पुस्तक परिचय -"काबूल इन विंटर"

"मी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच...
११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्‍या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. ... जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली... "
ऍन जोन्सच्या "काबूल इन विण्टर" ह्या पुस्तकाची ही सुरवात आपल्या मनाची जी पकड घेते ती शेवटपर्यंत सुटत नाही.

ऍन २००२ साली स्वयंसेवक म्हणून अफगाणिस्तानात गेली आणि पुढची चार वर्षं ती समाजसेवा करत तिथेच राहिली, सामान्य अफगाणी लोकांमधे फिरली, तिनं त्यांना जवळून पाहिलं. हे पुस्तक म्हणजे त्या चार वर्षांचं अनुभव कथन. त्यात वस्तुस्थितीपेक्षा हजारो मैल दूर, वातानुकुलित स्टूडियोमधून, प्रसिद्ध होणार्‍या गुळगुळीत वार्तापत्रांचा बेगडीपणा नाहीये. आहे तो स्वानुभवातून लिहिलेल्या प्रसंगांचा सच्चेपणा. ते वर्णन चटकन मनाला भिडतं कारण ते अफगाणी मानसिकतेचं आणि तिथल्या समाजाचं जवळून आणि अनेक अंगाने सदर्शन घडवतं.
ऍन जोन्स ही न्युयॉर्क टाईम्ससारख्या अतिप्रतिष्ठेच्या वृत्तपत्रात पत्रकार. व्यवसायात उपयोगी पडणारी संशोधक वृत्ती तिच्या इतर लेखनात सुद्धा सहज जाणवून येते. ३०० पानी असलेल्या ह्या पुस्तकासाठी वापरलेल्या तिने तब्बल पावणेदोनशे संदर्भ वापरले आहेत. पण हे पुस्तक म्हणजे नुसती संदर्भांची जंत्री नाही. हा प्रगाढ्यतेचा आव आणणारा संशोधन-ग्रंथ तर नाहीच नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे हे एक अनुभवावर आधारलेलं केवळ एक सद्यस्थितीवरचं भाष्य आहे.

पुस्तक ऍनने तीन भागात मांडलं आहे. पहिल्या "इन द स्ट्रीटस्" मधे कायम चालणार्‍या युद्धाने उध्वस्त झालेल्या अफगाणी समाजाचं चित्र, वर्षांनुवर्ष चालत असलेल्या ह्या युद्धांमागचा इतिहास, भिन्न संस्कृती आणि भटक्या टोळ्यांची परस्परांवर कायम वर्चस्व गाजवणारी वृत्ती, ह्या वृतीचा फायदा घेऊन युद्धांच्या भडक्यामधे तेल ओतणारा पाकिस्तानच्या आय-एस-आय चा हात आणि त्याला असणारी सी-आय-ए ह्या अमेरिकन गुप्तहेरखात्याची फूस ऍनने विस्ताराने मांडली आहे.

ह्या भागाच्या पार्श्वभुमीवर ती ओळख करून देते ती काबूलमधल्या स्त्रियांच्या तुरुंगाची - "इन द प्रिझन्स" ह्या भागात.
तुरुंगातल्या स्त्री-कैद्यांवरचे आरोप, आणि तुरुंगात येण्याआधी आणि आल्यानंतर त्यांच्यावर झालेले अत्याचार पाहून स्त्री कैदी आणि पुरूष-आरोपी (बहुतेकवेळा त्या स्त्रीला वेश्याव्यवसायात विकुन तिच्या कमाईवर जगणारा सख्खा भाऊ, वडील नाहीतर उकळतं तेल अंगावर "गंमत" म्हणून फेकणारा नवरा हेच आरोपी!) ह्यांच्यापैकी टोकाच्या पुरूषप्रधान अफगाणी संस्कृतीत नक्की दोषी कोण हा प्रश्न पडतो.
ऍला स्त्री-मुक्तीच्या क्षेत्रात एक आदराचं स्थान आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार(लग्नाच्या चौकटीत आणि चौकटीबाहेर) तिनं तिच्या इतर ७ पुस्तकांमधून मांडले आहेत. साहजिकच, ह्या पुस्तकामधेसुद्धा अफगाणी स्त्रिया आणि त्यांच्यावर नवरा, बाप, भाऊ यांच्याकडून नित्य केले जाणारे अत्याचार, स्त्रीयांचं अफगाणी समाजात असलेलं पायातल्या वाहणेपेक्षाही खालचं स्थान, वारंवार होणार्‍या बाळंतपणांमुळे स्त्रियांचं आजारांनी ग्रस्त असं हलाखीचं आयुष्य (फक्त ४६ वर्षे!) हे आपल्या पांढरपेशी मनाच्या आकलनापलिकडचं आहे. ज्या गोष्टी वाचणं कठीण असे अनुभव जवळून पाहून त्यांचं तटस्थपणे वर्णन करण हे अर्थात येर्‍यागबाळ्याचे काम नोहे.

