तीन घटना

घटना क्र.१ : उत्तर भारतातील एका शहरात एक तरुणी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावरुन फक्त अंतर्वस्त्रे घालून चालली.
घटना क्र.२: मंगलोरमध्ये संस्कृतीसंरक्षक श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांनी पबमध्ये उपस्थित असलेल्या (मद्यपान करणे व नृत्य करणे या भीषण गुन्ह्यांत सामील असलेल्या) तरुणींना मारहाण केली . त्यावर प्रतिक्रिया म्हणून तरुणींनी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना आपली गुलाबी रंगाची अंतर्वस्त्रे भेट म्हणून पाठवली.
घटना क्रः३ जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार व काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांना स्वतःच्या रक्ताने लिहिलेली पत्रे पाठवली ( शरद पवार आणि सोनिया गांधी यांना का व पंतप्रधान, राष्ट्रपती व कायदामंत्री यांना का नाही हा उपप्रश्न तूर्त बाजूला ठेवू!)
या तीन घटनांमधील समान सूत्र हे आपल्या (रास्त?) मागण्यांसाठी धक्कातंत्राचा वापर हे आहे. पबमधल्या मुलींना बाहेर खेचून मारहाण करणे हे संस्कृतीहीन वगैरे आहे असे सांगणार्‍यांनी विरोधाचा जो तथाकथित गांधीवादी मार्ग अवलंबला तोही तितकाच गांवढळ आणि अशिष्ट मानावा लागेल. म अं नि स ची भूमिका तितकी टोकाची नसली तरी त्यामागचे सूत्र असेच धक्क्याचे आहे. यावर या मंडळींनी दिलेले स्पष्टीकरण असे की असले काहीतरी केल्याशिवाय सुस्त, झोपाळू यंत्रणेला जागच येत नाही. सनदशीर, कायद्याच्या चौकटीत राहून केलेल्या विरोधाला कुणी दाद देत नाही. अगदी प्रसारमाध्यमेही असे काही केल्याशिवाय अशा विरोधाची दखलही घेत नाहीत.
हे खरेच असे आहे काय? असे असले तर प्रत्येकानेच अशी 'शॉक ट्रीटमेंट' वापरावी काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

नाईलाजाने वापरावी

घटना क्र ३
हा प्रसिद्धी स्टंट आहे या बद्दल दुमत नाही. पण अशा स्टंट बाजी शिवाय चळवळ चालु शकत नाही. काहीतरी जगावेगळे केल्याशिवाय प्रशासन व जनता जागी होत नाहील. तसेच यातुन चळवळिला प्रसिद्धी मिळते.खर तर म. अंनिस म्हणजे दाभोळकर हे सुत्र आहेच. त्यामुळे हा मार्ग व्यावहारिक आहे तात्विक नाही.
प्रकाश घाटपांडे

होय

भारतात खास करुन समाजच इतका झोपलेल्या अवस्थेत असतो की धक्का दिल्या शिवाय कोणालाच जाग येत नाही. मला वाटते हा धक्का प्रशासनापेक्षा जनमानसाला जास्त असतो. आहे हे असंच चालत राहणार ही मानसिकता लोकांमध्ये आणि म्हणूनच त्यांनी तयार केलेल्या प्रशासनामध्ये एकदम खोलवर गेली आहे. धक्का दिल्याशिवाय काहीच होत नाही. म्हणून स्टंटगिरी शिवाय पर्याय राहात नाही. अण्णा हजारे सुद्धा स्टंटबाजी करतात नाही का?






तुलना

घटना क्र्.१ ही अगदि वेगळी आहे. इथे त्या स्त्री ने तीची स्त्रीसुलभ् लज्जा पणाला लावली होती आणि अन्यायाचा कडेलोट् झाल्या शीवाय् ती ते करणार् नाही. (ही स्त्री मॉडेलींग् वगैरे क्षेत्रातील् नव्हती). बाकीच्या दोन् घटनांमधे संघटना होत्या. त्यांचे उद्देश् हे स्टंट, प्रसीध्दी वै. असु शकतात्.

मॉडेलींग

ती स्त्री जर मॉडेल असती तर? मॉडेल स्त्रियांवर अत्याचार होत नाहीत का?






उद्देश

मुद्दा उद्देशाचा आहे. रॅम्प वर अंगावरुन कपडे पडणे हा अत्याचार आहे का ?

हो...

एखाद्या मॉडेलला प्रगतीपथावर नेण्याचे अमिष म्हणून हा अत्याचार नक्कीच असु शकतो.






