मराठी अभ्यास केंद्र : उद्घाटन

स.न.वि.वि.

शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २००९ रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. हे कार्यालय प्रा. रमेश पानसे यांच्या सौजन्याने मिळाले आहे. ग्राममंगलच्या पुढाकाराने राबविण्यात येणा-या द्विभाषा प्रकल्पात मराठी अभ्यास केंद्राचा सहभाग असणार आहे. त्या प्रकल्पाचे कामही या कार्यालयातून चालणार आहे. प्रसिद्ध चित्रकार श्री. सदाशिव कुलकर्णी यांनी परिश्रमपूर्वक या कार्यालयाला नवीन साज चढवला आहे.

महाराष्ट्र फौंडेशनच्या मदतीने कार्यालयाचे संगणकीकरण झाले आहे. दिनांक १ मार्च पासून कार्यालय नियमितपणे सुरू होईल व मराठी अभ्यास केंद्राच्या कार्याला गती प्राप्त होईल.

कार्यकर्ता/हितचिंतक या नात्याने आपण मराठी अभ्यास केंद्राशी जवळून संबंधित आहात. तेव्हा आपणास विनंती आहे की दिनांक २७ फेब्रुवारी २००९ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळात आपण मराठी अभ्यास केंद्राच्या नूतन कार्यालयास सदिच्छा भेट देऊन आमचा हुरूप वाढवावा.

पत्ता :३, यमुना निवास, गोविंद बच्चाजी मार्ग, चरई, ठाणे, ४००६०२

संध्याकाळी ५ वाजता

स्नेहांकित,

मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकारी मंडळ
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी अभ्यास केंद्र विषयक निवेदन

मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीपुढील प्रश्नांची सोडवणूक करू इच्छिणार्यास कार्यकर्त्यांचं, अभ्यासकांचं व्यासपीठ आहे. मराठी समाजापुढील आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी या आधीही बरेच प्रयत्न राजकीय किंवा बिगर-राजकीय पातळीवर झालेले आहेत. मात्र हे प्रयत्न विखुरलेले आणि तात्कालिक राहिल्याने आज अनेक प्रश्न भेसूर झालेले दिसतात. जागतिकीकरणाने विविध भाषिक समुदायांपुढे अस्तित्वाचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. जागतिकीकरणाच्या लाटेवर स्वार झालेल्या मंडळींनी त्यांच्या ताब्यात असलेल्या माध्यमांच्या जोरावर मराठी भाषेचे मृत्यूलेख लिहायला घेतलेत. दुसरीकडे झोपेचे सोंग घेतलेल्या लेखक-कवींना, नोकरशहांना, राज्यकर्त्यांना सूर्य-चंद्र असेपर्यंत मराठीला काहीही होणार नाही असे भास होऊ लागलेत. परिस्थिती मोठी कठीण झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत आपण भाषा, समाज आणि संस्कृतीचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरलेल्या पध्दती बदलण्याची वेळ आली आहे. मराठी अभ्यास केंद्र हे त्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल आहे.

न्यूनगंडावर आधारलेले भाषेचे राजकारण दीर्घकाळ टीकू शकणार नाही ही जाणीव त्यामागे आहे. शासन यंत्रणेने भाषानियोजन, भाषाविकास याबाबत झटकलेली जबाबदारी, बाजारपेठच भाषेची उपयुक्तता ठरवेल असं म्हणणार्‍या तथाकथित विचारवंतांचा सुळसुळाट आणि साहित्यापलिकडे खूप मोठा भाषा व्यवहार आहे याबद्दल अज्ञानी असणारे सांस्कृतिक जगाचे प्रतिनिधी या व इतर आव्हानांचा सामना करत या नंतरच्या काळात मराठीच्या विकासासाठी वाटचाल करायची आहे. मराठी अभ्यास केंद्र ही विचारी कार्यकर्त्यांची रचनात्मक व सकारात्मक चळवळ आहे. म्हणूनच मराठी अभ्यास केंद्राचा प्रत्येक अभ्यासगट हा प्रत्यक्षात कृतिगटच आहे.