पण हे पुस्तक म्हणजे स्त्रियांवरच्या अत्याचारांची ओळख ह्यावर थांबत नाही. तिसर्‍या "इन द स्कुलस्" ह्या भागात तिच्या शिक्षणाच्या स्वयंसेवी कामाचे अनुभव आले आहेत. त्या अनुभवांमधे तिच्या प्रौढ शिक्षक-शिक्षण वर्गात असलेल्या स्त्री-पुरुष अशा दोन्हीप्रकारच्या शिक्षक-विद्यार्थ्यांचं बारकाईने केलेलं स्वभावचित्रण येतं. पुढे ह्यातल्या पुरुष-शिक्षक आणि स्त्री-शिक्षकांनी त्यांच्या शिक्षणाचा(त्यांच्यापरीने) कसा उपयोग केला ह्याचा ऍनने केलेला पाठपुरावा आहे. स्वयंसेवी कामासाठी आर्थिक मदत मिळवताना तिला आलेले अनुभव म्हणजे आंतर्राष्ट्रीय स्वयंसेवी आणि बिना-सरकारी संस्था कशा काम करतात, त्यांना मिळणारी लाखो डॉलर्सची मदत कुठुन मिळते, त्या मदतीचा विनिमय कसा होतो हे सगळं ग्रास-रूट लेव्हलवरून केलेलं वर्णनच आहे.
शाळा चालवताना करझाई सरकारच्या न्याय,शिक्षण आणि संस्कृती मंत्रालयात घालावे लागलेले खेटे आणि तिथले अडेलतट्टु, अति-बुरसटलेल्या विचारांचे कारकून/सचिव इतकच काय तर उच्चपदस्थ स्त्री-न्यायाधिशसुद्धा आपल्याला "असं सुद्धा सरकार असतं?" हा विचार राहून राहुन करायला लावतात.

वाचकाला भाषिक सामर्थ्य आणि डोळे उघडवणार्‍या अनुभवांच्या जोरावर घट्ट पकडून ठेवणार्‍या ह्या पुस्तकामधे काही मनोरंजक आणि धमाल विनोदी प्रसंगदेखील आहेत. अफगाणिस्तानचा राष्ट्रीय खेळ असणार्‍या बुझकाशीच्या वर्णनामधून(आठवतो का रँबो-३?) उलगडुन दाखविलेली अफगाणी पुरुषाची मानसिकता ऍनने नर्म विनोदी अंगाने रेखाटली आहे.
या पुस्तकात, कुठेही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची घाई नाही. लेखिकेनं परिस्थितीचं बरचसं समतोल आणि वस्तुनिष्ट वर्णन करत वाचकासमोर एक गुंतागुंतीचं आणि अनेक बारकावे असलेलं चित्र उभं केलं आहे. मी "बरचसं समतोल" अशासाठी म्हटलं,की ऍनचा डाव्या विचारसरणीचा मवाळ (डेमॉक्रॅटिक)स्वभाव स्पष्टपणे दिसतो. त्यात तिचे जॉर्ज बुश सारख्या कट्टर उजव्या आणि भांडवलशाही विचाराच्या सरकार वर ओढलेले ताशेरे (खुद्द बुशचा उल्लेख सुद्धा "कनिष्ट बुश"/बुश द लेसर असा उपहासात्मक येतो.) लपून राहत नाही. पण ह्या निमित्ताने अमेरिकेतले(किंवा एकुणच पाश्चिमात्य जगात), विशिष्ट राजकिय विचारसरणीची उघडपणे बाजु घेऊन भाष्य करणारे टिव्ही चॅनल्स, वृत्तपत्रे हे "व्यावसायिक पत्रकारितेचं", (भारतात सहसा न पाहायला मिळणारं) वेगळ जग समोर आणतात.

