"वरील पैकी कोणीही नाही"


वरील पैकी कोणीही नाही


कालच मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता या विषयावरील परिसंवादाला गेलो होतो. प्रा शमशुद्दीन तांबोळी, असगर अलि इंजिनियर (इस्लामचे अभ्यासक) व माधव गोडबोले (निवृत्त केंद्रिय वित्तसचिव व विचारवंत) ही मंडळी परिसंवादात बोलत होती. माधव गोडबोले म्हणत होते कि निवडणुकित लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन येण्यासाठी मतदानाच्या किमान ५१ टक्के मते त्याला मिळाली तरच तो निवडुन आला असे घोषित करणे योग्य आहे. तसे विधेयक संसदेत मंजुर झाला पाहिजे. त्यासाठी जनमताचा दबाव लोकप्रतिनिधींवर आला पाहिजे. अन्यथा हे होणे नाही. सद्यस्थितीत जास्तीत जास्त मते ज्याला पडतात तो लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन येतो. मतदारांच्या जाती धर्म च्या विभागणी नुसार तो आपली निवडणुक तंत्राची आखणी करतो. मात्र जर असा कायदा झाला तर त्याला फक्त आपल्या समाजाचा विचार न करता इतरांचाही विचार करावा लागेल. धर्मनिरपेक्ष मूल्य राखायला मदत होईल. अशा आशयाचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रम संपल्या नंतर मी त्यांना पुणेरी पद्धतीने गाठले व माझा एकच प्रश्न आहे असे म्हणुन त्यांचे लक्ष वेधुन घेतले.
" बोला"
"निवडणुकीत समजा मला ' वरील पैकी कोणीही उमेदवार लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणुन लायक नाही' असे मत नोंदवायचे आहे तर?"

"एक विशिष्ट फॊर्म मतदान अधिका-याकडे भरुन देता येतो."

"मागच्या निवडणुकित तशी सुविधा असल्याचे आयत्या वेळी पेपर मध्ये आले होते. कित्येक मतदान अधिका-यांना या विषयी माहिती नव्हती. त्यांनाही पेपर मधे वाचुनच समजले होते. माझे म्हणणे हे कि एवढा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा आताच्या निवडणुकीत आणि सध्याच्या तंत्रज्ञान युगात मतदान यंत्रावर वरील पैकी कोणीही नाही असे मत दर्शवणारे शेवटचे बटण ठेवता येणे काय अशक्य आहे?"

"हो सहज शक्य आहे. पण तसे झाले तर लोक त्याचाच वापर जास्त करतील."

"मला तेच म्हणायच आहे कि तुम्ही मांडलेला ५१ टक्क्याचा मुद्दा हा लांबचा आहे. सध्या तर आपल्याला हा पर्याय उपलब्ध आहे. समजा त्याचा वापर करुन वरील पैकी कोणीही नाही असा वापर करणा-या लोकांची संख्या किती आहे याचा अंदाज येईल व जर तो घटक प्रभावी ठरु लागला तर नव्याने मतदारांचे व उमेदवारांचे विश्लेषण होईल व मतनोंदणी निकषांचा फेर विचार करता येईल. मग ५१ टक्क्याचा विचार विधेयकासाठी पुढे आणता येईल "

"ओ तोही मुद्दा आहेच."

तेवढ्यात आम्ही त्यांच्या गाडीजवळ पोहोचलो व त्यांना माझा निरोप घ्यावा लागला. ( हे वाक्य असे ही म्हणता आले असते कि मला त्यांचा निरोप घ्यावा लागला ) माझे पुढचे मुद्दे हवेतच विरले.
त्या अगोदर शेजारील खुर्चीवरील एका विद्वानाशी माझे हे बोलणे झाले होते. त्यांनी माझे मुद्दे उडवुन लावले होते. अशा लोकांनी मतदान करु नये असे मत त्यांनी व्यक्त केले होते. मी त्यांना म्हणालो, " मतदान न करणे आणि 'वरील पैकी कोणीही नाही' असे मत व्यक्त करणे यात काही मुल्यात्मक फरक आहे कि नाही?" त्यावर त्यांचे म्हणणे असे होते कि मुल्यात्मक फरक आहे पण लोक कुणाला तरी म्हणजे जो आपली कामे करतो त्याला मत देतात. भ्रष्टाचारी असला तरी जो आपली कामे करतो त्याला मत देतात. कोणत्या मार्गाने करतो हे महत्वाचे नाही. अरुण गवळी तुरुंगातुन निवडुन येतो.कारण तो लोकांची कामे करतो.

