स्त्रीत्वदिना निमित्ताने...

१.
इव्ह, "मी खूप विचारात पडलेय..."
दैवीशक्ती, "काय चाललय तुझ्या मनात?"
इव्ह, "हे बघ, तु मला बनवलंस, ही सुंदर बाग बनवलीस, पशु-पक्षी बनवलेस, पण आजकाल मला जरा भीती वाटायला लागलीय."
दैवीशक्ती, "बोलत रहा..."
इव्ह, "बऱ्याच वेळा मला कंटाळा येतो- काही मजाच नाही आयुष्यात. आणि हे इकडे तिकडे फ़िरणारे जंगली श्वापदं, विषारी साप...मला खूप भीतीपण वाटते."
दैवीशक्ती (विचारात पडून), "बरं..."
"हे बघ इव्ह माझ्याकडे एक कल्पक विचार आहे. मी एक "पुरुष" बनविणार तुझ्यासाठी"
इव्ह, "पुरुष?" हे काय प्रकरण आहे?"
दैवीशक्ती, "पुरुष हा एक दोषपुर्ण प्राणी असेल. त्याला अनेक कमकुवती असतील व हलक्या सवयी असतील. तो खोटं बोलेल, फ़सवेल आणि मुर्खासारखा वागेल- खरं म्हणजे तो एक कायमची डोकेदुखी असेल. पण त्याला काही चांगल्या बाजुही आहेत. तो ताकदवान असेल, आडदांड असेल. तो तुझे रक्षणही करेल, तो शिकार करेल आणि हे तुला बरेच फायद्याचे असेल."
इव्ह, "हं..मला असे वाटतेय की ही "पुरुष" कल्पना राबवायला बरी आहे. पण मला सांग, मला आणखी काही माहिती करुन घ्यायला हवी आहे का?"
दैवीशक्ती, "एव्हढेच..की, पुरुष एका अटीवर मी तयार करीन...जसे आपण बोललो की, त्याच्या उद्धटपणाचा विचार करता, ताळतंत्र सोडून वागण्याच्या सवयीनुसार व स्वकेंद्रीत व्यक्तिमत्वाला धरुन, पुरुषाला नेहमी असे वाटत राहील की, जगात सर्वप्रथम तोच आला. आणि तुला माहितच आहे की, जगात इतर बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत वाद घालण्यासाठी त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य ठरेल. आणि हे बघ ही गोष्ट आपल्या दोघांतच राहीली पाहिजे.. तुला तर माहितीच आहे बायका-बायकांमधील गोष्टी...

२.
एक लहान मुलगा आणि त्याचे वडील कारने जात असता त्यांना अपघात होतो व त्यात ते दोघे जबर जखमी होतात. यथावकाश त्यांच्यापर्यंत मदत पोहोचते व त्यांना रुग्णवाहीकेतुन हॉस्पिटलला आणले जाते. ते दोघेही तो पर्यंत बेशुद्ध झालेले असतात. हॉस्पिटल मधे ही अपघाताची बातमी आधीच पोहोच्ल्यामुळे डॉक्टर तयारच असतात व त्यांचा स्टाफ दारार स्ट्रेचर घेऊन वाट पहात असतात. डॉक्टर आत ऒपरेशन्ची तयारी करत असतात.
रुग्णवाहीका हॉस्पिटल मधे पोहोचते पण तो लहान मुलगा आणि त्याचे वडील कोण आहेत हे कोणालाच माहित नसते. त्यांच्या नातेवाईकांना कसे कळवावे ह्या विवंचनेत असतानाच, त्यांना ऑपरेअशन थिएटर्मधे नेले जाते.
नर्स डॉक्टरांना माहिती देते की, पेशन्ट कोण आहेत हे अजुन कळले नाही.
ह्यावर डॉक्टर म्हणतात, त्याची काही गरज नाही, तो माझा नवरा आणि मुलगा आहे.

ज्यांनी ज्यांनी दैवीशक्ती आणि डॉक्टरच्या जागी "पुरुष" पात्र मनात पाहिले, त्या मानसिक घडणीला मानसशास्त्रात "इम्प्लिसीट असोशिएन" म्हणतात.

हे माझे वैयक्तिक मत आहे- जेव्हा स्त्रीला पुरुष (व पुरुषाला स्त्री) त्याच्या/तिच्या मनातल्या ह्या अशा "इम्प्लिसीट असोशिएन" मधे न अडकवता "पाहिल", तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष नात्यात प्रगती होईल.

कोणताही प्रतिसाद देण्याआधी हे पहावे अशी नम्र विनंती:
इथे जा- https://implicit.harvard.edu/implicit
मग भारताच्या झेंड्यावर टिचकी मारा, आणि मग "जेंडर" हा विषय निवडा.