गल्लत

संमतीने केलेलि कृती हा अत्त्याचार कसा काय होउ शकतो ?

मुतालिक आणि तरुणाई

लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीत आलेला मुतालिक आणि तरुणाई हा लेख या निमित्ताने उद्बोधक आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फालतू

लेख फालतू आहे. उद्बोधक वगैरे तर अजिबातच वाटला नाही. दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टींची सांगड घालण्यात आली आहे. तरुणाई पबमधे जाते हे चुकिचे (लेखिकेच्या मते) कल्चर रुजू पाहते आहे का ह्यावर उहापोह करणे समजू शकण्यासारखे. पण त्यामध्ये श्रीरामसेना आणणे हे विसंगत. तरुण मुलींना मारहाण करणारे आणि पब मध्ये जाणारे ह्यातल्या पहिल्या गटातील लोक निर्विवाद अपराधी. दुसर्या गटातील लोकांचे ज्यांच्या त्याच्या मगदुराप्रमाणे अर्थ काढावेत. अयोग्य वाटत असेल तर गप्प बसावे. थोडक्यात, तरुणाई पबात जाते की आश्रमात जाते ह्याच्याशी मला तरी काही देणेघेणे नाही हे ज्याचे त्याने ठरवावे पण पबात गेलेली मला आवडत नाही म्हणून मारहाण करणे हा प्रकार मात्र अजिबात पचणारा नाही

मुतालिक यांची भूमिका जेवढी आचरट आहे, त्यापेक्षा वाईट पवित्रा त्यांना विरोध करणाऱ्यांचा आहे.

ह्यावर हसावं का रडावं कळेना!

मुद्दा असा की

पबवर जाण्यासाठी आंदोलने वगैरे करणारी (आमची/आपली) पिढी ही कोणत्या प्रश्नांना महत्त्वाचे मानते आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची आंदोलने करते हा एकंदर प्रकार लाजिरवाणा आहे असे मला त्या लेखाचे मध्यवर्ती सूत्र वाटले. लेखिकेने व्यक्त केलेल्या मतांशी मी पूर्णपणे सहमत आहे.

मारहाण करणे चुकीचेच आहे त्याचे कोणत्याच प्रकारे समर्थन करण्याचा हा प्रयत्न नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आंदोलन

पबवर जाण्यासाठी आंदोलने वगैरे करणारी (आमची/आपली) पिढी ही कोणत्या प्रश्नांना महत्त्वाचे मानते आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची आंदोलने करते हा एकंदर प्रकार लाजिरवाणा आहे असे मला त्या लेखाचे मध्यवर्ती सूत्र वाटले.

आंदोलन हे काही व्यक्तिंनी कायदा हातात घेऊन मारहाण करण्या विरुध्द आहे. 'पब मध्ये जाणे' हा मुद्दा इथे गौण आहे.

प्रस्तुत लेखिकेला 'पब मध्ये जाणे' हे मारहाणीपेक्षा गंभीर वाटते आहे ज्याच्याशी मी असहमत आहे.

असे कसे?

आंदोलन हे काही व्यक्तिंनी कायदा हातात घेऊन मारहाण करण्या विरुध्द आहे. 'पब मध्ये जाणे' हा मुद्दा इथे गौण आहे.

असे कसे? मुद्दा एकट्यादुकट्याने स्वतःच्या आवडीनुसार, इच्छेनुसार पबमध्ये जाण्याचा नाही. पबमध्ये जाणे हा सविनय कायदेभंगासारखा काहीतरी महान प्रकार आहे असे मानून किंवा पबमध्ये जाण्याबाबत नाराजी व्यक्त केल्याने मोठा व्यक्तिस्वातंत्र्यसंकोच होतो असे वाटून घेणे हे चुकीचे आहे.

श्रीरामसेना जर मंगळुरूचे तालिबानीकरण करत असेल तर मतलबी कॉर्पोरेट प्रसारमाध्यमांना हाताशी धरुन या अनावश्यक प्रकाराचे उदात्तीकरण करणे हेदेखील वेगळ्या प्रकारचे तालीबानीकरणच वाटत आहे.


प्रस्तुत लेखिकेला 'पब मध्ये जाणे' हे मारहाणीपेक्षा गंभीर वाटते आहे ज्याच्याशी मी असहमत आहे.

