उपमा
उपमा
शाळेत सर्वात प्रथम शिकवला जाणारा अर्थालंकार म्हणजे उपमा. कळावयाला व ओळखावयाला, उपयोगात आणावयाला सोपा.वाघासारखा शूर सैनिक. वाघ शूर.. माहित आहे; सैनिक वाघासारखा आहे .. सांगितले, सैनिक शूर आहे कळले; एकदम सोपे ! उदाहरण द्या. लांडग्यासारखे क्रूर मास्त.... चुकलो, चुकलो... गायीसम गरीब आई ! लक्षात ठेवावयाचे चार घटक
[१] ज्या पदार्थाचे वर्णन करावयाचे त्याला प्रस्तुत किंवा उपमेय म्हणतात ... येथे सैनिक / आई.
[२] ज्याची उपमा दिलेली असते त्याला अप्रस्तुत किंवा उपमान म्हणतात.... येथे वाघ/ गाय.
[३] दोहोत जो सारखेपणा आहे त्यास साधर्म्य, सादृश्य किंवा साधारण धर्म म्हणतात, येथे येथे शूरपणा / गरीबपणा.
[४] प्रस्तुत व अप्रस्तुत यात सारखेपणा दाखवणारे जे शब्द, येथे सारखा/ सम, त्याना सादृश्यवाचक किंवा उपमाप्रतिपादक म्हणतात.
उपमेचे कार्य
१. नवीन गोष्ट समजावून घेताना जुन्या माहीत असलेल्या गोष्टी़शी संबंधीत साम्य/विरोध माहीत करून घेणे उपयोगी पडते. उदा. तुम्ही हत्ती पाहीला नाही; परंतु मी जर सांगितले की त्याचे कान सूपासारखे; त्याचे पाय खांबासारखे, तर तुम्हाला हत्तीचे कान/पाय यांची कल्पना येऊ शकेल.
२. यथार्थ ज्ञान देणे हा एक भाग झाला. कविमनातल्या भावना उत्कटपणे वाचकाच्या मनात निर्माण करणे हेही महत्वाचे काम उपमा करते.
कन्या सासुयासी जाये मागे परतोनी पाहे !
तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा !!
चुकलिया माये बाळ हुरुहुरु पाहे
जीवनावेगळी मासोळी तैसा तुका तळमळी !!
येथे तुकारामांच्या आर्ततेची कल्पना उपमांमुळेच वाचकाच्या मनात जागृक होते.
३. तिसरे कार्य म्हणजे चमत्कृतीमुळे आनंद देणे.मृगनयना, चंद्रमुखी या खरोखरी आल्हाददायक उपमा आहेत. पण अनेक वेळच्या उपयोगामुळे त्यांतील चमत्कृतीचा आनंद मिळणे अवघड झाले आहे. " तुझे चांदण्याचे हात " ही नवीन कल्पना जास्त आल्हादकारक आहे. सुवर्णसंधी, रामबाण औषध, असे प्रयोग रुळून गेल्यामुळे अलंकार राहिलेच नाहीत. माधव जुलियनांची नवीन कल्पना बघा
लावण्ययुक्त, पिस्त्यापरि लाडिक मुख तिचे जरा उघडे
सुचवी भाव जणूं कीं, " गंमत नामी तुम्हास सांगु गडे "
४. सौंदर्यदर्शन हे उपमेचे चौथे कार्य. चमत्कृतीपूर्ण यथार्थ दर्शन पुरेसे नाही. ते सुंदरही पाहिजे. उपमा किळसवाणी असेल तर आनंद कोठून व मग अलंकार तरी का म्हणावयाचे ?
अर्थात जुन्या कल्पनांना जवळ करूनच हे विधान स्विकारावे. नवकवी मुखाला खारा पिस्ता म्हणतील, पावडरचा जाडा थर दाखवावयाला ! असो.
उपमेचे तीन प्रकार
[१] पूर्णोपमा
उपमेतील चारही मुख्य घटक, प्रस्तुत, अप्रस्तुत, सादृश आणि उपमाप्रतिपादक यांचा स्पष्टपणे उल्लेख झालेला असतो त्या उपमेला पूर्णोपमा म्हणतात.
चाफ़्यापरी गोरेपण पिवळं,
काकडीपरी अंग कोवळं,
मैद्यापरी लुसलुशीत सगळं,
दृष्ट पडून करपली ! पडे कुणा पाप्याची सावली!
तांबे.
यातील पहिल्या ओळीत प्रस्तुत ... गोरेपण, अप्रस्तुत ... चाफ़ा, सादृश्य ... पिवळा रंग, उपमाप्रतिपादक .. परी हे चारही घटक स्पष्टपणे सांगितले आहेत.
[२] लुप्तोपमा
चार घटकांपैकी एक किंवा दोन स्पष्टपणे सांगितले नसतील तर लुप्तोपमा होते.