[वरील दोन्ही प्रसंग मी भाषांतर केले आहेत. माझे त्यातील कष्ट म्हणजे भाषांतर करणे व डोक्यात असलेल्या सारांशाच्या आषयाला शोभतील अशा कथा शोधून काढणे. पहिली कथा कोणाची आहे हे कोणालाच माहित्य नाही- ती ईटरनेट वर आहे. दुसरी कथा मी माल्कम ग्लडवेलच्या "ब्लिंक" मधे वाचली असावी पण काहीकेल्या मला ते पान आज सापडले नाही.]

लेखनविषय: दुवे:

Comments

स्त्री आणि स्त्रीत्व

अजयसाहेब,कृपया दोहोंमधील फ़रक सांगाल का ? बाहेर तर सगळीकडे स्त्री दिन साजरा होत होता.
शरद

इम्प्लीसीट असोसिएशन

मीही टेस्ट घेतली. त्यातील काही मुद्दे मला कळले नाही. तत्त्वज्ञान, कला, इतिहास यांचा संबंध मानवी भावनांशी जोडणे योग्य आहे परंतु नंतर यांचे असोसिएशन स्त्रीशी होणे म्हणजे हे विषय स्त्रैण आहेत किंवा कसे होते ते कळले नाही.

असो. चुकीच्या उत्तरांचे काय होते या जिज्ञासेपायी मी काही उत्तरे चुकीची देऊन पाहिली. काही उत्तरे वेगात देण्याच्या नादात खरेच चुकली. उत्तर असे आले.

मॉडरेट असोसिएशन ऑफ मेल विद सायन्स अँड फिमेल विद ह्युमॅनिटीज कंपेर्ड टू फिमेल विद सायन्स अँड मेल विद ह्युमॅनिटिज.

मला वाटते, आजच्या जगात हे उत्तर बर्‍यापैकी रिजनेबल आहे. यात रोजच्या व्यवहारातील अनेक गोष्टीही येतात.

अ. ड्रायव्हरने आपल्या कारला ट्रेलर जोडला होता. त्या ट्रेलरमध्ये जातीवंत अरबी घोडा होता. - इथे ड्रायवर बाई आहे हे आजच्या काळात चटकन वाटणार नाही.
ब. रस्त्यावर दोघा व्यक्तींत हाणामारी चालली होती. - दोघे पुरुष होते हे ग्राह्य धरले जाईल.

इत्यादी, इत्यादी.

रोजच्या व्यवहारातील अनेक गोष्टी

तुमचे उदाहरण बरोबर् आहे. अगदी अमेरिकेतही ट्रक ड्रायव्हर पुरुषच असतात. हॉटेलमधील भाटारखान्यात् नेहमी पुरुष स्वैपाकी असणे हे जगभर दिसते. त्य्ची नेमकी मिमांसा काय हे वेगळ्या संदर्भात पहायला पाहिजे.

परंतु, हे ही पहा- मी ९४-९५ साली अमेरिकेतील, स्वीडनमधील काही स्टील मिल्सला भेटी दिल्या तेव्हा मी तेथे अनेक स्त्रीया काम करतांना पाहिल्या. भारतात स्टील मिल्समधे स्त्री शॉपफ्लोअरला कधीही काम् करतांना दिसणार नाही.
त्यामुळे ही उदाहरणे काही प्रमाणात सामाजिक बदलांच्या प्रमाणात बदलत जातील. [इराकला पाठवलेल्या अमेरिकी सैन्यात अनेक स्त्रीया आहेत व् होत्या असे कळते.]

...आता थोडा व्यस्त आहे त्यामुळे हे उत्तर जरा अर्धे सोडून् देतो आहे. नंतर् लिहिन...

ड्रायव्हर

त्याचा निकाल लिटल ऑर नो असोसिएशन असा लागला.
जगातील सर्वात अजस्र ट्रकांचा चालकपदी महिलांनाच प्राधान्य द्यावे लागते (किंबहुना त्याचे ते करू शकतात) ही नुकतीच कळालेली उद्बोधक माहिती यामागे असू शकेल. (संदर्भ: डिस्कवरी 'ग्रेटेस्ट मशीन्स्' किंवा अशाच नावाचा कार्यक्रम)

शुक्रावरून स्त्रिया आणि मंगळावरून पुरुष

आले असे सुचवणारे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात दिलेल्या सिद्धांतावरून कोणी यावर प्रकाश टाकेल कां ?

हे

हे पुस्तक वाचले आहे. पुस्तकात स्त्रिया आणि पुरूष यांच्या विचार करण्याच्या आणि संवाद साधण्याच्या पद्धतींमधील फरक दाखवले आहेत. पण प्रस्तुत लेखाची आणि पुस्तकातील विचारांची कशी सांगड घालता येईल याचा अंदाज येत नाही.