पब मध्ये जाणे हे गंभीर नसून या मुद्द्यासाठी चड्डी आंदोलन करावे वाटले मात्र या वर्गाची इतर बाबतीतली उदासीनता ही गंभीर आहे हा मुद्दा आहे असे वाटते.

अवांतरः काही वर्षापूर्वी दिलीपकुमार यांच्या घराबाहेर शिवसेनेने असलेच घाणेरडे चड्डी मोर्चा आंदोलन केले होते. त्यावेळी शिवसेनेच्या 'संस्कृती'वर अनेकांनी टीका केली होती. मात्र तसाच प्रकार हे महाभागही करत आहेत त्यावेळी अनेकांना हे वावगे वाटू नये याचे आश्चर्य वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ते असे..

पब भरो आवाहन करोत वा चड्डी भेजो, हे जो पर्यंत आवाहनच आहे तो पर्यंत मला कसलाही आक्षेप नाही. कारण शेवटी काय करायचे आणि काय नाही हे मी ठरवू शकतो माझ्यावर कसलीही सक्ती नाही. पण मला पब मध्ये जायचे असेल तर मारहाण करणार्‍यांवर मात्र माझा आक्षेप आहे. इथे दुसर्‍याच कुणालातरी एक गोष्ट पटत नाही म्हणून माझ्यावर सक्ती केली जात आहे. आता दोन्ही गोष्टीतली कुठली अधिक गंभीर ते तुम्हीच सांगा

ह्म्म्म

आपापल्या ठिकाणी सगळेच बरोबर आहेत. जसे रामसेने अतिरेक केला तसा चड्डी पाठवणे हा सुद्धा मला अतिरेकच वाटतो. आता या पिंक चड्ड्या नक्की कसल्या होत्या ते माहित नाही. म्हणजे स्त्रियांच्या की पुरुषांच्या :). भारतात साधी घालायला चड्डी नसणारे पोरे सुद्धा खुप असतील. अथवा जाउदेत. मी न बोललेलेच बरे, तो मनोगतावर कोणीतरी आहे बायकांच्या वस्त्रांवर चर्चा करणारा, त्याला जास्त माहित असेल. त्यांना या चड्ड्या पाठवल्या असत्या तर रामसेनेला खरा धडा दिला गेला असता. म्हणजे कसे, विरोध सुद्ध प्रकट झाला आणि समाजसेवा सुद्धा झाली. बाकी चड्ड्या नसणार्‍यांना चड्ड्या न देता त्या ज्या माणसाला उपयोगी नाहीत अशा माणसाला पोस्टाने देण्यासाठी होणारा पैस्याचा/कपड्याचा आणि सार्वजनीक मालमत्तेचा (म्हणजे पोस्टाचा) असा वापर करण्यास माझा आक्षेप आहे.






मलाही लेख आवडला

लेखाच्या मध्यवर्ती सूत्राबाबतीत आजानुकर्णाशी सहमत.
मलाही हा लोकसत्तामधला लेख आवडला. बातमी अशी होती की श्रीराम सेनेने केलेल्या घटनेच्या विरोधात त्या कोणत्या स्त्री संघटनेने (नाव आठवत नाही) तरुणींना असे आवाहन केले की वॅलेंटाईनच्या दिवशी प्रत्येकीने पबात जाऊन दारूचा किमान एक घोट तरी घ्यावाच!
हे काय आवाहन झाले? पबात जाणे आणि दारू पिणे ही जीवनावश्यक बाब आहे का की अगदी कराच असे आवाहन करावे? तुम्हाला पबात जायला आवडत असेल तर श्रीराम सेनेसारख्या गुंडांची भीती/तमा न बाळगता खुशाल जा, असे म्हणणे ठीक आहे. श्रीराम सेनेने जे केले ते चुकीचेच आहे, पण त्यांनी चूक केली म्हणून आता आम्हीही त्याला चुकीच्याच मार्गाने प्रत्युत्तर देणार असा मूर्खपणा असेल तर मग दोन मूर्खांच्यात फरक तो काय राहिला?

सॉरी

त्या स्त्री संघटनेने वॅलेंटाइनच्या दिवशी रस्त्यावरच्या मुलींना पकडून एक घोट पाजला तरच तुमचा "तर मग दोन मूर्खांच्यात फरक तो काय राहिला?" युक्तिवाद मान्य, अन्यथा नाही. (बहुतेक फरक लक्षात आला असेल. )

स्त्री संघटनेने "पबात जाणे आणि दारू पिणे ही जीवनावश्यक बाब आहे" असे म्हणले असेल वाटत नाही आहे.

