची अत्यंत मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. भारतरत्न, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी शिष्यवृत्ती, तसेच 'अण्णासाहेब रातंजनकरांच्या बंदिशींचे सौंदर्य' ह्या विषयाच्या अभ्यासासाठी केन्द्र सरकारची दोन वर्षांकरिताची शिष्यवृत्तीही सौ गोडबोले यांना मिळाली आहे..

येत्या चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी, अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या लेखमालिकेचा शुभारंभ करायचा आमचा मानस आहे. उपक्रमावरील मायबाप वाचकांचा आशीर्वाद अर्थातच अत्यावश्यक आहे!

उपक्रमाच्या लेखन संग्रहात आमच्यासारख्या सामान्य सभासदाचा तेवढाच एक खारीचा वाटा..!

आपला,
(हिंदुस्थानी रागसंगीताचा एक विद्यार्थी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

उत्तम संकल्प

उत्तम संकल्प तात्या! चैत्र शुद्ध प्रतिपदेची वाट पहात आहोत.

हेच म्हणतो

वाट पाहत आहोत.

अस्सेच म्हणतो.


अरे परशुराम ये ये. हा परशुराम. ------ औषध आणतो तो, वाट पाहा. वा वा आणणार तर.

- धनंजय माने, बनवाबनवी

प्रतिसाद व वाचनसंख्या

लेखकाला प्रतिसाद व वाचनसंख्या ही महत्वाची वाटते. ज्या विचारांशी आपण पुर्णतः सहमत आहोत त्याविषयी व अंशतः सहमत आहोत त्याविषयी आपण टंकण्याचे कष्ट घेत नाही. बरेच सदस्य परस्परांना वैचारिकदृष्ट्या ओळखतात. तोचतोच पणा जरी आला तरी त्यात काही छटा वेगळ्या असु शकतात. त्यातील बारकावे आपण शोधत बसत नाही.
हे केवळ परस्परांची वैचारिक / बौद्धिक खाज भागवण्यासाठी असलेले व्यासपीठ नक्कीच नाही. उपक्रमाच्या धोरणांमुळे काही 'मर्यादा' पडतात हे खरे असले तरी तीच त्याची 'ताकद' आहे. लेखकांनी फक्त आपला 'रतीब' घालुन निघुन जावे असे नक्कीच अपेक्षित नाही. थोडीशी थट्टामस्करी संवाद (वाद) वाढवण्यास मदत करते. सगळेच गुडी गुडी असल्यावर कसा उत्साह राहणार.
खरडवही चा वापर करा संवाद वाढवा. निरर्थक वा गुळगुळीत झालेली वाक्ये देखील आत्मियता निर्माण करतात.
प्रकाश घाटपांडे

चर्चा चांगली होत आहे

चर्चा चांगली होत आहे.
उपक्रमाची निर्मिती हा एक मुद्दा विचारात घ्यायला हवा. कोणाशी स्पर्धा अथवा आकस या कारणाने उपक्रम सुरु झाले असे वाटत नाही. तसेच इतर संकेतस्थळे निर्माण झाल्याने उपक्रमाचा फायदाच झाला आहे असे वाटते. कोलबेरने संख्यात्मक आणि गुणात्मक हा मुद्दा योग्य प्रकार सांगितला आहे. आपण असे म्हणू शकतो कि उपक्रमावर चांगल्या विषयांवर लेखन होते. पण काही सदस्यांना माहितीपूर्ण लेख वाचण्याची भुक जास्त असल्याने त्यांना लेखनाचा वेग कमी वाटतो.

आता खालील दोन वाक्यांचा परत एकदा विचार करु.

  1. उपक्रमची सदस्यसंख्या दिवसेंदिवस वाढत आसतांना लेखनसंख्या कमीकमी होत जाणे उत्साह ओसरल्याचे लक्षण नाही काय?
  2. उपक्रमींचा ओढा मूळलेखन करण्यापेक्षा प्रतिक्रिया देण्याकडे असावा असे वाटते.