राया डोळ्यामंदी तुझ्या मोतियाचे पाणी,
राया तुझा रंग जवसाच्या फ़ुलावाणी.
तुझ्या डोईवर अक्षी पागुट कुसुंबी,
तुझा वठ बाई जशी फ़ुलली डाळिंबी.
राया तुझ दात जसं धुतल तांदुळ,
तुझ्यासाठीं मला जनूं भरलंया खूळ.
जात्यावरलं गाण
काय सुरेख ग्रामीण उपमा. लुप्त घटक शोधा, पण आस्वाद पहिल्यांदी घ्या.
[३] मालोपमा
एकाच उपमेयास अनेक उपमाने दिलेली असतात तेव्हा मालोपमा होते.
जो सर्व भूतांच्या ठाईं द्वेषातें नॆणे काहि
आप परू नाहि चैतन्या जैसा !
उत्तमाते धरिजे अधमाते अव्हेरिजे
हे कहि चि नेणिजे वसुधा जेंवि !
रायाचे देह चालूं रंकाते परौते गालूं
हे नेणेचि कृपालू प्राणु पै गा !
गाइची तृषा हरूं व्याघ्रा विष होऊनि मारूं
हे नेणेचि करूं तोय जैसे !
घरिचिया उजियेड करावा पारखेया आंधारु होआवा
हे न म्हणे पांडवा दीपु जैसा !
ऐसी सर्व भूतमात्रिं येकपणाची मैत्री
कृपेची धात्री आपण जो !
अध्याय १२.
चैतन्य, वसुधा, प्राण, तोय, दीप ही उपमाने भक्त या उपमेयाला दिली आहेत.
एक नम्र विनवणी. रसिक वाचकांनी या उपक्रमात भाग घेऊन स्वताला आवडलेली रचना प्रतिसाद म्हणून अवष्य द्यावी. निरनिराळी उदाहरणे गोडी वाढवतील. [विषेशत: श्री.वाचक्रवी,चतुरंग इत्यादींनी हा भार उचलावाच.]
शरद
Comments
उदा
पुर्णोपमा
यक लाजरान् साजरा मुखडा चंद्रावानी खुलला गं|
राजा मदन हासतोय जसा कि जीव माझा भुलला गं|
प्रकाश घाटपांडे
लेख प्रचंड आवडला.
हा लेख म्हणजे जणू उपक्रमावरील पागुटं कुसुंबीच. असेच सर्व अलंकार येत जावोत.
उदाहरण म्हणून माझ्याच खूपखूपखूप जुन्या कवितेतील एक उपमा - (C) ;)
विचार... जणू भर दुपारच्या उन्हात वावटळीत तरंगणारी करड्या केसांची गलिच्छ गुंतवळ.
सुंदर लेख
इतरांची उदाहरणे वाचण्यास उत्सुक.
असेच
म्हणतो. सुंदर लेख.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ समजावा.
छान!
"राया डोळ्यामंदी".. वाचून गंमत वाटली. आत्तापर्यंत जास्त करून स्त्रियांच्या बाबतीत असे वर्णन केलेले वाचले आहे. पुरूषांच्या चेहर्याचे असे वर्णन विरळाच असावे. देवाचे अनेकदा असते - जसे कृष्ण, पण सर्वसाधारण पुरूषांच्या बाबतीत अशा प्रतिमादर्शी काव्याची कमी उदाहरणे पाहिली आहेत.
लेख आवडला.
लेख
लेख आवडला. रंजन करता करता उत्तम भाषाविषयक माहिती देणारा.
प्रश्न :
लावण्ययुक्त, पिस्त्यापरि लाडिक मुख तिचे जरा उघडे
सुचवी भाव जणूं कीं, " गंमत नामी तुम्हास सांगु गडे "
यात पहिल्या ओळीत उपमा आहे पण दुसर्या ओळीत उत्प्रेक्षा आहे , बरोबर ना ?
बाकी उपमालंकार या भाषेच्या घटकाच्या मर्यादा साक्षात् आधुनिक वाल्मिकींनी सांगितल्या आहेत : "या दानासी , या दानाहून अन्य नसे उपमान्" :-)
मस्त
चांगला लेख.
उपमेचा उपयोग पद्याबरोबर गद्यातहि वेगवेगळ्याप्रकारे झाला आहे. अनेक लेखकांनी सौंदर्य, प्रेम, भीती, शौर्य, वगैरेंनी तर उपमा वापरली आहेच. पण मला व्यक्तीशः विओदात वापरलेल्या उपमा जास्त आवडतात... आअणि त्यातहि पुलं अश्याकाहि चपखल उपमा वापरतात की व्वा!
उदा.