बाकी

घटना क्रमांक १ - गंभीर कारण इतर ती एकट्याने केलेली कृती आहे ज्याला नक्कीच (भारतीय समाजात) आधीक धैर्य लागते. कारण व घटना माहीत नसल्याने आधीक टिप्पणी नाही.

घटना क्रमांक २ - वेडेपणा. कायदा हातात घेणार्‍यांचा निषेध.

घटना क्रमांक ३ - वाईट वाटते ज्या संस्थेकडून शहाणपणाचे वर्तन, संयम अपेक्षीत त्यांनी असा स्टंट करावा.

तीनही घटनातील साम्य हेच की प्रसारमाध्यमांच्या मार्फत प्रश्न मार्गी लागावा व आजकाल प्रसारमाध्यमे असे काही घडल्याशिवाय दखल घेणे कठिण वाटते.

सिनेमात नेहमीची बलस्थाने नसल्यास आपटणारच, सिनेमा हीट करायला काही क्लुप्त्या कराव्याच लागतात त्यातील हा प्रकार. यापुढेही हे असे घडणारच, फक्त घटना क्रमांक २ व ३ झाली नसती तर योग्य. समाज वेगवेगळ्या श्रेणीत घडतो (पुढे जातो?) आहे.

-------------------------------------------------------------------------
चालू द्या. नेहमीप्रमाणे आपण सोडून बाकी सगळे जग येडे आहे अश्या चर्चा करत राहू. कसे? ;-)

पब भरो

महिला व बालकल्याण विकास खात्याच्या सन्माननीय राज्यमंत्री रेणुकादेवी चौधरी यांनी केलेले हे आवाहन आहे. श्रीरामसेनेला धडा शिकवण्यासाठी 'पब भरो' आंदोलन.

यालाच रोगापेक्षा इलाज भयंकर असे म्हणतात असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संस्कृती रक्षण

खाली माझ्या प्रतिसादात आले आहेच पण म.टा. मधील संस्कृतिरक्षण, पब, आणि 'बातमी'ची भूक हा लेख वाचण्यासारखा आहे.

अवांतरः या संदर्भातमला जर व्हॅलेंटान डे ला समूळ उपटायचे असते तर व्हॅलेंटाईन डे साजरा करणे हे कसे संस्कृतीत बसते आणि प्रत्येकाने तो संस्कृतीरक्षण म्हणून साजरा करायलाच हवा म्हणून दबाव आणला असता. कारण तसा तो आपल्या संस्कृतीतील असावा :-) दिल तो पागल है मधे माधूरीला माहीत असते की वॅलेंटाईन डे आणि पौर्णिमा एकत्र आल्यास सखा मिळतो म्हणून ;) हे त्या खर्‍या संत व्हॅलेंटाईनला तरी माहीत होते का?

स्टंट नक्कीच आहे पण

वरील तिन्ही घटना बोलक्या आहेत आणि त्यात स्टंट नक्कीच आहे. पण वर घाटपांड्यांनी म्हणल्याप्रमाणे "..हा मार्ग व्यावहारिक आहे तात्विक नाही."

आता वरील तीन घटनांचा विचार केला तर काय जाणवते?