पुस्तकाचा विषय काय आहे याची या चित्रफितीवरून कल्पना यावी. :)

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

वेळेचं गणित

आता थोडा व्यस्त आहे त्यामुळे हे उत्तर जरा अर्धे सोडून् देतो आहे. नंतर् लिहिन...

वेळेचं गणित माझंही जमेनासं झालं आहे. माझा वरचा प्रतिसादही अर्धवट होता. तुम्हाला वेळ होईल तेव्हा तुम्ही तुमचा प्रतिसाद पूर्ण करा. मी येथे नवा प्रतिसाद सुरू करते. खालील प्रतिसाद हा तुम्हाला उद्देशून नाही कारण तुम्ही सर्वेक्षणातून किंवा चर्चेतून असे काही म्हटलेले नाही पण प्रश्न सोडवताना काही विचार मनात आले ते येथे मांडते.

हल्ली स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने सर्व कामे करू लागल्या आहेत हे खरे असले तरी स्त्रियांनी पुरूषांच्या बरोबरीने काम न करण्याचा कालावधी इतका प्रचंड आहे की गेल्या शे-दीडशे वर्षांत काही प्रमाणात स्त्रियांनी पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले म्हणून समाजाची मानसिकता चटकन बदलेल हा निष्कर्ष अपुरा आहे. आपल्या सर्वेक्षणातून त्यावर बोट ठेवलेले आहेच. परंतु, सर्वेक्षण ऑबजेक्टिव असल्याने येथे अधिक चर्चा करता येईल.

आपण प्रतिसादात स्त्रियांनी स्टील मिल्समध्ये काम करण्याचे उदाहरण दिलेत. भारतातच का अमेरिकेतही अशा स्त्रियांचे प्रमाण कमी आढळेल. किंबहुना, अशा क्षेत्रांत काम केल्याने स्त्री आणि पुरूषांची बरोबरी साधणे हे मला तितकेसे योग्य वाटत नाही. उदा. कुस्ती हा खेळ स्त्रियांनी खेळलाच पाहिजे, अन्यथा स्त्री आणि पुरूष असमान आहेत या वाक्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही त्याप्रमाणेच. स्त्रीची शारीरिक क्षमता, तिचे निसर्गचक्र हे पुरूषांच्या बरोबरीचे नाही त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्त्री दिसावीच असे नाही. परंतु, स्त्रियांच्या बाबतीत असा आग्रह धरणारे लोक* पुरूषांच्या बाबतीत असा आग्रह धरतात का हे कळत नाही. मला वाटते की नाही धरत.

खालील उदाहरणे अमेरिकेतील आहेत-

१. प्राथमिक शाळेत मी अतिशय कमी पुरूष शिक्षक पाहिले आहेत. त्यामानाने, जसे वरचे वर्ग, माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक शाळा सुरू होतात तसे पुरूष शिक्षक वाढतात.
२. डे-केअर किंवा लहान मुलांना सांभाळायच्या संस्थेत अतिशय कमी पुरूष दिसतात. त्यामानाने, मोठ्या मुलांचे कँप वगैरेमध्ये पुरूष अधिक असतात.
३. डॉक्टर हा पुरूष किंवा बाई असतात पण नर्स हा पुरूष असणे हा अद्यापही एक विनोदाचा विषय मानला जातो. (यावर अनेक अमेरिकन चित्रपट आहेतच, आताच दोस्तानाही आला होता.)
४. मेक-अप, फॅशन, जाहीरातीच्या क्षेत्रांतील पुरूष हे "स्ट्रेट" नसतात यावर अनेकांचा विश्वास असणे.

आणि अनेक. असो.

मला वाटते की स्त्रियांनी पुरूषांच्या बरोबरीने कामे केली म्हणजे स्त्री समान झाली ही भावना १००% बरोबर नाही. उलटपक्षी, काही कामे स्त्रीने करावीत आणि काही पुरूषाने असे जर एखाद्या व्यक्तीला वाटले तर ते गैर नाही. फक्त, स्त्री जे काम करते ते काम (मग ते मुले जन्माला घालण्याचे असो, त्यांना वाढवण्याचे असो, घर सांभाळण्याचे असो, शालेय शिक्षिकेचे असो, नर्तिका, गायक, डॉक्टर -इंजिनिअर किंवा खेळाडूचे असो.) हे काम करणार्‍या पुरूषापेक्षा कमी नाही. तिच्या कामाचा मोबदला ठरवला नसला तरी तिचे काम महत्त्वाचे आहे. तिच्या कामातला काही भाग मी करू शकतो, किंबहुना ते माझेच काम आहे ही भावना पुरूषांच्या (आणि स्त्रीच्याही) मनात उत्पन्न होईल त्या दिवशी समानता वाढीला लागेल आणि अशा असोसिएशन्स कमी होतील.