वाक्य १ - सदस्य संख्या वाढते आहे. थोडक्यात उपक्रमावर वाचन मात्र राहण्यासाठी सदस्यत्व घेण्याची गरज नसावी. पण सदस्य संख्या वाढते आहे. याचाच अर्थ असा काढता येऊ शकतो की उपक्रमाच्या धोरणांना अनेकांची मान्यता आहे. हां, प्रत्येक सदस्य लेखक असलाच पाहिजे हे मला तरी पटत नाही. याच सोबत लेखन संख्या वाढली तर आनंदच आहे. पण एक माहितीपुर्ण लेख लिहायला चांगला अभ्यास आणि वेळ लागतो. तसेच अशा लेखांना प्रतिसाद देणारे सुद्धा अभ्यासपुर्ण असतात. त्यामुळे लेख लिहिताना प्रतिसादात काय प्रश्न विचारले जातील हा एक कळीचा मुद्दा असतोच. तसेच काही उपद्रवी सदस्य रंगाचा बेरंग करणारे असतात त्यामुळे चांगल्या विषयाचा विचका झाल्याची उदाहरणे सुद्धा आहेत. हा मुद्दा विचारात घेतल्यास अशा सदस्यांचा बंदोबस्त तत्काळ करण्याची धोरणे असणे सुद्धा गरजेचे आहे. अलिकडचे एक उदाहरण चांगले बोलके आहे.

वाक्य २ - लेख/चर्चा जेवढी अभ्यासपुर्ण आणि सर्वसमावेशक असते तेवढा लोकांचा प्रतिसाद देण्याकडे जास्त कल असतो असे आपले माझे निरिक्षण आहे. उपक्रमावरचे काही समुदाय आणि त्यातले लेखन पहा. काही लेखक असे आहेत ज्यांच्या लेखनाला हमखास भरगोस आणि ते सुद्धा पाडलेले आहेत असे नसलेले प्रतिसाद असतात. ते लेखन संवंग लोकप्रियतेसाठी केलेले असते असे कधीच वाटत नाही तर सदस्यांचा अशा विषयांमधला रस हे कारण असते. याच सोबत काही सदस्य असेही असतात ज्यांना प्रत्येक विषयात आपला प्रतिसाद देण्याची इच्छा असते. त्यामुळे अशा सदस्यांचा ओढा प्रतिसाद देण्याकडे असतो.
इथे एक सदस्य असे आहेत जे हमखास चांगल्या लेखनाला प्रतिसाद देतात. पण लेखन कधीच करत नाहीत. कुठेही लेखन न करणार्‍या या सदस्याने येथे चक्क अभ्यासपुर्ण छायाचित्रे टाकून आपले लेखन प्रसिद्ध केले आहे.


:)

छान मनोरंजक चर्चा :)
इस्लाम खतरे मे है या हमखास लोक जमवणार्‍या आरोळीसारखा या लेखाचा विषय पण हमखास प्रतिसाद आणनारा. थोड्याफार कालावधीत पुन्हा पुन्हा दिसणारा.

बाकी माझ्या काही मित्रांना इथल्या अपडेट्स पुरेसे खाद्य पुरवतात हे पाहुन आनंद झाला. मिळालेल्या मोकळ्या वेळातुन इतर संस्थळांवरची छायाचित्रे वैगेरे पाहुन संपली की अगदी पुरेसे वाचन होईल एवढे माहितीपुर्ण लिखाण उपलब्ध असते असे कायसेसे मत त्यांचे असावे असे वाटले.

:)

हमखास प्रतिसाद

इस्लाम खतरे मे है या हमखास लोक जमवणार्‍या आरोळीसारखा या लेखाचा विषय पण हमखास प्रतिसाद आणनारा.

खरं आहे. पण अश्या चर्चांमुळे इतर स्थळांचे 'ओर्कुट' केलेले आमचे काही मित्र त्यानिमित्ताने 'इथेही' पिंका टाकायला येतात हा तोटाही आहे.

म्हणुनच आम्ही संख्यात्मक उत्साह न धरता गुणात्मक उत्साह महत्वाचा म्हणातो तो त्यासाठीच.

तेव्हा हमखास प्रतिसाद आणणारे ते चांगले असे नेहमी असतेच असे नाही . तुमच्या ह्या प्रतिसादाने मला माझा मुद्दा मांडायला छान मदत झाली. धन्यवाद!

सहमत

एकदम खरे!!!
असो, हे चालायचच...


ही ही ही

>>खरं आहे. पण अश्या चर्चांमुळे इतर स्थळांचे 'ओर्कुट' केलेले आमचे काही मित्र त्यानिमित्ताने 'इथेही' पिंका टाकायला येतात हा तोटाही आहे.

ही ही ही !!!
कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी कायसेसी म्हण उगाच आठवली :)

बाकी सर्किटरावांची कमतरता इथे जाणवली :)

-
(मसंस ऑर्कुटीकरण एक्पर्ट)

आनंदयात्री

या प्रतिसादाखालील काही प्रतिसाद मूळ चर्चेशी संबंधीत नसल्याने अप्रकाशित केले आहेत याची नोंद घ्यावी. नमुन्यादाखल सदर प्रतिसाद ठेवला आहे. अश्याप्रकारचे सर्व प्रतिसाद चर्चेतून अप्रकाशित केले जातील. - संपादन मंडळ.