"मान्य आहे त्यांनी जरुर त्यांचे तसे मत द्यावे. पण माझ्या 'वरील पैकी कोणीही नाही' मुद्द्याचे काय?"

परत अधांतरी.... विचार करत घरी आलो. मतदानकेंद्रात वरील पैकी कोणीहि नाही असे मत दर्शवणारा फॊर्म भरुन देण्यात गुप्तमतदानाचे "गुप्तता" मुल्य रहात नाही त्याचे काय? मतदान न करणा-याच्या नागरिकांच्या उदासीनतेकडे लोकशाहीचे मारक मुल्य अशा नजरेने किती काळ पहाणार? त्याची उदासीनता हा विद्वानांचा चघळण्याचा विषय आहे. त्याच्या नजरेतुन लोकशाहीचे मुल्यमापन करण्याची वेळ केव्हाच आली आहे. दरोडोखोर, भ्रष्टाचारी, साठेबाज, चोर. खुनी,गुंड, भुरटा यातुनच कोणाला तरी निवडुन द्यायचे असेल तर त्यापेक्षा मतदानाला न गेलेले काय वाईट? कुणीही निवडुन आल तरी आपल्याला काय फरक पडतो? त्यांचच राज्य आहे शेवटी. सगळ्याच राजकीय पक्षात गुंड आहेत. सगळेच कमी अधिक प्रमाणात भ्रष्ट आहेत.सज्जन माणुस राजकारणात टिकणार आहे का? मग दगडा पेक्षा वीट मउ या नात्याने दरोडेखोरापेक्षा चोराला मत द्यावे काय? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत.
तरी येथे ऋणमतदान (negative voting) प्रकाराचा विचार केला नाही. आपण ज्याला मत दिले तो निवडुन आला नाही तर आपले मत वाया गेले असे समजाणारा खुप मोठा वर्ग इथे आहे. निवडणुकीच्या काळात पैसे / (पुर्वी इंदिरा विकास पत्रे) , धान्य, साड्या, भांडीकुंडी अशा गोष्टींची अमिषे दाखवली जातात. बेरोजगार युवकांची पेट्रोल, वडापाव, क्वार्टर व तदानुषंगिक सोय केली जाते. मतदारही त्याचा वापर करुन घेतो कारण नंतर त्याच्या मताचा तीही किंमत येणार नसते हे तो जाणतो.
राजकीय पक्षाने विद्वानांनाही पाळले आहे. परिसंवाद घडवण्याचा सर्व खर्च ते करतात. त्यांना भरपुर मानधन दिले जाते. प्रवास, राहणे, खाणे, कपडेलत्ते याचा खर्च करायचा. दहा टक्के कोट्यातील सदनिका चांगल्या लोकेशनला देण्याचे आश्वासन द्यायचे. एखादी फॊरेन टुर स्पॊन्सर करायची.त्या बदल्यात विद्वानाने काय करायचे? लोकांचा असा बुद्धीभेद करायचा कि अमुक एक पक्षाला मत दिल्याशिवाय प्राप्त परिस्थितीत पर्याय नाही असे परिस्थितीनुसार आडवळणाने किंवा उघडपणे सुचवायचे. जर तुम्ही तसे केले नाहीत तर अर्थात तुम्ही लोकशाहीचे मारेकरी.