  1. पहील्या घटनेत एक व्यक्ती तिच्यावर व्यक्तिगत जे काही अन्याय झालेत त्यावर वाचा फोडत आहे. ही बातमी मी आधी नीट न वाचल्याने जास्त लिहीत नाही, पण एखाद्या व्यक्तीचा होणारा उद्रेक हा स्टंट पेक्षा मानसीक अवस्था (सायकॉलॉजिकल केस) म्हणून जास्त असू शकते असे वाटते.
  2. दुसर्‍या घटनेसंदर्भात मुतालीक आणि तरूणाई यावरील वर अजानुकर्णाने दिलेला लेख वाचनीय आहे. त्या लेखात हे तरूण पब विरुध्द असले स्टंट करतात असे म्हणले आहे पण त्यांना इतर कशाचेच काही पडलेले नाही (समाजाचे). तीच गोष्ट वास्तवीक त्या संबंधात मुतालीक आणि पार्टीची... हा लेख त्यासाठी वाचण्यासारखा आहे. पण पहीली घटना हे व्यक्तीच्या मानसशास्त्रासंदर्भात एक उदाहरण देत असेल तर या दुसर्‍या उदाहरणात मॉब सायकॉलॉजी आहे - दोन्ही बाजूंनी. टिळकांचे अशा अर्थी वाक्य आहे, "समाजाचे मानसशास्त्र हे न उलगडणारे कोडे आहे". येथे हा समाजपण नाही आहे तर निव्वळ जमाव आहे.
  3. तिसरे उदाहरण मात्र जरा वेगळे आहे. अनिस सारख्या संस्थेच्या (ज्यांचे बरेचसे विचार मला व्यक्तिशः पटले तरी आचार अजिबात पटत नाहीत) संघटकांनी रक्ताने वगैरे लिहून पाठवणे आणि अपेक्षा करणे की त्याचा दबाव म्हणून उपयोग होईल हे जरा अतीच झाले. अंधश्रद्धा जायला हवी असे जर खरेच वाटत असेल आणि ते जर या संस्थेचे ध्येय असेल तर त्यासाठी प्रयत्न करताना केवळ एक कायदा करून नक्की काय घडणार आहे ह्याचा विचार अशा (सु)शिक्षित लोकांनी केलेला बरा असे वाटते. आज अस्पृश्यता निवारण, हुंडा विरोध, पासून ते पानपराग विरोधात अनेक कायदे झालेत त्याचे काय झाले अथवा त्याने काय होत आहे ते माहीत असेलच. यातील प्रत्येक गोष्ट ही समाजशिक्षणाने साध्य होणार आहे, प्रसिद्धीने नाही. पण त्यासाठी धीर (पेशन्स) लागतो आणि कामात सातत्य लागते आणि ते करत असताना आत्मपरीक्षण आणि सिंहावलोकन करत कामात आणि पद्धतीत कालानुरूप फेरफार करावे लागतात. अनिस ने सातत्याने काम केले नाही असे मला म्हणायचे नाही, पण आत्मपरीक्षण आणि सिंहावलोकन करण्यात ते कमी पडत नाहीत ना असे नक्कीच वाटते.

जाता जाता प्रसारमाध्यमांचा मुद्दा: माणूस कुत्र्याला चावला तर लक्षवेधक बातमी होण्याची शक्यता असते. पण हा दोष प्रसारमाध्यमांचा की वाचकांचा? का दोघांचा?

थोडक्यात वरील तीन उदाहरणात व्यक्ती आणि जमाव यांच्या अचानक (रँडम या अर्थी) वागण्यावर कुणाचेच बंधन असू शकत नाही. पण तेच जेंव्हा एखादी संस्था असते (घटना ३) तेंव्हा त्यांच्या वागण्यावर कुणी सांगो न सांगो जबाबदारी असते - स्टंट न करता काम मोठे करण्याची. ते ज्या व्यक्ती, संस्था करतात त्या काळाच्या ओघात टिकतात, इतरांचा आदी-मध्य-अंत हा केवळ काळाचा महीमा ठरतो...

असो.

प्रसिद्धी तंत्र

प्रसिद्धि शिवाय लक्ष वेधले जात नाही. लक्षवेधि बातमीने माणुस आणि कुत्रा दोघांनाही प्रसिद्धी मिळते. वर्तमानपत्राचा खपही वाढतो. प्रसार् माध्यमे व वाचक दोघेही खुश. दाभोलकरांना प्रसिद्धि तंत्र चांगलेच अवगत आहे हे मी खात्रीने सांगु शकतो.

आज अस्पृश्यता निवारण, हुंडा विरोध, पासून ते पानपराग विरोधात अनेक कायदे झालेत त्याचे काय झाले अथवा त्याने काय होत आहे ते माहीत असेलच

यावर कायदा करुन प्रश्न सुटत नाहीत पण न करुनही सुटत नाहीत हा युक्तिवाद केला जातो

प्रकाश घाटपांडे

स्टंटबाजी व प्रश्न

"सनदशीर, कायद्याच्या चौकटीत राहून केलेल्या विरोधाला कुणी दाद देत नाही. अगदी प्रसारमाध्यमेही असे काही केल्याशिवाय अशा विरोधाची दखलही घेत नाहीत." ही दोन्ही विधाने मला पटतात.

प्रश्न रहातो : मग अशा प्रकारचे मार्ग चोखाळणे योग्य की अयोग्य ?