इस्लाम खतरेमें

अशी आरोळी सर्वत्र ऐकू गेलेली दिसते. :-)

उपक्रमावर गजबज आणि बजबज दोन्ही वाढल्याचे लक्षात आले. - ह. घ्यावे.

रायटर्स ब्लॉक

उपक्रमावरचे वेचक आणि मर्यादित लेखन हे 'उपक्रम' चे बलस्थानच आहे असे मला वाटते. लेख, सदस्य आणि प्रतिसाद यांची संख्या तसेच संकेतस्थळावरील वर्दळ हे मापदंड लावून कुठल्याही स्पर्धेत उपक्रमाला खेचू नये. उपक्रमावरचे लेखक हे काही व्यावसायिक लेखक नाहीत, त्यामुळे त्यांना येणारा 'रायटर्स ब्लॉक' समजण्यासारखा आहे.
सन्जोप राव

उपक्रम ही गोष्टच वेगळी आहे.

नमस्कार,
मी उपक्रमचा अगदी नवा सदस्य आहे. उपक्रमावर ज्या क्वालिटीचे लिखाण व चर्चा होतात ते पाहुन मला इथे सदस्यत्व घेण्याचा मोह आवरला नाही.
अनेक उत्तमोत्तम विषयांवर अतिशय सखोल चर्चा इथे घडत असताना पाहुन "मराठी संकेतस्थळांच्या निर्मीतीमागचा उद्देश" इथे मी बर्‍याच अंशी सफल होताना पाहिला व अर्थात ते पाहुन बरे वाटले.
अतिशय सखोल व व्यासंगी चर्चा करण्यास वा नविन तंत्र शिकण्यास उपक्रमाहुन उत्तम व खास ह्याच हेतुने बनवलेले दुसरे मराठी संकेतस्थळ अस्तित्वात नाही हे सत्य आहे.

ओसरु लागलेला उत्साह वगैरेवर भाष्य करण्याइतका मी अजुन उपक्रमाशी परिचीत नाही मात्र उपक्रमाला "दररोज पडणारे नवे लेख व वाढती वर्दळ" ह्या मापदंडात तोलु नये असे मला वाटते. उपक्रमाचा क्लासच वेगळा आहे.
सध्या मी इथे अत्यंत नवा असल्याने माझा बहुतांश वेळ जुन्या चर्चा वाचण्यातच जात आहे.
मात्र जशी संधी मिळेल तसे मलासुद्धा इथे लिहण्यात व चर्चा करण्यात मज्जा येईल असे आग्रहाने नमुद् करावे वाटते. आम्हाला जसे जमेल तसे आम्ही आमचे नवे व उपक्रमाच्या दर्जाला साजेल असे लिखाण घेऊन इथे नक्की येऊ ...
बाकी इथले लेखक व्यवसायीक नसल्याचा व त्यामुळे पर्यायाने येणारा "रायटर्स ब्लॉक" हा मुद्दा पटण्यासारखा आहे ...

उपक्रमाला पुढील वाटचालीस शुभेच्छा, आम्हीही जमेल तसा हातभार लाऊ अशी खात्री आहे.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

सहमत

उपक्रमाला "दररोज पडणारे नवे लेख व वाढती वर्दळ" ह्या मापदंडात तोलु नये असे मला वाटते. उपक्रमाचा क्लासच वेगळा आहे.

अगदी मनातले बोललात डॉन भाऊ. आमचाही हाच मुद्दा आहे.

उपक्रमच सर्वोत्तम

उपक्रमच सर्वोत्तम असे आमचे अजिबात म्हणणे नाही. आम्ही तर पक्के भारतीय. सर्व संकेतस्थळ समभाव. पण शेवटी आपली आवड ही असतेच. तसेच ती आवड असण्याची कारणे असतातच. त्यातली काही तुम्ही लिहिली आहेतच. :)


प्रतिसाद आवडला

अतिशय सखोल व व्यासंगी चर्चा करण्यास वा नविन तंत्र शिकण्यास उपक्रमाहुन उत्तम व खास ह्याच हेतुने बनवलेले दुसरे मराठी संकेतस्थळ अस्तित्वात नाही हे सत्य आहे.

वाक्य थोडेसे अतिशयोक्त असले तरी सुखावणारे वाटले. ;-)

मात्र जशी संधी मिळेल तसे मलासुद्धा इथे लिहण्यात व चर्चा करण्यात मज्जा येईल असे आग्रहाने नमुद् करावे वाटते. आम्हाला जसे जमेल तसे आम्ही आमचे नवे व उपक्रमाच्या दर्जाला साजेल असे लिखाण घेऊन इथे नक्की येऊ ...