नाहीतर,

डॉक्टर किंवा इंजिनिअर असणारी स्त्री आजही कामावरून परत आली की स्वयंपाकघरात कामाला लागते हे चित्र सर्रास दिसतेच. ते बदलून सोमवार-मंगळवार-बुधवार बाई स्वयंपाक करते. गुरूवार-शुक्रवार-शनिवार नवरा स्वयंपाक करतो असे झाले किंवा मुलं लहान आहेत म्हणून मी नोकरी सोडली आणि घरी बसलो असे नवरा सांगू लागेल आणि अशाप्रकारची चित्रे समाजात सर्रास दिसू लागतील (आणि ही दोन केवळ उदाहरणे आहेत. याचसह अनेक डॉक्टर, इंजिनिअर स्त्रिया दिसतील वगैरे) तेव्हा अशा इम्प्लिसिट असोसिएशन्स कमी होतील.

* अशा आग्रह धरणार्‍या लोकांत स्त्रियांची संख्याच अग्रगण्य असण्याची शक्यता आहे.

माझी जरा गडबड झाली

हा लेख स्त्री/पुरूष पूर्वग्रहाबद्दल असणार याची कल्पना होतीच, म्हणून या वाक्यावर मी अडकलो -

नर्स डॉक्टरांना माहिती देते...

आणि नेमका प्रश्न यायच्या आधी माझे मन भरकटले, की येथे नर्स स्त्री असल्याची माहिती "व्याकरणा"मुळे द्यावी लागली. अर्थात ते टाळायचे असेल, तर जरा लक्ष देऊन कधीकधी टाळता येते, पण नेहमीच टाळता येत नाही - "नर्सने डॉक्टरांना माहिती दिली..." पण अर्थ बदलतो. शिवाय कथा थोडीसुद्धा लांबली असती तर "डॉक्टर म्हणाले/म्हणाल्या..." किंवा अशा कुठल्या प्रकारे डॉक्टर स्त्री की पुरुष, ही बाब "व्याकरणामुळे" स्पष्ट झाली असती.
(ही बाब प्रकर्षाने जाणवायचे कारण की माझा एक आप्त मित्र नर्स आहे, त्यामुळे "नर्स" शब्दाविषयीचे पूर्वीचे "स्त्री"चित्र सहजच माझ्या मनातून पुसले गेले आहे.)

काही भाषांमध्ये स्त्री/पुरुषत्वाची माहिती देणे जवळजवळ अपरिहार्य होते - उदाहरणार्थ मराठी; तर काही भाषांत ती माहिती द्यायची असल्यास कित्येकदा मुद्दामून द्यावी लागते - उदाहरणार्थ इंग्रजी.

असो - हे नेहमीप्रमाणे मी भाषेवर घसरलो. पण हा विचार पूर्णपणे अवांतर नसावा.

चांगली चर्चा होते आहे

आपली एक् चांगली चर्चा होते आहे....मंगळवारी मी येथे परत येईन.

हं

टेस्ट प्रामाणिकपणे दिली.. "युअर् डेटा सजेस्ट लिटील ऑर नॉ असोसिएशन बिटविन फीमेल अँड् मेल विथ् सायन्स अँड् ह्युमॅनिटीज्" जे माझ्यापुरते तरी बरोबर आहे. बाकी हे निष्कर्ष कसे काढले हे सिरीयसली दिले असले तरी प्रकार जरा गमतीशीर वाटला ;)

बाकी पुरुष नर्स, नर्तक, प्राथनिक शिक्षक पाहिले आहेत/होते तेव्हा त्यात वेगळे/ विचित्र वाटत नाहि - वाटले नव्हते.. मात्र जेव्हा स्त्री रिक्षावाली, पुरुषाने चालवलेले पाळणाघर, स्त्री हमाल पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा वेगळेपण जाणवले होते.
अमेरिकेत केस कर्तनालयात पहिल्यांदा आपले डोके स्त्रीच्या हातात देताना असेच विचीत्रपण जाणवले होते :)
तेव्हा काहि व्यवसाय अनेक वर्ष स्त्री/पुरुष परत असल्याने त्या गोष्टी गोष्टी डोक्यात बसल्या आहेत. मात्र याचा अर्थ माझ्या डोक्यात हि कामे पुरुषानेच / स्त्रीनेच करायची आहेत असा समज आहे असा कोणी काढत असेल तर ते चुकीचे आहे.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

 
^ वर