२००७ चा ऍबेल पुरस्कार

भारतीय वंशाचे अमेरिकन गणिती श्री. श्रीनिवास एस. आर. वर्धन यांना २००७ चा गणितातील ऍबेल पुरस्कार घोषित झाला आहे. ते न्यूयॉर्क विद्यापीठात कुरँट गणित विज्ञान संस्था येथे गणिताचे प्राध्यापक आणि विज्ञानाचे फ्रँक जे. गोल्ड प्राध्यापक आहेत. प्रचंड तफावत न्याय (Large Deviation Principle) शोधून काढण्याच्या मूलभूत संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. मानचिन्ह आणि एक दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४.२३ कोटी रूपये) इतकी रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

ऍबेल पुरस्कार हा केवळ गणितासाठी देण्यात येतो. आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रात गणितासाठी नोबेल पुरस्कार देण्यात येऊ नये अशी तरतूद होती. त्यामुळे केवळ गणित शाखेत पुरस्कार देण्यात यावा म्हणून बऱ्याच गणिततज्ञांनी प्रयत्न केले. चाळीशीच्या आत वय असलेल्या गणितींसाठी फिल्डस् पदक देण्यात येते. तर, २००३ सालापासून नॉर्वेच्या विज्ञान व भाषा समिती दरवर्षी ऍबेल पुरस्कार घोषित करते. ह्या पुरस्कार पात्र होण्यासाठी श्री. वर्धन यांनी जे संशोधन केले त्याचा एक आढावा घेऊ या.

सांख्यिकीमध्ये शक्यता सिद्धांताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शक्यता सिद्धांतामध्ये सामान्य वितरणाच्या अभ्यासावर भर असतो. समजा आपण साप-शिडीच्या खेळातील फांसे फेकले तर १ ते ६ यापैकी कुठलेही दान पडण्याची शक्यता किती आहे हे कसे वर्तवता येईल? समजा एक हजार वेळा दान फेकले आणि प्रत्येक वेळी कोणता अंक आला यांचे विश्लेषण केले तर त्याचा अभ्यास करून कोणता अंक येण्याची शक्यता सर्वाधिक आहे हे सांगता येते. प्रचंड तफावत न्याय याच्या वेगळ्याच पैलूचा विचार करतो. समजा, ४ अंक येण्याची शक्यता ६७०/१००० (हजारी ६७०) आहे. तसेच ६ अंक येण्याची शक्यता ३५/१००० (हजारी ३५) आहे. येथे ६ अंकाची शक्यता तुलनेने अगदीच नगण्य आहे हे चटकन सांगता येईल. आता, प्रचंड तफावत न्यायाच्या दृष्टीने त्यानुसार, सलग १० वेळा फांसे फेकल्यावर ६ चाच आंकडा येईल ही शक्यता वर्तवता येते.

ह्या न्यायाचा व्यावहारिक उपयोग सांगण्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे विम्याचा हप्ता होय. विमा काढणारी संस्था, हप्ता ठरवतांना जी शक्यता फार कमी आहे त्याचा विचार करून तो ठरवीत असते. त्यामुळे अशी नगण्य शक्यता असलेली गोष्ट झालीच तर विम्याची रक्कम ती संस्था मुदतीपूर्वीच देते. त्यांना या न्यायाचा खूप उपयोग होतो. याशिवाय कणभौतिकी (particle physics), सांख्यिकीय भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, वाहतूक अभियांत्रिकी, संगणन अशा अनेक शास्त्रांमध्ये या न्यायाचा वापर फार महत्त्वाचा ठरणार आहे.

हा न्याय मांडण्यासाठी श्री. वर्धन यांना अरेषीय बिजणित, अपूर्ण विकलनीय समीकरणे आणि गणितातील अनेक क्लिष्ट शाखांना एकाच माळेत गुंफावे लागले. भारताचे नांव उज्ज्वल करणाऱ्या आणि गणितात मोलाची भर टाकणाऱ्या या गणितीस विदग्धचा मानाचा मुजरा!