मुंबईत १ डिसेंबर २००७ रोजी या अभ्यास केंद्राची स्थापना झाली. डॉ. प्रकाश परब आणि प्रा. दीपक पवार हे या अभ्यास केंद्राचे समन्वयक आहेत. डॉ. परब हे भाषाविज्ञानाचे अभ्यासक असून भाषानियोजन व भाषाविकास या विषयांवर सातत्याने काम करत असतात. प्रा. पवार हे भाषेचे राजकारण या विषयावर संशोधन व लेखन करतात. काही वर्षांपूर्वी शासनाने अभ्यासक्रमातील मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला, तेव्हा माहिती तंत्रज्ञानाला विरोध न करता मराठीची बाजू मांडणार्या कार्यकर्त्यांमध्ये हे दोघे होते. गेली काही वर्षे न्यायालयांच्या मराठीकरणाच्या चळवळीत या दोघांचा सक्रिय सहभाग आहे.

मराठी ही महाराष्ट्रीची राजभाषा व लोकभाषा आहे. ती व्यवहारभाषा व ज्ञानभाषा व्हावी यासाठी सर्व संबंधितांना बरोबर घेऊन मराठी अभ्यास केंद्राचे काम पुढे न्यायचे आहे. या कामात रूची आणि गती असणार्यांधनी सहभागी व्हावं आणि मराठी भाषेच्या विकास कार्यात आम्हाला सहकार्य करावं असं आपणास आवाहन आहे. आपल्या सहभागातूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी चाललेल्या आमच्या प्रयत्नांना लोकचळवळीचं स्वरूप येईल असा आमचा विश्वास आहे.

मराठी अभ्यास केंद्राचे विविध कृतीगट, त्यांचे स्वरूप व गटप्रमुख यांची माहिती सोबत देत आहोत.

समन्वयक

डॉ. प्रकाश परब
१६, नीलयन, शास्त्रीनगर,
जुनी डोंबिवली रिक्षा स्टॅण्ड जवळ,
डोंबिवली (प.) ४२१२०२
दुर. ९८९२८१६२४०
ई-मेल – pspdombivli@gmail.com

प्रा. दीपक पवार
ए,२, जयसावित्री, वल्लभ बाग गल्ली
गोरोडिया नगर, घाटकोपर (पू.)
मुंबई – ४०००७७
दुर. ९८२०४३७६६५
ई-मेल – santhadeep@gmail.com

संकेतस्थळ: www.marathi-vikas.blogspot.com

ई-मेल: marathivikas@gmail.com

लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

वा! आनंद वाटला.
या कार्यास मनापासून शुभेच्छा!!!

मराठीचे असे काही शिलेदार आहेत हे आपले भाग्यच आहे.

नमके काय काम केले जाईल याचा काही आराखडा आहे का?

या शिवाय
राज्य मराठी विकास संस्था,
चित्तरंजनांची संस्था,
मराठी विश्व कोश (शिवाय मराठी विकिही) तसेच
मराठी शब्द यांचा काही समन्वय आहे का?

असल्यास मोठाच दबाव गट तयार होवू शकतो असे वाटते.
आणि कामही नेमके पणाने, एकवाक्यतेने आणि सूत्रबद्धतेने होईल.

आपला (चिंतनशील)
गुंडोपंत

उत्तरे

संस्थेच्या संस्थापकांना उपक्रमाची लिन्क् दिलेली आहे. तुमच्यासारख्या इतरांच्याही प्रश्नांची उत्तरे देण्याकरता त्याना इथे सभासदत्व घेण्यास आवाहन केलेले आहे.

शुभेच्छा !!!

मराठी अभ्यासकेंद्राच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!

सुंदर निवेदन

निवेदन अतिशय सुंदर व आत्म परिक्षण करावयास लावणारे वाटले. वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद मुक्तसुनीत.

प्रकाश घाटपांडे

 
^ वर