लेखनविषय: दुवे:

Comments

योग्य

विवेचन आवडले. या पर्यायाचा जास्तीत जास्त उपयोग व्हायला हवा असे वाटते. गोडबोले यांच "हो सहज शक्य आहे. पण तसे झाले तर लोक त्याचाच वापर जास्त करतील." हे वक्तव्य विचार करण्यासारखे आहे.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

दिल्ली बहोत् दूर है

मत द्यावे, न द्यावे, निगेटिव्ह मत (कोणालाच नाही या अर्थी) द्यावे ह्या पर्यायांचा विचार करायचा झाला तर इतकेच म्हणावेसे वाटते की अभी दिल्ली बहोत दुर है!

मतदानासाठी आधी जायला लागू मग पुढचा पुढे विचार करू. माझे म्हणणे आहे, प्रत्येकाने गेल्यावेळी ज्याला मत दिले त्याच्या विरोधातील कोणालाही मत द्या. प्रत्येकाला घरी बसवा. असे १-२ दा किमान १५-२०% तरी झाले तर राजकारण्यांना काय होते ते समजेल आणि त्याचा फायदा हा निगेटीव्ह मतापेक्षा अधिक असेल.

सहमत

सर्व प्रथम मतदान केंद्रांपर्यंत जावा.


असेच केले पाहिजे...

प्रत्येकाने गेल्यावेळी ज्याला मत दिले त्याच्या विरोधातील कोणालाही मत द्या.
सहमत आहे ! (विकासाकडे लक्षच नाही अशांसाठी ) काही काहींचा याबाबतीत इतका आत्मविश्वास वाढलेला आहे की, काहीही न करता आपल्याला लोक निवडून देतात अशी भावना काही पक्षांच्या उमेदवारांमधे झाली आहे. लोक क्षणभर भावूक करणा-या गोष्टींनी वाहवत जातात आणि मग त्यांचे फावते. काही तरी लॊंगटर्मचा पर्याय पाहिजे असे वाटते. वर्षभरात त्याच्या कामाचा लेखाजोगा घ्यायचा आणि पुढील वर्षी लोकसभेत बसवण्यासाठी पुन्हा काही अटी घालायच्या.

-दिलीप बिरुटे

स्फुट आवडले

कुणालाही मत देता येणार नाही ह्या पर्यायाविषयी ठोस धोरण अवलंबले गेले पाहिजे हे नक्की. एक तर तो पर्याय काढून तरी टाकावा किंवा त्यासाठी बटण तरी उपलब्ध करावे. सध्याचा वापर काहीच उपयोगाचा नाही.

कालच मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता या विषयावरील परिसंवादाला गेलो होतो.

ह्या विषयी देखिल थोडक्यात माहिती दिलीत तर आवडेल.

निवडण्ग्कीचा उद्देश

लोकांचे प्रतिनिधी निवडणे हा असतो. "वरील पैकी कोणीही नाही "या नकारार्थी मताने तो सफल होत नाही. जेंव्हा एकाद्या प्रश्नावर लोकमत घेतले जाते तेंव्हा असे मत देता येईल. निवडणुकीमध्ये लोकांना जर लायक प्रतिनिधीच मिळत नसतील तर दगडापेक्षा वीट मऊ हे पहावेच लागेल. ती आदर्श लोकशाही झाली नाही तरी हुकुमशाहीपेक्षा बरी असेल.

त्यातला त्यात बरा

घारेसरांशी सहमत. त्यातला त्यात बरा उमेदवार निवडावा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लेख आवडला

बटणाचा पर्याय केल्यास त्याचा नक्की उपयोग होईल.
वरीलप्रमाणे बटण असले तरी त्यात अजून एक अट हवी की अमूक %- म्हणजे समजा मतदानाला गेलेल्या ५१% लोकांनी एखाद्या मतदारसंघात या बटणाच्या पर्यायाचा स्विकार केला तर त्या निवडणुकीत तुटपुंज्या मताने विजयी झालेला उमेदावराची निवड रद्द करून निवडणूक ठराविक काळात (३ महिने) परत घ्यायला हवी आणि त्या मतदार संघात आधी उभे राहिलेल्या कोणालाही परत त्या वर्षीच्या निवडणुकीला उभे राहता येणार नाही असे काही तरी?. त्याशिवाय नुसत्या सांख्यिकीकडे कोण लक्ष देणार? असे काही विचित्र कडक नियम आले तर कदाचित राजकिय पक्षही उमेदवारांना तिकीटे देताना अजून विचार करतील. जरा गोत्यात येतील.