माझे उत्तर : कायदा न मोडता , नासधूस , हाणामार्‍या न करता काही केले तर काय हरकत आहे ? एखादी व्यक्ती , एखादा गट , एखादा समाज जर का सनदशीर रीतीने आपला विरोध प्रकट करत असेल तर जरूर करावे. पहाणार्‍याला जर यातली स्टंटबाजी खटकत असेल तर त्याला नाइलाज आहे. स्टंटबाजी खटकणार्‍यांनी अशा अन्यायग्रस्त घटकांकरता काय केले आहे ? माझ्यामते अशा प्रकारचे उपाय करावे लागणे म्हणजे "आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या" असे त्या त्या घटकाचे सांगणे आहे. बस्स्. बर्‍याच वेळा अशा घटकांची दखल घेणारा कुणी वाली नसतो कारण अशा घटकांची बाजू घेऊन राजकीय फायदा नसतो. (उदा. त्या उत्तर भारतातील स्त्रीला मदत करणार्‍याला सार्‍या गावाचा रोष सहन करून घ्यावा लागला असता. गुलाबी अंतर्वस्त्रे देण्याची गांधीगिरी करणार्‍यांना मदत करणे म्हणजे समाजातल्या प्रबळ अशा पुरुषप्रधान "संस्कृतीरक्षकांच्या" मतांच्या गठ्ठ्याला दुखविणे. जादूटोणा विरोधी लोकांना मदत करणे म्हणजे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणार्‍या - प्रसंगी राजकीय वरदहस्त असणार्‍या - प्रबळ घटकांचा विरोध सहन करणे.)

थोडक्यात , ज्याना यातल्या स्टंटबाजीचा मानसिक त्रास होतो किंवा ती खटकते त्यांनी त्या त्या अन्यायग्रस्त लोकांच्या भूमिकेत शिरून पहावे. कदाचित त्यांच्या टीकेची धार बोथट होईल.

चर्चाविषय खरेच समजला नाही

धक्कातंत्र हे नवीन आहे काय? माहितीच्या गजबजाटात लोकांचे लक्ष दिपून गेलेले आहे. ठळकपणे दिसू येण्यासाठी काही लोक धक्कातंत्र अवलंबतील.

धक्के हिंसक नसल्यास सनदशीर आहेत, असे वाटते. गावंढळ किंवा अशिष्ट टवाळकीचा मार्ग मारहाणीपेक्षा कधीही उजवा. म्हणूनच -

सनदशीर, कायद्याच्या चौकटीत राहून केलेल्या विरोधाला कुणी दाद देत नाही.

या वाक्याचा येथील संदर्भ समजला नाही. अंतर्वस्त्रांत चालणे, अंतर्वस्त्रे पाठवणे, किंवा (स्वतःच्या) रक्ताची शाई करून पत्रे लिहिणे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे काय?

असे असले तर प्रत्येकानेच अशी 'शॉक ट्रीटमेंट' वापरावी काय?

सुज्ञ समाजकारकाने विचारपूर्वक धक्कातंत्र वापरावे, असे वाटते. जर आपल्याला हव्या असलेल्या मुद्द्याकडे लोक पूर्णपणे दुर्लक्ष करत असतील तर कुत्सित लक्षही बरे. जो मुद्दा ज्वलंत आहे, ज्याविषयी लोकांत साधकबाधक चर्चा चालू आहे, त्याची गोष्ट वेगळी असू शकते. "धक्कातंत्राचा अशिष्टपणा" या प्रकारात चर्चा गुंतल्यामुळे आपल्याबाजूचे लोक साथ देणार नाहीत अशी भीती असते. अशा परिस्थितीत धक्कातंत्र मुत्सद्दीपणे वापरावे.

मुत्सद्दीपणा

"धक्कातंत्राचा अशिष्टपणा" या प्रकारात चर्चा गुंतल्यामुळे आपल्याबाजूचे लोक साथ देणार नाहीत अशी भीती असते. अशा परिस्थितीत धक्कातंत्र मुत्सद्दीपणे वापरावे.

धक्कातंत्र कशासाठी? लक्ष वेधण्यासाठी.
लक्ष व्यक्तिकडे वेधले गेले हवे कि विचारांकडे असा तात्त्विक् प्रश्न ज्यावेळी उपस्थित होतो त्यावेळी साहजिकच जर व्यक्तिकडे लक्ष वेधले गेले तरच विचारांकडे लक्ष वेधले जाणार आहे. व्यक्ति ही त्या ठिकाणि विचारांची वाहक असते आणि स्त्रोत ही असते. धक्का तंत्राचा मुत्सदी वापर या मुद्द्यावर मला एक उदाहरण आठवते ग प्र प्रधानांनी आपला वाडा हा साधना ट्रस्ट ला दान दिला त्यावेळी त्याला पेपर मध्ये भरपुर प्रसिद्धी मिळाली होती. त्यासुमारास वाचकांच्या पत्रात एक् छोटे पत्र आले होते. एक नाणे उडवा. ते फरशीवर पडु द्या. त्याचा खण्णकन आवाज होउ द्या. लोक वळुन पाहतील. मग ते नाणे उचला आणि दान करा.