"या बायका नवरे मंडळीना खरेदीच्या वेळी तासन् तास टांगून ठेवतात..... श्रीखंडाच्या चक्क्यासारखं ":)
"एक डुकरीण आपल्या डझनभर पिलांना घेऊन शॉपिंगला निघाल्याच्या ऐटीत चालली होती"
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आणि अपन्हुती
शाळेत शिकलेले जे जसे आठवते त्याप्रमाणे
१) उपमा अलंकारांत ज्या गुणासाठी उपमा दिली जाते त्या गुणाच्या बाबतीत उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ असते. उदा. वाघासारखा शूर याचा गर्भितार्थ शूर पण वाघा झ्तका नाही.
२) उत्प्रेक्षा अलंकारात उपमेय व उपमान यांतील अंतर आणखी कमी होते. उदा. इतका शूर की जणूकाही वाघच. (जणू, जणूकाही या शब्दांचा वापर हे या अलंकाराचे लक्षण समजले जाते).
३) रूपक अलंकारात उपमेय व उपमान यांत काहीच अंतर नाही (किंबहुना दोन्ही एकच आहेत) असे सुचवलेले असते. त्याचे लक्षण खालील काव्यपंक्तीत सांगितले आहे:
उपमानोपमेयांचे अभेदे जेथ वर्णन
तेथ रूपक जाणा हे शास्त्र तत्वार्थ दर्पण
(येथे "शास्त्र तत्वार्थ दर्पण" हे उदाहरण म्हणून दिले आहे).
४) अपन्हुती अलंकारात उपमेयाचे अस्तित्वच नाकारले जाते व तेथे उपमानच आहे असा आरोप केला जातो. उदाहरणादाखल खालील काव्यपंक्ती पहा:
न हे नभोमंडल वारिराशी |
न तारका फेनचि हा तयासी || (फेन = फेस)
न चंद्रमा नावचि चालताहे |
न अंक तो तीवरी शीड आहे || (अंक = चंद्रावरील डाग)
(वरील गोष्टी सुमारे ५५ वर्षांपूर्वी शिकलेल्या असल्यामुळे व नंतर त्यांच्याशी संबंध न आल्यामुळे त्यावरील शंकांना उत्तरे देऊ शकेनच याची खात्री नाही).
प्रेमाला उपमा नाही
ज्योतीला भेटायला तिच्या कांही मैत्रिणी आल्या होत्या. ज्योतीच्या आईने त्यांच्यासाठी मस्तपैकी उपमा बनवला. तो त्यांना इतका आवडला की त्यांनी तो लगेच फस्त करून टाकला. त्यानंतर थोड्या वेळाने प्रेमा तिथे येऊन पोचली. तिला पाहून सर्व मैत्रिणींनी एका सुरात गाणे गाईले, "प्रेमाला उपमाआ नाआआहीईईईई..."
फारच छान
अलंकारांविषयी अधिक माहिती वाचायला आवडेल.
अपन्हुती हा अलंकार आम्हाला अभ्यासक्रमात कधीही नव्हता. बाकीचे अलंकार माहीत होते. मात्र या अलंकाराबाबत पहिल्यांदाच ऐकले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
उप्मा
उपमा म्हंजी सारखेपणा पाह्यजेच. उपमा अलंकारामधी ’सारखा, जसा, सम ,सदुश, असे शब्द आले पाह्यजेन
उपक्रमी सारे आकाशातले तारे, पर सर्किट भौ म्हंजे शुक्र तारा. :-)
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
हा हा
उपक्रमी सारे आकाशातले तारे, पर सर्किट भौ म्हंजे शुक्र तारा. :-)
सर्किट हे उपक्रमात नाहीत.
शुक्र हा तारा नाही.
त्यामुळे .... सर्किट हे उपक्रमातला कुठलाही तारा नाहीत. अन्य ठिकाणचा तारा असले तर तिथलासुद्धा शुक्र-तारा असणे अशक्य.
ह.घ्या. !! :-)
एक पूर्णोपमा
आताच रामजोशांच्या कवितांचे पुस्तक वाचायला घेतले आहे. त्यात दुसर्या बाजिरावाच्या पोवाड्यात पुढील पूर्णोपमा वाचायला मिळाली :
...बाजीराव पेशव्या...
...पुण्यवान ही पुरी ...
येथे नाना भोग भोगितो जसा जनक मंदिरी ।
आपुल्या अलिप्त अभ्यंतरी ।
...
उपमेय : पुण्यवान पुरी येथे बाजीराव पेशव्या
उपमान : मंदिरी जनक
सादृश्य : नाना भोग अलिप्त अभ्यंतरी भोगतो
उपमाप्रतिपादक : जसा
(दुसर्या बाजीरावाबद्दल इतिहासाचे मत तितके चांगले नाही. ऐशबाजीचा तो अलिप्त उपभोग (जणू उपभोगशून्य स्वामीचा पुढचा अवतार) घेत होता, असे त्या काळातल्या कवीकडून वर्णन वाचून गंमत वाटली.
पैशे दिले असतील
त्या कवीला असे काव्य रचण्यासाठी बाजीरावाने पैसे दिले असतील असे मानण्यास वाव आहे. :)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