इंग्रजी दुवा - http://www.abelprisen.no/en/prisvinnere/2007/

(शैलेश श. खांडेकर)

लेखनविषय: दुवे:

Comments

मानाचा मुजरा

कृपया शेवटचे वाक्य "भारताचे नांव उज्ज्वल करणाऱ्या आणि गणितात मोलाची भर टाकणाऱ्या या गणितीस आमचा मानाचा मुजरा!" असे वाचावे.
शैलेश

स्तुत्य घटना

ऍबेल पुरस्कार मिळणे ही खरंच गौरवाची आणि सर्व भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

पण... परदेशात राहणार्‍या भारतीयांच्या कामगिरीने भारताचे नाव खरच उज्वल् होते का?

भारतीय पण भारत नाही

"भारतीय" वंशाचं असणं ही अमेरिकेत राहणार्‍या लोकांची एक "जात" आहे. तेंव्हा प्रा. वर्धन हे भारतीय वंशाचे आहेत हे केवळ त्यांची जात दर्शवणारं वाक्य आहे. त्याचा भारताशी काही (महत्वाचा) संबंध आहे असं मला वाटत नाही.

पण...

मग प्रा. वर्धनांच्या बाबतीत नक्कीच आय. एस. आय. कलकत्ता चा गौरव आहे. आणि ही शिक्षण संस्था भारतीय आहे म्हणून हा भारताचा गौरव आहे, पण हे परस्पर संबंधाचं वाक्य नाहिये ह्याउलट तुम्ही दिलेल्या प्रतिसादात आय आय टी चा आणि नारायण मूर्तींचा परस्पर संबंध आहे.

मी म्हणतोय हा बहुसंख्य "अ-भारतीय" लोकांचा दृष्टिकोन असावा असं मला समजलेल्या इथल्या मानसावरून वाटतं. मध्यंतरी चंद्रशेखर ह्या नामवंत खगोलशास्त्रज्ञाबद्दल एका मुलाखतीत त्यांच्या एका सहकार्‍याला एका भारतीय पत्रकाराने विचारलं होतं कि तुम्हाला चंद्रशेखरांच्यामध्ये काही खास इंडियन वाटतं का. त्या सहकार्‍याला काय् उत्तर द्यायचं कळलं नाही म्हणून तो म्हणाला - हो चंद्रशेखरांच्या "टी पार्टी" छान असायच्या! म्हणजे चंद्रशेखरांचा आणि भारताचा संबंध त्यांना केवळ त्यांच्या काही लकबींपुरताच वाटत होता. हाच माझा मुद्दा आहे.

बरोबर आहे

ख्रिर्‍यांचा मुद्दा पटणारा वाटतो खास.
रम्या

छान

छान माहितीपूर्ण लेख.
--लिखाळ.

वा!

नवी माहिती कळली. धन्यवाद.

श्रीनिवास एस. आर. वर्धन यांना आपलाही मानाचा मुजरा.

माहीती आवडली.

उत्तम

उत्तम माहितीपूर्ण लेख. सर्किटरावांच्या प्रतिसादामधूनही मोलाची माहिती मिळाली. श्री. वर्धन ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि ही माहिती पुरवल्याबद्दल शैलेश आणि सर्किट यांचे आभार.

मनःपूर्वक आभार

आपल्या प्रतिक्रियांसाठी मनःपूर्वक आभार! गोल्ड प्राध्यापक या विषयावर सर्किटरावांनी चांगली माहिती दिली आहे, त्यासाठी त्यांचे विशेष आभार!

स्नेहांकित,
शैलेश

शाब्बास..

शाब्बास श्रीनिवास एस आर वर्धन,

छान काम करून दाखवलंत. आपल्याकडून अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, हीच आम्हा सर्व भारतीयांची शुभेच्छा..

आपला,
(निवासी भारतीय!) तात्या.

उत्तम

उत्तम लेख, शैलेश. वर्धन यांचे मन।पूर्वक अभिनंदन.
राजेंद्र

 
^ वर