प्रकाश घाटपांडे

हा हा

ग प्र प्रधानांनी आपला वाडा हा साधना ट्रस्ट ला दान दिला त्यावेळी त्याला पेपर मध्ये भरपुर प्रसिद्धी मिळाली होती. त्यासुमारास वाचकांच्या पत्रात एक् छोटे पत्र आले होते. एक नाणे उडवा. ते फरशीवर पडु द्या. त्याचा खण्णकन आवाज होउ द्या. लोक वळुन पाहतील. मग ते नाणे उचला आणि दान करा.

हाहाहा. :) प्रधानसरांविषयी अतिशय आदर असूनही हसायला आले. पत्र कोणत्या गावातून आले असावे याचा चटकन अंदाज आला. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बोथट आणि बालिश तंत्र

धक्का तंत्र पुन्हापुन्हा आणि अगदी क्षुल्लक कारणांसाठी वापरले गेल्याने आता त्याची धार बोथट झाली आहे.
इतकी बोथट की मूळ प्रश्न बाजूला राहून ते तंत्र अवलंबणार्‍यांना समाज 'विदुषकाच्या' रूपात पाहतो.
धक्का तंत्राची उपयुक्तता नष्ट झाली आहे. काही क्षणांपुरता त्या बातमीकडे अथवा प्रश्नात लोकांचे लक्ष वेधले जाते.
पण समाजमानसात त्याची प्रतिक्रिया दीर्घकाळ उमटू शकत नाही.

चर्चाप्रस्तावकाच्या प्रस्तावात उल्लेखिलेल्या तीन घटनांपैकी पहिली वैयक्तिक अन्यायाबाबत आहे. नंतरच्या दोन सामाजिक प्रश्नांबाबत आहेत.
पहिल्या घटनेत तो प्रश्न सोडविला गेला असावा किंवा सरकारी यंत्रणांना जाग आली असावी. पण पुनःपुन्हा असे प्रकार वैयक्तिक प्रश्नांसाठी घडू लागले तर 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी अवस्था येऊन ते प्रश्नही यंत्रणेला किरकोळ वाटू लागतील.

दुसर्‍या घटनेत दोन धक्के आहेत - एक मारहाणीचा आणि दुसरा गुलाबी चड्ड्यांचा. हे दोन्ही इलाज कायमस्वरूपी ठरू शकत नाहीत. 'संस्कृतीवरचे परकीय आक्रमण' हा प्रश्न आहे. मुलींना मारहाण हे त्याचे उत्तर नव्हे. तसेच 'स्त्रियांवर अत्याचार' हा प्रश्न आहे. 'गुलाबी चड्डीदान' हे त्याचे उत्तर नव्हे. दोन्ही समस्या पोरकटपणे सोडवण्यासारख्या नाहीत.

तिसर्‍या घटनेतले धक्कातंत्र अंनिस आणि दाभोलकर यांच्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणेच आहे. 'अंधश्रद्धा' ही समस्या सोडवण्यासाठी ठिकठिकाणी जाऊन प्रत्यक्ष विरोध करायचा हे प्रसिद्धी मिळवण्यासाठीचे तंत्र अंनिस पूर्वीपासूनच वापरत आहे. परंतु अंधश्रद्धांचे निर्मूलन हा खूपच व्यापक विषय आहे. अंधश्रद्धांमधून निर्माण होणार्‍या क्रूर, रानटी, पाशवी पद्धती नष्ट होण्यासाठी समाजाचे सर्वांगिण उत्थान होणे गरजेचे आहे. एखाद्या पूजास्थळावर जाऊन दंगा घालणे हा उपाय होऊ शकत नाही. अंनिस आणि दाभोलकरांच्या एकांगी प्रतिमेमुळे मध्यममार्गी लोक त्यांच्या बरोबर जाण्यास कचरतात हे कठोर सत्य त्यांच्या लक्षात येत नाही काय? जादूटोणाविरोधी कायदा व्हावा अशी रक्तलिखित मागणी करणे हा उपाय नव्हे. असा कायदा करायचा तर समाजातील चार समंजस, जनमान्य व्यक्तींबरोबर अशा कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी बोलणी व्हावीत.