एकुण काय, हे पुस्तक वाचल्यानंतर "आजचा अफगाणी समाज" म्हणजे काय हे जाणवतंच पण त्याबरोबर एखाद्या कसबी विणकराने आपल्यासमोर अनेक बारकाव्यांचं चित्रण करणारा गालिचा झरझर विणून दाखवावा आणि आपण थक्क होऊन पाहत राहावं असं वाटत राहतं.


पुस्तकाचे नावः काबूल इन विंटर
लेखिका: ऍन जोन्स.
प्रकाशकः पिकॅडॉर प्रकाशन, न्युयॉर्क
पृष्ठे: ३२१
किंमतः १४$

टीपः चांगल्या पुस्तकाचा आस्वाद घ्यायला भाषेची आडकाठी येत नाही असं म्हणतात. हे पुस्तक मुळ इंग्रजीतून आहे. माझ्या माहितीप्रमाणे मराठी अनुवाद अजुनतरी उपलब्ध नाहीये.

Comments

आवडले

खुप दिवसांनी चांगले पुस्तक परिक्षण वाचायला मिळाले.

जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली... "
हे वाक्य अर जगातल्या समस्त सारसार विचार करणार्‍यांचे प्रतिकच आहे.
त्यातही अमेरिका विरोध टोकाला पोहोचला असतांना जीवावर खेळून तेथे राहून त्या समाजाची अवहेलना प्रत्यक्ष पाहून शब्दात बांधणे हे अजोनच कठीण काम.

म्हणून, कठीण असे अनुभव जवळून पाहून त्यांचं तटस्थपणे वर्णन करण हे अर्थात येर्‍यागबाळ्याचे काम नोहे.
हे वाक्य मनोमन जाणवून गेले.

पुस्तक मिळवून वाचण्याचा नक्की प्रयत्न करेन.
आशा आहे आमचे सावाना लवकरच आणेल.

याच विषयावरचे प्रतिभा रानडे यांचे अफगाण डायरी वाचनीय आहे. मात्र हे बरेचसे राजकिय विश्लेषण आहे. मुळातच अस्थिर राहिलेला हा प्रदेश, त्यात टोळीवाल्यांनी आपल्या मनाप्रमाणे चालवलेली हुकुमशाही. मानवी वेदनेची व क्रौर्याची गाठलेली परीसीमा अश्या अनेक अंगांना हे ही पुस्तक स्पर्श करते.
या पुस्तकात वाचलेला एक अंगावर शहारे आणणारा शिक्षेचा प्रकार म्हणजे, पकडलेल्या सैनीकाची कमरेवरील त्वचा कमरपट्ट्या प्रमाणे कापायची. आणि अंगातला शर्ट काढावा तशी डोक्याकडून ओढून काढायची.

तसेच हे पुस्तक वाचले असेल तर आत्ताच्या सामाजिक अराजकाची बीजे संशयी स्टालीनवादा पर्यंत पोहोचलेली दिसतात. अरूण साधूंचे तिसरी क्रांती वाचले तर त्याची दुसरी बाजूही समोर येते. (साधू कम्युनिस्ट आहेत असे हे पुस्तक वाचल्यावर प्रकर्षाने जाणवते!)