हे सर्व व्हायला कठीण आहे, हे पटते. याला राजकिय पक्षांमधले कोणीच सहमत होणार नाही.
अवांतर - अमेरिकेत निवडणुकांमध्ये अनेकदा असे काही प्रश्न असतात - उदा. दरवेळी मतदान करायला जाताना लोक या प्रश्नांच्या संभाव्य (हो/नाही) लाही मत देतात, यातून त्यांचे कायदे/पॉलिसी करण्याची प्रक्रिया सुरू होते. तसे काही आपल्याकडे अस्तित्वात आले आहे का? नसल्यास, अशी सुधारणा करून आधी कायदे तयार होण्याच्या प्रक्रियेत मतदारांना प्रत्यक्ष सहभाग वाढू शकतो.

परत निवडणुक?

३ महिन्यात परत निवडणुक? चित्राताई, भारतातल्या निवडणुकीवर अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा जास्त खर्च होतो. तो भारतीयांच्याच कमाईतुन होतो. सध्याच्या काळ्यात भारतीयांना परवडतील असे काही तरी सुचवा.
मल वाटतं की सरसकत सगळ्यांनाच मतदानाचा अधिकार असल्याने त्या मतांना किंमतच नाही. मतदानाचे निकष लावा. जसे,
शैक्षणीक पात्रता - पदवीधर इत्यादी.
सामाजिक पात्रता - मुलांची संख्या (वैवाहिक असल्यास),मुलांना लसीकरण केले असल्यास, वर्षातुन एकदा तरी समाज/राष्ट्रकार्य केले असल्यास इत्यादी.
असे बरेच मुद्दे काढता येतील. भरमसाठ लोकसंख्येत लोकशाहीच्या नावाखाली नाही ते अधिकार लोकांना दिल्याने नको तसा आणि नको तिथे वापर होतो आणि मतांना सुद्धा किंमत नाही.


अहो, हो.

म्हणूनच वर विचित्र कडक म्हटले ना?!
तुम्ही म्हणता असे मुद्दे मला योग्य वाटत नाहीत. ती पात्रता असली म्हणजे राजकीय अक्कल चांगलीच असेल असे नाही. त्यामुळे मतांना किंमत यायला हवी असली तर मतदारांचा प्रत्यक्ष सहभाग वाढायला हवा असे मला वाटते.

माझेच मुद्दे

माझेच मुद्दे योग्य आहेत अथवा पटावेत असे माझे सुद्धा म्हणणे नाही. भारतीय लोकशाही सर्वात विचित्र आहे. ती कोणालाच सांभाळणे सहजासहजी शक्य नाही. म्हणून जगातली सर्वात महान लोकशाही म्हटले की संपले.
तसेच राजकिय पात्रता कोणाला हवी? मतदारांना की उमेदवारांना? कि दोघांना? माझे म्हणणे असे आहे की मताचा अधिकार अनेकांना असल्याने त्याची किंमत नाही. तो जर राखीव बनवला तर मग चढाओढ होऊन त्याची किंमत वाढेल.


तसे नाही


माझेच मुद्दे योग्य आहेत अथवा पटावेत असे माझे सुद्धा म्हणणे नाही.

त्याची कल्पना आहे, माझेही मत हे मान्य होणार नाही, ही कल्पना आहे. पण कधीतरी टोकाच्या भूमिका घेतल्या की "सुवर्णमध्य" साधता येतो. आधीच अपेक्षा जर खूप कमी ठेवल्या तर मग त्यातून हवे ते फळ मिळत नाही. शिवाय लोकसभेच्या निवडणुका जर अशा प्रकारे तीन चार महिन्यांत उरकल्या नाहीत, तर लोकसभा तयार व्हायला वेळ लागू शकतो असे काहीसे मनात होते, म्हणून असले ३ महिन्यांचे सुचले.