विशेषतः भारतात कोणत्याही समस्या अशा धक्का तंत्राने सुटत नाहीत. महाडला 'चवदार तळे' होऊन (२० मार्च १९२७) आता ब्यांशी वर्षे झाली. पण अजूनही भारतातीलच काय पण महाडातही (मानसिक) अस्पृष्यता नष्ट झालेली नाही.
थोडक्यात, धक्का तंत्र हे अत्यंत उथळ तंत्र असून त्याने कोणत्याही समस्येचे चुटकीसरशी समाधान होईल अशी बालिश अपेक्षा कोणीही बाळगू नये.

धक्का

क्रमांक १ मध्ये पोलिसांकडून लगेच कारवाई झाली हे लक्षात घेण्यासारखे आहे.
क्रमांक २ मध्ये मार्ग अशिष्ट वाटत असला तरी त्यात वावगे वाटत नाही. मुळात श्रीराम सेनेची वर्तणूक बघता त्यांच्याविरुद्ध कुठलाही उपाय केला तरी मला व्यक्तिशः वावगे वाटणार नाही.
क्रमांक ३ थोडा आश्चर्यकारक वाटला. अनिससारख्या संस्थेलाही असे मार्ग वापरावेसे वाटले ही बाब विचार करण्यासारखी आहे.

धक्का तंत्रामध्ये कायदा मोडत नसेल तर काही वावगे आहे असे वाटत नाही. दांडीयात्राही धक्का तंत्र होते असे म्हणता येईल.*

*मसवर असे वाक्य लिहीणे म्हणजे पेट्रोलपंपावर शिग्रेट पेटवण्यासारखे आहे, म्हणून एक मोठ्ठा डिसक्लेमर. इथे गांधीजींचा सत्याग्रह आणि वरील घटना यांची कुठलीही तुलना केलेली नाही. इथे गांधीवादाबद्दलही काहीही म्हणायचे नाही हे कृपया लक्षात घ्यावे. गांधीजींबद्दल पूर्ण आदर राखूनच हे विधान केले आहे. हेतू इतकाच की धक्कातंत्र ही नवीन गोष्ट नाही. आता ते कुणी, कसे वापरले यात बराच वेगळेपणा दिसतो.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

धक्का तंत्र नव्हे

यातील केवळ एकच घटना खर्‍या अर्थाने धक्का तंत्राची म्हणावी लागेल. ती मुतालिक यांची. पहिल्या घटनेतील महिलेवर झालेल्या अत्याचारांमुळे ती एवढी हतबल झाली होती, की तिने तो प्रकार केला तो अगदी स्वयंस्फूर्तपणे केला. त्यावेळी त्या घटनेचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांनाही तिने शिव्या घातल्या होत्या, हे मला आठवते. एकदा तिच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर पुन्हा असा प्रकार् तिने केल्याचे ऐकिवात नाही.
मुतालिक यांची संघटना असल्याचे कोणाला माहितही नव्हते. त्यांनी मंगळुरूमध्ये जो गोंधळ घातला त्यानंतर माध्यमांनी त्यांची दखल घेतली आणि इतरांनी बागुलबुवा उभा केला. यातून मुतालिकचा हेतूही साध्य झाला. त्याला प्रतिसाद म्हणून चड्डी पाठविण्याचे आंदोलन करण्याचीही पुरेशी चर्चा झाली. मात्र त्यांना चड्डी पाठविणाऱयांना मुतालिक यांनी खादीच्या साड्या पाठविल्या, याचा कुठेही उल्लेख झाला नाही. कारण त्यात चमत्कृती जशी नव्हती तशीच सोयही नव्हती. त्यामुळे धक्कातंत्र हे कसे आवश्यक आहे, हे कळून यावे.
नरेंद्र दाभोलकर यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांना जनतेचे नव्हे तर सरकारचे लक्ष त्यांच्य आंदोलनाकडे वळवायचे आहे. यापूर्वी त्यांनी अशाच धर्तीवर थोबाडीत मारा (स्वतःच्याच) असे आंदोलन केले होते. रक्ताने पत्र लिहिणे ही त्याची पुढची पायरी आहे. माध्यम आणि जनतेने त्यांच्या आंदोलनाची पुरेशी दखल घेतली आहे. त्यामुळे त्याला धक्कातंत्र म्हणावे असे मला तरी वाटत नाही. सरकारला हलविण्यासाठी योजलेला तो एक जालिम उपाय आहे, एवढेच.

 
^ वर