अलंकार
बरे केले देवा, उपटले कान !
नाही तरी शाळा सोडल्यापासून कोणी कान उपटले नव्हते. अभ्यास सोडून फ़ालतू गोष्टीत वेळ घालविण्याची सवय तेंव्हापासूनची. गुरुजी प्रयत्न करून थकले; आम्ही तसेच.असो. इतक्या दिवसांनंतर शालामातेची आठवण झाली हे काय कमी ? आता [चित्राताई म्हणतात त्याप्रमाणे] एखादेवेळी मित्रात गप्पा मारतांना जा हलक्या फ़ुलक्या गोष्टी आपण बडबडतो त्यातील एक
हराच्या हाराच्या. विसरून जाण्याच्या योग्यतेची. परत संतांच्या कविता ,शुआंग चांग, जेम्स प्रिन्सेप, या सारख्या गंभीर [म्हणजे अनेकांना पिडण्याकरिताच्या] विषयांना हात घालावयास हरकत नाही.त्यातही मराठी वाङमयातील विषय घ्यावा हे बरे. तोही जर सर्वांना माहित असलेला [परंतु आता लक्षात न राहिलेला ] असेल तर उत्तमच . प्रतिसाद हमखास येतील. तर मंडळी सुरु करू या "काव्यातील अलंकार " शाळेत अभास म्हणून शिकलेला, आता आस्वाद घेण्यासाठी.
उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अनुप्रास, यमक, व्यतिरेक, इत्यादी ५०-६० अलंकार मम्मटाच्या काव्यप्रकाशात दिले आहेत. त्यातही उपमेचे १०-१२ उपभेद, रुपकाचे ५-६ असे वाढवत गेले म्हणजे[संख्येने]गाडगीळांच्या दुकानातल्या दागिन्यांच्या पेट्यांसारखे जवळ जवळ अगणीत होतात. आता भरतमुनी, मम्मट,भामह, दंडी यांची नावे येतील, पण ती केवळ दबदबा निर्माण करण्याकरिता. मग प्रतिसादात हल्ला करावयाच्या आधी लोक जरा विचार करतात. आणि माणूस विचार करू लागला म्हणजे तो हल्ला वगैरे काही करत नाही. तरीही बुजुर्ग चुका शोधतीलच.पण " आपण मार्गदर्शन करावे " असे पहिल्यांदीच म्हटले की झाले. तर त्यांची अनुज्ञा घेऊनच सुरवात करू या.
काव्यात सर्वात महत्व शब्द व अर्थ यांनाच. नंतर इतर . संस्कृतात एक छान रुपक आहे.काव्य ही एक लावण्यवती स्त्री अशी कल्पना करून,शब्दार्थ तीचे शरीर, अलंकार हे तीला शोभा देणारे दागिने, गुण स्वभावाचे विशेष, रीती ही ठेवण, रस हा तीचा आत्मा असे सुचवले आहे. अर्थात लक्षार्थाने. हे विसरून उपयोग नाही.जशी सुन्दर स्त्री अलंकारांशिवायही सुदरच असते तसे चांगले काव्यही अलंकारांशिवाय उत्तम असू शकते.[ मग त्याला स्वभावोक्ती म्हणून नावाजतात.] तर हे लक्षात ठेवूनच पुढील विवेचन.
सुरवात अगदी साध्या उदाहरणाने करू.एखाद्या स्त्रीचे वर्णन करतांना तीचे मुख सुंदर आहे असे न म्हणता ते चंद्रासारखे आहे असे म्हटले की वाचकाला जास्त आनंद होतो. का ? येथे वाचक काव्यात गुंततो. कसा? तर त्याने चंद्र पाहिलेला असतो, त्याला तो प्रिय असतो, त्या आवडलेल्या " चंद्रासारखे मुख " त्याला " सुंदर मुखा "पेक्षा जास्त आनंद देते. बस. सर्व अलंकारांचा उद्देश हाच.पद्धती निरनिराळ्या. नावे निरनिराळी. हेच वापरून वापरून चोथा झालेले उदाहरण परत बघू. येथे दोन गोष्टी आहेत. मुख व चंद्र.येथे मुख हे मुख्य. याचे वर्णन करणे हाच उद्देश. म्हणून त्याला प्रस्तुत म्हणावयाचे. या प्रस्तुताचे वर्णन करतांना चंद्र आला. म्हणून तो अप्रस्तुत.यानाच अनुक्रमे उपमेय व उपमान असेही म्हणतात.
शब्दालंकार व अर्थालंकार हे दोन भेद.शब्दांवरूनच त्यांचे अर्थ लक्षात येतात.आपण दोहोंचीही उदाहरणे बघणार आहोत. आता उपक्रमकार सहनशील आहेत, कबूल. पण त्यांचा आणि तुमचाही
अंत पहावयाचा नाही म्हणून सगळे अलंकार सांगता येणार नाहित . [ किती जणांनी हुश्श्य केले ? ] थोडे बघू. आवडले तर इतर तज्ज्ञही मदतीला धावतीलच. हां, आणि एक. उदाहरणॆ
तुम्हाला आवडतील याची खात्री देतो. शिवाय माझा आग्रह आहे की आपण जाणकार रसिकांनी त्यात भर घालावी. अधिकस्य अधिकं फ़लं !
शालेय पद्धतीने सुरवात करावयाची झाली तर प्रथम उपमा. पण आपण थोडेच शाळेत आहोत ? सुरवात अपह्नुतीने करतो. प्रस्तुताचा निषेध करून त्यावर अप्रस्तुताचा आरोप केला असतो
तेव्हा हा अर्थालंकार होतो. थोडक्यात लपविणे, चकवणे.जेव्हा प्रस्तुत-अप्रस्तुत या दोघांना लागू पडणारे श्लिष्ट [द्य्वर्थी] शब्द वापरून ऐकणाऱ्याला गोंधळात पाडले जाते तेव्हा होते छेकापह्नुती.[छेक-चतुर]
येथे एक जण एक विधान करतो. ऐकणारा सरळ अर्थ काढून " असे का " विचारतो. मग पहिला " छे,छे,तसे नाही,असे " म्हणतो.संस्कृत सुभाषितांच्या वेळी आपण त्याचे उदाहरण पाहिले होते. आज मराठी बघू.
अंबरगत१ परि पयोधराते२ रगडुनि पळतो दुरी,
काय हा धीट म्हणावा तरी !
तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हया हरी,
नव्हे ग मारुत मेघोदरी.
सुवर्ण३ पाहुनि तनुवरी वंचक रात्रीं शिरतो घरीं,
टाकतो हस्त तसा तनुवरीं !
तो नंदाचा मुल काय गे सांग कन्हया हरी,
नव्हे हा दस्यु४ समज अंतरीं.
सुंदर रति५ जोगता मिळाला पति हे सुभगा खरी,
दुजीला असा मिळेल काय तरी !
तो नंदाचा मुल काय गे सांग कन्हया हरी,
नव्हे ग रतिला मन्मथ६ वरी .
राधेला सखीला सांगावयाचे आहे, आणि त्याच वेळी नाकारवयाचेही आहे. कन्हयाचीही तीच गत.
कंठी लपेटुनी सदा असावी सुभगा७ गुणशालिनी८
वाटते पुष्पवती९ शोभिनी !
वृषभानूची सुता काय ती राधा लिकुचस्तनी१० ?
नव्हे रे माळ आठवली मनीं.
अधरचुंबिनी वंशसंभवा११ लालसमधुरध्वनी,
असावी मुखासि मुख लावुनी !
वृषभानुची सुता काय ती राधा लिकुचस्तनी ?
नव्हे रे मुरली जगमोहिनी.
नखक्षताने मृदुक्वणन्ती१२ नवनवगुणरागिणी१३
धरावी वाटे कवटाळुनि !
वृषभानुची सुता काय ती राधा लिकुचस्तनी ?
नव्हे रे वीणा मृदुभाषिणी.
--राम जोशी
१. वस्त्र, आकाश, २.स्तन, ढग; ३.चांगला रंग, सोने; ४.चोर; ५. शृंगार क्रीडा, मदनाचे स्त्री; ६. मदन ; ७. प्रिया, सुंदर; ८. गुणी, दोरीत ओवलेली; ९. ॠतुमती, फ़ुले असलेली
१०. विलायती फ़णस; ११. चांगल्या वंशात जन्मलेली,वेळुपासून बनविलेली; १२. नाजुक, गोड आवाज करणारी; १३. नवीन नवीन प्रेमाचे प्रकार दाखविणारी,नवीन नवीन राग गाणारी.
शरद
Comments
मजेशीर/छेकापह्नुती
छेकापह्नुतीची माहिती आणि उदाहरण मजेशीर आहे :) अलंकाराविषयीचे सुरुवातीचे विवेचन आवडले.
'छेकापह्नुती'चा शब्दशः अर्थ काय आहे? पह्नुती प् + अ + ह् + न् +उ + त् + ई असेच लिहायचे ना?
छेकापह्नुती
छेक म्हणजे चतुर हे वर आलेच आहे. अपह्नव किंवा अपह्नुति म्हणजे लपवणे. जेथे एखादी वस्तू काय आहे ती निश्चित माहीत असून ती ती नाहीच असा निषेध करून, ती दुसरीच वस्तू आहे असे चतुराईने प्रतिपादन केले असते, तिथे हा अलंकार होतो.
प्रकृतम् यन्निषिध्यान्यत्साध्यते सा त्वपह्नुति: । मम्मटाचा काव्यप्रकाश १०.२२. --वाचक्नवी
धन्यवाद!
या माहितीबद्दल धन्यवाद!
राम जोशी
लेख वाचताना मजा आली. तुम्ही दिलेली कविताही मस्त आहे.
राम जोशींबद्दल काही लिहा ना जमले तर!
चांगला लेख
>>लेख वाचताना मजा आली. तुम्ही दिलेली कविताही मस्त आहे.
असेच म्हणतो.