तो जर राखीव बनवला तर मग चढाओढ होऊन त्याची किंमत वाढेल.
हे मात्र सपशेल अमान्य आहे. मतदानाचे अधिकार प्राप्त व्हायला नक्की काय प्रमाण लावणार? आणि ते योग्य/अयोग्य कसे ठरवावे? ते असो.

माझ्या अवांतर प्रश्नाचे उत्तर घाटपांडे किंवा इतरांना माहिती असल्यास त्यांनी दिले तर आवडेल.

तीन महिने फार झाले.

हल्ली मतदान संगणकावर होते. मतदान पाच वाजता संपल्यावर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत निकाल लावणे शक्य आहे. तो रात्री ११ वाजेपर्यंत स्थानिक जनतेला समजू शकतो. लगेच दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून परत मतदानाला आरंभ. यावेळी मताधिक्यात पहिल्या-दुसर्‍या आलेल्या दोनच उमेदवारांमध्ये निवडणूक होईल. लगेच निवडणूक असल्याने खर्चात फारशी वाढ होणार नाही.--वाचक्‍नवी

समांतर

निवडणुकांत सांख्यिकि विश्लेषण,जनमताचा कौल या बाबींवर काम करणार्‍या एका विश्लेषकाला मी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एक प्रश्न केला होता. सरासरी ५२ टक्के लोक मतदान करतात. मग उरलेले ४८ टक्के लोक जे मतदान करीत नाहीत ते लोक सामाजिक, आर्थिक, शहरी ,ग्रामीण, वयोगट अशा निकषांवर कुठल्या स्तरात असतात? त्या लोकांचा अधिकृत सर्वे कधी घेतला गेला आहे का?
याचे उत्तर नाही असे होते.
प्रकाश घाटपांडे

काही माहिती

फोनवरुन मी आमचे एक स्नेही श्री अरविंद बाळ जे या कार्यक्रमाला आले होते. त्यानी काही माहिती पुरवली
एकुण मतदान शंभर
प्रकार १ मताधिक्य
अ - ४०
ब - ३५
क - २५
या नुसार अ निवडुन आला
प्रकार २ बहुपर्याय
यात उमेदवाराला प्राधान्यक्रम द्यावयाचा आहे. समजा प्रथम प्राधान्य व द्वितीय् प्राधान्य असा वानगी दाखल घेतले . द्वितीय प्राधान्य खालीलप्रमाणे असेल व द्वितीय प्राधान्य निकषावर आणले तर
अ - ५
ब - २०
क - १
यानुसार ब निवडुन आला प्रथम प्राधान्य ची ३५ +द्वितीय प्राधान्य ची २०=५५
प्रकार - ३
यात अमुक एक उमेदवार नको आहे असे मत नोंदवायचे आहे. (ऋणमत)
अ - ४०
ब - ३५
क - २५
या नुसार क उमेदवार निवडुन आला.

प्रकाश घाटपांडे

विचारपूर्ण लेख

आवडला. आधीच वाचला होता, पण प्रतिसाद देण्याबाबत चलढकल करत होतो.

"वरीलपैकी कोणीही नाही" हा पर्याय मला बहुपक्षीय लोकशाहीत पटत नाही.

निवडणूक-अधिष्ठित लोकशाही म्हणजे "विस्कळित न होणारे राज्यशासन" आणि "लोकांची अनुमती" यांच्यामधला समतोल आहे.

अराजकापेक्षा कुठलेतरी राज्य असणे बरे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी तसेच नंतर कुठलेतरी शासन स्थापित असलेच पाहिजे, अशी घटनेची तरतूद हवीच. असा "कोणीच नको" पर्याय असला आणि एखाद्या निवडणुकीत तो पर्याय जिंकला तर काय करावे? अराजक नको, तर आधी चालू असलेलेच शासन कामचलाऊ म्हणून पुढे चालू ठेवावे काय? म्हणजे लोकांची संमती नसून चालू! तसे नको.