वा! वा! आपल्या लेखनाशीही आमची तोंडओळख आहेच. लवकर काही येऊ दे.

बाकी इथले लेखक व्यवसायीक नसल्याचा व त्यामुळे पर्यायाने येणारा "रायटर्स ब्लॉक" हा मुद्दा पटण्यासारखा आहे ...

रायटर्स ब्लॉकच्या मू़ळ लेखकाशी आणि आपल्याशी सहमत आहे. :-)

छान

-- उपक्रमावर ज्या क्वालिटीचे लिखाण व चर्चा होतात ते पाहुन मला इथे सदस्यत्व घेण्याचा मोह आवरला नाही

मलाही.

आम्ही फक्त वाचणारे...

कोर्डे साहेब,
आमच्या सारखे सदस्य पण बरेच असतील ना... आम्हाला मराठी मधे "शुद्ध" आणि "खूप" लिहीता येत नाही, पण उपक्रमावर आलेले उत्तम लेखन वाचायला आम्ही नियमित येत राहतो... येथे उपक्रमावर मराठी चे एवढे मोठे विद्वान लिहीतात, त्यामधे उगाच आमच्या सारख्यांनी नाक खुपसून उलट-सुलट मराठी कशाला लिहायचे... असो... अर्थात जरी लेखकांची संख्या कमी असली तरी पाठक संख्या वाढती आहे... हे ही महत्वपूर्ण आहे... असे मला वाटते... आणि लेखकांची संख्या पण वाढायला हवी हे ही तितकेच खरे... पण सारेच सदस्य लिहीत नाही म्हणून जे लोक नियमित लिहीत आहेत त्यांनी आपले लेखन कमी करू नये... ही विनंती... उपक्रमावर येवून खूप बरं वाटतं... लिहीत रहा... शुभेच्छा... (आम्ही हिन्दी पट्टीतली लोकं, त्यामुळे मराठीत वाचन आम्हाला सोपं वाटतं पण लेखन नाही)
http://sureshchiplunkar.blogspot.com

चालेल

सुरेशराव.. तुमच्या भागात मराठी जस बोललं जात तसं लिहा.. फक्त माहितीपूर्ण असलं म्हणजे झालं... आवडेल वाचायला.. शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

माझा अनुभव

संख्यात्मक, गुणात्मक वगैरेबद्दल सांगण्याइतके मी उपक्रमाचे वाचन केलेले नाही. माझ्या सदस्यत्वाला आता दोन वर्षे पूर्ण व्हायला आली आहेत, पण या ठिकाणी लिहावे असे मात्र मला अलीकडेच वाटू लागले आहे. उपक्रमावर लिहिणार्‍या लोकांची संख्या जर खरेच घटत चालली असेल तर ती घट भरून काढण्याच्या कामात मी एक खारीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लिहिण्याचा उत्साह निदान माझ्या बाबतीत कमी न होता वाढला आहे. असे मला म्हणावे लागेल.

संख्या आणि गुण

संख्यात्मक विश्लेषण हेच अनेकदा गुणात्मक विश्लेषण म्हणून स्वीकार्य असते, कारण गुणात्मक लेखनाचे एकूण लेखनातील प्रमाण साधारणतः स्थिर असते.

ह्या बद्दल काय वाटते ?

- उपक्रमी

संख्यात्मक विश्लेषण हेच अनेकदा गुणात्मक विश्लेषण

कारण गुणात्मक लेखनाचे एकूण लेखनातील प्रमाण साधारणतः स्थिर असते.

हे मराठी संकेतस्थळांबाबतील दिसून येत नाही. बर्‍याचवेळेला कचरा लेखन आणि प्रतिसाद वाढल्याने वरवर जरी ट्रॅफिक वाढलेला दिसता असला तरी पण गुणात्मक लेखांचे प्रमाण कमी कमी होत गेलेले दिसुन आलेले आहे.

सहमत आहे

कोलबेरपंतांच्या निरीक्षणाशी सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मी सुद्धा ...

मी सुद्धा कोलबेरपंतांच्या चपखल निरीक्षणाशी सहमत आहे.
ह्या गोष्टी बर्‍याच वेळा पहायला मिळतात ....

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

धन्यवाद

उपक्रमींना अश्या लेखाचे इंजेक्शन लागु पडते हे या लेखानंतर अधिक वेगाने आलेल्या उत्तमोत्तम लेखांनी (पुन्हा एकदा) सिद्ध झाले आहे :)
धन्यवाद शरदराव :)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

 
^ वर