या शिवाय निळू दामले हे ही अफगाणीस्तानला जावून पत्रकारिता करून आलेल्यांपैकी धाडसी पत्रकारांपैकी एक आहेत. त्यांचा या वेळच्या दिवाळी अंकात आलेला अफगाणिस्ताना विषयीचा लेख वाचनीय होता.

नवीन प्रकारचे साहित्य दर्शन आणल्या बद्दल अनेकानेक धन्यवाद!

(आपल्याच साठ्यातल्या, कुठल्यातरी त्याच त्या जुन्याच लेखकांचे नव-नवीन गुणगान वाचून वाचून पार कंटाळा आला होता, अगदी प्रतिसादही द्यायची इच्छा होत नव्हती. पण या नवीन लेखीका/पुस्तका विषयी वाचून प्रतिसाद द्यावासा वाटला.)

आपला
गुंडोपंत

नेटके परिक्षण

अश्या प्रकारची घालमेल वाढवणारी पुस्तके न वाचायचे मी ठरवले होते.. पण हे परिक्षण वाचून पुस्तक वाचावेसे वाटत आहे.
पुस्तक वाचेन की नाहि माहित नाहि.. मात्र परिक्षणे वाचायला नक्की आवडतील.
असे नेटके परिक्षण अजूनहि पुस्तकांचे येऊ द्या!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

छान

उपक्रमावर स्वागत. पुस्तक परीक्षण सुरेख झाले आहे. विस्ताराने प्रतिसाद देतोच. मात्र अमेरिकेप्रमाणेच आपल्याकडची वृत्तपत्रे व मीडिया निष्पक्षपणाची झूल पांघरली असली तरी कोणत्या पक्षाची बाजू घेतील हे नेमके ओळखता येते.

उदा. मराठीत सांगायचे झाले तर सकाळ, सामना, लोकसत्ता, मटा, लोकमत, तरुण भारत ही वृत्तपत्रे अनुक्रमे राकाँ, शिवसेना, काँग्रेस, मनसे, काँग्रेस, भाजप यांची बाजू घेतात असे मला वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद..

पुस्तक परीक्षणाबद्दल धन्यवाद. पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रतिभा रानडे यांचे 'अफगाण डायरी' निश्चितच वाचण्यासारखे आहे. 'काबूल कंदाहरकडील कथा' हे त्यांचे दुसरे पुस्तकही बर्‍यापैकी वाचनीय!

सौरभ.
==================

स्वागत!

उपक्रमावर स्वागत आहे. नेटके परीक्षण आवडले.

पुस्तकाचे शीर्षक काबूल इन विंटर असे का असावे बरे?

परिक्षण छान

वा! विंजिनेर साहेब परिक्षण छान झालं आहे.

मला अशी वास्तववादी नॉन फिक्शन पुस्तकेच वाचायला अधिक आवडते.

तुमच्या परिक्षणाने हे पुस्तक वाचायची नक्कीच इच्छा निर्माण झाली.

छान परीक्षण

पुस्तक वाचायचे कुतूहल निर्माण झाले आहे.

धन्यवाद

गुंडोपंत, ऋषिकेश, आजानुकर्ण, सौरभदा, प्रियाली, कोलबेर आणि धनंजयः
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. जे वाचनमात्र होते त्यांचे ही आभार.

"अफगाण डायरी"बद्दल ह्याच पुस्तकाबद्दल इतरांशी चर्चा करतांना ऐकले आहे. मिळवून वाचायला पाहिजे ते आता...

@प्रियाली: काबुल इन "विंटर" अशा साठी की लेखिका तिथे २००२ च्या हिवाळ्यात प्रथम गेली आणि पुढचे चार "हिवाळे" तिने तिथे पाहिले. म्हणून हे शिर्षक :)

परिक्षण

अतिशय प्रभावी परिक्षण आवडले.

 
^ वर