कुठल्याही निवडणुकीत कोणतेतरी सरकार निवडून आलेच पाहिजे अशा प्रकारेच निवडणूकीची प्रक्रिया उभारली पाहिजे.

(सामान्य आयुष्यातील उदाहरण घेऊ. आपण आज घरीच राहू, की सिनेमाला जाऊ, की चौपाटीवर जाऊ, की देवळात जाऊ, की ...? "काहीच नाही - घरीसुद्धा राहायचे नाही" हे उत्तर चालणार नाही - काही नाही तर "फुटपाथवर झोपून राहू" किंवा असा कुठलातरी नवीन पर्याय द्यावाच लागेल.)

बहुपक्षीय लोकशाहीत "हल्लीचे पर्याय नको" म्हणणार्‍याला नवीन पक्ष काढायचे स्वातंत्र्य आहे.

तरी लेखाचा एक गर्भित मुद्दा पटण्यासारखा आहे. सर्व उमेदवारांचा तिटकारा येऊन लोक निवडणुकीत मत द्यायला गेलेच नाही तर त्या लोकशाही राष्ट्राला मोठाच प्रश्न आहे. येणार्‍या शासनाला लोकांची संमती गृहीत धरता येत नाही. म्हणूनच काही देशांत मत देणे सक्तीचे केले जाते. पण यातही तोटे आहेत. लोकशाहीची कातडी पांघरलेली हुकुमशाही राज्ये सुद्धा याच सक्तीद्वारे "हुकुमशहा लोकनियुक्त आहे" असा आव आणतात.

लहान राज्यांत - स्वित्झरलँडमध्ये वगैरे - एक-एक मताने फरक पडतो. प्रचंड लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांमध्ये हा प्रश्न आहे - आपल्या मताने फरक पडतो, असे असे त्या अब्जापैकी एका व्यक्तीला कसे निश्चित पटावे? भारतात, अमेरिकेत (फ्लोरिडामधली ऍल गोर याने हरलेली निवडणूक आठवावी) क्वचित मोठा फरक पडतो, पण तो आकडेशास्त्रीय - जे मतपत्र फाटून बाजूला पडले ते आपलेच मत की लाखापैकी दुसर्‍या कोणाचे? आपल्या वैयक्तिक योगदानाबद्दल निश्चित खात्री पटत नाही.

मला वाटते सैद्धांतिक पातळीवर या प्रश्नाचे उत्तर देणे फार कठिण आहे. तोवर विकास म्हणतात तसे "मतदानासाठी आधी जायला लागू मग पुढचा पुढे विचार करू."

सहमत

कालच्या लोकसत्तात एक् चपखल किस्सा बिरबलाच्या तोंडी टाकला आहे.
"तुम्ही नॉन् व्हेज् खात नाही आणि व्हेज जेवणात बनवलेली वांग्याची आणि भेंडीची भाजी तुम्हाला आवडत नाही. म्हणून तुम्ही आज् जेवूच नका"
निवडणूक या संदर्भातच हे लिहिलेले आहे.

अर्थातच असा मार्ग योग्य नाही हे उघडच आहे.

गूगल इंडिया इलेक्शन सेंटर

लोकसभा निवडणुकांसाठी गूगलने गूगल इंडिया इलेक्शन सेंटर उघडले आहे. यामध्ये मतदारांना निवडणुकीच्या बातम्या, उमेदवारांची पार्श्वभूमी इ. बरीच माहिती मिळू शकेल. अधिक माहिती इथे.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

अण्णा हजारे

आजच वांद्र्याच्या एमएमआरडीए च्या मैदानावर भाषणात अण्णा हजारे यांनी हा पर्याय असला पाहिजे असे सांगितले. समजा वरील पैकी कोणीही उमेदवार पसंत नाही यालाच जास्त मते मिळाली तर तिथे परत निवडणूक घ्यावी. त्यात अगोदर सहभागी असलेल्या कोणत्याही उमेदवाराला उभे राहता येणार नाही असा कायदा करावा असे सुतोवाच केले.
आता याची व्यवहार्यता किती? हा प्रश्न आहेच.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर